Saturday 9 May 2015

नाथाभाऊंचा चेकमेट!

ळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या सर्व पक्षीय ‘सहकार पॅनेल’ने २१ पैकी १८ जागा जिंकल्या. ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून चर्चेचे गुर्‍हाळ तब्बल महिनाभर सुरू होते. शिवसेना नेत्यांनी खडसेंसोबत जाण्याचा ‘तह’ करून टाकला. कॉंग्रेस नेत्यांनी बदलाचे वारे ओळखून लढाईतून ‘माघार’ घेतली. राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही २/३ जागा देण्याची खडसेंची तयारी होती. मात्र, हट्टी आणि दुराग्रही नेत्यांमुळे निवडणुकीचा ‘फड’ रंगला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ज्या नेत्याने पक्षश्रेष्ठींचे हवाले देत निवडणूक लादली नंतर ते नेते प्रचारातून बाहेर राहीले. तसा ‘घरचा आहेर’ पक्षाच्या महिला नेत्यांनी जाहीरपणे दिला. अखेर  बँकेच्या राजपटावर सर्व विरोधकांना ‘चेकमेट’ करीत खडसेंचे पॅनेल बहुमताने विजयी झाले. राजकीय बुध्दीबळात सोंगट्या कितीही रंगाच्या असल्या तरी सर्व बाजूंचे राजे एकटे ‘नाथाभाऊ’ असल्याचे या निकालाने सिध्द केले. जिल्ह्यातील सहकाराला नवीदिशा देणारा आणि सत्ता वाटणीचा ‘नवा पटर्न’ निर्माण करणारा हा निकाल आहे. भविष्यात जिल्ह्यातील सहकार मोडीत-विक्रीत निघतो की उर्जितावस्थेत येतो हे काही काळानंतर दिसेल...
राजकारणाची तुलना बुध्दीबळाच्या खेळाशी करण्याचा मोह नेहमी होतो. सत्तेतील खूर्चीसारख्या ६४ जागा आणि मानवी प्रवृत्ती-कृतीचे दर्शन घडविणारे काळे-पांढरे मोहरे हे बुध्दीबळावरील घटक राजकारणातील कुटील डावपेच-कारस्थान आणि तहाचे प्रतिक भासतात. जळगाव जिल्हा बँक निवडणूक निमित्ताने सहकार क्षेत्राच्या पटावर अनेक खेळी रंगल्या. या खेळी राजकारणाचा भाग असल्यातरी त्यात खेळाचे अनेक सिध्दांत सिध्द झाले आणि काही मोडले सुध्दा. राजकारण करणे किंवा खेळणे यासाठी कोणताही सिद्धांत लागत नाही असे ढोबळ मानाने म्हटले जाते. पण, ते खरे नाही. कोणताही सिद्धांत न पाळता राजकारण करणे हा सुद्धा एक सिद्धांत आहेच. खेळातील सिद्धांत आणि जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत रचलेले डावपेच याची तुलना करीत निकालाचे विश्लेषण केले तर खेळाची ‘रंजक’ माहिती आणि राजकारणातील डावपेचांचे ‘नवे पदर’ उलगडत जातात.
असे म्हणतात, बुद्धीबळाचा डाव हा दोनच खेळाडूंमध्ये रचला जातो. पटाच्या भोवती खेळायला बसतात दोघेच मात्र, त्यांच्या प्रत्येक चालीमागे खेळाडूचा प्रशिक्षक, मित्र, संगणक आणि सराव याचे सूत्र असते. म्हणजेच दोन-चार जणांचे डोके अप्रत्यक्ष काम करीत असते. राजकारणाचेही तसेच आहे. दिसायला दोन बाजू दिसतात पण, त्यात इतरही अनेक बाजू दृश्य किंवा अदृश्य स्वरुपात असतात. खेळाचा अंतिम निष्कर्ष हा ‘हार-जित’ वर ठरतो. राजकारणातही हार आणि जित याच दोन बाजू असतात. म्हणून खेळाचा पहिला सिद्धांत आहे तो हाच की, खेळ कितीजण खेळणार हे प्रथम ठरवा आणि त्यानंतर खेळाची एकपात्री, दोनपात्री आणि बहुपात्री रचना करा.
