Saturday 6 June 2015

अॅड. निकमांच्या प्रभावळीला ग्रहण

संपूर्ण जगभरात भारतीय फौजदारी कायद्याचे अभ्यासू आणि निष्णांत विधीज्ञ म्हणून ओळख असलेले अॅड उज्ज्वल निकम हे कधीकधी उत्साहाच्या भरात केलेल्या वक्तव्यामुळे ‘शाब्दीक वादांच्या’ भोवर्‍यात सापडतात. यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना आपणच केलेली वक्तव्ये नाकारावी लागतात. असे प्रकार वारंवार घडल्याचे वर्तमान आणि इतिहासातील नोंदी पाहून लक्षात येते. प्रचंड लौकिक आणि लोकप्रियता असतानाही प्रिंट, वेब आणि लाईव्ह माध्यमांच्या आशयात ‘निकम खोटे बोलले’ किंवा ‘निकमने झूठ बोला’ अथवा ‘लॉयर निकम लाईज्’ अशा ब्रेकिंग न्यूज अलिकडे आल्या आहेत. ‘उज्ज्वल वलयांकित’ व्यक्तिमत्व असलेल्या निकमांच्या ‘प्रभावळीला’ या ब्रेकिंग न्यूज म्हणजे काही काळांसाठी ‘दोषांचा ग्रहणकाळ’ ठरतो. यापुढ असेे होवू नये याची काळजी स्वतः अॅड. निकम यांनाच घ्यायची आहे.
(वैधानिक इशारा - या लेखातील कोणताही आशय उपलब्ध वृत्तांकनांवर आधारित आहे. त्यातून अॅड. उज्ज्वल निकम यांचा अवमान करण्याचा हेतू मुळीच नाही)


माणसाच्या जगण्याचा मूलाधार ‘सत्य’ असावा. सत्य हेही काळ, वेळ आणि व्यक्ति सापेक्ष असते. त्यामुळे सत्य कोणते? असा प्रश्‍न माणसाला वारंवार पडतो. सत्याला एक आणि अनेक बाजूही असतात. जेवढे सत्य वर असते, दिसते तेवढेच ते खाली असू शकते किंवा नसतेही. दिसते त्यापेक्षा सत्य वेगळे असू शकते किंवा असते तेवढेच दिसते. अर्धसत्य आणि संपूर्ण सत्य या दोन संकल्पना म्हणून आपण मानतो.
राजकारणी, वकिल, पोलीस आणि पत्रकार यांचा सत्य, वास्तव याच्याशी वारंवार संबंध येतो. हे चारही घटक आपापल्या कुवतीनुसार सत्य समजावून घेतात. राजकिय माणसाची सत्याशी ‘फारकत’ असते असे म्हणतात. वकिल ‘कोणत्याही बाजूने’ बोलला तरी ते सत्य समजले जाते. पोलिसांचे काम ‘सत्याचा शोध’ घेणारे आहे. पत्रकार मात्र ‘मी सांगतो तेच सत्य’ या भ्रमात वागत असतात.

या घटकांपैकी एक आमचे परमप्रिय मित्र, खान्देशपूत्र, विशेष सरकारी वकिल अॅड. उज्ज्वल निकम आहेत. वकिल असल्यामुळे आणि बहुतांश खटल्यात ते सरकारचे किंवा तक्रारदाराचे वकिल असल्यामुळे त्यांचा पक्ष ‘सत्याचा’ असतो असे आम्ही मानतो. कायद्याचे पुरेपूर ज्ञान आणि सर्व प्रकारचे हातखंडे वापरून खटला जिंकणे यासाठी निकमांचे नाव अभ्यासू (हार्डवर्कर) आणि ‘वादालंकित’ (कॉन्ट्रोव्हर्सिअल) वकिल म्हणून आदराने घेतले जाते. मी स्वतः निकमसाहेबांचा जबरदस्त फॅन आहे. जळगावचे जिल्हा वकिल ते महाराष्ट्र सरकारचे विशेष सरकारी वकिल हा जसा त्यांचा २५-३० वर्षांचा प्रवास आहे तसाच अगदी माझाही आहे. फोटोग्राफर-बातमीदार ते संपादक होण्याचा. निकमांचा सुरवातीचा, मध्यंतरीचा आणि अलिकडचा कौशल्याधारित व्यावसायिक प्रवास मी जवळून पाहिला आहे. न्यायालयीन कामकाजात त्यांनी जिंकलेल्या अनेक खटल्यांचे वर्णन भरभरून शब्दांनी केले आहे. जवळपास ५० वर आरोपींना फाशीच्या दोरापर्यंत आणणे आणि ६०० वर जणांना जन्मठेप भोगायला कारागृहात पोहचविणे असे दैदीप्यमान कर्तृत्व निकम यांचे आहे. निकमांची ही कामगिरी म्हणजे तळपणार्‍या सूर्यागत. त्यावर टीका-टीप्पणी करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार.
