Monday, 27 April 2015

'मधुकर’चा कलाटणी देणारा कौल

फैजपूर (ता. यावल) येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल कारखान्यातील सत्ताधारी आमदार हरिभाऊ जावळे यांच्या नेतृत्वातील ‘शेतकरी’ पॅनेलला धक्का देणारा ठरला. जावळे यांच्यासह त्यांचे सर्व २१ शिलेदार पराभूत झाले. लेवापाटीदार बहूल मतदारांनी ‘भुईसपाट’ या शब्दाचा प्रत्यय आणून देत दिलेला हा कौल सहकार क्षेत्राला निश्चितपणे कलाटणी देणारा आहे. ‘मधुकर’मध्ये आता दुसर्‍या पिढीतील नेत्यांच्या नेतृत्वात ‘लोकमान्य’ पॅनेलची सत्ता आली आहे. कारखान्याच्या स्थापनेपासून नेतृत्व करणारे स्व. मधुकरराव चौधरी यांचे चिरंजिव शिरीष चौधरी, कारखान्याचे सर्वाधिक काळ अध्यक्ष राहिलेले स्व. जे. टी. महाजन यांचे चिरंजीव शरद महाजन, माजी उपाध्यक्ष उल्हास निंबा चौधरी यांचे चिरंजीव अतुल चौधरी यांच्यासह रमेश विठ्ठल चौधरी, अरुण पाटील आदींकडे कारखान्याचे नेतृत्व आले आहे. कारखान्याची आर्थिकस्थिती ‘डबघाईच्या मार्गावर’ अशीच आहे. ४० कोटींचा तोटा, पाच कोटींची कामगारांची देणी, ऊसाचे घटलेले क्षेत्र आणि ऊस तोडणीचे बिघडलेले वेळापत्रक अशा अनंत अडचणी नव्या संचालकांच्या समोर आहेत. मात्र, प्रामाणिक प्रयत्न केले तर हा कारखाना पुन्हा उर्जितावस्थेत येवू शकतो. तसे घडले तर ‘मधुकर’चा पॅटर्न संपूर्ण राज्यासाठी आदर्श ठरू शकेल...
यावल, रावेर हे दोन्हा तालुके आणि भुसावळ तालुक्यातील नशिराबाद परिसरातील काही भाग असे मधुकर सहकारी साखर कारखान्याचे क्षेत्र आहे. या भागातील बहुतांश ऊस उत्पादक शेतकरी ‘मधुकर’ला गाळपासाठी ऊस देतात. या शेतकर्‍यांमध्ये लेवापाटीदार हा समाज मोठ्या संख्येत आहे. हा समाज शिक्षित, कष्टकरी आणि बर्‍यापैकी विवेक जागृत ठेवून काम करणारा आहे. कारखान्याच्या ४० वर्षांच्या वाटचालीत समाजाने काहीवेळा परिवर्तनाचे कौल यापूर्वीही दिले आहेत. तसाच कौल यावेळी निवडणुकीत दिला. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष, आमदार हरिभाऊ जावळे यांच्या नेतृत्वातील ‘शेतकरी’ पॅनेलचे सर्वच्या सर्व उमेदवार पराभूत झाले. कारखान्यांची सत्ता माजी आमदार सर्वश्री शिरीष चौधरी, अरुण पाटील, रमेश चौधरी यांच्यासह शरद महाजन आदींच्या ‘लोकमान्य’ पॅनेलच्या ताब्यात गेली आहे.

