Friday 3 April 2015

त्र्यंबकेश्वरची ब्रह्मगिरी प्रदक्षिणा

त्र्यंबकेश्‍वरला श्रावणातील तिसर्‍या सोमवारच्या ब्रह्मतगरी प्रदक्षिणेला पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. दरवर्षी एकलाखावर भाविक या खडतर प्रदक्षिणेत सहभागी होतात. श्रावण महिन्यात दर सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी प्रदक्षिणा घालण्यासाठी बाविक गर्दी करतात. पुण्यदायी, मोक्षाकडे सन्मार्गाकडे नेणारी प्रदक्षिणा म्हणून बाविकांचा समज आहे. ‘भोलेहरऽऽऽ’च्या जयघोषाने त्र्यंबक परिसर दुमदुमला जातो. दरवर्षी सुमारे लाखावर भाविक ही प्रदक्षिणा पूर्ण करतात. ही प्रदक्षिणा करण्याची परंपरा अतिप्राचीन आहे.


 

सातशे वर्षांपूर्वी श्री संत निवृत्तीनाथ महाराज व संत ज्ञानेश्‍वर, सोपान, मुक्तबाई यांनी प्रदक्षिणा करून जगाला वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सन्मार्ग सांगितला. त्याच मार्गाने आजही जनतेची वाटचाल सुरू आहे.
या प्रदक्षिणेत वृद्धांचा मोठा सहभाग असतो. यात सहभागी होणारे 75 टक्के भाविक असले तरी 25 टक्के मंडळी सहल म्हणून प्रदक्षिणा करतात. 80 टक्के भाविक नेहमी येणारे असतात तर तर 20 टक्के भाविक दरवर्षी नव्याने येतात.
सह्याद्रीच्या पर्वत रांगेत पंचलिंग पट्ट्यात पर्वतराज ब्रह्मगिरी असून या पर्वतावरुनच पवित्र गोदामाईचा उगम झाला आहे. पंचलिंग डोंगरातून पाच नद्यांचा उगम झाला आहे. यात अहिल्या, गोदावरी, त्र्यंबकेश्‍वरी संगम घाटात दृष्टीत पडतात तर बाणगंगा वैतरणा यांचा संगम धाडोशीनजीक गणपती मंदिराजवळ दृष्टीस पडतो. येथे स्नान करून प्रदक्षिणार्थी पुढची वाटचाल करतात.
गोदावरीने महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम केले. पंचनद्यांनी इगतपुरी पट्टा हरित केला. वैतरणा नदी, धरण मुंबईकरांसाठी जीवनदायी ठरली. गोहत्येचे पातक नष्ट करण्यासाठी महर्षी गौतमांनी येथे प्रदीर्घ तपश्‍चर्या केली व गंगेला शिवशंकराच्या जटेतून भूलोकी आणलेे. अशा रितीने गोदावरीचा उगम झाला. श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज, संत ज्ञानेश्‍वर, सोपान, मुक्ताई हे चौघे भावंड प्रदक्षिणा करीत असतांना वाटेत त्यांच्या पाठीमागे वाघ लागल्याने जंगलात या भावंडांची ताटातूट झाली. संत निवृत्तीनाथ बचाव करण्यासाठी गुरू गहिनीनाथांच्या गुहेत शिरले. तिथेच संत निवृत्तीनाथांना नाथ संप्रदायाची दिक्षा गहिनीनाथांनी दिली. धर्माचे (आजच्या भागवत व वारकरी संप्रदाय) जनकल्याणाचे कार्य संत निवृत्तीनाथांनी केले. या पौराणिक कथेनुसार ब्रह्मगिरी प्रदक्षिणा निराकार भावनेतून करावी. परमेश्‍वर व निसर्गाशी एकरुप व्हावे. मानवी जीवनाचे कल्याण व्हावे, सर्व समाजाने एकत्र येऊन धार्मिक वृत्ती जोपासून देशचे कल्याण करावे. ही उदात्त शिकवणही प्रदक्षिणा देते. ‘त्र्यंबक महात्म्य व त्र्यंबकराज निवृत्ती विजय’ या ग्रंथात प्रदक्षिणेचे महत्त्व वर्णिलेले आहे. पेशवे काळात गुन्हेगारांना शिक्षा म्हणून उपप्रदक्षिणा घालण्यास सांगितले जात असे.


कुशावर्तावरून प्रदक्षिणेला ब्रह्ममुहूर्तावर प्रारंभ करावा. प्रयागतीर्थ, पहिणे बारी, भिलमाळ, कोजुर्ण धाडोशी गांवावरुन तेथे उजव्या हाताने वळण गौतमाचा धस (गौतमाचे मंदिर) तळेगांव धरणाजवळून नमस्कार, सापगांव शिवार, गणपत बारी, पुन्हा त्र्यंबकेश्‍वर असा छोट्या प्रदक्षिणेचा मार्ग आहे. ब्रह्मगिरी, गंगाद्वार, नीलपर्वत, पंचलिंंग डोंगर, गौतम धस, लग्नस्तंभ डोंगर, दुर्गा भांडार, मेटघेर किला अशा डोंगरांनाही प्रदक्षिणा होते. रामतीर्थ, बहुतीर्थ, वैतरणा, बाणगंगा, भागिरथी तीर्थ, अंकुर तीर्थ, भुजंग तीर्थ, नरसिंहतीर्थ इ. तीर्थ मंदिरे प्रदक्षिणा मार्गात लागतात व हे अंतर 24 कोसाचे आहे. धाडोशीच्या नवीन पुलावरुन अथवा सामुंडी गावावरुन मासळी घाट, हर्षेवाडी डोंगर, यात हरीहर डोंगर किल्ला यात नागमोडी रडकुंडी यामार्गावर मोठी प्रदक्षिणा केली जाते.
हरीहर पायथ्यानजीक मोठे सरोवर आहे. पुढे लेकुरवाळी देवीपर्यंत यावे लागते. या प्रदक्षिणा मार्गात विविध 108 तीर्थ लागतात. शेवाळावरुन चालणे, नितळ थंड पाण्यात स्नान करणे, धुक्यात वाटचाल तर नागमोडी व रडकुंडी येथे विषववृत्तीय जंगलाची अनुभूती, सूर्यदर्शन जवळपास नाही, अशा अवर्णनीय वातावरणात मोठी प्रदक्षिणा करण्यात येते. यासाठी गाईड अथवा जाणकार सोबत हवा. निसर्ग फेरी करा, निसर्गाशी एकरुप व्हा व ईश्‍वराचे लाभ स्मरण करून जीवन समृद्ध करा अशी शिकवण या प्रदक्षिणेतून मिळते. हर हर गंगे ऽऽऽ असा गगनभेदी जयघोष मोठ्या प्रदक्षिणेत केला जातो. ही प्रदक्षिणा करताना तुमच्या सादाला निसर्ग प्रतिसाद देतो याचा अनुभव येईल.

No comments:

Post a Comment