Friday 3 April 2015

जळगावच्या गुन्हेपटावर दुसर्‍या पिढीचा रक्तसंघर्ष

गेल्या 20- 25 वर्षांत जळगाव शहरातील गुन्हेगारी टोळ्यांची सशस्त्र दहशत पोलीसांच्या कणखर कारवाईमुळे संपुष्टात आली आहे. टोळ्यांच्या म्होरक्यांनीही स्थानिक स्वराज्य, सहकारी, शिक्षण आणि काही क्रीडा संघटनांमध्ये कारभारीपदे मिळविल्यामुळे त्यांचे लोकदर्शन सभ्यतेचा मुखवटा घालून होत आहे. असे पांढरपोषाखी पुढारी पोलीसांच्या प्रतिबंधात्मक कारवाईला घाबरतांना दिसतात. हा धाक निश्चितच कायद्याचाच आहे. मात्र, एप्रिल 2012 मध्ये एकमेकांवर सशस्त्र हल्ल्याच्या घडलेल्या काही घटना पाहता गुन्हेगारीपटावर दुसर्‍या पिढीचा रक्तसंघर्ष सुरू झाला की काय?  अशी शंका येते. नव्या गुंडाराजचा हा बाका प्रसंग ओळखून पोलीसांनीही दंडाराज अस्तित्वात आहे, हे दाखवून द्यायलाच हवे...

सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता राम गोपाल वर्माने मुंबईतील गुन्हेगारी विश्र्वातील वास्तव ‘सत्या’ या
गुन्हेगारीपटातून प्रत्ययकारी पद्धतीने मांडले आहे. या चित्रपटातील लक्षात राहणारे एक दृश्य  आहे. गुंड भीकू म्हात्रे समुद्र किनार्‍यावरील उंच इमारतींच्या पार्श्र्वभूमीवर उभा राहून सहकार्‍याला विचारतो, ‘मुंबईका किंग कौन’...आणि जोरात हसत स्वतःच म्हणतो...भीकू म्हात्रे.
जळगाव महानगरात आज कोणताही कधीकाळी नामचिन म्होरक्या स्वतःला भीकू म्हात्रे समजून, जळगावचा किंग कौन? असे विचारेल तर...उत्तर देण्याची हिंमतही त्याचा पंटर करू शकणार नाही. कारणच तसे आहे.
1980 पासून गेल्या 30- 31 वर्षांत जळगावमधील अनेक टोळ्यांच्या म्होरक्यांनी राजाश्रय घेऊन स्वतःचे उखळ शब्दशः पोषाखे आणि अर्थकारणातून पांढरे करून घेतले आहे. कधीकाळी दारू गाळणारे, रेल्वेच्या वॅगनमधून कोळसा चोरणारे, रेल्वेचे भंगार पळवणारे, सट्टा- मटका चालविणारे, वैश्यांकडे मौजमजेसाठी येणार्‍या शौकीनांना लुबाडणारे असे सारेच्या सारे टोळीप्रमुख आज राजकिय झूल पांघरून दादा, भाई, नाना, आबा, तात्या, काका, बाबा झाले आहेत. यातील काही जणांची हातात पाटी घेतलेली छायाचित्रे त्यावेळी शहर, जिल्हा, शनिपेठ पोलीस ठाण्यांमधील दर्शनी फलकांवर होती.
या टोळीप्रमुखांना विविध राजकीय पक्षांनी पद आणि प्रतिष्ठा दिली. कोणताही नेता किंवा पक्ष त्याला डावा- उजवा अपवाद नाही. जळगावच्या स्थानिक राजकारणात सत्तेचे आणि पैसा कमावण्याचे साधन झालेल्या पूर्वीच्या नगरपालिका आणि आताच्या महानगर पालिकेत स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून जवळपास सर्वच टोळीप्रमुखांचे दलबदल, निष्ठाबदलाचे अनेक अध्याय पूर्ण झाले आहेत. एकमेकांच्या गटात आणि गोटात येणार्‍या- जाणार्‍या प्रत्येकाचे पायघड्या घालून स्वागतच मान्यवर नेत्यांनी केले आहे.
