Saturday, 28 November 2015

सोंगाड्या आमिर खान!

बालिवूडमध्ये गेल्या तीन दशकांपासून खानावळींचे वर्चस्व आहे. अभिनयाच्या गुणवत्तेवर आणि ‘अंडरवर्ल्ड’ शी असलेल्या आर्थिक संबंधातून खानांची किती आणि कुठे चलती आहे, हा चौकशीचा तसाच शोधाचा मुद्दा आहे. चित्रपटनिर्मिती प्रक्रियेत कोणत्या खानाचे कोणाशी कसे लागेबांधे असतील हे सांगता येत नाही. त्यामुळे खानावळ मंडळी पाकिस्तानच्या कलावंतानाही बॉलिवूडमध्ये सहज घुसवून टाकतात. खानावळीच्या गोतावळ्यात ‘परफेक्टनिस्ट’ म्हणून लौकिक मिळवणारा आमिर खान सध्या तमाशातील सोंगाड्यासारखे काम करीत आहे. फरक एवढाच की, तमाशातला सोंगाड्या प्रामाणिकपणे रसिकांना हसवायचे काम करतो तर, आमिरने वठविलेला सोंगाड्या जगभरात भारताच्या साहिष्णू प्रतिमेला धक्का पोहचवून देशवासियांना ‘लाजवायचे’ काम करीत आहे.

आमिर खानची तमाशातील सोंगाड्याशी तुलना करताना प्रथम सोंगाड्या म्हणजे काय? ते समजावून घेवू. तमाशात ‘सोंगाड्या’ चे स्थान महत्त्वाचे असते. तमाशातील दोन लावण्या किंवा प्रसंग यात संदर्भ दाखवणारे संभाषण त्याला करायचे असते. यालाच ‘संपादणी करणे’ असे म्हणतात. थोडक्यात, तमाशामध्ये शाहीर तसेच नृत्यांगना यांच्याइतकेच महत्त्वाचे स्थान सोंगाड्याला असते. आपल्या विनोदाने तो प्रेक्षकांना खळाळून हसायला लावतो. क्वचित प्रसंगी गंभीर होवून अंतर्मुख व्हायला लावतो. ग्रामीण भाषा, द्वर्थी शब्द यांचा वापर करून विनोदनिर्मिती करण्यात सोंगाड्या पटाईत असतो. पुष्कळदा सोंगाड्या हाच तामाशातील नायक ठरतो. तमाशातून हास्य आणि शृंगार या दोन्हींची अपेक्षा असते. त्यातील हास्यरसाची सारी मदार सोंगाड्यावर असते. सोंगाड्या हजरजबाबी, कोणत्याही गोष्टीचा भलताच ‘विपर्यास करणारा’ आणि नावाप्रमाणेच ‘क्षणात सोंग बदलणारा’ असतो. ग्रामीण मराठीत त्याचा विनोद पुष्कळवेळा सभ्यतेच्या मर्यादा सोडून अश्‍लिल होतो.
सोंगाड्याविषयी वरील संदर्भ लक्षात घेतले तर सध्याच्या परिस्थितीत आमिर खान करीत असलेली कृती सोंगाड्याची असल्याचे लक्षात येते. येथे आमिरने निर्माण केलेली प्रसंगनिर्मिती विनोदाची नाही. ती पूर्णतः गंभीर आणि भारताच्या जगातील प्रतिमेशी फारकत घेणारी निश्चित आहे. ‘हे विश्वची माझे घर’ किंवा ‘वसुधैव कुटूंबकम्’ अथवा ‘सारे जहॉं से अच्छा हिंदोस्ता हमारा’ असे जगाला निक्षून सांगणार्‍या भारताची नवी ओळख आमिरने जगाला करून दिली आहे ती म्हणजे, ‘भारत हा असहिष्णू लोकांचा देश आहे.’ एवढेच करुन आमिर थांबलेला नाही तर पत्नी सौभाग्यवती किरण राव-खानच्या वक्तव्याचा संदर्भ देवून ती म्हणाली, ‘भारतदेश सोडून जावू या का?’ असेही विधान  जाहिरपणे सांगण्याचा प्रमाद आमिरने केला आहे.
