Thursday, 22 October 2015

सोने लुटण्याचा अन्वयार्थ

स-याच्या दिवशी सोने लुटणे ऐवजी सोने वाटायला जावू, असा विचार आमचे सुधारणावादी मित्र मांडतात. मात्र ही विद्वान मंडळी लुटणे या शब्दांचा केवळ भाषा शास्त्रीय आणि कृतीशील अर्थ लक्षात घेतात. जसे लूट म्हणजे चोरी, हिसकावणे, जबरीने नेणे वगैरे. हा भाषीक व कृतीदर्शक अर्थ आहे.
लुटणे किंवा लुटविणे याला आनंद देणे, समर्पण करणे, दुसऱ्यावर ओवाळणे, आनंदात किंवा सुखात डुंबविणे असाही भावार्थ आहे. आजच्या जमान्यात 'जो मेरा है वो तेरा है और जो तेरा है वो मेरा है' ही भावना लूट आणि लुटविणे याविषयी अधिक प्रभावीपणे भावार्थ स्पष्ट करते.

अर्थ समजून घ्या
लुटणे आणि लुटविणे या शब्दांचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. लुटणे याचा अर्थ शेअर करणे, इतरांना भरपूर देणे या अर्थाने घेतला जावा. आपल्याकडील माहिती–ज्ञान आणि जास्तीची संपत्ती दुसऱ्याला दिली पाहिजे, असाही लुटणे किंवा लुटविणे याचा अर्थ आहे.
छत्रपती शिवरायांनी सुरत दोनदा लुटले. ते लुटारू होते का ? शिवरायांसोबत मावळे सुरत लुटायला जात. तेथे जबरदस्ती होती पण, जेथे सुबत्ता आहे तेथून काही संपत्ती स्वराज्यासाठी आणावी यात शिवरायांना गैर वाटले नाही. सुरत लुटणे यात परोपकाराचा भावार्थ आहे. म्हणून सुरत लुटले तरी शिवराय लुटारू ठरत नाहीत. मात्र, चंगेजखान, महंमद गझनी, महंमद घौरी यांनी हिंदुस्तानात वारंवार येवून लुटालूट केली. जनतेच्या जानमालाचे नुकसान केले म्हणून त्यांना मुस्लिमांच्या लुटारू टोळ्याच म्हणावे लागते. शिवरायांच्या सुरत लुटीची तुलना स्वातंत्र लढ्यातील वीरांनी केलेल्या ब्रिटीशांच्या खजिना लुटीशी करता येईल. तेथेही भावार्थ हा देशाच्या मुक्तीसाठी संपत्ती हरणाचा होता. ही संपत्ती हिंदुस्तानच्या जनतेचीच होती आणि ब्रिटीश ती अन्यायाने ब्रिटनमध्ये नेत होते.
स्वातंत्र्याच्या समरात अनेक वीरांनी आपला जीव लुटविला असाही संदर्भ लेखनात येतो. हिंदीत 'कई स्वतंत्रता सेनानिंयोंने आजादीके लिए अपनी जान लुटायी है' असा उल्लेख वाचनात येतो. या ठिकाणी व्यक्तीचा जीव, जान ही हिंदुस्तानसाठी क्षुल्लक मानली असून अनेकांनी आपला जीव देशावर ओवाळून टाकला असा समर्पणाचा भावार्थ यात आहे. प्रेमातूर मंडळीही प्रेयसी अथवा प्रियकरावर 'जान लुटा देंगे' असे आंधळेपणात सहज बोलून जातात.
आपण आनंदही लुटतो
नाटक, चित्रपट, तमाशा, खेळाचा सामना पाहताना प्रेक्षक आनंद लुटतात. येथे लूट ही समोरच्या कलावंत, खेळाडू आदींच्या आनंद देण्याच्या कौशल्यावर अवलंबून असते. नाटकात संवादामुळे, चित्रपटात गाण्यांमुळे, तमाशात लावणीमुळे आणि खेळात विजयाच्या स्थितीत मनमुराद आनंद लुटता येतो. विनोद, शब्दव्यंग निर्मितीच्या कोणत्याही कार्यक्रमात हास्यही लुटता येते. त्याला निखळ हसणे किंवा सातमजली हसणे म्हणतात.
वरील सर्व संदर्भ लक्षात घेतले तर लुटणे या शब्दाचा चुकीचा अर्थ (नव्हे अनर्थ) लावून सोने लुटणे या ऐवजी सोने वाटणे हा शब्द प्रयोग लग्नात अक्षता वाटणे या कृतीसारखा भावहीन आणि निरस वाटतो. आता दसरा-याच्या दिवशी सोने लूट करावी असे का म्हणतात तेही जाणून घेवू.

