Tuesday 24 November 2015

आपला तो बाळासाहेब, दुसऱ्याचा तो कार्टा...

आपला तो बाळासाहेब, दुसर्‍याचा तो कार्टा

बीमा भारती
बिहारच्या मंत्रिमंडळात लालूप्रसाद यादव यांचे पूत्र तेजप्रताप आणि   तेजस्वी यादव यांचा समावेश झाल्यानंतर दोघांच्या अल्पशिक्षीत असण्यावरून आणि शपथ घेताना झालेल्या चुकीवरून अनुकूल व प्रतिकूल प्रतिक्रिया सुरू आहेत.  त असावेत की अल्पशिक्षित अथवा अशिक्षित असावेत. दुसरा, शपथ घेताना झालेली चूक ही कितपत गंभीर मानावी ?
यावर मत मांडताना पहिला मुद्दा पाहू. महाराष्ट्राच्या प्रभावशाली मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीत यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर वसंतदादा पाटील यांचे नाव घेतले जाते. मात्र, वसंतदादा अल्पशिक्षित होते. त्यांनी आपले सामाजिक भान आणि अनुभव याच्या जोरावर मुख्यमंत्री म्हणून अत्यंत प्रभावी काम केले. याशिवाय, इतरही अनेक लोकप्रतिनिधींचे शिक्षण कमी असतानाही त्यांनी केलेल्या उत्तुंग कामगिरीची नोंद इतिहासात झालेली आहे. त्यात सविस्तर जाण्याचे कारण नाही.


लोकप्रतिनिधी आणि नंतर कार्यकारी अथवा मंत्रीपदावर विराजमान होताना त्या नेत्याची निर्णय क्षमता, अनुभव, समाजाविषयीचे भान, दूरदृष्टी याचाच विचार करणे योग्य ठरते. शिक्षण असणे किंवा नसणे हा मुद्दा तसा फारसा महत्त्वाचा नाही. आजपर्यंत तशी घटनेतही तरतुद नाही. विधी मंडळ अथवा संसदेत बहुमताच्या जोरावर राजकारणासाठी शिक्षणाच्या सक्तीचा कायदाही होण्याची शक्यता नाही.
राजस्थान सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शैक्षणिक मर्यादा निश्‍चित करण्याचा प्रयत्न केला आहे. पंचायत समितीसाठी १० वी उत्तीर्ण, सरपंचासाठी ८ वी उत्तीर्ण राखीव जागांसाठी ५ वी उत्तीर्णची अट टाकण्यात आली आहे. हा कायदा याचवर्षी केला आहे.  तेथील विधी मंडळाने या दुरूस्तीस मान्यता दिली आहे.

मात्र, दुसरीकडे महाराष्ट्रात असा प्रयोग मंत्रिमंडळाच्या चर्चेतून फसला आहे. एकदा नव्हे तर दोनदा. सन २०११ आणि २०१२ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधीस शैक्षणिक अट सक्तीची करण्याचा प्रस्ताव होता. पण, आमदार व खासदार होण्यासाठी शैक्षणिक अट नसताना स्थानिक स्वराज्य संस्थेत ही अट का ? असा प्रश्‍न करून कायद्यातील सुधारणा तत्कालिन मंत्र्यांनी फेटाळली.

आता थोडे देशाच्या राजकारणातही डोकावू. पंतप्रधानांचे शिक्षणही अल्पच आहे. देशाचे मनुष्यबळ आणि विकास मंत्रालय सांभाळणार्‍या मंत्र्यांचे शिक्षण कमीच आहे. एकदा हे वास्तव स्वीकारले की, लालुंच्या मुलाच्या शिक्षणाचा मुद्दा चर्चेतही गैरलागू ठरतो.

येथे एक आहे. राज्यांच्या विधान परिषदेत पदवीधर मतदार संघातून आमदार निवडून येतात. या मतदार संघात मतदार व्हायचे असेल तर पदवीपर्यंत शिक्षण हवे अशी अट आहे. पण, उमेदवार म्हणून निवडणूक लढवायची तर अशिक्षित व्यक्तीही निवडणूक लढवू शकतो. मग, नंतर मंत्री होण्यात अडचण ती काय ?

