
‘सब समाजको साथलिए आगे है बढते जाना’ हा विचार घेवून ‘जळगाव जनता सहकारी बँक’ सुरू झाली. त्यानंतर आर्थिक विकासातून समाज विकास हे तेव्हाचे सूत्र घेवून ‘केशवस्मृती प्रतिष्ठान’ स्थापन झाले. समाजाच्या विविध गरजांची शक्य तशी पूर्तता करण्याची जबाबदारी प्रतिष्ठानने सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून स्वीकारली. प्रतिष्ठानच्या नियंत्रणात आज जवळपास १६ सेवा प्रकल्प सुरू आहेत. भविष्यात इतरही नव्या सेवा प्रकल्पांचा विस्तार आणि जुन्या प्रकल्पांचे सक्षमीकरण करण्याच्या योजना आहेत. हे करताना, प्रतिष्ठानच्या कामात काळानुरुप अमूलाग्र बदलाची भूमिका स्वीकारण्यात आली आहे. समूह नेतृत्त्व आणि व्यवहाराचे शहाणपण असलेल्यांचा एकत्रित समूह ही ‘विचारशैली’ आणि समुहाच्या गरजांपर्यंत पोहचण्याची ‘कार्यशैली’ घेवून केशवस्मृती प्रतिष्ठान वाटचाल करीत आहे. केशवस्मृती प्रतिष्ठानचे प्रकल्प प्रमुख म्हणून श्री. भरतदादा अमळकर सेवा प्रकल्पांचा भावी प्रवास (डायरेक्शन), संकल्प (एम्स), आव्हाने (हर्डल्स) आणि पर्यायी मार्ग (सोल्यूशन) या विषयी ‘कलेक्टीव्ह विस्डम’ (बहुगुणींचा समुह) ही संकल्पना मांडतात...
प्रतिष्ठानची स्थापना
केशवस्मृती प्रतिष्ठान परिवाराची रचना आणि उभारणी स्व. डॉ. अविनाशदादा आचार्य यांच्या ठाम आणि दूरदृष्टीच्या विचारधारेतून झाली. आचार्यदादा स्वतः संघ परिवाराचे एकनिष्ठ अनुयायी होते. दुर्बल, गरीब समाजाचा आणि त्यांच्यासाठी असलेल्या सार्वत्रिक सामाजिक सेवांचा विकास हा समुहाच्याच पुढाकारातून होवू शकतो असा त्यांना विश्वास होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील इतर मान्यवरांच्या सदैव संपर्कात असलेल्या आचार्यदादांनी समूह विकासाच्या अनेक कल्पना जळगाव जिल्ह्यासाठी अनुसरल्या.गरीब, दूर्बल, कमकूवत मात्र प्रामाणिक, होतकरू, परिश्रम करणार्या समाजाला आर्थिक पाठबळ देण्यासाठी आचार्यदादांनी ‘जळगाव जनता सहकारी बँक’ स्थापन केली. आर्थिक पाठबळातून समूह विकास हे तेव्हाचे सूत्र होते. समाजाच्या ‘आर्थिक’ क्षेत्रात प्रगतीची दिशा बँकेच्या माध्यमातून निश्चित झाली.
गरीबांच्या दोनवेळच्या जेवणाची गरज भागावी म्हणून ‘क्षुधाशांती झुणका भाकर योजना’ सुरू करण्यात आली. गरजूंना अवघ्या एक रुपयात झुणका भाकर देण्याचा आचार्यदादांचा विचार खूप दूरदृष्टीचा होता. मात्र, हे समाजिक कार्य आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. आर्थिक गणित जमेल तेवढे बँक परिवारातून आणि शक्य तेवढे समाजाच्या देणगीतून भागवायचे आणि योजना राबवायची हा त्यांचा संकल्प होता. योजनेतील तोटा भरून काढण्यासाठी आचार्यदादांनी जळगावमधील सुप्रसिद्ध आर. सी. बाफना ज्वेलर्स यांचे सहकार्य घेतले. झुणका भाकर प्रकल्प सुरू झाला. कालांतराने राज्यात सत्तेवर आलेल्या युती सरकारने याच विचाराने ‘सरकारी झुणका भाकर योजना’ सुरू केली. गंमत म्हणजे, आचार्यदादांनी तेव्हा खर्चाच्या तुलनेत एक रुपया कमी घेण्याची तयारी दाखवून सरकारी योजनेला झुणका भाकर पुरविण्याची तयारी दर्शविली होती. केशवस्मृती प्रतिष्ठानचा हा प्रकल्प म्हणजे ‘समाजिक’ सेवेच्या उद्दिष्ट पूर्तीकडे जाणारे पाऊल होते.