पती-पत्नीत होणारा संवाद हा व्यक्तिगत आणि खासगी असतो. मात्र, दोघांमधील कोणीही ते संभाषण जाहिरपणे मांडले की, त्यावर अनुकूल किंवा प्रतिकूल प्रतिक्रिया देण्याचा अधिकार इतरांना मिळतो. म्हणूनच, पत्नीने एकांतात सांगितलेला विषय चारचौघांत सांगायचा की नाही, हे शहाणपण पतीकडे असले पाहिजे. आमिर खानसारख्या संवेदनशिल अभिनेत्याकडे ते निश्‍चित आहे. तरी सुद्धा त्याने सौभाग्यवती किरण राव-खानचे एकांतातील मत चारचौघांत मांडल्यामुळे त्यातून त्याचा ‘सहेतूक’ उद्देश दिसून येतो. तसा हेतू आहे म्हटल्यावर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लाभ घेत इतरही मंडळी ‘सहेतूक’ व्यक्त होणार हे निश्‍चित आहे. सध्या तेच चालले आहे.
आमिरचा सोंगाड्या असण्याचा संदर्भ आहे तो या ठिकाणी. भारताच्या राज्यघटनेत सार्वभौमत्व, एकात्मता व समानता ही तत्वे देशाची मूलभूत तत्वे म्हणून स्वीकारली आहेत. त्यानुसार भारताचा चेहरा सर्व समाज, जाती, धर्म, पंथ, लिंग आदींसाठी सहिष्णु असताना आमिर खानच्या दुसर्‍या पत्नी सौभाग्यवती किरण राव-खानला  अचानक आपला देश असहिष्णु झाल्याचा साक्षात्कार झाला. मनातून घाबरलेल्या सौभाग्यवतीने मुलगा आझादच्या भवितव्यासाठी भारत सोडून जाण्याचा विचार बोलून दाखवला. अर्थात, एकांतात केलेली ही चर्चा आमिर स्वतःपुरती ठेवणार असा पत्नीसुलभ विचार तीचा असावा. मात्र, समाजात अती संवेदनशील म्हणून वावरणार्‍या आमिर खानने सौभाग्यवतीचे एकांतातील कथन मनभावीपणे जाहीर करून टाकले. बिच्चारी, सौभाग्यवती किरण ही सुद्धा आरोपीच्या पिंजरार्‍यात उभी ठाकली.
आमिरने सौभाग्यवती किरणचे नाव घेवून जे जाहीरपणे सांगितले, त्यात त्याचे व्यक्तिगत मत किती आणि सौभाग्यवती किरणचे किती? हे समजायला जागा नाही. पण, सौभाग्यवती किरणच्या नावाने आमिरने देशातील तथाकथित असाहिष्णु वातावरणाविषयी स्वतःचा विषारी फुत्कारच सोडल्याचे स्पष्ट जाणवते. म्हणून आमिर सोंगाड्या ठरतोे.
सोंगाड्या दोन प्रसंगातील वेळ भरून काढतो, वस्तुस्थितीचा विपर्यास करतो, प्रसंगी ‘ध’ चा ‘मा’ सुध्दा करतो. नावाप्रमाणे सोंग बदलतो. ही सारी कृती आमिरने सोंगाड्या म्हणून केली आहे. देशात ‘सहिष्णुता’ आणि ‘असहिष्णुता’ या दोन विषयांवर सुरू असलेल्या चर्चेत त्याने ‘गॅप’ भरून काढला. भारतीय चित्रपट रसिकांच्या प्रेमातून कोट्यवधी रुपये आणि लोकप्रियता मिळविणार्‍या आमिरने एका झटक्यात भारतीयांना सौभाग्यवतीच्या आडून असहिष्णु ठरवून टाकले. खरे तर, आमिरने सोंगाड्या म्हणून केलेला हा जागतिक दर्जाचा ‘विनोद’ आहे. आमिर समाजात वावरताना जी सोंगे घेतो, त्याचाच हा भाग आहे. म्हणून आमिर सोंगाड्या ठरतो.
