Saturday 4 April 2015

कारभारी दमानं !

जामनेर तालुक्यातील जनतेचे आमदार गिरीश महाजन सध्या राज्याचे जलसंपदामंत्री आहेत. महाजन यांना ‘भाऊ’ सुद्धा म्हणतात. जामनेरकरांमध्ये ‘टपरीवरचा आमदार’ किंवा ‘बुलेटवाला आमदार’ अशीही महाजन यांची ओळख आहे. ती वर्षानुवर्षे आहे आणि राहील सुद्धा. महाजन यांना मंत्रिपदाची शपथ देवविताना राज्यपालांनी महाजन यांच्या मुखातून ‘माझे शुद्ध आणि सद्विवेकी आचरण’ राहिल असे जाहीरपणे वदवून घेतले आहे. याशिवाय, ‘कायद्याद्वारे स्थापित राज्याचा मी घटक असेन, त्याचे पालन करीन,’ असेही महाजन यांनी शपथेवर म्हटले आहे. त्यामुळे मंत्री म्हणून आपले सार्वत्रिक ‘वर्तन’ आणि व्यक्तिगत ‘वागणूक’ याच्याशी संबंधित आचरणाविषयी ‘मंत्री महाजन’ यांना गंभीर व्हावेच लागणार आहे. राज्याच्या या कारभार्‍याला ‘कारभारी दमानं’ असे सांगण्याची ही वेळ आहे...

लोकशाही व्यवस्थेच्या रचनेत मंत्री, त्यांचे सचिव, खात्याचे अधिकारी-कर्मचारी यंत्रणा आणि लाभ, सुविधांचा हक्क असलेली जनता यांचा संबंध कसा असावा? त्यांची परस्परांवर अवलंबित कार्यपद्धती काय असावी? याविषयी प्रशासनाचे विविध ‘मॉडेल’ आहेत. त्यातील कोणते आदर्श आणि कोणते अनुपयोगी यावर आपल्याला चर्चा करायची नाही.
सरकारी यंत्रणेत कोणाची भूमिका काय असावी? हा आपला मुद्दा आहे. मंत्रालयाचा प्रमुख त्या त्या खात्याचा मंत्री असतो. त्याच्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी सचिव असतो. सूचना गावपातळीवर, लाभार्थ्यांपर्यंत पोहचवायला इतर अधिकारी-कर्मचारी असतात. ही रचना कार्यालयांंतर्गत प्रशासनाची झाली.
हेच प्रशासन बाहेरही काम करीत असते. तेथे प्रशासनाचा प्रमुख सचिव असतो. त्याच्या नियंत्रणात इतर प्रशासन यंत्रणा काम करते. कार्यालयाच्या बाहेर मंत्री हा प्रशासनाचा सल्लागार असतो. तो जाहीरपणे कोणतीही भूमिका, आदेश, निर्णय, पक्ष, समर्थन देवू किंवा घेवू शकत नाही.
थोडक्यात बाहेरील क्षेत्रात मंत्र्याचा रोल हा ‘कृष्णाचा’ असतो. तो कसा हेही लक्षात घेवू. सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचविणे म्हणजे रणभूमिवरचा संघर्ष. तेथे सारेच लाभार्थी आहेत. ते आपले किंवा परके आहेत. या रणभूमित ‘सरकारी यंत्रणा आणि लाभाच्या योजना’ म्हणजे प्रशासनाचा रथ. या रथावरून प्रशासनाला कार्यक्षम करण्याची सूत्रे आहेत ती प्रशासनाच्या हातात. म्हणजेच, प्रशासनाचा प्रमुख सचिव हा ‘अर्जूनाच्या’ भूमिकेत. रथावर पुढे सारथी म्हणून बसलेला त्या खात्याचा मंत्री आहे ‘कृष्णाच्या’ भूमिकेत. कृष्ण लढाईपूर्वी कार्यालयात युक्तीच्या चार गोष्टी सांगू शकतो. पण, रणांगणात थेट ‘शस्त्र’ हातात घेवू शकत नाही. कारण त्याने शपथ घेतली आहे, ‘न धरी शस्त्र करी, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार’. महाभारताच्या युद्धात ही शपथ विसरून कृष्ण हा अर्जुनाच्या प्रेमापोटी मोडलेल्या रथाचे चाक उचलून एकदाच भिष्मावर धावून गेला. युद्धातील प्रसंगाचे वर्णन टीपणारा माध्यम म्हणून तेव्हा ‘संजय’ होता. त्याने ते टीपले आणि दृष्टीहीन धृतराष्ट्राला सांगितले. महाभारताच्या शेकडो पानांत लोकोपवादाचा तेवढा एक ‘आक्षेप’ आजही कृष्णाच्या नावावर आहे. मित्रप्रेमाच्या क्रोधातून किंवा अनावधानाने कृष्णाने शस्त्र हाती घेतले. त्यातून तो टीकेचा धनी झाला.
