Saturday, 3 October 2015

मातीचे आख्यान

माणूस जेव्हा आईच्या गर्भात आकाराला येत असतो तेवढाच काळ तो अधांतरित असतो. जन्माला आल्यानंतर माणसाचे आणि जमिनीचे नाते घट्ट जमते. माणसाचे पाय जमिनीवर हवेत हा वाक्प्रचार यातूनच तयार झाला. माणसाला पहिली चव मातीचीच कळते. लहानपणी तो न कळत माती चाखतो. माणसाला ओल्या मातीचा गंध हवाहवासा वाटतो. माणसाच्या सुबत्तेचे इमले मातीवरच उभारले जातात. अंतिम समयी अंत्यसंस्कार किंवा दफनविधी होवून माणूस मातीतच विलीन होतो. मातीची ही कहाणी कधी रोचक तर कधी स्तंभित करणारी...

हजारो वर्षांपूर्वी तप्त सूर्यापासून तुटलेला एक तप्त गोळा हळूहळू थंड होत पृथ्वी तयार झाली अशी विज्ञान कथा आहे. थंड होणार्‍या पृथ्वीवर अगोदर बर्फ, दगड-धोंडे आणि डोंगर दर्‍या निर्माण झाल्या. त्यानंवर पृथ्वीवर ऊन-वारा-पाऊस यांचा हजारो वर्षे परिणाम होत त्यातून मृदा, मृतिका, माती, मिट्टी किंवा खाक जन्माला आली. म्हणजेच, आज आपण ज्या मातीवर चालतो, फिरतो, शेती करतो ती किती तरी वर्षांपूर्वी तयार झालेली आहे.

माती म्हणजे राष्ट्रीय संपत्ती

माती ही राष्ट्रीय संपत्ती आहे. संपत्ती म्हटले की, मूल्य आले. मातीला मोल नसते असे म्हणणे किंवा मानणे हे पूर्णतः चुकीचे. ‘‘माती ही अनमोल येथली माणूस कवडी मोल’’, अशा काव्य पंक्तिंची वारंवार आठवण यावी अशी स्थिती. मुंबई सारख्या महामहानगरात जेव्हा माती वरील मालमत्तांचे अलिकडचे गाजलेले कोट्यवधींचे सौदे आणि त्यातील चारशे कोटी, सातशे कोटी, चौदाशे कोटी असे आकडे ऐकले की, मातीचे मोल ठळकपणे नजरेत भरते.
माती ही संपत्ती असल्यामुळे तीचे विशेष आणि समान्य मूल्यही आहे. मातीशी संबंधीत कायदे आहेत. ते कायदे महसूल, कृषि, पर्यावरण, प्रदूषण, उद्योग अशा विविध खात्यांशी संबंधित आहेत. मातीशी संबंधित उत्खनन आणि गौण खनिज विभाग असून मातीच्या संवर्धनासाठी मृद संधारण विभाग आहे. मातीच्या गुण-अवगुणाच्या परिक्षणासाठी माती परिक्षण तथा प्रयोगशाळा विभाग आहेत. माती अशी अनमोल आहे.