मात्र, तळपणार्‍या सूर्याच्या बाबतीत दोन घटना नेहमी निसर्गतः घडतात. पहिली म्हणजे, पृथ्वी किंवा चंद्राच्या सावलीमुळे काही काळासाठी सूर्यग्रहण झाल्याचे आपण पाहतो-अनुभवतो. दुसरी म्हणजे, सूर्याकडे उघड्याडोळ्यांनी पाहिल्यानंतर डोळे अंधारतात. काळ्या काचेच्या माध्यमातून सूर्याकडे पाहिले की, त्यावरही बारिक काळे डाग दिसतात. त्याला ‘सनबर्न’ असेही म्हणतात. निकमांच्या प्रभावळीत असे ग्रहणाचे किंवा सनबर्नचे लहानमोठे अनेक प्रसंग येवून गेले आहेत. या प्रसंगामुळे निकमांनी काहीवेळा स्वतःला खोटारडे, लायर किंवा झूठ बोलनेवाले अशी विशेषणे लावून घेतली आहेत. ही परिस्थिती त्यांनी ओढवून घेतली आहे. दुसर्‍या कोणीही ती निर्माण केलेली नाही.

निकम व्यावसायिक कौशल्याच्या बाबतीत अभ्यासू, कठोर परिश्रम करणारे आहेत. याशिवाय हवे ते-हवे त्या पद्धतीने-हवे त्या किंमतीत-हवे तेव्हा पदरात पाडून घेण्याची किमयाही त्यांना साध्य झाली आहे. ही सिद्धी त्यांना कमी वेळेत आणि कमी वयात मिळाली. त्यामुळे त्यांच्याविषयी मनात सुप्त असूया असलेला त्यांच्याच कार्यक्षेत्रातील वर्गही मोठा आहे. त्यापैकी बर्‍याच जणांवर निकमांनी ‘हरएक पद्धतीने मात’ केली आहे. असे सारे हातात आणि नशिबात असतानाही निकमांच्या प्रभावळीला कधीकधी ‘स्वस्तुती’ आणि ‘अपकिर्तीचा डाग’ लागतोच. आज त्याचेच सिंहावलोकन आपण निकमांच्या भूमिकेतून करायचे आहे.
निकम हे बहुतांशवेळा बोलण्यातून आणि अपवादाने कृतीतून वाद-विवादात अडकतात. निकम स्पष्ट आणि परखड बोलतात. परंतु, सत्य बोलतात, असे म्हटलेले नाही. असंख्य खटल्यांचा, माणसांचा अनुभव गाठीशी असल्यामुळे त्यांच्याकडे सांगण्यासारखे आणि ‘न सांगण्यासारखे’ बरेच काही आहे. या पार्श्वभूमिवर व्यावसायिक सेवा देताना निकम प्रत्येकवेळी सत्यच बोलत असतील असेही नाही. किंबहुना, वकिली व्यवसायाचा हातखंडा किंवा डावपेचाच भाग म्हणून निकमांना न्यायालयात किंवा समाजात सत्य बोलण्याचे नाटकही करावे लागत असेल. तसे ते करतात, हेही मी जवळून अनुभवले आहे.
अगदी अलिकडे निकमांनी अजमल कसाबच्या संदर्भात ‘मटण बिर्याणीचा जाहीर खुलासा’ करून ‘हो मी तेव्हा असत्य बोललो’ असे कबूल केले आहे. त्यांच्या या धाडसी खुलाशामुळेच काही माध्यमांनी निकमांना खोटारडेपणाच्या भोवर्‍यात अडकवून टाकले. मात्र, निकमांच्या तेव्हाच्या सत्य बोलण्याच्या भूमिकेचे मी सुद्धा पत्रकार म्हणून समर्थन केले होते. अजमल कसाबला जनतेची सहानुभूती मिळवून देण्याचे प्रकार तेव्हा काही माध्यमे करीत होती. अशावेळी ‘कसाब मटण बिर्याणी मागतो’ असे वक्तव्य करून माध्यमांना ताळ्यावर आणण्याचे काम निकमांनी केले होते. निकमांचे ‘असत्य बोलणे’ असे पडद्यामागील नैतिकतेला धरून असेल तर चालू शकते मात्र, कधीकधी निकम सत्य सांगितल्याचे भासवून नंतर मी तसे म्हटले नाही, असे असत्य बोलतात त्याचा इतरांना त्रास होतो.
सत्य बोलण्याच्या संदर्भात कृष्णाने गीतेत, समर्थ रामदासांनी दासबोधात, भर्तृहरिने  संस्कृत सुभाषितात, कबीराने दोह्यांमध्ये, संत ज्ञानेश्‍वरांनी ओव्यामधून, संत तुकारामांनी अभंगातून मार्ग दाखविले आहेत. नेहमी सत्य बोलावे असा ‘सत्यं वद’ संकेत सारेच देतात. मात्र, सत्य बोलण्यासाठी काळ, वेळ आणि समोरिल व्यक्ती याचाही विचार करायला लावणारा स्वतंत्र उपदेशही आहे.

