Saturday 18 July 2015

‘बाहुबली’चे अभासी-वास्तव तंत्र

ध्या सर्व प्रकारच्या चित्रपटगृहांमध्ये पाच दिवसांत ३०० कोटींचा धंदा करणार्‍या आणि माध्यमांमध्ये निर्मिती विषयक तंत्राची दंतकथा बनू पाहणार्‍या ‘बाहुबली’ चित्रपटात संगणकातील अभासी जग (व्हर्च्यूअल वर्ल्ड) आणि वास्तव जग (रिअल वर्ल्ड) याचे तंत्र-यंत्राद्वारे सर्वोत्कृष्ट मिश्रण (मिक्सिंग) केले आहे. चित्रपट निर्मितीत व्हिज्यूअल इफेक्ट (दृश्य परिणाम) चा मैलाचा दगड ठरेल अशी कामगिरी भारतीय कला दिग्दर्शक, कला संचालक आणि कला निर्माता यांनी करून दाखविली आहे.बाहुबली चित्रपट हा त्याच्या दृश्यात्मक परिणाम आणि फॅन्टसी (अद्भूत कल्पनारम्यता) यासाठी जगभरात नावलौकिक मिळवतो आहे आणि कोट्यवधींच्या कमाईचा गल्लाही भरतो आहे. या यशामागे  कला दिग्दर्शक एस. एस. राजामोउली, कला संचालक तथा दृश्य परिणामतज्ञ श्रीनिवास मोहन यांचे तीन वर्षांचे अथक परिश्रम कारणीभूत ठरले आहेत.
\
चित्रपटगृहात पडद्यावर बाहुबली हा भव्य-दिव्य चित्रपट वाटतो. रायमायण-महाभारत काळसदृश्य जनजीवनाचे अद्भूत कल्पनेतील चित्रण करण्याचा अनोखा प्रयत्न कॅमेरा, संगणक, सेट आणि कलेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. पण, या चित्रपटाच्या निर्मिती मागील परिश्रमाची आणि नियोजनाची कहाणी कोणत्याही संघटना, संस्था, व्यक्ती यांच्या उभारणी-विस्तार यासाठी प्रेरणा देणारी आहे. तीनवर्षे विविध प्रकारच्या टीमने सोबत काम करीत हा भव्य-दिव्य अनुभव जगभरातील रसिकांना दिला आहे. बाहुबली चित्रपट हा अवघा १ तास ५९ मिनिटांचा आहे. या चित्रपटात भव्यता आणि अद्भुतता याचे चित्रण आणि मिश्रण प्रमुख्याने ४,५०० ते ५,००० अशा वेगवेगळे  व्हिज्यूअल इफेक्ट आणि १६ वेगवेगळ्या संगणकीय प्रणालींचा (ऍप्स किंवा सॉफ्टवेअर) चा वापर करुन केले आहे. चित्रपटातील दृश्यांची अती-अती भव्यता ३ स्थळांच्या दृश्यांतून दर्शविण्यात आली आहे.

२,००० फूटांचा धबधबा

प्रेक्षकांना स्तंभित करणारे पहिले दृश्य म्हणजे सुमारे १,५०० फुटांवरून कोसळणारा धबधबा. जगात आज असा धबधबा कुठेही नाही, असे सजग मन आपल्याला सांगत असले तरी आपण पहिल्यांदा दृश्य पाहाताच क्षणी त्याच्याशी एकरुप होवून जातो. हा धबधबा तयार करण्यासाठी कला संचालकांनी सुरूवातीला केवळ २०० फुटांचा विचार केला होता. मात्र, कला दिग्दर्शकाने सांगितले की, धबधबा ढगांपर्यंत पोहचणारा हवा. त्यानंतर कल्पनेने भरारी मारली २,००० फुटांची. प्रथम त्याचे स्केच केले गेले. ते करताना केरळमध्ये वास्तवात असलेल्या एका धबधब्याचे स्थळ निश्‍चित करण्याचे आले. संगणकावर १,५०० फुटांपर्यंतचा धबधबा तयार करण्यात आला. त्यात सुरूवातीला केवळ द्विमित (टूडी) लांबी-उंची दर्शवणारे तंत्र वापरले. वास्तव आणि अभासी चित्रण मिश्रण करताना त्याला पुन्हा त्रिमित (थ्रीडी) लांबी-उंची-खोली तंत्र वापरले गेले. बाहुबलीच्या घसरण्याचे, उंच उडी मारण्याचे, कोसळण्याचे चित्रण नेहमीप्रमाणे निळ्या, हिरव्या पडद्याच्या पार्श्‍वभूमिवर करण्यात आले. दोन्ही प्रकारचे (अभासी-वास्तव) चित्रण हे इम्पोज (दोन दृश्ये मिश्रण), सुपर इम्पोज (तीन किंवा जास्त दृश्ये मिश्रण), डिस्पोज अथवा डिलीट (काढून टाकणे), डिफ्यूज (अस्पष्ट करणे) असे संगणकातील तंत्र वापरून पूर्ण झाले. त्यानंतर चित्रपटाचा ‘रिळ’ तयार झाला. या सर्व प्रक्रियेला किमान ६ महिने कालावधी लागला. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे दुसरे दृश्य आहे युद्धाचे. एक लाख सैन्याशी लढणारे बाहुबली-भालदेवचे अवघे २५,००० सैनिक. अशा प्रकारची लढाई अद्याप तरी दुसर्‍या भारतीय चित्रपटात चित्रीत केलेले नाही.