सोने लुटण्याची कथा
रामायणाच्या पंचम सर्गांत रघुवंशामध्ये दिलेली कथा अशी-
पूर्वी पैठणमध्ये देवदत्त नावाच्या एका ब्राह्मणास कौत्स नावाचा मुलगा होता. तो भडोच या शहरात वरतंतू ऋषीच्या घरी विद्यार्जनासाठी गेला. कौत्स तेथे सर्व शास्त्रांत पारंगत झाला. गुरूला गुरुदक्षिणा देऊन त्यांच्या ऋणातून मुक्त व्हावे असा विचार तो करू लागला. निरोप घेताना त्याने अत्यंत कृतज्ञतापूर्वक त्यांचे आभार मानून गुरुदक्षिणा घेण्याचा आग्रह धरला. त्यावर गुरूने उत्तर दिले, कौत्सा, दक्षिणार्थ विद्या शिकविणे हे अनुचित कर्म आहे. शिष्य विद्वान झालेला पाहून गुरुस जो आनंद प्राप्त होतो तीच गुरुदक्षिणा होय.
परंतु, कौत्सास गुरूला दक्षिणा देण्याची तीव्र ईच्छा होती. त्याने आग्रह धरला व काय दक्षिणा देऊ? असे विचारू लागला. तेव्हा वरतंतू ऋषी म्हणाले, मी दक्षिणा घ्यावी असा तुझा आग्रहच असेल तर तुला शिकविलेल्या प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी याप्रमाणे चौदा कोटी मुद्रा व त्याही एकाच व्यक्तीकडून आणून दे. ही अट कौत्साने मान्य करून आपल्या विद्येच्या जोरावर सुवर्ण मुद्रा कमाविण्याच्या इराद्याने तो तेथून बाहेर पडला. परंतु, चौदा कोटी मुद्रा व त्याही एकाच व्यक्तीकडून मिळविणे काही सोपे काम नव्हे हे त्याला लवकरच समजले.
रघुराजा मोठा उदार व विद्वानांस आश्रय देणारा आहे असे त्याच्या कानावर येताच कौत्स त्याच्याकडे गेला. परंतु त्या वेळी रघुराजाने विश्वजित यज्ञ करून ब्राह्मणांवर सर्व द्रव्यभंडार लुटविले होते. (येथे लूटविले हा शब्द राजाने स्वतः खूप दक्षिणा, द्रव्य दिले असा आहे. शिवाजीराजांनीही राज्याभिषेकावेळी गागाभट्टावर असेच द्रव्य लुटविले होते. त्याला दक्षिणा घरी  नेण्यासाठी हत्ती व घोड्यांचा वापर करावा लागला होता. ब्राम्हणाला दिलेली दक्षिणा लूट नसते. तो स्वेच्छेचा व्यवहार असतो). दक्षिणा देवून रघुराजा गरीब झालेला होता. कौत्साला राजाची विपन्नावस्था समजली. आपली इच्छा येथे सफल होणार नाही असे वाटून त्याला दु:ख झाले. रघुराजाने आपल्या द्वारी आलेल्या विद्वान ब्राह्मणाचा योग्य सत्कार केला व त्याच्या आगमनाचे कारण विचारले.
कौत्साने कारण सांगितले व तो पुढे म्हणाला, 'राजा, तुला प्राप्त झालेल्या स्थितीत माझी मनीषा सफल होण्याचा रंग दिसत नाही. तथापि, त्याबद्दल तू खंत न वाटू देता मला दुसरा दाता शोधून काढण्यासाठी जाऊ दे.'
हे कौत्साचे भाषण ऐकून राजा हसला. त्याने चौदा कोटी सुवर्ण मुद्रा तीन दिवसात देतो असे कौत्सास आश्वासन देऊन त्याला आपल्या घरी ठेवून घेतले. नंतर रघुराजाने इंद्राबरोबर लढण्याची तयारी चालविली. ही गोष्ट इंद्रास समजताच त्याने अयोध्या नगराबाहेर आपट्याच्या व शमीच्या झाडांवर कुबेराकडून सुवर्णमुद्रांचा वर्षांव करविला. रघुराजाने त्या सर्व कौत्सास दिल्या. त्याने त्या वरतंतू ऋषिपुढे ठेवून त्यांचा स्वीकार करण्याविषयी विनंती केली. मात्र, त्यांनीही १४ कोटी सुवर्ण मुद्रा ठेवून बाकीच्या कौत्सास परत दिल्या. त्या त्याने रघुरराजास आणून दिल्या, पण तोही त्या घेईना. शेवटी त्या सुवर्ण मुद्रांचा आपट्याच्या व शमीच्या झाडाखाली ढिग करून रघुराजाने त्या जनतेस नेण्यास सांगितले. लोकांनी अनायासे श्रीमंत होण्याची ही संधी साधून मुद्रा रुपातील सोने येथेच्छ लुटले. नातेवाईक मित्रमंडळीस देऊन आनंद व्यक्त केला. तो दिवस विजयादशमीचा होता. त्या वेळेपासून या झाडांची पूजा करून सुवर्ण मुद्रांच्या ऐवजी या झाडांची पाने लुटण्याची प्रथा सुरू झाली.  