हा सिद्धांत जिल्हा बँकेच्या राजपटावर पहिल्यापासून चर्चेत होता. ज्येष्ठ नेते खडसे यांनी निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केल्यानंतर शक्यतो ‘एकपात्री’ यादी तयार होईल असे वाटत होते. राजपटावर वेगवेगळ्या बाजूने बसणार्‍यांपैकी शिवसेनेच्या नेत्यांनी एकपात्री प्रयोगाला ‘हो’ म्हणून टाकले. त्यामुळे चिमणराव पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे आणि आमदार किशोर पाटील हे आपसूक खडसेंच्या पॅनेलचे घटक झाले. खडसेंच्या पॅनेलला पहिल्या पासून ‘युतीचा’ चेहरा लाभला. शिवसेनेतील तिसरे आमदार गुलाबराव पाटील यांचे खडसेंशी फारसे सख्य नाही. ते बँकेच्या रिंगणात उतरणार नाही अशी परिस्थिती आपोआप निर्माण झाली.
एकपात्री प्रयोगाचे ‘सर्व पक्षीय सहकार पॅनेल’ असे करण्यात आले. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळातील बरेच जण खडसेंच्या सोबत तडजोडी करण्याच्या मूडमध्ये होते. गुलाबराव देवकर, संजय पवार, नानासाहेब देशमुख यांनी सर्व पक्षीय मधून उमेदवारी निश्चित केली. खडसेंनी सुद्धा त्यांचे ‘पुन्हा निवडून येण्याचे मेरिट’ लक्षात घेवून उमेदवारीला होकार देवून टाकला. एकूण २१ पैकी जवळपास १० ते १२ जणांची उमेदवारी एकपात्री प्रयोगात पूर्वीपासून निश्चित होती. खडसेंच्या पॅनेलची यादी खूप आधी तयार झाली होती मात्र, उमेदवारी अर्ज माघारीपर्यंत इतरांचा अंदाज घेण्यासाठी आज ठरवू-उद्या ठरवू असा वेळ घेण्यात आला. याचा व्हायचा तो परिणाम झाला. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कोण रिंगणात उतरणार आणि स्वतंत्र पॅनेल करायचे का? या घोळात विरोधकांना पुरेसा वेळ मिळाला नाही. म्हणजेच ‘द्विपात्री’ किंवा ‘बहुपात्री’ खेळासाठी तयारी करण्याचे भान-संधी-वेळ विरोधकांना राहीली नाही.
मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसची मोट बांधून ईश्वरलाल जैन यांनी बँक ताब्यात घेतली होती. यावेळीही जैन यांच्या सोबत डॉ. सतीश पाटील, ऍड. वसंतराव मोरे आणि कॉंग्रेसची काही मंडळी द्विपात्री प्रयोग रंगवतील असे चित्र होते. पण, जैन यांनी जामनेर तालुक्यातून स्वतःच्या ऐवजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी उमेदवारी करायला संधी दिली आणि द्विपात्री प्रयोगातील दुसरा खेळ रंगायला लागला. जैन एकपात्रीतून बाहेर झाले. मात्र, महाजन यांच्यासोबत बँकेत येण्यासाठी चाळीसगावचे भाजप आमदार उन्मेश पाटील आणि अमळनेरचे अपक्ष आमदार शिरीष चौधरी हेही प्रयत्नशील झाले. खडसेंच्या यादीत ही दोन्ही नावे पहिल्यापासून नव्हती. ही बाब लक्षात घेवून सर्व पक्षीय पॅनेलमध्ये भाजप नेत्यांमध्येच मतभेद होतील असा विरोधकांचा प्राथमिक कयास होता. पण, ‘क’ वर्ग सोसायटीतून ठराव असलेल्या उमेदवारास निवडणूक लढता येणार नाही हा नियम आडवा आला आणि आमदार पाटील, आमदार चौधरी यांच्यासह इतर मान्यवर इच्छूकांचे अर्ज छाननीत बाद झाले. येथून पुन्हा राजकारणाचा खेळ एकपात्रीपडे वळला.
दुसरीकडे खडसे, बँकेचे विद्यमान अध्यक्ष चिमणराव पाटील, खासदार ए. टी. पाटील, आमदार प्रा. सोनवणे, आमदार किशोर पाटील, आमदार संजय सावकारे यांनी शांतपणे व्यूहरचना करीत एक-एक नाव निश्चित केले.
