Saturday, 23 May 2015

अष्टावधानी अत्रेबाबा !

माणसाचे कर्तृत्व आणि चरित्र हे त्याच्या व्यक्तिगत आणि विविध क्षेत्रांतील यश-अपयशावर मोजले जाते. किंबहुना, अशाच निकषांवर व्यक्तिंचा चरित्राभ्यास करून त्यांचे मोठेपण समाजासमोर मांडले जाते. व्यक्ती मूल्यांकनाची ही सोपी पद्धत आहे. मात्र, जळगावचे स्व. ऍड. अच्युतराव वामनराव अत्रे यांचे चरित्र आणि व्यक्तिमत्व अशा निकषांच्या सीमा मोडून ओलांडणारे होते. महाराष्ट्रभर ‘अत्रेबाबा’ म्हणून नावलौकिक असलेेल्या ‘अत्रेसाहेब’ यांचे व्यक्तिमत्व मला ‘अष्टावधानी’ वाटते. प्रत्येक स्थितीच्या वास्तवाचे भान जपून आवश्यक आणि योग्य ती कृती करीत ते जगले. त्यांच्या वेगवेगळ्या ‘आठ अवधानांची’ दखल...


एखाद्या उत्तुंग आणि यशस्वी व्यक्तिमत्वाची शब्दांमध्ये मांडणी करताना सरसकट ‘अष्टपैलू’ हे विशेषण वापरले जाते. अनुभवी आणि कुशल कारागिराकडून कच्च्या हिर्‍याला पाडले जाणारे पैलू ही जिकरीची व जोखिमीची क्रिया लक्षात घेतली तर हिर्‍याची चमक-धमकची गुणविशेषता ही परावलंबी ठरते. इतरांच्या मेहनतीमुळे अनेक माणसांच्या कार्य-कर्तृत्वाचा विकास होतो. तशी माणसे मोठीही होतात. त्यांचे यश इतरांना झाकोळूनही टाकते.
पण, काही व्यक्तिमत्वे ही स्वतःचेे अधिष्ठान स्वतः निर्माण करून मोठी होतात. निग्रह, निश्‍चय आणि निष्ठेने आपापल्या यशाचा मार्ग निवडतात. त्या मार्गाचे विस्तारिकरण करतात. त्यावर पुढे जाताना स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचे ‘माईलस्टोन’ स्वतःच रोवतात. अशा माणसांना आपल्या कार्य, वर्तन आणि चरित्राचे सदैव भान असते. मार्गावरील प्रत्येक अडथळे, यश आणि अपयश अशा गोष्टींकडे त्यांचे लक्ष असते. त्याचे त्यांना ‘अवधान’ असते.
अवधान शब्द खूप काही क्रिया व्यक्त करतो. त्यात ध्यान आहे, सोबत सावधान शब्दाचीही छटाही आहे. निश्‍चलता, निस्पृहता आणि निर्मोहता यातील ‘निः’ म्हणजे नकार दाखविणारा ‘अ’ हा शब्दही आहे. हा सारा शब्द प्रपंच लक्षात घेवूनच स्व. ऍड. अच्युतराव अत्रे यांना ‘अष्ठावधानी’ म्हणणे समर्पक वाटते.
अवधान हे उपजत असते. ते अनुभव, व्रत आणि कष्ट यातून प्राप्त होते. व्यवसायाने वकिल असलेल्या अत्रेबाबांच्या व्यक्तिमत्वातील ही अष्टावधानेच त्यांचे स्वतःच स्वतःला उभे करणे स्पष्ट करतात. अत्रेबाबांच्या ठायी कोणती अवधाने होती, हे समजून घ्यायचे असेल तर त्यांच्या कुटुंबियांशी आणि निकटवर्तियांशी बोलायला हवे.
