Saturday, 31 December 2016

छोटा आनंद अनुभवण्याचा संकल्प !!

संग्रहित छायाचित्र
सन २०१६ सरत असताना वर्षभरात मी काय केले ? याचा मनोमनी विचार करीत होतो. जाणारे वर्ष तसे माझ्यासाठी अनपेक्षित वळणाचे ठरले. वेतनभोगी कर्मचाऱ्यांच्या गटातून मी स्वयंरोजगाराच्या गटात आलो. कधीकधी इष्टापत्ती आपल्या क्षमतांना नवे आव्हान देते आणि आव्हानास पेलण्याची रग, धमकही देते. अशाच परिस्थितीतून तावुन सलाखून निघण्याचा अनुभव मी घेतला. अजुनही घेतोय.

Friday, 23 December 2016

सोशल मीडियाचा जळगाव पॅटर्न

विविध प्रकारची गतीमान माध्यमे वापराची सध्या वावटळ (बूम) आहे. पारंपरिक माध्यमे वृत्तपत्रे, टीव्ही आणि सिनेमा यांच्यासमोर इंटरनेटद्वारा वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडियाने अनेक आव्हाने उभा केली आहेत. दिवस आणि रात्रीचे २४ तास सोशल मीडिया धावत असतो. त्यावरील लिखीत, चित्र, व्हीडीओ स्वरुपातील संदेश निर्मिती व वहन सतत सुरू असते. अशा या सोशल मीडियाच्या विधायक, सकारात्मक व कृतीशिल वापराची अनेक उदाहरणे जळगावकरांनी निर्माण केली आहेत. सोशल मीडिया वापराचा युनिक पॅटर्न जळगावकरांनी जन्माला घातला आहे.   

Wednesday, 21 December 2016

जि.प. निवडणुकांसाठी गिरीशभाऊंचा बुस्टर डोस ...

जळगाव जिल्ह्यात पालिकांच्यानंतर आता ग्रामीण राजकारणाची सत्ताकेंद्रे असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या निवडणुकीचा ज्वर चढतो आहे. जिल्ह्यासह राज्यातील नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकत क्रमांक १ चा पक्ष म्हणून लौकिक मिळविला आहे.  आता ग्रामीणच्या लढाईत पंचायत समित्या जिंकण्यासह जिल्हा परिषदही पुन्हा काबीज करण्याचे भाजपसमोर आव्हान आहे.

Friday, 16 December 2016

समांतर रस्त्यांच्या श्रेयासाठी झगडा !!!

जळगाव शहर, जिल्हा लगतच्या परिसरातून रस्ते, राज्यमार्ग व महामार्ग विकासासाठी सुमारे १८ हजार कोटी रुपयांची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दि. २५ जानेवारी २०१६ ला जळगाव येथे केली होती. या रस्त्यांच्या विकासाचा प्रारंभही गडकरींच्या हस्ते तेव्हा झाला होता. प्रारंभाच्या कामाची कोनशिला नंतर कुठे लावण्यात आली ती आजपर्यंत पाहायला मिळालेली नाही किंवा जळगाव परिसरात रस्त्याच्या विकासाचे काम सुरू झाल्याचे ऐकीवात नाही.  

Thursday, 15 December 2016

मंत्री जानकरांची चूक आणि इतरांच्या घोडचुका ...

सत्तेत असलेला पक्ष आणि विरोधकांच्या भूमिकेतील पक्ष आपापल्या राजकिय खेळीचे पत्ते काळ वेळ पाहून फेकत असतात. अशावेळी राजकारणातील चूक आणि घोडचूक याची तुलना करीत न्याय मागण्याचा मनभावीपणा केल्याचे विरोधी पक्ष दाखवत असतात. एखाद दुसऱ्याला मंत्री पदावरुन पाय उतार करीत काहींना वाचविण्याचा प्रयत्न सत्ताधारी करीत असतात. कधी काळी आपणही सत्तेत असताना आपल्या लोकांनी कोणत्या घोडचूका केल्या आणि त्याचे काय प्रायःश्चित्त घेतले याचा सोयीने विसर विरोधकांना पडतो. काँग्रेसला सिमेंट घोटाळा, पीएचडी पदवी घोटाळा, मुंबईवरील अतिरेकी हल्ला प्रकरणात हलगर्जीपणा, आदर्श इमारत घोटाळा अशा अनेक गाजलेल्या प्रकरणात मुख्यमंत्री बदलावे लागले होते. कोहीनूर प्रकरणाच्या आरोपानंतर शिवसेनेलाही मुख्यमंत्री खांदेपालट करावा लागला होता. राष्ट्रवादी काँग्रेसनेही आरोपांमुळे उपमुख्यमंत्री बदलले. हा इतिहास सर्वांना माहित असताना आज विरोधक म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना मनभावीपणा करीत आहेत. 

Monday, 12 December 2016

ब्रम्हाच्या सहवासातील ते प्रसंग ...

जैन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष तथा जेष्ठ सामाजिक जाणिव असलेले विचारवंत पद्मश्री स्व. भवरलालजी जैन तथा स्व. मोटेभाऊ यांचा आज जन्मदिवस. पहिलांदा असे घडले की, भाऊंचा जन्मदिवस असूनही आज जैन हिल्सवर जाण्याची संधी नाही. गाभाऱ्यात परमेश्वराची प्रतिमा नसताना तेथे जाणे टाळावे लागते. तद्वतच जैनहिल्सवर स्व. मोठेभाऊंची उपस्थिती नसणे या दोन्ही भावना माझ्यासाठी आज तरी एकच आहेत.  

Thursday, 8 December 2016

मृतप्राय जिल्हा काँग्रेसचा दोष कोणावर ?

काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर अखिल भारतीय स्तरावर पहिले ग्रामीण अधिवेशन घेणाऱ्या जळगाव जिल्ह्यात काँग्रेस पक्ष आज पूर्णतः मृतप्राय झाला आहे. जिल्हा व जळगाव शहरस्तरावर मोजक्या मंडळींनी संघटनात्मक पदे अडकून ठेवल्यामुळे काँग्रेसमध्ये नव्या कार्यकर्त्यांची प्रवेश प्रक्रिया थांबली आहे. या घडीला पक्षाचे जिल्हाध्यक्ष किंवा जळगाव शहराध्यक्ष हे दोघेही पक्षांतर्गत क्रियाशिल कार्यकर्ते किती हा आकडाही सांगू शकत नाहीत.  

Monday, 5 December 2016

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मला काय दिले ?

सध्याच्या समाजाची विभागणी भक्त (Divoties), अनुयायी (followers), पंथीय (Stoic) आणि कार्यकर्ता (Workers) अशा चार प्रकारात केली जाते. या चारही शब्दांना विशिष्ट कृतीचा ठोस अर्थ आहे. प्रत्येक शब्दाशी निगडीत भाव, वर्तन व आचरण विभिन्न आहे. देवादिकांच्या कर्मकांड मार्गावर चालणारा भक्त, आदर्श व्यक्तीच्या विचारांनुसार आचरण किंवा अनुनय करणारा अनुयायी, जगण्याची विशिष्टशैली स्वीकारुन एकाच पथ वरुन चालत ओळख जपणारा पंथीय आणि व्यक्ति, समाज, पक्ष, संघटन यासाठी झेपेल व पडेल ते कार्य करणारा कार्यकर्ता अशा या ढोबळ व्याख्या आहेत.

