![]() |
Amir in Makkah |
![]() |
Amir with Mother at Mumbai Air Port |
![]() |
Amir In Makkah with Mother |
![]() |
Amir in Makkah after DARSHAN HOLY PLACE |
![]() |
Amir and Mother Praying |
![]() |
Amir At Makkah processing NAMZ |
‘पीकेचा पंचनामा’ हा लेख आणि नंतर सविस्तर पुस्तिका तयार करताना पीकेतील फसवा-दिशाभूल करणारा आशय आणि प्रेमाच्या त्रिकोणातील काही समाजिक प्रश्नांची मांडणी आम्ही केली होती. धर्म-कर्मकांड आणि देवादिकांचे अवडंबर याचे वरवरचे चित्रण असलेल्या पीकेत युवापिढीला पथ व मती भ्रष्ट करणाराही संदेश दिला गेला होता, हे आम्ही तटस्थपणे मांडले. धर्म-कर्मकांडाच्या विरोधात आम्हीही आहोत. श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या पुसटशा सिमारेषेत होणारी गल्लत आणि त्यातून होणारी सर्वसामान्यांची पिळवणूक आम्हालाही मान्य आहेच. म्हणूनच ‘ओएमजी’ चे समर्थन करताना आम्ही ‘पीके’ ला विरोध करतो. अंधश्रद्धेच्या बाजारूपणावर कथित प्रहार करताना अमीर-हिराणी-चोप्रा यांनी हिंदू मुलगी आणि पाकिस्तानातील मुस्लिम मुलगा यांच्या प्रेमाची रंगवलेली गोष्ट काही भावत नाही. असो, त्यावर सविस्तर लिखाण ‘पीकेचा पंचनामा’ या पुस्तिकेत केले आहे. पुन्हा विषयांतर येथे नको.
आपल्याला चर्चा करायची आहे ती अमीर-हिराणींच्या पडद्यामागील वर्तनाची. पीकेमधील आशयाला आक्षेप घेवून धर्म-देवादिकांच्या पुरस्कर्त्या मंडळींनी जेव्हा पीकेला विरोध सुरू केला तेव्हा अमीर-हिराणी यांनी प्रेक्षकांना चिंतनशील भासतील अशा प्रतिक्रिया दिल्या होत्या.
अमीर म्हणाला होता, ‘पीके निर्माण करणारे आम्ही सर्वजण सर्व धर्मांचा आदर करतो. माझ्या सर्व हिंदू मित्रांनी पीके पाहिला आहे. मात्र, त्यांना त्यात आक्षेपार्ह काहीही दिसत नाही.’ अमीर पुढे असेही म्हणाला होता,‘भारतात लोकशाही आहे. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही सर्वांच्या मत-मतांतराला सन्मान देतो. पीके हा चित्रपट कोणत्याही एका धर्मावर टीका करीत नाही. चित्रपटातील कर्मकांड विरोधातील संदेश हा संवेदनशिलपणे दिला आहे गदारोळ निर्माण करण्यासाठी नाही’
हिराणीही बोलले होते, ‘इतर लोक म्हणतात तसे आम्ही कोणावरही टीका करण्यासाठी मुद्दाम पीकेची निर्मिती केलेली नाही. पीके चित्रपटातील मध्यवर्ती कल्पना अशी आहे की, माणूस जन्मतः कोणताही धार्मिक ट्रेडमार्क जसे हिंदू, मुस्लिम, शिख, ख्रिश्चन घेवून येत नाही. नंतर, तो धर्माचरण करायला लागतो. चित्रपटातील पीके हा असाच आहे. बिना धर्माच्या शिक्क्याचा. म्हणून त्याला पृथ्वीवरील लोकांचे जीवनमान, धर्माचरण माहित नाही. त्यामुळे तो प्रत्येक धर्माचरण करुन सत्य शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला त्यातील मिथ्या, असत्य गोष्टी जाणवू लागतात. असे प्रकार सर्वच धर्मात आहेत.’
