![]() |
एकनाथराव खडसे .....गुलाबराव पाटील |
गेले महिनाभर जिल्ह्यातील भाजप आणि शिवसेनच्या मूठभर कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांच्या बदनामीची ‘सुंदोपसुंदी’ सुरू आहे. शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी जिल्हा पालकमंत्री तथा राज्याच्या मंत्रीमंडळातील सर्वांत ज्येष्ठमंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर गल्लीमैदानातून सुरू केलेला आरोपांचा पाढा थेट विधिमंडळातही वाचून दाखविला. त्यावर खडसे यांनी सविस्तरपणे व्यक्तिगत स्पष्टीकरण करून सर्व आरोप तूर्त खोडून काढले आहेत.
विविध विषयांशी संबंधित आरोप-प्रत्योपांचा ‘शिमगा’ दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही पत्रकांच्या माध्यमातून खेळून
घेतला. आता काही प्रमाणात धुराळ बसतोय. प्रकरण निवळण्याची चिन्हे आहेत. हेच वातावरणात
असताना शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे जळगाव दौर्यावर येवून गेले. त्यांनी सामंजस्य
दाखवून एक गोष्ट केली. शिमग्याच्या खेळात त्यांनी नव्याने कोणताही रंग भरला नाही.
ज्येष्ठनेते एकनाथराव खडसे आणि गुलाबराव पाटील यांच्यातील वाद-विवादामुळे
दोघांची प्रतिष्ठा वाढते आहे, असे मुळीच नाही. दोघांची अप्रतिष्ठाही होते आहे, असेही
समजण्याचे कारण नाही. दोघांचेही व्यक्तिमत्त्व विभिन्न पैलूंचे आहे. दोघांचे त्यांच्या
पक्षातील स्थान निर्विवाद वर्चस्वाचे आहे. खडसे आणि पाटील यांच्या व्यक्तिमत्वांची
तुलनाच होवू शकत नाही. याचे कारण, जळगाव जिल्ह्यातून गेल्या ५० वर्षांत राज्यस्तरावर
वर्चस्व, प्रभाव निर्माण करणारा एकमेव नेता खडसेंच्या रुपात सध्या ठामपणे उभा आहे.
ती उंची गुलाबराव आज आणि भविष्यातही गाठू शकत नाहीत. भविष्याच्या उदरात काय दडले आहे
त्यावर भाष्य करणे टाळावे लागेल.
जळगाव जिल्ह्याच्या गेल्या ५० वर्षांच्या राजकारणात राष्ट्र किंवा
राज्यस्तरावर प्रभाव टाकणारे मोजकेच नेते निर्माण झाले. राज्य किंवा केंद्रीय मंत्रिमंडळात
नेतृत्वाची संधी मिळाली म्हणजे, संपूर्ण राज्यस्तरावर प्रभावाचे वलय निर्माण झाले असे
होत नाही. अगदी तसे पाहिले तर विधान परिषदेचे माजी उपसभापती स्व. गजाननराव गरूड, विधानसभेचे
माजी अध्यक्ष स्व. मधुकरराव चौधरी, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूण गुजराथी आणि देशाच्या
राष्ट्रपतीपदापर्यंत पोहचलेल्या श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या नंतर आज केवळ आणि
केवळ खडसे यांचेच नाव घेता येते.
खडसे हे अनुभवी आहेत. ३५ वर्षांपासून विधिमंडळाच्या राजकारकणात आहेत.
राजकारणासोबत समाजकारण, कला, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत त्यांचा लिलया वावर आहे.
राज्य आणि देशपातळीवर पक्षांतर्गत आणि पक्षबाह्य अनेक मान्यवर नेत्यांशी त्यांचे व्यक्तिगत
संबंध आहेत. सर्वांसाठीचे असे ‘नाथाभाऊ’ तयार होण्याचा कालावधी हा किमान ४०-४५ वर्षांचा आहे.
