Sunday, 21 June 2015

काका नॉनस्टॉप ७५ !!!

म्ही बापाला बापू म्हणतो. गांधींना बापू म्हणायचे म्हणून नव्हे. तर गल्लीतले बरेच बाप मुलांचे बापू होते. त्या मुलांच्या सोबत आम्ही राहाय म्हणून आमचे पप्पा सुध्दा बापू झाले. अर्थात, हे नाव लहान भाऊ शैलेशने प्रचलित केले. आज नेमका "योगा डे" असल्यामुळे मला बापूंची योगाविषयी आठवण सांगायला हवी.


बापूंचे वय सध्या ७९ वर्षे आहे. प्रकृती ठणठणीत. रोज ७ किमी फिरायला जाणे. अरविंदच्या लहानग्या यश सोबत देवळाई (औरंगाबाद) जवळची टेकडी चढणे. किमान ५० वर्षे झाली बापू योगासने करताहेत. सूर्यनमस्कार आणि आसनांच्या कायिक क्रिया नेमक्या कशा हव्यात ? हे सांगणारा बाप माणूस म्हणजे बापू. घरात आसनांची १०० वर पुस्तके.

मला आठवते, जिभकाटे नावाचे कोणी योगशिक्षक भडगावला आले होते. त्यांनी जुन्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये योगवर्ग घेतला होता. पहाटे सर्व शिक्षक आणि काही मान्यवर नागरिक योगासने करायला शाळेच्या प्रांगणात येत. तेव्हा मी पाचवीत असेन. जिभकाटे आठदिवसांनी गेले आणि योगवर्गाची जबाबदारी बापूंनी घेतली. बापू वयाने मोठे असल्यामुळे सर्व शिक्षिकांचे भय्या होते. हे सर्व शिक्षक वडिलांचा आदर करीत. त्यामुळे इच्छा असो नसो सकाळी ५.३० ला सारे वर्गाला येत. जो लागोपाठ दोन दिवस नाही आला त्याला धिरूभाईची मिसळ खावू घालण्याचा दंड होता. दंड नको म्हणून सलग दांडी कोणाचीही नसे. या वर्गाला राजाभाऊ मोहरीर, ग. ल. पूर्णपात्रे, एस के महाजन, एल एस महाजन, टी डी भंगाळे, पी एस सापधरे, बी के नेहते, बी टी झांबरे, एस के परदेशी, जे यू वाणी पुं गो कासर असे सारे ज्येष्ठ शिक्षक हजर राहत. शिवाय शिक्षकांचा संध्याकाळचा व्हालीबॉल क्लबही होता. बापूंनी नंतर महिनाभर योगवर्ग घेतला. (* न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांचे कुटुंब यावर एकदा लिहावे लागेल)

त्यानंर गेली ४०-४५ वर्षे बापूंची योगसाधना सुरू आहे. बापूंना मी आजही योगतज्ञ, योगगुरू असे काही म्हणत नाही. आजकाल योगाचा प्रमाणपत्र वर्ग केला की योगशिक्षक पद कोणीही लावते. एखादा वर्ग घेतला की योगतज्ञ म्हणून घेता येते. वर्गाचा बोर्ड लावला की योगगुरू होता येते. बापू याच्यापासून लांबच. बापूंनी अनेकांना उपचार म्हणून आसने सांगितली पण ते योगगुरू काही झाले नाही.