रामायण, महाभारत संबंध
आपटा किंवा शमीच्या झाडांवर प्रभू रामचंद्राने आणि पांडवांनी शस्त्रे ठेवल्याचेही संदर्भ आहेत. याचे कारण या वृक्षांच्या बाह्य दर्शनात आणि प्रवृत्ती गुणात आहे.
वनवासाला जाताना प्रभू रामचंद्रांनी शमीच्या झाडाच्या ढोलीत शस्त्रे ठेवली होती. शमीच्या खोडातून व पानांतून उत्पन्न होणाऱ्या तेजतत्त्वरूपी धगीमुळे शस्त्रांतील सुप्त मारक शक्ती अखंड कार्यरत अवस्थेत राहू शकते, हे त्यांना माहित होते. सोप्या शब्दांत सांगायचे तर शस्त्रांची धार शमीच्या अग्नी तत्वामुळे गंजणार नाही हे प्रभू रामचंद्रास माहित होते. जेव्हा  रामचंद्रांनी शस्त्रे उतरवली, तेव्हा त्या शस्त्रांनी मारक शक्ती दुर्जनांवर सोडून शमीपत्रांच्या साहाय्याने संपूर्ण ब्रह्मांडात मारक तत्त्वाचे कार्य केले. दस-याच्या दिवशी रामाचे तारक, तर हनुमानाचे मारक तत्त्व कार्यरत असल्याने शमीपत्र हे तेच तत्त्व आकृष्ट करून घेऊन वायूमंडलात प्रक्षेपित करण्याचे महत्त्वाचे कार्य करते.
पांडवांनी त्यांच्या अज्ञातवासात विराटनगरीत प्रवेश करण्यापूर्वी शस्त्रे शमीच्याच झाडावर दडवून ठेवली होती. त्यामागे हेच कारण असावे की, वर्षभर वृक्षाकडे कोणीही जाणार नाही. दसरा वगळता इतरवेळी शमी किंवा आपट्याच्या वृक्षाचे दर्शन त्याकाळी अशुभ मानले जात असे.
प्रभू रामचंद्राने व पांडवांनी शमीचेच झाड का निवडले ? त्याचेही कारण विज्ञानाकडे नेणारे आहे. ‘शमी गर्भात अग्नीही’ असे एक वचन आहे. याचा अर्थ असा की, शमीच्या पोटामध्ये अग्नीचा वास आहे. त्यादृष्टीने विचार करताना लक्षात येते की, शस्त्रे ही लोखंडाची असतात. ती जर फार काळ वापरात आली नाहीत किंवा बराच काळ नुसतीच ठेवली गेली तर त्यावर गंज चढतो. ती पुन्हा वापरण्यासाठी, त्यांना धार लावण्यासाठी अग्नीची गरज असते. अशा वेळी जर ही शस्त्रास्त्रे अग्नीच्या सान्निध्यातच राहिली तर ती कधीच गंजणार नाही. याचे ज्ञान प्रभू रामचंद्र आणि पांडवांना होते. म्हणून त्यांनी ती शमीच्या झाडावर लपवून ठेवली.

सोने पृथ्वीवर बाहेरचेच
आता ख-या सोन्याचेही लुटणे कसे योग्य ठरते हेही समजावून घेवू. पूर्वी पुस्तकात दसरा सणासंबंधी एक धडा होता. त्यातील पहिले वाक्य होते, ‘शिलंगणाचे सोने लुटण्यासाठी...’’ यातील ‘लुटणे’ हा शब्द मनात गोंधळ घालत असे. कारण सोने ‘लुटले’ तर तो गुन्हा आहे. आपट्याची पाने लुटली तरी पर्यावरणवादी जोरदार आक्षेप घेतील. तरीही ‘लुटणे’ हा शब्द दोन्ही कृतीत बरोबर आहे. कारण पृथ्वीवर चारशे कोटी वर्षांपूर्वी जडण-घडण होताना सोने नव्हते. ते बाह्यविश्वातून पृथ्वीवर येऊन पडले. ताऱ्यांमध्ये कार्बन-लोह तयार होऊ शकते. पण, सोने तयार होणे मुश्किलच नाही तर नामुमकीन आहे.  सोने तयार होण्यासाठी प्रथम एखाद्या 'महाताऱ्याचा' स्फोट होऊन त्यातून अतिप्रचंड घनता असलेले न्यूट्रॉन तारे तयार व्हायला पाहिजेत. सुमारे वीस किलोमीटर व्यासाचे ते दोन न्यूट्रॉन तारे एकमेकांवर आदळले की त्या सुवर्णक्षणी महाभयंकर ‘गॅमा रे (किरण) बर्स्ट’ होऊन सुमारे दहा चंद्रांच्या वस्तुमानाएवढे सोने आणि प्लॅटिनम तयार होते. असे तावून-सुलाखून जन्मलेले सोने अशनी, धूमकेतू, उल्कामध्ये समाविष्ट होते. ३९० कोटी वर्षांपूर्वी सतत वीस कोटी वर्षे जोरदार उल्का वर्षाव झाला. त्या उल्कांमध्ये सोने आणि प्लॅटिनम होते. सुरवातीला त्यातील बरेच सोने व प्लॕटीनम पृथ्वीच्या पोटात गेले. नंतर काही पृष्ठभागावर पडत गेले. यामुळे ते आजही पृथ्वीच्या सर्व खंडांवर आढळून येते. गर्भातील सोने काढण्याच्या खाणी आहेत. म्हणूनच बाह्यजगातून आलेले सोने माणूस सध्या लुटत किंवा लुटवत आहे असेच म्हणावे लागेल.

