Sunday 5 April 2015

७/१२ अॅट व्हाट्स अॅप टू फेसबुक

ध्या समुह चाळ्यांचे व्यक्तिगत माध्यम असलेल्या व्हाट्स ऍपवर कोण कशाची चर्चा करेल सांगता येत नाही? परवा आमच्या कान्हदेश गृपवर ‘सातबारा’ या विषयावर अशीच चर्चा रंगली. एकाने सातबारा नाव कसे तयार झाले? याची पोस्ट शेअर केली. त्यानंतर सदस्यांची चर्चा रंगली ती शेतीच्या आठवणींवर. गृपमधील काही सदस्यांचा शेतीशी संबंध आहे. कोणी कधीतरी शेतीत काम केले आहे. त्या आठवून रात्री उशिरापर्यंत विषय चर्चेत होता. शेती परवडत नाही पासून कोरवाडू शेतकर्‍यांचे आजचे प्रश्‍नही मांडले गेले. एका सदस्याने हा विषय व्यापक समूह चाळ्यांच्या फेसबुकवर नेला आणि विषय गंभीरही झाला...


सध्या माझ्या डोक्यावर अटकेची आणि त्यानंतर हद्दपारीची टांगती तलवार आहे. अतीउच्चशिक्षित गुरूने माझ्या विरोधात न्यायालयात फौजदारी गुन्हा टाकला आहे. तेथे जामीन द्यावा लागणार आहे. त्यानंतर एका हिस्ट्री सिटरने मला अटक करून थेट हद्दपार करण्याची मागणी केली आहे, असा दुहेरी अडचणीत मी आहे. त्यामुळे न्यायालयीन किंवा जामीनाच्या कामासाठी माझ्या डोळ्यांसमोर दिवस-रात्र सातबारा फिरत असतो. आज-काल जो समोर दिसेल त्याला मी विचारतो,’बाबारे तुझ्याकडे सातबारा आहे का?’ माणसाला भय असे अस्थिर करते त्याचे हे उदाहरण.
परवा रात्री वकिल मित्र केतन ढाके यांनी आमच्या कान्हदेश गृपमध्ये सातबारा म्हणजे काय? हे स्पष्ट करणारी एक पोस्ट टाकली. मी ती वाचत होतो, सातबारा हा शब्द अहिल्याबाई होळकर यांच्या ‘गावकी’ च्या व्यवस्थेतून तयार झाला. त्यांनी गरीबांना काम आणि निर्वाहाचे साधन मिळावे या हेतूने सरकारी खर्चाने गरीबांच्या घरासमोर १२ फळझाडे लावली. ही फळझाडे घरमालकाने वाढवायची. त्यातील ५ झाडांच्या फळांचे उत्पन्न सरकारला द्यायचे आणि उरलेल्या ७ झाडांच्या फळांवर आपला उदरनिर्वाह चालवायचा. या झाडांची नोंद ज्या दप्तरात केली जात असे त्याला ‘सातबारा’ म्हणत. तेथून घरांच्या उतार्‍यांनाही सातबारा नाव मिळाले.
मी सतत जामीनासाठी चिंतीत असल्यामुळे म्हटले, मला सातबाराची माहिती नको पण, जामीनासाठी सातबारा हवा. त्यावर आमचे मित्र जैन उद्योग समुहाचे उपाध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी पोस्ट टाकली, सातबारा हवा तर त्यासाठी जमीन हवी. मी सहज उत्तर दिले, गावाकडे जमीन आहे. लहानपणी शेतजमीनीत थोडेफार काम केले आहे आणि इतरांना काम करताना पाहिलेही आहे. एवढ्या दोन ओळींच्या संवादातून विषय विस्तार होत गेला.