महाजनांचे ‘पिस्तूल’ प्रकरण
आता, विषय आहे तो मंत्री गिरीश महाजन यांचा. मूक-बधीर शाळेतील विद्यार्थ्यांच्या एका कार्यक्रमात महाजन हे भाषणासाठी उभे राहीले आणि त्यांच्या कमरेला खोचलेले पिस्तूल माध्यमांच्या नजरेला पडले. नंतर महाजनांच्या वर्तनावर आक्षेप घेणार्‍या छापिल, नेटवरील आणि दूरचित्रवाणीवरील अनेक बातम्यांचा जन्म झाला.
अर्थात, आपल्या नेहमीच्या आक्रमक स्वभावानुसार महाजन यांनी सुरूवातीला भूमिका घेतली की, ‘मी गेली २० वर्षे पिस्तूल बाळगतोय. माझ्याकडे परवाना आहे. मी आजपर्यंत त्याचा वापर केला नाही. त्या कार्यक्रमातही मी पिस्तूल बाळगले यात गैर नाही.’ महाजनांच्या मदतीला नंतर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सर्वांत ज्येष्ठ मंत्री एकनाथराव खडसेही धावून आले. महाजन यांनी जवळ पिस्तूल बाळगले यात गैर नाही, असे खडसे म्हणाले. पण, तसे ते सर्वांना दिसायला नको होते असा सल्लाही खडसेंनी दिला. महाजन यांच्या मदतीला नंतर मुख्यमंत्रीही धावून आले. विरोधकांनी जी काय पिसे काढायची ती काढलीच. विधीमंडळात एखाद्या मंत्र्यांच्या शस्त्र बाळगण्यावर चर्चा होते आणि मुख्यमंत्र्याला त्याचे समर्थन करावे लागते, हा तसा नामुष्कीचा प्रसंग आहे.
विधी (कायदा) द्वारा स्थापित राज्याचे आम्ही घटक असून त्याचे पालन करू असे मंत्रीपदाची शपथ घेताना मुख्यमंत्र्यासह प्रत्येक मंत्री जाहीरपणे म्हणत असतो. त्यानंतर मंत्री म्हणून काम करताना त्यांचे सार्वत्रिक वर्तन हे वरील विधानांशी प्रामाणिक असावे अशी जनतेची अपेक्षा असते.
पिस्तूल प्रकरणी कायदा काय म्हणतो?
महाजन यांच्या बाबतीत येथे कायद्याचे भान थोडे हरवलेले दिसते. महाजनांकडे शस्त्र परवाना आहे. त्यांचे शस्त्रही सरकार दप्तरी नोंदलेले आहे. आक्षेप याबाबत नाहीच. आहे तो, भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे पालन न केल्याबद्दल. या अधिनियमानुसार परवाना असलेले शस्त्रही शिक्षण संस्था, धार्मिक कार्यक्रम किंवा मिरवणुकीच्या ठिकाणी दिसणार नाही असे बाळगण्याच्या सूचना आहेत. शस्त्र नियम १९६२ सुद्धा हेच सांगतो. वरील ठिकाणी शस्त्र हे होलस्टर किंवा पाऊचमध्ये बाळगा असेच म्हटले आहे. हे अधिनियम पाहाता महाजन यांचे जाहीर खुलासे किंवा मुख्यमत्र्यांनी त्यांची घेतलेली बाजू ‘लंगडी’ ठरते.
अर्थात, पिस्तूल उघडपणे बाळगणे ही आपली चूक झाली हे सांगण्याचा ‘प्रांजळपणा’ महाजन यांनी नाशिक येथे एका वृत्तवाहिनीच्या वर्धापनदिन कार्यक्रमात दाखवला. पण, तेव्हा वेळ निघून गेली होती. हाच खुलासा संयमाने जळगावमधील माध्यमांच्या समोरच केला असता तर नंतर गहजब झाला नसता. माध्यमांनी पिस्तूल बाळगल्याबद्दल विनाकारण प्रकरण रंगवले असेही महाजन दोन-तीनदा म्हणालेे. येथे महाजन यांना सल्ला द्यावासा वाटतो. त्यांनी सार्वत्रिकरित्या वावरताना हेच भान ठेवायला हवे, की मंत्री म्हणून तुमचे घराबाहेरील वर्तन टीपण्याचे काम माध्यमांचे आहेच. ते ‘गैर’ वर्तन म्हणून टिपले जाणार नाही याची काळजी महाजन यांना स्वतःला घेता येईल. किंबहुना ते त्यांच्याच हातात आहे.