आमिर खानच्या अभिनेता असणे आणि त्याचे व्यावसायिक यश यावर या लेखात भाष्य करायचे नाही कारण, अभिनेता म्हणून त्याला जे प्राप्त झाले ते येथील १२५ कोटी जनतेने दिले आहे. अभिनेता म्हणून वावरताना आमिरने स्वतःचे व्यक्तिमत्व कसलेला, संवेदनशील, मेहनती, सामाजिक भान असलेला, नेमकेपणाचा आग्रह धरणारा, वक्तशीर आणि निवडक काम करणारा असे षट्कोनी म्हणून लोकांच्या मनांत बिंबविले आहे. मात्र, यात कौटुंबिक आणि मैत्री निभावण्यासंदर्भातील दोन कोन हे १८० अंशात ‘सपाट’ दिसतात.
कोणत्याही व्यक्तिच्या स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाचे पैलू त्याच्या भोवतीचे कुंटूंब आणि मित्रमंडळींच्या गोतावळ्यात घडते. या गोतावळ्यातीत गुणदोषांचा कमी-अधिक परिणाम माणसाच्या व्यक्तिमत्वावर आपसूक घडतो. आमिरच्या सोंगाड्या असण्याची काही कारणे त्याचे कौटुंबिक आणि मित्रमंडळींच्या गोतावळ्यात आणि परस्परांविषयीच्या वर्तनात दडलेले असावे. आमिरच्या भोवतीचे वातावरण असहिष्णु असावे म्हणून त्याच्या मनातील खंत, विखार, संताप बहुधा सौभाग्यवती किरणच्या वक्तव्याआडून निघाला असावा. समाजापेक्षा कुटूंब किंवा मित्रमंडळींचे अनुभव कटू असले की, माणसाला सर्वांत प्रथम घराच्या भिंती परक्या वाटायला लागतात. नंतर घराच्या दाराबाहेरचे जगही विरोधात असल्याचा वारंवार भास होतो. आमिरच्या बाबतीत हिच शक्यता जास्त दिसत आहे. आमिरच्या कौटुंबिक प्रवासाचे सर्व संदर्भ तपासले तर त्याच्या व्यक्तिमत्वात भरलेला कडवटपणा ठळकपणे लक्षात येतो.
‘फ्लॅशबॅक’ मध्ये जावू या. आमिरचे वडिल ताहिर हुसेन. चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक. त्यांची पाहिली पत्नी झिनत हुसेन. आमिरसह चार मुलांची आई. ताहिर हुसेन तसे रंगिले. असे म्हणतात, राबिया अमिन या सहकलावंत महिलेशी ताहिर यांचे विवाहबाह्य संबंध होते. राबिया यांची कन्या झिया खान असून तीने आमिर सोबत ‘गझनी’ चित्रपटात काम केले आहे. ताहिर यांच्या रंगिलेपणाचा एक किस्सा चर्चेत आहे तो म्हणजे, वयाच्या ६० व्या वर्षी दुसरे लग्न करताना ते म्हणाले होते, ‘मी आजही दुसरा आमिर खान जन्माला घालू शकतो’ याच काळात त्यांनी आमिरच्या आईला तलाक देवून स्वतःपेक्षा कितीतरी तरुण शाहनाझ हिच्याशी दुसरे लग्न केले होते. काही काळानंतर शाहनाझला सोडून ते पुन्हा कुटुंबात परतले होते.
आमिरचे नंतर ताहिर यांच्याशी फारसे चांगले संबंध राहिले नाही. ‘लगान’ चित्रपटाच्या चित्रिकरण दरम्यान ताहिर हेही एका चित्रपटाची निर्माता म्हणून जुळणी करीत होते. त्यांनी वित्त पुरवठ्यासाठी काही जणांशी संपर्क केला. तेव्हा या मंडळींनी आमिरला ताहिर यांच्या हालचाली सांगितल्या. आमिरने त्यावेळी एक निवेदन प्रसिद्धीस दिले. त्यात म्हटले होेते की, ‘ताहिर हुसेन यांच्या कोणत्याही वित्तीय व्यवहारांची जबाबदारी माझ्याशी संबंधित नाही.’ या निवेदनानंतर ताहिर हुसेन बिथरले आणि त्यांनीही प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रतिक्रिया दिली की, ‘आमिर जसा मला बाप मानत नाही, तसा तो माझा मुलगा नाही’ या प्रकारामुळे ताहिर हुसेन आणि आमिरचे संबंध पूर्णतः ताणले गेले.
