Saturday 19 December 2015

मॅरेथॉनचा ‘सेलेब्रिटी शिलेदार’

गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण आणि अवघड मॅरेथॉनचे २१ किलोमीटरचे अंतर पहिल्याच प्रयत्नात पूर्ण करण्याचे यश जळगावचे युवा आयकॉन तथा उद्योगपती किरण बच्छाव यांनी निश्‍चयाने साधले आहे. धावण्याच्या जगात जळगावचा पहिला ‘सेलेब्रिटी शिलेदार’ म्हणून त्यांची नोंद झाली आहे. यापुढे शक्य त्या मॅरेथॉनमध्ये धावायचे असे त्यांनी ठरविले आहे. साहसी खेळाच्या प्रकारात समावेश असलेल्या मॅरेथॉनच्या नव्या क्षेत्राकडे किरण बच्छाव यांनी इतरांचेही लक्ष वेधले आहे...





पल्ल्याची धावण्याची स्पर्धा म्हणून मॅरेथॉनची  संपूर्ण जगात ओळख आहे. भारतातही मुंबईसह इतर अनेक महानगरांमध्ये मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. खूप मोठे अंतर, धावण्यासाठी लागणारा स्टॅमिना, त्यासाठीची शारीरिक क्षमता, सतत सराव आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर अनेक धावपटू या स्पर्धेत सहभागी होतात. स्पर्धात्मक अव्वल वेळ नोंदवून विजयी सुद्धा होतात. मॅरेथॉनचे साहसी क्षेत्र आणि त्याभोवतीचे प्रसिद्धीचे वलय हे फार थोड्या मान्यवरांच्या नशिबी येते.

जळगाव येथील ऑटोमोबाईल्स, बिल्डर, सौरऊर्जा या व्यावसायिक आणि उद्योग क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रात नावलौकिक मिळविलेले युवा मान्यवर किरण बच्छाव यांनी मॅरेथॉनच्या साहसी क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. फोटोग्राफी, ट्रॅकिंग या दोन कौशल्यांचा छंद म्हणून जोपासना करणार्‍या बच्छाव यांच्यासाठी मॅरेथॉन आता ‘पॅशन’ बनू पाहात आहे.

गोवा येथे दि. १३ डिसेंबर २०१५ ला झालेली मॅरेथॉन स्पर्धा बच्छाव यांनी धावून पूर्ण केली. स्पर्धेचे अंतर २१ किलोमीटर होते. या अंतरासाठी २ तास ४८ मिनिटांची वेळ त्यांनी नोंदविली. विजेत्याने नोंदविलेल्या वेळेत आणि बच्छाव यांच्यावेळेत तासाभराचा फरक असावा. मात्र, त्यांच्या दृष्टीने स्पर्धेचे अंतर धावून पूर्ण करणे हा आनंदाचा ठेवा आहे. यामागचे समाधान हेच की,  बच्छाव यांनी धावण्याचा पहिला प्रयत्न गोवा मॅरेथॉनमध्ये केला आणि नियोजित अंतर पूर्ण करण्याचा किमान उद्देश साध्यही झाला. यासाठीची सर्व तयारी एक मिशन म्हणून केल्याचे किरण बच्छाव सांगतात.

आरोग्य सदृढ व तंदुरूस्त असावे म्हणून सकाळी फिरणे, सायकल चालविले, जीमला जाणे हे नियमित व्यायाम प्रकार बच्छाव करीत होते. अडिच महिन्यांपूर्वी त्यांनी गोव्याच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. लगोलग त्यासाठी तयारी करणे सुरू केले. तेथून तर स्पर्धा पूर्ण करेपर्यंतचा प्रवास हा इतरांना एखाद्या मिशनसाठी कशी तयारी करावी? याचा मार्गदर्शक आराखडा आहे.

बच्छाव यांना जास्त अंतर धावण्याचा मुळीच सराव नव्हता. मैदानावर दोन राऊंड मारले तरी त्यांना धाप लागत असे. मॅरेथॉनसाठी तयारी करायची तर जळगावमध्ये त्यादृष्टीने मार्गदर्शन करणारे कोणीही नाही. कसे धावावे, रोजचा सराव, आहार काय असावा, शरीराच्यादृष्टीने तयारी, स्पर्धेची तयारी कशी करावी वगैरेसाठी कोणी टीप्स देवू शकेल अशी अनुभवी, तज्ञ मंडळी डोळ्यांसमोर नव्हती.