महाराष्ट्रात दुसर्‍यांदा सत्तेत आलेल्या युतीच्या भाजप नेतृत्वातील सरकारमध्ये महाजन यांना प्रतिक्षा करुनच मंत्रिपद मिळाले आहे. आमदारकीच्या पाचव्या टर्ममध्ये मंत्रिपद मिळणे म्हणजे तसा खुपच उशीर. पण, मंत्रिपदावर आल्यानंतर महाजन हे ‘वाचाळतेमुळे’ सतत चर्चेत राहीले आहेत.
पिस्तूल का बाळगता?
‘मी जनतेचा रस्त्यावरचा आमदार आहे,’ असे एकीकडे मोठ्याने सांगणार्‍या महाजन यांना मंत्रिपदाच्या पोलीस बंदोबस्तात पिस्तूल बाळगून का फिरावे लागते? त्यांना भय कोणाचे आहे? राज्यातील कायदा सुव्यवस्थेविषयी ते साशंक आहेत का? महाजनांवर कोणी हल्ला करू शकते का? की, महाजन जसे वेगवेगळ्या जॅकेटच्या प्रेमात पडतात तसे ते पिस्तूलच्याही प्रेमात पडले आहेत?  असे अनेक प्रश्‍न खोचकपणे विचारता येतात. पण आपल्याला ते विचारायचे नाही. कारण, महाजन हे जनतेचे आमदार आहेत आणि लोक त्यांच्यावर प्रेम करतात हे आपण मान्य करीत आहोत. हो परंतू, एक बाब चांगली दिसली नाही. ती म्हणजे, महाजन कमरेला पिस्तूल खोचून भाषण देत असताना त्यांच्या शेजारी जिल्हा प्रशासन प्रमुख कलेक्टर आणि पोलीस प्रशासन प्रमुख एसपी हे दोघे हात बांधून बसून होते.
खात्याची घोषणा केली स्वतःच
आता थोडा फ्लॅशबॅक पाहू. मंत्रिमंडळाचा पहिल्या विस्तारात महाजनांना मंत्रिपद मिळाले. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातून अधिकृतपणे खाते वाटप जाहीर व्हायचे होते. त्याच्या अगोदर महाजन यांनी ‘मला जलसंपदा खाते मिळाले’ हे माध्यमांना सांगून टाकले. एवढेच नव्हे तर, शपथविधीच्या ठिकाणाहून बाहेर निघाल्यानंतर त्यांनी घोषणाही करुन टाकली, की ‘कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळातील सिंचन घोटाळ्यांची चौकशी करणार’ म्हणून. येथूनच महाजन यांच्या ‘सैल वक्व्यांची’ कल्पना यायला लागली होती. मात्र, तेव्हा त्यांना कोणी टोकले नाही.
मंत्र्याची बुलेटवारी
जलसंपदामंत्री म्हणून जळगावात पोहचलेल्या महाजन यांनी रेल्वेस्थानक ते अजिंठा विश्रामगृह पायी जाणे पसंत केले. लोकांना वाटले, ‘रस्त्यावरचा मंत्री’ आहे. महाजन यांनाही तसे म्हणवून घेणे आवडते. दुपारी स्वगृही जामनेरला पोहचलेल्या महाजन यांचा बुलेटवर ‘रपेट’ करतानाचाही फोटोही आला. ‘बुलेटवाला आमदार’ ही ओळख कायम राहिली.