ताहिर यांच्या वर्तणुकीचा प्रभाव आमिरवर कसा पडला असावा याचाही अंदाज घेवू. आमिरचे लग्न झाले रिना दत्ता हिच्याशी. त्यांना मुलगा जुनेद आणि मुलगी ईरा ही अपत्ये झाली. आमिरच्या कहाणीतही बापाप्रमाणेच एक ट्विस्ट आहे. चित्रपट क्षेत्रातील बित्तंबातमी देणार्‍या ‘स्टारडस्ट’ या मासिकाने आमिरचे आणि ब्रिटीश पत्रकार जेसिका हिन्स यांच्या ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ मधील संबंधाची बातमी प्रसिद्ध केली होती. यासंबधातून मूलही जन्माला आले.  त्याचे नाव जान. त्यानंतर जेसिका लंडनमध्ये निघून गेली. अर्थात, यावर आमिरचा कोणताही खुलासा नाही. हा प्रकार ‘गुलाम’ चित्रपटाच्या चित्रिकरण दरम्यानचा होता. त्यानंतर ‘लगान’च्यावेळी किरण राव ही आमिरच्या संपर्कात-सानिध्यात आली. अखेर रिनाला तलाक देवून आमिरने किरणला सौभाग्यवती बनविले. ताहिर हुसेन यांच्या आयुष्यातील आडवळणाप्रमाणेच आमिरचा प्रवास नाही का? झिनत, राबिया आणि शाहनाझ या ताहिर यांच्या आयुष्यात होत्या. तसेच रिना, जेसिका आणि नंतर किरण या आमिरच्या आयुष्यात आहेत.
आमिर आणि सौभाग्यवती किरण राव-खानने कंत्राटी आई (सरोगटेड मदर) च्या माध्यमातून आझाद या मुलाला जन्म दिला आहे. सौभ्यावती किरणला आता या आझादच्या भवितव्याची चिंता वाटते. तीला ‘सध्याचा भारत’ फारच असहिष्णु वाटतो. म्हणून ती आमिरला म्हणते, ‘मुलाच्या भवितव्यासाठी भारत सोडायचा का?’ आता येथे एक प्रश्‍न आमिरला विचारू या, ‘बाबारे, तू जुनेद, ईरा आणि जान या तीन मुलांचाही बाप आहेस. मग, तुला त्यांच्या भवितव्याची चिंता वाटल्याचे कधी तुझ्या तोंडून निघाले नाही?’
स्वतः तीन मुलांच्या पालकत्वाविषयी कोणतीही जबाबदारी जाहिरपणे न स्वीकारणारा आमिर ‘सत्यमेव जयते’ या मालिकेत मनभावीपणे परितक्त्या, पालक नसलेल्या मुलांच्या भवितव्यावर बोलतो. हे जरा अती वाटते.
आमिरच्या कौटुंबिक वातावरणात अजूनही कटू प्रसंग आहेत. भाऊ फैजल खानच्या कस्टडीचा विषय असाच कोर्टात गेला. त्यातून पुन्हा ताहिर, फैजल आणि आमिरचे संबंध पूर्णतः दुरावले. फैजल हा काही काळ मानसिक आजाराने त्रस्त होता. त्याला आमिरने आपल्या निवासस्थानी ठेवले होते. पण, फैजलचे म्हणणे होते की, तो मानसिकदृष्ट्या सक्षम असून आमिर त्याला औषधी देवून मानसिक रोगी बनवत आहे. फैजलच्या आरोपाचीच  ताहिर हुसेन यांनी ‘रि’ ओढली होती. अखेर प्रकरण पोलिसात आणि नंतर कोर्टात गेले. कोर्टाने फैजलची कस्टडी ताहिर हुसेन यांना सोपविली. मात्र, फैजल त्यांच्याकडेही राहिला नाही. तो नंतर स्वतंत्र राहू लागला. आमिर याही प्रकरणात तसा बदनाम झाला.
