Saturday, 20 June 2015

योगाची जगभरारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती स्वीकारून संयुक्त राष्ट्रसंघाने दि. २१ जूनला ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ साजरा करण्याचे जाहीर केले आहे. जगभरातील जवळपास १७७ देशांमधील कोट्यवधी नागरिक आज सामुहिकपणे विविध प्रकारची योगासने करून प्राचिन भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग  असलेल्या अध्यात्मिक, कायिक आणि मानसिक जीवनक्रियेला स्वीकारतील. योगाची ही ‘जगभरारी’ नवा इतिहास लिहीण्यास प्रारंभ करीत आहे.सुमारे सहा हजार वर्षांपासून योगाचे अस्तित्त्व आणि महत्त्व अधोरेखित करणारे उल्लेख भारताच्या अतिप्राचिन इतिहासाचे दस्तावेज असलेल्या वेद आणि इतर ग्रंथांमध्ये आढळून येतात. योगा आणि योगासनांचा प्रारंभ भारतात झाला की नाही? याविषयी मतभेद-विचार प्रवाह असू शकतात. मात्र, एक संदर्भ कोणीही नाकारू शकत नाही तो हाच की, भारताच्या प्राचिन गुरूकूल परंपरेत ‘योगा आणि योगासने’ ही अध्ययन तथा जीवनशैलीचा अविभाज्य भाग होती.

 भारतीयांच्या आचार, विहार आणि आचरणात योगा आणि योगासनांचा काही ना काही प्रकारे वापर होत असे. योगाच्या विभिन्न पद्धतींनी माणसाच्या अध्यात्मिक, वर्तनात्मक आणि मानसिक जडण-घडण होण्यात सातत्याने सुलभ, उपयुक्त, परिवर्तनात्मक क्रिया निर्माण केल्या. योगा आणि योगासनांचे महत्त्व गेल्या काही वर्षांत भारतीय सीमा, भाषा आणि वर्ण ओलांडून जगाच्या कानाकोपर्‍यात पोहचले. अतिपरिश्रमाच्या व्यायाम प्रकारांपेक्षा अवयवांना नैसर्गिक स्थितीत ठेवण्याची आणि शरीराला आराम देणारी ‘योगिक क्रिया’ ताण-तणावाने भरलेल्या, सतत स्पर्धेत धावणार्‍या जागतिक समुहाला आपली वाटू लागली आहे. योगाचे शरीर, क्रिया आणि मानसशास्त्र विषयक मूलतत्त्व भारतीय असले तरी त्यात प्रांत, गरज आणि सुलभिकरणामुळे काही ‘किरकोळ बदल’ स्थळ-काळानुसार झालेले दिसतात. याच कारणामुळे योगासनांच्या क्रिया जवळपास २०० ते २५० वर जातात.
योगा आणि योगासनांचे जीवनक्रिया विषयक महत्त्व यापूर्वी विविध योगतज्ज्ञ, मान्यवरांनी जागतिक समुहासमोर सातत्याने मांडले. योगाची ही सार्वत्रिक स्वीकार्हता डोळ्यांसमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्तराष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत १९३ देशांच्या प्रतिनिधींसमोर ‘योगा आणि योगासन’ याचे महत्त्व विषद केले. दि. २७ सप्टेंबर २०१४ ला मोदींचे सर्वसाधारण सभेत भाषण झाले. तेथे त्यांनी योगाचे भौतिक, मानसिक आणि अध्यात्मिक महत्त्व थोडक्यात सांगितले. याला जोडूनच दि. २१ जूनला जगभरात ‘आंतराष्ट्रीय योगदिन’ साजरा केला जावा अशी सूचना मांडली. मोदींच्या या सूचनेला तेथे उपस्थित जवळपास सर्व सभासद देशांच्या प्रतिनिधींनी पाठींबा दर्शविला. त्यानंतर दि. ११ डिसेंबर २०१४ ला झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत दि. २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्याला १९३ पैकी १७७ देशांनी पाठींबा दिला. एवढ्या मोठ्या प्रमाणात ठरावाच्या बाजूने सकारात्मक मतदान होण्याची ही ऐतिहासिक घटना होती. त्यामुळे दि. २१ जून हा आंतरराष्ट्रीय कॅलेंडरवर ‘जागतिक योगदिन’ म्हणून नोंदला गेला.
