Friday 3 April 2015

होम चिकित्सा केंद्र - तपोवन

पारोळा- अमळनेर रस्त्यावर पारोळ्यापासून अवघ्या पाच किलोमीटरवर तपोवन हे होम चिकित्सा केंद्र आहे. तेथे जैविक ऊर्जा, वैद्यकशास्त्र, कृषिशास्त्र आणि हवामानशास्त्र याचा वैदीक पद्धतीने अभ्यास व प्रचार- प्रसार केला जातो. अग्निहोत्राच्या माध्यमातून या शास्त्रांचा सुरेख संगम घालून निसर्गदायी झालेली मानवी जीवनशैली येथे अनुभवता येते. त्याच्या अनोखा प्रवास...
तपोवन हे फार्म हाऊस नाही. सहलीचे पर्यटन स्थळ नाही. पार्टी करण्याची जागा मुळीच नाही. तपोवन हे निसर्गाशी नाते जोडून निसर्गदायी मानवी जीवनशैली तयार करणारे केंद्र आहे. वेद- पुराणांचा अभ्यास करून त्यातील शास्त्र शुद्ध संकल्पनांचा आजही पाठपुरावा करीत त्याचे महत्व पटवून देणारी जीवनशाळा आहे.

होम- हवनचे महत्व ते काय?  असा प्रश्न अनेकांना पडतो. होम केल्याने पाऊस पडतो का? कोणाचे आरोग्य सुधारते का? होमातील आहुतीमुळे निर्माण होणार्‍या ज्वाला, भस्म व धुराशी मानवाच्या जीवनशैलीचा काय संबंध? असे प्रश्न विज्ञानवादी काही चिकित्सक विचारतात. या प्रश्नांच्या मागे बर्‍याचवेळा कुचेष्टा असते. मात्र, विज्ञानाच्या कसोटीवर जिज्ञासू म्हणून प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर तपोवनमध्ये एकदा गेलेच पाहिजे.

पारोळ्यापासून अवघ्या पाच किलोमीटरवर तपोवन आहे. धुळे येथील  कै. वसंतराव परांजपे हे अक्कलकोटचे सदगुरू गजानन महाराज यांच्या संपर्कात होते. 1985 च्या सुमारास गजानन महाराजांचे धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने रत्नापिंप्री (ता. पारोळा) येथे आगमन झाले. तेथे गजानन महाराजांनी त्यांना परिसरात अग्निहोत्राचा प्रचार- प्रसार करण्याचा संदेश दिला. महाराजांचा आदेश मानून परांजपे यांनी अग्निहोत्राच्या प्रचार- प्रसाराचे काम देशभर सुरू केले. महाराष्ट्रातील एक केंद्र रत्नापिंप्री येथेही सुरू करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ग्रामस्थांच्या व काही सहकार्‍यांच्या मार्फत त्यांनी तपोवनची रचना 1995 मध्ये केली.  प्रत्यक्ष 1997 पासून केंद्राचे काम सुरू झाले. आज या केंद्राला 16 वर्षे पूर्ण होत आहेत. सुमारे एक तपाच्या वाटचालीत तपोवनची ओळख संपूर्ण जगात होम थेरपी सेंटर म्हणून झाली आहे. या केंद्राचे व्यवस्थापन कै. परांजपे यांचे पूत्र श्री. अभय परांजपे (रा. धुळे) पाहतात. सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथील ब्रुस जॉन्सन आणि त्यांच्या पत्नी ऍन गॉडफ्रे यांचाही या केंद्राच्या व्यवस्थापनात सहभाग राहीला आहे. या दोघांनी अग्निहोत्र प्रचार- प्रसारासाठी आपले आयुष्यच समर्पित केले आहे.