शंभर कोटींच्या लाचेचा गौप्यस्फोट
गंमत दुसर्‍या दिवशी आली. जामनेरला एका ऑईल मिलमध्ये महाजन यांचा मित्रमंडळींनी घरगुती स्वरुपात सत्कार ठेवला होता. तेथे महाजन जाहिरपणे म्हणाले, ‘राज्यात निधी अभावी सिंचनाची अकराशे कोटींची कामे मी थांबविली आहे. ती सुरू करण्यासाठी ठेकेदारांनी मला १०० कोटींची लाच देण्याचा प्रयत्न केला.’ नंतर हेच वक्तव्य महाजन यांनी मुंबईसह इतर ठिकाणी पुन्हा पुन्हा केले. हे करीत असताना, लाच देणे किंवा घेणे किंवा तसे सूचविणे, सूतोवाच करणे हा प्रकारही लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार अपराध आहे हेही महाजन विसरून गेले. मंत्र्याच्या असल्या चुकीचे भांडवल करण्यात विरोधक हुशार आहेत. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसवाले जास्तच हुशार. त्यांनी बरोबर महाजन यांच्या नार्कोटेस्टचा मुद्दा काढला. पुन्हा महाजन दोन-तीन दिवस याच विषयात गुंतून राहीले.
...तर मंत्रालयच रिकामे!
काही दिवसांपूर्वी हाच विषय विधीमंडळात मांडताना महाजन असेही म्हणाले की, ‘जलसंपदा मंत्रालयात भ्रष्टाचार्‍यांवर जर कारवाई करणे सुरू केले तर सर्व मंत्रालयच रिकामे होईल.’ आपल्याच मंत्रालयाविषयी महाजनांची वक्तव्ये जनतेला अचंबित करणारी आहेत. सार्‍या भ्रष्टाचार्‍यांचा गुण नाही पण वाण महाजन घेणार नाहीत ना? हीच तर आता चिंता आहे.
विधानसभाध्यक्षांकडून समज
महाजन यांच्या बाह्य वर्तनावर काही आक्षेप घेतले जात असताना सभागृहातील ‘विचित्र वर्तनाविषयी’ सुद्धा विधानसभाध्यक्षांनी महाजन यांना समज दिली. पारोळा - एरंडोल मतदार संघाचे आमदार डॉ. सतीश पाटील हे सभागृहात विषय मांडत असताना त्यांच्याकडे पाहून महाजन यांनी वेगळेच हावभाव केले असा आक्षेप आमदार डॉ. पाटील यांनी विधानसभाध्यक्षांकडे नोंदवला. असा प्रकार यापूर्वी कोणाच्याही बाबतीत घडलेला नाही.
हावभावसुध्दा आक्षेपार्हच
महाजन यांच्या हावभावांविषयी आमदार डॉ. पाटील यांनी नोंदविलेला आक्षेप खरा असल्याचे अनेकजण खाजगीत बोलतात. महाजन हे चार-चौघांत अधिकारी किंवा कार्यकर्त्यांशी गप्पा मारत असताना डोळे मिचकावणे, चिमटा काढणे, खांद्यावर मारणे असले प्रकार नेहमीच करतात. हे एखाद्या आमदाराला शोभत असले तरी मंत्र्यासाठी निश्‍चितच उचित नाही.
नाशिक जिल्हाधिकार्‍यांशी मनभेद
वरील सर्व घटनाक्रमातून महाजन अनुभवी होत जातील ही अपेक्षा आहे. पण, तसे अलिकडच्या वर्तनातूनही दिसत नाही. महाजन यांच्याकडे नाशिकचे पालकमंत्रीपद आहे. पुढीलवर्षी नाशिक आणि त्र्यंबकेश्‍वरला कुंभमेळा होत आहे. त्याच्या नियोजनाची विशेष जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी महाजन यांच्यावर सोपविली आहे. या नियोजनातही महाजन आणि तेथील जिल्हाधिकार्‍यांचे ‘मनभेद’ झाले. ‘जिल्हाधिकारी अपेक्षित काम करीत नाहीत,’ असेही महाजन जाहीरपणे म्हणाले. साधू-महंतही विविध कामांच्या पूर्ततेबाबत नाराज आहेत. त्यातही कोणा एका आमदाराच्या मध्यस्थीच्या कहाण्या माध्यमांमधून आल्या आहेत.
जलसंपदाचे अधिकारीही ऐकेनात
महाजन यांचे जलसंपदा मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी यांच्याविषयी काही ग्रह निश्‍चित आहेत. महाजन ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तेथील अधिकार्‍यांविषयी सुद्धा त्यांचे काही ‘विविक्षीत मत’ आहे. ही बाब कार्यक्षम प्रशासनात अडथळा ठरु शकते. याच अडथळ्यातून आता जलसंपदा विभागाचे अधिकारीही महाजन यांचे ऐकत नाही असा अनुभव येत आहे. नाशिक येथील सिंहस्थाची कामे वेळेवर होत नाही म्हणून तीन अधिकार्‍यांना निलंबित करणे किंवा मुख्य अभियंत्यास सक्तीने रजेवर पाठविणे असेही कटू निर्णय महाजन यांना वैतागातून घ्यावे लागले. असे प्रकार कार्यक्षम प्रशासनाचा भाग आहेत असे म्हणात येईल का? वरुन महाजन असेही म्हणतात की, ‘मी नाशिकला नेहमी येत नसलो तरी कामांवर माझे लक्ष आहे.’
