नंदुरबारचे किशोरभाई वाणी यांचा प्रयत्न ः नंदुरबारच्या ‘केआरपीएस’चा उपक्रम
शाळेमध्ये विद्यार्थ्याच्या प्रगती, गुणवत्ता आणि वर्तणुकीची माहिती पालकांना देण्यासाठी ‘ऍण्ड्राईड ऍप’ चा वापर करण्याची अभिनव संकल्पना नंदुरबारच्या कन्हय्यालाल रावजी पब्लिक स्कूलने (केआरपीएस) अत्यंत प्रभावीपणे राबविली आहे. बदलत्या काळानुसार नव्या तंत्राचा अधिकाधिक वापर करून विद्यार्थ्यांना संभाव्य स्पर्धेत कसे उतरवता येईल, याचाच ध्यास घेतलेले नंदुरबारचे उद्योगपती तथा सर्वांत मोठे आडत व्यापारी किशोरभाई वाणी यांच्या नेतृत्वात ही शाळा वेगवेगळे शैक्षणिक प्रयोग राबवित आहे.
मुले शाळेत काय करतात? त्यांची शैक्षणिक प्रगती काय आहे? ते रोज शाळेत वेळेवर येतात का? त्यांना होमवर्क दिला जातो का? विविध चाचण्या, खेळ किंवा उपक्रमात पाल्याची काय प्रगती आहे? आदी विषयांची माहिती पालकांना नसते. किंबहुना पालक मंडळी ती घेण्याचा प्रयत्नही करीत नाहीत. निवासी शाळांमध्ये ‘भरमसाठ शुल्क’ भरले की, पालकाला वाटते आता सर्व जबाबदारी शाळेकडे आहे. त्यातूनच मुलांचे भवितव्य घडविण्याकडे पालकांचे दुर्लक्ष होते.
हाच बेसिक मुद्दा लक्षात घेवून किशोरभाई वाणी यांनी त्यांच्या ‘केआरपीएस’ या निवासी शाळेत विविध शैक्षणिक प्रयोग सुरू केले आहेत. मुलांच्या शैक्षणिक प्रगती, गती, गुणवत्ता, सुधारणा आणि वर्तणुकीची माहिती पालकांना देण्यासाठी शाळेच्याच नावाने ‘ऍन्ड्राईड ऍप’ तयार करण्यात आले आहे. गुगल प्ले स्टोअरवर ‘के आर पॅरेन्ट पोर्टल’ नावाने ते उपलब्ध आहे. ‘इआरपी सॉफ्टवेअर’तर्फे ते तयार करण्यात आले आहे. हे ऍप सर्व पालकांना त्यांच्या मोबाईलवर डाऊनलोड करावे लागते. त्यावर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची सर्व माहिती दिली जाते.
अगदी साधे उदाहरण म्हणजे, वर्ग शिक्षकाने रोजची हजेरी नोंदल्यानंतर जे विद्यार्थी गैरहजर असतात त्यांची माहिती शाळा प्रशासनाच्या संगणकात अपलोड केली जाते. गैरहजर विद्यार्थ्यांच्या पाल्याना तेथून ऍपवर संदेश दिला जातो. अशाच प्रकारे शाळेने दिलेला होमवर्क, इव्हेंट, शुल्क, शालेय कॅलेण्डर अशी माहिती दिली जाते. पालकांनी संदेश दिला तर मुलांच्या उत्तरपत्रिकाही पाठविण्याची या ऍपमध्ये सोय आहे.
किशोरभाई शालेय व्यवस्थापनात अनावधानाने आले. मित्रासोबत अडकलेला अर्थव्यवहार पूर्ण करण्यासाठी त्यांनी शाळा चालवायला घेतली. तेव्हा पहिली ते दहावीच्या वर्गात केवळ ७० मुले होती. स्वतः किशोरभाईंना शाळा व्यवस्थापनाची फारशी माहिती नव्हती. पण, आव्हान म्हणून त्यांनी काम स्वीकारले. आज पहिली ते दहावीच्या वर्गांत ८०० विद्यार्थी आहेत. दरवर्षी प्रवेश बंद करावे लागतात. किशोरभाईंची दुसरी पिढी आता शाळेत लक्ष घातले आहे. सिद्धार्थ वाणी हे त्यांचे चिरंजिव विविध कल्पना राबवित आहेत. शाळेतील मुलांना मल्लखांब-घोडेसवारी-स्केटींग शिकविणे, गावातील मोठ्या सभागृहात गॅदरिंग घेणे, संस्कारक्षम सवयी-छंद लावणे असे अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग या शाळेत केले जातात. मध्यंतरी आयआयटीच्या काही ज्येष्ठ विद्यार्थ्यांना शाळेेत बोलावून रोबोट कसा तयार करावा, याचे प्रशिक्षण मुलांना देण्यात आले. शैक्षणिक प्रगती बरोबरच मुलांच्या खेळाच्या नैप्युण्य विकासाकडेही लक्ष दिले जाते. यातूनच दोरीवरील शारिरीक कवायतींचे नवनवे अविष्कार विद्यार्थी-विद्यार्थीनी करु लागले आहेत. अवघ्या काही वर्षांतच केआरपीएसने आपल्या वेगळेपणाचा नावलौकिक मिळविला आहे. म्हणून किशोरभाईंकडे इतरही शाळा चालविण्यास घ्या अशी विनंती करण्यात येत आहे. त्यात पुण्यातीलही शाळा आहेत.
No comments:
Post a Comment