‘मधुकर’च्या निवडणुकांचा इतिहास पाहिला तर येथे सत्तेसाठी नेहमी तीन गटात लढती झाल्याचे दिसते. सत्तेसाठी निवडणुकीच्यापूर्वी ज्या दोन गटांची ‘हातमिळवणी’ होईल त्या गटांचे पॅनेल विजयी होताना दिसतात. मधुकर कारखान्यातच नव्हे तर लेवापाटीदार समाजातही दोन गट प्रामुख्याने दिसतात. पहिला गट हा स्व. मधुकरराव चौधरी यांचा राहिला. त्याचा वारसा शिरीष चौधरींकडे आहे. दुसरा गट स्व. जे. टी. महाजन यांचा राहिला. त्याचा वारसा शरद महाजन यांच्याकडे आहे. तिसरा गट हा भाजपप्रणित मंडळींचा आहे. पूर्वी त्याचे नेतृत्व डॉ. गुणवंतराव सरोदे यांच्याकडे होते. त्यांच्यानंतर जावळे यांनी नेतृत्व केले. जेव्हा-जेव्हा कारखान्याच्या निवडणुकीत महाजन-चौधरी किंवा भाजप-चौधरी अशी हातमिळवणी झाली तेव्हा-तेव्हा ‘परिवर्तन’ झाले. मागील निवडणुकीत महाजन-जावळे गटात लढत असताना चौधरी गटाने ऐनवेळी माघार घेवून भाजपला अप्रत्यक्ष मदत केली होती. मात्र, यावेळी महाजन, चौधरी आणि इतरही मान्यवर एकत्र आल्यामुळे जावळे यांच्या पॅनेलला ‘चारीमुंड्याचित्त’ होण्याचा अत्यंत कटू अनुभव घ्यावा लागला.
हे अपयश पक्ष म्हणून भाजपचे मुळीच नाही. तसेच जावळे आणि त्यांच्या ‘शेतकरी’ पॅनेलचा प्रचार करण्यासाठी दोन-तीन सभा घेणार्‍या महसूलमंत्री एकनाथराव खडसे किंवा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे मुळीच नाही. हा ‘नामुष्कीदायी’ पराभव जावळे आणि त्यांच्या सोबतच्या दोन-चार लोकांनी हातोपायी ओढवू घेतला आहे. त्याची कारणेही तशीच आहेत.

‘मधुकर’च्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर सत्ताधारी गटाने सलग तीनवर्षे ऊस पुरवठ्याचा मुद्दा मांडून विरोधकांमधील मान्यवरांचे उमेदवारी अर्ज बाद करण्याची खेळी केली होती. मात्र, या संदर्भातील पोटनियम दुरूस्ती केल्यानंतर सभासदांना ऊस लागवडीचा किमान तीनवर्षांचा कालावधीच दिला गेला नाही, हा मुद्दा साखर संचालकांच्या समोर प्रभावीपणे मांडण्यात आला. नंतर सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. तेथेच सत्ताधारी गट निवडणूक हरल्यागत दिसत होता. कारण, कारखान्यातून जावळे आणि त्यांच्या समर्थकांना घालविण्यासाठी चौधरी-महाजन-पाटील-नारखेडे हे एकत्र आल्याचा संदेश दिला गेला. यापैकी डिगंबरशेट नारखेडे हे स्थापनेपासून या कारखान्यात संचालक असून ते अत्यंत निस्पृही व्यक्तिमत्व म्हणून लेवापाटीदार समाजात ओळखले जातात. त्यांनी ही निवडणूक लढविली नाही पण आपले समर्थन ‘लोकमान्य’ पॅनेलला असल्याचे प्रचारातून दाखवून दिले. या सर्वांची एकत्र शक्ती जावळेंच्या विरोधात जाणार हे दिसत असतानाच निकाल काय लागणार हे जवळपास निश्चित झाले होते.
जावळेंच्या ‘शेतकरी’ पॅनेलसाठी खडसे यांनी काही ठिकाणी सभा घेतल्या. पण, लोकसभेच्या यावल-रावेर मतदार संघातील खासदार रक्षाताई खडसे कुठेही प्रचारात दिसल्या नाहीत. कारण, लोकसभा निवडणुकीत शिरीष चौधरी, रमेश चौधरी, शरद महाजन, अरुण महाजन आदींनी अप्रत्यक्षपणे श्रीमती खडसेंना मदत केली होती. या सर्वांचा अंतर्गत विरोध राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार मनीष ईश्वरलाल जैन यांना होता. तसेच, कॉंग्रेसचे बंडखोर डॉ. उल्हास पाटील यांच्यावरही लेवापाटीदार समाज व लेवा पंचायतीचा नाराजी होतीच. श्रीमती खडसे म्हणूनच कारखान्याच्या निवडणुकीत प्रचारात कुठेही दिसल्या नाहीत. श्रीमती खडसे यांना भाजपची उमेदवारी मिळत असताना जावळे यांनीही कुठेतरी विरोधाचा सूर लावल्याची चर्चाही काही जण खासगीत करतात. ही बाब लक्षात घेता आणि जावळेंच्या काळात झालेली कारखान्याची दूरावस्था पाहून खडसेसुद्धा जावळेंच्या पॅनेलसाठी फारसे सकारात्मक नव्हतेच. पण, महाजन प्रचारात आले आणि खडसेंनाही जावे लागले, हेही तेवढेच खरे आहे.

