Sunday, 19 April 2015

गारपिटचे संकट अटळच !

हाराष्ट्रासोबत इतरही राज्यांमध्ये बारमाही होणार्‍या गारपिटचे नवे संकट शेतकर्‍यांसमोर दोन-तीन वर्षांपासून उभे ठाकले आहे. याचा सर्वाधिक फटका शेतीच्या तीनही हंगामातील पिकांना बसत असून शेतकर्‍यांसोबत केंद्र व राज्य सरकारही या संकटावर कशी उपाय योजना करावी? याच विचाराने हवालदिल आहे. गारपिट रोखण्याचे कोणतेही यंत्र-तंत्र-विज्ञान सध्यातरी जगात कुठेही उपलब्ध नाही. मात्र, अत्याधुनिक यंत्राच्या साह्याने हवामान बदलाचा अंदाज घेवून बेमोसमी पाऊस, गारपिट किंवा वादळ-वारे याचा काही तास अगोदर विश्‍वासपूर्ण अंदाज देवू शकेल असे तंत्र जगभरात विकसित झाले आहे. हे यंत्र-तंत्र सरकारी खर्चाने किंवा शेतकर्‍यांनी सामूहिक सहकार्यातून शेतशिवारापर्यंत आणण्याचा विचार करायला हवा. तसे झाले तरच भविष्यात गारपिटच्या संकटातून शेती उत्पादनांचा बचाव करणे शक्य होणार आहे...

गेले वर्षभर महाराष्ट्रातील शेतकरी हा गारपिटग्रस्त ठरला आहे. खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तीनही शेती हंगामात गेल्या १२ महिन्यांत किमान बारावेळा गारपिट होवून शेतातील उभे पीक अक्षरशः मातीमोल झाल्याची उदाहरणे डोळ्यांसमोर आहे. कोणत्या महिन्यात गारपिट किंवा बेमोसमी पाऊस झाला नाही? असे विचारण्याची सोय नाही. राज्यातील महसूल यंत्रणेला दर दोन-तीन महिन्यांत पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावे लागत असून केंद्र व राज्य सरकारच्या दरबारी नुकसानीच्या अंदाजाचे आकडे कोट्यवधींच्या घरात नोंदले जात आहेत.
एकिकडे शेतीला नैसर्गिक आपत्तीचा जोरदार फटका बसत असताना दुसरीकडे कृषी विमा योजनांची अवस्था गरजेपेक्षा ‘ठिगळ लहान’ अशी झाली आहे. हा अनुभव वास्तव लक्षात घेवून ‘हवामान आधारित पीक विमा योजना’ सुरू केली जावी अशी मागणी शेतकरी सातत्याने करीत आहेत. काही पिकांच्याबाबतीत हवामान आधारित भरपाईचे निकष बदलून नवे निश्‍चित केले जात आहेत. परंतू, निसर्ग आणि हवामान ‘लहरी’ किंवा ‘बेभरवशाचे’ होत असल्यामुळे शेतकर्‍यांची अवस्था ‘घर का ना घाट का’ अशी बिकट झाली आहे.
निसर्गातील अनपेक्षित, अनाहूत, अकस्मिक बदल आणि हवामानाचा लहरीपणा या समस्या केवळ भारतापुरत्याच नाहीत. त्याचा संबंध संपूर्ण जगाशी असून पर्यावरण विषयक प्रश्‍न आणि वाढते प्रदूषण हेच सबळ कारण यामागे आहे. जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात हवा, पाणी, जमिन आणि वातावरण याच्यात होणार्‍या बदलांचा परिणाम हा आता दुसर्‍या देशांसाठी सुद्धा नवे प्रश्‍न निर्माण करणारा ठरत आहे. ‘माझ्या दाराशी घडत नाही, त्यामुळे त्याच्याशी माझा संबंध नाही’ असे बेसावधपणे किंवा बेमूर्वतखोरपणे सांगण्याचे दिवस आता संपले आहेत. पर्यावरण प्रदूषणाच्या नव्या समस्या बारमाही गारपिट, बेमोसमी पाऊस आणि वादळ-वार्‍यांचे संकट उभे करीत आहेत.
