

जळगाव जिल्ह्यातील बहुजन असलेल्या मराठा समाजाची शिक्षण संस्था म्हणून नावलौकीक असलेली ‘मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संस्था’ दोन वर्षांनी म्हणजे सन २०१७ मध्ये स्थापनादिनाचा शतक महोत्सव साजरा करणार आहे. आज ही संस्था निवडणुकीच्या उंबरठ्यावर असून दोन दिवसांनी संस्थेचे नवे पदाधिकारी सूत्रे हातात घेतील.
‘मविप्र’ ही संस्था ‘सहकार कायद्यान्वये’ स्थापन झालेली आहे. संस्थेच्या नावातही ‘सहकार’ हा शब्द आहे. तरी सुद्धा सहकार कायद्यानुसार या संस्थेची निवडणूक घेतली जावू नये, समाजाच्या लोकांचे नाममात्र शुल्क स्वीकारून त्यांना मतदार करून घेवू नये यासाठी अनेक अडथळे काही नतद्रष्ट मंडळींनी वेळोवेळी निर्माण केले. मात्र, गेली २४ वर्षे अविरत संघर्ष करणार्या ‘मोजक्या’ मंडळींच्या पाठपुराव्यामुळे रविवारी संस्था परिवर्तनाचा उंबरठा ओलांडणार आहे.
‘मविप्र’ संस्थेत संचालकांच्या एकूण २१ जागा आहेत. त्यापैकी अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव घटकात एकही सभासद नसल्यामुळे ती जागा रिक्त राहणार आहे. उर्वरित २० जागांपैकी १६ जागा सर्वसाधारण घटकासाठी, २ जागा महिलांसाठी आणि प्रत्येकी एक जागा व्हीजेएनटी/एसबीसी व ओबीसीसाठी राखीव आहे. रविवारी १४ हजार ४४९ सभासद मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
निवडणूक होणार्या २० जागांपैकी व्हीजे एनटी राखीव जागेवर ‘मविप्र विकास पॅनल’ चे अजय काळे बिनविरोध निवडून आले आहेत. १९ जागांसाठी ५७ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वसाधारण १९ जागांसाठी ५०, २ महिलांच्या जागेसाठी ५, आणि ओबीसीच्या १ जागेसाठी २ असे हे ५७ उमेदवार आहेत. जिल्ह्यात ४४ मतदान केंद्रांवर रविवारी (दि. १० मे) मतदान होईल. मतमोजणी दि. ११ मे रोजी जळगावला नूतन मराठा महाविद्यालयातील बहुउद्देशिय सभागृहात होणार आहे.
‘मविप्र’च्या निवडणुकीचा फड हा तीन वेगवेगळ्या पॅनेलमध्ये रंगला आहे. संस्थेत पूर्वी असलेल्या प्रस्थापित, जुलमी आणि हुकूमशाही प्रवृत्तीच्या तथाकथित पदाधिकारी व संचालकांच्या विरोधात गेली दोन तपे लढा देणारी मंडळी नरेंद्र पाटील, बी. बी. आबा पाटील, प्रा. डी. डी. बच्चाव, संजय मुरलीधर पवार, डॉ. सुरेश मन्साराम पाटील, ऍड. भरत देशमुख यांच्या नेतृत्वात ‘मविप्र विकास पॅनेल’ मधून रिंगणात आहेत.
या पॅनेलचे नेते नरेंद्र पाटील व प्रा. बच्छाव यांनी ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली जावी म्हणून जिल्हा ते हायकोर्ट-सुप्रीम कोर्ट पर्यंतचा लढा दिला आहे. ही मंडळी विविध पातळ्यांवर संघर्ष करीत असताना उर्वरित दोन पॅनेलमधील अपवाद वगळता कोणीही जुन्या प्रस्थापित आणि वादातीत व्यक्तींशी कधीही संघर्ष केल्याचे आठवत नाही.
‘मविप्र’ विकास पॅनेलने सर्व जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य दिले आहे. निवडणूक जाहिरनाम्यात अनेक विषय स्पष्टपणे मांडले आहेत. संस्थेच्या नव्या इमारती उभारणे, विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, स्वच्छतागृह, पोषण आहार अशा सुविधा देणे, ग्रंथालय-प्रयोगशाळा-अपंगांसाठी रॅम्प उभारणी, १० वी- १२ वीच्या निकालात गुणवत्ता वाढविणे, शाखा विस्तार, संगणकीय यंत्रणा विस्तार अशी आश्वासने दिली आहेत.
‘मविप्र’ विकास पॅनेलची भूमिका नरेंद्र पाटील यांनी ‘ध्यासपर्व’ या पुस्तिकेतून मांडली आहे. सन १९८७ पासून तर सन २०१० पर्यंत संस्थेतील दहशतवादी-दडपशाही करणार्या पदाधिकार्यांशी कसा-कसा न्यायालयीन व आंदोलनात्मक लढा दिला याचा लेखाजोखा या पुस्तिकेत आहे. संस्थेतून पाय उतार झालेल्या पदाधिकार्यांवर जळगाव, अमळनेर, भडगाव तालुक्यात खंडणी, अपहार, मारहाण असे ३० वर गुन्हे दाखल असल्याचेही पुस्तिकेत म्हटले आहे. ‘मविप्र’ वर प्रशासक नियुक्तीसाठी ३५ वेळा कोर्टाची पायरी चढावी लागली अशीही माहिती पुस्तिकेत आहे. नाशिक मविप्र, खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीची यांच्याशी ‘मविप्र’ जळगावची तुलनाही पुस्तिकेत केली आहे या पुस्तिकेतून ‘मविप्र’ विकास पॅनेलची भूमिका स्पष्ट होते.
