Saturday, 4 April 2015

खेळ नियतीचा !

(माझ्या गुन्हेगारीला गोल्डमेडलच्या टाळ्या)
मित्राहो, मी अंध विश्‍वासू नाही पण, आयुष्यातील काही घटना अशा घडतात की, कुठेतरी-कोणीतरी-काहीतरी नियंत्रित करते आहे, असे वाटायला लागते. आज (दि. १६ मार्च २०१५) ला मला याची पुन्हा प्रचिती आली. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या २३ व्या पदवीदान समारंभात ‘एमए मासकॉम’ या अभ्यासक्रमात विद्यापीठात पहिला आल्याबद्दलचे ‘गोल्डमेडल’ मी स्वीकारले. हे ‘गोल्डमेडल’ मला डून विद्यापीठाचे (देहराडून, झारखंड) कुलगुरू प्रा. व्ही. के जैन यांच्याहस्ते देण्यात आले. यावेळी व्यासपिठावर एकाबाजूला उमविचे कुलगुरू प्रा. डॉ. सुधीर मेश्राम आणि कुलसचिव प्रा. डॉ. अशोक महाजन टाळ्या वाजवत होते.


डून विद्यापीठाचे (देहराडून, झारखंड) कुलगुरू प्रा. व्ही. के जैन यांच्याहस्ते देण्यात आले. यावेळी व्यासपिठावर एकाबाजूला उमविचे कुलगुरू प्रा. डॉ. सुधीर मेश्राम आणि कुलसचिव प्रा. डॉ. अशोक महाजन


जानेवारी २०१५ महिन्यात उमवितील विदेशी विद्यार्थीनी परविना बिरगोनी हिच्या निवास, वावर संदर्भातील ‘विशेष पोलीस पथकाचा’ अहवाल मी पहिल्यांदा वृत्तपत्रातून प्रकाशित केला. या अहवालात संबंधित महिला अधिकार्‍यांनी परविनाच्या उमवित निवास आणि वावरचा ठपका कुलगुरू, कुलसचिव आणि बीसीयूडी संचालकावर ठेवला आहे. हा निष्पन्न झालेला निष्कर्ष मी पहिल्यांदा छापला.
खरेतर, तो अहवाल पोलिसांचा होता. आम्ही वाचकांशी बांधिलकी ठेवून जनतेच्या माहितीसाठी वृत्तपत्राचे सत्य सर्वांच्यासमोर मांडण्याचे कर्तव्य पार पाडले. यात आम्ही आमचे म्हणून काहीही "घुसडले" नव्हते. पण, कुलगुरूंना त्यांच्या भोवतालच्या चौकडीने उलट-सुलट मार्गदर्शन करून माझ्या विरोधात थेट न्यायालयात ‘फौजदारी खटला’ दाखल करून टाकला. हे करीत असताना, पोलिसांचा कुलगुरुंच्या विरोधात तसा अहवाल नाहीच अशी भूमिका घेतली आहे.
हे केल्यानंतर कुलगुरूंनी ‘तरुण भारत’ ला बातम्या देणे बंद केले, पत्रकार परिषदेत संपादक म्हणून बोलावणे बंद केले. याची तक्रार आम्ही कुलपती तथा राज्यपालांकडे केली आहे. त्यानंतर झालेल्या एका पत्रकार परिषदेत काही पत्रकारांनी ‘तरुण भारतचा’ विषय काढला. त्यावर कुलगुरू म्हणाले, ‘आम्ही कोणावरही बंदी घातली नाही किंवा कोणत्याही वृत्तपत्रांना नोटीसा दिल्या नाहीत. तरुण भारतला बोलावतो. तुम्ही त्यांना विचारा.’ कुलगुरू असे बोलले पण वास्तव काय आहे हे इतर वृत्तपत्रातील संपादकांनाही माहित आहे. त्यामुळे ‘कुलगुरू खोटे बोलले’ असेही वृत्त प्रकाशित झाले.
हे प्रकरण इथपर्यंतच असेत तर बरे झाले असते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून काही ‘बगलबच्चे’ कुलगुरूंच्या समर्थनार्थ आंदोलनाचा इशारा देत आहेत. शिक्षणाशी फारसा संबंध नसलेल्या काही मंडळींनी माझ्या ‘अटकेची’ आणि लगेच ‘हद्दपारीची’ मागणी करून टाकली. आता तर मी एवढा मोठा झालोय की, दि. १ एप्रिलला माझ्या अटकेच्या मागणीसाठी रेल्वेरोको होणार आहे.