भारतात सर्वसाधारण किंवा शेतीशी संबंधित हवामान विषयक अंदाज देण्याची पद्धत आजही जुन्याच यंत्र-तंत्रावर काम करताना दिसते. त्यामुळे ‘हवामानाचा अंदाज’  हा विषय आजही टिंगल-टवाळीचाच ठरतो आहे.
उपलब्ध माहितीनुसार गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भ, मध्य व पश्‍चिम महाराष्ट्र या विभागांना सातत्याने गारपिटचा फटका बसला आहे. एवढेच नव्हेतर महाराष्ट्राच्या शेजारील तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र, कर्नाटक या राज्यांमध्येही गारपीट किंवा बेमोसमी पावसाने सातत्याने हजेरी लावली आहे.
गारपिटचे प्रमाण वाढत असताना नियमित पावसाचे सरासरी प्रमाण बदलत आहे. याला ‘पाऊस निर्देशांक’ असे म्हणतात. जलवायू विज्ञान विभागाच्या अहवालानुसार, सन १९०१ ते २००६ दरम्यानच्या सरासरी पावसाच्या आकडेवारीचा अभ्यास केला तर पाऊस निर्देशांकही लहरीपणे बदलत असल्याचे दिसते. आकडेवारीवरून ढोबळ निष्कर्षानुसार सर्वाधिक पावसाचे जिल्हे म्हणून ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरीची नोंद दिसते. सर्वात कमी पाऊस सांगली व सोलापूर जिल्ह्यात दिसतो. इतर जिल्ह्यात पावसाच्या प्रमाणात सातत्याने बदल झाले आहेत. आकडेवारी ही अस्थिर दिसते. हीच बाब शेती हंगामासाठी चिंताजनक ठरते आहे.

पावसाळ्यात (मान्सूनमध्ये) नियमित चार महिन्यांच्या काळातील पावसाचे दिवस आणि पावसाची टक्केवारी कमी होत असताना उर्वरित आठ महिन्यात पावसांचे दिवस आणि सरासरी पाऊस वाढत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष १०० वर्षांच्या आकडेवारीतून समोर आला आहे. याचा भयंकर परिणाम म्हणून इतही महिन्यांमध्ये पूर, बेमोसमी पाऊस याचा त्रासदायक अनुभव घ्यावा लागत आहे.
निसर्ग व पावसाचे नियमित चक्र का आणि कसे बदलते आहे?  हेही यानिमित्त समजावून घेणे आवश्यक वाटते. जागतिकस्तरावरील काही हवामान संशोधकांना सध्याचे बिघडलेले निसर्ग चक्र हे ‘मिनी आईस एज’ म्हणजेच ‘लघु काळासाठीचे हिमयूग’ याकडे जाणारे वाटते. याविषयावर पाश्‍चात्य संशोधक कारणांची मांडणी करतात ती अशी, पृथ्वीवर पडणारी सूर्याची किरणे लंब वर्तुळाकार कक्षेत पडतात. त्यामुळे ती कुठे लांब तर, कुठे आखूड असतात. पृथ्वीच्या वातावरणात धूळ आणि कार्बन कणांचे प्रमाण वाढत असल्यामुळे सूर्य किरणांच्या उष्णतेतही कमी-अधिकपणा निर्माण होत आहे. याचा सरासरी निष्कर्ष हाच की, सूर्य किरणांचे तापमान घटत आहे. तापमान घटणे म्हणजे वातावरणात आर्द्रता किंवा बाष्प वाढणे होय. बाष्पाला गोठवणारी स्थिती निर्माण झाली की हवेत बर्फ निर्माण होतो आणि तो गारांच्या रुपात खाली कोसळतो. जगभरात गारपिटचे असेच प्रमाण वाढत असल्यामुळे मिनी आईस एजची कल्पना मांडली गेली आहे.
