Saturday, 4 April 2015

निवडणुकीपुरता सुरेशदादा आपला माणूस!

जैन समर्थकांची अवस्था सध्यातरी कोणता झेंडा घेवू हाती

ळगाव मनपाच्या घरकुल प्रकरणात जळगावचे आमदार व नेते सुरेशदादा जैन हे गेल्या दोन वर्षांपासून तुरूंगात असल्याची आठवण काल पासून तीव्रतेने होत आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणूकपूर्व मेळावा घेण्यासाठी काल जळगावात आले होते. त्यांनी कार्याकर्त्यांच्या मेळाव्यात जाहीरपणे सांगितले की, सुरेशदादा आपला माणूस आहे, त्याला राज्यातल्या कॉंग्रेस आघाडी सरकारने तुरूंगात डांबले आहे...त्यानंतर ठाकरे हे जैन कुटुंबियांच्या भेटीसाठी त्यांच्या घरीही गेले...तेथे त्यांची खातरदारी झाल्याचेही फोटो आणि वर्णन छापून आले आहे...

सुरेशदादा गैरव्यवहाराच्या एका संघटीत गुन्ह्यात तुरूंगात आहेत. त्यांना हृदयाचा आजार असून अवघड शस्त्रक्रियाही झाल्या आहेत. वाढत्या वयामुळे इतरही आजार आहेत. माणुसकी आणि सहानुभूतीचे तत्व विचारात घेता सुरेशदादांची आता जामीनावर सुटका व्हावी हे मत कोणीही संवेदनशिल माणूस व्यक्त करेल. पण, कायदा आणि न्यायालयीन प्रक्रिया माणुसकी, सहानुभूती आणि संवेदना यावर चालत नाही. ती चालते कायदा, पुरावे आणि कागदावरील माणसाचा इतिहास यावर.

सुरेशदादांवर न्यायालयीन प्रक्रियेत व्यक्तिशः काय आरोप आहेत, पोलिसांनी कोणते पुरावे दिले आहेत, ते किती गंभीर आहेत, सुरेशदादांचा कागदावर इतिहास काय आहे आणि न्यायाधिश त्यावर काय विचार करतात? यावर आपण चर्चा करणार नाही. आपला मुद्दा आहे तो हाच की, शिवसेनेच्या नेत्यांना तब्बल दोन वर्षांनी आपला माणूस तुरूंगात डांबलेला आहे, याची आठवण उशीरा यावी हाच.
गेल्या दोन- तीन महिन्यांत दोन निवडणूक झाल्या. पहिली लोकसभेची. त्यानंतर विधान परिषदेच्या जळगाव मतदार संघाची. आता माहौल आहे तो तिसर्‍या निवडणुकीचा. ती आहे विधानसभेची. ऑक्टोबरमध्ये मतदान आहे. या तीनही निवडणुकांच्या निमित्ताने अपवाद वगळता जवळपास सार्‍याच राजकिय पक्षांनी राजकिय लाभ घेण्यासाठी सुरेशदादांना आपला माणूस म्हटल्याचे ठळकपणे लक्षात येते. केवळ असाहय्यता, अपरिर्हाता यातून जैन कुटुंबिय आणि जैन समर्थकांना हे तातुरपरते आपलेपण स्वीकारावे लागलेले दिसत आहे.
थोडे मागे जावू या. माजी आमदार मनिष जैन यांनी जळगावमध्ये कापूस परिषद घेतली होती. या परिषदेला कॉंग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आले होते. मनिष जैन यांनी कॉंग्रेसवासी होत सहयोगी सदस्यपद स्वीकारले होते. या कार्यक्रमच्या व्यासपिठावर खान्देश विकास आघाडीचे नेते रमेश जैन होते. कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची माळ आपल्या गळ्यात पडेल या अविर्भावात करीम सालारही फिरत होते. बहुधा जैन समर्थक मंडळी कॉंग्रेसवासी होणार, असेच चित्र होते. मुख्यमंत्र्यांनी सुरेशदादांना आपला माणूस म्हटले असावे, असे भासवणारे हे पहिले चित्र होते. उंबरठ्यावर निवडणूक होती जळगाव मनपाची. हवा अशी होती की, जैन मंडळी कॉंग्रेसचा झेंडा हाती घेवून ही निवडणूक लढवणार. रमेश जैन यांनी मनपाच्या अडचणींचे गार्‍हाणेही मुख्यमंत्र्यांच्यासमोर मांडले. नंतर मुंबईत सुद्धा मनपा निवडणुकीवर खलबते झाली. जळगावमधील जैनांच्या थिंक टॅन्कने कॉंग्रेसवासी होण्याचा प्रस्ताव फेटाळला. मनिष जैन परदेशवारीवर निघून गेले.
त्यानंतर लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजीमंत्री डॉ. सतीश पाटील धुळ्याच्या कारागृहात जावून सुरेशदादांचा आशीर्वाद घेवून आले. सुरेशदादांनी मला आपला माणूस म्हटले, असे चित्र त्यांनी उभे केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्याशी जुळवून घेण्याची खलबते झाली. कॉंग्रेसचे सहयोगी सदस्यपद स्वीकारणार्‍या मनिष जैन यांनी रावेरच्या उमेदवारीसाठी आमदारकी फुकट घालवली. त्यांचे पिताश्री खासदार ईश्‍वरलाल जैन यांनी राष्ट्रवादीची रावेरची उमेदवारी मुलासाठी मागून जळगावमध्ये डॉ. सतीश पाटील यांच्यासाठी खान्देश विकास आघाडीकडे पाठींबा मागितला. जैनांच्या  थिंक टॅन्कने आपले वजन राष्ट्रवादीच्या पारड्यात टाकले. जळगावच्या दौर्‍यावर असलेल्या शरद पवारांच्या सभेत पुन्हा रमेश जैन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या व्यासपिठावर दिसले. या सभेच्या एका फोटोत व्यासपिठावर श्री. पवार हे रमेश जैन यांना उभ्यानेच काही तरी निग्रहाने सांगत असल्याचे आढळून आले होते. बहुधा ते सुरेशदादा आपला माणूस, असेच म्हणत असावेत. खाविआने आपला पाठींबा राष्ट्रवादी कॉंग्रेसला दिला होता पण जळगावकरांनी भरभरून मते अबकी बार मोदी सरकारला दिली. एक घटना यानंतर घडली. ती म्हणजे, राष्ट्रवादीचे मुंबईतील नेते ऍड. मजिद मेमन हे घरकुल घोटाळा प्रकरणात सुरेशदादांचे वकील म्हणून उभे राहीले. अर्थात, ते सुद्धा जामीन मिळवून देवू शकले नाहीत.
यानंतर विधान परिषदेच्या जळगाव मतदार संघाची निवडणूक झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारीबाबत आत्मघात केला. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मोठ्या खुबीने मैत्री आणि स्नेहाचे संबंध जपत निवडणूक बिनविरोध करून घेतली. खाविआच्या नेत्यांनी माघार घेत गप्प राहणे पसंत केले. पहिल्यांदा विधान परिषदेसाठी भाजपचे गुरूमुख जगवानी बिनविरोध निवडले गेले.
आता विधानसभेची निवडणूक उंबरठ्यावर आहे. शिवसेनेला जळगाव शहरासह जिल्ह्यातील इतर मतदार संघातील जागांवर आपले वर्चस्व सिद्ध करायचे आहे. युतीला सर्वच्या सर्व ११ जागा निवडून आणायच्या आहेत. यात भाजपच्याही जागा आहेत. त्यामुळे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलेली महायुतीसाठीची व्यूहरचना योग्य आहे. सुरेशदादांचे दीर्घकाळ तुरूंगात असणे बहुतांश जळगावकरांना मान्य नाही. सुरेशदादा बाहेर यावेत हीच अपेक्षा अनेकांची आहे. अशावेळी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सरकार सुरेशदादांना तुरूंगात डांबून ठेवत आहे, हा मुद्दा प्रचारासाठी सोपा आणि लोकांच्या भावनांना हात घालणारा ठरतो. अर्थात, राष्ट्रवादी कॉंग्रेसचाही एक मोहरा याच आरोपातून तुरूंगात आहे, याकडे दुर्लक्ष करता येत नाही. ठाकरेंनी सुरेशदादांच्या संदर्भातील हाच मुद्दा पकडला आहे. म्हणून कालच्या त्यांच्या दौर्‍यातील राजकिय जाहीर भाषण आणि त्यांचे सुरेशदादा जैन यांच्या निवास्थानी जाणे या गोष्टी पूर्णतः  ठरवून रचलेल्या वाटतात. ठाकरे यांच्या सभेच्या व्यासपिठावरही रमेश जैन उपस्थित होते.