मातीचे सरकारी मूल्य

मातीचे मूल्य सरकारी भाषेत चार मुख्य प्रकारात लावले जाते. महसूलच्या दप्तरी चार प्रकार म्हणजे डबर, रेती, वाळू आणि मुरूम होय. याचा हिशोब रॉयल्टीच्या स्वरूपात वसूल केला जातो. मातीच्या या रॉयल्टी रुपातील व्यवहारातून जळगाव जिल्ह्यास सरकारी महसूल सुमारे ६६ कोटींवर मिळतो. निव्वळ माती म्हणून एक कोटी ३२ लाख, डबर म्हणून ४ कोटी ४० लाख, मुरूम म्हणून २ कोटी ३२ लाख असे सरासरी उत्पन्न सरकारला मिळते. वाळू व्यवहार दोन आकड्यातील कोटींचा असतो. मातीचे सरकारी मूल्य असे आहे.
शेत जमीन किंवा घर जमीन खरेदी-विक्री व्यवहार नोंदवावा लागतो. तेथेही खरदी मूल्यानुसार कर भरावा लागतो. जमिनीचे सरकारी आणि बाजार मूल्य असेही प्रकार आहेत.
माणसाला माती फूकट मिळते असे समजणे चुकीचे आहे. एखाद्या जुन्या मोडतोड अथवा खोदकामातून निघणारी माती पूनर्वापरासाठी उपयोगात आणली तरच ती दुसर्‍या, तिसर्‍या वापरात मोफत मिळाली असे वाटते. प्रत्यक्षात त्या मातीचे मूल्य कधीतरी चुकविलेले असते.
माणसाला प्रामुख्याने रस्ते, इमारती, कालवे, धरणे, घरे आणि इतर कोण्याही बांधकामासाठी किंवा मातीची भांडी, काच सामान अथवा विविध प्रकारच्या सजावटीसाठी दगड, माती, मुरुम या गौण खनिजाचा वापर करावा लागतो. यासाठी लागणारी माती खासगी किंवा सरकारी जमिनीवर उत्खनन करुन आणावी लागते. मातीच्या या वापरासाठी महसूल यंत्रणा रॉयल्टी (स्वामित्वधन) वसूल करते. ही वसुली गौण खनिज शिर्षांतर्गत येते. या रुपातून सरकारी तिजोरीत दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल गोळा होतो.
राज्य सरकारने गेल्या जून महिन्यात गौण खनिज वरील रॉयल्टीचे दर वाढविले. तब्बल पाच वर्षांनंतर रॉयल्टीत दुपटीने वाढ केली. बांधकामासाठी चूना वापरला जातो. हा चूना चुनखडी अथवा शिंपल्यापासून तयार होतो. चुन्याचा प्रतिब्रास रॉयल्टी दर २०० रुपये पूर्वी होता. सध्या तो ४०० रुपये आहे. दगडासाठी प्रतिब्रास रॉयल्टी दर २०० रुपये होता. आता तो ४०० रुपये आहे. बांधकामासाठी वापरण्यात येणार्‍या जामा दगडाचा प्रतिब्रास रॉयल्टी दर १०० रुपये झालेला आहे. उत्खनन करून काढलेले किंवा गोळा केलेले दगड, बारीक खडी, मुरुम व डबरसाठी प्रतीब्रास रॉयल्टी दर ४०० रुपये आहे. पूर्वी तो २०० रुपये होता. कौले तयार करण्यासाठी लागणारी मातीही प्रतिब्रास ४०० रूपये रॉयल्टी भरून आणावी लागते.  धरण, बंधारे, रस्ते, लोहमार्ग व इमारती अशी बांधकामे करताना किंवा जमिनीवर मातीची भर घालणे, सपाटीकरण करणे यासाठीची रॉयल्टी दुप्पट झाली आहे. ती सुध्दा प्रतिब्रास ४०० रुपये आहे. कुठेही भर घालण्यासाठी लागणार्‍या मातीसाठी प्रतिब्रास १ हजार २४ रुपये मोजावे लागतात. सजावट कामासाठी लागणार्‍या दगडासाठी (ग्रेनाईट वगळून) प्रतिब्रास रॉयल्टी १ हजार ९२० रुपये भरावी लागते. विटांसाठी लागणारी साधी माती, गाळ, चिकण माती यासाठी प्रतिब्रास रॉयल्टी १६० रुपये भरावे लागते.
मातीची ही महती समजून घेताना लक्षात येते की, जमिनीवरील किमान मीटरभर खोदकामाची मालकी ही सरकारची असते. यासाठी ग्राम पंचायत, नपा, मनपा, तहसीलदार, जिल्हाधिकारी किंवा अगदी खालच्या स्तरावर तलाठी यांची परवानगी घ्यावी लागते. शेती बाळगणारा माणूस दरवर्षी मातीचा शेतसारा भरतो. घर, बंगले, इमारत असलेल्यांना विना शेती कर भरावा लागतो. नावावर खूला भूखंड असेल तर त्याचाही कर भरावा लागतोच.