आमिरच्या कौटुंबिक गोतावळ्यात त्याच्या दोन बहिणी आहेत. दोन्ही बहिणींचे पती हिंदू आहेत. मोठी बहिण निखात हिचे पती संतोष हेगडे असून तीला २ मुले आहेत. हे कुंटूब पुण्यात राहते. दुसरी लहान बहिण फरात असून हिचे पती राजीव दत्ता आहेत. राजीव हे आमिरची घटस्फोटीता पत्नी रिना दत्ताचे लहान भाऊ आहेत. त्यांना एक मुलगा असून ते अमेरिकेत न्यू जर्सी येथे राहतात. आमिर रिनाशी कसा वागला याचा काहीही परिणाम फरात व राजीव यांच्यावर झालेला नाही. आमिरच्या दोन्ही बहिणींचे पती हिंदू असून एकानेही अजून सौभाग्यवतींना घटस्फोट दिलेला नाही. बहुधा, हा हिंदुंचा ‘एक पत्नीव्रता’ असण्याचा चांगूलपणा असावा. कारण आमिर आणि त्याचे वडिल ताहिर यांनी प्रत्येकी पाहिल्या पत्नीस तलाक दिलेला आहे.
येथे एक मुद्दा अधिक स्पष्ट करावा लागेल, तो म्हणजे फैजल आणि ताहिर यांनी आमिर विरोधात माध्यमांमधून टीका-टीप्पणी केल्यानंतर उर्वरित कुटूंंब आमिरच्या पाठीमागे ठाम उभे राहीले. त्यांनी माध्यमांमध्ये निवेदन देवून ताहिर व फैजल यांनी आमिरवर केलेले आरोप फेटाळले होते. आमिरसाठी कुटुंबात हिच एक सकारात्मक गोष्ट घडल्याचे लक्षात येते. नाही म्हणायला दोघी बहिणींशी आमिरचे संबंध तसे उत्तम आहेत.
आता वळू या आमिरच्या व्यावसायिक स्पर्धेतील वर्तणुकीकडे. आमिरचे समकालिन मित्र व स्पर्धक आहेत सलमान खान आणि शाहरुख खान. पैकी सलमानशी आमिरची मैत्री टिकून आहे पण, शाहरुखशी आमिरचे आजही फारसे चांगले संबंध नाहीत. आमिरने शाहरुखशी एवढी खुन्नस बाळगली आहे की, आपल्या एका कुत्र्याचे नाव त्याने ‘शाहरुख’ ठेवले असून ‘मी त्याला केक किंवा बिस्किट दिले तर तो माझे पाय चाटतो’ असे आमिर एकदा जाहिरपणे म्हणाला होता. यावर शाहरुख काहीही बोलला नाही पण, आमिरची खाली जाण्याची पातळी किती आहे हे लक्षात येते.
शाहरूखच्या संदर्भात आमिरचा अजून एक किस्सा सांगितला जातो तो म्हणजे, आमिर कोणत्याही चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्यास जात नाही कारण, फिल्मफेअर पुरस्कारच्या स्पर्धेत एकदा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ आणि ‘रंगिला’ या चित्रपटांचे नॉमिनेशन होते. पुरस्कार शाहरुखच्या वाट्यावर गेला. त्यावर आमिर जाहिरपणे म्हणाला होता की, ‘हे पुरस्कार मॅनेज करुन दिले जातात.’ आमिरचा हा पुरस्कारांविषयी दुषित दृष्टीकोन आजही कायम आहे.  यापूर्वी ‘जो जिता वही सिकंदर’ समोर ‘बेटा’ तील अनिल कपूरने, त्यानंतर ‘हम है राही प्यार के’ समोर शाहरुखच्या ‘बाजीगर’ने पुरस्कार पटकावले होते. अशावेळी स्पर्धकांचे अभिनंदन करण्याचे सौजन्य न दाखता आमिरने पुरस्कार आणि आयोजकांवर ‘मॅनेज होणारे’ म्हणत जाहिरपणे अविश्वास दाखवला होता.