Wednesday, 30 November 2016

९ नगराध्यक्ष अल्पमतात

दोन वर्षांच्या स्थैर्याची हमी, नंतर अविश्वासाचे अस्त्र

जळगाव जिल्ह्यात नुकतीच निवडणूक झालेल्या १२ पालिकांमध्ये लोकनियुक्त १२ सह एका नगर पंचायतीतील नगराध्यक्षांपैकी ८ नगराध्यक्ष अल्पमतात आहेत. यात ५ नगराध्यक्ष भाजपचे, २ शिवसेनेचे, २ आघाड्यांचे आहेत. पक्षाच्या बहुमताच्या पाठबळावर ५ वर्षे पदावर राजकीय संसार करु शकतील असे ४ नगराध्यक्ष ज्यात भाजपचे २, शिवसेनेचे १ व आघाडीचे १ नगराध्यक्ष आहेत.

भाजपतील अर्धा प्याला ... !

नशा मद्याची असते तशी ती सत्तेचीही असते. सत्तेच्या नशेत मिळणारे यश कधी भरलेल्या प्याला प्रमाणे असते. म्हणजे १०० टक्के विजयाचा कैफ देणारे. कधी कधी सत्तेचा प्याला हा अर्धाच भरला जातो. काही तरी मिळवताना बरेच काही गमावले जाते. अशा प्रकारचे यश हे अर्धा भरलेल्या प्याला प्रमाणे असते. यात यश ५० टक्के असते तर अपयश ५० टक्के असते. जळगाव जिल्हा भाजपतील नेत्यांच्या प्रभावळीची अवस्था ही अशीच आहे. सर्व सामान्याला अर्धा पेला भरल्यागत वाटणारी आणि भाजप कार्यकर्त्यांना अर्धवट रिकामा वाटणारी.

Monday, 28 November 2016

अमळनेर नगराध्यक्ष विजयाचा अन्वयार्थ

अमळनेरमधील स्थानिक पुढाऱ्यांनी एकत्र येवून स्थापन केलेल्या शहर विकास आघाडीच्या सौ. पुष्पलता साहेबराव पाटील या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या. या विजयाचे विश्लेषण काही मंडळी चुकीच्या पध्दतीने करीत आहेत. राज्यभरात मराठा क्रांती मोर्चे निघाल्यानंतर मराठ्यांनी एकत्र येवून मिळवलेला हा विजय असल्याचे चित्र काही जण रंगवत आहेत. असा दावा करणे हे धोकेदायक आहे. अमळनेरचा विजय केवळ एका समाजामुळे शक्य झाला असे म्हणत यशाचे श्रेय विशिष्ट घटकाने घेणे हे भविष्यातील राजकीय डावपेच उध्वस्त करणारे ठरू शकते.

Tuesday, 22 November 2016

गिरीश महाजनांचे निर्विवाद वर्चस्व ...

विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे चंदुलाल पटेल हे दणदणीत मताधिक्य मिळवून विजयी झाले. पटेल यांच्या विजयामुळे जळगाव जिल्ह्यातील सर्व समावेश राजकारणावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे निर्विवाद वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले. महाजन आणि त्यांच्या सोबतींचे व समर्थकांचे हे निर्मळ यश आहे.

चंदुलाल पटेल विजयी झाल्यानंतर आनंदोत्सव साजरा करताना महाजन, पटेल यांच्यासोबत राज्यमंत्री गुलाबराव पाटील (शिवसेना), सुरेशदादा जैन (शिवसेना व खाविआचे नेते), महापौर (खाविआ), ललित कोल्हे (मनसे), कैलास सोनवणे (कधीतरी स्थापन केलेली शहर विकास आघाडी) होते. याच नेत्यांच्या गर्दीत भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार सुरेश भोळे, गोविंद अग्रवाल व डॉ. गुरुमुख जगवानी यांचेही हसमुख चेहरे पाहता आले.  

Wednesday, 16 November 2016

धार्मिक स्थळांची संपत्ती खरेच जप्त करावी?

नोटा बदलाच्या निर्णयानंतर सोशल मीडियात एक संदेश फिरतो आहे. तो म्हणजे, आता मंदिरांची संपत्ती सरकारने ताब्यात घ्यावी अशी मागणी करणारा. हा मेसेज कोणती मंडळी फॉर्वर्ड करीत आहेत? ज्यांनी कधीही मंदिराच्या दानपेटीत रुपया टाकला नाहीज्यांनी कधीही मंदिरासाठी देणगीची पावती फाडली नाही, अशी मंडळी हा मेसेज फास्ट फॉर्वर्ड करीत आहे. मेसेज फॉर्वर्ड करायला काहीही हरकत नाही. पण, जेव्हा मंदिरांची संपत्ती ताब्यात घ्यावी असे जेव्हा आपण लिहू शकतो तेव्हा मशीद, चर्च, गुरुद्वारा आदी प्रार्थना किंवा धर्मस्थळांचीही संपत्ती ताब्यात घेणे अपेक्षीत असते का? जेवढ्या सहजपणे आपण मंदिर लिहू शकतो तेवढ्या सहजपणे इतर प्रार्थनास्थळांचा उल्लेख करु शकतो का? याचा खुलासा होत नाही.

Monday, 14 November 2016

बनावट नोटा ... दहशतवाद आणि पाकिस्तान

(कृपया लेख जरुर वाचा. मात्र संपूर्ण लेख कॉपीपेस्ट करु नका. इतरांना लेखाची लिंक पाठवा)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. ९ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्री पासून भारतीय चलनातून ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्या. या निर्णयाचे अनेक बरे-वाईट परिणाम सर्वत्र दिसत असून भारतीय नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होत आहे हे निश्चित. परंतु, सर्वांत लक्षवेधी परिणाम हा भारत-पाकिस्तान सीमेवर दिसत असून नोटा रद्दच्या निर्णयानंतर सीमेपलिकडून भारतात होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी आणि त्यांना संरक्षण देण्यासाठी पाकिस्तानी सैनिक करीत असलेला अंदाधुंद गोळीबार पूर्णतः थांबला आहे. याशिवाय जम्मू-काश्मीरात कुठेही सैन्यदलांच्या विरोधात असंतोषाच्या घटना नाहीत. पाकिस्तानमध्ये तयार झालेल्या भारतीय चलनातील बनावट नोटा घेवून आता कोण मरायला भारतात घुसखोरी करेल? किंवा जम्मू-काश्मीरात बनावट नोटा घेवून कोण दगड फेकेल?   या मागील कुटनिती समजून घ्यायला बनावट नोटा ... दहशतवाद आणि पाकिस्तान याचा संबंध समजून घ्यावा लागेल. 

Sunday, 13 November 2016

व्यापारातील भविष्यकार !!