‘सत्यं ब्रुयात, प्रियं ब्रुयात. न ब्रुयात सत्यंमप्रिय. प्रियंच नावृतं ब्रुयात. एषः धर्मः सनातनः’ 


(अर्थ ः खरे बोला पण प्रिय बोला. सत्य अप्रिय असेल तर दुसर्‍याच्या भावना दुखावतील असे बोलू नका. तसेच सत्यावर आवरण देखील घालू नका. हाच खरा धर्म आहे)

खरेतर, वरील उपदेश हा वकिली पेशातील माणसाला लागू होत नाही. कारण, त्याचे सारे व्यावसायिक कौशल्य हे सत्य-असत्याच्या शोध, त्याची मांडणी यावर अवलंबून असते. परंतु, खोटे बोलायची वेळ आलीच तर ‘परित्राणाय साधूनां विनाशायच दृष्कृताम्’ या संकेतानुसार असावे. तसे केले तरच माणसाच्या वर्तन आणि आचारणाला व्यापकत्व आणि आदर प्राप्त होतो. कुणाचे रक्षण करणे, कुणाचे प्राण वाचविणे यासाठी खोटे बोलावे लागले तर त्याला नैतिक आणि धार्मिक अधिष्ठान मानले जाते. पण, स्वतःच्या कोणत्याही स्वार्थासाठी खोटे बोलायची वेळ आलीच तर त्याच्या परिणामांना सामोरे जाण्याचे धाडसही हवे.
निकमांची गफलत होते ती येथे. निकमांनी त्यांच्या अनेक खटल्यांमध्ये गीतेतील संकेत, उपदेशांचा मोठ्या खुबीने वापर केला आहे. त्यातून न्यायदानाचा अपेक्षित परिणामही साधला आहे. मात्र, स्वतःसाठी सत्य बोलण्याचे अवधान त्यांनी कधीकधी पाळलेले नाही.
तसे पाहिले तर संस्कृत हा निकमांचा विषय नव्हता. त्यांचे गुरू स्व. अच्युतराव अत्रे यांच्याकडे ते विद्यार्थीदशेपासून सल्लामसलत करायला जात. श्रीमती प्रतिमा अत्रे या त्यांच्या गुरूमाऊली. त्यांचे शिक्षण संस्कृतात झाले होते. निकम आपल्या गरजेनुसार गुरूमाऊलीकडे सुभाषितांचा संदर्भ विचारत. त्या निकमांना अनेक सुभाषिते सांगत. जोपर्यंत हवे त्या स्थितीतले सुभाषित मिळत नाही तोपर्यंत निकम पाठपुरावा करीत. ही आठवण स्वतः स्व. अत्रे यांनी एका इंग्रजी माध्यम प्रतिनिधीस सांगितली आहे. संस्कृतचा हा वापर असा उसनवारीवर होता. हा अनुभव लक्षात घेवून निकमांनी चिरंजिव अनिकेतला शालेय शिक्षणात संस्कृत घेण्यास भाग पाडले. सांगायचा मुद्दा असा की, स्वतःसाठी किती अप्रिय किंवा असत्य बोलावे याचा विचार निकम यांनी करायला हवा.
अलिकडचा किस्सा असाच. पुण्यातील ‘चपराक’ नावाच्या ऑनलाईन माध्यमातून शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. गोपिनाथ मुंडे यांच्याविषयी निकम यांनी केलेले वक्तव्य सोशल मीडियातून राज्यभर पसरले. त्यात स्व. मुंडेंचे मोठेपण मांडताना स्व. बाळासाहेब यांच्याकडे कमीपणा येईल असा उल्लेख निकमांकडून झाला. स्व. बाळासाहेब हे वादग्रस्त अभिनेता संजय दत्तला मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातून (अनधिकृतरित्या शस्त्र बाळगल्याच्या आरोपातून) मुक्त करू इच्छित होते. त्यासाठी त्यांनी तेव्हा माझ्यावर दबाव टाकला. तसेच त्यांच्या सांगण्यावरून तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी मला खटल्यातून काढण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांना दिल्या. पण, स्व. मुंडे हे तेव्हा उपमुख्यमंत्री व गृहमंत्री होते. त्यांनी माझ्या प्रामाणिकपणाची खात्री स्व. बाळासाहेबांना दिली आणि गृहमंत्री म्हणून स्वअधिकारात माझी नेमणूक खटल्यात कायम ठेवली असे वक्तव्य निकमांनी केल्याचे ‘चपराक’ च्या वृत्तात प्रसिद्ध झाले आहे. यावर उलट-सुलट प्रतिक्रिया येत असल्याचे दिसतात निकम यांनी ‘मी तसे बोललो नाही’ अशी भूमिका घेतली. सुदैवाने ‘चपराक’चे संपादक घनश्याम पाटील यांच्याशी या विषयावर चर्चा केली असता त्यांनी थेट सांगितले की, ‘निकम माझ्या सोबत ४ दिवस पुण्यात होते. ते जे बोलले तेच मी छापले आहे. त्याची ऑडिओ कॅसेटही माझ्याकडे आहे.’ पाटील यांच्या या खुलाशामुळे निकम पुन्हा ‘खोटारडे’ किंवा ‘लायर’ ठरले. अर्थात, या विषयावर बोलायला मी स्वतः निकमांना दि. २ ते ५ दरम्यान असंख्यवेळा मोबाइलवर संपर्क केला. कॉलची रिंग वाजली मात्र निकम बोलले नाहीत.