प्रतिष्ठानचा विस्तार
समाजात तळागाळातील घटकांच्या इतरही गरजा डोळ्यांसमोर असल्यामुळे वारंवार निधीची गरज भासेल हेही आचार्यदादांना माहित होते. ही अडचण दूर करण्यासाठी विश्वस्त स्वरुपातील संस्था असावी म्हणून ‘जळगाव जनता बँक संचलित केशवस्मृती प्रतिष्ठान’ स्थापन करण्यात आले. बँकेच्या दरवर्षीच्या नफ्यातून २० टक्के निधी हा सेवा आणि सामाजिक कार्यासाठी राखून ठेवण्याची घटनात्मक तरतूदही करण्यात आली. आचार्यदादा स्वतः डॉक्टर असल्यामुळे रुग्णसेवेत गरीबांना येणार्या अनंत अडचणी त्यांना माहित होत्या. रुग्णांच्या विविध शस्त्रक्रियांसाठी रक्त पुरवठा करणारी कोणतीही यंत्रणा त्या काळात जळगावमध्ये नव्हती. ही गरज लक्षात घेवून आचार्यदादांनी रक्तपेढी सुरू करण्याचा प्रकल्प हाती घेतला. हा प्रकल्प खर्चिक आणि विविध नियम-अटींमुळे क्लिष्ट होता. तरीसुद्धा ‘माधवराव गोळवलकर रक्तपेढी’ प्रकल्प सुरू झाला. हा निर्णय केशवस्मृती प्रतिष्ठानची ‘वैद्यकिय’ सेवेची जबाबदारी निश्चित करणारा होता.आर्थिक, सामाजिक आणि वैद्यकिय सेवांच्या पाठोपाठ केशवस्मृती प्रतिष्ठानने समाजातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज भागविण्यासाठी ‘शैक्षणिक’ क्षेत्रातही ठरवून आणि निश्चयाने पाऊल टाकले. स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान अंतर्गत निवासी शाळा प्रकल्प सुरू केला.
सतत काम करणारी माणसे जेव्हा प्रयत्न सुरू करतात तेव्हा अडचणीही त्यांच्यासमोर उभ्या राहून त्यांच्या निश्चयाला कडव्या परिश्रमाचे बळ देतात. समूह सेवा प्रकल्पांच्या इतर योजना समोर असताना भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमात बदल केले. बँकांना त्यांच्या नफ्यातून केवळ १ टक्का निधी सामाजिक कार्यावर खर्च करता येईल, असा हा बदल होता. त्यामुळे बँक संचलित केशवस्मृती प्रतिष्ठानसमोर अर्थ पुरवठ्याची मोठी समस्या उभी राहिली. आचार्यदादा आणि सोबतची मंडळी जिद्दी असल्याने त्यांनी सेवा प्रकल्प पुढेही जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार केला. ‘बँक संचलित केशवस्मृती प्रतिष्ठान’ ला स्वतंत्र करण्यात आले. सन १९९९ च्या दरम्यान ‘केशवस्मृती प्रतिष्ठान’ ही स्वतंत्र विश्वस्त संस्था म्हणून अस्तित्वात आले.
या काळात सामाजिक कार्यासाठी देणगी देणार्यांची संख्या मर्यादीत होती. त्यांचे आर्थिक पाठबळ सेवा प्रकल्प केवळ चालवण्या पुरतेच होते. दीर्घकाळ सेवा प्रकल्पांचा आर्थिक गाडा पुढे खेचला जाणार नाही ही व्यवहारी अडचण आचार्यदादांच्या लक्षात आली होती. सोबतच्या मंडळींनाही चिंता होतीच. तेव्हा आचार्यदादांनी जिल्ह्यातला ‘पहिला मेगाइव्हेंट’ ठरेल असा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कल्पनेतील ‘जाणता राजा’ या महानाट्याचा प्रयोग तिकीट लावून ठेेवला. जळगावकरांसह जिल्हावासियांनी भरभरून प्रतिसाद देत ‘जाणता राजा’ला हजेरी लावली.