भारतासारख्या देशातही गारपिटच्या समस्येची मांडणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिटीरॉलॉजी डिपार्टमेंट (हवामानशास्त्र विभाग) करीत असतो. या विभागाने केलेली कारणमिमांसा अशी, भारतातील हवामानाचा संबंध हा अल निनोशी आहे. यालाच ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ असेही म्हणतात. सूर्याच्या किरणांची जमिनीजवळ वाढणारी उष्णता जमिनीवरील संपूर्ण आर्द्रता शोषून घेत आहे. ती उंचावर जाते. तेथे थंड वातावरण मिळाले की त्याचे हिमखड्यात रुपांतर होते. हा वजनदार हिमखडा जमिनीकडे झेपावतो. त्याचे तुकडे होत तो नंतर गारपिट म्हणून कोसळतो. येथे संबंध आहे तो अल निनोच्या प्रभावामुळे समुद्रीय भागावर निर्माण होणार्‍या हवेच्या कमी-अधिक दाबाच्या पट्ट्यांचा. जेथे हवेचा दाब कमी होतो तेथे हिमखडे निर्माण करणारी आर्द्रता खेचली जाते आणि नंतर गारपीट होते. हवेचे हे पट्टे जमिनीपासून सुमारे ३५ ते ४० हजार फूट उंचीवर असणार्‍या ‘ट्रोपोस्फिरस’  या पट्ट्यात  असतात. तेथेच हवामान विषयक बदल घडतात. या पट्ट्याच्यावर विमाने उडतात हे लक्षात घेतले की, तेथे घडणार्‍या हवामानाच्या बदलांची कल्पना येईल.
येथे एक प्रश्‍न निर्माण होतो की, काही शास्त्रज्ञ हे सूर्य किरणांची उष्णता कमी होत आहे असा निष्कर्ष मांडत असताना जमिनीच्या पृष्ठभागाजवळ उष्णता जास्त निर्माण होते असाही निष्कर्ष मांडत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे, वातावरणात कार्बन कणांचे किंवा ऑक्साईडचे उत्सर्जन वाढत असल्यामुळे तापमान वाढत आहे. तसेच जमिनीत असलेल्या उष्णतेमुळे पृष्ठभागावरील आर्द्रता शोषून घेण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा प्रकारे वाढणार्‍या तापमानामुळे हिमनद्या वितळत आहेत. ते पाणी समुद्रात वाढत आहे. समुद्राजवळ जास्त आर्द्रता निर्माण होत आहे. ती उंचावर गेल्यानंतर कोणत्याही दिशेने वाहणार्‍या कमी-अधिक दाबाच्या पट्ट्यात शोषली जाते. तेथे हिमकण-खडे तयार होतात. थंड वातावरण मिळाले की बेमोसमी पाऊस किंवा गारपीट होते, अशी ही साधी प्रक्रिया आहे. वैज्ञानिक अथवा तांत्रिक भाषेत याला शब्द वेगळे असले तरी प्रक्रिया ही अशीच होते.
भारताच्या संदर्भात ही प्रक्रिया अजून सोप्या भाषेत सांगायची तर भारतीय अवकाशात पश्‍चिमेकडून उष्ण आणि शुष्क वारे येतात. याचे शास्त्रीय नाव ‘ड्राय एअर’ असेही आहे. बंगालच्या उपसागरावरून आर्द्रता घेवून दमट व उष्ण वारे येतात. वार्‍यांचे प्रवाह आणि दाब यात अनियमितता निर्माण होते. अशावेळी कमी दाबाच्या ठिकाणी आर्द्रता असलेले वारे शोषून घेतले जातात किंवा स्थलांतरित होतात. तेथे थंड वातावरण मिळाले की गारपिट होते.