सत्ताधारी मंडळींचा जेव्हा पराभव होतो तेव्हा त्यांनी केलेल्या कामाचे फळ त्यांच्या पदरात मतदार टाकतात असे कोणीही म्हणू शकते. जावळे यांच्याबाबतीत तसेच झाले आहे. गेल्या पाचवर्षांत ‘मधुकर’ अक्षरशः रसातळाला गेला. एवढी वाईट अवस्था या कारखान्याची कधीही नव्हती. जावळेंच्या काळात नामुष्कीचे अनेक मापदंड रोवले गेले. त्यात भरीसभर म्हणून डॉ. आर. एम. चौधरी उर्फ रमेश मोतीराम चौधरी यांच्या मनमानी कारभाराच्या कहाण्या नेहमी चर्चेत राहिल्या. डॉ. चौधरी यांचे जळगाव-कारखाना ‘अप-डाऊन’ हा कळीचा मुद्दा होता. नितीन भोजराज राणे यांच्यासारख्या माहितगार संचालकाला बाजूला ठेवण्यात आले. ऊसाच्या भावाचा प्रश्न नेहमी अडचणीचा ठरला. यात सरकारचे धोरण काही प्रमाणात कारणीभूत असले तरी जावळे यांनी खासदार आणि आमदार असताना कारखान्याच्या दैनंदिन कामकाजाकडे केलेले दुर्लक्ष घात करणारे ठरले. कारखान्यात आर्थिक आणि गाळपाचे नियोजन पूर्णतः कोलमडले. जवळपास २० महिने गाळप हंगाम लटकला. ‘गेटकेन’च्या ऊसावर जादा खर्च झाला. यावल तालुक्यातील नायगावचा ऊस मुक्ताईनगर कारखान्यात गेला तर घोडगाव (ता. मुक्ताईनगर) चा ऊस ‘मधुकर’साठी आणण्यात आला. यात कारखान्याची आर्थिक कोंडी झाली. प्रशासकिय खर्च वाढला. तोटा हळूहळू ४० कोटींपर्यंत पोहचला. स्व. जे. टी. महाजन यांनी स्वतः किंवा स्व. मधुकरराव चौधरी यांच्या नेतृत्वात काम करणार्‍या समर्थकांनी एवढे घोळ कधीही केले नाहीत.
जावळे यांच्या कार्यपद्धतीविषयी ऊस उत्पादक मतदार किती नाराज होते हे दाखवून देण्यासाठी तीन उदाहरणे पुरेशी आहेत. पहिले म्हणजे लोकमान्यमधून सर्वसाधारण गटातून शालिनी हेमंत महाजन (सावदा) आणि शैला काशिनाथ चौधरी (खिरोदा) या दोघी विजयी झाल्या. या दोघी एकदाही प्रचारात सहभागी झाल्या नाहीत किंवा त्यांचे कुटुंबियसुद्धा प्रचारासाठी फारसे फिरले नाहीत. मात्र, या दोघींच्या समोर असलेल्या प्रस्थापित डॉ. आर. एम. चौधरी व सावद्याचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र श्रीकांत चौधरी यांचा दारूण पराभव झाला. तसाच मतदारांनी ठरवून धक्कादायक निकाल फैजपूरचे नगराध्यक्ष (नगरपती) निलेश राणे आणि कृषी सभापती नितीन चौधरी यांच्यात रंगला. यात राणे यांचा सर्वाधिक मताधिक्याने पराभव झाला. हे तीन निकाल मतदारांची मानसिकता दाखवतात.