समाजात संख्येने वाढणार्या वृद्धांचे प्रश्नही आचार्यदादांच्या समोर होते. कुंटूंब असलेल्या मात्र, तेथे जागा नसलेल्या आणि निराधार वृद्धांच्या निवासासाठी पुन्हा धर्मार्थसेवा म्हणून ‘मातोश्री वृद्धाश्रम’ सुरू करण्यात आला. या सेवा प्रकल्पासह इतरही सेवा प्रकल्पांच्या इमारती आणि पूरक सेवांसाठी आचार्यदादांनी प्रसंगी कर्ज काढले. सोबतच समाजाच्या गरजांशी संबंधित इतर सेवा प्रकल्पही जिद्दीने उभे केले. त्यामुळे सेवा प्रकल्पांची संख्या १६ पर्यंत पोहचली. यात मांगीलाल बाफना नेत्रपेढी, रुग्णवाहिका, मूकबधीर मुलांचे विद्यालय, ललित कला अकादमी, सार्वजनिक गणेशोत्सव, सेवा वस्ती विभाग, माधव बहुउद्देशिय प्रतिष्ठान असे सेवा प्रकल्प सुरू झाले. केशवस्मृती प्रतिष्ठान हे आर्थिक, सामाजिक, वैद्यकिय आणि शैक्षणिक सेवा प्रकल्पंची ‘वन अम्रेला’ (एक छत्री) झाले. समूह सेवा प्रकल्पांची ‘मातृसंस्था’ म्हणून केशवस्मृती प्रतिष्ठानला ओळख मिळाली.
येथे महत्त्वाची बाब म्हणजे आचार्यदादांच्या सोबत आलेली माणसे एका ध्येय्याने आणि विचारांनी प्रेरित होवून काम करणारी होती-आहेत. प्रत्येकाने सक्रिय पुढाकार घेत विविध प्रकल्प सांभाळले. अनेकांना सेवा प्रकल्पांचे नेतृत्त्व करण्याची संधी आचार्यदादांनी दिली. प्रकल्पांच्या अडचणी मांडणार्या सहकार्यांना दादा म्हणत, ‘काम करीत राहा, मार्ग निघेल. तुझे कामच तुझ्याविषयी बोलेल’
कलेक्टीव्ह विस्डम
आचार्यदादा स्वतः अनेक गुणांचा समुच्छ संचय असलेले व्यक्तिमत्व होते. ते निस्पृह मात्र जिद्दी होते, ते खंबीर परंतू लवचिकही होते, कठोर असले तरी त्यांच्यात भरपूर ममत्वही होते. ते प्रामाणिक होते आणि सचोटी हा त्यांचा कर्मसिद्धांत होता. ते मितभाषी पण स्पष्टवक्तेही होते. ते पाठबळ द्यायचे आणि प्रसंगी निर्धाराने पुढे उभे राहत. आचार्यदादांच्या गुणांची मोजणी कोणत्याही संख्यात्मक ‘अवधानात’ करता येणार नाही.आज स्व. आचार्यदादांच्या नंतर केशवस्मृती प्रतिष्ठानची वाटचाल पाहताना तीन पिढ्यांच्या सहयोग आणि सहभागाची कल्पना येते. स्व. डॉ. आचार्यदादांचे समवयस्क आणि बुजूर्ग सोबती, तेव्हाची युुवापिढी आणि आज निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेली प्रौढ मंडळी आणि सेवा प्रकल्पांना स्वबळावर सक्षम करीत नवी कार्यशैली स्वीकारणारी युवापिढी. असा हा तीन पिढ्यांचा प्रवास आहे.