अत्रेबाबांनी वकिल व्हायचेच असे ठरवून निग्रहाने आपल्या आयुष्याची रचना केली. हे करताना त्यांनी नेहमी दिशावधान,  स्थलावधान, कालावधान, प्रसंगावधान (संकटकाळ धरून) वातावरणावधान (अनुकूल अथवा प्रतिकूल), वयावधान (वयोमानावधान सोबत आरोग्यावधान), सभावधान (लोकसमुदायावधान किंवा गर्दीचे व्यवधान),  आणि स्त्री-पुरुष-उपस्थिती अवधान याचे भान ठेवले. नुसतेच भान ठेवले नाहीतर कृती सुद्धा त्या अवधानाशी सुसंबंधित आणि सुनियोजित केली.
अत्रेबाबांच्या व्यक्तिमत्वाची दोन-तीन अवधाने लोकांच्या समोर आहेत. त्यातील पहिले म्हणजे, प्रामाणिक आणि यशस्वी वकिल, दुसरे म्हणजे व्रतस्थ शिक्षण संस्थाचालक, तिसरे म्हणजे हिंदूत्ववादी विचारांचा कट्टर पुरस्कर्ता. यापलिकडे अत्रेबाबांच्या इतर अवधानांचा उहापोह कधी सार्वत्रिक पातळ्यांवर झालेला नाही. मात्र, त्यांच्या कुटुंबिय, निकटवर्तीय आणि काही नियमित पक्षकार मंडळींना अत्रेबाबांच्या इतरही अवधानांचा चांगला परिचय आहे. आपणही अत्रेबाबांचे ‘अष्टावधान’ त्यांचे ज्येष्ठ पूत्र ऍड. सुशील अत्रे यांच्याकडून समजून घेवू. त्यांच्याशी चर्चा करताना अत्रेबाबांचे व्यक्तिमत्व एका अवधानातून  दुसर्‍या अवधानांची वैशिष्ट्ये गुंफत उत्कटपणे उलगडत जाते.
पहिले अवधान ः पालक संस्कार
स्व. वामनराव अत्रे हे निष्णांत वकिल होते. त्यांचे चिरंजीव अच्युतराव. मुलाने वकिली व्यवसायात येवू नये असे वामनरावांना त्यांच्या अनुभवांवरून वाटे. वकिली प्रत्येकाला जमेलच असे नाही. ते काम सोपे नाही असे वामनराव म्हणत. मात्र, ‘मी करेन तर वकिलीच’ या निश्‍चयाने अच्युतरावांनी मार्ग आणि दिशा ठरविली. ‘इतरांना वकिली जमू शकते तर ती मलाही जमणार’, असा हा स्वनिग्रह होता. अखेर वामनराव मुलास म्हणाले, ‘तुला करायची तर वकिली कर पण, उथळपणे करू नकोस. गंभीरतेने तो पेशा स्वीकार’  या संमतीनंतर अच्युतरावांचा विधी व कायदा शिक्षणाचा प्रवास सुरू झाला. दुसर्‍या वर्षांचे पेपर सुरू होण्याच्या काही दिवस अगोदर आईचे निधन झाले. सर्व सोपास्कार करून अच्युतराव परीक्षेला गेले. नंतर उत्तीर्णही झाले.
न्यायालयातील अवघड आणि गुंतागुंतीचे खटले जिंकून यशस्वी ठरलेले अच्युतराव महाविद्यालयीन शिक्षणात कधीही गुणवत्तेत नव्हते. पण, चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत होते. याविषयी अच्युतराव नेहमी म्हणत, ‘कायद्याच्या अभ्यासात चांगले गुण मिळणे आणि कायदा चांगला समजून तो न्यायालयात मांडणे यात फरक आहे. चांगला वकिल होण्यासाठी कायदा चांगला समजला पाहिजे. तो कसा समजला आहे हे कोर्टाच्या कामकाजातच समजू शकते’ हाच विचार घेवून नवशिक्या वकिलांना अत्रेबाबा नेहमी म्हणत, ‘कायदा समजून घ्या. तो समजला तरच तुम्ही कोर्टात यशस्वी व्हाल’ हिच दिशा, सूत्र घेवून अत्रेबाबांनी नेहमी कायद्याचा चांगला वापर करीत वकिली व्यवसाय सुरू केला, वाढवला, जोपासला आणि श्‍वासाच्या अखेरपर्यंत त्याच विचारांशी प्रामाणिक राहून ते काम करीत राहिले.
