Saturday 13 June 2015

हरणार्‍या लढाईचे शिलेदार

ईश्वरलाल जैन आणि मनिष जैन
ळगावच्या राजकारणात काही महिन्यांपूर्वी खासदार पिता-आमदार पूत्र अशी ईश्‍वरलाल जैन-मनिष जैन यांची ओळख होती. मुंबई ते दिल्लीच्या राजकारणात ईश्‍वरलाल जैन यांचा दबदबा आहे. मनिष जैन यांना अजून ओळख मिळालेली नाही. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत आणि जिल्ह्याच्या राजकारणात आज या पिता-पूत्रांची अवस्था ‘हरणार्‍या लढाईचे शिलेदार’ म्हणूनच झाली आहे.महाराष्ट्र आणि दिल्लीच्या राजकारणात शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून कधीकाळी ईश्‍वरलाल जैन यांची ओळख होती. पूर्वी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक रचनेत कोषाध्यक्ष म्हणून जैन यांच्याकडे जबाबदारी असे. पवारांचे जवळचे म्हणून जशी ही जबाबदारी होती तशीच मोक्याच्यावेळी पक्षाला हवा तेव्हा वित्त पुरवठा करणे आणि तो कागदोपत्री सांभाळण्याची जोखिमही जैन यांच्यावर होती.
पवारांच्या ‘किचन कॅबिनेट’ मध्ये बाबुजींचा शब्द चालत असे. पवार राज्यात मुख्यमंत्री असताना त्यांनी विधानसभा निवडणुकीत नेहमी ईश्‍वरलाल जैन यांना जामनेर मतदार संघातून उमेदवारी दिली. पण, जैन कधीही निवडून आले नाहीत. स्वत: जैन असे म्हणतात की, जर मी निवडून आलो असतो तर राज्याचा अर्थमंत्री नक्कीच झालो असतो. तसे घडले मात्र नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवाहात गरजेनुसार पिढीजात नेतृत्व बदलत गेले आणि या बदलाचा फटका नेहमी ईश्‍वरलाल जैन यांना बसला. अजित पवार यांच्याकडे पक्षाची सूत्रे जशी-जशी आली तशी-तशी ईश्‍वरलाल जैन यांची पक्ष संघटनेतून ‘एक्झिट’ होत गेली. हा फटका एवढा जीवघेणा होता की, स्वत:च्या खर्चाने जळगाव येथे राष्ट्रवादी भवन बांधून देणार्‍या जैन यांनाच नंतर पदाधिकार्‍यांनी या भवनात जाण्यास मज्जाव केला.
एवढेच नव्हे तर लोकसभा निवडणूक, त्यानंतर विधानसभा निवडणूक आणि अलिकडे जळगाव जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत जैन यांनीच पक्ष विरोधी किंवा उमेदवाराच्या विरोधी काम केल्याचा आरोप पुरूष व महिला पदाधिकार्‍यांनी केला. जेथे ‘सोन वेचले’ तेथे आपल्याच लोकांचे ‘खडे खाण्याची’ वेळ जैन यांच्यावर आली.
अर्थात, पवार यांच्या पाठबळाचा राजकिय आणि व्यावसायिक फायदा जैन यांनी वेळोवेळी घेतला. राजकिय फायदा असा की, हार्ड पवार सपोर्टर अशी ओळख असल्यामुळे ते थेट पवारांकडे जात. इतरांची कामे करून घेत. व्यावसायिक फायदा असा की जेव्हा केव्हा सोने-चांदी विक्री विषयक केंद्रातील अबकारी खात्याकडून ‘आरएल फर्म’वर कारवाई झाली तेव्हा-तेव्हा राजकिय संबंध वापरून आणि दंडात्मक रक्कम भरून जैन यांनी पद, व्यवसाय आणि प्रतिष्ठा जपली.
मात्र, जळगाव जिल्ह्याच्या राजपटावर मुलगा मनिष जैन यांच्या आगमनापासून जैनांच्या निष्ठा, प्रतिष्ठा आणि राजकिय प्रभावाला अडथळे सुरू झाले. त्यात भरीस भर म्हणून काही निर्णय चुकत गेले आणि स्वपक्षियांनीच खिंडीत गाठल्यामुळे पिता-पूत्राचा प्रवास हरणार्‍या लढाईचे शिलेदार म्हणून सुरू झाला.
विधानपरिषदेच्या जळगाव मतदार संघातील निवडणूक मनिष जैन आणि स्व. निखिल खडसे यांच्यात गाजली होती. ही निवडणूक खर्‍या अर्थाने सुरेशदादा जैन आणि तेव्हाचे विरोधी पक्षनेता एकनाथराव खडसे यांच्यात गाजली होती. अपक्ष लढणार्‍या मनिष यांनी स्व.निखिल यांचा पराभव करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारालाही पराभूत केले होते. या लढाईत ईश्‍वरलाल जैन पडद्यामागे मौन स्वीकारून गप्प बसले होते.
मनिष जैन आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांच्याकडे सुरेशदादांचे वारसदार म्हणूनही पाहणे सुरू झाले. ‘सुरेशदादा माझे राजकिय पिताश्री आहेत’ असे विधानही मनिष जैन वारंवार करीत असत. आमदार म्हणून त्यांनी युवकांसाठी विविध उपक्रमही सुरू केले.