आता येवू शपथ घेताना झालेल्या चुकांकडे. भारताच्या विधीमंडळ व संसदीय इतिहासात एक काळीकुट्ट नोंद आहे. ती म्हणजे शपथेचा उच्चार न करताही एक महिला राज्याची मंत्री झालेली आहे. हा प्रकारही तसा बिहार मधलाच. बीमा भारती या शपथ न वाचता मंत्री झाल्या होत्या. तेव्हा मुख्यमंत्री होते, जितन राम मांझी. अजून दुसरी गंमत, राजस्थानमध्ये गेहलोत मंत्रीमंडळात सहभागी होताना
गोलमा देवी
गोलमा देवी यांनी मंत्रीपदाची शपथ घेताना केवळ मैं गोलमा देवी बोल रही हूँ इतकेच वाक्य उच्चारले होते. मोठ्या मुश्किलीने त्यांनी शपथपत्रावर सही केली होती.
राबडी देवी

बिहारच्या मुख्यमंत्री झालेल्या राबडी देवी यांच्याही शपथविधीचा किस्सा असाच आहे. होय मी अशिक्षित आहे, असे त्या जाहीरपणे म्हणाल्या होत्या. त्यांना कागदपत्रांवर केवळ ‘रालाया’  (राबडीदेवी लालुप्रसाद यादव) अशीच सही करता येत होती.

मंत्रीपदासाठी शपथ घेताना उच्चारण चुकल्याची उदाहरणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपासून पंतप्रधान आणि थेट बराक ओबामापर्यंत आहे. ओबामा जाहीर कार्यक्रमात शपथ घेताना चुकले होते. म्हणून मुख्य न्यायाधिशाने त्यांना पुन्हा कक्षात शपथ घ्यायला लावली होती हे संपूर्ण जगाने पाहिले आहे.

भारतात शपथ घेताना झालेल्या चुकांचे काही किस्से असे ः 
१९/१/२००३ ः विजयसिंह मोहिते-पाटील हे शपथ घेतानाच अडखळले. त्यांनी शपथ घेताना स्वतःचे नावच घेतले नाही.
२८/५/२००९ ः केंद्रीय मंत्री व्ही. नारायणस्वामी आणि सुगाता राय यांनीही शपथ घेताना घोळ घातला होता. राष्ट्रपतींनी  मैं म्हणायच्या आधीच त्यांनी शपथ वाचायला सुरुवात केली. त्यामुळे सभागृहात हशा पिकला होता.
२६/५/२०१४ ः श्रीपाद नाईक यांनी शपथ घेताना थेट दुसरा परिच्छेद वाचायला सुरूवात केली होती. राष्ट्रपतींनी त्यांना रोखले होते.
७/६/२०१४ ः ज्येष्ठ नेते जगदंबिका पाल हेही लोकसभेत सदस्यत्वाची शपथ घेताना अडखळले होते. लिखित संहितेचा आधार न घेतल्याने त्यांचा गोंधळ झाला होता. अखेर त्यांनी लिखित मसुदा हाती घेऊन शपथ घेतली. स्वतःचे भाषण कौशल्य सभागृहाला दाखवून देण्यासाठी पाल यांनी खटाटोप केला होता. प्रारंभी काही संस्कृत शब्दांचे स्पष्ट उच्चार केल्यानंतर पाल अडखळले, नंतर त्यांनी स्वतःहून लिखित मसुदा मागवून घेतला आणि आपली शपथ पूर्ण केली.
४/७/२०१४ ः बीमा भारती शपथ न वाचता मंत्री झाल्या होत्या. 
१ /११/२०१४ ः शपथ घेताना सार्वभौमत्व हा शब्द उच्चारताना देवेंद्र फडणवीस अडखळले होते. सार्वभौमत्व  ऐवजी ते सार्वभौमता म्हणाले होते.
६/३/२०१५ ः मुप्ती महंमद सईद यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.
२०/११/२०१५ ः लालूंचा मुलगा तेजप्रताप यादव यांनी मंत्रिपदाची शपथ घेताना अपेक्षित या शब्दाच्या जागी उपेक्षित असा शब्द उच्चारला. यावर राज्यपाल आर. एन. कोविंद यांनी तेजप्रताप यांना मधेच थांबवून चूक सुधारायला सांगितली. यानंतरही तेजप्रताप शपथविधी घेताना दोन वेळा चुकले. अखेर मंचावर उपस्थित असलेल्या कर्मचार्‍यांच्या मदतीने तेजप्रताप यांनी कशीबशी आपली शपथ पूर्ण केली.