अर्थात, आमच्या घरात योग करण्याचे वातावरण आधीपासून होते. माझे आजोबा वयाच्या ६७ वर्षांपर्यत योगासने करीत. काका ॲड. प्रकाश, जवाहर योगासने करीत. मी सुध्दा योगासने करावीत आसा आग्रह बापू करतात. मी ती लहरीनुसार करतो. मला एक किस्सा आठवतो. मी नाशिक देशदूतला असताना दर शनिवार-सोमवार बसने ये जा करीत असे. पाच-सहा तास बसमधील बसण्यामुळे कंबरेचे दुखणे सुरू झाले. सोपा उपचार म्हणजे पेन किलर खाणे आणि इंजेक्शन घेणे सुरू झाले. कधीकधी प्रवास करून घरी आल्यापासून कंबर शेकण्याचा खेळ असे. एकदोनदा ट्रॕक्शनसाठी गेलो. जळगावातल्या जुन्या हाडवैद्यांना भेटलो. तात्पुरत्या आरामानंतर दुखणे कायम असे. बापू ही गंमत पाहत. मला म्हणत "मी सांगतो ती ३ आसने कर कंबर कधीच दुखणार नाही." मी हसून टाळत असे. सहा महिने गेले.  एकदा बापूंनी हट्टाने ती ३ योगासने दाखविली. चक्रासन, पश्चिमोत्तानासन आणि पद्मासन. मला म्हणाले,"केवळ ५ मिनिटे या प्रत्येक आसनाच्या अवस्थेत राहा. १५ मिनिटे मला दे"  बापूच्या समाधानासाठी मी आसने केली. काय चमत्कार सांगू ? कमरेला आराम पडला. मी पुन्हा पुन्हा आसनांचा वेळ वाढवून ताण दिला. तासाभरात कंबरदुखी गायब. ती आजपर्यंत  परत नाही. मी आसन करीत असताना बापू हसत होते. म्हणाले, "ट्रॕक्शन करताना डॉक्टर काय करतो ? स्नायूला ताण देतो. तो तांत्रिक  ताण आहे, आसनांचा ताण हा नैसर्गिक आहे. म्हणून तुला आराम पडतो." बापूने एका वाक्यात योगासन समजावले.

आम्ही ४/५ मित्र नारायणअप्पा खडकेंच्या गिताशंकर तलावावर सायंकाळी अर्धातास पोहायचो. एकदा बापू म्हणाले, मी येतो. भडगावी गिरणाकाठावर लहानपण घालवणारा प्रत्येकजण नदीत पोहतोच. बापूंना सराव होता. बापू तलावात उतरले. अप्पा आणि इतरांनी वय विचारले. मी ७४ आकडा सांगताच इतर म्हणाले, "नका. कशाला रिस्क घेता?" आम्ही बोलत असताना बापू तिकडे पाण्यात उतरले. आणि अक्षरशः पाठीवर पाण्यावर झोपल्यागत तरंगू लागले. आजुबाजूचे पाणीही हलत नव्हते. आता पाहणारे सारे अचंबित झाले. पोहण्याचा हा प्रकार नवाच होता. तासभर बापू पाण्यात होते. एक थेंबही पाणी उडाले नाही. बापू बाहेर आले. अंग पूसत असताना दोघे तिघे म्हणाले, "काका तुम्ही पाण्यावर कसे तरंगत होता?" बापू म्हणाले, "हा पाण्यावरचा प्राणायाम आहे. केवळ एकदा घेतलेला श्वास खुपवेळ तरंगत ठेवतो. श्वास घेताना पोट हलणार नाही यावरही नियंत्रण असते." तलावावरच्या प्रशिक्षकांनी बापूंच्या पायाला हात लावले.

श्वास घेण्याच्या पध्दतींवर बापूंचा अभ्यास आहे. त्यामुळे सप्तशृंगगड, शिवनेरी किल्ला, ब्रम्हगिरी येथे चढताना मी बापूंच्या श्वास दीर्घ झाल्याचे कधी पाहीले नाही. आम्ही इतर कुटुंबिय मात्र चढताना अनेक बैठका मारतो आणि मुखानेही जादाचा श्वास घेतो. शिवनेरीला चढताना बापूंच्या डोक्यावर डेव्हीड टाईप कॕप होती. डोळ्यांवर काळा चष्मा होता. सोबत कॉलेजची काही मुलेही चढत होती. ती बापूंना हसून म्हणाली "बुढाडॉन" बापू सुध्दा हसून म्हणाले, "नॉन स्टॉप ७५" हे ऐकून ती मुले गप्प झाली. कारण गड चढताना ती मुले बसून बसून चढत होती. बापू मात्र कुठेही बसले नव्हते. आम्ही अर्थात मागे रेंगाळलो होतो. परत उतरताना जेव्हा हिच मुले बापूंना म्हणाली,"काका नॉनस्टॉप ७५" त्यानंतर काय घडले हे सर्वांना समजले... आता बापू नॉनस्टॉप ७९ आहेत. आज बापूंच्या या आठवणी खास फादर्स डे आणि योगदिनानिमित्त !!!

No comments:

Post a Comment