गार कशी तयार होते? हेही थोडक्यात समजावून घेवू. जमिनीपासून वरच्या दिशेने जसे-जसे वर जावे तसे-तसे वातावरणात हवा विरळ होत जाते. हवा विरळ होणे म्हणजे कमी दाबाचे पट्टे तयार होणे. आर्द्रता असलेली हवा जशी वर जाते तशी ती ढगांच्या रुपात एकवटली जाते. ढग १५ ते २० किलोमाटर (जास्तीत जास्त ३४ ते ४० हजार फूट) वर जातात. या पट्ट्यातही ढगांचे दोन थर असतात. एक वर जाणारे आणि दुसरे खाली येणारे. ढगांच्या वर आणि खाली होण्याच्या क्रियेत आर्द्रता बाष्पात रुपांतरित होते. त्यातून हिमकण-खडे तयार होतात. वातावरण अधिकच थंड झाले तर हे कण खड्यांच्या रुपात असतात. ते वजनामुळे खाली येतात. त्यांचा प्रवास वेगाने जमिनीकडे सुरू होते. घर्षणातून खड्यांचे तुकडे होतात. हिमखड्यांचे तुकडे जमिनीवर पडताना आपण गारपिट झाली असे म्हणतो. म्हणूनच गारा वाहून नेणे, वेग, ढगांची गडदपणा (डेन्सिटी) यावर गारांचे अस्तित्व, मार आणि कालावधी अवलंबून असतो. याशिवाय गार कोसळेल का? किती प्रमाणात? कोणत्या आकारात? कुठे? याचा ऐनवेळी अंदाज देता येत नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेता गारपिट हे संकट कायम ‘डोक्यावर टांगती तलवार’ सारखे अस्तित्त्वात असेल हे मान्य करावे लागते.

‘स्केलर वेव्ह जनरेटर’ ला शास्त्रीय आधार नाहीच

गारपिट रोखण्यासाठी गाररोधक यंत्र (स्केलर वेव्ह जनरेटर) तयार केल्याचा दावा विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील हिवरखेडे येथील शेतकरी दादाराव हटकर यांनी केला आहे. त्यांचे आणि छोट्या तोफेसारख्या यंत्राचे छायाचित्र सध्या माध्यमांमधून फिरत आहे, चर्चेत आहे. स्केलर वेव्ह म्हणजे पृथ्वीच्या अंतर्भागातील ऊर्जा. मात्र, तशी ऊर्जा असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. या कथित उर्जेचा  वापर या यंत्रात केला असल्याचे सांगण्यात येते. यंत्राची एक वायर जमिनीत टाकून एका नळीच्या माध्यमातून स्केलर वेव्ह आकाशात सोडली जाते. त्यातून ढग किंवा गारांचे पावसात रुपांतर होते असा दावा केला जातो. मात्र, या थिअरीला कोणताही शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे या यंत्राविषयी अभ्यासक पूर्णतः साशंक आहेत. यापूर्वी गुजरातमधील एका शेतकर्‍यानेही कुलर सारखे यंत्र तयार करून मी हवेत बाष्प सोडतो त्यामुळे पाऊस पडतो असा दावा केला होता. ही व्यक्ती काही काळ जामनेर येथेही मुक्कामी होती.

गारपिटचा केवळ अंदाज देता येवू शकतो


गारपिट हे शेतकर्‍यांसाठी नियमित संकट ठरत असताना ती रोखता येईल का? किंवा गरपिटचा पूर्व अंदाज मिळू शकेल का? या दोन प्रश्‍नांविषयी उत्सूकता निर्माण होते. यातील पहिल्या प्रश्‍नाचे उत्तर सध्यातरी पूर्णतः नकारार्थी आहे. गारपीट रोखण्याचे कोणतेही तंत्र-यंत्र-विज्ञान उपलब्ध नाही. मात्र, जगभरात सर्वत्र हवामानात अपेक्षित सुधारणा करता येईल का? या हेतूने संशोधन केले जात आहे. यात सध्यातरी चीन, फ्रान्समधील काही संदर्भ उपलब्ध आहेत.