निकम यांच्या प्रभावळीला लागणार्‍या काही ग्रहणांचे प्रसंग अशाच मालिकेतील आहेत. मला चांगले आठवते, मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करणार्‍या मुंबई पोलिसांना अनधिकृत शस्त्र बाळगल्याच्या आरोपात अभिनेता संजय दत्त हाती लागला. त्यानंतर निकमांची खटल्यासाठी नियुक्ती झाली. निकम आणि संजय दत्तची न्यायालयात पहिली भेट होणार होती. त्याच्या एक-दोन दिवस आधी निकम जळगाव येथे खटल्याची तयारी व  अभ्यास करीत होते. तेव्हा आम्ही काही पत्रकारही त्यांच्या घरी गेलो. संजय दत्तचा ‘खलनायक’  चित्रपट तेव्हा चर्चेत होता. चित्रपटगृहात तो तुफान चालला होता. याचा संदर्भ घेत निकमांनी पहिल्या भेटीची रचना केली होती. ती आम्हाला ऐकवली. निकम म्हणाले, ‘माझा अटॅक संजयवर असेल. मी म्हणेन, हा कसला खलनायक आहे? हा भित्रा आहे. जवळ विनापरवाना गन बाळगतो. हा खलनायक नाही हा चुहाँ आहे...’ निकमांचा हा सराव आम्ही ऐकला. तसाच तो दोन-तीन दिवसांनी मुंबईच्या विषेश न्यायालयात घडला आणि सर्व माध्यमांनी शब्दंन शब्द छापला.
बॉम्बस्फोट खटल्यात निकमांनी सातत्याने संजय दत्तला कायद्याच्या चौकटीत अडचणीत आणले. सुनावणी सुरू झाल्यानंतर त्याचा जामिन रद्द करून पुन्हा तुरूंगात पाठविले. पंचनामे किंवा इतर कागदपत्रांवर विनाकारण आक्षेप घेवून कालापव्यय करणार्‍या प्रतिवादींच्या वकिलांना निकमांनी वेळप्रसंगी खडसावून समजही दिली. न्यायाधिशांच्या धर्मावरून आक्षेप घेणार्‍या प्रतिवादींच्या सुप्रसिद्ध वकिलांना निकमांनी थेट आव्हान देत ठणकावले, ‘न्यायाधिशांवर आक्षेप नको अन्यथा, तुमच्यावर न्यायालयाच्या अवमानाचा खटला भरू’.
निकम व्यावसायिक डावपेचात पक्के मुरलेले आहेत. नव्हे तर, फौजदारी कायदे व खटल्यांचा मुरलेला ‘मोरावळा’ म्हणजे निकम आहेत. निकमांची प्रसिद्धी जशी-जशी वाढू लागली तशी-तशी त्यांनी माध्यमांमध्ये स्वतःची ‘स्पेस’ निर्माण करणे सुरू केले. कोणता अंक कुठे, कोणते माध्यम कुठे वापरायचे याचे त्यांना जबदस्त भान आहे. कोणता पत्रकार बातमी छापू शकतो, आपल्याला हवे ते कसे प्रसिद्ध करू शकतो याचा अंदाज बांधून निकम थेट संपादकांच्या संपर्कात असतात. प्रसिद्धीसाठी त्यांचा कोल्हापूर भागाकडे आग्रह असतो. कारण, कोल्हापूर हे त्यांच्या सासरवाडीचे गाव.
निकम यांनी माध्यमांच्या गरजा लक्षात घेतल्या आहेत. विशेष वृत्तांकन (एक्सक्लूसिव्ह) किंवा मुलाखती (इंटरव्हयू) मिळविण्याच्या स्पर्धेत पत्रकार मेहनत करायला विसरतोय हा मीडियाचा आळस निकमांनी हेरला आहे. त्यावेळी जेव्हा कोणी मुलाखत मागायचे तेव्हा निकमांनी ‘तयार मुलाखती’ सुद्धा दिल्या. म्हणजे, प्रश्‍नही निकमांचे आणि उत्तरही निकमांचे. जळगाव आणि मुंबईच्या सुप्रसिद्ध दैनिकातून अशा ‘रेडीमेड’ मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत.
निकम प्रसिध्दी मिळवतात किंवा प्रसिद्धीसाठी जागा तयार करतात. त्यांचा हा स्वतःच्या मार्केटींगचा फंडा इतरांना आवडत नाही. म्हणूनच त्यांच्या विषयी काही चुकीचे आक्षेपही घेतले जातात. निकम बातमीसाठी सतत मागे लागतात, पाठपुराव्यासाठी मिस कॉल करतात, असे कपोलकल्पित आक्षेप घेतले जातात. ते खरे नाहीत. पण, निकमांच्या मागे या प्रचारातून बदनामीचे ग्रहण येथे लागतेच.