सोने लुटीचा आगळा वेगळा संदर्भ
पोखरण गावातील ऐतिहासिक दसरा शिवलग्नाच्या सोहळ्यामुळे प्रसिद्ध आहे. गाववासीयांच्या उपस्थितीत लिंग रवळनाथ देवाची वाजतगाजत मिरवणूक निघते. तेथील चव्हाट्यावर मोठया उत्साहपूर्वक वातावरणात शिवलग्न सोहळा होत असतो. गाववासीय पहिल्यांदा सोने लुटतात. यानंतर देवाचा लग्न सोहळा पार पडतो. लिंग रवळनाथ मंदिरात जेव्हा कोणताही कार्यक्रम असतो तेव्हा कुसबे येथील मानकरी भगवती देवीचे प्रतिनिधी म्हणून आवर्जून उपस्थित राहतात. भगवती मंदिरात कोणताही कार्यक्रम असतो तेव्हा पोखरण गावचे लोक आवर्जून उपस्थित राहतात. दोन्ही गावातील सणाला एकमेकांची आठवण केल्याशिवाय कार्यक्रम केला जात नाही. दस-याच्या आदल्या दिवशी लिंगरवळनाथ मंदिरातून देव वाजतगाजत बाहेर पडतात. येथील चव्हाट्यावर आल्यानंतर धार्मिक विधी केले जातात व सोने लुटायचा कार्यक्रम केला जातो.

छत्रपतींच्या वंशाची शाही सोने लूट
विजयादशमीचा ऐतिहासिक सोहळा करवीरनगरीत (कोल्हापुरात) दरवर्षी पारंपरिक पद्धतीने साजरा होतो. दसरा चौकातील समोल्लंघन सोहळा मावळत्या सूर्याच्या साक्षीने छत्रपती घराण्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडतो. हजारो कोल्हापूरकर सोने लुटण्यासाठी उपस्थित असतात. विजयादशमीदिनी करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीची पूजा केली जाते. महालक्ष्मी, तुळजाभवानी व गुरुमहाराज पालखी लवाजम्यासह दसरा चौकात येते. तेथे श्रीमंत शाहू महाराज, युवराज संभाजीराजे, युवराज मालोजीराजे यांच्या हस्ते शमीचे पूजन करण्यात येते. त्यानंतर सोने लुटण्यासाठी नागरिकांची एकच गडबड सुरू होते.

आंग्रेकालीन सोने लूट
अलिबाग येथील सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या काळातील सीमोल्लंघन आणि सोने लुटण्याची परंपरा आंग्रे यांच्या नवव्या पिढीचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी येथील हिराषकोट किल्ल्याशेजारील ‘घेरीया’ या आपल्या निवासी परिसरात आजही अबाधित राखली आहे. गावातील मराठा बांधव सहकुटुंसब विजयादशमीच्या संध्याकाळी घेरीयामध्ये एकत्र येतात. मिरवणुकीने  सीमोल्लंघनास जातात. हिराकोट किल्ल्याशेजारुन तलावावरुन शेजारील आंग्रेकालीन श्री राज राजेश्वरी देवीच्या मंदिरात दर्शनाला जातात. नंतर वाजतगाजत सोने लुटून एकमेकांस शुभेच्छा देतात. मिरवणूक वाजतगाजत पुन्हा घेरीयामध्ये आल्यावर तेथे आपट्यांच्या पानांचे भारे सोने लुटण्याकरिता सज्ज ठेवण्यात येते. त्याचेही रघुजीराजे आंग्रे यांच्या हस्ते विधिवत पूजन करुन मग सोने लुटण्याचा आनंद समाज बांधव घेतात.

No comments:

Post a Comment