गुन्हेगारांना प्रतिष्ठा मिळवून देणार्‍या इतिहासाची पाने चाळली तर अनेकांच्या रक्ताळलेल्या हातांचे चारित्र्य समोर येते. असे म्हणतात, वाईट इतिहास फार उगाळू नये. मात्र, वर्तमानाच्या पानांवर भविष्यातील चुकांचे काही डाग पुन्हा नजरेस पडत असतील तर परखड लेखणीच्या प्रहाराने ते कृत्य रोखण्याचा प्रयत्न व्हायलाच हवा. हाच हेतू या लेखनामागे आहे. कोणत्याही मान्यवराचा मानभंग करण्याचा हा प्रयत्न नव्हे किंबहुना तसे कोणाला वाटले तर आडनावातील साधर्म्यमुळे निर्माण झालेला तो केवळ योगायोग समजावा.
जळगावच्या गुन्हेगारी पटावर रक्ताळलेल्या कहाण्यांमध्ये प्यादे नेहमी लेवापाटील, कोळी, मेहतर, परिट (धोबी), मुस्लिम समाजाचे राहिले आहेत. यात काहींचा संघर्ष हा दुसर्‍या समाजातील म्होरक्यांशी झाला आहे, तसेच स्वतःच्या समाजातूनही त्यांना आव्हान मिळाले आहे. या सार्‍या कहाण्या तिहेरी संघर्षांच्या आहेत. तिसरा संघर्ष हा पोलीसांशी झाला आहे.
1980 च्या आसपास जळगावमध्ये काही भागात ठराविक म्होरक्यांची दादागिरी होती. एम. जे. कॉलेज परिसर हाही एक भाग होता. तेथे खडके- कोल्हे यांचे नाव घेतले जायचे. या म्होरक्यांना विधायक विरोध ऍड. बबन बाहेती करायचे. कबड्डीच्या मैदानातूनही या म्होरक्यांचा संघर्ष रंगायचा. काट्याफईल भागात मलिक यांचे नाव चालायचे. शनिपेठेत ढंढोरे होते. गांजा- भांग विक्रीत काळे तसेच सट्टा- बेटींग व गावठी दारूच्या विक्रीतही काळे होते. यापैकी काही मंडळी रेल्वेतील मालाची उचलेगिरी करीत. काही मौजमस्ती करणार्‍यांना लुबाडत. कोणाच्या लॉजवर जुगाराचे खेळ चालत. काहीजण अक्षरशः 10- 20 रुपयांसाठी भांडत. जिल्हा रुग्णालय आणि सिंधी कॉलनी भागाकडे शिरसाळे, चांगरे, सोनवणे, सपकाळे, पांचाळ यांच्या नावांची चलती होती.
एकमेकांचा भाग सोडून कोणीही दुसर्‍या ठिकाणी दादागिरी करीत नसत. बहुधा ते अलिखीत सामंजस्य होते.
याच काळात एम. जे. कॉलेजमधील बलात्कार प्रकरण गाजले. मोर्चे, सभा आदी आंदोलनांच्या माध्यमातून आलेल्या नागरी दबावामुळे पोलीसांनी गुन्हेगारांना गजाआड केले. जळगावच्या गुन्हेगारी इतिहासातील हा पहिला काळा अध्याय ठरतो.
यात आरोपी असलेल्या संशयितांनी नंतर बाहेती यांच्यावरही हल्ला केला. त्यात जगदीश जोशीचा बळी गेला. कालांतराने कोल्हे- बाहेती हे एकमेकांच्या जवळही आले. आज दोघेही पडद्याआड गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या दुसर्‍या पिढीचा कोणताही संघर्ष नाही.
