Sunday, 2 August 2015

स्फोटापेक्षा महाभयंकर !

मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडविण्याच्या खटल्यात दोषी असल्याचे सिद्ध झाल्यानंतरही याकूब मेमनच्या बचाव आणि समर्थनासाठी उभ्या राहिलेल्या ‘मूठभर’ मंडळींनी हिंदूस्थानातील एकसंघ समाजाची वैचारिक आणि धर्माच्या नावावर विभागणी करून टाकली. याकूब आणि त्याच्या टोळीतील गुन्हेगारांच्या कृत्यामुळे २५७ जणांची हत्या झाली.  तो प्रकार क्रूर होता. पण, याकूबला झालेल्या शिक्षेच्या अंमलबजावणीनंतर समाज थेट दुभंगला. हा परिणाम त्या स्फोटांपेक्षा महाभयंकर आहे.
 

हिंदूस्थान हे अनेक राज्यांचे मिळून   तयार झालेले संघराज्य आहे. या राज्यांची रचना भाषावार झालेली आहे. बहुतांश हिंदीसह नानाविध भाषा आपण बोलतो. हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा असला तरी जवळपास निम्मे हिंदुस्थानी ही भाषा बोलत नाहीत. इतरांनी आपापल्या भाषेची अस्मिता जपली आहे.
भाषावार प्रांतरचनेत आपण विभागलेलो असतानाच आपण राष्ट्रीयत्वाचीही विभागणी केली आहे. आपण इंग्रजीत स्वतःला ‘इंडियन’ म्हणून घेतो, हिंदी-मराठीत ‘हिंदुस्थानी’ किंवा ‘भारतीय’ म्हणून घेतो. परंतु, शाळा-महाविद्यालय, कोणत्याही शासकिय सेवा-योजनेचा लाभ घेताना आपण राष्ट्रीयत्व गुजराती, मराठी, तामीळ, पंजाबी असे राज्याच्या रचनेशी संबंधित लिहतो. समाज येथे विभागला जातोय
जेव्हा पासपोर्ट काढण्याची वेळ येते तेव्हाच आपल्याला नॅशनॅलिटी (राष्ट्रीयत्व) प्रमाणपत्राची गरज पडते. नॅशनॅलिटी प्रमाणपत्र आणि डोमेसाईल (अधिवास) प्रमाणपत्र हे दोन्ही गमतीशिर आहेत. नॅशनॅलिटी प्रमाणपत्रात हिंदूस्थानचा रहिवासी असल्याचे नोंदले जात असले तरी राज्यात कधीपासून निवास करतात, हे सांगण्यासाठी डोमेसाईल लागते. येथे समाजाची पुन्हा विभागणी होते.
सरकारच्या विविध कागदपत्रांमध्ये जात आणि धर्म सुद्धा लिहावा लागतो.  तेथे आम्ही खर्‍या अर्थाने भौतिकदृष्ट्या आणि शरीराने विभागले जातो.
समाजाची विभागणी जातींच्या आणि आर्थिक मर्यादांच्या आरक्षण धोरणातून सुद्धा होते. आरक्षण हा देशाच्या घटनेने विशिष्ट मर्यादेपर्यंत घालून दिलेला हक्क आहे. ही मर्यादा सत्ताकर्त्यांनी वारंवार लवचिक केली. त्यामुळे त्या आधारावरील विभागणीही कटूता निर्माण करणारी ठरली.
शेवटची विभागणी ही देशाच्या फाळणीशी आणि धर्माशी संबंधित आहे. ती म्हणजे, हिंदू आणि मुस्लिम हे दोनच धर्म. इतरही धर्म आहेत मात्र, त्यांच्यातील संघर्षाला इतिहासातील पानांचा काळाकुट्ट  इतिहास नाही.
वरील प्रमाणे वेगवेगळ्या घटकात हिंदूस्थानी माणसाची सातत्याने विभागणी सुरूच असते. त्याचे प्रत्यंतर रेल्वे प्रवासात डब्यातील प्रवाशांशी गप्पा करताना, एखाद्या सार्वजनिक ठिकाणी गप्पा मारताना वारंवार येत असते.