माती म्हणजे काय ?

पृथ्वी सुरुवातीला खडकाळ होती. लाखो वर्षांच्या प्रक्रियेनंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावर माती तयार झाली.  सर्वप्रथम खडक तुटून फुटून त्याचे लहान लहान तुकडे बनतात व याला भौतिक झीज क्रिया म्हणतात. त्यानंतर ऑक्सिडीकरण (ऑक्सिडीभवन), विद्रावीकरण (विरघळण्याची क्रिया), जलसंयोगीकरण, कार्बनीकरण आदी विघटन क्रियांमुळे त्यातील खनिज पदार्थांचे अपघटन (रेणूचे तुकडे होऊन घटक द्रव्ये अलग होण्याची क्रिया) व परिवर्तन होते. अशा प्रकारच्या भौतिक आणि रासायनिक झीज क्रिया अखंडपणे चालू असतात व त्याचबरोबर जैव घटकांचे कार्य देखील चालू असते. त्यामध्ये सूक्ष्मजीव, त्यापेक्षा मोठे सजीव, पालापाचोळा, वनस्पतींची मुळे ही विघटनाच्या कार्यात मदत करतात आणि मातीत कार्बनी घटकाची वाढ होते. अशा रितीने जमिनीचा पृष्ठभाग बनण्यास सुरुवात होते. हलके हलके ही झीज क्रिया पृष्ठभागाखाली सरकत जाते व परिणामी मातीस एक सलग स्वरूप प्राप्त होते. निरनिराळ्या थरांची उत्पत्ती होते. जमिनीची खोली काही सेंटीमीटरपासून ते अनेक मीटरपर्यंत असू शकते. ही खोली जमीन कोणत्या परिस्थितीत बनली त्यावर अवलंबून असते. अशा प्रकारे अचेतन खडकापासून सचेतन अथवा क्रियाशील असा मातीची पिंड तयार होतो व त्यास एक विशेष प्रकारची संरचना व आकार असतो. मातीचा एक  थर तयार होण्यास सुमारे सहा हजार वर्षांचा कालावधी लागतो.
सेंद्रिय पदार्थ आणि खनिज पदार्थ अशा दोन प्रकारच्या पदार्थांनी माती बनते. मातीत वेगवेगळ्या कणांचे प्रमाण वेगवेगळे असू शकते. त्यानुसार मातीचे पाच प्रकार पडतात.
१) वाळू २) वाळू दुमट (सण्डीलोम) ३) दुमट लोम ४) गाळ दुमट (सिल्ट लोम) ५) चिकण माती दुमट (क्ले लोम).
या सर्व प्रकारांची थोडक्यात माहिती अशी -
वाळू - वाळू या मातीत ८० ते ९० टक्के वाळू तसेच ५ ते २० टक्क्यांपर्यंत गाळ व चिकण माती असते. सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण एक टक्के असते. नदीच्या कोरड्या पात्रातील जमीन या प्रकारची असते. येथे डांगर, टरबूज, खरबूज, काकडी, खीरे वाढतात.
वाळू दुमट - या मातीत ५० ते ८० टक्के वाळू व २० ते २५ टक्के गाळ आणि चिकणमाती असते. तीन टक्के सेंद्रिय पदार्थ असतात. ही जमीन सुपीक असते. या जमिनीत भाजीपाला, शोभाझाडे, लहान फळझाडे चांगली वाढतात. सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढवल्यास फुलझाडे, फळझाडे उत्तमरित्या वाढू शकतात.
दुमट - या मातीत ३० ते ५० टक्के वाळू ५० ते ७० टक्के गाळ व चिकणमाती तसेच १ ते ४ टक्के सेंद्रिय पदार्थ असतात. ही माती वाळू व वाळू दुमटपेक्षा जास्त सुपीक असते. भाजीपाला, शोभाझाडे, लहानमोठी फळझाडे बर्‍यापैकी वाढतात.
गाळ दुमट - या मातीत २० ते ३० टक्के वाळू, ७० ते ८० टक्के गाळ व चिकणमाती आणि १ ते ५ टक्के सेंद्रिय पदार्थ असतात. ही माती वरील तीन प्रकारच्या मातीपेक्षा बारीक कणांनी बनलेली असते. जास्त प्रमाणात गाळ व चिकणमातीमुळे पाण्याचा निचरा लवकर होत नाही. त्यामुळे मातीत हवाही कमी प्रमाणात खेळते.
चिकणमाती दुमट - खूपच बारीक कणांनी ही माती बनलेली असते. त्यामुळे पाण्याचा निचरा चांगला होत नाही. मात्र, माती सुपीक असते. नायट्रेट, नायट्रोजन यांचे प्रमाण चांगले असते. फळझाडांसाठी ही माती योग्य नाही पण उशिरा येणार्‍या फळझाडांसाठी चांगली असते.