शेतकर्‍यांची भेट टाळली
विषय फिरून महाजन यांच्या पालकमंत्रीपदाकडे येतो. मध्यंतरी नाशिक जिल्ह्याला गारपिटीचा फटका बसला. त्यावेळी महाजन यांनी जिल्ह्यात काही ठिकाणी धावत्या भेटी दिल्या. एका ठिकाणी संतप्त शेतकरी गोळा होवून आंदोलन करीत आहेत हे समजल्यानंतर महाजन यांनी तेथे जाणे टाळले. हे ‘टायमिंग’ साधून आमदार छगन भुजबळ तेथे पोहचले. त्यांनी संतप्त शेतकर्‍यांसमोर स्वतःची बाजू मांडत महाजन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तो झाला नाही. परंतू, प्रांताधिकार्‍यांनी महाजन यांच्याशी संपर्क केला असता तो सहज झाला. फोनवरून शेतकर्‍यांशी बोलत आश्‍वासने देवून महाजन यांनी वेळ मारून नेली. पण, पालकमंत्री आले नाही हा ठपका त्यांच्यावर कायम राहिलाच.
हा विषय संपत नाही तोपर्यंत जळगावमध्ये पिस्तूल प्रकरण घडले. त्यातील आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा अजूनही बसलेला नाही. महाजन यांच्यासारखा ‘जनतेचा नेता’ मंत्री म्हणून अनेक आरोपांच्या पिंजर्‍यात उभा दिसतोय. महाजन यांच्या मित्रांचे वर्तूळ तसे मोठे आहे. रस्त्यावरचा आमदार अशी प्रतिमा असल्यामुळे चहावाला, टपरीवाला, चप्पल दुरूस्त करणारा असा सामान्यातल्या सामान्य माणसांना ‘गिरीशभाऊंशी’ जिव्हाळा आहे.
‘प्रतिमा’ सुधारावी, ‘प्रतिष्ठा’ जपावी
नेत्याची ‘प्रतिमा’ सर्व सामान्य माणसाला आवडणारी असलीच पाहिजे किंतू, मंत्रिपदाचीही ‘प्रतिष्ठा’ सुध्दा जपली जाणेही आवश्यक आहे. ती प्रतिष्ठा जपण्याची जबाबदारी १० टक्के प्रशासनावर, दहा टक्के कार्यकर्त्यांवर असून किमान ८० टक्के स्वतः महाजन यांच्यावरच आहे. लोकप्रिय होताना व लोकहिताचे काम करताना प्रशासनाला ‘हो’ आणि व्यक्तिगत लाभांचे काम करताना कार्यकर्त्यांना ‘नाही’ म्हणण्याचे धाडस महाजन यांना करावेच लागेल. तसे होत गेले तरच पदाची ‘प्रतिष्ठा’ आणि लोकप्रियतेची ‘प्रतिमा’ टीकून राहील. म्हणूनच महाजन यांना सल्ला दिला आहे की, ‘कारभारी दमानं! होवू द्या दमानं !!’


लोकप्रियतेच्या मापदंडात बदल करावाच लागेल!

जामनेरकरांना महाजन यांच्याविषयी घरचा माणूस म्हणून जिव्हाळा आहे. सरपंच, सरकारशी भांडणारा आमदार आणि सत्तेत सामर्थ्यवान मंत्री असा महाजन यांचा राजकिय प्रवास आहे. महाजन सरपंच आणि आमदार असताना रस्त्यावर लोकांचे प्रश्‍न एकून घेत आणि सोडविण्यासाठी प्रयत्न करीत. म्हणून ते टपरीवरचा आमदार किंवा रस्त्यावरचा आमदार म्हणून प्रसिद्ध झाले.
मंत्रिपदावर विराजमान झालेल्या महाजन यांनी गांधीचौकातील सांडू बारी यांच्या नूतनीकरण झालेल्या पानटपरीचे उद्घाटन केले. अशाच प्रकारे एका बॅण्डपार्टीचेही उद्घाटन केले. यातून जनतेसाठी ‘मंत्री साधा’ आहे, हा संदेश गेला असला तरी टपरीतून दिल्या जाणार्‍या गुटखा, पान, तंबाखूमुळे भावी पिढीला सकारात्मक संदेश दिला जात नाही याचे भान मंत्री महाजन यांना बाळगावेच लागणार आहे. हे महाजन यांना कोण सांगू शकते?