कार्पोरेट कल्चरचे शिक्षण देणारे बोर्डरुम नावाचे एक पुस्तक आहे. त्याचे वाचन साधारणतः १५/१६ वर्षांपूर्वी अकोला येथे असताना मी केले होते. त्या पुस्तकातील बाजारपेठ (मार्केट), विपणन (मार्केटींग), ग्राहक आणि त्यांच्या सवयी (कस्टमर हैबीट), प्रतिष्ठान-संस्था  (कंपनी) आणि समुह कार्य (टीमवर्क) हे विषय मी झपाटल्यागत वाचले होते. बाजारपेठ आणि व्यापार याचा जुजबी परिचय झाला होता. फारसे काही समजले नव्हते. विषयाची कार्यपध्दती (थीअरी) समजली. प्रात्यक्षिक (प्रैक्टीकल) समजून घ्यायला जागा नव्हती.

Tuesday, 8 November 2016

राजकिय जाहिरातींचा किमयागार !

जळगाव जिल्ह्यात विधान परिषदेच्या जळगाव मतदार संघासाठी आणि १३ नगरपालिकांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. याच बरोबर विधान परिषदेच्या नाशिक पदविधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार होणे सुरू आहे. एकूणच राजकिय वातावरणात गर्मी आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत राजकिय पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून एकमेव भाजचे उमेदवार रिंगणात आहेत. इतर उमेदवार अपक्ष आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या जाहिर प्रचाराचा धुराळा फारसा उडणार नाही. थेट मतदाराशी लेन-देनच्या व्यवहारावर सारे काही अवलंबून असल्यामुळे उमेदवार वृत्तपत्रात किंवा इतर प्रचारावर फारसा खर्च करणार नाही. पालिकांच्या निवडणुकीचा प्रक्रिया माघारीच्या फेरीत आहे. त्यानंतर चित्र स्पष्ट होईल. यावेळी नगराध्यक्षपदासाठी शहरांमधील सर्व मतदार मतदान करतील. म्हणजेच नगराध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेतून तीन वर्षांच्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या संभाव्य बदलाची कल्पना येवू शकते. विज्ञानाच्या प्रयोगिक भाषेत बोलायचे तर नगराध्यक्षांची निवडणूक ही लिटमस टेस्ट आहे. नगराध्यक्ष निवडणुकीसाठी प्रचाराची मोठी रणधुमाळी जवळपास सर्वच ठिकाणी दिसते आहे. अशा या साऱ्या गर्मीच्या वातावरणात निवडणुकीच्या जाहिर प्रचाराची साधने अद्यापही थंडावलेली दिसतात.  

Sunday, 6 November 2016

आतेभावाचे नाते हळव्या मैत्रिचे ...

तुमच्या घरात किती खोल्या आहेत आणि तुम्हाला त्यात सुख व समाधानाने राहायला किती जागा आहे यावर माणसाची श्रीमंती ठरत नाही. तुम्हाला किती मित्र आहेत आणि त्यांच्याशी तुम्ही किती मोकळेपणाने बोलू शकता यावरच माणसाचे ऐश्वर्य ठरते. अशा प्रकारचे मित्र मला भरपूर आहेत. अनेकांशी मी अत्यंत खुलेपणाने बोलू शकतो. यात मित्रांच्या गोताळ्यात माझा एक सख्खा आणि सच्चा नातेवाईक आहे. तो म्हणजे पारोळा निवासी तथा विमा विकास अधिकारी असलेला आतेभाऊ मिलींद मिसर. मिलींद नात्याने आतेभाऊ आहे पण सहवासातून आम्ही मित्र आहोत. एकमेकांविषयी मोकळेपणे बोलायच्या आम्ही एकमेकांच्या जागा आहोत. आयुष्याच्या वळणावरील अनेक कटू व गोड आठवणी आम्ही एकमेकांना सांगितल्या आहेत आणि त्या व्यक्तिगत स्वरुपातच जपल्या आहेत. त्याचा गावभर कधी बभ्रा केला नाही.

Monday, 31 October 2016

जळगाव जिल्हा भाजपतील सोयीची साठमारी ...

जिल्ह्यातील नगर पालिकांच्या निवडणुकीत भाजपच्या जिल्हा नेत्यांनी सोयीचे राजकारण आरंभले आहे. राज्यस्तरावर भाजप-शिवसेना युती होणार अशी घोषणा झाल्यानंतरही भाजपच्या जिल्हा पुढाऱ्यांनी स्वबळाचा अहंकार कुरवाळत सवतेसुभे निर्माण केले आहेत. या निवडणुकांमध्ये नगराध्यक्ष हे शहरातील मतदारांच्या सार्वत्रिक मतदानातून निवडून येतील. त्यामुळे सर्वच विधानसभा क्षेत्रात नगराध्यक्ष निवडणूक म्हणजे आगामी निवडणुकांची लिटमस चाचणी ठरणार आहे. मात्र या निवडणुकांनी जिल्हा भाजपत राजकीय साठमारीचा खेळ सुरु केला आहे. विरोधकांना सोडून जिल्हा नेते आपल्याच लोकांना बडवून काढत आहेत.

Sunday, 30 October 2016

युवर प्रॉब्लेम्स अर्जन्ट सोल्युशनची भोंदूगिरी !!

कोणत्याही अडचणी, प्रश्न, समस्यांमुळे माणसं परेशान असतात. घरगुती, कौटुंबिक, नातेसंबंधातील किंवा मित्र परिवारातील अथवा नोकरी, उद्योग, व्यवसाय यासह व्यापारातील काही विषय अडथळे घेवून उभे राहतात. अशा स्थितीत मानसिक, शारिरीक ताण तणाव निर्माण होतो. आर्थिक दबाव सुध्दा मानगुटावर बसतो. ही अवस्था अस्वस्थ तथा बैचेन करणारी असते. मनातले सांगायला कोणीही जवळचा नसेल तर अबोल, निश्चल न निःशब्द अवस्था अधिकच एकाकी करते. आणि मग प्रयत्न सुरु होतो समस्या, प्रश्न सोडविण्याचा नव्या तथा अघोरी मार्गांचा.

Friday, 28 October 2016

मुखवटा आणि चेहऱ्यातला संघर्ष ...

टाटा उद्योग समुहाचा चेहरा आजही टाटा परिवारातील अर्ध्वयू रतन टाटा हेच आहेत. परंपरा, विश्वास, प्रगती आणि राष्ट्रहित या मुल्यांची जोपासना करीत टाटा समुह गेल्या १४८ वर्षांत जगभरात विस्तारला. रतन टाटांच्या नंतर कोण ? हा प्रश्न निकाली काढताना सायरस मिस्री यांना टाटांचे वारस नेमले गेले. मात्र, अवघ्या ४ वर्षानंतर सायरस यांना वारसा पदावरुन पायउतार करण्यात आले. या मागील अनेक कारणे हळूहळू समोर येत आहेत. मुख्य कारण मुखवटा आणि चेहरा यांच्यातील संघर्ष हेच आहे, हेही स्पष्ट होत आहे. कार्पोरेट क्षेत्राचा खरा चेहरा हा संचालकांचे आपापसातील वर्तन, त्यांची कर्मचाऱ्यांशी वागणूक आणि लाभार्थी, ग्राहक तथा हिचिंतकांशी व्यवहार यावर ओळखला जातो. मात्र, बड्या उद्योग समुहात दिसणारे चेहरे आणि दाखवायचे मुखवटेही अनेक असतात. अशावेळी टाटांचा मूळ चेहरा आणि सायरस यांचा मुखवटा यांच्यात संघर्ष होतो. त्याचीच ही कारणमिमांसा ...  