मला पुरस्कार मिळत नाही ना? मग, ते निश्चित केलेले आहेत असे मानणार्‍या आमिरच्या समोर ‘स्टंट मास्टर’ अक्षयकुमारने सौजन्याने पुरस्कार नाकारल्याचा आणि तो आमिरला द्या असे नम्रतेने सांगितल्याचे उदाहरण सुद्धा आहे. ‘गझनी’ आणि ‘सिंग ईज किंग’ या चित्रपटात स्पर्धा असताना पुरस्कार अक्षयकुमारला जाहिर झाला होता मात्र, अक्षयकुमारने मनाचा मोठेपणा दाखवत तो पुरस्कार ‘गझनी’साठी आमिरला द्या असे सूचविले होते. या तुलनेत आमिरचे वर्तन कसे वाटते?
देशी पुरस्कारांकडे दुर्लक्ष करणारा आमिर ‘लगान’ चित्रपटासाठी ‘ऑस्कर’ मिळवायला धावधाव करीत होता. चित्रपटाच्या प्रचार-प्रसारासाठी आमिर व आशुतोष गोवारिकर अमेरिकेत फिरले होते. त्यावर त्यांनी ९ कोटी रुपये खर्च केले होते. हा सुद्धा ‘लॉबिंग’ किंवा ‘मॅनेज’ चा प्रकार नव्हता का?
त्यावेळी ऑस्कर पुरस्कार ‘नो मेन्स लॅण्ड’ या चित्रपटास गेला होता. एवढेच नव्हे तर त्यावर्षी ‘नो मेन्स लॅण्ड’ ला जवळपास सर्वच आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. तेव्हा आमिरने पुरस्कार न मिळाल्याचा राग काढत स्पर्धेत ‘नो मेन्स लॅण्ड’ पेक्षा इतरही सरस चित्रपट होते अशी मल्लीनाथी करीत मनांतील विखार बाहेर काढला होता.
आमिरचा खोटे बोलण्याचा एक किस्सा सध्या चर्चेत आहे. सलमानचा ‘बजरंगी भाईजान’ चित्रपट ५०० वर कोटींची कमाई करून गेला. सलमानची भूमिका गाजली. या चित्रपटाच्या यशाची पार्टी आयोजित केलेली होती. तीत आमिरने वक्तव्य केले की, ‘हा ‘बीबी’ चित्रपट प्रथम माझ्याकडे आला होता, तो मी नाकारल्यामुळे सेकंड चॉईस सलमान होता.’ यावर चित्रपटाचा निर्माता कबीर खानला छेडले असता त्याने आमिरकडे गेल्याचे नाकारले. यातून आमिरचे खोटे बोलणे समोर आले.
आमिर खोटे बोलतो याविषयी त्याने ‘सत्यमेव जयते’ या टीव्ही कार्यक्रमात मान्य केले होते. त्याला एका प्रेक्षकांने प्रश्‍न विचारला, तुम्ही कधी खोटे बोलले आहात का? यावर आमिरचे उत्तर होते, ‘कधीही खोटे न बोलणारा माणूस असू शकतो?’ अर्थात, या प्रतीप्रश्‍नातून ‘मी सुद्धा कधीतरी खोटे बोललेलो आहे,’ अशीच कबुली आमिरने दिली होती.
 ‘सत्यमेव जयते’ मालिकेत आमिरने दावा केलेल्या अनेक विषयांची माहिती खोटी किंवा चुकीच्या आकडेवारीवर आधारित आहे, असे अनेकांनी नंतर सिद्ध केले. काही विषय हे एकांगी पद्धतीने दाखविल्याचाही आक्षेप होताच. ‘सत्यमेव जयते’ मध्ये मुलींना दत्तक घ्या असे म्हणणार्‍या आमिरने सौभाग्यवती किरणच्या आग्रहाखातर कंत्राटी आईच्या माध्यमातून मूल जन्माला घातले. त्याने स्वतः मुलीस दत्तक घेण्याची कृती का केली नाही?