जावळेंच्या पराभवाची इतरही कारणेे आहेत. ती स्वतंत्रपणे चौकटीत देत आहोत. त्यापैकी विशेष उल्लेखनीय अशी ः २००९ पासून कामगार, ठेवीदार, तोडकरी आणि वाहतुकदार यांची देणी पहिल्यांदा थकली. जेव्हा कारखाना जावळे यांच्या ताब्यात आला तेव्हा २०-२२ कोटी तोटा होता पण, कारखान्याच्या गोदामात सुमारे ३५ कोटी रुपयांचा साखर साठा शिल्लक होता. असे हातात असूनही जावळे आणि मंडळी परिस्थिती सुधारू शकले नाहीत.  २००२-०३ मध्ये डिंगबरशेट नारखेडे यांनी कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सुमारे १८ कोटींच्या ठेवी उभ्या केल्या होत्या. त्यातून कारखाना सावरला होता. जावळे तसे काही करू शकले नाहीत. गेल्या पाच-सहा वर्षांत साखरेसंदर्भात केंद्र व राज्य सरकारचे धोरणही बदलत गेले. त्यात साखर उद्योगाला फटका बसत गेला. त्याचवेळी कारखान्याला मळी विक्रीतूनही फारसे उत्पन्न मिळाले नाही. अशा एक ना अनेक कारणांमुळे जावळेंची कारकिर्द अपयशी-अयशस्वी ठरत गेली. त्याचा अंतिम परिणाम दारूण पराभवात झाला हे सांगायला नको.

निवडणूक प्रचाराच्या काळात ‘शेतकरी’ पॅनेल आपल्या अडचणींची कहाणीही नीटपणे मांडू शकले नाहीत. दुसरीकडे ‘लोकमान्य’ पॅनेलने अनेक आरोपांचा आकडेवारीसह ऊहापोह केला. अशातच समाजातील ज्येष्ठ नेत्यांचा अवमान करणारा मजकूर व्हाट्स अप सारख्या सोशल मीडियातून डॉ. आर. एम. चौधरी यांनी पाठवला. त्यातूनही वादाची ठिणगी पडली. अखेर डॉ. चौधरी यांना माफी मागावी लागली. सत्ताधार्‍यांचा हा प्रवास पराभवाकडे जाणारा होता आणि घडलेही तसेच.
‘मधुकर’ ची सध्याची अवस्था फारशी चांगली नाही. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतही बदलाचे वारे आहे. तेथे येणारी नवी मंडळी कारखान्याकडे कशा प्रकारे पाहाते हेही कालांतराने दिसेल. पूर्वी स्व. जे. टी. महाजन, स्व. प्रल्हादराव पाटील,  सुरेशदादा जैन यांचे जिल्हा बँकेत जिव्हाळ्याचे संबंध होते. हवा तेव्हा कारखान्यास पैसा मिळायचा. आता एकनाथराव खडसे यांच्या सहकार्यावर परिस्थिती अवलंबून राहील, असे दिसते. खडसे-शिरीष चौधरी असे सहकार्याचे नवे संबंध निर्माण झाले तर ‘मधुकर’ मध्ये परिवर्तनाचे नवे पर्व सहज सुरू होईल असे आश्वासकपणे म्हणता येईल.