Friday, 21 October 2016

मालक आणि सहकारी एक अनोखे नाते

जगभरात औद्योगिकरणाचे वारे वाहू लागल्यानंतर उद्योजक व कामगारांचे, मालक व नोकराचे नाते अस्तित्वात आले आहे. बदलत्या काळाने या नात्याला भांडवलदार तथा शोषक आणि कामगार, मजूर तथा शोषणग्रस्त असेही रुप दिले.  जगभरातील नोकरदार हा आजही असंतुष्ट, अस्वस्थ असून काम करुन घेणारी यंत्रणा त्याचे शोषण करते किंवा त्याला कामाच्या श्रमाचा मोबदला कमी देते अशी तक्रार जवळपास सर्वांची आहे. भारतात सरकारी व निमसरकारी सेवेतील कर्मचारी तथा कर्मचाऱ्यांचे संघटन आहे. त्यांना त्याच्या बळावर सहावा वेतन आयोग लागू करून सातवा वेतन आयोग स्वीकारण्याची स्थिती निर्माण करता येते. विधीमंडळ किंवा संसदीय मंडळात जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी असलेले नेतेही स्वतःचे वेतन वाढवून घेतात. 

Wednesday, 19 October 2016

हलक्या पायांची नेते मंडळी

जळगाव महानगर पालिकेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून २५ कोटींचा निधी दिल्याचा आनंदोत्सव साजरा करताना दिवाळीपूर्व मनपाची दिवाळी असे म्हणत सत्ताधारी मंडळींनी फटाके फोडले. दुसरीकडे, याच विषयावर शंकेखोरांचा शिमगा सुरू आहे. राज्यात नगरपालिकांच्या निवडणुका लागल्या आहेत. त्याची आचार संहिता आहे. मग, हा निधी मिळेल का ? रस्त्यांचे प्रस्ताव इतर योजनेत मंजूर आहेत. मग, मागील प्रस्तावांचे काय ? २५ कोटी खर्चाचा प्रस्ताव नव्याने द्यावा लागेल ? अशा या शंका आहेत. या संदर्भात सर्वांत महत्त्वाचा मुद्दा हाच की, जळगाव हे महानगरपालिका क्षेत्र आहे. इतर नगरपालिकांच्या निवडणुकांच्या आचारसंहितेचा येथे कोणत्याही कामकाजावर परिणाम शक्य नाही. यापूर्वी इतर निवडणुकांच्या कामकाजाविषयी न्यायालयाने तसे निकाल दिले आहेत. त्यामुळे शंकेखोर मंडळींनी फारशी चिंता न करता मनपाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांचे काम करु द्यावे. 

Monday, 17 October 2016

भाजपतील “दबक्या पाऊलांची” माणसं !!

जळगाव जिल्ह्यात इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत पक्षीय बल व पदांच्या संख्येत भाजप कागदावर बळकट आहे. जळगाव जिल्हा भाजपचा बालेकिल्ला म्हणता येईल अशी स्थिती अजुनही आहे. दोन खासदार, विधानसभेचे ५ आमदार, विधान परिषदेचे २ आमदार असून जिल्हा परिषद, अनेक पंचायत समित्या, नगर पालिका यासह जिल्हा सहकारी बँक, दूध संघ, बाजार समित्या भाजपच्या ताब्यात आहेत. जिल्ह्यात फोफावलेला भाजप लक्षात घेवून राज्याच्या मंत्रीमंडळात जळगाव जिल्ह्यातून एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांना मंत्रीपदे मिळाली होती. यात खडसेंकडे १२ मंत्रालयांचा तर महाजनांकडे १ मंत्रालयाचा भार होता. महसूल, कृषि, राज्य उत्पादन शुल्क व जलसंपदा अशा वजनदार व मालदार खात्यांचा भार खडसे व महाजनांकडे होता. म्हणजेच जिल्ह्यातील मतदारांनी भाजपला जे भरभरुन दिले त्या बदल्यात पक्षानेही या जिल्ह्यातील नेत्यांना मंत्री रुपाने भरभरुन दिले होते.

Friday, 14 October 2016

सच्चा आणि अच्छा मित्र कैलासअप्पा !

काही माणसांची मैत्री का होते ? या प्रश्नाचे नेमके उत्तर कधीकधी देता येत नाही. मैत्रीतले नाते पाण्यासारखे नितळ आणि पारदर्शी असले की, मैत्री सुध्दा एकमेकात गुंतल्यासारखी होते. कैलासअप्पा सोनवणे यांच्याशी माझी मैत्री अशीच आहे. एकमेकात गुंतलेली. एकमेकांविषयी जिव्हाळा व आदर असलेली. म्हणून कैलासअप्पाचा उल्लेख एकेरी केला आहे.

Tuesday, 11 October 2016

सीएम फडणवीस आणि भाजपचा सोशल मीडिया सेल आहे कुठे ?

रायगडावर शिवराज्याभिषेकदिनी वंदन करणारे पहिले मुख्यमंत्री फडणवीस
महाराष्ट्रातील समाज मन सध्या सामाजिक विषयांवर अस्वस्थ आहे. आपापल्या समस्या मांडण्यासाठी विविध समाज, जाती एकत्र येवून संख्यात्मक ताकद दाखवित आहेत. मराठा समाजाचे मूकमोर्चे, बहुजन लेबल घेवून निघालेला माळी समाजाचा मोर्चा ही या शक्तीप्रदर्शनाची ताजी उदाहरणे. आपली शक्ती संख्यात्मक रुपात दाखवली जावी असे दलितांमध्येही घाटते आहे. विषय समोर नसल्यामुळे तूर्त त्यांची माघार आहे. मुस्लिमांच्या मनांतही असंतोष आहे. संख्यात्मक शक्ती दाखविण्याची सोय ते सुध्दा पाहत आहेत. मूकमोर्चांचे फलित संबंधित समाजाच्या पदरात काय पडते ? याचा विचार करुन ब्रम्हवृंद समाजही कडेकडेने निरीक्षण करतो आहे. असे हे वातावरण "तू एक अस्वस्थ ... मी एक अस्वस्थ" असे आहे.

Saturday, 8 October 2016

सर, आपण पत्रकार आहात का ???