दि. २१ जूनला जागतिक योगदिन म्हणून मान्यता मिळावी यासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातिचे अध्यात्मिक गुरू श्री श्री रवी शंकर हेही त्यांच्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ परिवाराच्या माध्यमातून प्रयत्न करीत होते. त्यांच्या सोबत असलेल्या अनेक मान्यवरांनी दि. ४ व ५ डिसेंबर २०११ ला बंगळुरू येथे झालेल्या ‘योगा ः जागतिक शांततेचे विज्ञान’ या विषयावरील संमेलनानंतर संयुक्त राष्ट्रसंघाला तसेच युनेस्कोला निवेदन देवून दि. २१ जून हा जागतिक योगदिन म्हणून जाहीर करावा अशी सूचना केली होती. याच सूचनेचा पुनरुच्चार पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघात योग्यवेळी केला आणि भारतीय जीवनशैलीचा अविभाज्य भाग असलेली ‘योगा आणि योगासन’ जीवनक्रिया जगाची मान्यता मिळून गेली. संयुक्त राष्ट्रसंघाने दि. २१ जूनला आंतराष्ट्रीय योगादिन जाहीर करण्याची घोषणा करताच सर्वप्रथम नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांनी त्याचे स्वागत केले. त्यानंतर अमेरिका, कॅनडा, चीन, इजिप्त अशा सर्व देशांनी ठरावाचे स्वागत केले. नंतरच्या काळात सर्वच देशांमध्ये पहिला योगदिन उत्साहात साजरा करण्याची तयारी सुरू झाली. जगभरातून लोकांच्या तयारीची छायाचित्रे, बातम्या प्रिंट, वेब आणि लाईव्ह माध्यमांमधून दिसू लागल्या.
भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ‘आंतर राष्ट्रीय योगदिन’ तयारीची जबाबदारी स्वीकारली. त्याला इतरही मंत्रालयांनी सहकार्य केले. हा दिवस शाळा-महाविद्यालयांमध्ये साजरा करण्याचा विषय चर्चेला आला. दि. २१ जूनला रविवारची सार्वजनिक सुटी असल्यामुळे उपस्थितीच्या सक्तीवर वाद-विवाद सुरू झाले. काही मुस्लिम संघटनांनी ‘सूर्यनमस्कार इस्लाम विरोधी’ असल्याचे मत मांडून योगदिनी उपस्थितीच्या सक्तीला विरोध केला. काही मवाळ मुस्लिम संघटनांनी योगाची उपयुक्तता मांडून विरोध नाही असे स्पष्ट केले. यातून वातावरण गढूळ झाले.
सूर्यनमस्कार ऐवजी चंद्रनमस्कार करा, सूर्याय नमः ऐवजी अल्लाह नमः म्हणा, नमाज पठण हाही योगासनांचाच प्रकार असे काही पर्याय चर्चेतून समोर मांडले गेले.
मुस्लिमांच्या वर्तन आणि आचरणाबाबत कुराण शरीफमध्ये अल्लाहने सांगितलेल्या क्रिया करणे हेच पवित्र कार्य मानले गेले आहे. त्यापलिकडे केलेली कोणतीही कृती किंवा सूचविलेली कृती करणे म्हणजे अपवित्र (हराम) असल्याचे मत काही इस्लामी तज्ज्ञांनी मांडले. नमाज पठणाच्या काही शारिरीक क्रियांवरून वाद-विवाद होतात तर योगाच्या क्रिया करण्यावरून ‘भयंकर तांडव’ होवू शकते असेही सांगण्यात आले. अल्लाह म्हणतो, ‘माझा धर्म माझ्या जागी आणि तुझा धर्म तुझ्या जागी. त्यामुळे मी तुझ्यावर काही लादत नाही. तू माझ्यावर काही लादू नको. म्हणजेच योगा कर हेही तू सांगू नको’  असेही मत मांडले गेले.
