Saturday 12 December 2015

गुलाबराव पाटीलको गुस्सा क्यों आता है ?

ळगाव जिल्ह्यात शिवसेनेच्या बहराचा काळ असताना गुलाबराव पाटील यांचे नतृत्व पुढे आले. रस्त्यावरचा आणि सतत लढाऊबाण्याने काम करणारा कार्यकर्ता अशी त्यांची बराचकाळ ओळख होती. लागोपाठ दोनवेळा आमदारकी मिळाली. मुंबईवार्‍या करणार्‍या गुलाबरावांनी मतदार संघातील विकास कामांसाठी मंत्रालयात कधी पाठपुरावा केला असे आढळले नाही. नंतर व्हायच्या त्या परिणामातून आमदारकी गेली. पाचवर्षे गुलाबराव राजकिय वनवासात होते. आता पुन्हा नशिबाने साथ दिली म्हणून गुलाबराव आमदार आहेत. राज्यातील सत्तेच्या सारीपाटात मंत्रिपदाची खूर्ची मिळण्याची संधी त्यांना दिसते आहे. पण, टोकाचा विरोध करून आणि हलके मुद्दे घेवून गुलाबरावांना साध्य काय करायचे आहे? हा खरा प्रश्‍न आहे. वारंवार बोलघेवडेपणा करून आपल्याच व्यक्तिमत्वाला खुजे ठरविणार्‍या गुलाबरावांना प्रश्‍न विचारावासा वाटतो, ‘गुलाबरावको गुस्सा क्यों आता है?’



गुलाबराव पाटील. शिवसेनेचा एक लढवय्या कार्यकर्ता होता. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेला हा तरुण जिल्ह्यातील शिवसैनिकांचा आदशर्र् होता. मला चांगले आठवते, सभेत भाषण करावे म्हणून तेव्हाचे आघाडीचे नेते गुलाबरावांना आग्रह करीत. तेव्हाही शिवसेनेत पक्षनेतृत्वासमोर स्वतःला सिद्ध करणार्‍या युवानेतृत्वाची मोठी फळी होती. भुसावळचे नेते आणि जळगावचे नेते असाही सुप्त वादप्रवाद होता. म्हणूनच भुसावळ मतदार संघाचा वेगळा आणि एरंडोल मतदार संघाचा जिल्हाध्यक्ष वेगळा अशी रचना केली गेली. एरंडोलचे नेतृत्व गुलाबरावांकडे आले. लढवय्या तरुण म्हणून सत्तेत भागिदारीची वेळ आली तेव्हा आमदारकीची संधी मिळाली. एकदा नव्हे तर दोनदा गुलाबराव आमदार झाले. तिसर्‍यांदा संधी हुकली. ललित कोल्हे आणि पी. सी. पाटील यांची माघार गुलाबराव देवकर यांना संधी देवून गेली. खरेतर तेव्हाच गुलाबराव पाटील यांना गुर्जर समाजाने धोक्याचा इशारा दिला होता. नंतर गुलाबरावांनी पाचवर्षांचा वनवास पाहिला. देवकर यांच्या जिल्हाबाहेर असल्याचा फायदा घेत आणि भाजपतर्फे स्वतः पी. सी. पाटील रिंगणात उतरल्यामुळे गुलाबरावांना नशिबाने आमदारकी मिळालेली आहे. ही आहे, गुलाबरावांच्या प्रवासाची शॉर्टफिल्म. 

गुलाबराव आतापर्यंतच्या प्रवासात शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले ही त्यांची जमा बाजू. मात्र, तेथेही सुरेशदादा जैन यांच्या सोबत राहावे का? इतरांसोबत जावे? या संभ्रमातही काहीकाळ गुलाबराव होते. सुरेशदादांसाठी त्यांनी केलेली ‘जैनंम पूत्र...’ ही कविता आजही कार्यकर्ते खासगीत बोलून दाखवतात. आता सुरेशदादा कारागृहात असताना गुलाबराव त्यांचे कट्टर समर्थक झालेले आहेत. 