नाथाभाऊंच्या सोबत आज संसदीय किंवा विधीमंडळ राजकारणात वावरणार्या
जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेतृत्वाचे सरासरी वय ४५ च्यावर आणि ५० वर्षांच्या आतील आहे.
खडसे ६५ च्या उंबरठ्यावर आहेत. जिल्ह्याच्या ‘सेकंड लाईन’ नेतृत्वाचा प्रश्न खडसे यांच्यासह इतरही पक्षांमधील नेत्यांच्या
समोर आहेच. तसा तो शिवसेनेच्या समोरही आहे.
अशावेळी जिल्ह्याच्या विकासाचा अजेंडा घेवून खडसेंच्यानंतर ‘सेकंड
लाईन नेतृत्वाचा’ झेंडा आपल्या खांद्यावर उचलण्याचे
कौशल्य कोणीही दाखवू शकते. तशी संधी देण्याची स्वतः खडसे यांची तयारी असली तरी वर उल्लेख
केलेल्या ‘स’ कारच्या कार्यशैलीतून सेकंड लाईनचा
दर्जा, कुवत मिळविणे हुशार नेत्याला सहज शक्य व साध्य आहे.
विषय फिरून पुन्हा गुलाबराव पाटील आणि खडसे यांच्यातील कथित संघर्षावर
येतो. ‘सकारात्मक आणि सशक्त समाज उभारणीसाठीचे व्यासपीठ’ अशी ‘तरुण भारत’ ची विचारसरणी
आहे. याच विचारांचा धागा पकडून आम्हाला असे वाटते की, खडसे यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचा
सार्वंगिण विकास सरकारात्मक वातावरणात आणि अधिक सशक्तपणे होण्यासाठी सध्याचा काळ अनुकूल
आहे. खडसे स्वतः ‘स्वयंभू’ असल्यामुळे त्यांची त्या दिशेने वाटचाल
सुरू आहे. समन्वय, सहमती व सहकाराचे सर्व पक्षीय प्रयत्न त्यांनी सुरू केलेच आहे.
त्याचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात
पक्ष विरहीत राजकारण उभे राहिले. अशा वातावरणात खडसे-गुलाबराव संघर्षाचा ‘एक सल’ सर्व सामान्य माणसाच्या मनांत उभा राहतोच.
वाद-विवाद कोणी सुरू केला, काय आरोप केले, त्याला कोणी खतपाणी घातले?
अशा प्रश्नांवर चर्चा करण्याची आणि कोणाचे बरोबर, कोणाचे चूक? हे ठरविण्याची भूमिका नाही. या विषयावर दोन्ही बाजुंकडून
संशयकल्लोळाचे खूप पाणी वाहून गेले आहे. आता पाण्याच्या ‘ओघळांवर’ प्रहार करूनही काहीही उपयोग नाही. पण, एक गोष्ट नक्की की, दोन्ही
बाजुंकडून होणार्या या बदनामीच्या खेळात स्वतः नेते आणि त्यांचे समर्थक समाधानी, आनंदी
नाहीत. आहे ती केवळ अस्वस्थताच!
आरोप-प्रत्यारोपांच्या विविध विषयांना, दोन्ही बाजुंशी चर्चा करताना
एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे ‘सहमतीचा’ ओलावा अजुनही
वाद-विवादांच्या ओघळात टीकून आहे. हा ओलावा पुन्हा सहमती, सहकार्य, सहयोगस संमती, समन्वय
याचा प्रवाह वाहून नेवू शकतो.
खडसे स्वभावाने कठोर आहेत. पण, टोकाचा विरोध कुरवाळणारे नाहीत. आपल्या
अडचणी त्यांना सांगितल्या की, ते सुद्धा समजून घेतात. विषय सोडून देतात. विकासाच्या
विषयावर चर्चेची, पाठिंब्याची आणि पुढे सरकण्याची त्यांची नेहमी तयारी असते. गुलाबराव
आक्रमक आहेत. बोलण्यात परखड आहेत. काही विषयांवर त्यांची मतेही ठाम आहेत. पण, त्यातून
साध्य काय होते? हा प्रश्न उरतोच.