शिरीष चौधरींची समजदारी

‘मधुकर’ कारखान्याच्या निवडणुकीत स्व. मधुकरराव चौधरी यांच्या नेतृत्वात एकदाच मोठे यश मिळाले होते. तेव्हा ऍड. पी. एन. चौधरी हे अध्यक्ष झाले होते  आणि त्यांचीही नंतरची कारकिर्द वादग्रस्त ठरली होती. स्व. मधुकरराव चौधरी विधानसभाध्यक्ष असताना झालेल्या नंतरच्या निवडणुकीत स्व. जे. टी. महाजन यांनी पुन्हा कारखाना जिंकला होता. नंतरच्या काळात स्व. चौधरी गट थेट विरोधात लढण्याच्या ऐवजी इतरांशी हातमिळवणी करू लागला. स्व. मधुकरराव आणि स्व. जे. टी. महाजन हे कारखान्यात एकत्र कधीही लढले नाहीत. पण, त्यांचे वारस असलेले शिरीष चौधरी आणि शरद महाजन हे पहिल्यांदा एकत्र आले आणि लढले. त्यांनी जावळेंची सद्दी संपवून टाकली. येथे एक नोंद महत्त्वाची आहे. ती म्हणजे, शिरीष चौधरी यांनी स्वतः उमेदवार होणे टाळले. खरेतर शिरीष चौधरी यांची आमदारकी जावळेंनी हिरावली आहे. त्यामुळे कारखान्याच्या अध्यक्षपदावर लक्ष ठेवून चौधरी लढू शकले असते. ते त्यांनी समजदारीतून टाळले. ‘मी उमेदवार राहीलो तर अध्यक्ष कोण होणार? हा किंतू-परंतू लोकांच्या मनात निर्माण होवून दगाफटका होईल. त्यापेक्षा मी बाजूला थांबतो’ अशी भूमिका चौधरींनी घेतली. ती योग्य ठरली हे आज निकालावरून दिसते आहे.


शेतकरी पॅनलच्या पराभवाची कारणे

विद्यमान चेअरमन तथा आमदार हरिभाऊ जावळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी पॅनल तयार करण्यात आले होते. मात्र त्यांच्या पॅनलला या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही.
नऊ-दहा महिन्यांपासून कामगार, हंगामी कामगारांचे थकलेले पगार
ऊसाची वेळेवर उचल न होणे, ऊस उचल करतांना शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणावर झालेला त्रास.
कारखान्याने उभे केलेले पाच प्रकल्प अद्यापही बंदावस्थेत असून त्यामुळेच कारखान्याच्या तोटात झालेली वाढ.
काही संचालकांच्या मनमानी कारभाराकडे झालेले दुर्लक्ष.
निवडणुकीत नियोजनाचा असलेला अभाव, पक्षातील दुफळीकडे झालेले दुर्लक्ष.
नगरपालिका निवडणुकीत ज्यांच्यावर टीका झाली त्यांनाच पॅनलमध्ये समावेश.
कारखाना तोट्यात घालून तो बंद करीत स्वत: गिळंकृत करण्याची व मुक्ताई शुगर कारखान्याला मदत होत असल्याची अफवा.
क्षेत्राबाहेरील ऊसाची उचल होत असल्याने शेतकरी नाराज.
खासदार रक्षाताई खडसे यांची प्रचारातील अनुपस्थिती.

लोकमान्य पॅनलच्या विजयाची कारणे

माजी आमदार शिरीष चौधरी, रमेश चौधरी, अरुण पाटील, डिगंबर चौधरी, शरद महाजन यांच्या नेतृत्वाखाली लोकमान्य पॅनलची स्थापना करण्यात आली. पॅनलला निवडणुकीत मोठा विजय संपादन करण्यात यश आले.
कॉंग्रेसधील गटबाजीला दिलेली तिलांजली.
जे.टी. महाजन, मधुकरराव चौधरी यांच्या विचारांची प्रेरणा.
महिला राखीव गटाच्या नंतरही महिलांना संधी.
कारखान्यातील मनमानीविरुद्ध मतदारांमध्ये केलेली जनजागृती.
बिनविरोध निवडीचा डाव हाणून पाडला आणि मतदारांना नव्या योजनांची माहिती योग्य पद्धतीने पोहचविली.
डॉ.आर.एम. चौधरी यांनी जाहीरपणे मागितलेली माफी पथ्यावर.
नेत्यांनी कुणावरही व्यक्तीगत टीका केली नाही.
कारखान्याच्या हितासाठी असलेला आराखडा.
कामगारांनी उघडपणे दिलेला पाठींबा.
ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या व्यथा दूर करण्याचे आश्‍वासन.

No comments:

Post a Comment