निकमांनी संजय दत्तला नेहमी टक्के टोणपे हाणले. संजय दत्तचा ‘लगे रहो मुन्नाभाई’ हा चित्रपट जोरात सुरू असताना मुन्नाभाईची ‘गांधीगिरी’ चर्चेत होती. तेव्हा निकमांनी प्रतिक्रिया दिली होती, ‘नेता हो या अभिनेता, उसकी बोगस गांधीगिरीसे परमात्मा कोई पाप नही धोता’ जेव्हा विनापरवाना शस्त्र बाळगल्या प्रकरणी संजय दत्तला शिक्षा झाली तेव्हा, निर्माता- निर्देशक महेश भटने ‘संजयला सोडा’ (लिव्ह संजय) अभियान सुरू केले होते. तेव्हाही निकम यांनी महेश भटला दरडावून सांगितले, ‘आमचे तुमच्यावर लक्ष आहे. न्यायालयाच्या अवमानाची योग्यवेळी केस तुमच्यावर ठोकू.’  त्यांच्या या वक्तव्यानंतर भट आणि त्यांच्या सोबत आमीर खान सुद्धा निकम यांच्या भेटीला आणि जेवायला हॉटेलात आले. तेव्हा चिरंजिव अनिकेत लहान होता. आमीर खानला जवळून पाहिल्याचे त्याला काय कौतुक होते!
याच संजय दत्तच्या कारणावरून निकमांनी स्व. बाळासाहेब  आणि स्व. मुंडे यांच्याविषयी अनावधानाने वक्तव्य केले आणि नंतर ते त्यांना नाकारावे लागले. वास्तविक निकमांचे वक्तव्य छापणारा पत्रकार त्यांचा जवळचा मित्र आहे. तो जाहीरपणे निकमांना दुखावणार नाही. पण, तो वृत्तांकनही मागे घेवू शकत नाही. म्हणूनच चुकीच्या किंवा बेधडक केलेल्या वक्तव्याची सूई निकमांकडे जातेच.
राज्यात ‘टाडा’ कायद्याच्या विरोधात वातावरण होते. अल्पसंख्यांक समाज या कायद्याला धर्म विरोधी मानत होता. अखेर, राज्य सरकारने नवा ‘पोटा’ कायदा आणला. तो सुद्धा टाडा एवढाच सशक्त होता. पोटाच्या कलमांची भलावण सर्व प्रथम निकम यांनी उघडपणे केली. पोटा हा गुन्हेगारांच्या विरोधात आहे. धर्माच्या नाही, हे त्यांनी ठणकावून सांगितले.
निकम यांनी साततत्याने सरकार पक्षाचे खटले लढविले. त्यामुळे त्यांच्या विचारांची रचना नेहमी सरकारच्या राष्ट्रीय व राष्ट्रीयत्वाच्या भूमिकेला धरून असते. अशावेळी गुन्हेगार विशिष्ट जात, समाजाचे असले की वकिलाची प्रतिमा विशिष्ट लोकांच्या विरोधात रंगविली जाते. निकमांच्या बाबतीत तसे काहीवेळी घडलेही.
सहा-सातवर्षांपूर्वी ‘सच्चर समिती अहवाल’ आल्यानंतर जळगाव येथून प्रसिद्ध होणार्‍या दैनिकाचा संपादक म्हणून मी मुस्लिम नेत्यांचे चर्चासत्र मुस्लिमांच्या त्यावेळच्या स्थितीवर घेतले होते. त्यात निकम यांना मुख्य वक्ते म्हणून बोलावले होते. निकमांवर तेव्हा विशिष्ट लोकांच्या विरोधाचा आक्षेप होताच. निकम सुद्धा आपले म्हणणे मांडण्याची योग्य जागा व संधी समजून चर्चासत्रात आले. तेथे त्यांनी केलेले वक्तव्य गाजले. ते म्हणाले, ‘राष्ट्रप्रेमी कोणत्याही मुस्लिमाच्या विरोधातील अन्यायकारक खटला मी स्वतः लढवायला तयार आहे. माझे दार त्यासाठी खुले आहे.’ मला हेही आठवते निकम हे वक्तव्य करीत असताना, उपस्थित मुस्लिम नेत्यांनी उभे राहून टाळ्या वाजवून निकमांच्या भूमिकेचे स्वागत केले होते.
निकम जेव्हा मुंबई बॉम्बस्फोट खटला जिंकल्यानंतर पहिल्यांदा जळगाव शहरात आले त्यादिवशी योगायोगाने या दैनिकाचा वर्धापनदिन सोहळा होता. ही संधी साधून कार्यक्रमात स्व. अच्युतराव अत्रे यांच्या हस्ते निकम यांचा सत्कार घडवून आणला. माझ्या संपादकिय कारकिर्दीतला हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आजही मला बारकाव्याने आठवतो.
येथे अजून एक मुद्दा स्पष्ट करायला हवा. तो म्हणजे काही प्रतिष्ठीत जळगावकरांच्या संकुचित मनोवृत्तीचे झालेले दर्शन. निकम यांच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांचा जळगावकरांतर्फे नागरी सत्कार करण्याचे ठरले होते. त्यासाठी एक स्वागत समिती शिवव्याख्यात्यांच्या नेतृत्वात स्थापन झाली होती. पण एका दैनिकाने सत्कार केला म्हणून या नागरी समितीने नंतर निकमांचा सत्कार केला नाही. अर्थातच यामागे दैनिकांमधील स्पर्धाही होती. एवढेच नव्हे तर, निकम यांना जाहीर झालेला ‘जळगाव भुषण पुरस्कार’ ही मनपाने अद्याप दिलेला नाही.