खेळाचा एक सिद्धांत असाही आहे तो म्हणजे, खेळातही ‘नफा-नुकसान’ पाहावेच लागते. हा सिद्धांत राजकारणात जास्त प्रभावीपणे वापला जातो. नफा-नुकसानचा हिशोब खडसेंनी आधीपासून केला होता. कोण निवडून येवू शकतो, कोणाच्या बाजूने मतदारांचे ठराव आहेत, कोण मतदार मिळवू शकतो याचा ताळेबंद सर्व पक्षीयने अगोदरच केला होता. याच मेरिटवर अखेरच्या यादीत आमदार सुरेश भोळे, ऍड. रोहिणी खेवलकर, वाडीलाल राठोड, अनिल भाईदास पाटील, कैलास सूर्यवंशी आणि इतरांची नावे एकपात्रीत निश्चित झाली. ती निश्चित करताना कोणती जागा तोट्यात आहे याचा अंदाजही खडसे-पाटील यांना होता. चाळीसगावमध्ये सूर्यवंशी यांचा निभाव राजीव देशमुख यांच्यासमोर लागणार नाही हे नेत्यांना माहित होते. म्हणूनच चाळीसगावसह अजून एखादी जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला द्यायला खडसे तयार होते. पण, ईश्वरलाल जैन आणि डॉ. सतीश पाटील यांच्यात जागेसंदर्भात एकमत होवू शकले नाही आणि जैनांनी निवडणुकीचा मार्ग स्वीकारला.
खेळाच्या सिद्धांतात नफा-नुकसान तीन प्रकारे पाहिले जाते. पहिला सिद्धांत हा ‘शून्य बेरीज खेळ’ असा आहे, दुसरा सिद्धांत ‘अशून्य बेरीज खेळ’ असा आहे. तिसरा सिद्धांत ‘विशाल-सरळकृती खेळ’ असा आहे. शून्य बेरीजमध्ये विद्यमान मंडळींचे नुकसान होत नाही तर लाभ होतो. अशून्य बेरीजमध्ये लाभ-नुकसान काहीही होत नसते मात्र, खेळ जो खेळवतो तो त्याचा अप्रत्यक्ष हिस्सा वसूल करतो. विशाल-सरळकृती खेळाचा सिद्धांत म्हणजे सर्व डावपेचांचा वापर करून खेळणे. एकपात्रीचा खेळ रचला असे सांगत असताना खडसे मात्र तिसर्‍या सिद्धांतावरही काम करीत होते.
खडसे यांनी जिल्हा बँकेत वरील तीनही सिद्धांत सहज-सोप्या पद्धतीने वापरले. भाजप पक्षांतर्गत कोणाचाही रोष होणार नाही, उमेदवारी वाटपात कोणीही फाटा फोडणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. मंत्री गिरीश महाजन यांना पॅनेलमध्ये घेतले. नंतर त्यांच्याकडून कोणाचीही शिफारस येणार नाही किंवा नावाचा आग्रह होणार नाही याची दक्षता घेतली. प्रचाराच्या काळात महाजन हे मुख्यमंत्र्यांच्यासोबत इस्त्राईलला जावून आले. तो काळही सर्व पक्षीयसाठी निवांतपणाचा होता. चाळीसगावमध्ये राठोड आणि सूर्यवंशी यांना पक्षाचे आणि स्वतःचे समर्थक म्हणून खडसेंनी उमेदवारी दिली. अमळनेरमध्ये गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव पाहाणारे, तेथील नगरपालिकेतही पिछाडीवर पडलेले अनिल भाईदास पाटील यांना खडसेंनी उमेदवारी दिली. तसे करीत असताना आमदार स्मिता वाघ आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनाही विश्‍वासात-सोबत ठेवले. जळगाव शहरातून आमदार भोळे यांना उमेदवारी दिली. यातून शहरातील अनेकांची मक्तेदारी संपली. धरणगाव मधून आमदार गुलाबराव पाटील यांना बाजूला ठेवताना देवकरांना सोबत घेतले. येथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. ती म्हणजे, कॉंग्रेस आघाडी सरकारमध्ये देवकर राज्यमंत्री आणि जिल्हा पालकमंत्री मंत्री असताना ते खडसेंना ‘विरोधी पक्षनेता’ म्हणून जाहीरपणे जो मान-सन्मान देत ते संबंध यावेळी कामाला आले. खडसेंनी अप्रत्यक्ष केलेल्या व्यूहरचनेत भाजपचे १० ते ११ जण निवडून येण्याच्या निकषावर सुरक्षित झाले. नंतर ते निवडूनही आले. अपवाद फक्त सूर्यवंशी यांचाच झाला. त्यांना पराभव पाहावा लागला. खडसेंनी अखेरच्या टप्प्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसवर पूर्णतः मात केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिलोत्तमा पाटील शेवटच्या दिवशी सर्व पक्षीय पॅनेलमध्ये सहभागी झाल्या. खडसेंच्या एकपात्री खेळाचा प्रयोग येथेच पूर्ण झाला होता. पण, विशाल-सरळकृती खेळाचा सिद्धांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ईश्वरलाल जैन यांनी गरज नसताना मांडला. त्यांनी ‘स्वतंत्र पॅनेल टाकू’ असा पवित्रा घेत १५ जागांसाठी उमेदवार रिंगणात उतरवले. अर्थात, हा हरणार्‍या खेळाचा प्रवास होता. एक-दोन जागा येतील हेही जैन यांच्यासह इतरांनाही माहित होते.