तपोवनची रचना निसर्गशेतीचे सूत्र घेवून केली गेली. त्यामुळे येथील माळरानाच्या जमिनीवर निसर्ग फुलविण्याचे आव्हान वेदशास्त्राला आणि त्याच्या अनुयायांच्या समोर होते. रत्नापिंप्रीच्या काही ग्रामस्थांना हा प्रकल्प वेडेपणाचा वाटत होता. काही जण सोबत होते तर काही विरोधात होते. काहीशा खडकाळ, रुक्ष आणि निकस वाटणार्‍या जमिनीवर काय होणार?  याची उत्सुकता सार्‍यांना होती. आजचे तपोवन पाहिले म्हणजे काळाच्या प्रवाहात किती अनंत अडचणींचा सामना करावा लागला असेल याची कल्पना येते.

आज या खडकाळ जमिनीवर निसर्गशेती फुलली आहे. तालुक्यातील इतर ठिकाणापेक्षा या भागात पर्जन्याचे प्रमाण वाढले आहे. फळझाडे, फुलझाडे, भाजीपाला, रोपवाटीका, वनौषधी, धान्यपिके, हळद असे अनेक शेती उत्पादन येथे पाहता येते. या सार्‍याची उगवण आणि वाढ काढणी ही निसर्गशेती किंवा सेंद्रीय शेती पद्धतीनुसार केली जाते. ब्रुस आणि ऍन यांनी या सार्‍या स्वप्नवत रचनेच्या वास्तवपूर्तीसाठी आयुष्याची 15-16 वर्षे दिली.

शेतीसाठी पाणी हवे. जमिन खडकाळ असल्यामुळे पाण्याची अडचण होतीच. भविष्यातील आव्हान लक्षात घेवून तपोवन परिसरात पर्जन्य संधारणाचा कार्यक्रमही राबविण्यात आला. शेतातून वाहणार्‍या नाल्यातील पाण्याचे नियोजन केले गेले. कोरड्या विहारी भरल्या. नाल्यात जास्तकाळ पाणी टीकून राहू लागले. शेतीला पाणी मिळाले. निसर्गशेतीच्या संकल्पनेतील प्रयोगांनी हळूहळू परिसर बहरत गेला.

तपोवनचा मुख्य हेतू अग्निहोत्र शेती पद्धतीचा प्रचार- प्रसार हाच होता. त्यामुळे 25 मार्च 2001 पासून येथे अखंड महामृत्यूंजय मंत्र जागरचा प्रयोग सुरू झाला. तेथे सूर्यादय आणि सुर्यास्ताच्या समयपासून अखंड अग्रनिहोत्र सुरू असते.

निसर्गशेतीच्या सोबत मानवी जीवनशेलीही निसर्गदायी कशी होईल?  याचाही विचार करण्यात आला. त्यामुळे होम- हवन तंत्र शिकण्यासोबतच मातीच्या घरांची निर्मिती, गांडूळ खत निर्मिती, सेंद्रिय पद्धतीने बी- बियाणे निर्मिती, रोपांची निर्मिती हेही प्रयोग सुरू झाले. होम हवनसाठी गाईचे तूप लागते म्हणून गोशाळा सुरू झाली.  आज गोशाळेत 125 वर गाई असून तेथे दुधासह गावराण तूप व ताकाची मुबलक उपलब्धता आहे. यापैकी कोणत्याही उत्पानाची विक्री मात्र केली जात नाही.

तपोवनातील सेंद्रीयशेती व्यवस्थापन अनुभवताना एक बाब लक्षात येते, ती म्हणजे परिसरात जास्वंदाची खूप झाडे आहेत. विविध रंगी फुले नेहमी ताजी, टवटवीत दिसतात. यामागील कारण विचारले असता सांगण्यात येते की, जास्वंदावर मावा, बुरशी आदी रोगांचा प्रादुर्भाव सहज होतो. त्यामुळे झाड लवकर नष्ट होते. तपोवन परिसरात कोणत्याही रासायनिक किटनाशकांचा किंवा खतांचा वापर होत नसल्यामुळे येथे जास्वंद नैसर्गिक पद्धतीने वाढले असून आजपर्यंत एकही झाड कशामुळेही नष्ट झालेले नाही. हीच बाब तपोवनमधील रोपवाटीकेतील पोरनिर्मितीला लागू होते. तेथील भाजापालाही टवटवीत असतो. मध्यंतरी कोरफड व हळद लागवडीचा प्रयोग ही करण्यात आला.