१२० दिवसांचे युद्ध

या युद्धाला वास्तव परिणाम देण्यासाठी चित्रीकरणाच्या ठिकाणी ३०० फुटांचे २ स्क्रिन वापरले गेले. एवढ्या भव्य स्वरुपातील स्क्रिनचा वापर पहिल्यांदा झाला. या स्क्रिनचा आकारही ‘एल टाईप’ होता. त्यामुळे युद्धाचे दृश्य चारही बाजूने वास्तवाचा भास निर्माण करतात. आता खरी गंमत अशी की, अवघ्या २,००० सैनिकांच्या वेषातील कलाकार आणि २०० घोडे-हत्तींवर हे युद्ध चित्रीत झाले आहे. लढाईतील संघर्षाचे कॅमेराद्वारे चित्रीकरण करताना ५०० सहकलाकारांनी मदत केली. जवळपास १२० दिवस युद्धाचे चित्रीकरण चालले. युद्धाचे काही प्रसंग हे निळा, हिरवा पडद्याच्या पार्श्‍वभूमिवर चित्रीत करून त्याचे मिश्रण केले आहे.

महिष्मतीचा राजप्रासाद

प्रेक्षकांना अचंबित करणारे तिसरे दृश्य महिशमती शहराच्या राजप्रासादाचे आहे. अतीअती भव्यता, दूरवर विस्तार, नक्षीकाम, मूर्तीकाम, अलंकरण अशी अनेक कलाकौशल्ये यात आहेत. या राजप्रासादाच्या निर्मितीचे काम दीडवर्षे चालले. २५ चित्रकारांनी कला दिग्दर्शकाकाडून विषय समजून घेतला. पात्राचे पोषाख, हत्यारे, जिवनमान कल्पनेत उभे केले. नंतर कागदावर रफ आरेखन केले. नंतर रंगासहीत आरेखन केले. त्यानंतर मॉडेल तयार केले. आणि अंतिम टप्प्यात खराखुरा प्रासाद बांबूच्या सांगाड्यावर २० एकर जागेत उभा केला. हे काम १,००० कारागिरांनी २०० दिवसांत पूर्ण केले. चाकू, तलवारी, युद्धाची साधने यांची छोटीछोटी मॉडेल्स तयार केली. पात्रांची आभूषणे, शीरस्त्राणे, मुकूट, वस्त्रे तयार केली. आता चित्रपट पूर्ण झाल्यानंतर बाहुबलीच्या या वस्तूंचे संग्रहालय तयार केले जात आहे. असे हे भारतातील पहिले संग्रहालय आहे.

निर्मितीची इतर वैशिष्ट्ये

संपूर्ण संगणकीय तंत्रावर ८५ कोटी रुपये खर्च, संपूर्ण चित्रपट निर्मिती खर्च २५० कोटी, जगभरात एकाच दिवशी ४,००० चित्रपटगृहे आणि अमेरिकेत १३५ बिग स्क्रिनवर प्रदर्शित, कलाकार प्रभास आणि राणा यांनी भूमिकेसाठी १०० किलो वजन वाढवले. यासाठी दिवसभरातून ६/७ वेळा जेवण केले, बाहुबलीच्या प्रचाराचे पोस्टर ५१,००० चौरस फुटाचे होते आणि त्यांची नोंद गिनिस बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली, ज्युरासिक वर्ल्ड चित्रपट तयार करणार्‍या टीमने बाहुबलीचे संगणकिय काम केले आहे.

स्पेशल इफेक्टचे तंत्र

संगणकीय प्रणालीत नुके, ऍटो डेक्स माया, पिक्सर रेंडर मॅन ऍण्ड गोलेम क्राऊड, लर्न थ्रीडी मॉडेलिंग, डिजिटल स्न्लप्टींग, कॅरेक्टर ऍनिमेशन (अभिनेत्यांचे वेगवेगळ्या ऍक्शनमधील चलफित व छायाचित्रे) याचा वापर करण्यात आला आहे. या तंत्राचा भाग मॅट पेंटींग आणि स्थिर चित्रण, लाईव्ह ऍक्शन इपेक्ट, डिजिटल ऍनिमेशन आणि साऊंड इफेक्ट हा सुद्धा असतो. त्यामुळेच दृश्य मिश्रण हव्या त्या पद्धतीने आणि वास्तवाजवळ जाणारे करता येते.

ते धबधबा केरळमधला

बाहुबलीमध्ये खरा आणि खोटा असा धबधबा मिश्रण केले आहे. केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात चलकुडी तालुक्यामधल्या अथिराप्पिलीमध्ये असलेल्या अथिराप्पिली धबधब्याचे चित्रण यात वापरले आहे. चित्रपटाचा सुरुवातीचा भाग याच धबधब्याजवळ चित्रित करण्यात आला आहे. अथिराप्पिली धबधब्याला भारताचा नायगरा फॉल्स म्हटले जाते. चलकुडी नदीतून या धबधब्याचा उगम होतो. धबधबा ८० फूट उंच असून जवळपास ३३० फूट रुंद आहे. जोरदार वेगाने पडणार्‍या पाण्यामुळे धबधब्याच्या तळाशी अत्यंत मनमोहक दृश्य दिसते. याच धबधब्याखाली शिवडू शिवलिंग उचलून ठेवतो.

No comments:

Post a Comment