अमीर असेही म्हणाला होता, ‘चित्रपटाने ढोंगी बाबा-बुवांवर प्रहार केले आहेत. स्वतःच्या लाभासाठी भविकांची पिळवणूक करणार्यांचे पीकेत चित्रण आहे. अशी मंडळी भाविकांची केवळ दिशाभूल करीत नाही तर त्यांचा परमेश्वरावर असलेला विश्वासही खोटा ठरवते’ याच चर्चेत अमीरला प्रश्न विचारला गेला की, ‘तू हृदयापासून धार्मिक आहेस, अल्लाहला मानतो का?’ त्यावर अमीर म्हणाला होता, ‘प्रत्येकाला आपापले प्राधान्य असते. मी जास्त धर्मकांड करीत नाही पण, माझी आई किंवा माझी पत्नी किरणची आई जेव्हा मला काही करायला लावते तेव्हा त्यांच्या समाधानासाठी ते करतो. मी हे धर्म-कर्मकांडासाठी करीत नाही तर त्यांच्याविषयी असलेल्या आदरापोटी करतो. मी त्यांची काळजी घेतो. मी कर्मकांडावर विश्वास ठेवत नाही पण मी इतरांसाठी तसे करतो यात मी आनंदी आहे. माझ्या कृतीतून इतरही आनंदी होतात.’
अमीरचे प्रत्येक वाक्य मनभावीपणाचे होते. अमीर स्वतःला अल्लाहवादी म्हणत नाही पण, कुटुंबातील इतरांच्या आदरासाठी-आनंदासाठी कर्मकांड करतो, असे सांगत स्वतःकडे बेमालूपणे मोठेपणाही घेवून टाकला.
हिंदू, मुस्लिम, शिख किंवा ख्रिश्चन आणि इतरही जाती-धर्मात कर्मकांड हे सारेच कुटुंब करीत नाही किंवा त्यात सारेजण गुंतलेले नसतात. कुटुंबातला एखाद-दुसरा अवडंबराच्या चक्रात अडकलेला असतो. त्याच्यामागे कुटुंबाची धावपळ होत असते. याच अवस्थेतून मंदिर, दर्गा, चर्च आणि गुरूद्वारा परिसरात गर्दी दिसते. कोणाची आई, कोणाचे वडील, भाऊ-बहिण किंवा इतर नातेवाईंकांच्या इच्छा-अपेक्षा-श्रद्धांसाठी गोतावळ्यांची गर्दी बहुतांश धर्म अथवा प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी दिसते.
आता थोडे चित्रपटाच्या मागील सत्यही तपासू या. अमीर जेव्हा म्हणतो, ‘मी आईच्या किंवा सासूबाईंच्या ईच्छेखातर करतो’, तेव्हा तो सुद्धा चित्रपटातल्या धर्म-कर्मकांडाचे अवडंबर माजवणार्यांच्या गर्दीतला एक होतो. हाच अमीर सन २०१२ च्या ऑॅक्टोबर महिन्यात दि. २२ ते २८ दरम्यान आखातातील मक्का येथे हाजला जाणार्या भाविकांच्या गर्दीत हजेरी लावत होता. त्याची आई झिनत हुसेन यांना मक्का येथे दर्शनासाठी अमीर घेवून गेला होता. त्यावेळी धूम ३ आणि तलाश या चित्रपटांच्या निर्मिती शेड्यूलमध्ये व्यस्त असूनही अमीरने वेळात वेळ काढून आईला हाज यात्रेसाठी नेले होते. मक्का येथे पांढरे कपडे घालून करावे लागणारे सर्व कर्मकांड अमीरने केले. अगदी डोक्यावर गोल टोपी घालून फोटोसेशनही केले. आईला व्हीलचेअरवरून घेवून जाताना अमीरच्या चेहर्यावर हास्य व समाधान होते. यात्रेहून परतीच्या प्रवासात त्याच्या आईच्या चेहर्यावर पवित्रकर्म करून आल्याचे समाधान दिसत होते.