गुलाबरावांचे मधल्याकाळात जसे सुरेशदादांशी पटले नाही तसे ते भाजपचे नेते व आताचे मंत्री एकनाथराव खडसे यांच्याशीही पटले नाही. जैन-खडसे यांच्याशी काही काळ गुलाबरावांनी जमवूनही घेतले होते. राजकिय नेत्यांच्या आयुष्यात असे ‘यू टर्न’ नेहमी येतात. ते घ्यावेही लागतात. त्याचा दोष फारसा लागत नाही. मात्र, नेहमी नेहमी भोवतालच्या कोंडाळ्यातील स्तुतिपाठकांनी टोकाचा विरोध करायला सांगितले की तसेच करायला पाहिजे का? याचा सारासार विचार विवेकाने करावा लागतो. पक्षाचे सर्वोच्च कार्याध्यक्ष सुद्धा राज्याच्या सत्तेत भागिदारी हवी म्हणून एखाद-दुसरे पाऊल मागे घेतात. सत्ता उपभोगायची तर टोकाचे मतभेद किंवा व्यक्तिद्वेष करुन भागत नाही.

बहुधा गुलाबरावांमधील तडजोडीचा किंवा समन्वयाचा हा भाग राजकिय वनवासात कुठेतरी गळून पडला असावा. अन्यथा, एकनाथराव खडसे यांच्याशी अगदीचे टोकाचे मतभेद गुलाबरावांनी कुरवाळले नसते किंवा त्यावर आपली प्रतिष्ठाही पणाला लावली नसती.

जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीत सर्वपक्षिय पॅटर्न राबविताना गुलाबराव पाटील यांना बाजूला ठेवले गेले. त्याचे मूळ कारण हा त्यांचा स्वभाव दोष आहे. जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ यात गुलाबरावांना संधी मिळाली नाही. शिवाय, तालुका बाजार समितीतही शिवसेना म्हणून फारसे यश मिळाले नाही. सर्वपक्षिय फॉर्म्यूूल्यात शिवसेनेचे आमदार, माजी आमदार आणि त्यांचे पूत्रही जिल्हा बँकेच्या सत्तेत भागिदार होत असताना गुलाबरावांना मात्र बाजूला ठेवले गेले. असे का झाले? हे ही गुलाबरावांनी तपासले पाहिजे.

‘शिवसेनेशी भाजपची युती मोडण्याचा निरोप मी कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना दिला आणि मी भाजपला स्वबळावर लढायला सांगितले,’ असे जाहीरपणे खडसे सांगत असल्यामुळे त्याचे शल्य कार्याध्यक्षांपासून शिवसेनेच्या अनेकांना आहे. हे खरेही आहे. पण, मुक्ताईनगर मतदार संघात कार्याध्यक्षांनी जाहिरसभा घेवूनही खडसेंचे काहीही बिघडले नाही. मताधिक्य कमी झाले नाही. हेही वास्तव लक्षात घ्यायला हवे. खडसे आणि ठाकरे हा वाद राज्यस्तरावर असताना तो कुरवाळून खडसेंना जिल्ह्यात आव्हान देण्याची गुलाबरावांची भूमिकाच मुळी एकांगी आहे.

आता खडसेंना टोकाचा विरोध करा, असा पक्षनेतृत्वाचा सल्ला कार्याध्यक्षांचा असेल तर गुलाबराव पाटलांनी तसा ‘गेम’ खेळायला हरकत नाही. पण, कार्याध्यक्षांची भूमिकाही धरसोड आहे. महाराष्ट्रातील सत्ता भाजपनेतृत्वात ‘हवी’ आणि ‘नको’ असा त्यांचाच संभ्रम आहे. मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी द्यायची हेही पक्षाकडून निश्‍चित नाही. अशावेळी खडसे मला मंत्री होवू देत नाहीत, असा समज करून आणि खडसेंना मी जिल्ह्यात विरोध करू शकतो हे भासविण्यासाठी गुलाबरावांनी मारलेल्या उड्या या ‘कोल्ह्यास द्राक्ष आंबट’ या प्रकारात मोडतात. गुलाबरावांना मंत्रीपद हवे, ते त्यांना मिळत नाही. याचा राग पक्षनेतृत्वावर काढण्याऐवजी ते खडसेंवर काढत आहेत.