आमिर आपल्या मित्र किंवा समवयस्क मंडळींशी ‘तिरसट’ वागला असे नाही तर, त्याने चित्रपटसृष्टीतील ‘बिग बी’ यांनाही हिणविण्याचा प्रयत्न केला आहे. अमिताभ यांचा ‘ब्लॅक’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जवळपास सर्वच माध्यमे व समिक्षकांनी अमिताभ व राणी मुखर्जीच्या अभिनयाची तारिफ केली होती. तेव्हा आमिरने अमिताभच्या टवाळीचा सूर लावून म्हटले होते की, ‘ब्लॅक चित्रपट आणि अमिताभचा अभिनय डोक्यावरून जातो.’ त्यावर अमिताभने केवळ एक वाक्य उच्चारले होते आणि ते होते, ‘खरे आहे, ब्लॅक चित्रपट आमिरच्या डोक्यावरून जाणाराच आहे.’ बिग बीने आमिरच्या शारिरीक आणि वैचारिक उंचीचे असे जाहीर मापच काढले होते.
वरील उदाहरणे लक्षात घेतली तर आमिर हा मित्रमंडळी तथा ज्येष्ठ मंडळी यांच्याशी सुध्दा ‘खुन्नस’ किंवा ‘खारबाजी’ करतो असे लक्षात येते. म्हणजेच कुटुंबात संबंध दुरावलेला आणि मित्रांपासून लांबलेला आमिर आपल्याला दिसतो. असा आमिर कसा काय सहिष्णु असू शकतो? असा प्रश्न पडतोच.
आमिर, राजकुमार हिराणी आणि विधू विनोद चोप्रा यांनी ‘थ्री ईडीयट्स’ चित्रपटाच्या कथेवरूनही लेखक चेतन भगतची बोळवण केल्याचा किस्सा चर्चेत होता. चेतन भगतच्या ‘फाईव्ह पॉईंट समवन’ या पुस्तकातून काही पात्र, प्रसंग व कल्पना ‘थ्री ईडीयट्स’ साठी आमिर व इतरांनी उचलल्या होत्या. मात्र, चित्रपटाच्या श्रेयनामावलीत चित्रपट कथालेखक म्हणून अभिजित जोशीचा उल्लेख केला होता. कुठेतरी बारीक अक्षरात सहाय्यक म्हणून चेतनचे नाव होते. हा विषय तेव्हा माध्यमात खूप गाजला होता. आमिर, हिराणी, चोप्रा यांच्या विधानांमधून ‘थ्री इडीयट्स’ ला प्रसिध्दी मिळत गेली. अखेर, चेतन भगतने हा विषय सोडून दिला. मात्र, आमिरने कथा ढापल्याबाबत साधी दिलगिरी सुध्दा व्यक्त केली नाही. उलट चेतन भगतचा उल्लेख लेखकांमधील ‘राखी सावंत’ असा केला होता. अशावेळी प्रश्न पडतो की, स्वतःला परफेक्टनिस्ट म्हणवणारा आमिर इतरांशी असहिष्णु कसा वागू शकतो?
बहुधा, चित्रपट प्रदर्शनापूर्वी सव्यंग चर्चा निर्माण करण्याचा फॉर्म्यूला आमिरच्या अंगवळणी पडला आहे. ‘फना’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी आमिर हा दिल्लीत ‘नर्मदा बचावओ’ आंदोलकांसोबत जावून बसला आणि प्रकल्पगस्तांच्या मागण्यांना त्याने पाठिंबा दिल्याचे विधान केले. त्यावरून वाद निर्माण झाला. गुजरात सरकारने चित्रपट प्रदर्शनावर बंदी घातली. मात्र, इतर राज्यांमध्ये चित्रपट बर्‍यापैकी चालला. यानंतर निर्माता म्हणून त्याने ‘देलही बेली’ हा चित्रपट काढला. त्यात तरुणांच्या तोंडी अगदी शिवराळ आणि ‘ग’ शी संबंधित शिव्या वापरल्या होत्या. त्याचे समर्थन करीत ‘आपकी अदालत’ या कार्यक्रमात आमिर म्हणाला होता, ‘आजचे युवक अशीच भाषा वापरतात. ज्यांना ही भाषा माहित नाही त्यांनी चित्रपट पाहू नये.’ देशातल्या युुवकांविषयी इतके उथळ विधान करणारा आमिर आज देशात असहिष्णुता वाढते आहे असे म्हणतो. जरा आश्‍चर्य वाटते.