अमीरच्या आईची श्रद्धा त्याला मक्केला घेवून जायला भाग पाडते. तो ते आईच्या समाधान-आनंदासाठी करतो. मग, येथे प्रश्न हाच विचारावासा वाटतो, बाबारे! धर्मस्थळे, प्रार्थनास्थळे येथे होणारी गर्दी ही तुझ्या सारख्या पोरांचीच असते. हिंदू धर्मात श्रावणबाळाची कथा आहे. अंध आई-वडीलांना खांद्यावर घेवून श्रावणबाळ तीर्थस्थळी फिरत होता. तसेच हे आहे. मंदिर, दर्गा-मशिद, चर्च आणि गुरूद्वाराजवळ येणारे असे शेकडो श्रावणबाळ असतात. अनेकजण कुटुंबासाठीच येतात. त्यामुळे अमीर तुझी आईच्याप्रति श्रद्धा आणि इतर श्रावणबाळांची अंधश्रद्धा कसे म्हणता येईल? म्हणूनच अमीर-हिराणींचा दावा फसतो आणि चित्रपटातील संदेशात आणि या मंडळींच्या वर्तनात तफावत दिसते.
पीकेच्या पडद्यामागील अजूनही इतर वास्तव गमती आहेत. पीके चित्रपटात अमीर एका मंदिरात पूजेची थाळी पुजार्याला देवून भांडतो. त्यानंतर म्हणतो, ‘अशी थाळी घेवून देव कसे काय माझे भले करणार?’ भाविकांच्या दांभिकतेवर किंवा अंधश्रध्देवर वास्तवादी प्रहार करणारे हे चित्रण आहे असे आपण म्हणून या.
पीकेचे चित्रण राजस्थानमधील झूनझूूनू जिल्ह्यातील मांडवा या गावात केले जात होते. बहुधा दि. १२ फेब्रुवारी २०१३ चा दिवस होता. अमीरसोबत संजय दत्तच्या काही प्रसंगांचे चित्रण याच गावात झाले आहे. येथील चित्रणासाठी मुहूर्ताचा क्लॅप देण्यासाठी राजस्थानच्या वन व पर्यटनमंत्री तथा अभिनेत्या बिना काक उपस्थित होत्या. काक या सुद्धा श्रद्धाळू आहेत. त्यांच्याही गळ्यात रुद्राक्षची माळ आहे. क्लॅप देण्याच्या कार्यक्रमापूर्वी पूजा करण्यात आली. फुलांची थाळी, नारळ मागविण्यात आले. नंतर प्रसाद म्हणून पेढेही वाटण्यात आले. या मुहूर्ताचे फोटो उपलब्ध आहेत.
हा प्रसंग नंतर माध्यमांमध्ये चर्चेत राहीला. कारण, मुहूर्ताचे क्लॅप देताना मंत्री काक यांचा गुढघा थिजला (फ्रिझ्ड) झाला. त्यावर नंतर दिल्लीत खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करावी लागली. (बहुधा, अमीर-हिराणी यांच्या दिखावूपणामुळे केलेल्या पूजेचे प्रायश्चित्त घेणे काक यांच्या प्रारब्धात असेल?)
येथे पुन्हा हिराणींना प्रश्न विचारण्याचा मोह होतो, बाबारे! तुझ्या चित्रपटाचा मुहूर्त करताना तू पूजापाठ करू शकतो. तसे करणे ही तुझी कोणती डोळस श्रद्धा आहे? मात्र, मंदिरात जाताना हिंदू भाविक आणतात ती पूजेची थाळी तुम्हाला अंधश्रद्धा कशी काय वाटते?
पीकेच्या पडद्यामागे अजूनही काही बाबी आहेत. एका मंदिराच्या समोर दानपेटीत रक्कम टाकण्याचा प्रसंग चित्रपटात आहे. मंदिरातील धर्मवादी मंडळी बळजोरी करून पर्समधील रक्कम काढून घेतात असे चित्रण आहे.