For info about Eknathrao Khadse
....... http://www.eknathkhadse.in/

कोणताही खेळ खेळायचा तर त्याच्यासाठी लागणार्‍या वेळेचेही दोन सिद्धांत आहेत. पहिला म्हणजे, खेळासाठी लागणारा पुरेसा वेळ दिलाच गेला पाहिजे. दुसरा सिद्धांत म्हणजे, अमर्याद वेळेचा खेळ त्रासदायक आणि वेळ काढू असतो. खडसेंनी एकपात्री खेळासाठी उमेदवारी अर्ज माघारीपर्यंती मुदत निश्चित केली होती. त्यामुळे त्यांच्या खेळाचे निष्कर्ष त्याच दिवशी निश्चित झाले. विरोधकांचा खेळ उमेदवारी माघारीनंतर सुरू झाला. तो मर्यादेच्या वेळे बाहेर गेला. विशाल-सरळकृती खेळ सिद्धांतात ‘दैवाच्या भरवशावरही’ खेळी केली जाते. अशा प्रकारचे सुदैव ऍड. रवींद्र पाटील यांना लाभले. ते ईश्वर चिठ्ठीवर निवडून आले. ईश्वरलाल जैन शेवटपर्यंत सोबत नसतानाही ‘ईश्वर’ चिठ्ठीने ऍड. पाटील यांना तारले. नाहीतर, त्यांचे पिताश्री स्व. प्रल्हादराव पाटील यांचा पुतळा बँकेत लावला मात्र ऍड. पाटील बँकेबाहेर गेले असे चित्र दिसले असते.
जिल्हा बँकेत एकूण २१ संचालक आहेत. सर्व पक्षीय पॅनेलच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन जण ऍड. रवींद्र पाटील व राजीव देशमुख निवडून आले. कॉंग्रेसचे दोन जण डॉ. सुरेश पाटील (चोपडा) हे विरोधी पॅनेलमधून तर संजय मुरलीधर पवार हे सर्व पक्षीय पॅनेलमधून निवडून आले. एकपात्री खेळात खडसेंनी राष्ट्रवादीला दोन आणि कॉंग्रेसला एखाद-दुसरी जागा देण्याचे मान्य केले होते. अखेर निकालही तसाच हाती आला. सर्व पक्षीय पॅनेलमधून राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर, नानासाहेब देशमुख व तिलोत्तमा रवींद्र पाटील हे तीन जण निवडून आले. तिसर्‍या क्रमांकावर शिवसेना राहीली. बँकेचे विद्यमान अध्यक्ष चिमणराव पाटील हे पूत्र अमोल पाटीलसह बिनविरोध निवडून आले. शिवाय दोन्ही आमदार सोनवणे (चोपडा) आणि पाटील (पाचोरा) हेही निवडून आले.
खडसेंचे या निवडणुकीतील सर्वांत मोठे यश म्हणजे बँकेत पहिल्यांदा भाजपचे १० संचालक निवडून आले. हे १० पैकी १० जण खडसेंचे ऐकणारे आहेत. खडसे, महाजन, खा. पाटील, आ. सावकारे, आ. भोळे, ऍड. रोहिणी खेवलकर, नंदकिशोर महाजन, गणेश गिरधर नेहते, वाडीलाल राठोड आणि अनिल पाटील ही मंडळी खडसेंच्या शब्दाबाहेर जावू शकत नाही.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खडसे यांच्या कन्या ऍड. रोहिणी खेवलकर याच अध्यक्ष होतील असे दिसते. त्याची काही ठोस कारणेही आहेत. ती अशी ः जिल्हा बँक आर्थिकदृष्या आजही ८०-९० कोटींच्या संचित तोट्यात रुतली आहे. जिल्हा बँकेला शिखर बँकेकडून मिळणार्‍या कर्जाचा व्याजदर आणि शेतकर्‍यांना वाटप होणार्‍या कर्जाचा व्याजदर यात अर्धा टक्का बँकेचे नुकसान होत आहे. शिखर बँकेकडील ठेवींवरचे व्याज कमी झाले आहे. सरकारकडे कर्जमाफी म्हणून अडकलेली रक्कम लवकर मिळण्याची शक्यता नाही. मागील अध्यक्ष आणि काही संचालकांवर विविध घोटाळ्यांची चौकशी सुरू आहे.