वामनराव सुद्धा वयाच्या ७३ व्या वर्षांपर्यंत वकिली करीत होते. मात्र, तेथे ते ठरवून थांबले. त्यांनी आपल्या व्यवसायाची अधिकृत सूत्रे अच्युतरावांकडे दिली. वकिली व्यवसायाला पूर्णविराम देणार्‍या वामनरावांची मुलाखत तेव्हा आकाशवाणीवरून प्रसारित झाली होती. तीत एका प्रश्‍नावर वामनराव म्हणाले, ‘मला आता विश्‍वास आहे की, माझ्या व्यवसायाची धुरा नावलौकिकासह माझा मुलगा सांभाळू शकेल’ यानंतर वामनरावांनी पुन्हा कधीही मुलाच्या व्यवसायात हस्तक्षेप केला नाही. संपूर्ण गीता मुखोद्गत असलेल्या वामनरावांनी निष्काम कर्मयोग अशा प्रकारे जोपासला आणि त्याचा वसा आणि वारसा अच्युतरावांना दिला.
दुसरे अवधान ः कौटुंबिक जबाबदारी
वामनरावांनी स्वतःच्या आयुष्यासोबत अच्युतरावांच्या आयुष्यालाही शिस्तीची मर्यादा  घातली होती. ती म्हणजे, साध्या राहणीमानासाठी आवश्यक गरजा पालकाकडून पूर्ण करुन घ्याव्यात. पण, चैैनीच्या कोणत्याही सवयी, वस्तू या स्वतःच्याच कमाईतून पूर्ण कराव्यात किंवा घ्याव्यात. या मर्यादेत असताना  अच्युतरावांचे लग्न झाले. अवघे १९ वर्षे वय असलेल्या प्रतिमा सून म्हणून अत्रेंच्या घरात आल्या तेव्हा त्यांच्यावरही काही कौटुंबिक मर्यादा आणि घराची संपूर्ण जबाबदारीही होती. अच्युतरावांच्या व्यवसायाचा तो उमेदीचा व धावपळीचा काळ होता. एक पाय जळगावात तर दुसरा बाहेरगावी असे. रात्री-बेरात्री जावे लागे. कधीकधी पक्षकार मुक्कामी येत. त्यामुळे दाम्पत्य म्हणून निवांत वेळ असा मिळत नसे. ‘लैला-मजून’ खून खटल्याने अच्युतरावांना ओळख दिली. दरम्यानच्या काळात वामनरावांचे निधन झाले. १९८२ च्या सुमारास अच्युतरावांनी स्वकमाईतून पहिली मोटार घेतली. वकिली व्यवसायाला प्रारंभ केल्यानंतर तब्बल २० वर्षांनी. मधल्या काळात अच्युतराव बस, रेल्वेने इतर ठिकाणी जात.
वामनरावांचा संस्कार होता, चैनीची वस्तू स्वकमाईतून घ्यायच्या. त्यामुळे स्वतःची मोटार घेण्यासाठी अच्युतराव २० वर्षे थांबले. हाच संस्कार वामनरावांच्या संदर्भात अच्युतरावांनी कठोरपणे पाळला. वामनराव पान खात. त्यामुळे ते थुंकायला घराबाहेर बाहेर जात. दिवसभरात त्यांच्या अशा अनेक फेर्‍या होत. त्यांना रोखणे शक्य नव्हते. उन्हाळ्यात हे जाणे-येणे त्रासाचे असे. तप्त उन्हात थुंकायला घराबाहेर जायचे आणि पुन्हा घरात यायचे.  अशावेळी सर्वांच्या सोयीसाठी कुलर लावला तरी वडिलांना त्रास होईल. बाहेर जावू नका, अशी विनंती केली तरी ते ऐकणार नाहीत. हे माहित असल्यामुळे कुलर घेण्याची क्षमता असूनही अच्युतरावांनी वडिल हयात असेपर्यंत घरात कुलर लावला नाही. त्याविषयी पत्नी किंवा मुलांनीही कुरकूर केली नाही.