आता माहिती अशी समोर आली आहे की, पीके चित्रपटाचे बहुतांश चित्रण हे मंदिरे, चर्च परिसरात झाले आहे. यातील एक मंदिर नाशिक येथील सुप्रसिद्ध काळाराम मंदिर आहे. चर्च ही जयपूर येथील ऑल सेन्टस चर्च आहे. मंदिर, चर्च परिसरात चित्रणाची परवानगी मिळावी म्हणून हिराणी यांनी संबंधित विश्वस्तांना देणग्या दिल्याचे स्पष्ट झाले आहे. जयपूरच्या चर्चमधील दुरूस्ती कामासाठी २० हजार रुपये देणगी आणि मुंबईहून आणलेला क्रुसावरील ख्रिस्ताची मूर्ती हिराणी यांनी भेट म्हणून दिल्याचे तेथील रेव्हरंट जे. सी. जोसेफ यांनी म्हटले आहे. या देणगीच्या बदल्यात चर्चमध्ये अमीर नारळ फोडतानाचे चित्रण केले आहे.
असाच किस्सा नाशिकच्या काळाराम मंदिरचा आहे. या मंदिराच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे छायाचित्रणास परवानगी नाही. ती तशी मिळणार नाही हे माहित असल्यामुळे अमीर-हिराणी यांनी मंदिराच्या एका विश्वस्ताला हाताशी धरून परवानगी मिळविली. यासाठी मंदिराला २५ हजार रुपयांची देणगी दिली. ही माहिती तेथील सुधीर पुजारी यांनी द इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राला दिली आहे. या देणगीच्या बदल्यात काळाराम मंदिर परिसरात अमीर लोटांगण घालतो असे चित्रण केले आहे. हे चित्रण करीत असताना मंदिर परिसरात इतर सहाय्यक-तंत्रज्ञ चपला घालून फिरत असल्यामुळे काही काळ तणावही झाला होता. तेथील विश्वस्तांपैकी असलेल्या ऍड. अजय निकम यांनी यावर आक्षेपही घेतला होता.
वरील दोन्ही प्रसंग लक्षात घेतले तर अमीर-हिराणी यांनी आपला स्वार्थी हेतू साध्य करण्यासाठी मंदिर-चर्चला देणगी दिल्याचे दिसते. चित्रपटातील आशय पडद्यावर काय दिसणार आहे? हे माहित नसल्यामुळेच संबंधितांनी अमीर-हिराणी यांना चित्रणाची परवानगी दिली. देणगीच्या स्वार्थातून परवानगी मिळेल हे माहित असल्यामुळे त्याचा स्वार्थासाठी लाभ अमीर-हिराणी यांनी घेतला. चित्रपटात काय दाखवणार आहोत? हे सत्य हिराणी यांनी संबंधित रेव्हरंट किंवा पुजारी यांना सांगितले असते तर तसे चित्रण करायलाच काय तेथे घुसायलाही संधी मिळाली नसती.
येथे हिराणी यांनी शुद्ध हेतूने देणगी दिली नाही हाच मुद्दा स्पष्ट करायचा आहे. मंदिर-चर्चच्या विश्वस्तांचाही हावरेपणा यातून दिसून येतोच.
हिराणी यांनी मंदिरांचे चित्रण करताना वास्तव किंवा हेतू सांगितला नाही हे अजून तिसर्या प्रसंगातून स्पष्ट होते. जेजुरीच्या खंडोबारायाच्या पालखीचे तयार चित्रण त्यांना हवे होते. त्यांनी तसे ते विश्वस्त मंडळाकडे मागितले. याविषयी तेथील विश्वस्त प्रमोद टेकवाडे म्हणतात, ‘त्यांनी आमच्याकडे केवळ तयार चित्रण (फुटेज) मागितले. खंडोबारायाचे सकारात्मक चित्रण असणार्या टीव्हीवरील मालिका किंवा चित्रपटांना आम्ही तसे चित्रण देतो. हिराणी यांनी आम्हाला तशी कल्पना दिली नाही मात्र, चित्रपटात अमीर खान आहे म्हणून आम्ही तयार चित्रण दिले. निर्मात्याकडून जास्त माहिती जाणून घेतली नाही.
येथे पुन्हा हा मुद्दा ठळक होतो की, देवादिकांच्या बाजारूपणावर प्रहार करताना लोकांना सत्य, वास्तव किंवा आपला हेतू हिराणी यांनी सांगितला नाही. चित्रपटात इतरांच्या खोटेपणावर आशय निर्मिती करताना हिराणी यांनी देणगी देणे, फुटेजसंदर्भात केलेल्या खोटपणाचे समर्थन करणार कसे?