संपूर्ण राज्यात रुग्णांना मदत करणारे आमदार म्हणूनही महाजन यांची ओळख आहे. जामनेरचा उल्लेख ‘मोतीबिंदूमुक्त तालुका’ म्हणून केला जातो. तसेच संपूर्ण राज्यात मूक-बधिरांना दत्तक घेवून त्यांच्या उपचारांची यंत्रणाही महाजन यांनी मुंबई ते गल्ली अशी उभी केली आहे.
महाजन तालुक्यातील बहुतांश लग्न, मृत्यू, वाढदिवस, स्मृतीदिन अशा कार्यक्रमांना उपस्थित राहातात. त्यांना शक्य नसेल तर पत्नी सौ. साधना या जातात. काही ठिकाणी मंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून छगन झाल्टेही हजेरी लावतात.
महाजन यांचे निवासस्थान किंवा कार्यालय हे न्याय-निवाड करण्याचेही ठिकाण आहे. भावा - भावांची भांडणे, सासू - सुनेतील वाद, शेताच्या बांधावर शेजार्‍यांमधील संघर्ष असे वाद - विवाद महाजन यांच्या मध्यस्थीने मिटतात.
महाजन यांच्या चांगुलपणाबरोबच त्यांच्या आक्रमकतेच्या कहाण्या नेहमी चर्चेत आहेत. जामनेर दंगल (सन २००२) च्या प्रसंगी महाजन - अप्पर पोलीस अधीक्षकातील वाद, जि.प. -पं.स. निवडणूक मतमोजणी वेळी महाजन-पोलीस निरीक्षकातील वाद, भारनियमन विरोधात महाजन-सहाय्यक अभियंता यांच्यात फोनवर झालेला वाद,  महाजन - शिवसेना नेत्याचा रेल्वेत रंगलेला वाद असे किस्से महाजन यांच्या जवळचे कार्यकर्ते रंगवून सांगतात. अशाच आक्रमकतेमुळे महाजन विधीमंडळातून दोन वेळा निलंबितही झाले आहेत.
कापसाच्या आंदोलनात ९ दिवस उपवास करून जिल्हा रुग्णालयात दाखल झालेले महाजनही संपूर्ण राज्याला माहित आहेत.
महाजन यांना वाद-विवाद का चिटकून आहेत, याचा शोध घेतल्यावर समजले की,  महाजन कुस्तीचे शौकीन आहेत. तरुणपणात तेही आखाड्यात उतरत. तीच ‘रग’ आज राजकारणात ‘मौखिक’ किंवा ‘कायिक’ वर्तनातून निघत असावी. महाजन आजही बुलेटवर फिरतात किंवा मोटारसायकलवर दुसर्‍याच्या मागे बसून फिरतात. पानटपरी किंवा चहाच्या टपरीवर उभे राहून गावभरच्या गप्पाही करतात. महाजन हे महाविद्यालयातही राजकारण करण्यासाठीच आले होते असे सांगण्यात येते. महाजन यांनी ११ वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता. पण, त्या शाखेत निवडणूक होत नाही म्हणून त्यांनी तो प्रवेश रद्द करुन वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. नंतर ते महाविद्यालयात जनरल सेक्रेटरी (जीएस) म्हणून विजयी सुद्धा झाले.
महाजन यांचा हा सारा प्रवास निश्‍चितपणे थक्क करणारा किंवा मसाला चित्रपटाच्या पटकथेसाठी उपयुक्त आहे. अर्थात, तशी पटकथा लिहून चित्रपट निर्माण झालाच तर तो ‘दाक्षिणात्य’ चित्रपट भासेल. कारण, कुस्ती खेळणारा, बुलेटवर फिरणारा, पिस्तूल बाळगणारा मंत्री, चाहत्यासाठी पायी फिरणारा पुढारी, अधिकार्‍यांना सुनावणारा, रुग्णांसाठी हळवा, गप्पामारताना ‘हावभाव’ करणारा असा ‘हिरो’ आज महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत नाही. तो दिसतो केवळ दाक्षिणात्य चित्रपटात. म्हणून मंत्रिपदावर असताना महाजन यांना लोकप्रियतेच्या काही मापदंडात बदल करावेच लागतील!

No comments:

Post a Comment