जळगाव जिल्ह्याच्या राजकारणाची जुनी पाने वाचली तर लक्षात येते की,
मधुकरराव विरोधात जे. टी. महाजन असा उघड संघर्ष, अरुण गुजराथी विरोधात सुरेशदादा जैन
असा खुला संघर्ष, मधुकरराव विरोधात प्रतिभाताई असा छुपा संघर्ष काही काळ होता. मतभेद
व मनभेदही होते. पण, त्यात एवढा टोकाचा विखार कधीही पोसला गेला नाही. मध्यंतरी खडसे
विरोधात सुरेशदादा असाही संघर्ष होता, आजही आहे. त्यातील काही विषय न्यायालयीन कज्जात
अडकल्याने त्याविषयावर शांतता आहे.
जिल्ह्याच्या नेतृत्वाचे सुकाणू आपसूक नाथाभाऊंच्या हाती आहे. दोन
खासदार, दोन मंत्रिपदे, पाच आमदार त्यांच्या नेत्ृत्वात केंद्र व राज्याच्या सत्तेत
भागीदार आहेत. राज्यातील युतीच्या सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेचे ३ आमदार आहेत.
विरोधक म्हणून नावाला केवळ राष्ट्रवादीचे एकमेव आमदार आहेत. राजपटावरील नियतीचे दान
असे युतीच्या बाजूने असताना वाद-विवादाचे किरकोळ विषय दोन्ही बाजूने सहज मिटविता येणे
शक्य आहे. किंबहुना ते मिटवायलाच हवेत!
वडिलकीचा विचार केला तर नाथाभाऊ गुलाबराव पाटील यांना, ‘अरे इकडे
ये’ असे सांगू शकतात. दुसरीकडे, गुलाबराव हे ‘भाऊ मला मार्गदर्शन करा’ असे म्हणू शकतात. आता यात पुढाकार कोणी घ्यावा हा प्रतिष्ठेचा मुद्दा
होवू शकतो.
‘तरूण भारत’ फॉर्म्यूूला म्हणून असे सांगावेसे वाटते की, दोन्ही पक्षांच्या
वाद-विवाद घालणार्या कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद अगोदर मिटवून टाकावेत. एकत्र
बसून नेत्यांना दिलजमाईची विनंती करावी. नवे विषय-वाद निर्माण होणार नाहीत याची एकमेकांना
ग्वाही द्यावी. मग हळूच तीळ संक्रांतीला नेत्यांच्या मनेमिलनाचा व विकासावर गोड बोलण्याचा
कार्यक्रम घडवून आणावा. हे घडविणे अशक्य नाही. छोट्या कार्यकर्त्यांनी मोठ्या लाभासाठी
आपले मतभेद कुरवाळायचे नसतात, हा चाणक्यनितीतला साधासोपा धडा लक्षात घेतला तर ‘स’ काराशी संबंधित पर्वाचा प्रांरभ जळगाव जिल्ह्यात सहज होईल.
सेकंडलाईन सुद्धा अनुकूल
खडसे-गुलाबराव प्रकरणावर ‘तरुण भारत’ ने दोन्ही बाजुंवर परखडपणे लिखाण केले आहे. गुलाबरावांवर कडक शब्दांत
लिहून सुद्धा त्यांनी ‘तरुण भारत’ कार्यालयात
येवून आपले परखड मत मांडले. याच विषयाचा धागा पकडून खडसे यांचे कट्टर समर्थक तथा भाजपचे
महानगर पदाधिकारी दीपक फालक आणि शिवसेनेचे माजी शहर प्रमुख गजानन मालपुरे यांना छेडले
असता दोघांचे एक मत स्पष्टपणे समोर आले. ते होते, हा वादाचा विषय संपायला हवा. दोन्ही
बाजुंनी ताणून धरण्याचे कारण नाही. या वादात कोणीतरी प्रामाणिकपणे चर्चा घडवून आणायला
हवी.
No comments:
Post a Comment