अवैध वाळू वाहतूक, पीआय सादरे आत्महत्या प्रकरण, पीक वीमाचा हप्ता वाटप असे काही आरोपाचे विषय सुद्धा गुलाबरावांनी उकरून काढले आहेत. गुलाबराव स्वतः आमदार असून जिल्हा प्रशासनाकडून हवी ती माहिती मिळू शकतात. माहिती मिळत नसेल तर उपोषण करू शकतात. गुलाबरावांना तसा होमवर्क मान्य नसावा. कारण, त्यांची संस्कृति ही ‘राडा’ संस्कृति आहे. अनेक आरोपांसाठी शेलकी, हलकी भाषा वापरण्यापेक्षा ठोस एकच मुद्दा घेवून उभे राहणे योग्य ठरू शकते असा सल्ला त्यांचे स्तुतिपाठक देणार नाहीत.

खडसेंच्या विरोधातील आरोप-प्रत्यारोपात विनाकारण लेवा पाटीदार आणि लेवा गुर्जर समाजाला ओढण्याचा प्रयत्न गुलाबरावांनी केला. इतरांच्या दृष्टीने लेवा समाजाच्या दोन फांद्या गुर्जर आणि पाटीदार आहेत. दोघेही सरदार वल्लभभाई पटेल यांना मानतात. अलिकडे रोटी-बेटी व्यवहारही होवू लागले आहेत. असे असताना दोन समाजात पत्रकबाजी व आरोप प्रत्यरोपासाठी गुलाबरावांनी समाज वापरला.

समाजाच्या पातळीवर वास्तव मुद्दे लक्षात घेतले तर शिवसेनेपेक्षा भाजपत लेवा गुर्जरनेत्यांना नेतृत्वाची संधी अधिक मिळालेली आहे. नावे घेण्याचे कारण नाही पण शिवसेनेत गुलाबरावांच्या पलिकडे दुसरे नाव नाही. बहुधा असेही असावे की, गुलाबराव हेच शिवसेनेत गुर्जर नेत्यांना मोठे होवू देत नसावेत? शिवाय, गुलाबरावांनी गुर्जर समाज किंवा  संस्थेसाठी काही भरीव कार्य केल्याचे दिसत नाही. एक गोष्ट नक्की की गुलाबराव पाटील यांच्यामागे गुर्जर समाज एकगठ्ठा आहे असे सिद्ध करणारी स्थिती नाही.

दुसरीकडे व्यक्ति व नेता म्हणून गुलाबरावांच्या प्रभावळीत अनेक आरोपांची जंत्री दिसते. काय आहेत ते आरोप जरा बघू या. गुलाबराव यांना कारावासाची शिक्षा सुनावली गेली आहे. गुलाबरावांवर शासकिय मालमत्तेच्या नुकसानीचे आरोप आहे, गुलाबराव सरकारी अधिकार्‍यांना मारहाण करतात, धमकावतात असे आरोप आहेत. गुलाबरावांनी फसवणूक केली आहे. गुलाबरावांनी जातीवाचक शब्द वापरले आहेत. पाळधी या छोट्या गावात कोणाचे राज्य आहे? असे हे वादविवादाचे विषय आहेत.

थोडे सविस्तर विषय माहित केले तर, गुलाबराव यांच्यावर जळगावच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीच्या कलमाखाली गुन्हा दाखल आहे. खोटी कागदपत्रे तयार करून संस्था हडप केल्याचा हा गुन्हा म्हसावद येथील पद्मालय शिक्षण प्रसारक मंडळाशी संबंधित आहे. 

बांभोरी ग्रामस्थांची खंडीत वीजेची तक्रार होती. त्यामुळे संतप्त झालेल्या  ग्रामस्थांनी धरणगाव येथे वीज वितरण कार्यालयात जाऊन साहित्याची तोडफोड केली होती. शिवाजी पुतळ्यासमोर रस्ता रोको आंदोलन केले होते. तेथे गुलाबराव यांच्यासह १२५ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

वीज मंडळाच्या तोडफोडनंतर जिल्हा शल्यचिकित्सकांना मारहाण प्रकरणीही गुलाबराव यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. सुरेशदादा जैन यांना उपचारासाठी रुग्णालयात आणले असताना तेव्हा गुलाबराव व इतरांना तेथे राडा केला होता. याच प्रकरणात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात रोज हजेरीची अटही न्यायालयाने टाकली होती. हे प्रकरण आजही न्यायालयात असून निर्णय प्रलंबित आहे. गुलाबराव आणि इतर ‘बालिश’ नेत्यांच्या त्या कृतीमुळेच जवळपास पावणेचार वर्षे सुरेशदादांना जामीन मिळू शकलेला नाही.