हिंदूस्थानी माणसाच्या मनाची कुतरओढ नेहमी मी कोण? या प्रश्‍नाचे उत्तर शोधताना होते. गाव, शहर, जिल्हा, राज्य, राष्ट्र, जात, धर्म, व्यवसाय, वर्ग, स्तर, संघटन अशा विविध विगतवारीत तो स्वतःला शोधत असतो. सामाजिक विभागणीचा हा ‘तडा’ (क्रॅक) जवळपास सर्वच हिंदुस्थानी माणसाच्या मन आणि शरीराला गेलेला आहे. हा तडा समाजासाठी कधी ‘दुभंगाचे’ निमित्त होईल सांगता येत नाही.
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोप सिद्ध झालेला दोषी याकूब मेमनला सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर, राष्ट्रपतींनी त्याचा दया अर्ज निकाली काढल्यानंतर हिंदुस्थानातील समाजाची मन आणि शरीरांची विभागणी अधिकच कटूतेने सुरू झाली. याकूब हा मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडविणार्‍या कुंटुबातील घटक आहे, त्याचा या कट-कारस्थानात थेट सहभाग आहे, हे अनेक पुराव्यांच्या  आधारे सिद्ध झालेले असतानाही त्याच्या बचावाचे कोर्ट बाह्य मुद्दे पुन्हा-पुन्हा उकरून काढण्यात आले. नव्हे, ते वारंवार प्रसार माध्यामात चर्चिले जातील असा कटही केला गेला.
याकूब स्वतः शरण आला, याकूबला संबंधित अधिकार्‍यांनी अभयदान दिले होते, याकूबने इतर गुन्हेगारांची माहिती दिली, याकूबचा कटात थेट सहभाग नव्हता असे हे मुद्दे मांडून समाजात बुद्धीभेदाचे दुष्टचक्र सुरू झाले. याकूबच्या बचावासाठीची एक ‘बौद्धीक लाट’ सर्वत्र निर्माण केली गेली.
हे सारे घडत असताना, ज्या २५७ जणांचे स्फोटात बळी गेले, जे ७०० लोक जखमी झाले, ज्यांच्या ५०-६० कोटी रुपयांच्या मालमत्तांचे नुकसान झाले, जे रोजी-रोटी, रोजगाराला मुकले त्यांच्या भावनांची कदर कोणीही करीत नव्हते.
भारतीय समाजाच्या विभागणीचे नेहमी हेही एक कारण असते की, समाजाच्या विकासामुळे विस्थापित किंवा आपदग्रस्त ठरलेल्यांच्या अपेक्षा, ईच्छा, अडचणी, प्रश्‍न याची कदर किंवा दखल सरकार आणि सामाजिक पातळीवर नीट घेतली जात नाही. तसेच, कोणत्याही आपत्तीत थेट नुकसान झालेल्यांच्या भरपाईचा अधिकार हा आपत्तीग्रस्तांना मिळत नाही. भरपाईचे निकष अथवा लाभ हे बाबुगिरी आणि पुढारपण करणारे ठरवतात. यातूनच समाजाची विभागणी ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ यात सुद्धा झाली आहे. विस्थापितांच्या बाजू मांडणार्‍यांना ‘नक्षली’ ठरविले जाते तर विकासासाठी काहीही करणार्‍यांना ‘विकासदूत’ म्हटले जाते.
याकूबच्या अस्तित्वाकडे गांधीवादी ‘अहिंसात्मक’ किंवा प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे असे मानणार्‍या ‘मानवतावादी’ दृष्टीकोनातून पाहणार्‍यांनी बुध्दीभेदाचे विविध मुद्दे मांडून समाजमन कलूषित करून टाकले. हे विष एवढ्या तत्परतेने आणि प्रभावीपणे कालावले की, याकूब आणि इतर दोषी ठरलेल्या गुन्हेगारांना कोर्टाच्या न्यायदानाच्या प्रक्रियेत मुद्दाम अडकविले असावे अशी शंका यावी. मात्र, या खटल्याचे कामकाज जिवावर उदार होवून खडतर परिश्रम करीत पूर्णत्वास नेणार्‍या पोलीस आणि सरकार पक्षाच्या वकिलांच्या निष्ठा आणि प्रामाणिकपणा यावर शंका घेण्याचे काहीही कारण नाही. पण, काही विखारी-फुत्कारी मंडळींनी जनमनात तशी शंका निर्माण करण्याचे कामही पूर्ण केले.