नंतरच्या काळात शनिपेठेतील वर्चस्वातून मेहतर समाजातील ढंढोरे - चांगरे यांचे संघर्षाचे बीज पेरले गेले. आजही ही धुसफूस आहेच. ढंढोरे यांनी रेल्वेस्थानकाजवळ मानसिंग यांचा निर्घृणपणे खून केला. त्यानंतर आजपर्यंत दोघांचाही एकमेकांवर विश्वास नाही. ढंढोरे यांना गृहकलहला सामोरे जावे लागले. ढंढोरे आणि चांगरे मंडळीही काही काळ राजकारणातून बाहेर फेकली गेली.
त्यानंतरच्या काळात शिरसाळे, पांचाळ, सपके आणि सोनवणे यांच्यातील वैमनस्याचा अध्याय लिहीला गेला. या टोळ्यांनी एकमेकांना संपविण्याचा चंगच बांधला. शिरसाळे - पांचाळ यांच्या समर्थकांवर सोनवणे मंडळींनी हल्ले केले. त्यानंतर नव्या भिकमचंद जैन व्यापारी संकुलाजवळच्या दर्गाशेजारी शिरसाळे- पांचाळ व सपके यांच्या टोळीने तत्कालिन नगरसेवक शालिक सोनवणे यांचा अत्यंत निर्दयपणे खून केला. या घटनेनंतर जळगावच्या गुन्हेगारी संघर्षांची कथा राज्यस्तरीय वृत्तपत्रातूनही रंगली होती.
जळगावच्या गुन्हेगारी विश्र्वात शिरसाळे विरोधात सोनवणे, सोनवणे विरोधात ढंढोरे, सोनवणे विरोधात सोनवणे, भोईटे विरोधात सोनवणे अशा संघर्षांची अनेक प्रकरणे आहेत.
सोनवणे टोळीने एका दवाखान्यात घुसून शिरसाळे गटाच्या सुनील पाटील याचा निर्दयप़णे खून केला होता. यावेळी सोनव़णेे गटाच्या एका म्होरक्याने स्वतःजवळच्या पिस्तुलातून गोळीबार केला होता. नंतर या मंडळींनी गुन्हेगारी विश्वातून स्वतःला अलगद बाजूला करीत कार्यक्षेत्र बदलून घेतले.
क्रिकेटच्या भांडणातून (चर्चेतील कारण) डॉन सोनवणे कंपनीने ढंढोरे टोळीचा युुवा म्होरक्या बापू याचा मध्यप्रदेशातील शिरवेलजवळ अक्षरशः मुडदा पाडला. हे प्रकरण त्यावेळी संपूर्ण राज्यभर गाजले. बापूच्या अंत्ययात्रेला हजारोंची गर्दी झाली होती. त्यावेळचे अनेक गावगन्ना पुढारी या अंत्ययात्रेत सहभागी होते. बापू हा समाजसेवक नव्हता. जळगावमधील एम. जे. कॉलेज, बांभोरी महाविद्यालयसह सेंट्रल फुले मार्केट ही त्याच्या गुन्हेगारीची व हप्तावसुलीची ठिकाणे होती. मित्र आणि शत्रूसोबत क्रूरपणे वर्तवणुकीच्या त्याच्या कहाण्या आजही अंगावर शहारे आणतात.
सिंधी कॉलनी लगतच्या वार्डातील राजकीय वैमनस्यातून चांगरे- शिरसाळे गटात सतत धुम्मस सुरू असायची. यातून राजकीय पराभवाचा वचपा काढण्यासाठी चांगरे टोळीने शिरसाळे गटाचा मोहरा बापू बाविस्कर याला खोटेनगर जवळच्या एका हॉटेलजवळ हल्ला करून संपविले. त्यानंतर शिरसाळे कंपनीही थंडावली. आणि नंतर राजकारणातून बाहेर फेकली गेली. म्होरक्यासह पत्नीलाही पराभूत व्हावे लागले.