गारपिटचा संबंध हा पावसाच्या निर्मितीशी आहे. जगभरात पावसाचे प्रमाण सर्वत्र अनिश्‍चित होत आहे. अशावेळी अवकाशात असलेल्या बापष्पयुक्त ढगांमध्ये रसायन पेरणी करून कृत्रिम पद्धतीने पाऊस पाडता येईल का? यावर संशोधन सुरू आहे. फ्रान्समध्ये १९९५ पासून कृत्रिम पद्धतीने पाऊस पाडण्याचे प्रयोग केले जातात. भारतातही सहा-सात वर्षांपूर्वी असे प्रयोग केले गेले. बाष्पयुक्त ढगांमध्ये कॅल्शियम किंवा सोडियम क्लोराईडचे मिश्रण फवारून कृत्रिम पाऊस पाडता येतो हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. अशा पद्धतीने पडणार्‍या पावसाच्या प्रमाणावरही नियंत्रण ठेवतो येत नाही, हेही तितकेच खरे आहे. मात्र, या प्रयोगासाठी अत्याधुनिक रडार, हेलिकॉप्टर, पायलट, हवामान तंत्रज्ञ, रसायने याची आवश्यकता असते. चीनमध्ये सुद्धा २००० पासून याच प्रकारचे प्रयोग सुरू आहेत. तेथील सरकारने या प्रयोगासाठी अत्याधुनिक रडार, मायक्रोवेव्ह रेडिओमीटर्स, एअरक्राफ्ट, रॉकेट लॉन्चर, रसायने, तंत्रज्ञ उपलब्ध करून दिली आहेत. यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्याची चीन सरकारची तयारी सुद्धा आहे. तेथील शेतकर्‍यांचा या प्रयोगात सक्रिय सहभाग असतो ही बाब विशेष महत्त्वाची. चीनने या प्रयोगाशी संबंधित खास हवामानविषयक कायदा केला आहे. चीनमध्ये ढगांमध्येे फवारणीसाठी एझोटीक कुलिंग लिक्विड, ड्राय ऑक्साईड, प्रोपेन यांचे मिश्रण वापरले जाते.
भारतात हवामान अंदाज देण्याचे तंत्र-यंत्रे आजही पारंपरिक आहेत. जमिनीवरील साधने (वेधशाळेतील यंत्रे), रडार (बंद किंवा जुनाट पद्धतीची), समुद्राच्या पाण्यावरील साधने (फुगे व उपकरणे), वातावरणात सोडली जाणारी साधने (फुगे व उपकरणे) याचाच वापर आजही केला जातो.
मिळालेल्या माहितीनुसार हवामान किंवा वार्‍याचा वेग, ढगांची गती, त्यातील आर्द्रता, प्रकार, भौगोलिक स्थान याचा अभ्यास करण्यासाठी अत्याधुनिक ‘डॉप्लर रडार’ चा वापर केला जातो. भारतात सध्यातरी या पद्धतीची यंत्रणा नाही. महाराष्ट्रात नागपूरसह मुंबईत दोन ठिकाणी हे रडार आहे असे सांगण्यात येते. पण, ते सुद्धा नादुरूस्त आहे. स्व. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना पाच ठिकाणी डॉप्लर रडार बसविण्याची योजना होती. ती नंतर मुख्यमंत्री बदलताना मागे पडली.
भारतात आजही हवामान अभ्यासासाठी आकडेवारीवर आधारित ‘न्यूमेरिकल वेदर प्रिडिक्शन सिस्टिम’ वापरल्या जातात. त्यातून निर्माण होणारे तंत्रही वेगवेगळे आहे. भारत हा पृथ्वीच्या मध्यावर असलेला देश आहे. त्यामुळे येथील वातावरण हे ‘समशितोष्ण’ कटिबंधातील मानले जाते. येथे पाऊस, ऊन आणि हिवाळा हा जवळपास सारखाच असतो. त्याची तीव्रता आणि शितलता तेवढीच टोकाची असते. त्यामुळे भारतासाठी कोणतेही एक हवामान प्रतिकृती (वेदर मॉडेल) वापरता येत नाही.