समाजमनात होणारी घालमेल दर्शविणारा आरसा म्हणून सोशल मीडियावर उमटणार्‍या प्रतिक्रियांकडे पाहावे लागेल. याकूबच्या समर्थनार्थ थेट बाबरी मशीद पतनापासूनचे संदर्भ मांडणे सुरू झाले. काही ठिकाणी मालेगाव स्फोटाचा उल्लेख झाला. गुजरातमधील दंगलीचेही दाखले देण्यात आले. याला जोडून अफझल गुरू, कसाब, दाऊद यांच्या कृत्यांच्याही उखळ्या-पाखळ्या काढल्या गेल्या. समाज दुभंगाचा जुनाच तडा पुन्हा नव्याने विभागणीचे कारण ठरू लागला.
याकूबला फाशी का नको? या विषयावर भडक चर्चा रंगत असताना याकूब ‘मुस्लिम’ आहे हा मुद्दा आणि फाशीची शिक्षा ही मूळातच ‘अनमानवीय’ आहे हा जुनाच मुद्दा उगाळणे सुरू झाले. यात काही अहिंसावादीही, मौत का बदला मौत नको असे तुणतूणे वाजवत होती. मात्र, याकूबच्या कृत्यामुळे २५७ जणांचा बळी गेला ही बाब अहिंसावादी सोयिस्करपणे विसरताना दिसले.
याकूबने घडविलेल्या स्फोटामुळे निरपराधांचे शेकड्यात बळी गेले हे जेवढे सत्य आहे तेवढेच, याकूबच्या फाशीनंतर समाज मनात महाभयंकर दुभंग झाला हेही तेवढेच खरे आहे. परिणामांची भीती आहे ती येथून पुढे. याकूबचा ‘गुन्हेगार जातभाई’ पाकिस्तानात लपून बसला आहे. त्याने तेथून फुत्कार काढलाच. तो म्हणाला, याकूबच्या फाशीचे परिणाम भोगावे लागतील. हा इशारा सहजपणे घेण्याचे कारण नाही. त्याचे परिणाम कुठेही, कोणाच्याही दारापर्यंत पोहचविण्याची ‘फितूर यंत्रणा’ हिंदूस्थानात आहे. याकूबच्या ‘जनाजा’  हजेरी लावणारा प्रत्येकजण गुन्हेगार किंवा देशद्राही आहे असे समजण्याचे कारण नाही पण, त्यापैकी बहुतांश जण पाकिस्तानातून फुत्कारणार्‍या गुन्हेगार जातभाईचे ‘व्हेईकल ऑपरेटर’ असू शकतात.
याकूबच्या शिक्षेमागील अनुकूल आणि प्रतिकूल विचारांचा उहापोह करताना देशात धर्माच्या नावावर झालेल्या दोन्ही बाजूंच्या दहशतवादांची उदाहरणे दोन्ही बाजुंनी दिली जातात. या उदाहरणांचा उपयोग बुद्धीभेदासाठी विद्वान माणसे सहज करू शकतात. दोन-चार घटनांमधील सर्वसाधारण साम्यस्थळे अपराधांना एका पातळीवर आणतात. मात्र, अपराधांच्या परिणामाची तीव्रता, विस्तार याचा साकल्याने विचार होत नाही. माथी ठणकविण्यासाठी आणि नंतर भडकविण्यासाठी ही तकलादू उदाहरणे ‘ट्रिगर’ म्हणून काम करतात. भीती आहे ती येथेच. ट्रीगर कोणी व्हायचे हा आता प्रश्‍न नाही, ‘गोळी होवून’ विध्वंस करायला शेकडो जण सध्या तयार आहेत. हेच धोकादायक आणि महाभयंकर आहे. समाजमनाची विभागणी खरेतर याच मुद्यावर व्हायला हवी. हिंसा घडवणारे ‘गुन्हेगार’ आणि हिंसा नको म्हणणारे ‘मानवतावादी’. पण, तसे होणार नाही. यापुढेही याकूब आणि त्याचे समर्थक तेवढ्याच संख्येने निर्माण होत जातील किंबहुना त्यांचा वेगही वाढू शकतो. अशांना रंग, धर्म, जात, भाषा वगैर याचे बंधन असणार नाही. भविष्यात त्यांना कोणत्या रुपात ओळखायचे? हा प्रश्‍न अस्वस्थ करतोय.

No comments:

Post a Comment