Friday, 3 April 2015

शरददादांची भावकी !

नेत्यांनाही अडचणीत आले. त्यापैकी "दखल' घ्यावी लागेल ती मंत्री डॉ. विजय गावित यांचे बंधु शरद गावित यांनी "बहुजन समाजवादी पक्षा'तर्फे केलेल्या उमेदवारीची. श्री. शरद गावित एवढे फोकसमध्ये नव्हतेच. मात्र, मंत्र्यांचे भाऊ आणि कॉंग्रेस विरोधातील उमेदवारी यामुळे ते चर्चेत आले आहेत...


डॉ. विजय गावित
शरद गावित

लोकसभेच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जागा वाटपाचा घोळ अखेरच्या टप्प्यापर्यंत सुरू होता. नंदुरबारची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळावी म्हणून रस्सीखेच झाली. रावेरची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला नको असतानाही कॉंग्रेसने बहाल केली. त्यामुळे दोन्ही ठीकाणी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नेते- कार्यकर्त्यांचे संबंध ताणले गेले. अखेर नंदुरबार कॉंग्रेसकडेच राहणार म्हटल्यावर डॉ. गावीत यांचे बंधू श्री. शरद गावीत यांनी "बसपा' तर्फे अर्ज भरला. पक्षाचे प्रदेशस्तरावरील नेते श्री. ईश्वरलाल जैन यांनी श्री. शरद यांना समजावण्याचा प्रयत्न केला. "मी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा सदस्य नाही. त्यामुळे इतरांचे ऐकण्याचा प्रश्‍न नाही' असे म्हणत श्री. शरद गावित यांनी अर्ज कायम ठेवला. "भाऊ ऐकत नाही. त्यामुळे मी आघाडीचेच काम करेन' असे डॉ. गावित यांनी अखेर जाहीर केले. त्यानंतरही कॉंग्रेस नेत्यांचा आणि डॉ. गावित यांचा "सांधा' या मतदार संघात जुळलेला नाही. श्री. शरद गावित यांच्या रुपाने रावेर आणि जळगाव मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोघा उमेदवारांना ग्रहण लागण्याची शक्‍यता आहे.
या सगळ्या घटनां- घडामोडीत केंद्रस्थानी राहिलेले श्री. शरद गावित हे कोण आहेत ? त्याचा राजकारणाशी काय संबंध ? मंत्री डॉ. गावित यांच्या कार्यव्यवस्थापनात त्यांचा सहभाग काय ? असे अनेक प्रश्‍न नंतर खानदेशातील तमाम मतदारांच्या मनांत निर्माण झाले.
मंत्री डॉ. गावित यांचे बंधू अशी ओळख असलेल्या श्री. शरद गावित यांना नंदुरबार जिल्हा पातळीवर "शरददादा' म्हणून ओळखले जाते. डॉ. गावित यांच्या मार्फत राबवायच्या विविध योजनांचे सीत्रसंचालन श्री. शरद गावित हेच करतात.
नटावद (ता. नंदुरबार) येथील कृष्णा गावित या शिक्षकाच्या कुटुंबात शरद यांचा जन्म झाला. गावित परिवार प्रारंभा पासून राजकारणाकडे ओढला गेलेला. त्यांचे काका तुकाराम हुरजी गावित कॉंग्रेसचे खासदार होते. त्यानंतर कृष्णा गावित यांनीही विधानसभेत जाण्याचे प्रयत्न केले. त्यात अपयश आले. मात्र, 1995 च्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रस्थापितांना विरोध करीत डॉ. विजय गावित हे अपक्ष म्हणून निवडणून आले. त्याअगोदर ते औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक होते. तेव्हा पासून आजपर्यंत यशाची एक एक शिडी चढत जाणाऱ्या डॉ. गावित यांची कारकिर्द यशस्वी ठरली आहे.
डॉ. गावित हे प्रथम राज्यमंत्री, नंतर कॅबिनेटमंत्री व त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांच्या कामाची व्याप्ती नंदुरबार मतदार संघ, जिल्हा व राज्यात वाढू लागली आहे. त्यामुळे त्यांना विश्‍वासू सहकाऱ्याची गरज भासू लागली. मंत्रालयात कक्ष अधिकारी असलेले बंधू राजेंद्र गावित प्रशासकीय पातळीवर त्यांना मदत करू लागले. मंत्री डॉ. गावित यांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांची अधिकृत नियुक्‍ती झाली. त्यांना घरातलाच एक विश्‍वासू सहकारी मिळाला. मुंबईतील, मंत्रालयातील कामे होऊ लागली. प्रशासनातील अडचणी दूर झाल्या. हे काम करीत असतांनाच राजेंद्र गावित यांनी आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीच्या शाखा वाढविण्याकडे लक्ष केंद्रीत केले. या सोसायटीच्या सुमारे 36 वर शाखा आहेत.