-----------------------------------------------------------------------------------------------
नागपूर येथे गेल्या काही वर्षांपासून योगा करणार्‍या मुस्लिमांच्या प्रतिक्रिया Muslims performing Yoga in Nagpur for International Yoga Day-TV9 -----------------------------------------------------------------------------------------------
या सार्‍या मत-मतांतरांमधून बहुतांश मुस्लिम संघटनांनी तथा संस्थांनी ‘योगदिन’ साजरा करण्याचेही धाडसाने जाहीर केले. हळूहळू विरोधही मावळत गेला. सरकारनेही योगदिन सक्तीचा नाही असे स्पष्टीकरण देवून टाकले. त्यानंतर सर्वच ठिकाणी योगदिनाची तयारी सुरू झाली. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने  जगभरात आणि देशांतर्गत योगदिन आयोजनाचे उत्कृष्ट नियोजन केले. यासाठी इंटरनेटवर संकेतस्थळ तयार केले. त्यात भारतातील मुख्य कार्यक्रमांसह जगभरातील कार्यक्रमांची माहिती उपलब्ध करून दिली. विविध संस्था, संघटनांचे ठिकठिकाणी सहकार्य घेतले. विविध १७७ देशांमध्ये तेथील भारतीय दूतावासाच्यामार्फत कार्यक्रमांचे आयोजन केले. एकमेव पाकिस्तान वगळता प्रत्येक देशात तीन किंवा त्यापेक्षा जास्त ठिकाणी आज (दि. २१ जून) योगदिनाचे कार्यक्रम होणार आहेत. पाकिस्तानातही इस्लामाबाद येथील भारतीय दूतावासात अधिकृत कार्यक्रम होणार आहे. दुसरीकडे इतर इस्लामी राष्ट्रांमध्येही २ ते ५ ठिकाणी योगदिनाचे कार्यक्रम होत आहेत.
भारतात योगदिनाचा मुख्य कार्यक्रम दिल्लीतील राजपथावर होत आहे. हा कार्यक्रम सकाळी ६.३० सुरू झालेला असेल. पंतप्रधान मोदी आणि योगगुरू रामदेब बाबा हे यात सहभागी होतील. जवळपास ४० हजार नागरिकही योगासने करतील. दूरदर्शनचे जवळपास २३ कॅमेरे विविध कोनातून या कार्यक्रमाचे प्रसारण जगभरात करतील.
दिल्लीसोबतच लखनऊ, कोलकाता आणि पाटणा येथे भव्य योगदिनाचे आयोजन करण्यात आले आहे. लखनऊमधील योगदिनाचा सोहळा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या नेतृत्वात होत आहे. चेन्नईतील कार्यक्रमात केंद्रीय नगरविकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू नेतृत्व करणार आहेत. मेरठमध्ये संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर उपस्थित राहणार आहेत.
न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयासह जगाच्या पाठीवरील विविध देशांमध्ये योगदिनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज संयुक्त राष्ट्रातील सोहळ्याचे नेतृत्व करणार आहेत.
व्हिएतनाम, फ्रान्स, हॉंगकॉंग, हंगेरी, बहारिन, मेक्सिको, सिडनी, नॉर्वे, मेलबर्न, न्यूयॉर्क आदी ठिकाणी योगदिनानिमित्त करायच्या योगा आणि आसनांचा सराव सुरू असल्याची छायाचित्रे आणि वृत्त विविध माध्यमांमधून प्रसिद्ध झाले आहेत. बहुतांश ठिकाणी ‘आर्ट ऑफ लिव्हींग’ ने पुढाकार घेतला आहे. विदेशात एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन कसे केले जाते? याचे उदाहरण बघायचे असेल तर सनफ्रान्सिस्को येथे ‘आर्ट ऑफ लिव्हींग’ ने आयोजित केलेल्या ‘इव्हेंट’ चे घ्यावे लागेल. भारतीय राजदूत कार्यालयाच्या सहकार्याने हा कार्यक्रम होत आहे. या इव्हेंटचा प्रचार-प्रसार ‘झिरो वेस्ट इव्हेंट’ म्हणून केला आहे. सकाळी ९ पासून तर दुपारी २.३० पर्यंतच्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती इंटरनेटवर वेब स्थळाच्या माध्यमातून दिली आहे. जवळपास ५ हजार नागरिक सहभागी होतील. या ठिकाणी दिनेश काशिकर, जेनेट स्टोन व प्रदीप टेओरिआ हे योग आणि योगासने याविषयी मार्गदर्शन करतील. याशिवाय, पाश्‍चात्य संगितकार जय उत्तल हे पाश्‍चात्य आणि भारतीय संगिताच्या मिलाफातून तयार केलेला ‘कीर्तन’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. उत्तल हे काही काळ भारतात निवासी होते. तेव्हा त्यांनी अध्यात्म, योग आणि संगीत असा अभ्यास केला आहे. या कार्यक्रमासाठी विविध आंतराष्ट्रीय संस्थांनी प्रायोजकत्त्व दिले आहे.