आचार्यदादांच्या नंतर प्रतिष्ठानचे काय असा विचार करताना नेहमी प्रश्न पडतो की, दादांच्या एवढ्या गुणांचा संचय असलेली कोणती व्यक्ती प्रतिष्ठानचे नेतृत्त्व करणार? यावर सध्याचे प्रकल्प प्रमुख भरतदादा अमळकर खूप छान कल्पना मांडतात. ते म्हणतात, समाजसेवा आणि समूह सेवा प्रकल्प, संस्था चालकांना नेहमी पडणारा हा प्रश्न आहे. हे खरे आहे की, स्व. आचार्यदादांच्या उंचीचा एक माणूस मिळणार नाही. किंबहुना दुसरे दादा होणे नाही. पण, आम्ही सार्यांनी एकत्र येवून समूह नेतृत्त्व आणि व्यवहारिक सामूहिक शहाणपणातून कृती अशी ‘कलेक्टीव्ह विस्डम’ ही संकल्पना स्वीकारली आहे.
कोणत्याही एका व्यक्तीत अनेक गुणांचा संच नसेल पण, विविध गुणांनी युक्त असणारी अनेक माणसे जोडून स्व. आचार्यदादांच्या प्रमाणे समूह नेतृत्त्व उभे करता येणे शक्य झाले आहे. विविध क्षेत्रांतील, विचार प्रवाहातील, क्षमतांची माणसे आम्ही जोडली आहेत. ‘कलेक्टीव्ह विस्डम’ हीच ही संकल्पना आहे. यातूनच समूह नेतृत्त्व आणि सेवा प्रकल्पांच्या विकासाला दिशा मिळत आहे.
जळगाव जनता सहकारी बँकेच्या सध्या सुरू असलेल्या निवडणुकीचे नियोजनही समूह नेतृत्त्व आणि सामूहिक शहाणपण असणार्या माणसांच्या सहभागातून केले आहे. जगाच्या पाठीवरील प्रत्येक क्षेत्रात तंत्र-यंत्र याच्या गतीमान वापरासह कौशल्ये अंगी असलेल्या लोकांनी नेतृत्त्व करण्याचे दिवस आहेत. पूर्वीच्या समूह नेतृत्त्वात जिद्द आणि परिश्रम या गुणांना महत्त्व होते. आजही तेच गूण प्राथमिक पातळीवर महत्त्वाचे आहेतच पण, तंत्र माहित असलेली, कामासोबत व्यावसायिकता, व्यवहार्यता आणि प्रगती याचे भान ठेवणारीही मंडळी साथीला घेणे आवश्यक आहे. ‘कलेक्टीव्ह विस्डम’ हीच ही संकल्पना आहे. म्हणून, बँकेत नव्या दमाचे शिलेदार निवडताना बँकिंग क्षेत्राशी संबंधीत पाच चार्टर्ड अकाऊंटंट, तीन डॉक्टर, सेल्सटॅक्स कन्सल्टंट अशा सर्वांना सोबत घेतले आहे.
विविध घटकांना जोडणी
बदलत्या काळात बँकिंग हा व्यवहार फक्त ठेवी, देणे, घेणे, कर्ज, वसुली अशा कृतींपुरता मर्यादीत राहणार नाही. बँक व्यवस्थापन हे समाजाच्या सर्वच प्रकारच्या गरजांसाठी परिवर्तनाचे ‘माध्यम’ होवू पाहत आहे. सभासदांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासोबत त्यांचे जीवनमान उंचावणाणारी दूरदृष्टी संचालकांमध्ये आवश्यक आहे. येथे उदाहरण म्हणून उल्लेख करावा लागेल. तो म्हणजे, जळगाव जनता सहकारी बँकेच्या माध्यमातून सर्व सामान्य घटकांतील महिलांचे सात हजार बचत गट आज जिल्ह्यात कार्यरत आहेत. या बचत गटांच्या माध्यमातून महिला सभासद करीत असलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन दरवर्षी बँकेतर्फे घेतले जाते. जळगावकरांसाठी हा सांस्कृतिक आणि खरेदीमेळा असतो. अशा प्रकारे बँकेची सेवा गरजूंपर्यंत नेण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे.सेवा प्रकल्पांच्या संचलनात नवी मंडळी जोडताना केवळ अनुभव हाच एक निकष आता उपयुक्त नाही. सकारात्मक विचारांच्या कृतिशील युवा मंडळींनाही सोबत घेण्याचे ठरवून प्रयत्न केले जात आहेत. अनुभवी ज्येष्ठांनी मार्ग आणि दिशादर्शनाची भूमिका स्वीकारली आहे.