तिसरे अवधान ः स्वावलंबन
अत्रे कुटुंबाच्या निवासस्थानाला ‘अत्रेय आश्रम’ असे नाव आहे. मुलांवर आणि नातवांवर संस्कार हा गुरूकूल पद्धतीप्रमाणेच केला जातो. अच्युतरावांनी निग्रहाने स्वावलंबनाचे काही संस्कार स्वतःवर केले. ते आयुष्यभर पाळले.  अच्युतराव रोज पहाटे ४.५० ला उठत. स्वतःचा चहा स्वतः बनवत. चहा पिवून झाला की, स्वतः पातेले व कपबशी धुवून ठेवत.
पूर्वी जळगावात पाण्याचे दुर्भीक्ष होते. पहाटे कधीतरी पाणी पुरवठा होई. तो सुद्धा खूप कमी वेळ असे. त्या काळात स्वतः पाणी भरण्याची सवय अच्युतरावांनी खूप वर्षांपर्यंत पाळली. ते प्रतिमा यांना म्हणत, ‘तुला दिवसभर इतर कामे असतात त्यामुळे तू पहाटे उठू नकोस, मी पाणी भरून ठेवतो’ हा संस्कार त्यांनी अलिकडेपर्यंत जपला.
अच्युतरावांना स्वतःची अनेक कामे स्वतः करण्याची सवय होती. ते स्वतःचे कपडे स्वतःच धुवत. अगदी एप्रिल २०१५ पर्यंत त्यांनी ही सवय पाळली. प्रवासाकरिता लागणारी बॅग ते स्वतःच भरत. निघायच्या एक दिवस अगोदर बॅग भरून तयार असे आणि परत आल्यानंतर १० मिनिटांत बॅगेतल्या वस्तू नेहमीच्या जागांवर ठेवून ती रिकामी केली जात असे. सुशील यांच्या पत्नी तथा सूनबाई पद्मजा यांनी वेळोवेळी अच्युतरावांना आग्रह केला, ‘बाबा मी बॅग भरते’ मात्र, अच्युतराव म्हणत, ‘तू समोर बसून गप्पा कर पण, माझी बॅग मलाच भरू दे’
अत्रेय आश्रमातला अजून एक कौटुंबिक संस्कार आहे. तो म्हणजे, ताटात अन्न शिल्लक टाकू नये. जेवढे खाणे शक्य आहे तेवढेच ताटात घ्यावे. या संस्कारासह इतरही संस्कार अत्रेंची चौथी पिढी जपत आहे.
चौथे अवधान ः कट्टर हिंदूत्ववादी विचारसरणी
अच्युतराव कट्टर हिंदूत्ववादी विचारसरणीचे होते. संघविचार आणि शिस्तीचा त्यांच्यावर प्रभाव होता. बालवयातून ही विचारधारा स्वीकारली आणि आचरणात आणली होती. हिंदू महासभा, विश्‍व हिंदू परिषदेचे कार्य अच्युतरावांनी केले. राम मंदिर उभारणीसाठी पहिल्या कारसेवेचा माहौल असताना अच्युतरावांनी अयोद्धेत जाण्याचा निश्‍चय केला होता. मात्र, इतरांनी त्यांना थांबविले. ‘तुम्ही जळगावात थांबून इतरांना मार्गदर्शन करा’ असा आग्रह त्यांना केला गेला. अखेर अच्युतराव नाही तर घरातील कोणाला तरी पाठवा असे ठरले. त्यानुसार सुशील यांनी कारसेवेला जायची तयारी दर्शविली. तेव्हा उत्तरप्रदेशात मुलायमसिंगचे सरकार होते. त्या सरकारने कारसेवकांना अटक केली. सुशील कारसेवक म्हणून १३ दिवस तेथे कारागृहात होते.