जळगावमध्ये  विश्‍व योगदिन आयोजन समितीतर्फे दि. २१ जूनला दुपारी ४ वाजता योगफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. ही फेरी शिवतीर्थ मैदानावरून निघेल. या कार्यक्रमाचे नियोजन केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे. मल्टीमिडीया फिचर्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेनेही मेगा इव्हेंट म्हणून ‘योगी’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. सकाळी ६.३० ला बालगंधर्व खुले नाट्यगृहात या कार्यक्रमास प्रारंभ होईल. के. सी. ई. सोसाटीच्या सोहम्  योग-निसर्गोपचार संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रानेही योगदिनी विविध कार्यक्रम  आयोजित केले आहे. योगदिन प्रचारासाठी जाहीर व्याख्यान, तपासणी शिबिर, पथनाट्य, योग प्रचार फेरी, योगगीत रजनी असे कार्यक्रम दि. १९ ते २० जून दरम्यान झाले. आज (दि. २१) जूनला  सकाळी ६ पासून मंगल चिंतन, सामूहिक योगसाधना, दुपारी २.३० ला योगफेरी आणि सायंकाळी ६.३० ला व्याख्यान असे कार्यक्रम होत आहेत. मल्हार कम्युनिकेशन या संस्थेने एक हजार कामगारांसाठी ‘योग कार्यशाळा’ आयोजित केली आहे. ही कार्यशाळा सकाळी ७ ला खान्देश सेंट्र हॉलच्या कम्युनिटी हॉलमध्ये सुरू होणार असून दुपारी ११.३० पर्यंत सुरू राहील.

दि. २१ जूनला योगदिन का?


सूर्याची संपूर्ण ग्रहमाला त्याच्या भोवती फिरते. गोल आकारातील पृथ्वी स्वतःभोवती फिरताना सूर्याभोवती लंबवर्तुळाकार परिघात फिरते. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे दिवस आणि रात्र होतात. पृथ्वीच्या लंबवर्तुळाकार फिरण्यासाठी ३६५ दिवस (१ वर्ष) लागते. पृथ्वी जेव्हा सूर्याच्या अतीजवळ येते तेव्हा सूर्यकिरणे पृथ्वीवर आखूड स्वरुपात पडतात. त्या काळात पृथ्वीचा मध्य हा सूर्याच्या समोर असतो. एकीकडे उत्तरधृव आणि दुसरीकडे दक्षिणधृव असतो.
पृथ्वीचा उत्तर गोलार्ध हा दि. २१ जून रोजी सूर्याच्या दिनेशे झूकतो. त्यामुळे या दिवशी सूर्य उत्तर गोलार्धाच्या सर्वांत जवळ असतो. म्हणजेच उत्तर गोलार्धात दि. २१ जूनचा दिवस वर्षातला सगळ्यात मोठा दिवस असतो. तो जवळपास १३ तास १३ मिनिटांचा असतो. या दिवसाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे, याच दिवशी दक्षिण गोलार्धात दि. २१ जूनची रात्र सर्वांत लहान असते. शिवाय बर्‍याच देशांमध्ये हिवाळ्याची सुरुवात होते. याच दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते. वर्षातला दि. २१ जून जसा मोठा दिवस असतो तसाच दि. २२ डिसेंबर हा वर्षातला लहान दिवस असतो. या दिवसापासून दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होत असते.