गेली २६ वर्षे वृत्तपत्र माध्यमात विविध पदांवर काम करीत होतो. सात महिन्यांपासून वृत्तपत्राच्या संपादकिय कामकाजातून बाजुला झालो आहे. सोशल मीडियाशी संबंधित विविध पर्यायी माध्यमांचा वापर करीत पत्रकार म्हणून लिखाण सुरु ठेवले आहे. सकाळ, देशदूत व तरुण भारत या वृत्तपत्रांमध्ये फोटोग्राफर, बातमीदार, उपसंपादक, सहयोगी, सहाय्यक तथा मुख्यसंपादक म्हणून काम केले. या वृत्तपत्रांमधून सातत्याने लिखाण करीत आलो. सकाळमधील दखल हे सदर देशदूत व तरुण भारतमध्येही नियमितपणे लिहीले. सकाळमधील लेखांच्या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचा उत्कृष्ट वाडमय निर्मितीचा पुरस्कारही मिळाला. खान्देशातील अनेक संस्था, संघटनांच्या कार्यक्रमात संपादक म्हणूनही गेलो. वृत्तपत्राचा संपादक असलेली ओळख तेव्हा विशिष्ट परिघातच होती. वृत्तपत्रातून लेख लिहीताना संस्थात्मक धोरणाच्या आणि काही व्यावसायिक हितसंबधांच्या मर्यादा पाळाव्या लागत. कितीही तटस्थपणे आणि सत्य लिहायचे म्हटले तरी लेखणीचे स्वातंत्र्य आकसून जात असे.

Tuesday, 4 October 2016

कारभारी देवेंद्र यांच्या मापात पाप ... !!!

नाशिक येथे ओबीसी समाजाने मोर्चा काढून माजी उपमुख्यमंत्री तथा माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांची कारागृहातून सुटका कराण्याच्या मागणीचा राज्य सरकारवर दबाव निर्माण केला आहे. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामात कोट्यवधी रुपयांचा घोळ केल्याचा भुजबळ यांच्यावर आरोप आहे. भुजबळांवर हा आरोप केंद्र सरकारची यंत्रणा ईडी (अंमलबजावणी संचालनालय) ने केला असून त्याचे आरोपपत्र न्यायालयात दाखल आहे. भुजबळांवरील सर्व आरोपांची माहिती व त्यातील गांभीर्य लक्षात घेवून उच्च व सर्वोच्च न्यायालयानेही भुजबळांना गेल्या दीड वर्षात जामीन दिलेला नाही. अशा पध्दतीने कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात संशयित आरोपी असलेल्या भुजबळांची कारागृहातून सुटका करण्यासाठी ओबीसींच्या नावाने मोर्चा काढून झुंडशाहीचा काळा अध्याय लोकशाहीच्या नावावर लिहीला गेला आहे.

Monday, 3 October 2016

“ब्लॅक आऊट अच्छा है ...!!!”

ब्लॅक आऊट वर्धापनदिनाचा केक कापताना मान्यवर
ब्लॅक आऊट म्हणजे, वीजेचा पुर्णतः वापर बंद करुन अंधार करणे. युद्धाची स्थिती असलेल्या भागात शत्रू सैन्याचा रात्री होणारा हल्ला गृहीत धरुन नागरिकांना ब्लॅक आऊटसाठी आवाहन केले जाते. किंबहुना तशी सक्तीच असते. मात्र, ब्लॅक आऊटचा वापर एखाद्या कॉलनीतील रहिवासी वीज बचत करण्याच्या हेतूने सुरू करतात आणि त्यातून कॉलनी परिसरातील नागरिकांचा आपापसात, कुटुंबात संवाद वाढून विविध प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक व सामुहिक उपक्रम सुरू होतात. जीवनशैली बदलून टाकणारा हा अनुभव समाजाच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा आहे. 

Saturday, 1 October 2016

माँ शक्ति के उपासना का मूलार्थ

चरणसे यश प्राप्ती और वाचासे सर्वनाश
आजसे (दि. १ अक्तुबर २०१६) नवरात्री का हुआ है. हिंदू काल गणनानुसार वर्ष के १२ मास में चैत्र और अश्विन मास में माँ शक्ति की उपासना का पर्व हिंदू जनजाती में मनाया जाता है. हिंदू देविदेवताओंकी रचना हमारे समाज जिवनसे प्रभावित है. हिंदू जनजाती कुटुंबवत्सल है. पती, पत्नी और पुत्रादी से परिवार पूर्ण स्वरुप होता है. सामाजिक व्यवस्थाकी यह रचना हमारे देवादिकोके प्रतिको में हम अनुभवित करते है. देवादिक के पूजन का अर्थ अंधश्रध्दा नही, परंतु मानव जाती के भीतर कार्य और वर्तन से दर्शाए शौर्य, ममत्व, विश्वास और आस्था की प्रचिती है. माँ शक्ति का पूजन यह मानव जातीके शौर्य और गुणोंका पूजन है. 

Monday, 26 September 2016

दानशूर जळगावकरांची गरज आहे ...

आजची सकाळ भांबाळून टाकणारी ठरली. वृत्तपत्रात एकीकडे मास्टर डान्सर तनय मल्हारा च्या आगमनासाठी केलेल्या तयारीची बातमी होती तर दुसरीकडे परिवर्तन संस्थेने पुरुषोत्तम करंडक महोत्सव गुंडाळल्याची बातमी होती. एका बातमीत आनंद तर दुसरीत गोंधळ अशी ही भांबाळून टाकणारी स्थिती.  

Monday, 19 September 2016

नेत्यांच्या बगलबच्च्यांनी शांत बसावे !

साधारणपणे सहा महिन्यांपूर्वी ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या विरोधात अनेक आरोपांचा धुराळा उडाला होता. तेव्हा खडसे १२ खात्यांचे मंत्री होते आणि त्यांच्याकडील काही खात्यांशी संबंधित गैरप्रकारांची प्रकरणे चर्चेत आणली गेली होती. जवळपास प्रत्येक प्रकरणाचा इन्कार करीत खडसेंनी आपले निर्दोषत्व सिद्ध करायचा प्रयत्न केला होता. आपल्याच नियंत्रणातील अधिकाऱ्यांकडून क्लिन चीटही मिळविली होती. तेव्हा क्लिन चीट हा शब्दही खुपच चर्चेत आला होता. खडसेंवरील कोणते आरोप बिनबुडाचे आणि कोणते त्यांना त्रासाचे ठरणार या विषयी याच ब्लॉगवरुन सातत्याने लिखाण केले आहे. त्यामुळे त्या आरोपांचे विषय आज पुन्हा उगाळायचे नाहीत. मात्र, काल मुंबई हायकोर्टाने भोसरी (जि. पुणे) येथील एमआयडीसीशी संबंधित प्लॉट खरेदी प्रकरणात चौकशीचे आदेश देत खडसेंवर मंत्री म्हणून जे करायला नको ते केल्याचे ताशेरे ओढल्याच्या बातम्या आल्या. आता खडसेंची मंत्रीमंडळात पुन्हा वापसी होणार की नाही ? यावर पुन्हा प्रश्न चिन्ह लागले आहे. कोर्टाच्या या ताशेऱ्यांमुळे न्या. झोटींग समितीवर आता याच प्रकरणाची चौकशी अत्यंत कठोरपणे करण्याची जबाबदारी येवून पडली आहे. कारण, वर्किंग न्यायालय ताशेरे ओढत असताना निवृत्त न्या. झोटींग समितीचा गुळमुळीत अहवाल देवेंद्र फडणवीस सरकारची अब्रू घालवणारा ठरु शकतो.  

Friday, 16 September 2016

धावण्यासह जगणे शिकवणारा माणूस ... !!

सोशल मीडिया सोल्युशन इनेशिएटीव्ह ...