शेतातील मृदा म्हणजे काय ?

मृदा म्हणजे शेतजमीन किंवा शेतमाती. ही एक स्वतंत्र सचेतन वस्तू आहे. ती नुसतीच झिजलेल्या खडकाचा चुरा नसून सचेतन आणि क्रियाशील आहे. त्यामुळेच तीवर वनस्पती तग धरू शकतात. ज्यावर वनस्पतीस आधार मिळतो, त्यांचे पोषण होते व त्या वाढू शकतात असा भूकवचाचा झिजलेला (रूपांतरित) थर म्हणजे मृदा असे म्हणता येईल. थोडक्यात मृदेवरच सकल प्राणिमात्रांचे जीवन, पालन, पोषण व पुनरूज्जीवन अवलंबून असते. पिकासाठी योग्य मातीची माहिती झाल्यास, तसेच मातीतील उणिवा योग्य प्रकारे भरून काढल्यास पिकांचे भरघोस उत्पादन काढता येते.
सर्वसामान्य माणूस मातीस अचेतन व निरुपयोगी पदार्थ म्हणून मानतो. या मातीत वनस्पतींना पोषक अशी अन्नद्रव्ये असतात आणि म्हणूनच काही किलोग्रॅम बी पेरले, तर त्यापासून क्विंटलमध्ये उत्पादन मिळू शकतो. मातीच्या कहाणीशी संबंधित अजूनही इतर विषय आहेत. त्यात रंजकता आणि सामान्य ज्ञानही आहे. ते पुढे कधीतरी पाहू. आता समारोप करताना हर्षदा विनया यांची कविता आठवते...

माती...भुसभूशीत
लुसलुशीत पण अबोल माती..
कोणत्यातरी साच्यात
स्वतःला बसवू पाहणारी माती..
साचे निराळे.. कधी पुरूषी तर कधी स्त्रित्व दाखवणारे..
स्वतःला साच्यात बंद करून,
गुपचूप त्याच्या कूशीत ..
निजू पाहणारी माती..
साच्याचा नवीन आकार मिळेल,
असे स्वप्नेरी स्वप्न लपवून जगणारी माती..
जिवाच्या आकांताने,
जखमा खात,
साच्यात मावू पाहणारी माती
धडपड धडपड .. अविश्रांत धडपड..
साच्यात मावण्याची..
पण प्रत्येक वेळी,
साचा उपडी केल्यावर..
पुर्वीसारखीच भूसभूशीत
खाली कोसळणारी माती
स्वतःला कोणताच आकार,
न देऊ शकलेली..
कोणताही साचा आपला,
न म्हणू शकलेली..
थकलेली, विफल माती.



No comments:

Post a Comment