पूर्वीच्या कार्यपद्धतीत लोकांच्या गरजा लक्षात घेवून सेवा प्रकल्प सुरू केले गेले. प्रकल्पांची रचना ही गरजू आपल्याकडे येईल अशा पद्धतीवर आधारित होती. त्यामुळे लोक आले तर उद्दिष्ट साध्य नाहीतर गरजूंची प्रतिक्षा असेही चित्र होते. आता बदलणार्या कार्यपद्धतीत सेवा ही गरजूंपर्यंत नेण्याचा कृतिशील विचार अमलात आणला आहे. सेवा वस्ती विभाग आज तळागाळातील लोकांपर्यंत पोहचतो आहे. वैद्यकिय सेवा लोकांच्या दारात नेली आहे. दुर्बल, गरीब घटकांतील महिलांमधील हिमोग्लोबिन तपासणे, गवंडी काम करणार्या कामगारांना धनुर्वाताचे इंजेक्शन देणे, रक्त घटक तपासणी असे अनेक प्रकल्प गरजूंच्या दारात केशवस्मृती प्रतिष्ठानने पोहचविले आहेत.
केशवस्मृती प्रतिष्ठानच्या समूह सेवांमध्ये नेतृत्त्वाची संधी मिळणे ही संबंधितांना गौरवाची बाब वाटावी म्हणून सर्वच घटकातील शहाण्या आणि होतकरू मंडळींना सोबत घेतले आहे. केशवस्मृती प्रतिष्ठानचे व्यवस्थापन ‘व्हाईट कॉलर’ मधून ‘कॉमन कॉलर’ कडे नेण्याचा ठरवून आणि टप्प्याटप्प्याने प्रयत्न सुरू आहे. समाजातील लहान, मागास, छोट्या घटकांचे प्रश्न आणि ते सोडविण्याचे उत्तर घेवून येणार्यांना संधी दिली जात आहे. १६ सेवा प्रकल्पांच्या माध्यमातून जवळपास १५० वर मंडळी समूह नेतृत्त्व आणि सामूहिक शहाणपणातून काम करीत आहेत.
काळासोबत बदलाचे धोरण स्वीकारल्यामुळे सोबतच्या मंडळींना इतर ठिकाणचे चांगले, विधायक काम दाखविण्याचा प्रयत्नही केशवस्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून केला जात आहेे. अभ्यास सहली आयोजित करून दुसर्यांचे चांगले कामही दाखविले जाते. त्यातून आपल्या कार्यपद्धीत सुधारणा होते किंवा अनुकरण केले जाते. हा एक प्रकारे अंतर्गत प्रशिक्षणाचा भाग आहे.