जळगावकर आपल्या माणसांच्या बाबतीत थोडे ‘अनलकीच’ आहेत. राष्ट्रपतीपदावर प्रतिभाताई पाटील विराजमान झाल्या. त्यांचा नागरी सत्कार तब्बल एकावर्षानंतर केला गेला. माहेरच्या मंडळींच्या अगोदर सासरी अमरावतीत त्यांचा सत्कार झाला. निकम यांचा तर सत्कार जळगावकरांनी केलाच नाही पण, धरणगावकरांनी निकमांचा जंगी सत्कार घडवून आणला.
निकमांच्या विशिष्ट समाज किंवा विचारसरणीबाबत व्यक्तिमत्वावर घेतला जाणारा आक्षेप काहीवेळा त्यांच्या नियुक्ती वरून न्यायालयातही मांडला गेला.
लैला खान आणि तीच्या कुटुंबियांच्या खून खटल्यात निकमांच्या नियुक्तीला नक्वी इजाज यांनी आक्षेप घेतला होता. हा आक्षेप घेताना संबंधिताने तेव्हाचे गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. ‘निकम हे अपयशी वकिल आहेत’ असा एकांगी दावाही त्यांनी केला होता. निकम या आक्षेपावर गप्प राहीले. त्यांनी कधीही त्यावर मत व्यक्त केले नाही. कारण, त्यावेळी अनेक खटल्यांमध्ये निकमांनी आरोपींना फाशीच्या फंद्यापर्यंत किंवा जन्मठेपेच्या कारागृहात पोहचवलेले होते.
असाच एक आक्षेप सांगलीच्या दुहेरी खून प्रकरणात घेतला गेला होता. तेथे न्यायालयात चर्चा होवून सरकारला विचारणा झाली होती की, ‘सांगलीत ७० सरकारी वकिल असताना तुम्ही ७०० किलोमीटरवरून जळगावचा वकिल का आणला?’ निकम तेव्हाही गप्प राहीले.
मध्यंतरीच्या काळात अफझल गुरूच्या फाशीच्या विलंबाचा मुद्दा खूप गाजला. अफझल गुरूने काँग्रेस सरकार आणि तेव्हाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडे दयेचा अर्ज केला होता. जवळपास ४०-५० दोषींचे दयेचे अर्ज राष्ट्रपती भवनात पेंडींग होते. मेहनत घेवून खटले लढवायचे. दोषींना फाशीची शिक्षा मिळवायची मात्र सरकार पुढे काहीही करीत नाही हा विषय वारंवार चर्चेत यायचा. हा विषय निघाला की, निकम संवेदनशिल होवून बोलत. ते म्हणत, ‘दयेचा अर्ज निकाली काढण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार एक तर काढून टाकावा किंवा त्याला कालबद्ध मर्यादा घालावी. वेळेत अर्ज निकाली नाही निघाला तर दोषीला फासावर लटकवावे’ अर्थात, त्यांच्या या मताला सर्व माध्यमांनी जोरदार प्रसिद्धी दिली. राष्ट्रपती बदलल्यानंतर अफझल गुरू आणि नंतर कसाबही फासावर लटकावले गेले.
राज्यात काँग्रेस आघाडी सरकार असताना निकम यांच्यावर वक्तव्य फिरवण्याची वेळ आली होती. ‘मुंबईवरील हल्ला प्रकरणाचा निकाल लवकर लावा असे एका मंत्र्याने मला सांगितले’ असे वक्तव्य निकम यांनी केले होते. त्या मंत्र्याला असे वाटत होते की खटल्याचा निकाल लागला तर विधानसभा निवडणुकीत आघाडीला त्याचे श्रेय घेता येईल. मात्र, निकमांच्या वक्तव्याचा भलताच परिणाम झाला. तेव्हा विधानसभेत विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे होते. त्यांनी सरकारला धारेवर धरले आणि निकमांचा खुलासा मागवला. निकमांनी ‘मी तसे बोललो नाही म्हणून सुटका करुन घेतली’
योगायोग बघा, अजमल कसाबच्या बिर्याणी प्रकरणातील असत्य घटनेचा सत्य खुलासा केल्यानंतरही सध्याच्या सरकारने निकमांकडे खुलासा मागितला. तशी मागणी करण्याचा आग्रह खडसे यांनीच केला. आजच्या राज्य सरकारमध्ये खडसे सर्वांत सामर्थ्यवानमंत्री आहेत. निकमांनी खडसेंची भेट घेवून बाजू मांडली आहे. हे प्रकरण सुरू असताना वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यामुळे निकमांना जळगाव जिल्हा सरकारी वकीलपद सोडावे लागले आहे.