या पुस्तिकेत म्हटले आहे की, संस्थेत पूर्वी पदाधिकारी असलेल्या मंडळींचे कोणतेही लागेबांधे सरकारमधील लोकांशी नव्हते. पण, त्यांना पायउतार करायला २४ वर्षे लढावे लागले. आता निवडणुकीचा हक्क मिळाला तर पूर्वी सरकारमध्ये सत्ताभोगलेली मंडळी नेतृत्व करायला तयार आहे. सत्तेची चटक लागलेली मंडळी जर ‘मविप्र’ त आज घुसली तर त्यांना पुन्हा बाहेर काढायला १०० वर्षे लागतील. हा मुद्दा महत्त्वाचा आणि लक्षवेधी आहे.
याला पार्श्वभूमिही तशीच आहे. ‘मविप्र’ ची सहकार विभागातर्फे होणारी ही निवडणूक स्थगित करण्याची मागणी काही जणांनी हायकोर्ट-सुप्रीम कोर्टापर्यंत केली होती. अगदी शेवटच्या दिवसांपर्यंत हा लढा चालला. अखेर दोन्ही कोर्टाने स्थगिती नाकारल्यानंतरच रविवारचा मतदानाचा दिन उजाडत आहे. हे कोणामुळे शक्य झाले याचा विचार मतदारांना करावाच लागणार आहे.
इतरही दोन पॅनेल रिंगणात
‘मविप्र’ संस्थेत कथित गैरव्यवहार व जुन्या पदाधिकार्यांच्या मनमानी कारभाराचा मुद्दा पुढे करून अशोक शिंदे, दिलीप खोडपे, प्रा. डॉ. संभाजीराव देसाई, प्राचार्य उल्हास पाटील, ज्ञानेश मोरे आदींचे ‘शिव-सज्जन शक्ति पॅनेल’ रिंगणात आहे. या पॅनेलनेही भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनीही जुन्या पदाधिकार्यांवर आरोप केले आहेत. मात्र, यातील काही मंडळी जुन्या पदाधिकार्यांचे समर्थक किंवा पाठीराखे होते असेही सांगण्यात येते
तिसरे पॅनेल ‘मराठा जागृती पॅनेल’ म्हणून रिंगणात आहे. या पॅनेलचे नेतृत्व माजी पालकमंत्री तथा पारोळ्याचे विद्यमान आमदार डॉ. सतीश पाटील करीत आहेत. त्यांच्यासोबत डॉ. दीपक पाटील, ऍड सत्यजित पाटील, प्रा. डॉ. अजित वाघ, प्रकाश सोमवंशी हे रिंगणात आहेत.
येथे डॉ. सतीश पाटील यांच्या संदर्भात एक आक्षेप असा घेतला जातो की, जेव्हा डॉक्टर हे सत्तेत होते तेव्हा त्यांनी कधीही ‘मविप्र’ तील मनमानी विरोधात सरकार दरबारी आवाज उठवला नाही. मात्र, संस्थेची निवडणूक लागताच डॉ. पाटील काही मंडळींच्या सोबत रिंगणात उतरले. हा ‘संधीसाधूपणा’ आहे, असे काही जण म्हणतात. तर काही जण असे म्हणतात की, ‘मविप्र’साठी नाममात्र शंभर रुपये शुल्क घेवून सभासद वाढ करण्याचे काम सुरु असताना संस्थेतल्या जुन्या पदाधिकार्यांनी जिल्हा सहकारी बँकेस शुल्काचा भरणा करुन घेण्यास मनाई केली होती. त्यावेळेस डॉ. पाटील यांनी बँकेच्या कार्यकारी संचालकांना शुल्क स्वीकारण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे आज चौदा हजारापेक्षा जास्त मतदार आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील.
शिव-सज्जन शक्ति आणि मराठा जागृती पॅनेलमधील काही मंडळी शिक्षण क्षेत्रातील आणि त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रातील मातब्बत, अनुभवी मंडळी आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणतचाही आक्षेप नाही. पण, ‘मविप्र’ मधील मनमानी, दादागिरी, हुकूमशाही मोडण्यासाठी या मंडळींनी कधी-कुठे-कोणा विरोधात आंदोलन केल्याचे दिसत नाही. म्हणूनच नरेंद्र पाटील यांच्या ‘मविप्र विकास पॅनेल’ ला विरोधाची भूमिका घेवून ही मंडळी रिंगणात उतरली का? अशी शंका उपस्थित होते.
रविवारी सकाळी मतदानाची प्रक्रिया सुरू होईल. जसे-जसे मतदान वाढत जाईल तशी-तशी ‘मविप्र’ जळगाव मधील परिवर्तनाची मुहूर्तमेढ घट्ट रोवली जाईल. तीनही पॅनेलच्या उमेदवार आणि त्यांच्या कार्याची माहिती मराठा समाजाला पुरेशी आहे. निकाल काहीही लागला तरी संस्थेत परिवर्तनाचे एक वर्तूळ पूर्ण झालेले असेल. म्हणूनच मराठा समाजाच्या मतदारांनी विनंती आहे की, मतदानासाठी बाहेर पडा आणि खर्याअर्थाने परिवर्तन शब्दाचा अर्थ समजून घेत ठरवून, निर्धार करून समाजाचे प्रतिनिधी निवडून द्या!!
No comments:
Post a Comment