तपावेनच्या जागेची निवड कशासाठी ?

तपोवनच्या रचनेसाठी सध्याची जागा का निवडली या विषयी सांगण्यात येते की, 1985 च्या सुमारास रत्नापिंप्री येथे मंदिरातील मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सदगुरू गजानन महाराज यांचे रत्नापिंप्रीला आगमन झाले होते. तेव्हा त्यांना येथील तप भूमीविषयी साक्षाःत्कार झाला. त्यांच्या प्रेरणेतून शिवधाम मंदिर आणि तपोवनची निर्मिती करण्यात आली. या भागात प्राचिनकाळी ऋषीमुनींचा वास होता. नेहमी जप- तप, होम- हवन सुरू असायचे. तपोवनमध्ये सध्या कोणतेही खोदकाम केले तर तेथे भस्म आढळून येते. म्हणूनच परांजपे यांनी केंद्राला तपोवन हेच नाव दिले. आज तपोवनमधील निसर्गदायी शेतीची माहिती घेण्यासाठी 50 हून अधिक देशांचे हजारो प्रतिनिधी येवून गेले आहेत. ऑस्टे्रलिया, जर्मनी, अमेरिका, चिली या देशांमध्ये अखंड अग्निहोत्र केंद्र सुरू आहेत. परांजपे यांना 14 भाषा अवगत होत्या. त्यामुळे त्यांनी समाजाला अत्यंत प्रभावीपणे आणि सप्रयोग अग्निहोत्राची गरज समजावून दिली. सन 2004 मध्ये तपोवनमध्ये बार्शीच्या श्रीयोगीदान वेद, विज्ञान आश्रमातर्फे पर्जन्य जाग झाला. त्यानंतरच्या अनुभवातून परिसरात दरवर्षी सरासरी पावसाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे.


काय आहे अग्निहोत्र?

तपोवनमध्ये अखंड अग्निहोत्र सुरू असते. कर्मकांडाचा भाग समजली जाणारी ही पद्धत वैदिक विधीतील विज्ञान प्रक्रिया आहे.  अग्निहोत्र म्हणजे ठिक समयी पवित्र पद्धतीने प्रज्वलित केलेल्या अग्नित आहुती देणे. अग्निहोत्र हे उलट्या पिरामीड आकाराच्या ताम्र पात्रात केले जाते. यात तांदूळ (अक्षत), गायीचे तूप, गाईच्या शेणापासून केलेल्या गोवर्‍या याची महा मृत्यूंजय मंत्रोच्चारात आहुती दिली जाते. यासाठी सूर्यादय व सुर्यास्ताची अचूक वेळ साधवी लागते.

अग्निहोत्र सुरू असताना ताम्रपात्राच्या भोवती प्रंचड चुंबकीय ऊर्जा निर्माण होते. ही पवित्र ऊर्जा परिसरातील विघातक ऊर्जा (रेडीएशनचा प्रभाव असलेली किरणे) निष्क्रिय करते. हवनासाठी वापरलेल्या गाईचे तूप, गोवर्‍या व अक्षत यामुळे औषधी धूर निर्माण होतो. तो मानवी आरोग्यासाठी हितकारक असतो. त्यामुळे श्वसन विकार दूर होतात.

अग्निहोत्रामुळे मेंदुतील पेशी प्रसन्न होवून मज्जासंस्था कार्यप्रवण होते. रक्त शुद्धी होते. त्वचा चैतन्यदायी होते. फुफ्फूस, हृदय, रक्तप्रवाह यावर अप्रत्यक्ष परिणाम होतो. असाच रिणाम परिसरातील वृक्ष, वेली, झुडुपांवरही होतो.