पालिका निवडणूक वादातून सोनवणे टोळीने रणजित भोईटे यांचा प्रेमनगर रेल्वेगेटजवळ निर्घृणपणे खून केला. भोईटे यांच्या पत्नीने सोनवणे यांच्या आईचा पराभव केल्याच्या रागातून सोनवणेंच्या दुसर्‍या पिढीतील युवा म्होरक्याने ही कामगिरी बजावली.
निवडणुुकीच्या वादातूनच सोनवणे टोळीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी रमेश सोनवणे यांचा बळी घेतला. येथेही सोनवणे यांच्या दुसर्‍या पिढीतील युवा म्होरक्यानेच सुपारी तडीला नेली.
वरील सर्व ठळक घटना इतिहासाच्या पानातून गुन्हेगारी प्रवासाचे वास्तव सांगत असताना एक बाब आणखी ठळकपणे जाणवते. ती म्हणजे, 1980 नंतर जळगावमधील अनेक म्होरक्यांनी पालिकेच्या राजकारणात प्रवेश केला. त्यांच्या निवडून येण्याच्या मेरिटवरून त्यांना राजकीय नेत्यांनी उमेदवारी दिल्यात. अनेक जण निवडून आलेत. कालांतराने महिला आरक्षण आल्यानंतर काही म्होरक्यांनी पत्नीसह राजकारणात श्रीगणेशा केला. जळगावच्या मतदारांनी या मंडळींना येन केन प्रकारे स्विकारले, हेही वास्तव इतिहासाच्या पानातून दिसते.
जळगावच्या राजकारणात गल्लीतला पराभव पाहण्याचा इतिहासही आमदार सुरेशदादा जैन यांच्या नावावर लिहीला गेला. खोटेनगर, जिल्हा दूध संघाचा भाग असलेल्या भागातून दादांना 400 मतांनी पराभूत व्हावे लागले.
 गुन्हेगारी पटावरील अनेक म्होरक्यांचे राजकारणात पुनर्वसन केल्याचा आरोपही आ. दादांवर होतो. अर्थात, याला दुसरीही बाजू आहे. ती म्हणजे, आ. दादांनी गुन्हेगारांना राजकारणात आणल्यामुळे काही वर्षे जळगावातील गुन्हेगारी थांबली असेही म्हटले जाते. जळगावात सर्व सामान्यांच्या पोरीबाळी सुरक्षित फिरू शकल्या यामागे आ. दादांचीच रणनिती यशस्वी झाल्याचा उल्लेख केला जातो.
जळगाव पालिकेच्या राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी अनेक म्होरके छुटपूट गुन्हे करून खंडणीच्या माध्यमातून पैसा मिळवित. मात्र, नगरपालिकेच्या आणि त्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून गटारी, रस्ते, स्वच्छता, डेली वसुली आदी विकास कामांचे ठेके घेऊन म्होरक्या मंडळींची आर्थिक स्थितीही उत्तम होत गेली. कालांतराने ही मंडळी बिल्डर झाली. काहींनी मध्यप्रदेशात जाऊन व्यवसाय वाढविला. कधीकाळी गल्लीबोळात छोट्या खोल्यांमध्ये राहणारे म्होरक्यांचे कुटूंब मध्यवस्तीत अभेद्य सुरक्षेच्या बंगल्यांमध्ये राहायला आले. काहींनी भीतीपोटी मोहल्ले आणि बंगले बदलले.
मध्यंतरी महापालिका आणि जिल्हा बँकेतील व्यक्तीगत संघर्षांतून वाळू लिलावाच्या आर्थिक सुबत्तेकडे सभ्य पुढार्‍यांचे लक्ष गेले. खरे तर वाळू लिलावाचे ठेके हे टोळ्यांचे ठराविक म्होरकेच घेत असत. मात्र, एकमेकांना संपविण्याच्या इर्षेतून कोणी शेअर बाजारातील पैसा, तर कोणी सोने व्यवसायातील पैसा यात लावला. वाळूच्या सुबत्तेत अनेक वाटेकरी उभे राहिले. गुन्हे विषयक वर्चस्वाला हे नवे क्षेत्र मिळाले.