भारतीय हवामान खाते २४ तास किंवा ४८ तास आधी अंदाज देवू शकते. तो अचूक असण्याची शक्यता सुद्धा ५० टक्के वारंवारता आणि ५० टक्के अनियमितता अशीच आहे. म्हणूनच, भारतात आजही हवामानाचा अंदाज पूर्णतः चुकतो किंवा कधीकधी अचूक ठरतो. अमेरिकेत विविध अत्याधुनिक यंत्र-तंत्र-विज्ञानाच्या साह्याने अभ्यास करून ‘रिअल र्टाम वेदर फोरकास्ट’ (काही तासांपूर्वीचा अंदाज) दिला जातो. हा अंदाज रेडिओ, टीव्ही, नेट, मोबाईल मार्फत सत्वर लोकांपर्यंत पोहचतो. तेथे नैसर्गिक आपत्ती रोखता येत नसली तरी आपत्तीमुळे होणारे नुकसान कमी करता येते, ही बाब ठळकपणे निदर्शनास येते.
भारतातही गारपीट रोखण्याच्या दृष्टीने संशोधन सुरू आहे. पुण्यातील ‘एमआयटी’ संस्थेने या संदर्भात प्रयोग केले. त्याची थिअरी सुद्धा ढगांमध्ये द्रावण फवारून हिमखड्यांचे पावसात रुपांतर करणारीच आहे. ढगात फवारणी करण्यासाठी सिल्वर क्लोराईड व सोडियम क्लोराईड ही रसायने सूचविली आहेत. एमआयटीने या प्रकल्पासाठी ४० कोटी रुपये खर्चाची योजना सादर केली आहे. त्यात डॉप्लर रडार, छोटे होलिकॉप्टर, रॉकेट लॉन्चर, तंत्रज्ञ असा आराखडा दिला आहे. हा प्रकल्प चालविण्यासाठी दर वर्षी ६ कोटी रुपये खर्च अपेक्षित असेल. ही यंत्रणा २०० किलोमीटर हवाई क्षेत्रात पावसावर (गारपिटवर नाही) निरीक्षण व मर्यादीत नियंत्रण करु शकेल. भारतात असे केंद्र २३ ठिकाणी सुरू करावे लागेल.
भारतात गारपिट अथवा पावसाच्या संदर्भात संशोधन खूप प्राथमिक स्तरावरचे आहे, असे स्पष्ट मत पर्यावरण तज्ञ अतुल देऊळगावकर मांडतात. हवामान खाते अधिक सक्षम करायचे असेल तर त्यांनी वर्तविलेला हवामानाचा अंदाज चुकला तर त्यांच्यांवर गुन्हा दाखल करायची तरतुद करावी असे मत देऊळगावकर मांडतात. भारतात आजही प्रत्येक गावापर्यंत तापमान मापक, पर्जन्य मापक आणि आर्द्रता मापक यंत्रे पोहचलेली नाहीत. अंदाज वर्तविला तरी तो लोकांपर्यंत पोहचविण्याची संपर्क यंत्रणा नाही. गावनिहाय पाऊस, गारपीट याची आकडेवारी नाही. असा अडचणीही देऊळगावकर यांनी मांडलेल्या आहेत.
गारपिटचा महाराष्ट्रातील इतिहास
सन २००३ ते २०१३ अशा १३ वर्षांत सातत्याने गारपीट झाली आहे. केंद्र व राज्य सरकारांतर्फे किमान ३०० कोटींवर मदत वाटप झाली आहे. प्रत्येकवर्षी सरासरी १२ ते १३ जिल्ह्यांना गारपिटचा फटका बसला आहे. अलिकडच्या आकडेवारी नुसार गेल्या १२ महिन्यात १२ वेळा गारपिट झाली आहे. जळगाव जिल्ह्यात गारपिटचे चित्र सन २०१२ पासून सातत्याने आहे.

No comments:

Post a Comment