आपल्या पक्षाच्या नेत्याला होणार्‍या त्रासाबद्दल नेत्यांनी बोलायलाच हवे. बाजूही घ्यायला हवी. उद्दव ठाकरे यांच्या बाबतीत घडले असे की, त्यांनी सुरेशदादांना आपला माणूस म्हणायला दोन वर्षांचा उशीर केला. शिवसेनेने सुरेशदादांच्या समर्थनाची भूमिका म्हणून या विषयाचा कधीच पाठपुरावा केला नाही. काही महिन्यांपूर्वी शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील व इतरांनी सुरेशदादांवरील अन्यायाबाबत विधी मंडळाच्या बाहेर वक्तव्य केल्याचे आठवते. शिवसेनेच्या कुठल्यातरी कार्यक्रमात संपर्क नेत्यांनी सुरेशदादांची बाजू घेतल्याची पुसटशी आठवण आहे. मुखपत्रातूनही अग्रलेखात काही संदर्भ प्रसिद्ध झाले आहेत. जळगावमधील शिवसेनेचे काही कार्यकर्ते सुरेशदादांच्या मुक्तीसाठी उघडपणे फलकबाजी करीत असतात. या सार्‍यांच्या भावनांचा सन्मान आहेच. फक्त राहून- राहून एकच गोष्ट खटकते, सुरेशदादा सर्वांना हवे आहेत ते केवळ निवडणुकीच्या लाभापुरतेच!

(सुरेशदादांच्या जामीनावर सुटकेच्या संदर्भातील इतरांचे विचार वेगळेही असू शकतात. अशा वेगळ्या विचारांचे, सडतोड मांडणीचे तरुण भारतच्या व्यासपिठावर निश्‍चित स्वागत आहे. आपले म्हणणे लगेच लेखी स्वरुपात मुख्य संपादक यांच्या नावे पाठवा)

No comments:

Post a Comment