मुलाचा तेव्हाचा पराभव खडसेंच्या जिव्हारी लागलेला आहे. सुरेशदादा जैन शिवसेनेचे असूनही त्यांनी तेव्हा भाजप उमेदवार स्व. निखिल यांना मदत केली नाही, उलटपक्षी त्यांच्या पराभवातून खडसेंना खिजविण्याचा प्रयत्नच केला अशी धारणा खडसेंची आजही आहे. त्यामुळे खडसेंच्या विरोधी अजेंड्यावर सुरेशदादा आणि त्यांचे समर्थक, ईश्‍वरलाल जैन आणि मनिष जैन आहेतच.
पितापूत्राच्या संबंधातील अनेक गैरप्रकारांच्या प्रकरणांच्या चौकशीचा ससेमिरा खडसेंनी दोघांच्या मागे लावला आहे. यातील जामनेरचे साग लागवड आणि साग विक्री प्रकरण आजही सीआयडीकडे चौकशीला आहेच. या प्रकरणात पितापूत्रांना जामीन मिळाला आहे. पण चौकशी अजूनही सुरू असून कारवाईची टांगती तलवार कायम आहे.
मनिष जैन आमदार झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसशीही सलगीचा प्रयत्न केला. तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाणांना जळगावात आणून कापूस परिषद घेतली. त्याचे फलित काय? हे आजही कोणाला उमगलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ईश्‍वरलाल जैन दुरावलेले असताना सुरेशदादा जैन यांनाही काँग्रेसमध्ये नेण्याचा एक फॉर्मूला जैन पिता-पूत्राने मांडून पाहिला. त्यानंतर जळगाव मनपा निवडणूक लागली. तेथे मात्र सुरेशदादांच्या पारंपरिक वारसांनी मनिष जैन यांचा मनपातील हस्तक्षेप थांबवला. अखेर मनिष जैन आपल्या संघटनेचे काही उमेदवार उभे करून विदेशात निघून गेले.
त्यानंतरचा किस्सा हा लोकसभेच्या निवडणुकीचा आहे. मनिष जैन यांना खासदार करण्याच्या हेतूने ईश्‍वरलाल जैन मोठी राजकिय खेळी करायला गेले. तेथे त्यांचा अंदाज चुकला आणि मनिष जैन विधानपरिषदेची आमदारकी गमावून बसले आणि खासदारही होवू शकले नाहीत. जैनांच्या पराभवाचा हा अध्याय येथे सुरू होतो. खडसेंच्या सून तथा स्व. निखिल यांच्या पत्नी श्रीमती रक्षा खडसे या खासदार म्हणून निवडून आल्या.
नंतरच्या काळात जिल्हा बँक निवडणूक झाली. मागील पंचवार्षिकमध्ये दोन वर्षे अध्यक्ष असलेल्या ईश्‍वरलाल जैन यांनी या निवडणुकीतून काढता पाय घेतला. पण, एकनाथराव खडसेंच्या बिनविरोधच्या संकल्पनेला निवडणुकीचा सुरूंग जैन यांनी लावला. अखेर बँकेचे नेतृत्व खडसेंच्या परिवारात गेलेच. सौ. रोहिणी खडसे-खेवलकर या बँकेच्या अध्यक्ष झाल्या.
हरणार्‍या लढाईचे शिलेदार म्हणून जैन पितापूत्राची ओळख ही अनेक बाबतीत आहे. दोघांच्या विरोधात साग लागवड योजनेत खोटी कागदपत्रे तयार केल्याचा ठपका आहे. सीआयडीने केलेल्या तपासात खोट्या नोंदींचे अनेक किस्से चर्चेत आहे. या प्रकरणात योग्य तो दंड भरल्याचे जैन पितापूत्र सांगतात. त्यावर इतर न्यायव्यवस्थेत अपिल होवू शकत नाही असाही त्यांचा दावा आहे. पण सध्या तरी हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपिठात प्रकरण प्रलंबित आहे.
दुसरे प्रकरण महावीर अर्बन पतसंस्थेच्या चेक बाऊन्सचे आहे. त्यात मनिष जैन यांना कैदेची शिक्षा जिल्हा न्यायालयाने ठोठावली आहे. या प्रकरणातही चेकवर सह्या माझ्या नाहीत, असा बचाव मनिष जैन करीत आहेत. ते फारसे समर्थनिय नाही.
यापूर्वीही जैन पितापूत्र विविध प्रकरणांमुळे अडचणीत होते. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नीची रेल्वेत पर्स चोरी झाल्यानंतर त्यातील सोने चोरट्याने जैनांच्या फर्ममध्ये विक्री केल्याचा संशय होता. अशी लहान मोठी इतरही प्रकरणे आहेत. दुकानातील सोन्याच्या हिशोबाचे प्रकरण, खुल्या बाजारात सोने-चांदी खरेदी प्रकरण असेही विषय कधीतरी गाजले आहेत. तूर्त, हे विषय उद्योग-धंदा यांच्याशी संबंधित असले तरी तेथे सचोटी, प्रामाणिकपणा याचा कस लागतोच.
‘घर फिरले की वासे फिरतात’ अशी मराठीत म्हण आहे. जैन-पितापूत्रांच्या बाबत त्याचा अनुभव वारंवार येतोय. देशाच्या आणि राज्यातील राजकारणाच्या पटावर ईश्‍वरलाल जैन यांचे संबंध पवार फॅमिलीशी दुरावल्यानंतर त्यांच्या अडचणी सतत वाढत गेल्याच्या दिसतात. यातील काही जैनांनी आपल्या बोलघेवड्या स्वभावातून ओढवून घेतल्या आहेत तर काही प्रकरणात विरोधकांनी इतरांचे कान फुंकून निर्माण केल्या आहेत. तूर्त तरी जैन इतर कोणत्याही राजकिय लढाईत उतरण्याची शक्यता नाही. कारण पहिले त्यांना कोर्टकज्जातून स्वतःचे पाय मोकळे करावे लागतील.

No comments:

Post a Comment