दि. २१ जून ला सूर्य लवकर उगवतो आणि उशीरा मावळतो. योगसाधनेत या दिवसाला सर्वाधिक महत्त्व आहे. सूर्याचे दक्षिणायन प्रारंभकाळ हा ‘साधना पद’ मानला जातो. सूर्याकडे पाहून केली जाणारी योगासने किंवा सूर्यनमस्कार या कालावधीत जास्त फलदायी ठरतात. सूर्याच्या उत्तरायणाचा काळ योगसाधनेत  ‘गंगा पद’ मानला जातो. सूर्याच्या भ्रमणावर आधारित योगसाधनेचे हे महत्त्व लक्षात घेवून २१ जूनला आंतराष्ट्रीय योगदिन साजरा करण्याची सूचना करण्यात आली आणि ती संपूर्ण जगाने स्वीकारली आहे

योग आणि योगासनाविषयी प्राथमिक माहिती

‘योगसूत्र’ हा योगाविषयी भाष्य करणारा हा पहिला ग्रंथ मानला जातो. पातंजली ऋषींनी इ. स. २००० पूर्वी हा ग्रंथ लिहिला. त्यांनी या ग्रंथात अनंत काळापासून चाललेल्या ध्यान प्रक्रिया, तपस्या यांचे एकत्रित संकलन केले. हा ग्रंथ सर्व विद्यांचा संग्रह समजला जातो.
व्यास भाष्य : व्यास भाष्याची रचना इ. स. २००-४०० पूर्वी झाल्याचे समजले जाते. योगसूत्रावर व्यासांनी ‘व्यास भाष्य’ लिहिले असून ते पहिले प्रामाणिक भाष्य समजले जाते.
तत्त्ववैशारदी : पातंजली योगसूत्राच्या व्यास भाष्यात प्रामाणिक व्याख्याकार म्हणून वाचस्पती मिश्रांचा ‘तत्त्ववैशारदी’ हा प्रमुख ग्रंथ मानला जातो. वाचस्पती मिश्रांनी योगसूत्रे आणि व्यास भाष्य या दोन्ही ग्रंथांवर भाष्य केले आहे. तत्त्ववैशारदीचा रचना काळ इ. स. ८४१ नंतर समजला जातो.
योगवार्तिक : योगसूत्रावर महत्त्वाचे भाष्य विज्ञानभीक्षूचे आहे. त्याचे नाव ‘योगवार्तिक’ आहे.
भोजवृती : भोजाचा राज्याची वेळ विक्रम संवत १०७५-१११० मानली जाते. धरेश्वर भोज नावाच्या प्रसिध्द व्यक्तीने योग सूत्रावर ‘भोजवृत्ती’ नावाचा ग्रंथ लिहिला होता. काही इतिहासकार भोजवृत्तीस १६ व्या शतकातील ग्रंथ मानतात.
अष्टांग योग
अष्टांग योगामध्ये योगाचे विविध प्रकार सांगितले आहेत. त्यानुसार योगाचे सहा प्रकार मानले जातात.
१ राजयोग, २ हठयोग, ३ लययोग, ४ ज्ञानयोग, ५ कर्मयोग, ६ भक्तियोग. ज्या क्रमाने त्यांना योगशास्त्रात लिहिण्यात आले आहे, त्या क्रमाने त्यांना दर्जा व महत्त्व प्राप्त झाले आहे.
राजयोग - यम, नियम, आसन, प्राणायम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी, हे पतंजली राजयोगाचे आठ अंग आहेत. त्यांना अष्टांग योग ही म्हटले जाते.
हठयोग - षट्कर्म, आसन, मुद्रा, प्रत्याहार, ध्यान व समाधी, हे हठयोगाचे सात अंग आहेत. मात्र, हठयोगीचा जोर आसन किंवा कुंडलिनी जागृतीसाठी आसन, बंध, मुद्रा व प्राणायमावर अधिक असतो. यालाच क्रियायोग म्हटले जाते.
लययोग - यम, नियम, स्थूल क्रिया, सूक्ष्म क्रिया, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी असे लययोगाचे आठ अंग आहेत.
ज्ञानयोग - अशुध्द आत्म्याचे ज्ञान प्राप्त करणे, हाच ज्ञानयोग आहे. याला ध्यानयोग असे ही म्हटले जाते.
कर्मयोग - कर्म करणेच कर्मयोग आहे. कर्माने आपल्यात कौशल्य आत्मसात करणे, हा त्यामागील खरा उद्देश आहे. याला सहजयोगही म्हटले जाते.
भक्तियोग - भक्ति, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सौख्य व आत्मनिवेदन असे नऊ गुण असणार्‍या व्यक्तीला भक्त म्हटले जाते. व्यक्ती त्याची आवड, प्रकृत्ती व साधना यांच्या योग्यतानुसार त्याची निवड करू शकतो. भक्ती योगानुसार सौख्य, समन्वय, आपुलकी असे गुण निर्माण होतात.