अच्युतराव हिंदूत्ववादी विचारांचे होते. मात्र, वकिली व्यवसाय करताना ते विचारांची आणि पेशाच्या निती, तत्त्वांची गल्लत करीत नसत. आपल्याकडे आलेल्या पक्षकाराला कायद्यानुसार न्याय मिळवून देण्याची त्यांची भूमिका असे. त्यामुळे त्यांच्याकडे समाजवादी, कॉंग्रेस, मुस्लिम अशा विभिन्न विचारसरणीची-जात-धर्म-पंथाची मंडळी विश्‍वासाने पक्षकार म्हणून येत. सन १९७५-७६ च्या आणिबाणीच्या काळात अच्युतरावांच्या घरावरही सरकारचे लक्ष होते. सरकारमधील काही मंडळी म्हणत, ‘तुम्ही संघाची कामे घेवू नका. त्रास होणार नाही’ मात्र, अच्युतरावांनी संघाच्या अनेक गरजू, भूमिगतांना मदत केली. काहींचे खटलेही चालविले.
व्यावसायिक निष्ठा पाळताना कधीकधी हिंदूत्ववादी संघटनांनीही अच्युतरावांचा निषेध केला. चोपडा येथील कन्हय्ये बंधू खून खटल्यात आरोपींचे वकिलपत्र घेतले म्हणून शिवसेनेने अच्युतरावांवर आरोप केले. मात्र, अच्युतरावांनी खटला सोडला नाही. तेव्हा धमकीचे फोन सुद्धा आले. अच्युतराव बधले नाहीत. असाच अनुभव गांधीहत्या झाल्यानंतर आला. घरावर दगडफेक झाली. इतरही प्रकारचे त्रास झाले. मात्र, अच्युतरावांनी हिंदूत्ववादी विचारधारा सोडली नाही.
मुंबई बॉम्बस्फोट खटल्याचे काम सुरू असताना विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी वेळोवेळी अच्युतरावांचे मार्गदर्शन घेतले. त्यांनीही ते दिले. कारण, अच्युतराव म्हणत, ‘हे प्रकरण देशावर हल्ल्याचे आहे. दोषींना शिक्षा व्हायलाय हवी’ त्यानंतर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्यावर संशयित आरोपी म्हणून खटला सुरू झाल्यानंतर सरकार पक्षाला मदत करण्याचे अच्युतरावांनी स्पष्टपणेे नाकारले.
अवधान पाचवे ः कमालीचा प्रामाणिकपणा
दोन वर्षांपूर्वी अच्युतरावांची पंचाहत्तरी साजरी करताना जळगावचे उद्योगपती, विचारवंत तथा पद्मश्री डॉ. भवरलाल जैन म्हणाले होते, ‘अच्युतराव हे कमालीचे प्रामाणिक वकिल आहेत. निष्ठा, निती, तत्व त्यांच्या कृती, वर्तनातून ठासून भरले आहे’
अच्युतरावांनी वकिली व्यवसात प्रामाणिकपणा हे तत्व ‘सतीचे वाण’ समजून जपले. पक्षकाराचे काम कायद्याच्या चौकटीत करण्याचा प्रयत्न त्यांनी नेहमी केला. ‘मी वकिल आहे आणि वकिल म्हणूनच काम करेन, त्यापलिकडे नाही’, हे तत्व त्यांनी लोभ, मोह, लाभ, अपेक्षा सोडून अंगिकारले, जपले, पाळले.
अच्युतराव बहुतांश खटल्यात बचावाचे वकिल असत. मात्र, कोणी मदत मागितली की, ते त्यालाही कायदा समजून सांगत. कोर्टात खटल्याच्या कामकाजात सरकारी वकिल किंवा विरोधातील प्रतिवादीच्या वकिलाचा कायदा चुकला तर अच्युतराव तो दुरूस्त करत. माणसापेक्षा कायदा मोठा आहे, असे अच्युतराव मानत आणि इतरांनाही तसे करण्याचा आग्रह धरत.
महाभारतातील एक उदाहरण अच्युतरावांच्या व्यक्तिमत्वाला चपखल बसते. भीष्माला मारल्याशिवाय पांडवांचा विजय होणार नाही हे कृष्णाला माहित होते. म्हणून त्याने चलाखीने भीष्माच्या तोंडूनच त्याच्या पराभवाचे उत्तर प्राप्त केले. अच्युतरावही कोर्ट-कज्जात भीष्मासारखे होते. समोरचा वकिल विरोधी पक्षकाराचा आहे हे माहित असूनही त्याला योग्य तो सल्ला अच्युतराव देत.