राजकारणाच्या या उंबरठ्यावर  जैनांनी सोनवणेंशी, सोनवणेंनी खडसेंशी, काळेंनी जैन नंतर पुन्हा खडसेंशी, सोनवणे यांनी पुन्हा सोनवणे यांच्याशी जमवून घेतले. एकमेकांना राजकारणात प्रतिष्ठा देण्यासाठी सहकार्यही केले.
गुन्हेगारी क्षेत्रातील ही मंडळी सभ्यतेचा मुखवटा घालायला लागल्या पासून काहीजण समाजिक काम करायला लागले. काही नियमित हजला जायला लागले. काही शिर्डीच्या साईंचे भक्त झालेत. मंदिराच्या भंडार्‍यासाठी देणग्या देऊ लागले. महिला- परितक्त्यांना आर्थिक मदत देऊ लागले. समाजात त्यांना प्रतिष्ठा मिळाली. काहींनी सामूहिक विवाहात पुढाकार घेतला. काहींनी शिक्षण संस्था काढल्या. काही क्रीडा क्षेत्राचे तारणहार बनले.
जळगावच्या गुन्हेगारी क्षेत्राचे गेल्या 20- 30 वर्षांत शांततेने पुनर्वसन झाल्याचे वाटत असताना एप्रिल 2012 मध्ये पुन्हा गुन्हेगारीविषयक घटनांनी उचल खाल्ली. टोळ्यांच्या म्होरक्यांची युवा पिढी सक्रिय झाल्याचे अनेक घटनांमधून दिसले. कोल्हे कुटूंबातील ललित, ढेकळे कुटूंबातील मधुकर, सपकाळे कुटूंबातील राजेश (बाबू), मलिक कुटूंबातील सईद आणि नंतर नईम, सोनवणे कुटूंबातील अक्षय, हटकर कुटूंबातील कैलास यांची नावे आज विविध घटनांमध्ये चर्चेत आहेत किंवा सं़शयित म्हणून आहेत.
दुसर्‍या पिढीतील ही मंडळी वाड- वडिलांनी प्रयत्नपूर्वक सोडलेल्या दहशतीच्या व टोळी युद्धाच्या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना वेळीच पोलीसांनी रोखायला हवे.
गेल्या 20- 25 वर्षांत जळगाव शहरात पोलीस अधीक्षक म्हणून काम करणार्‍या पी. डी. भाल,  अरूण पटनायक, दीपक जोग, दिलीप श्रीराव, रश्मी शुक्ला, भूषणकुमार उपाध्याय, कुलवंत कुमार, संतोष रस्तोगी, सुनील फुलारी, प्रवीण साळुंखे, दिलीप सावंत, सारंग आव्हाड, कैसर खालिद आदींनी आपल्या निस्पृह कामाचा ठसा उमटवून गुन्हेगारी टोळ्यांच्या कारवायांना पायबंद घातला. यात, पोलिसींग कार्यपद्धतीही गुन्हेगारांवर वरचढ ठरली. आज त्याच कार्यशैलीची पुन्हा गरज निर्माण झाल्याचे दिसत आहे. ही शैली पुन्हा जळगावातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळू शकेल.

दादानिर्मूलन कायदा प्रभावीपणे राबवावा...

झोपडपट्टीदादा निर्मूलन कायद्याची (एमपीडीए) प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याचे उदाहरण जळगाव शहरातले आहे. शिक्षण क्षेत्राला वेठीस धरू पाहणार्‍या काही मंडळींना या कायद्याने सळो की पळो करून सोडले आहे. याच कायद्याचा धाक दाखवून राजकीय पक्षाचा म्होरक्या मालपुरे, माजी महापौर सपकाळे यांच्यावरही कारवाई सुरू झाल्याची चर्चा आहे.

No comments:

Post a Comment