इतर नवे प्रकल्प
केशवस्मृती प्रतिष्ठानच्या सेवा, सुविधा या केवळ आर्थिक दूर्बल घटकांसाठी किंवा तळागळातील लोकांसाठीच आहेत, हाही एक समज होता. तो बदलण्यासाठी सेवांमधील गुणवत्ता वाढ आणि तत्परता याकडे लक्ष दिले गेले. स्पर्धेत असलेल्या खासगी किंवा व्यावसायिक सेवांशी स्पर्धा करण्याचे धाडस प्रकल्प चालकांमध्ये निर्माण झाले. केशवस्मृती प्रतिष्ठानच्या सेवा प्रत्येक गरजूसाठी आहेत हा विचार समाजाच्या मनात निर्माण केला. नव्हे तर, गरजवंत हा कोणत्याही आर्थिकस्तराचा असेल तर तो सेवा प्रकल्पांच्या सानिध्यात लाभासाठी आलाच पाहिजे असेही नियोजन करण्यात आले. याचा परिणाम म्हणजे, आर. सी. बाफना यांच्या आर्थिक पाठबळावर सुरू असलेल्या नेत्रपेढीत स्वतः श्री. रतनलालजी बाफना यांच्या नातेवाईकांवर नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आली. शिवाय, नेत्रपेढीतून होणार्या इतर शस्त्रक्रियांची संख्या वाढली. वृद्धाश्रमात धर्मार्थ आर्थिक पाठबळावर राहणार्या वृध्दांच्या सोबत दरमहा स्वतंत्रपणे मानधन देवून राहणार्या वृद्धांची वेगळी सेवा व्यवस्था करण्यात आली. प्रामुख्याने यातूनच आवश्यक तेव्हा व्यावसायिकता स्वीकारण्याची दृष्टी प्रतिष्ठानला मिळाली. क्षुधाशांतीच्या प्रकल्पात पूर्ण जेवण, भाजीपोळी, नास्ता, उडपी पदार्थ सुरू करण्यात आले. केटरर्स सेवा म्हणून जेवणावळीचे करार केले जात आहेत. रक्तपेढीत अत्याधुनिक तपासण्यांची सोय झाली आहे. शैक्षणिक प्रकल्पांमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीचे प्रयोग सुरू आहेत. हा सारा बदलाचा व्याप समूह आणि सामूहिक शहाणपण असलेल्या नेतृत्त्वातून विस्तारतो आहे, वाढतो आहे.बदलत्या काळात समूह आणि समाजाच्या नव्या गरजा लक्षात घेवून सेवा प्रकल्पांचा विस्तारही करण्याचे नियोजन आहे. सामाजिक, आर्थिक, वैद्यकिय आणि शैक्षणिक क्षेत्रात समूह विकासाची विचारधारा आणि निष्ठा तीच आहे. मात्र, नवे प्रकल्प आकाराला येत आहेत. जळगाव शहरातील पूर्व भागात विवेकानंद निवासी शाळेसारखी शाळा सुरू करण्याचे निश्चित झाले आहे. कुसुंबा परिसरात ‘अहिंसातीर्थ’ आहे. तेथील कर्मचारी, मजुरांची मुले, परिसरातील गरीब-दूर्बल घटकांची मुले यांच्यासाठी ‘गोठाशाळा’ सुरू झाली आहे. हा नवा शैक्षणिक प्रयोग आहे. साखर कामगारांच्या मुलांसाठी जशी ‘साखरशाळा’ असते तशी ही ‘गोठाशाळा’ आहे.
जळगाव जिल्ह्यातील रेल्वेस्थानक परिसरात बहुसंख्य निराधार मुले दिसतात. त्यांना एकत्र करून त्यांच्यासाठी निवारा सुरू करून त्यांच्या पुनर्वसनाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पात ‘समतोल फाऊंडेशन’चे सहकार्य मिळाले आहे. मुलांच्या सर्व्हेक्षणाचे काम ‘मुस्कान’ योजनेत सुरू आहे.
झोपडपट्टीतील किंवा दुर्बल घटकांतील महिलांमधील रक्त घटक, ऍनिमिया तपासणीचा उपक्रमही नुकताच सुरू झाला आहे. झोपडपट्टींमध्ये बालकांसाठी संस्कार वर्ग सुरू केले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातही एक शिक्षकी शाळा सक्षम करण्याचे प्रयत्न आहेत.
वृद्धाश्रमाच्या बाबतीत अजून एक आगळा वेगळा प्रयोग यशस्वी होत आहे. कुटूंब असूनही जे वृद्ध आश्रमात आहेत त्यांना परिवारात पाठविण्यासाठी सकारात्मक नियोजन आहे. वृद्धांसह त्यांच्या पाल्यांचेही कौन्सिलींग करुन वृद्धांना कुटुंबाच्या सानिध्यात पाठविले जात आहे. काही प्रकरणात हा प्रयोग यशस्वी झाला आहे.
निवासी शाळेचा पॅटर्न घेवून एरंडोल-धरणगाव रस्त्यावर आणि फैजपूर-यावल रस्त्यावर विवेकानंद शाळा सुरू करण्यात येणार आहे. या शिवाय जळगाव शहरात यशस्वीपणे कार्यरत असलेल्या ‘क्षुधाशांती’चे प्रकल्प भुसावळ आणि चाळीसगाव येथे सुरू केले जाणार आहेत. तेथील काही समाजसेवी मंडळी प्रतिष्ठान सोबत येत आहे.
केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे वैद्यकिय सेवा प्रकल्प विविध वस्त्यांमध्ये सुरू आहेत. स्व. डॉ. आचार्यदादांचे स्वप्न होते की, जळगाव येथे सुसज्ज कॅन्सर हॉस्पिटल सुरू करायचे. त्यावर काम सुरू आहे. केशवस्मृती प्रतिष्ठान सोबत रतनलाल सी. बाफना फाऊंडेशन, रोटरी क्लब आणि जैन उद्योग समूह यांच्या सहकार्याने जळगावात लवकरच सुसज्ज कॅन्सर हॉस्पिटलची उभारणी होणार आहे. हा प्रकल्प मोठ्या खर्चाचा मात्र संपूर्ण महाराष्ट्रातील कॅन्सरच्या रुग्णांना दिलासा देणारा राहील.
या सार्या व्यापात कार्यकर्ता घडविणारा एक स्वतंत्र प्रकल्प सुरू होणार आहे. समाजाचे निरीक्षण आणि कार्यात सहभाग हे केवळ कार्यकर्ता किंवा स्वयंसेवकच करू शकतो. अशा हेतूने काम करणार्यांची एकसंध साखळी तयार करण्याचा प्रयत्न आहे. गाव ते देश पातळीवर कार्यकर्ता यातून जोडला जाईल. रचनात्मक आणि प्रशिक्षित संघटन यातून उभे राहील. कार्यकर्ता मनोवृत्तीने उभा राहणारा युवक देशाच्या कोणत्याही व्यवस्था-यंत्रणेला वापरता येईल. ही व्यवस्था सरकारी, खासगी किंवा स्वयंसेवी कशीही असू शकेल.
केशवस्मृती प्रतिष्ठानच्या कॅन्व्हासवर नव्या रंगाने चित्र रंगविणे सुरू आहे. कॅन्व्हास जुनाच आणि शिस्तीच्या चौकटीतला आहे. रंगांची उधळण करणारे मात्र नव्या दमाचे, कल्पकतेचे आणि एका विचारांचे आहेत. बहुधा ‘कलेक्टीव्ह विस्मड’ या संकल्पनेतील चित्र येणार्या पाच-दहा वर्षांत निश्चितपणे इतरसांठी मार्गदर्शक आणि प्रेरणा देणारे ठरेल याविषयी शंका नाही.
आचार्यदादा आमच्यासाठी थांबले
कोणत्याही संस्था-संघटनेच्या यशस्वी वाटचालीनंतर संस्थापकांच्या नंतर कोण? हा प्रश्न नेहमी पडतो. केशवस्मृती प्रतिष्ठान समोरही ही अडचण होतीच. या संदर्भात श्री. भरतदादा अमळकर हे डॉ. आचार्यदादांच्या काळातील एक आठवण सांगतात. प्रकृती खूप खालावल्यामुळे आचार्यदादा नाशिक येथे कुंटुबियांकडे गेले होते. तेव्हाही त्यांचे वय जास्त होते. मी आणि श्री. संजयजी बिर्ला दादांच्या भेटीसाठी एकदा नाशिकला गेलो. आम्ही दादांना भेटलो. ते पडूनच होते. आम्हाला बघून म्हणाले, ‘आता काम संपले आहे. मला निरोप घ्यावा लागेल’ प्रसंग गंभीर होता. मी म्हणालो, ‘दादा! तुम्ही थांबायला हवे. आम्हाला तुमची अजून गरज आहे. काही कामे तुम्हीच मार्गी लावू शकाल.’ ते ऐकल्यानंतर दादांच्या डोळ्यांत निश्चय दिसला. त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली. दादा जळगावाला घरी परतले. पुढील काही वर्षांत त्यांनी सेवा प्रकल्पांमधील अडचणी दूर केल्या. माझ्या सारख्याला हा प्रसंग नेहमी अडचणींवर मात करण्याचे व्यक्तिगत बळ देतो. दादांची इच्छाशक्ती किती दृढ होती त्याचेच हे उदाहरण आहे.
No comments:
Post a Comment