 उंची दर्शविणारे प्रकार
हे सारे प्रकार हास्यास्पद आणि माणसांची, त्यांच्या विचार-संस्कारांची ‘उंची’ दर्शविणारे आहे. त्यातील संशयाची "एक सूई" आपसूक कुलगुरूंच्याकडेही जाते. हा खेळ बहुधा त्यांनाही आवडत असावा.
कुलगुरूंच्या विषयी वृत्तांकन करताना मी संपादक म्हणून नेहमी संयम पाळला. नॅक समिती असताना वृतांकन बंद केले. अभाविप संघटनेच्या व्यक्ति म्हणून कुलगुरुंच्या विरोधातील बातम्या मी प्रसिद्ध केल्या नाही. त्यामुळे त्या विरोधातील इतर संघटनेच्या बातम्याही प्रसिद्ध करण्याचा संबंध नव्हता. कुलगुरूंच्या विरोधात कर्मचार्‍यांनी दिलेले आक्षेपार्ह जबाब मी छापले नाही. कारण, माझ्यावर पत्रकारितेचा संस्कार हा कै. नानसाहेब परुळेकर यांच्या विचारधारेवर निघणार्‍या वृत्तपत्राचा आहे. माझ्यावर नैतिक दबाव हा कै. डॉ. अविनाश आचार्य यांचा विचारांचा आहे. परंतू, ज्यांच्या डोळ्यांना प्रत्येक घटनेत-प्रसंगात सामाजिक किंवा जातीय रंग शोधायची सवय असते, ती मंडळी नको त्या ठिकाणी पुढाकार घ्यायला लागते. यात ‘उंची’ कमी होते ती, ‘कुलगुरू सारख्या माणसाची.’ कुलगुरूंच्यासाठी रस्त्यावर उतरणार्‍या संघटना उमवित घडलेल्या परविना प्रकरणाचे कोणतेही उत्तरदायित्व उमवि प्रशासनावर सोपवित नाही. पण, त्यांना ‘कुलगुरूंची बदनामी झाल्याचा’ मात्र साक्षात्कार होतो. मी त्या मंडळींना जाहीर आवाहनही केले की, ‘बाबांनो! कुलगुरूंना एकदा तुम्ही विचारा की सर, या प्रकरणात अधिकारी म्हणून किंवा नैतिक अशी कोणतीही तुमची चूक नाही का?’
मी या प्रकरणाच्या प्रारंभी नियतीचा मुद्दा मांडला आहे. तो एवढ्यासाठीच की, ‘ज्या कुलगुरूने, कुलसचिवने मला गुन्हेगार ठरविण्यासाठी तकलादू मुद्यांवर तडकाफडकी न्यायालय गाठले त्यांचे प्रशासन परविना प्रकरणात एवढे तत्पर का नाही वागले? त्याचे उत्तर कुलगुरू किंवा त्यांचे बगलबच्चे देणार नाहीत.’ मात्र, मला गोल्डमेडल देताना त्यांना टाळ्या वाजवाव्या लागल्या हेही नसे थोडके. हे नियतीने घडवले असावे का ??
उमविच्या रौप्य महोत्सवी २३ व्या पदवीप्रदान सोहळ्यास कुलपती आले नाहीत. जिल्ह्यातील कोणतेही मंत्री फिरकले नाहीत. ज्यांना डिलिट दिली ते अनुपस्थित राहीले. सोहळ्यातही अनेक त्रृटी होत्या. मान्यवर म्हणून बोलावलेली मंडळी आली नाही. सुमारे तासभर व्हीआयपी खूर्च्या रिकाम्या होत्या. कुलसचिव व्यासपीठावर मोबाईलचा वापर करून सूचना देत होते. उमविचा एवढा महत्त्वाचा कार्यक्रम असताना व्यासपीठावर मोबाईलचा वापर नको, याची शिकवण कोणत्या प्रशासनिक पुस्तकातून द्यावी ? हा प्रकार प्रा. व्ही. के. जैन कुतूहलाने पहात होते. ‘माणसे मोठी होतात वर्तनातून आणि खुजी ठरतात वागणुकीतून.’ ‘वर्तन’ ही सवय असते आणि ‘वागणूक’ ही जाणून-बुजून केली जाते.

 नियतीचा अखेरचा मुद्दा
नियतीचा अखेरचा मुद्दा हाच. मला गुन्हेगार ठरविण्याचा आटापिटा करणार्‍या मंडळींना माझ्यासाठी व्यासपीठावर टाळ्या वाजवाव्या लागल्या. मी आनंदीत होते मात्र, त्यांच्या मनांत काय चालले असावे? एक गंमत आहे, उद्या मला कोर्टाने विचारले की, ‘तुम्ही उमवितील प्रकरणाचा पर्दाफाश केलात हे कुठे शिकलात...?’ मी सांगेन, ‘न्यायाधिश महाराज हे सारे-सारे मला उमविने शिकवले आहे आणि मला उमविने गोल्डमेडलही दिले आहे.’ पण, याच प्रकरणात उमविची बाजू लंगडी पडली आणि न्यायालयाने विचारले की, ‘कुलगुरू, कुलसचिव तुम्ही चुकीचे कसे करता किंवा वागलात?’ त्यावर उमवि प्रशासनाच्या मानगुटावर पोलीस अहवाल, मालते समिती अहवाल, सिनेटमधील वाद, कर्मचार्‍यांचे दावे-प्रतिदावे याचे भूत उभे असेल...हे भूत काय करेल....‘पुन्हा उंची कमी करेल'. कोणाची हे विचारू नका. अशावेळी भिंतीवरचे आंबेडकर आणि फुलेंचेही फोटो ओशाळून जातील....!!!

No comments:

Post a Comment