डॉ. गावित यांचे दुसरे बंधू प्रकाश गावित हे शेती कामाकडे लक्ष देत होते. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत केही जिल्हा परिषद सदस्य झाले. दुसरे बंधू संजय गावित हे नाशिक पोलिस विभागात उपनिरीक्षक आहेत. प्रत्येकाची अशी स्वतंत्र रचना असली तरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात संपर्कासाठी अजून सहकारी अपेक्षीत होता. राज्यपरिवहन महामंडळाच्या सेवेत लेखा लिपिक असलेले श्री. शरद यांनी पाच वर्षापूर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी केली. त्यावेळी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. या निवडणूकीत त्यांना अपयश आले. त्यांच्या राजीनाम्या समवेत त्यांच्या पत्नीनेही आरोग्य विभागातील सेवेचा राजीनामा दिला. त्यानंतर श्री. शरद यांनी डॉ. गावित यांना सहकार्य करण्यात लक्ष घातले. आदिवासी विकास विभागाच्या विविध योजना, सामुहीक लाभ, व्यक्तिगत लाभाच्या योजना त्यांनी तळागाळा पर्यंत पोहोचवल्या.
श्री. शरद गावित यांना ही कामे करताना लोकांशी संपर्काची विशिष्ट शैली सापडली. ज्या गावात योजना द्याची आहे तेथे जावून ते चर्चा करतात. योग्य लाभार्थ्यांची निवड करतात. सामुहीक आणि वैयक्तिक लाभाच्या योजनांचा जनतेला अधिकाधिक लाभमिळावा यासाठी तळागाळापर्यंत प्रय्तन करतात. लोकांचे अर्ज घेणे, आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करणे ही कामे त्या त्या गावातील स्थानिक सहकारी कार्यकर्त्यांकडून करुन घेतात. आदिवासी प्रकल्प विभागातून त्याला मंजूरी मिळवतात. त्यानंतर लाभात दिल्या जाणाऱ्या गायी, म्हैस, बकरी गट, विविध यंत्र आदी स्वत: घेऊन जातात आणि संबंधितांपर्यंत त्या पोहोचवतात. या प्रत्येक टप्प्यात त्यांचा स्वत:चा संपर्क प्रत्यक्ष लाभार्थ्यांशी असतो. त्यामुळे आदिवासी विकास विभागाच्या योजनांचा लाभ डॉ. गावित यांच्यापेक्षा श्री. शरद गावित यांनीच मिळवून दिला, अशी प्रतिमा ग्रामीण भागात तयार झाली आहे. कोणतेही काम करण्यासाठी ग्रामीण भागातील कार्यकर्त्याला श्री. शरद गावित यांची भेट घ्यावी लागते. त्यांनी हिरवा कंदिल दाखविला तर काम मार्गी लागते. व्यक्तिगत लाभाची योजना असो की सामुहीक कामाचे उद्‌घाटन असो.
आतातर जिल्हा परिषदेत डॉ. गावित यांच्या पत्नी सौ. कुमुदिनी गावित अध्यक्षा आहेत. त्यामुळे तेथील योजनांचाही लाभ आता श्री. सरद गावित यांच्या मार्फतच लोकांच्यापर्यंत पोटत आहे. सुमारे नऊ वर्षापूर्वी नंदुरबार नगर पालिकेत सत्तेवरून वाद होत होते. दोन गट निर्माण झाले होते. त्यात डॉ. गावित यांचे शालक जगदीश वळवी (चोपडा, जि. जळगाव येथील रहिवासी) हे काही काळ नंदुरबार येथे वास्तव्यास होते. ते पालिकेचे सदस्य झाले. डॉ. गावित यांच्या विरोधी गट असलेल्या चंद्रकांत रघुवंशी यांच्या सहकार्याने ते नगराध्यक्षही झाले होते. डॉ. गावित यांचे सासरे रमेश पान्या वळवी हे माजी गृहराज्यमंत्री आहेत.
डॉ. गावित यांचे काम सांभाळणाऱ्या श्री. शरद गावित यांच्या संपत्तीचा तपशिलही लक्षवेधी आहे. त्यांच्याकडे रोकड 48 हजार रुपये, पत्नीकडे रोकड 20 हजार रुपये, मुलगा राजश्रीच्या नावावर 3 आणि जयश्रीच्या नावावर 2 दोन हजार रुपये बॅंकेत आहेत. युनियन बॅंकेत सात लाख 12 हजार, डीडीसीसी बॅंकेच्या धानोरा शाखेत 17 हजार 144, जयकृष्ण पतपेढीत 1 लाख 59 हजार रुपयांच्या टेवी आहेत. नटावद येथे 5.32 हेक्‍टर, नटावद येथेच 3. 2 हेक्‍टर, कोठली येते 0.80 हेक्‍टर, विठ्याफळी येथे 0.80 हेक्‍टर शेत जमिन आहे. तोरणमाळ येथे 128 चौमी, कोठली येथे 36000 चौफु, नागाई नगर 208 चौमी, विमल प्लाझा दुकानमध्ये 20.84 मीटरचे दुकान आहेय त्यांच्यानावावर युनियन बॅंकचे कर्ज 3 लाख 85 हजार, व्यक्तिगतकर्ज 6 लाख रुपये आहे.


असे आहेत शरद गावित

नाव : शरद कृष्णराव गावित
जन्म तारीख : 11 एप्रिल 1963
पत्ता : नटावद (ता. जि. नंदुरबार)
जात : हिंदू भिल (अनुसूचित जमाती)
शिक्षण : बी.ए. मानसशास्त्र - प्रथम श्रेणी (मार्च 1987)
एम. ए. इतिहास - ऍपियर (मार्च 1989).
विविध पदे - माजी अध्यक्ष - आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी, नटावद (ता. जि. नंदुरबार),
संचालक - आदिवासी युवक क्रिडा विकास मंडळ, नटावद (ता. जि. नंदुरबार), माजी अध्यक्ष - प्रकल्पस्तरीय समिती, नंदुरबार.

ता. 13 एप्रिल 2007 साठी

No comments:

Post a Comment