वकिली व्यवसायात सध्या शिकावू अथवा ज्युनिअर वकिलांकडे तुच्छेतेने पाहिले जाते. काही सिनिअर मंडळी वाईट वागणूक देतात. मात्र, अच्युतरावांनी कनिष्ट किंवा शिकावू वकिलांना नेहमी प्रतिष्ठा दिली. त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यांनी कधीही कोणाविषयी तक्रार केली नाही की कोणाचा मानभंग केला नाही.
सहावे अवधान ः सामाजिक कार्य
अच्युतरावांवर गुरूकुलचे संस्कार होते. त्यामुळे त्यांनी होतकरू आणि आर्थिक दुर्बल घटकातील मुला-मुलींच्या शिक्षणाला मदत करण्याचे कार्य न बोलता, गाजावाजा न करता केले. गणवेश, दप्तर, वह्या-पुस्तके, शुल्क यासाठी काही शाळांमध्ये थेट अर्थ सहाय्य अच्युतरावांनी केले. अंध-अपंगांच्या गरजांकडे ते लक्ष देत. काही विद्यार्थ्यांकडून आलेली पत्रे आजही उपलब्ध आहेत.
अच्युतरावांचा विविध संस्था-संघटनाशी जवळचा संबंध होता. अशा संस्थांना प्रसंगी कायदा, नियम, सल्ला यासाठी ते मदत, सहकार्य करीत. विचारसरणी वेगळी असली तरी अच्युतराव सर्वांना सहकार्य करीत. त्यांच्या या स्वभावामुळे त्यांना सर्वच संस्थांमधून वक्ते, प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले जात. समाजिक कार्याचा हा वसा त्यांनी अखेरपर्यंत जपला.
अच्युतरावांनी कधीही कोणतेही काम नाकरले नाही. उलटपक्षी गरजूंना योग्य सल्ला अथवा वकिल मिळवून देण्यासाठी मदत केली.
सातवे अवधान ः शैक्षणिक कार्य
अच्युतरावांना कार्याची आवड असलेला दुसरा प्रांत शैक्षणिक क्षेत्र होता. त्यांचा पूर्वी खान्देश एज्युुकेशन सोसायटीशी संबंध आला. भगीरथ इंग्लिश मीडियम स्कूलचे ते पदाधिकारी होते. नंतर त्यांनी शिक्षण प्रसारक मंडळाची सूत्रे संस्थाचालक म्हणून स्वीकारली. या संस्थेत त्यांनी चांगले कार्य करणार्‍या लोकांना नेहमी प्रोत्साहन दिले. त्यांच्या नेतृत्वातील संस्थेला देणग्या मिळाल्या. अत्रे वकिल नावाभोवती असलेल्या वलयामुळे सरकारी यंत्रणांचा त्रास कमी झाला. अलिकडे शिक्षण संस्थाचालकांच्या संघटनेला अच्युतरावांमुळे बळ मिळाले. शिक्षणेतर अनुदानाचा प्रश्‍न अच्युतरावांनी सातत्याने सरकार दरबारी मांडला. ला. ना. शाळेला गुणवत्तेच्या एका उंचीवर पोहचविण्याचे कार्य अच्युतरावांनी केले.
आठवे अवधान ः माणूस असण्याचे भान
अच्युतराव ७६ वर्षांचे आयुष्य जगले. त्यांनी कौटुंबिक, पेशा, व्यवसाय आणि सामाजिक कार्य करताना स्वतःसह सभोवती इतरही माणसे असल्याचे भान-ध्यान जपले आणि सांभाळले. त्यांनी कोणतीही गोष्ट सहज-सोपी-उथळ म्हणून केली नाही. ते स्वतः टापटीप राहत. थोड्या गरजांमध्ये आपले काम पूर्ण करीत. कागदाच्या एका कपट्यावर ते खटल्यांची टीपणे लिहत.