कधी कधी कामाच्या गडबडीत काही माणसांविषयी लिहायचे असूनही लिहायचे राहून जाते. आज काल माझे असेच होत आहे. दुसऱ्यांसाठी लेखन करायचे ठरविल्यापासून इतर माणसांमधील चांगुलपणा जास्त ठळकपणे दिसायला लागला आहे. दैनिकाचा संपादक असलेला माणूस स्वतःच्याच लेखन प्रेमात पडतो. आम्ही लिहू तेच समाजाचे चित्र असा सुलेमानी किड्याचा भ्रम त्याच्या डोक्यात असतो. पूर्वी लोक केवळ दैनिके वाचत. त्यामुळे बातम्या किंवा लेखांची दुनिया दैनिकाच्या पानांपुरतीच होती. ती सुध्दा २४ तास उशिराची. नंतर आली आकाशवाणी. बातमी कानावर पडायला लागली. नंतर आला टीव्ही. थेट बातमी दिसायला लागली. आता आला सोशल मीडिया आणि मोबाईल. ४८ तास आपण खिशात बातम्या बाळगतो. अशा स्पर्धेच्या व आव्हानात्मक काळात दैनिकांचे संपादक जाहिरातीचा धंदा आणि पेपरचा कागदोपत्री खप वाढवाच्या कामात गुंतले आहेत. दैनिकांचे संपादक इव्हेंट मैनेजर आणि व्यवस्थापक वसुली अधिकारी झाले आहेत. त्यामुळे समाजातील चांगुलपणा आणि चांगली माणसं यांच्याविषयी लिहणार कोण ? हा खरा प्रश्न आहे. 

Monday, 12 September 2016

कनेक्टींग जनरेशन्स !!!

चि. रोहितला भेटायला मी आणि सौ. सरोज पुण्याला गेलो होतो. रोहित आणि त्याच्या मित्रांचा दीड दिवसाचा सहवास लाभला. हे दीड दिवस स्मृतींच्या पानांवर धम्माल आठवणी कोरून गेले. पन्नाशीच्या उंबरठ्यावरील आम्ही दोघे आणि युवावस्थेच्या उंबरठ्यावरील रोहीत, त्याचा मित्र श्रेय, मैत्रिणी आरजू, मोना आणि भूमिका असा आमच्या एकत्रित सहवासाचा आणि सौ. सरोजच्या वाढदिवसांचा धम्माल दिवस आमच्यासाठी कनेक्टींग जनरेशन्सचा होता. दोन पिढ्यांमधील जनरेशन गैपवर नाक मुरडणाऱ्या मंडळींनी कनेक्टींग जनरेशन्स ही संकल्पना समजून घ्यायला हवी.  

Friday, 9 September 2016

मला काका बनवणारे एकमेव मित्र ...

माझे जवळचे मित्र डॉ. राधेशाम चौधरी यांचा आज वाढदिवस आहे. गेले ६/७ महिने आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. राजकारणाचा उंबरठा ओलांडण्याचा प्रयत्न डॉक्टरसाहेब करीत आहेत. एक सज्जन आणि सहृदयी माणूस म्हणून मी डॉक्टरांना ओळखतो. ते आधी पासून काँग्रेसचे काम करतात. अनेक प्रकारच्या पक्ष कार्यात, उपक्रमात व आंदोलनात डॉक्टर सहभागी आहेत. मात्र, लोकप्रतिनिधी होण्याची संधी त्याना साधता आलेली नाही. म्हणून अजुनही ते राजकीय उंबरठ्यावर आहेत. जळगाव मनपात प्रवेश करण्याचा त्यांचा पहिला प्रयत्न फारच थोड्या फरकाने हुकला. नंतर अडचणीच्या काळात पक्षाने त्यांना विधानसभा निवडणुकीत जळगाव शहरासाठी उमेदवारी दिली गेली. पराभव दिसत असून डॉक्टर लढले. पक्षाच्या चिन्हामुळे त्यांचे नाव घराघरात पोहचले.

Wednesday, 7 September 2016

“देखावे” आणि “दिखाव्या”चे दिवस

सध्या गणेशोत्सव सुरू आहे. नागरिकांसाठी गणेश स्थापना मंडपातील देखावे पाहण्याचे दिवस आहेत. दुसऱ्या बाजुला कार्यकर्ते आणि समर्थकांचे दिखाव्याचे दिवस आहेत. जामीनावर कारागृहाच्या बाहेर आलेल्या नेत्याच्या स्वागताला शेकडो समर्थक जमतात आणि नागरिकांना संदेश देतात की, आमचे आजही नेत्यावर प्रेम आहे. हा सुद्धा दिखावा करावा लागतो. विविध आरोपांच्या (कथित) फैरी झाडणाऱ्या माध्यमांवर नेते तोंडसुख घेणारी टीका करतात मात्र, त्याच माध्यमांना नेत्याच्या वाढदिवसांच्या पेड पुरवण्या देवून आमचे आमच्या नेत्यावर प्रेम आहे, असाही दिखावा करावा लागतो. म्हणूनच दिवस देखावे आणि दिखाव्यांचे आहेत. 

Sunday, 4 September 2016

“सोशल मीडिया सोल्युशन” ची आज पासून प्रचार-प्रसार सेवा

सोशल मीडिया हैण्डलर सेवा
प्रिंट आणि लाईव्ह मीडियाच्या कव्हरेज व गतीपेक्षा जास्त वेगवान, सोपा आणि प्रत्येकाच्या हातात पोहच असलेल्या सोशल मीडिया त तुम्हाला तुमचे विचार मांडण्याची आणि तुमच्या संस्था, सेवा, वस्तू, उत्पादनांचा प्रचार-प्रसार करण्याची संधी  सोशल मीडिया हैण्डलर म्हणून आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर (दि. ५ सप्टेंबर २०१६) आम्ही या व्यावसायिक सेवेचा प्रारंभ करीत आहोत. अगदी सोप्या भाषेत म्हणजे विचार, प्रसिद्धी तुमची असेल परंतु प्रभावी व नेटक्या शब्दांत, भाषेत त्याची मांडणी आणि ते लोकांपर्यंत पोहचविण्याची भन्नाटसेवा आमची असेल. तीच सेवा म्हणजेच सोशल मीडिया हैण्डलर सेवा होय.

Saturday, 3 September 2016

अनोखा श्री गणेश शॉपिंग फेस्टीवल

गणोशत्सवानिमित्त अभिनव कल्पना घेवून सुरू केलेला श्री गणेश उत्सव शॉपिंग फेस्टिवल २०१६ ला खान्देश सेंट्रल मॉलमध्ये प्रारंभ झाला आहे. त्याचे विधीवत उद्घाटन राज्याचे (नागपूर) माहिती आयुक्त व्ही. डी. पाटील यांच्या हस्ते झाले. महापौर नितीन लढ्ढा, गणेश महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे व इतर मान्यवर प्रमुख पाहुणे होते. 

Friday, 2 September 2016

दोघा नेत्यांचे दोन प्रश्न उत्तर मात्र एकच !!

