Friday 3 April 2015

गोदावरी प्रदूषणाचे गुन्हेगार कोण?

र एक तपानंतर गोदावरी काठावर होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे देव तथा संतभूमी त्र्यंबकेश्वर आणि मंदिरांची पवित्र भूमी नाशिक हे जगप्रसिद्ध झाले आहेत. या दोन्ही ठिकाणी अतिक्रमण आणि प्रदूषणामुळे गोदावरीचे अस्तित्त्व आकुंचित होत असून, विविध कारणांमुळे प्रदूषित होणारे पाणी हे वापराच्या लायकसुद्धा नाही. माशांचा मृत्यू आणि पात्रात फोफावणार्‍या पाणवेलींच्या समस्येमुळे गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा चर्चेच्या ऐरणीवर आहे. गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठीचा देखावा त्र्यंबकेश्वर नगरपालिका, नाशिक महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ करीत असतात. थातूर- मातूर कारवाई आणि चिल्लर स्वरुपातील स्वच्छता मोहीम अशा पत्रकबाजीत गोदावरी प्रदूषणाचे खरे गुन्हेगार मात्र बाजूला पडत आहेत....


गरूड पुराणात सिंहस्थ कुंभमेळा आयोजनाचे महात्म्य स्पष्ट केले आहे. समुद्र मंथनातून निघालेल्या अमृतकुंभातील अमृताचे काही थेंब धम्मगिरी पर्वतराजीच्या परिसरातून उगम पावणार्‍या गोदावरी काठावर वसलेल्या त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थात आणि नाशिक महानगरीतील रामकुंडात पडल्याचा उल्लेख या पुराणात आहे. या दोन्ही ठिकाणी दर 12 वर्षांनी साधू-संतांचा सिंहस्थ कुंभमेळा भरतो. त्यामुळे त्र्यंबकेश्वर आणि नाशिककडे तपोभूमी म्हणून पाहिले जाते. गोदावरीच्या अस्तित्वामुळे अनेक शहरे, गावे पावन होतात. पिण्यासाठी, सिंचनासाठी पाणी, विविध प्रकारच्या रोजगार- उद्योगांची संधी यामुळे गोदावरी या भागाची जीवनदायनी ठरते. तिला दक्षिणगंगा असेही संबोधतात.
नाशिक ते त्र्यंबकेश्वरदरम्यानचे अंतर साधारणत: 28 किलोमीटर आहे. नाशिक महानगराची लोकसंख्या 18 लाखांच्या आसपास आहे. त्र्यंबकेश्वर येथे उगम पावणारी गोदावरी नाशकातून किमान 18 किलोमीटर लांबीच्या पात्रातून वाहते. प्रत्येक नाशिककराचा आणि वर्षभरात येथे लाखोंच्या संख्येत येणार्‍या भाविक, पर्यटकांचा कधीना कधी गोदावरीशी संबंध येतोच.
नाशिकची पाणीपुरवठा व्यवस्था गोदावरीवर अवलंबून आहे. नाशिक परिसरातील शेती सिंचन, उद्योग- व्यवसायासाठी लागणारे पाणी गोदावरीतूनच मिळते. पर्यटनाचा व्यवसाय गोदावरीशी संबंधित परिसरातच फुलतो. नाशिक महानगराचे सौंदर्य गोदाघाटामुळे वाढते. पोथी-पुराणातील गोदावरी महात्म्यपेक्षा गोदावरीचे हे महत्त्व त्रिकाल अबाधित आहे.
कधीकाळी धम्मगिरीच्या पर्वतराजीतून अवखळपणे वाहत येणारी गोदावरी सोमेश्वरपासून शांत- शीतल होत जाते. नाशिक महानगर परिसरात ती अगदी स्थितप्रज्ञ झाल्यासारखी असते. गोदावरी कधीही क्रौर्याने कोपत नाही. पावसाळ्यात संतापली तरी तिचा पूर हा पात्राच्या आवाक्यात असतो. लवकर नियंत्रितही होतो.
गेल्या काही वर्षांत गोदावरीला आकुंचित आणि प्रदूषित करण्याचा अप्रत्यक्ष अपराध विविध प्रकारच्या समाज व शासकीय घटकांकडून होत आहे. काही ठिकाणी ते अनावधानाने घडते आहे तर काही ठिकाणी जाणूनबुजून केले जात आहे. ज्यांनी हे रोखायला हवे त्या संस्था (त्र्यंबकेश्वर नगरपालिका, नाशिक महानगरपिलिका) आणि यंत्रणा (प्रदूषण नियंत्रण महामंडळ) डोळ्यांवर झापडे पांघरून गप्प आहेत.