स्व. मुंडे यांच्या संदर्भात निकम यांनी केलेले वक्तव्य बहुधा भाजपशी जवळकी निर्माण करण्यासाठी केलेला प्रयत्न या प्रकारातील असावे असाही ‘तर्क’ आहे. पण ते करताना स्व. बाळासाहेबांच्या विषयीच्या वक्तव्याने शिवसेना दुखावू शकते हा अंदाज निकमांनी घेतला नाही. अर्थात, भाजपशी जवळकीसाठी निकमांनी स्व. मुंडेंविषयी वक्तव्य केले असावे हा ‘तर्क’ मुळीच पटत नाही.
शक्ती मिल परिसरातील बलात्कार प्रकरणी तीघा आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यांनी गुन्हेगारांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिली होती. ‘बच्चे तो बच्चे है’ म्हणत त्यांच्या हातून चुका होतील असा दावा केला होता. त्यावर निकम यांनी मुलायमसिंग यांना खडसावून ‘गुन्हेगारांच्या कृत्याचे वयानुसार वर्गिकरण करू नका’ असे सुनावले होते.
अगदी अलिकडे केंद्रातील गृहराज्यमंत्र्यांनी लोकसभेत खुलासा केला की, ‘कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम हा पाकिस्तानात आहे किंवा नाही याविषयी भारत सरकारला माहित नाही. त्यावर विरोधकांनी गदारोळ केला. दोन दिवसांनी गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, ‘दाऊद पाकिस्तानातच आहे आणि सरकार त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे’ हा विषय येथे मिटला होता. परंतु, त्यानंतर निकम यांची प्रतिक्रिया काही माध्यमातून आली. ते म्हणाले होते, ‘दाऊदला भारतात आणणे शक्य नाही. कारण इंटरपोलने रेड नोटीस दिल्यानंतरही पाकिस्तानने दाऊदला इंटपोलच्या सुपूर्त केलेले नाही. भारताचा पाकिस्तानशी गुन्हेगार हस्तांतरण करार नाही’ झाले, पुन्हा निकम वादात अडकले. सरकार काही बोलत असताना निकम यांनी सांगितलेले ‘सत्य’ पुन्हा सरकारला अडचणीत आणणारे ठरले.
बहुधा सरकारशी होणारा गॅप भरून काढण्यासाठीच निकम यांनी स्व. मुंडे यांच्या संदर्भात आदराचे वक्तव्य केले असावे असाच ‘तर्क’ पुन्हा काढावा लागतो. यातून काय साधले? हा प्रश्‍न अधिकच गडद होत जातो.
निकम यांच्यावर कोणाचे कितीही आक्षेप असले तरी खान्देशचा हा सुपूत्र निडर, खमक्या आणि सडेतोड आहे. हा माणूस कामाशी आणि पेशाशी प्रामाणिक आहे. या माणसाने स्वतःच स्वतःला आकार दिला आहे. अगदी स्व. अच्युतराव अत्रे यांच्या भाषेत सांगायचे तर निकम हे ‘सर्वोत्तम’ (शिष्य) आहेत. अशा सर्वोत्तम ‘आपल्या माणसावर’ यापुढे कोणत्याही प्रकारचे वक्तव्य नाकारण्याची वेळ येवू नये असे मनापासून सांगायची इच्छा होते. अॅड. निकम फोन कॉल घेत नाही म्हणूनच हे प्रदीर्घ लेखन केले आहे.

निकमांच्या फी संदर्भातही आक्षेप

अॅड.उज्ज्वल निकम हे राज्य सरकारच्या किमान दोन डझन खटल्यांमध्ये विशेष सरकारी वकिल होते आणि अजूनही आहेत. निकम यांचे नाव आणि कार्य गेल्या २५-३० वर्षांत विस्तारले. सरकार पक्षाकडून लढताना त्यांच्या खटल्यांची यशस्वी होण्याची टक्केवारीही उत्तम आहे. परंतु, निकम यांना विशेष सरकारी वकिल म्हणून सरकारतर्फे देण्यात येणार्‍या मानधन संदर्भातही आतापर्यंत अनेकवेळा आक्षेप घेतले गेले आहेत.
हा मुद्दा मांडताना निकम यांच्या मानधनाविषयी कोणताही वादग्रस्त विषय उपस्थित करायचा नाही. पण, निकम यांच्या विषयी असलेल्या वादाचे सर्वच विषय येथे चर्चेत घेत आहोत, म्हणून मानधनाचा विषय आहे.
अलिकडे निकम हे राज्य सरकारकडून एका दिवसाच्या सुनावणीसाठी ४० हजार रुपये मानधन, १० हजार रुपये सल्ला शुल्क आणि पाच हजार रुपये हॉटेलमधील निवासासाठी घेतात असे सांगण्यात येते. या शिवाय त्यांना खटले, चौकशी वगैरे कामासाठी बिझिनेस क्लासचे विमानाचे भाडे दिले जाते. जवळपास ५० ते ६० हजार रुपये एकत्रित मानधन दिवसाला निकम घेतात. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात निकम यांच्या सोबत तेव्हा माजी सॉलिसिटर जनरल गोपाळ सुब्रमण्यम हे अवघा एक रुपया मानधन घेवून काम करीत होते. निकम यांनी पहिल्यांदा राज्य सरकारचे काम सुरू केले तेव्हा त्यांना मानधन प्रतिदिन बारा हजार होते. इतरही भत्ते होते.  इतर सरकारी वकिलांना तेव्हा हजार-बाराशे रुपये मिळत. निकम यांना तेव्हापासून ‘झेड सुरक्षा’ आहे. त्यांच्या बंगल्याजवळ खास पोलीस चौकी आहे. तो खर्च महिन्याला ५ लाखांवर आहे. निकम यांच्या गाडीवर लालदिवा असून गाडीचा सायरन सुद्धा निकम यांच्या ‘हातात’ आहे.