योगाची संक्षिप्त रूपे आपण पाहिलीत. या व्यतिरिक्त ध्यानयोग, कुंडलिनी योग, साधना योग, क्रिया योग, सहज योग, मुद्रायोग, मंत्रयोग व तंत्रयोग आदी अनेक प्रकार आहेत.
योग म्हणजे जीव व ईश्वर यांचा संयोग. पातंजली ऋषीने योगशास्त्र सूत्ररुपाने मांडले आहे. यात योगाची पुढीलप्रमाणे व्याख्या दिली आहे. योग : चित्तवृत्ती निरोध : (चित्तवृत्तींना निर्विकार करणे म्हणजे योग.) तरंग नसलेल्या एखाद्या शांत सरोवराप्रमाणे मन निर्विकार करणे म्हणजे योग.
मन निर्विकार करण्यासाठी पातंजलीने अनेक पायर्‍या व साधने सांगितली आहेत म्हणूनच योगशास्त्र मुख्यत: मानसिक आहे, शारीरिक नाही. म्हणून योग म्हणजे केवळ योगासने नाही. योगासने ही केवळ एक पूर्वतयारी आहे. शरीर हट्टाने काबूत आणणे, त्यानंतर मन काबूत आणणे याला हठयोग म्हणता येईल.
योगासनांचे प्रकार
स्थिर व सुखकारक स्थिती म्हणजे ‘योगासन’ अशी व्याख्या आहे. प्रारंभी अवघड वाटणारी आसने नंतर सरावाने आणि शरीर लवचिक झाल्यानंतर सोपी, सहज वाटतात. वय व शरीरबांधणीनुसार यात फरक पडतो. लहानपणी शिकल्यास योगासने लवकर येतात. म्हणूनच शाळेपासून योगविद्या शिकवणे आवश्यक आहे.
योगासनांचे ६ गट पाडता येतील. ते असे ः १ उभी आसने, २ बैठी आसने, ३ पाठीवर झोपून करायची आसने,  ४ पोटावर झोपून करायची आसने, ५ खाली डोके वर पाय अशी अवस्था, ६ पोटाची आसने/क्रिया
या ५ गटांत मिळून शेकडो आसने येतात. मात्र, त्यातली निवडक आसने प्रचलित आहेत. सर्व आसने करणे एखाद्यालाच शक्य होते. ही सर्व आसने शरीर सर्वांगाने लवचीक व सुदृढ व्हावे म्हणून उपयोगी आहेत. प्राचीन काळात अनेक योगी (हठयोगी) पुरुषांनी अनेकविध आसने शोधली. त्याचे काही प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.
निरीक्षणाधारित योगप्रकार
ऋषि-मुनिनी आरोग्य आणि आध्यात्मिक क्रियांसाठी विविध गोष्टींचे निरीक्षण करून जीवनक्रिया निर्माण केल्या. निसर्ग, पशू आणि पक्षांचे निरिक्षण करून त्यांनी योगासनांची रचना केली. त्यानुसार काही आसने पुढील प्रमाणे आहेत. पशूवत आसन : हा प्रकार म्हणजे पशू-पक्षी ज्या पद्धतीने उठतात-बसतात त्याच्यावरून आसनांची रचना केली. काही आसन असे ः १ वृश्चिक आसन, २ भुजंगासन, ३ मयूरासन, ४ सिंहासन, ५ शलभासन, ६ मत्स्यासन ७ बकासन ८ कुक्कुटासन, ९ मकरासन, १० हंसासन, ११ काकआसन, १२  उष्ट्रासन, १३ कुर्मासन, १४  कपोत्तासन, १५ मार्जरासन, १६ क्रोंचासन, १७ शशांकासन, १८ तितली आसन, १९ गौमुखासन, २० गरुडासन ,२१ खग आसन, २२ चातक आसन, २३ उल्लुक आसन, २४ श्वानासन, २५ अधोमुख श्वानासन, २६ पार्श्व बकासन, २७ भद्रासन या गोरक्षासन, २८ कगासन, २९ व्याघ्रासन, ३० एकपाद राजकपोतासन
वस्तूवत आसन : काही वस्तूंचे निरीक्षण करून रचना केलेले आसन असे ः १ हलासन, २ धनुरासन, ३ आकर्ण अर्ध धनुरासन, ४  आकर्ण धनुरासन, ५ चक्रासन या उर्ध्व धनुरासन, ६ वज्रासन, ७ सुप्त वज्रासन, ८ नौकासन, ९  विपरित नौकासन, १० दंडासन, ११ तोलंगासन, १२ तोलासन, १३ शिलासन
प्रकृति (निसर्ग) आसन : निसर्गातील वनस्पती, वृक्ष आणि इतर गोष्टींचे निरीक्षण करून रचना केलेले आसन असे ः १ वृक्षासन, २ पद्मासन, ३ लतासन, ४ ताडासन ५ पद्म पर्वतासन, ६ मंडूकासन, ७ पर्वतासन, ८ अधोमुख वृक्षासन, ९  अनंतासन, १० चंद्रासन, ११ अर्ध चंद्रासन, १३ तालाबासन.
