Friday 19 June 2015

लिमजी मोठाच होता...

लिमजीचा आणि माझा फार संबंध नाही आला. जैन उद्योग
समुहाच्या जैन हिल्सवर काही निमित्ताने भेट असली की तेथील  पीआरच्या गोतावळ्यात लिमजी हसमूख चेहऱ्याने नेहमी भेटायचा. त्याच्या हास्यामागे कधीही कोणताही हेतू नसायचा. पीआरमधील मंडळी तशी सहेतूक हसत असते. लिमजी तसा कधीही नव्हता. त्याचा आणि माझा संबंध तसा थेट आलाच नाही. पण, त्याच्या जाण्याचा निरोप राजूभाऊ नन्नवरेंकडून आला आणि बहुधा नंतर मी तो इतरांना दिला. केवळ हसमूख चेहऱ्यामुळे स्मृतीत राहीलेल्या लिमजीची जाण्याची बातमी मला चुटपूट लावून गेली.


लिमजी विषयी काहीतरी लिहून पाठवा हा आग्रह मी विनोद रापतवार आणि किशोर कुळकर्णीकडे केला. तोपर्यंत लिमजीच्या सामाजिक व पर्यावरण विषयक कार्याची माहिती समोर आली. कुळकर्णी म्हणाला, लिमजीला पोटाचा कॕन्सर होता. २ वर्षांपासून तो पोटात हा महाभयंकर आजार बाळगून होता. मात्र, त्याच्या चेहऱ्यावर कधी वेदनेचा सल दिसला नाही. आजार माहित असल्यामुळे लिमजीने लग्न केले नाही. पण लहान मुलांशी गट्टी करण्याची हौस त्याने मित्रांच्या मुलाबाळांशी मैत्री करून भागवली.

लिमजी कट्टर राष्ट्रीय विचारांचा होता. तसा तो पूर्वाश्रमीचा अभाविपवाला. एमजेतच विद्यार्थी नेता होता. एकवर्षी एमजेने कॉलेज प्रॉस्पेक्टसची किंमत वाढवली. लिमजी मुले घेवून प्राचार्य राव यांच्या कॕबिनला घुसला. २ तास घेराव घातला. शेवटी किंमत कमी केल्याचा समेट घडवूनच रावसरांची सुटका झाली.

लिमजी चळवळ्या होता. तसा सभ्य वाटणारा लिमजी आतून खमक्या आणि नीडर होता. जैन समुहातील अर्धवट माहितीवर फालतू कमेंट करणाऱ्या सहकारीला लिमजीने हाग्या दम भरला. म्हणाला, कंपनीत आहे म्हणून तुला ठोकत नाही. तू बाहेर निघ तुला दाखवतोच...अर्धवट माहितीवाला गप्पगार झाला.

लिमजी निसर्गप्रेमी होता. सातपुडा बचाव त्याचा आवडता विषय. जैन उद्योग समुहाचे उपाध्यक्ष अशोकभाऊंनी हा गुण हेरला आणि जैन व्हॕलीतील जैवविविधतेचा प्रकल्प लिमजीला दिला.

लिमजी जळगावमधील सेवा समुह केशवस्मृति प्रतिष्ठानचा सच्चा कार्यकर्ता होता. स्व. डाॕ. अविनाश आचार्यदादांशी तो मनमोकळे बोलायचा.

केंद्र व राज्यात भाजपचे सरकार आल्यावर काही जुन्या मित्रांनी लिमजीला मंत्रालयात खासगी पीए म्हणून पाठविण्याचा प्रस्ताव वरिष्ठांना दिला होता. मात्र पोटात बाळगलेला आजार तेव्हाच वाढला आणि लिमजीला उपचारासाठी मुंबईकडे जावे लागले. विषय थांबला.

एकदा लिमजी जळगावात आला. त्याला आराम करायला सांगितले होते. तेव्हा जळगावात वसुंधरा महोत्सव सुरू होता. आयोजक अर्थात जैन समुह आणि नन्नवरे. लिमजीला राहवले नाही. तो सायंकाळी उशीरा कार्यक्रम स्थळी आलाच. १०/२० मिनिटे. तेव्हा तो उपचाराने थकला होता. केस गळाले होतो. डोक्यावर कॕप होती. मात्र मुखावर कँन्सरला हरविण्याची जिद्द असलेले हास्य कायम होते. लिमजीला तेव्हा फार थोड्यांना भेटला.

नंतर-नंतर लिमजीला घरी भेटायला जाणे त्याच्या कुटुंबासाठी अडचणीचे झाले. कोणी घरी आलेच तरी लिमजी तसेच स्वच्छ हसायचा...दोन महिन्यांपूर्वी उपचारासाठी तो मुंबईला गेला. अर्थात अशोकभाऊंनी व्यवस्था केली होती...आज सकाळी तो गेल्याची बातमी आली...एक निर्मळ हास्यनिमाले...लिमजीला शांती लाभावी म्हणून संदेश सुरू झाले...

सायंकाळी विजय डोहळे भेटले. लिमजी विषयी वृत्त लेखन करीत असताना त्यांनी केशवस्मृतिच्या पूस्तिकेतील एक योगायोग निदर्शनास आणला. संचालकांच्या यादीत क्रमांक एकवर नाव होते स्व. डाॕ. अविनाशदादाःचे आणि शेवटचे नाव होते लिमजीचे. त्याच्यापुढेही स्वर्गिय लागले होते. हे लिहताना हात अजूनही थरथरतोय...

लिमजी, खरेच पुन्हा भेट झाली तर मी नक्की तुझ्याकडून स्वच्छ आणि निर्मळ हसणे शिकून घेईन. शिकल्याने अभिनय होतो हे माहित आहे. पण तु सुध्दा वेदना कुरवाळून हसत होतास ना? तो सुध्दा बेमालूम वठविलेला अभिनय...जातिवंत अन् जिवंत...

No comments:

Post a Comment