केंद्र शासनाच्या मध्यवर्ती प्रदूषण नियंत्रण मंडळाचा महाराष्ट्रातील नद्यांच्या प्रदूषणाविषयीचा एक अहवाल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध झाला आहे. त्यात सर्वाधिक प्रदूषित आढळलेल्या नद्यांच्या यादीत गोदावरीचे नाव तिसरे आहे. याशिवाय भीमा, पवना, पंचगंगा, पाताळगंगा, इंद्रायणी, कोयना, कुंडलिका, तापी, गिरणा, वैतरणा, निरा, कृष्णा, पूर्णा, चंद्रभागा, वेण्णा, रंगावली आणि भातसा या नद्या प्रदूषित झाल्याचे सुस्पष्ट मत नोंदविले आहे.
काठावरील कारखाने, साखर कारखाने, सांडपाणी यामुळेे या सर्व नद्यांचे स्रोत प्रदूषित झाल्याचा सविस्तर उल्लेख अहवालात आहे. हा एकमेव अहवाल म्हणजे गोदावरीच्या प्रदूषणाचा दस्तावेज नाही. यापूर्वी किमान 50 वेगवगेळ्या प्रकारच्या अभ्यास गटांनी गोदावरीचे प्रदूषण या विषयावर स्वतंत्रपणे अहवाल तयार केले आहेत. प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजनाही सांगितल्या आहेत, मात्र प्रदूषित गोदावरी हे नाशिक शहरासाठी कोट्यवधींचा निधी मिळविण्याचे एक लेखाशीर्ष तयार झाल्यामुळे महानगरपालिकेसाठी गोदावरी ही पैशांची दुभती गाय झालेली आहे. गोदावरी पात्राशी संबंधित अनेक कामांचे ठेके घेण्यामुळे ठाराविक नगरसेवकांची आणि ठेकेदारांचीे पिढीजात पैसा कमावण्याची सोय झाली आहे. गोदावरीची संभाव्य पूररेषा हासुद्धा सर्वसामान्य लोकांना धमकावण्याचा आणि पूररेषेतून घर, जमीन, भूखंड वगळण्याचा नवा धंदा महापालिका अधिकारी तथा पदाधिकार्‍यांना मिळाला आहे.
गोदावरीच्या प्रदूषणाचा विषय त्र्यंबकेश्वर आणि नाशिक महानगर अशा दोन्ही ठिकाणी चर्चेत आहे. यापैकी त्र्यंबक हे तिच्या उगमाचे स्थान. तेथे गोदावरी गावातूनच वाहते. त्यामुळे तिच्या प्रवाहावर ढापे टाकण्यात आले आहेत. उगमाचे ठिकाण छोटे असल्यामुळे गावातील सांडपाणी आणि मलनिस्सारण व्यवस्थाही गोदावरी पात्रात सोडण्यात आली आहे. अशा स्थितीत उगमाच्या ठिकाणीच गोदावरीचा श्‍वास कोंडलेला दिसतो.
त्र्यंबकेश्वरला कुशावर्त तीर्थ असून, तेथेच धार्मिक विधी केले जातात. या कुंडाजवळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने जलशुद्धीकरण यंत्रणा तयार केली होती. कुंभमेळ्यानिमित्त मिळालेल्या सव्वाशे कोटी रुपयांच्या निधीत हे काम झाले होते. सध्या ही यंत्रणा बंद आहे. त्र्यंबकची अर्थव्यवस्था पूर्णत: गोदावरीवरच अवलंबून आहे. बाराही महिने तेथे भाविकांची रीघ असते. तेथील नगरपालिकेच्या खर्चाच्या काही मर्यादा आहेत. शिवाय तेथील पुरोहित संघही फार काही करू शकत नाही. गोदावरीच्या महात्म्यामुळे येणारा भाविकांचा व पर्यटकांचा पैसा सर्वांना हवा आहे, मात्र गोदावरीच्या संवर्धन किंवा संरक्षणासाठी कोणीही पदरचे पैसे खर्च करण्यास तयार नाही, असे चित्र आहे. जे काही द्यायचे ते शासनानेच द्यावे, असे प्रत्येकाला वाटते.
त्र्यंबकेश्वरमध्ये सध्या गोदावरीचे अस्तित्व सांडपाणी, मलयुक्त पाणी, कचरायुक्त पाणी असेच आहे. पितरांच्या मुक्तीसाठी गोदावरीच्या पवित्र प्रवाहात पिंडदान करण्याच्या अपेक्षेन येणार्‍या भाविकांचा त्यामुळेे हिरमोडच होतो.
गोदावरीच्या प्रदूषणाची नाशिक परिसरातील कहाणी यापेक्षा वेगळी नाही. पावसाळ्यापूर्वी गोदावरी विविध कारणांमुळे प्रदूषित असते. तर पावसाळ्यात पाणवेलींच्या वाढीमुळे अदृश्य झालेली असते.

No comments:

Post a Comment