अच्युतराव मित्र जोडताना कधीही जात-धर्म-पंथ-पैसा याचा विचार करीत नसत. त्यांनी कधीही कोणता विचार किंवा व्यक्ति अस्पृश्य किंवा अछूत मानली नाही. त्यांच्याकडे कामाच्या गरजेतून आलेल्या प्रत्येक माणसाला त्यांनी मदत केली. संघाच्या अतीप्रतिकूल काळात मित्र गजाभाऊ जोशींसोबत स्कूटरवर जिल्हाभर फिरले. त्यांनी सर्वच क्षेत्रांत खूप मित्र जोडले आणि त्यांच्याशी मैत्री जपली. काही नातेवाईंकांना न बोलता मदत केली. त्यांचे घर उभे राहीले किंवा कौटुंबिक वाद-विवादात मध्यस्थी करून ते सावरले. अच्युतरावांनी कोर्टात काही खटले कौटुंबिक कलहाचे चालवले. मात्र, अत्रेय आश्रमात मित्र, निकटवर्ती, परिचित दाम्पत्यांचे मोडकळीस आलेले सहजीवन न्यायाधिशाच्या भूमिकेत सावरले, सांभाळले.
अत्रेबाबांच्या व्यक्तिमत्वाचे इतरही अवधान मांडता येतील. मात्र, अच्युतरावांचे व्यक्तिमत्व वरील आठ अवधानानुसार ‘अष्टावधानी’ असल्याचे मला वाटते. बहुधा इतरांनाही अच्युतराव याच अवधानातून आपले, आपलेसे आणि आपलेच भासण्याची शक्यता अधिक आहे.

अवधानी म्हणजे ‘सतत भान ठेवून दक्ष असलेला’

अच्युतरावांना ‘अष्टावधानी’ का म्हणायचे? याचे अजून एक कारण आहे. अत्रेबाबा वकिल होते. कोर्टाच्या कामकाजात त्यांचा संबंध नेहमी साक्ष नोंदणी, उलट तपासणी अशा प्रकारात ‘सवाल-जबाब’ शी यायचा. त्यांनी नेहमी समर्पक उत्तरे शोधली. त्यामुळे ते खटले जिंकले आणि त्यांनी माणसांनाही जिंकले. अवधान हा प्रकार ‘सवाल-जबाब’शी अशाच जुुळलेला आहे. अवधान हे माणसाच्या तल्लख स्मृती आणि समर्पक युक्तीवादाचे लक्षण आहे.
कर्नाटकात तेलगू भाषिक ‘अवधान’ नावाचा एक सार्वजनिक कार्यक्रम सादर करतात. त्यात शतावधानी, अष्टावधानी असे प्रकार आहेत. एकाचवेळी एका पाठोपाठ अनेक प्रश्‍नकर्ते १०० किंवा ८ प्रश्‍न उत्तर देणार्‍या विद्वानास विचारतात. उत्तर देणाराही प्रत्येकाच्या प्रश्‍नाचे उत्तर पद्यातून देतो. मात्र, तसे करताना तो पहिल्या प्रश्‍नकर्त्याचे उत्तर पद्याच्या पहिल्या ओळीत, दुसर्‍या प्रश्‍नकर्त्याचे  उत्तर पद्याच्या दुसर्‍या ओळीत या क्रमाने देत जातो. चक्र पूर्ण झाल्यानंतर पुन्हा पहिल्या प्रश्‍नकर्त्याजवळ आल्यानंतर त्याच्या उत्तरातील दुसरी ओळ सांगतो. पुढे क्रम तसाच राहतो.  हे करताना उत्तर देणार्‍याची स्मृती, अनुभव, पद्याची रचना हे तल्लखपणाच्या कसोटीवरच तपासले जाते. अच्युतराव कोर्टाच्या कामात तेवढ्याच तल्लखतेने दक्ष असत. म्हणून ते यशस्वी होवू शकले. राज्यभरात नाव कमावू शकले.

No comments:

Post a Comment