खरेतर भारतात ब्रिटीशांनी घालून दिलेल्या अनेक पंरपरा आजही आपण विनाकारण जपतो आहोत. सरकार, न्यायालये, महसूल, पदवीदान अशा अनेक ठिकाणी ब्रिटीशांनी दिलेले नियम, शिष्टाचार किंवा संहितांचे पालन आजही सुरू आहे. त्यापैकीच एक हा मंत्रिमंडळाचा शपथविधी आहे. उमेदवारी भरताना शपथ, आमदार म्हणून सभागृहात बसताना शपथ, मंत्रीपद स्वीकारताना शपथ घेतली जाते. मात्र, शपथेवर लोकप्रतिनिधी खोटे बोलतात हा प्रकार वारंवार उघडकीस येतो. उमेदवारी अर्ज भरताना संपत्ती विवरण, गुन्हे तक्ता किंवा पाल्य संख्या चुकते, मंत्री म्हणून असलेल्या अधिकारांद्वारे पक्षपात होतो. न्यायालयात गीतेवर हात ठेवून खोटी शपथ घेतली जाते. व्यावसायिक नितीमत्ता पाळू अशी शपथ घेणारे डॉक्टर, वकील गैरवर्तन करतात. हे वास्तव लक्षात घेवून सर्वच क्षेत्रांतला शपथविधीचा भोंगळपणा कुठेेतरी थांबायला हवा. एकदा मुख्यमंत्र्यांनी, पंतप्रधानांनी मंत्री म्हणून स्वीकारले की, जा बाबा बस तुझ्या कॅबिनमध्ये असा साधा सरळ पर्याय यापुढे स्वीकारला जायला हवा. नदीचे मूळ, ऋषीचे कूळ विचारू नये. तसेच पुढार्‍यांच्या शिक्षणावर बोलू नये. यातच खरे शहाणपण आहे.

अजून एक रंजक माहिती. शाळा न शिकलेले काही जण मंत्री किंवा खासदार/ आमदार झाले त्यांची नावे व राज्य असे...

गुलजार सिग रैनके (शाळा पाहिली नाही/मंत्री/पंजाब)
फूलन देवी (शाळा पाहिली नाही/खासदार/उत्तरप्रदेश)
जे. जयललिता (दहावी/मुख्यमंत्री/आंध्रप्रदेश)
विजयकांत (बारावी/आमदार/तामिळनाडू)
राबडीदेवी (शाळा पाहिली नाही/मुख्यमंत्री/बिहार)
जाफर शरीफ (बारावी/केंद्रियमंत्री/भारत सकार)
करुणानिधी (दहावी/मुख्यमंत्री/तामिळनाडू)
के कामराज (शाळा पाहिली नाही/ मुख्यमंत्री/तामिळनाडू)
गोलमादेवी (शाळा पाहिली नाही/मंत्री/राजस्थान)
वटल नागराज (नववी/आमदार/कर्नाटक)
अनंत गीते (दहावी/केंद्रियमंत्री/भारत सरकार)
उमा भारती  (सहावी/केंद्रियमंत्री/भारत सरकार)
स्मृती इराणी (बारावी/केंद्रियमंत्री/भारत सरकार)

No comments:

Post a Comment