जळगाव जिल्ह्यातील राजकारण वेगळ्या वळणाच्या उंबरठ्यावर आहे. ज्येष्ठनेते सुरेशदादा जैन यांचा राजकिय विजनवास साडेचारवर्षांपासून सुरू झालेला आहे. तेव्हा त्यांच्या ३५ वर्षांचे राजकारण थबकले होते. आज साडेचार वर्षानंतर सुरेशदादा जामीन मिळवून कारागृहाच्या बाहेर आले आहेत. त्यांच्या समर्थकांनी काल जल्लोष केला. गेल्या साडेचार वर्षांत सुरेशदादा समर्थक प्रश्न विचारत होते की, दादांना जामीन का मिळत नाही ?  

Saturday, 27 August 2016

मराठा क्रांती मोर्चाला विरोधाचे अवलक्षण कशाला ??

कोपर्डी येथील घटनेचा निषेध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाचे एकत्रिकरण होवून मूकमोर्चाच्या रुपात निषेधाचे हत्यार उपसण्यात आले आहे. औरंगाबाद येथे पहिल्यांदा शिस्तबध्द मूकमोर्चा निघाला. त्याचे वैशिष्ट्य होते की, तो मोर्चा प्रस्थापित पुढारी किंवा संघटनांच्या शिलेदारांनी आयोजित केलेला नव्हता. समाजातील काही संवेदनशिल युवकांनी एकत्र येवून मूकमोर्चाचा नवा पॅटर्न तयार केला. सर्वांत पुढे लेकीबाळी, माता भगिनी, त्या पाठोपाठ युवक, नंतर समाजातील प्रतिष्ठित बुजूर्ग आणि शेवटी प्रस्थापित पुढारी, संघटना आदींचे नेते. असा हा लाखोंचा मोर्चा जेव्हा शांतपणे निघाला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या.

तनय अंतिम फेरीत जायलाच हवा !!!

तनय मल्हारा
जळगावचा तनय आनंद मल्हारा (वय १४ वर्षे, ९ वी, सेंट तेरेसा कॉन्व्हेंट) हा स्टार चॅनलवरून प्रसारित होत असलेल्या डान्स प्लस २ या लाईव्ह परफॉर्मन्स स्पर्धेत शेवटच्या ८ स्पर्धकात पोहचला आहे. दि. २८, रविवार रोजी त्याचे महत्त्वाच्या फेरीतील नृत्य आहे. अंतिम चौघात जाण्यासाठी त्याला दर्शकांचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. रविवारी रात्री ८ ते १० च्या दरम्यान प्रेक्षक, दर्शकांना मतदान करता येणार आहे. तनयचा टोल फ्री नंबर १८००८३३३३५१ असा आहे. त्या दोन तासातच त्यावर फोन अथवा मोबाईलद्वारे मीस कॉल करुन मतदान करता येईल. एका फोन व मोबाईलवरून एकच कॉल करीत एकच मत नोंदविता येईल. यासाठी जळगाव शहर, जिल्हा आणि महाराष्ट्रातील दर्शक, प्रेक्षक व रसिकांनी तनयसाठी कॉल करुन मतदान करणे आवश्यक आहे. हरहुन्नरी, मेहनती, चपळ, लवचिक तनयचा या निमित्त थोडक्यात परिचय 

Friday, 26 August 2016

दृश्य कलेचे शिवधनुष्य – अभिवाचन

जळगावात आज (दि. २७) परिवर्तन अभिवाचन महोत्सव सुरू होतो आहे. अलिकडच्या काळात अभिवाचन या दृश्य कलेचा बऱ्यापैकी प्रचार-प्रसार होतो आहे. प्रसंग, संवाद, अभिनय, नेपथ्य आदींची रंगमंचीय अनुभुती देत मंचिय नाट्य व संवादीक अभिनयाचा सुवर्णमध्य साधणारी दृश्य कला म्हणजेच अभिवाचन होय. कलावंतांसाठी अभिवाचन हे शिवधनुष्य उचलण्याचे आव्हान आहे.

Thursday, 25 August 2016

आमदार राजूमामा, “देर आए दुरुस्त आए ...”

नागरी सुविधांच्या बाबतीत एखाद्या खेड्यापेक्षा वाईट अवस्थेत जळगाव महानगर आहे. शहरातील कोणत्याही रस्त्यातील खड्ड्यांमधून ठेचाळत वाहन नेणारा चालक हा मनपा पदाधिकाऱ्यांच्या  नाकर्तेपणाचा उध्दार करतो. सार्वजनिक ठिकाणी असलेले घाणीचे व दुर्गंधीचे आगार पाहून नगरसेवक आणि मनपा प्रशासनाला सामान्य माणूस शिव्या घालतो. असे म्हणतात की, जिवंतपणी वाईट कार्य करणाऱ्याला मृत्यूनंतर नरकवास मिळतो. तेथे अनेक प्रकारच्या यातना सहन कराव्या लागतात. तसे खरेच असेल तर, जळगावमधील आजचे जिणे हे नरकापेक्षा कमी आहे का ??” असा प्रश्न पडतो. 

Friday, 19 August 2016

मीडिया ट्रायलचे महागुरू आचार्य अत्रे

आचार्य अत्रे
वृत्तपत्रे आणि राजकारण यांचे नाते नेहमी आवळे-जावळे असते. ते कधी एकमेकांवर रुसणारे तर कधी कवटाळणारे असते. वृत्तपत्रे राजकारण वाढवते तसे संपवते. वृत्तपत्राने महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांचे राजकारण संपविल्याचा जुना इतिहास आहे. तेव्हा मीडिया ट्रायल हा शब्द नव्हता पण वृत्तांकन मीडिया ट्रायलचेच होते.

Tuesday, 16 August 2016

संवाद सेतू “शाकम कनेक्ट २०१६”

बाळासाहेब डुबे, मी, मुकुंद ठिगळे, शेख मुख्तार
बहुप्रतिक्षीत शाकम कनेक्ट २०१६ हा संवाद सोहळा दि. १४ ऑगस्टला नेहमीच्या जल्लोषात साजरा झाला. यावर्षीही मी हजेरी लावली. यावेळच्या कार्यक्रमाचे नियोजन उत्तमपणे करण्यात आले होते. थीमबेस दोन कार्यक्रम झाले. आता हळूहळू शाकम कनेक्टला निश्चित अशी दिशा मिळू लागली आहे. हा चांगला बदल आहे. आयोजकांपैकी बाळू देशपांडे, नरेश लहाने, खत्री, चौरसीया, प्रणिता आदींना धन्यवाद. काहींची नावे घेतलेली नाही. पण, इतरांनीही खुप मेहनत घेतली.  
शाकम कनेक्ट हा आता माजी विद्यार्थ्यांच्या संवादाचा एक सेतू झाला आहे. गेली सहावर्षे तो साजरा होतोय. हे सातवे वर्ष होते. शाकमच्या माजी विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय असतो. जुने-नवे मित्र या एका दिवसासाठी एकत्र येतात. आपापल्या प्रगतीविषयी भरभरून बोलतात. शाकमच्या भग्न इमारतीत जावून आठवणींना उजाळा देतात. संपूर्ण दिवस जुन्या विश्वात रमतात.

Friday, 12 August 2016

अनिलभाई कांकरीया म्हणजे बुस्टरभाई ...