हिराणी यांनी पीके चित्रपटाच्या कथेविषयी माहिती गोळा करताना एक प्रसंग सांगितला आहे. ते म्हणतात, ‘या चित्रपटाच्या कथेसाठी मी काही ठिकाणी संशोधनासाठी गेलो. तेथे मी माझी ओळख लपविली. मी माझ्या मिशा काढून मंदिरे, चर्चमध्ये भटकलो. पण, मंदिराच्या रांगेत मी उभा असताना एका युवकाने मला हटकलेच. तो मला विधू विनोद चोप्रा समजत होता. तो माझा पिच्छा सोडतच नव्हता. तेव्हा मलाही जाणवले की, विनोद आणि माझ्या चेहर्यात साम्य असावे. नंतर तो युवक गेला.’
हिराणी हा प्रसंग सांगताना स्वतःची ओळख लपविली हे मान्य करतात. कारण, त्यांना माहित होते की, देवादिके- अल्लाह-गॉड यांच्या संदर्भातील एकांगी चित्रण आपण करीत असल्याचे सांगितले तर लोक सहकार्य करणार नाहीत. येथे वाईट प्रवृत्तीवर प्रहार करण्याची अमीर-हिराणी यांची भूमिका योग्य असली तरी तीला खोटेपणाची किनार आहे.
धर्म-कर्मकांडाच्या अवडंबरावर यापूर्वीही साधू-संत-महंत आणि समाजसुधारकांनी शब्दांचे जोरदार प्रहार केले आहेत. ‘जत्रामे फतरा बिठाया, तीरथ बनाया पानी, दुनिया भयी दिवानी’, असे संत गाडगेबाबा त्यांच्या प्रवचनातून सांगत. हे सांगताना बाबांना कधी असत्याची कास धरावी लागली नाही. अमीर-हिराणी-चोप्रा यांना मात्र देवादिकांचे कथित बाजारुपण टीपत असताना असत्याचे सोंग घ्यावे लागले आहे. हाच ‘पीकेचा पडद्यामागील पंचनामा’ आहे. म्हणूनच, गल्लाभरू हेतूने आलेला पीके गल्लाभरून कधी आला कधी गेला कळलेच नाही. आता त्याची चर्चाही नाही...कुठे पुरस्कारही नाही.
मानसपूजा हाच खरा विधी
हिंदूच्या पूजापाठ विधीत देवादिकांची मानसपूजा हा अत्यंत पवित्र विधी मानला गेला आहे. कोणत्याही प्रकारचे साधन, तंत्र, यंत्र, साहित्य, प्रतिक न घेता मनाने इच्छित देवांची पूजा करण्याची ही पद्धत आहे. आपल्या मनात आपल्या ईष्ट देवतेला आवाहन करीत त्या देवतेची पूजा करण्यात येते. मनाने संकल्प, अभिषेक, हळदकूंक अर्पण करणे असे या पूजेचे स्वरुप असते. खरेतर, ही पूजापद्धती अध्यात्मिक पातळीवर मनाची एकाग्रता निर्माण करण्यासाठी सूचविली आहे. मनाला शांत करणे आणि मग मानसपूजा करणे हा मानसशास्त्राचा हा भाग आहे. हिंदूंच्या पूजा विधीत देवतांची मूर्ती, थाळी, पळी, पात्र, घंटा, शंख, आरती, अगरबत्ती आदी साहित्य हे एकाग्रता निर्माण करण्याचे साहित्य आहे. ते साधन आहे. ते प्रतिक आहे. मात्र, यालाच देव किंवा साध्य मानणारी मंडळी पूजाविधीच्या तांत्रिकतेत अडकून पडते. तंत्रात अडकणे हा मानवी प्रवृत्तीचा दोष आहे. कोणत्या देवाने सांगितले आहे की, मी याच पद्धतीने पूजा केली तर भेटेन म्हणून???
No comments:
Post a Comment