तरी सुद्धा पुण्यातील मित्र किशोर धनकुडे आणि जळगावचे डॉ. रणजीत चव्हाण, डॉ. निरंजन चव्हाण यांच्याकडून शक्य ते मार्गदर्शन घेतले. अगोदर मैदानावर धावायचा प्राथमिक सराव केला. त्यानंतर महाबळ ते टॉवर असे अंतर पार केले. पुढच्या टप्प्यात शिरसोली, वावडदा हे अंतर पूर्ण करण्याचा सराव केला. हळू-हळू मॅरेथॉनसाठी तयारी सुरू झाली. एक-एक टप्पा सर करीत असताना स्पर्धेत सहभागाचा निश्‍चय दृढ होत गेला.
धावण्याचा सराव करीत असताना उजवा गुडघा दुखत असल्याचे बच्छाव यांच्या लक्षात आले. असे का होत असावे हे कळेना. त्यांनी पुण्यातील मित्राला विचारले. त्याने धावण्याच्या सरावाचा मॅप मागितला. त्याच्या लक्षात आले की, बच्छाव हे रोज एकाच मार्गावरून धावतात आणि विशिष्ट वळण जवळूनच घेतात. त्याने सूचना केली की, जवळून वळण घ्यायचे नाही आणि एकाच वळणाचा सराव करायचा नाही. सर्व बाजूंनी वळण घेण्याचा सराव करायचा. बच्छाव यांच्या धावण्यात सुधारणा झाली. अशाच प्रकारच्या अडचणीत डॉ. चव्हाणद्वयींनी मार्गदर्शन केले.

धावण्याच्या सरावात हेही समजले की, आपण बर्‍याच अवयवांचा दैनंदिन कामकाजात वापर करीत नाही. त्यामुळे ते अवयव आक्रसून जातात किंवा त्यांची एकच ठेवण कायम होवून जाते. धावण्याच्या पहिल्या सरावात त्यांचे दुखणे निश्‍चित असते. या दुखण्यावर सरावातून मात करता येते. औषधांची गरज भासत नाही. मात्र, सरावाचा विशिष्ट काळ जावू देणे आवश्यक असते.

धावण्याच्या सरावात आहार आणि पाणी पिणे यावर सतत नियंत्रण ठेवावे लागते. फॅट असलेले पदार्थ टाळावे लागतात. वजन कमी करावे लागते. अगदी शरीरावर घालायच्या कपड्यांचेही वजन लक्षात घ्यावे लागते. अर्थात, याबाबी बच्छाव यांच्यासाठी अगोदर पासून पूरक होत्या. वजन कायम होते आणि खाण्यावर पुरेसे नियंत्रण होते. शरीरातील लवचिकता आणि स्नायूंचा मोकळेपणा टीकवून ठेवण्यासाठी ग्लुकोज, इलेक्ट्रोल लिक्विड प्रमाणात प्यावे लागते, याची सुध्दा माहिती बच्छाव यांनी पुण्यातील मित्राकडून आणि वाचनातून मिळविली. रोजच्या सरावादरम्यान नारळ पाणी पिवून स्टॅमिना वाढविण्यात चांगली मदत झाली. जवळपास अडिच महिन्यांच्या सराव आणि अडचणीतून आलेल्या   शहाणपणाने आत्मविश्‍वास दिला. या तयारीनिशी मॅरेथॉनच्या सहभागासाठी गोव्याकडे प्रस्थान केले.

गोव्यात वास्को स्टेडीयम ते परत असे मॅरेथॉनचे २१ किलोमीटरचे अंतर होते. हा रस्ता उंच-सखल, चढ-उताराचा आहे. गोव्यात डिसेंबर महिन्यातही वातावरणात बर्‍यापैकी आर्द्रता असते. त्यामुळे धावताना घामाचाही त्रास होता. शरीरातून बर्‍यापैकी पाणी उत्सर्जित होते. या बाबी लक्षात घेवून बच्छाव यांनी शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रणात राहावे म्हणून स्पर्धेच्या आधी दोन-तीन दिवस भरपूर पाणी पिवून शरीरात पाण्याचा स्टॉक केला होता. हे ऐकायला थोडे विचित्र वाटेल. पण, शरीरातील पेशींमध्ये तशी रचना असते. प्रोफेन्शल रनर याचा वापर करतात. बच्छाव यांनी वाचून हे कौशल्य अंगिकारले होते.