कांकरीया परिवार आणि नवजीवनचे नाते पिढीजात आहे. आतापर्यंतच्या ५२ वर्षांच्या प्रवासातील काही आठवणी मोकळेपणाने अनिलभाई झेप या ब्लॉगवरून सांगत आहेत. नवजीवनच्या  गौरवशाली प्रवासाविषयी अनेक बाबी अनेकांना माहित आहेत किंवा पुढेही होतील. पण, अनिलभाई कांकरीया हे उत्तम कौन्सिलर आहेत हे अनेकांना बहुधा माहित नसावे. मी त्याचा अनुभव गेल्या २० – २२ वर्षांत अनेकदा घेतला आहे. म्हणून मी अनिलभाईंना बुस्टरभाई म्हणतो.  

Monday, 8 August 2016

जगायचंय मुक्तपणे ... !!!

मागील महिन्याचा प्रसंग. ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपल्याचे लक्षात आले. मित्राने पकडून आरटीओ अॉफिसला नेले. लायसन्स रिन्युअल केले. ते अवघ्या १३ महिन्यांच्या मुदतीचे होते. तेथील अधिकाऱ्यांना विचारले, "रिन्युअल ५ वर्षांसाठी होते ना ?" ते म्हणाले, "वयाची पन्नाशी पूर्ण होत असेल तर तेवढ्याच काळासाठी मिळते. त्यानंतर तुम्ही फिजिकली फिटचा दाखला दिल्यानंतर ५ वर्षांसाठी मिळेल. पुढच्या महिन्यात तुम्ही पन्नाशीच्या उंबरठ्यावर आहात." त्यांचे ते वाक्य ऐकून मी आनंदून गेलो. आयुष्याचे "अर्धशतक" गाठतोय म्हटल्यावर माझा स्वतःविषयीचा दृष्टीकोन तेथेच बदलला.

Saturday, 6 August 2016

जीवन जगण्याचा संस्कार “गोचरी दया”

संग्रहित छायाचित्र - लेखातील नावांशी संबंध नाही (गोचरी घेताना साध्वी)
हिंदू धर्मात उपनयन संस्कार करताना माते भिक्षांदेही हा संस्कार बालवयात केला जातो. बालवयात केलेला हा संस्कार फारसा गंभीर नसतो. केवळ एक धार्मिक औपचारिकता पूर्ण करायची म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. उपनयन संस्काराची गरजही अलिकडे कमी होत आहे. मुलांनाही बटू म्हणून केस कापण्यात वैषम्य वाटत असल्याने तेही हा संस्कार नाकारायला लागले आहेत. बालवयातला हा संस्कार सोडून देता येतो.

परंतु, जैन धर्मियात साधू, संत, साध्वी आदींच्या  रोजच्या उदरनिर्वाहाची रचनाच रोजच्या शिधा मागणीवर केली आहे. त्याला गोचरी दया म्हणतात. साधू-संत-साध्वी हे स्थानकात निवास करतात. त्या स्थानकाच्या परिसरातील कुटुंबांच्या घरी रोजची गोचरी घेण्यासाठी त्यांना जावे लागते. समाजाची घरे कमी असतील तर इतरांकडे जाता येते. मात्र, ते कुटुंब शुद्ध शाकाहारी असल्याची खात्री हवी. दिवसभरातल्या दोन वेळच्या जेवणासाठी दोन्ही वेळा साधू-संत-साध्वींना परिसरातील लोकांच्या घरी गोचरी मागायला जावे लागते. एका वेळच्या जेवणासाठी जेवढी पुरेशी होईल तेवढीच गोचरी स्वीकारावी लागते. यातही नियम अत्यंत कडक आहेत. पाऊस, कर्फ्यूसारखी स्थिती असेल तर गोचरी दयेसाठी जाता येत नाही. अशा प्रसंगी साधू-संत-साध्वींना काही दिवसांचा उपवास घडतो. असेही नाही की समाजातील मंडळींनी स्वतःहून शिधा आणून दिला आणि ते साधू-संत-साध्वीनां स्वीकारला. 

Thursday, 28 July 2016

फॅन्सी नंबरप्लेट विरोधात लोकाभियान !

जळगाव शहरातील वाहनांच्या फॅन्सी नंबरप्लेट विरोधात पोलिसांनी अभियान सुरू करावे अशी सूचना माध्यमांच्या प्रतिनिधींनी थेट एसपी डॉ. जालिंदर सुपेकर यांना केली आहे. त्यानुसार एक – दोन दिवसांत फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांचे चालक अथवा मालक एखाद्या चौकात वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालताना दिसतील. असे प्रकार टाळायचे असतील तर संबंधितांनी वेळीच आपापल्या वाहनांच्या नंबर प्लेट या नियमानुसार तयार करुन घेणे उचित ठरणार आहे.

Tuesday, 26 July 2016

मैत्री ... दोस्ती ... यारी !!!

डाविकडून नंदु जोगळेकर, मी, डॉ. चंद्रकांत वाघमारे, नितीन देशमुख
विदर्भातील वऱ्हाड प्रांताचा आणि माझा संबंध तीन वर्षांचा. सन २००३ ते २००६ दरम्यान मी अकोला येथे दैनिक सकाळच्या विभागीय कार्यालयात मुख्य उपसंपादक म्हणून काम केले. अकोलासह बुलडाणा व वाशीम ही विभागीय कार्यालये सुद्धा माझ्या कार्यक्षेत्रात होती. अकोल्यात सुहास कुळकर्णी, रत्नाकर जोशी, नंदु जोगळेकर, विशाल राजे, मनिष जोशी, विनोद इंगोले, गिरीश देशमुख, जीवन सोनटक्के, संजय सोनार, गजानन लोणकर, मनोज वाकोडे आदी माझे सहकारी होते. बुलडाण्यात अरुण जैन व वाशीममध्ये नंदकुमार शिंदे हे सहकारी होते. अकोला सोडून मी जळगाव येथे दैनिक सकाळसाठी सहयोगी संपादक म्हणून आलो. अकोल्यातील मित्र परिवार दुरावला. 

Monday, 25 July 2016

मोझरी ते सेवाग्राम व्हाया दीक्षाभूमि

विदर्भाची भूमि ही संतांची आणि राष्ट्रपुरुषांची आहे. महात्मा गांधी हे साबरमती आश्रम सोडून वर्धाजवळ सेवाग्राम येथे काही काळ विसावले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुरात बौद्ध धर्मांची दीक्षा घेतली. त्यामुळे नागपुरला  दीक्षाभूमि चे पावित्र्य मिळाले. सामाजिक प्रश्नांवर सोप्या भाषेत गाणी, ओव्या गावून किंवा किर्तन करून भाष्य करणाऱ्या तथा खंजिरीवादक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरूकुंजमुळे मोझरीला देशभरात ओळख मिळाली. या तिनही व्यक्ती आणि स्थान महात्म्यचा माझ्यावर प्रभाव आहे. यापूर्वी मोझरी, दीक्षाभूमि व सेवाग्रामला मी दोनवेळा भेट दिली आहे. तेथे घालवलेला एक-एक क्षण मला नेहमी आठवतो आणि काही तरी वेगळे करण्याची प्रेरणा देतो.