निकम यांच्या मानधनाचा मुद्दा सांगली न्यायालय, मुंबई हायकोर्टातही चर्चेत आला आहे. निरज ग्रोहर खून खटल्यात अमरनाथ ग्रोहर यांनी निकम यांना खटला द्यावा अशी मागणी केली होती. सरकारने ती नाकारत अमरनाथ ग्रोहर यांना म्हटले होते की, ‘निकम यांना नेमता येईल मात्र, त्यांच्या नेमणुकीचा खर्च तुम्ही स्वतः करा’
निकम यांच्या मानधनाच्या चौकशीचे मागणी पत्र माहिती अधिकार कार्यकर्त्यांनीही एक-दोनवेळा सरकारला दिले आहे. उल्हास नाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून विचारले की, ‘निकम यांना मुंबईत म्हाडाचा फ्लॅट दिला मग हॉटेलचा खर्च का दिला जातो?’  
येथे एक मुद्दा स्पष्ट करायला हवा. निकम अनेक वर्षे मुंबईत सरकार पक्षाचे काम पाहात आहेत. पण, त्यांचे मुंबईत निवासस्थान नव्हते. चिरंजिव अनिकेत हे पदवी आणि पदव्यूत्तर परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी मुंबईत फ्लॅट घेतला. निकम मुंबईत हॉटेलात राहत असले तरी जेवणासाठी घरून शिधा नेत होते.
निकम यांच्या मानधन संदर्भात अकाऊंटंट जनरल यांनीही काही प्रश्‍न उपस्थित केले होते. मुंबई हायकोर्टात निकम यांच्या मानधनाचा विषय चर्चेला आला तेव्हा न्यायाधिश म्हणाले होते की, ‘येथे मुंबईत अडीच हजारावर वकिल असताना सरकारला प्रत्येक खटल्यात निकम का लागतात?’
याचे उत्तर निकम यांनी एका मुलाखतीत दिले आहे. त्यातून त्यांचा स्वतःवरील आत्मविश्‍वास दिसतो. असाच प्रश्‍न एका पत्रकाराने निकम यांना विचारला होता, सरकारला तुम्हीच का हवे असता? त्यावर निकम म्हणाले, ‘इतर बहुधा खटले चालवतात. मी मात्र, ते जिंकायचेच यासाठी लढतो. जिंकण्यासाठी मेहनतीपासून सारे काही करण्याची माझी तयारी असते. मानधन तसा माझ्यासाठी गौण मुद्दा आहे’ हे सांगताना निकम अजून एक विषयाकडे लक्ष वेधतात. ते म्हणतात, ‘मी जे मानधन घेतो त्यावर चर्चा होते पण आता आदर्श घोटाळ्यात सरकारतर्फे चौकशी करणारे वकिल दिवसाला १ लाख २० हजार रुपये मानधन घेत आहेत. त्यावर कोणीही बोलत नाही’
मुंबई बॉम्बस्फोट खटला सुरू झाला तेव्हा निकम हे नाव कोणाला फारसे माहित नव्हते. मुंबईला विशेष न्यायालयात बचाव पक्षाची मोठी फौज होती. तेव्हा समोर होते एकटेच निकम.
मला आठवते एकदा चर्चेत जेष्ठ वकिलांची जादा फी आणि ज्युनिअर वकिलांना मिळणारे नाममात्र मानधन यावर निकम म्हणाले होते, ‘वकिलांचा पहिल्या पाचवर्षांचा काळ केवळ बसायचा असतो. नंतरची पाचवर्षे काम सुरू होते. पुढे पाचवर्षांत तो रोज कमावतो. नंतरची पाचवर्षे तो ज्येष्ठ असतो. तेव्हा कुटुंबाच्या जबाबदार्‍याही वाढतात. अशावेळी ज्येष्ठ मंडळी तगडे मानधन घेतात’ निकम यांचा हा मुद्दा बिनतोड आहे. निकम यांच्या सरकारी मानधनावर आक्षेप घेणारी मंडळी सलमान खान, संजय दत्त, सैफअली खान वगैरेंच्या वकिलांना काही तासांसाठी दिल्या जाणार्‍या लाखोंच्या मानधनवर चर्चा करीत नाहीत.
निकम यांच्या तिसर्‍या पिढीतील त्यांचे चिरंजिव अनिकेत सध्या मुंबईत स्थायिक झाले आहेत. ते तेथे हायकोर्टात काम करतात. विशेष म्हणजे, अनिकेत हे मुंबई महापालिकेच्या वकिल पॅनेलवर आहेत. ही मनपा शिवसेनेच्या ताब्यात आहे.

No comments:

Post a Comment