स्पर्धेच्या ठिकाणी अनुभव आला की, सहभागी होणार्‍या अनेक मित्रमंडळींचे शहर निहाय गृप आहेत. सर्वजण एकमेकांना भेटून शुभेच्छा देत होते आणि सहभागाबद्दल आनंद व्यक्त करीत होते. हे कल्चर अजून आपल्या जळगावात नाही, हा विचार बच्छाव यांच्या मनांत चमकून गेला. धावताना सुद्धा अनेक स्पर्धक ओळखी-पाळखीचे हसून दाद देत स्पर्धेचा आनंद घेत होते.

सर्वाधिक आश्‍चर्य होते ते हेच की, स्पर्धेत सहभागी अनेक जण वय विसरलेले होते. अगदी ७० चा उंबरठा ओलांडलेले मनाने सदाबहार स्पर्धक होते. अपंग असलेले मात्र जयपूर फूटच्या माध्यमातून धावू शकणारे असे शरीराने अपंग पण मनाने अभंग अनेकजण होते. बच्छाव यांनी हेही निरीक्षण नोंदविले की, एखाद्या मिशनमध्ये वय हा मुद्दा गौण आहे. तेथे इच्छाशक्ती हवी. तसेच हो मी करणारच, हा आत्मविश्‍वास हवा. मॅरेथॉनमध्ये धावणारे हजारो असतात मात्र, वरील दोन गुणांच्या बळावर स्पर्धा पूर्ण करणारे शेकड्यानेच शिल्लक राहतात.

किरण बच्छाव यांनी सराव, निश्‍चय आणि आत्मविश्‍वास याच्या बळावर स्पर्धा पूर्ण केली. हा आनंद कुटूंंब आणि मित्रांसह पहिल्यांदा शेअर करताना त्यांना मॅरेथॉन जिंकल्याचाच आनंद झालेला होता. अगदी पहिल्या टप्प्यात किमान किलोमीटरचे अंतर धावताना धाप लागणारे बच्छाव २१ किलोमीटर न थांबता, न थकता धावू शकले होते. मिशन इम्पॉसिबल हे पॉसिबल मिशन झाले होते.

किरण बच्छाव यांच्या या आगळ्या वेगळ्या साहसाने जळगावातील अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. धावणार्‍या मित्रांचा एक गृप सुरू करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्याचा त्यांचा पुढचा संकल्प आहे. आता यापुढील मॅरेथॉनचा सराव करताना किमान ५ जण जळगावातून तयार व्हावेत ही अपेक्षा घेवून ते मॅरेथॉन तयारीचा सराव व प्रचार-प्रसार करणार आहेत. त्यांच्या या प्रवासात कोण-कोण साथीदार मिळतात हे लवकरच लक्षात येईल.

मोबाईलने दुखावला हात

किरण बच्छाव यांनी मॅरेथॉनचे अंतर जवळपास पावणे तीन तासात पूर्ण केले. धावत असताना त्यांच्या डाव्या हातात मोबाईल होता. सराव करताना एका दर एका किलेमीटरला किती वेळ लागला हे सांगणारे टाईमर मोबाईलमध्ये होते. मोबाईल बाळगायची सवय झाली होती. स्पर्धा संपल्यानंतर डावा हात विशिष्ट ठिकाणी दुखत असल्याचे जाणवले. मित्राचा सल्ला घेतला. तो पटकन म्हणाला, ‘तू हातात मोबाईल घेवून धावलास का?’ त्यावर उत्तर होकारार्थी होते. मित्र म्हणाला, ‘म्हणून हात दुखतोय.’ मोबाईलचे वजन एवढा वेळ बाळगल्याने त्या हातातील स्नायूंवर ताण पडला. नियमित हालचालीतून ते दुखणे बंद झाले.

(श्री. किरण बच्छाव यांचा संपर्क क्रमांक ९४२२७७३३११ असून त्यांना मॅरेथॉन पूर्ण केल्याबद्दल अभिनंदनाचा फोन आवर्जून करावा.)

No comments:

Post a Comment