अंग मुद्रावत आसन : माणसाच्या शरिराला पुष्ट करण्यासाठी रचना केलेले काही आसन असे ः १ शीर्षासन, २ सर्वांगासन, ३ पादहस्तासन या उत्तानासन, ४  अर्ध पादहस्तासन, ५ विपरीतकर्णी सर्वांगासन, ६ सलंब सर्वांगासन, ७  मेरुदंडासन, ८ एकपादग्रीवासन, ९ पाद अंगुष्ठासन, १० उत्थिष्ठ हस्तपादांगुष्ठासन, ११ सुप्त पादअंगुष्ठासन, १२  कटिचक्रासन, १३ द्विपाद विपरित दंडासन, १४ जानुसिरासन, १५ जानुहस्तासन, १६ परिवृत्त जानुसिरासन, १७ पार्श्वोत्तानासन, १८ कर्णपीडासन, १९ बालासन या गर्भासन, २० आनंद बालासन, २१ मलासन, २२ प्राण मुक्तासन, २३ शवासन, २४  हस्तपादासन, २५ भुजपीडासन
योगीनाम आसन : काही आसनांची रचना ही कोणी योगी अथवा देवाच्या नावाने केली. ते आसन असे ः १ महावीरासन, २ ध्रुवासन, ३ हनुमानासन, ४ मत्स्येंद्रासन, ५ अर्धमत्स्येंद्रासन, ६ भैरवासन, ७ गोरखासन, ८ ब्रह्ममुद्रा, ९ भारद्वाजासन, १० सिद्धासन, ११ नटराजासन, १२ अंजनेयासन १३ अष्टवक्रासन, १४ मारिचियासन (मारिच आसन) १५ वीरासन १६  वीरभद्रासन १७  वशिष्ठासन
अन्य आसन : काही आसनांची रचना गरजेतून झाली. ते असे ः १ स्वस्तिकासन, २ पश्चिमोत्तनासन, ३ सुखासन, ४ योगमुद्रा, ५ वक्रासन, ६ वीरासन, ७ पवनमुक्तासन, ८ समकोणासन, ९ त्रिकोणासन, १० वतायनासन, ११ बंध कोणासन, १२ कोणासन, १३ उपविष्ठ कोणासन, १४ चमत्कारासन, १५ उत्थिष्ठ पार्श्व कोणासन, १६ उत्थिष्ठ त्रिकोणासन, १७ सेतूबंध आसन, १८ सुप्त बंधकोणासन, १९ पासासन
सूर्यनमस्कार परिपूर्ण व्यायाम
सूर्यनमस्कार हा भारतीय परंपरेतला एक परिपूर्ण व्यायाम आहे. तो शास्त्रशुध्द पध्दतीने केला तर यात व्यायामाची बहुतेक सर्व अंगे आपोआप साधतात. स्नायूंचा व्यायाम, श्वसनाचे व्यायाम, प्राणायाम, हृदयक्रिया वाढणे, ताण-लवचीकता, पोटातील अवयवांचा व्यायाम इ. बहुतेक सर्व गरजा यात पूर्ण होतात. कमीत कमी बारा सूर्यनमस्कार घालावेत, व सोबत मन प्रसन्न-एकाग्र करण्याचा अभ्यास करावा असे सांगण्यात येते.
(या उप लेखातील माहिती ही प्रिंट आणि वेब माध्यमातील संदर्भांवर आधारित आहे)

No comments:

Post a Comment