अग्निहोत्र करताना मंत्र कसे म्हणावेत?

अग्निहोत्र दिवसातून दोन वेळा करतात. ते सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अचूक वेळेवर करावे. यासाठी तपोवनमध्ये संपूर्ण जिल्ह्याचे अक्षांश व रेखांशनुसार सूर्योदय व सूर्यास्ताचे वेळापत्रक उपलब्ध आहे. अग्निहोत्र करताना पुढील मंत्र म्हणावेत-

सूर्योदयाच्यावेळी-

सूर्याय स्वाहा

(स्वाहा उच्चारणानंतर अक्षत व तूप मिश्रीत पहिला भाग अग्नित टाकावा)

सूर्याय इदम्‌ न मम

प्रजापतये स्वाहा

(स्वाहा उच्चारणानंतर अक्षत व तूप मिश्रीत दुसरा भाग अग्नित टाकावा)

प्रजापतये इदम्‌ न मम

सूर्यास्ताच्यावेळी-

अग्नये स्वाहा

(स्वाहा उच्चारणानंतर अक्षत व तूप मिश्रीत पहिला भाग अग्नित टाकावा)

अग्नये  इदम्‌ न मम

प्रजापतये स्वाहा

(स्वाहा उच्चारणानंतर अक्षत व तूप मिश्रीत दुसरा भाग अग्नित टाकावा)

प्रजापतये इदम्‌ न मम


तपोवनातील गोधडी शिवण केंद्र

ब्रुस आणि ऍन यांनी तपोवनात काम करीत असताना परिसरातील महिलांना गोधडी शिवण्याचा एक अनोखा रोजगार दिला. मॅगसेस पुरस्कार विजेत्या व अलिकडे पद्मश्री मिळालेल्या बहादरपूरच्या खानदेशकन्या निलीमा मिश्रा यांच्या बचत गटांच्या माध्यमातून ही गोधडी देशाच्या बाहेर सातासमुद्रापार पोहचली.

ऍन या फॅशन डिझाईनर आहेत. त्यांनी कारखान्यातील चिंधी कापडाचा उपयोग करुन गोधडी, पर्स आणि महिलांचे कपडे शिवण्याचे काम सुरू केले. महिलांना शिवणकाम कसे करायचे याचे प्रशिक्षण दिले जाते. शिवणकामाचे डिझाईन दिले जाते. त्याप्रमाणे महिला शिवणकाम करतात. आपल्याकडे ग्रामीण भागात जुन्या कपड्यांची गोधडी शिवतात. या केंद्रीतील गोधडी नव्या कपड्यांची असते. जुन्या गोधडीत उब मिळावी म्हणून पुरण (जुन्या कापडाची भर असते). तो प्रकार या गोधडीत नसतो. विविध कापडांचे तुकडे वापरून तयार होणारी गोधडी लक्ष वेधून घेते. परदेशात स्थायिक भारतीय ती खरेदी करतात. त्वचेशी संबंधीत विकार असलेले ती घेतात. काही दानशूर मंडळी या गोधडींचे गरजूना वाटप करतात. सातासमुद्रापार गेलेल्या गोधडीची कहाणी वेगळीच आहे.


तपोवनसाठी संपर्क

तपोवनचे व्यवस्थापक म्हणून सध्या संजय पाटील (मो. क्र. 9923552154) पाहतात. केंद्राची शेत जमिन 22 एकर आहे. या केंद्राचे व्यवस्थापन फाईव्ह फोल्ड पाथ मिशन या ट्रस्टच्या माध्यमातून केले जाते. या ट्रस्टसाठी कोणतेही सरकारी अनुदान मिळत नाही. येथे माहिती घेण्यासाठी येणारे साधक देणगी स्वरुपात मदत करतात.No comments:

Post a Comment