अगदी अलिकडे रेल्वे न्यायालयाने गुलाबरावांंना रेल्वे अधिकार्‍याला मारहाण व धरणगाव स्थानकावर धुमाकूळ घातल्याप्रकरणी एक महिन्याचा कारावास व रोख ५० हजार रूपये दंड ठोठावला आहे. या प्रकरणातही गुलाबराव सध्या जामीनावर बाहेर आहेत. एका रिक्षा चालकासाठी गुलाबरावांनी हा राडा केला होता. 

पाळधी ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचारादरम्यान गुलाबराव व त्यांच्या समर्थकांनी मारहाण, शिवीगाळ केल्याचा गुन्हाही दाखल होता. त्यातही गुलाबराव जामीनावर सुटले होते. 

वीजेसाठी राडा करण्याची संस्कृति गुलाबरावांनी जळगाव शहरातही जपली आहे. जळगावमध्ये क्रॉम्प्टनमार्फत वीज पुरवठा होत असताना रात्रीचे भारनियमन बंद करा या मागणीसाठी गुलाबराव यांनी समर्थकांसह क्रॉम्प्टनच्या युनिट हेडला कार्यालयाबाहेर खेचून कार्यालयाला कुलूप लावण्याचीही प्रकार केला होता. हे प्रकरण तेव्हा पोलिसांच्या मध्यस्थीने मिटले होते. 

वरील उदाहरणे शिवसेनेची कार्यशैली म्हणून समर्थनिय असली तरी त्यातून उभे राहणारे गुलाबराव पाटील यांचे व्यक्तिमत्व लोकप्रिय ठरत नाही. 

या सार्‍या प्रवासातून काय मिळाले?  आणि काय गमावले? याचा ताळेबंद गुलाबरांनी कधी तरी मांडायला हवा. आक्राळास्तपणा करणारे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेतील नेते आज आहेत कुठे? याचा अंदाज घ्यायला हवा. 

सत्तेच्या विरोधात असताना आंदोलन करणार्‍या नेत्यांवर पोलीस गुन्हे दाखल करतात. नंतर ते सरकारच्या निर्णयाने मागेही घेतले जातात. खडसे, गिरीश महाजन यांच्यावरही असेच गुन्हे दाखल होते, आहेत. गिरीश महाजन यांनी कापसाच्या वाढीव भावासाठी ९ दिवस उपोषण केले होते. तो आत्मक्लेश होता. गुलाबरावांच्या नावावर असे आत्मक्लेशाचे कोणते आंदोलन नोंदले गेले आहे?

आता अखेरचा प्रश्‍न, खडसे यांच्या विरोधात गुलाबराव शाब्दीक आधळआपट का करीत असावेत? याचे उत्तर एकच असू शकते. ते म्हणजे, केवळ प्रसिद्धीसाठी आणि शिवसेना कार्याध्यक्षांना आपला कडवा खडसे विरोध दाखविण्यासाठी. बहुधा, कार्याध्यक्ष सुध्दा अशा नोंद घेवूनच पदे वाटत असावेत.

ज्यादिवशी या संपूर्ण विषयावर स्वतः गुलाबराव चिंतन करतील त्यादिवशी ‘गुलाबराव पाटीलको गुस्सा क्यों आता है’ याचे वास्तवदर्शी उत्तर त्यांना मिळेल. एक गोष्ट नक्की, ते उत्तर मिळाले की, गुलाबरांवाची बाजू मांडण्यासाठीही ही लेखणी चालविण्यात आनंद असेल. गुलाबराव तेवढ्या संयमाने आणि खुल्या दिलाने ही ‘ऑफर’ स्वीकारतील?

1 comment: