Saturday 19 September 2015

काँग्रेसमुक्त जिल्हा !

चर्चा करताना दिलीप तिवारी (डाविकडे) भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ (उजविकडे)
धीकाळी सत्तेचा सुवर्णकाळ पाहणारी काँग्रेस (आय) आज जिल्ह्यात ‘गलीतगात्र’ झाली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘देशाला काँग्रेसमुक्त करा’ असे आवाहन भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी केले होते. ते आवाहन जळगाव जिल्ह्यातील मतदारांनी शब्दशः खरे करून दाखविले आहे. लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकार अशा बहुतांश सत्ताकेंद्रातून काँग्रेस हद्दपार झाली आहे. याचे एकहाती श्रेय महसूल-कृषिमंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह सध्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांना जाते. जळगाव जिल्हा सध्यातरी काँग्रेसमुक्त असून स्व. प्रमोद महाजन यांनी दिलेल्या ‘शत प्रती शत भाजप’ घोषणेचा अनुभव येत आहे.


भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पहिले ग्रामीण अधिवेशन फैजपूर (जि. जळगाव) येथे झाले होते. जळगाव जिल्ह्यातून केंद्रात मंत्री होणारे काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते होते. राज्याच्या मंत्रिमंडळात साडेतीन मंंत्रीपदेकाँग्रेस राजवटीत मिळाली होती. काँग्रेसमध्ये निष्ठेने हयात घालविणार्‍या मा. प्रतिभाताई पाटील देशाच्या सर्वोच्चस्थानी म्हणजे राष्ट्रपतीपदावर विराजमान झाल्या. काँग्रेसच्या कार्यकाळीतील अशा अनेक नोंदी जळगाव जिल्ह्याच्या राजकिय इतिहासात सुवर्णाक्षरात नोंदल्या आहेत.
मात्र, आज देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात काँग्रेसची पिछेहाट होताना जिल्ह्यातून काँग्रेसची पाळेमुळेही उखडली गेल्याचा चिंताजनक अनुभव येत आहे. गेल्या वर्षा-दोनवर्षांत भाजपने केलेल्या नियोजनबद्ध आखणीतून ‘शत प्रती शत भाजप’ असे चित्र गाव ते जिल्हा पातळीवर निर्माण झालेले दिसत आहे.
जिल्ह्यातून लोकसभेचे दोन्ही खासदार भाजपचे आहेत. निवडून आलेले ६ आमदार भाजपचे आहेत. विधान परिषदेचे दोन आमदार असून त्यात एकाची बिनविरोध निवड झालेली आहे. एकूण १,५२० ग्रामपंचायतींपैकी ७५४ ग्रामपंचायतींची निवडणूक नुकतीच झाली. त्यात ४७० ग्रामपंचायती या भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. बाजार समित्यांच्या निवडणुकीत जळगावसह चाळीसगाव, अमळनेर, धरणगाव, जामनेर या बाजार समिती भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. इतर बाजार समित्यांमध्ये भाजपच्या संचालकांची संख्या वाढली आहे. सहकार संस्थांच्या निवडणुकांमध्ये जळगाव जिल्हा बँकेत भाजपचे १३, जिल्हा दूध संघात भाजपचे १२ संचालक निवडून आले असून चेअरमनपद भाजपकडे आहे.
हा सर्व राजकिय ताळेबंद  भाजपचे ‘शत प्रती शत भाजप’ यश सिद्ध करीत असताना काँग्रेससाठी मात्र नामुष्कीचा ठरला आहे. नाही म्हणायला राजकिय पटावर असे दिवस जवळपास सर्वच पक्षांना कधीतरी पाहावे लागतात. भूतकाळात भाजपसह इतर पक्षांचीही अशी अवस्था होती. परंतु, काँग्रेसच्या आजच्या पराभवाची कारणे लिहीत असताना त्यात मुख्य मुद्दा हा काँग्रेसपासून लांब जाणारा मतदार, लोकांच्या समस्या-प्रश्‍न यापासून लांब गेलेले नेते आणि सुखवस्तू झालेला कार्यकर्ता हेही नोंदवावे लागेल.
दुसरीकडे भाजपने गेल्या दोनवर्षांत मजबूतपणे केलेल्या पक्ष बांधणीचाही उल्लेख येथे करावा लागेल. सध्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचा कार्यकाळ जवळपास पावणे तीन वर्षांचा झाला आहे. त्यांच्या या कार्यकाळात भाजपचे यश सुवर्णाक्षरांनी नोंदले गेले आहे.
यशाच्या या प्रवासाविषयी विचारले असता ते म्हणतात, आम्ही सर्व प्रथम पक्ष संघटन मजबूत करण्यावर लक्ष दिले. जिल्ह्यात भाजपचे पूर्वी १ लाख १० हजार सक्रिय सभासद होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी सदस्य नोंदणी अभियान राबवून आम्ही पाच लाखांच्यावर सभासद नोंदले. आज संख्या पाच लाख ६१ हजार आहे. यासाठी ५३४ विस्तारक प्रत्येक गावाच्या बूथपर्यंत पोहचले. ३,३०४ बूथशी संबंधित २० कार्यकर्ते नेमण्यात आले आहेत. आज पक्ष त्यांच्या संपर्कात आहे.
भाजपने गावपातळीपर्यंत नेटवर्क उभे करताना सोशल मीडिया आणि मोबाईल माध्यमाचा पुरेपुर वापर केला. त्यामुळे प्रत्येक जण कोणाच्यातरी संपर्कात आला. संदेश वहन राज्य, जिल्हा आणि थेट बूथपर्यंत असे तीनस्तराचे झाले. कार्यकर्ता सजग, सक्रिय झाला. त्याचे परिणाम लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर ग्रामपंचायत तथा सहकाराच्या निवडणुकांमध्ये दिसून आले. गाव, पाडे यापर्यंत भाजप पोहचला.
भाजपमधील अतीवेगवान संपर्क वहनामुळे इतर पक्षांचे कार्यकर्ते मागे पडले. त्यांचा आत्मविश्‍वास कमी झाला. अशा वातावरणात गावपातळीवरील निवडणुका जिंकणे सोपे झाले.
जळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात निराशाजनक वातावरण होते. बहुतांश संस्थांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढारी होते. जिल्हा बँकेसह इतर संस्था आर्थिकदृष्ट्या डबघाईला होत्या. सहकारात निवडणुका पक्षाच्या नावाने ‘कडवट’ वातावरणात लढविल्या असत्या तर सहकाराचे अधिक नुकसान झाले असते. हाच मुद्दा लक्षात घेवून जिल्हा पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी सहकारात चांगल्या लोकांचा ‘सर्वपक्षिय  पॅनेल’ फॉर्म्यूला वापरला. त्यांच्या या विचारांशी इतर पक्षांतील अनुभवी व सक्षम मंडळी जोडली गेली. भाजपतील ज्येष्ठ व तरुणांनाही संधी मिळाली. जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ येथे भाजपच्या संख्याबळाचे बहुमत घेवून तेथील चेअरमनपदे भाजपकडे आली. या दोन्ही संस्था सध्या आर्थिकदृष्ट्या फारशा सक्षम नाही. कोट्यवधींच्या संचित तोट्यांचे आवाहन आहे. मात्र, स्वतः एकनाथराव खडसे यांनी लक्ष घातलेले असल्यामुळे तेथील परिस्थिती सुधारेल असा शेतकरी आणि दूध उत्पादकांना विश्‍वास आहे.
केंद्र आणि राज्यातही भाजप नेतृत्वातील सरकारे आहेत. त्यामुळे जनतेसह कार्यकर्त्यांनाही ‘अच्छेदिन’ ची अपेक्षा आहे. केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना सध्या प्रचाराच्या अवस्थेत आहेत. त्यांचा गाव-पाडा पातळीपर्यंत प्रचार-प्रसार करण्याची जबाबदारी सरकारी यंत्रणेसह भाजपच्या कार्यकर्त्यांचीही आहे. राज्यात कृषि, दुग्ध, मत्स्योत्पादन हे शेतकर्‍यांशी संबंधित विभाग स्वतः खडसे यांच्याकडे आहेत. अनेक यंत्रणांशी संबंधित कामकाजाचा अनुभव असल्यामुळे ते नव्या योजना किंवा जुन्यांमधील योग्य दुरुस्ती करीत आहेत. म्हणून त्यांच्या कार्याचा धडाका आणि अभ्यास पुढील वर्षभरात कृषि, कृषिपूरक आणि सहकार क्षेत्रात आशादायक चित्र निर्माण करू शकेल असा विश्‍वास सर्व सामान्य जनतेलाही आहे. कार्यकर्त्यांच्याही पक्षनेत्यांकडून अनेक अपेक्षा आहेत. ही बाब लक्षात घेवून पक्षाने विविध सत्तासंस्थानांमध्ये कार्यकर्त्यांना सामावून घेणे सुरू केले आहे. येणारा काळ हा भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी सत्तेची विविध दालने उघडणारा निश्‍चितच असेल.

सोशल मीडियात भाजप

जळगाव जिल्हा भाजप सोशल मीडियात अग्रेसर आहे. खासदार ए. टी. पाटील आणि आमदार उन्मेश पाटील यांचे स्वतःचे मोबाईल ऍप्स आहेत. याशिवाय फेसबूक, व्हाट्स ऍप संदेश वहनातून त्यांचे कार्य जनतेपर्यंत पोहचत असते. आमदार स्मिताताई वाघ आणि उदय वाघ यांचाही सोशल मीडियावर सातत्याने संपर्क सुरू असतो. आमदार वाघ यांची वेबसाईटही तयार होत आहे. लोकसभा व विधानसभा निवडणूक काळात ‘ऑनलाईन वॉर रुम’ची कल्पना पक्षाने कृतीत आणली. त्याचा परिणाम उमेदवारांचे मताधिक्य वाढण्यातून दिसला. ए. टी. पाटील व रक्षाताई खडसे यांना विक्रमी मताधिक्य मिळाले. एकनाथराव खडसे यांचे सोशल मीडियाचे काम प्रोफेन्शनल संस्थेकडे आहे. त्यांचे कॅबिनेटमधील मंजूर निर्णय सायंकाळपर्यंत राज्यात पोहचतात.

काँग्रेस  उभारणी सुरू

जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या अवस्थेविषयी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीपभय्या पाटील यांना विचारले. ते म्हणाले, हे खरे आहे की पक्षाची जवळपास सर्वच ठिकाणी पिछेहाट झाली आहे. हे काँग्रेसबाबत दुसर्‍यांदा घडते आहे. मात्र, काँग्रेस संपत नाही. ती फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा झेप घेते. आता पक्ष निरिक्षक म्हणून भाई जगताप आले आहेत. आम्ही ७-८ तालुक्यात पक्ष संघटनेवर काम केले. मेळावे घेतले. कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेत आहेत. आगामी काळात संपूर्ण जिल्ह्यातील मंडळींशी चर्चा करून पक्ष संघटना अधिक मजबूत करणार आहोत. सध्या आमच्यातील लहान-मोठ्या गटांचे मतभेद मिटवत आहोत. विरोधी पक्षाचे भान ठेवून आम्ही जबाबदारी निभावत आहोत

No comments:

Post a Comment