अॅड. रोहिणी खेवलकरच होणार अध्यक्ष
हे सर्व विषय निस्तरायचे तर शिखर बँक, सहकार मंत्रालय आणि कृषीमंत्रालय यांच्याशी संबंध असलेल्या व्यक्तिला अध्यक्षपदाच्या खूर्चीवर बसवावे लागेल. निवडून आलेल्या संचालकात अशी एकमेव व्यक्ती आहे, ती म्हणजे खडसेंच्या कन्या ऍड. रोहिणी खेवलकर. गेल्या काही वर्षांपासून त्या सूतगिरणी आणि साखर कारखान्याच्या माध्यमातून सहकारात काम करीत आहेत. त्या जिल्हा बँकेच्या अध्यक्ष झाल्या तर शिखर बँकेच्या नाड्या कृषीमंत्री म्हणून खडसे आवळू शकतात. सहकार मंत्रालय चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. ते खडसेंचा कोणताही शब्द टाळू शकत नाहीत. जुन्या-जाणत्या संचालकांचे पाय चौकशीच्या फेर्‍यात अडकलेले आहेत. अशा परिस्थितीत ऍड. रोहिणी खेवलकर यांना अध्यक्ष करू नका असे कोण म्हणू शकतो?
येणार्‍या काही दिवसात विद्यमान चेअरमन चिमणराव पाटील हेच सर्व पक्षीय पॅनेलतर्फे ऍड. रोहिणी खेवलकर यांचे नाव अध्यक्षपदासाठी सूचविण्याची शक्यता आहे. कारण, जिल्हा बँकेत चिमणराव पाटील यांना अध्यक्ष होण्याची संधी ही खडसे यांनी उघडपणे त्यांना दिलेल्या समर्थनामुळे मिळाली होती. शिवाय, चिमणराव पाटील यांच्या काळातील नोकर भरतीपासून इतर घोळांचे विषय सुद्धा सरकार दरबारी व न्यायालयात प्रलंबित आहेत. बँकेच्या २१ संचालकांपैकी उघडपणे कोणीही ऍड. रोहिणी खेवलकर यांना विरोध दर्शवू शकत नाही. भावी अध्यक्ष म्हणून ऍड. खेवलकर यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होईल हे निश्चित.

एक बुद्धीबळ, चार बाजू आणि एकटा राजा
बुद्धीबळाच्या खेळात काळ्या-पांढर्‍या सोंगट्या अशा दोन बाजू असतात. प्यादे, हत्ती, उंट, घोडा आणि वजीर हलवून राजा सुरक्षित ठेवत खेळावे लागते. राजकारणाच्या पटावरही असेच घडते. नेते मंडळी समर्थकांची हलवा-हलव करून हार-जितचे गणित मांडतात. शेवटच्या टप्प्यात सर्वस्व गमावून पराभूत होणार्‍या राजाला जेव्हा शह (चेक) दिला जातो तेव्हा केवळ एक घर सरकण्याची संधी त्याला असते. पुन्हा दुसर्‍याने शह दिला की खेळ मात देवून खल्लास (मेट) होतो. जिल्हा बँकेच्या निकालाने खडसे यांना सहकारातील सर्व बाजूंनी खेळणार्‍या राजाचा दर्जा न बोलता दिला आहे. जळगाव जिल्ह्यातील सहकाराच्या राजकारणाचे प्रवाह जिल्हा बँकेतून सुरू होतात आणि परतून तेथेच संपतात. आज जिल्ह्यात साखर कारखाने, सूतगिरण्या, दूध संघ, पतसंस्था, प्रक्रिया प्रकल्प असे सहकारातील सर्वच प्रकल्प डबघाईला आले आहेत. ते पुन्हा उर्जितावस्थेत येण्यासाठी खडसेंना ‘मिडास राजाची’ भूमिका निभवावी लागणार आहे. खडसेंनी ज्या संस्थेला हात लावले ती सोन्याची व्हायला हवी. तसे झाले तरच येथे ‘अच्छे दिन’ येवू शकतील. यात एक खबरदारी ही सुद्धा घ्यावी लागेल. ती म्हणजे,  आपल्याच हाताने आपल्याचे माणसांचे ‘सोन्याचे पुतळे’ होणार नाहीत ना?


No comments:

Post a Comment