‘पीके’ चित्रपटाच्यावेळीही आमिर, हिराणी व चोप्रा यांनी हिंदू देवदेवतांच्या विरोधातही श्रद्धा-अंधश्रद्धा म्हणत प्रसिद्धी मिळवून लक्ष वेधले होते. चित्रपटात देवादिकांच्या अवडंबराविषयी भाष्य करणारा आमिर स्वतःच्या आई श्रीमती झिनतला मक्का-मदीना येथे घेवून गेला होता. आईच्या खातर त्याने तेथील विधी-परंपरांचे पालनही केले होते. ‘इतरांच्या श्रद्धेसाठी मी हे केले’ असे सांगण्याचा मनभावीपणाही त्याने दाखविला होता.
‘सत्यमेव जयते’ या टीव्ही कार्यक्रमात आमिरने समाजातील काही संवेदनशील विषय मांडले. मात्र, त्यात दाखविलेली अनेक गृहितके, तथ्ये किंवा निष्कर्ष हे चुकीच्या मांडणीवर आधारित होती असेही संबंधित अभ्यासकांनी लक्षात आणून दिले आहेत. त्याचा तसा संदर्भ नेटवर सुद्धा उपलब्ध आहेत.
आमिरने नंतर आपल्या प्रत्येक चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी काहीना काही वादातीत विधान करून स्वतःकडे आणि चित्रपटाकडे लक्ष वेधले आहे. ‘तलाश’ च्या प्रदर्शनापूर्वी तो अण्णा हजारेंच्या ‘भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात’ सहभागी झाला होता. आज सौभाग्यवती किरणच्या नावावर देशातील असहिष्णु स्थितीवर भाष्य करणार्‍या आमिरचा ‘दंगल’ चित्रपट येवू घातलेला आहे. बहुधा त्यापूर्वी चांगली-वाईट प्रसिद्धी मिळवून स्वतःच्या लोकप्रियतेचा नवा माईलस्टोन रोवण्याचा आमिरचा प्रयत्न आहे. कारण, शाहरूखच्या ‘चेन्नई एकस्प्रेस’ आणि सलमानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटांनी तिकीटबारीवर धंदा करण्याचे विक्रम आता काही कोटींवर नेवून ठेवले आहेत. त्यांच्याशी स्पर्धा करायची तर सव्यंग लोकप्रियतेचा फॉर्म्यूला वापरण्याशिवाय आमिरला पर्याय नाही. म्हणून, ‘नेहमी व्यक्तिगत प्रेमात राहणारा आमिर’ विविध सोंगे करताना सोंगाड्याच ठरतो!
(या लेखातील बहुतांश संदर्भ हे यापूर्वी लिखित अथवा चलमाध्यमातून चर्चिले गेले आहेत. आमिरला मिळालेले इतर पुरस्कार, सन्मान किंवा त्याने सामाजिक उपक्रमात दिलेला सहभाग अथवा दिलेल्या देणग्या याचा विचार येथे केलेला नाही. कारण तेव्हा भारत ‘सहिष्णु’ असावा. म्हणून आमिरने स्वतः पुरस्कार, सन्मान परत केले नाही. सद्यस्थितीत भारताला ‘असहिष्णु’ ठरविण्याचा प्रमाद त्याने केला आहे. त्याची तशी धारणा का झाली असावी? याचा वेध घेताना कुटूंब, मित्र, व्यवसाय, समाज यात आमिरच्या दुसर्‍या प्रतिमेतील काही प्रसंग येथे क्रमाने जोडले आहेत.)

No comments:

Post a Comment