मी म्हटले, लहानपणी आम्ही काकांच्या सोबत रात्री शेतात गेलो आहोत. तेव्हा चार्जेबल पूनम बॅटरी प्रसिद्ध होती. पाटाचे पाणी रात्री येणार म्हणून आम्ही ३/४ बॅटरी घेवून गहू, कपाशीला पाणी भरायला जात असू. माझे काम बांधावर बसून बॅटरी सांभाळणे असे. कारण शेतात इतरत्र किर्रर्र अंधार असे. रात्रीचे काम असल्यामुळे सोबत चहापत्तीचे १०/२० पैशांचे पाकिट, बाटलीत थोडे दूध आणि गूळ न्यावा लागे.
त्यावर अशोकभाऊंनी पोस्ट  टाकली, मी सुद्धा वाकोदला अजिंठ्याच्या पायथ्याला असलेल्या शेतात जायचो. तेथे शेतात मोट चालविली. ट्रॅक्टरने नांगरणी केली. पिकांना पाणी दिले. गाई-म्हशींचे दूध काढले. ज्वारीची भाकरी, लसणची चटणी आणि कांदा खाल्ला.
नंतर चर्चेत आले डॉ. राधेश्याम चौधरी. त्यांनी पोस्ट टाकली, एमबीबीएससाठी माझी निवड झाल्याचे पत्र जेव्हा घरी आले तेव्हा मी शेतात कपाशीला पाणी भरत होतो. मे महिन्याच्या उन्हात भुईमूग काढायला जायचो. आमच्या चर्चेत सर्वांत लहान सदस्य कल्पिता रमेश पाटील ही सुद्धा सहभागी झाली. तीने पोस्ट टाकली, रविवारी सुटीच्या दिवशी आजीसोबत कापूस वेचायला जायचे. तेथे बोर आणि चिंचा खाण्याची मज्जा यायची. हरभरा भाजून खाणे खूप आवडायचे.
सरिता माळीसुद्धा चर्चेत उतरल्या. त्यांनी पोस्ट केले, मी सुट्यांमध्ये नेहमी शेतात जायची. पण, एकदा शेतात असताना खूप गारपीट झाली. कापूस वेचणार्‍या बायांनी मला एका पोत्यात कोंबून ठेवले. त्याचवेळी शेतात इतर जनावरे शिरली. शेत मालक आम्हाला रागावला. अशोकभाऊंनी पुन्हा पोस्ट टाकली. गेल्या दिवाळीत लक्ष्मीपूजन झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी आमचे कुटूंंब एकत्र शेतात गेले होते. वाकोदच्या शेतात जवळपास १०० जण जमले होते.
जळगावहून सिंधूदुर्गला गेलेले मित्र पोलीस निरिक्षक विश्‍वजित काईंगडे हेही सहभागी झाले. त्यांनी पोस्ट टाकली, लहानपणी आम्ही विहीरीत पोहण्यासाठी म्हशीच्या अंगावरून उड्या टाकत असू. मधल्या काळात इकडे वर म्हैस पिकांत घुसायची. आम्हाला शेत मालक रागवायचा.
डॉ. महेंद्र काबरा हे २४ तास व्हॉट्स ऍपचा वापर करतात. तेही संवादात घुसले. त्यांनी पोस्ट केले, आमच्या शेतात गुर्‍हाळ होते. बादलीभर रस काढायचो. उसाच्या टीपर्‍याला गरम कच्चा गूळ (मलई) लावायचो. तो खाताना जीभ भाजायची.
प्रा. शिल्पा बेंडाळे यांनीही अनुभव सांगितले. मी मामाच्या गावात शेतीच्या अनेक कामांचा अनुभव घेतला.
आमच्या चर्चेला गंभीर वळण आणले ते ज्येष्ठ रंगकर्मी तथा सरकारी ठेकेदार शंभूअण्णा पाटील यांनी. त्यांनी खूपवेळ टाईप करून पोस्ट टाकली. प्रतिक्रिया देणारे वरचे सर्व शेतकरी बागायती होते. आम्ही कोरडवाहू होतो. शेतात प्यायचे पाणी घरून न्यायचो. माझ्या शेतीच्या आठवणी रम्य नाहीत. उध्वस्त कुटूंब, भंगलेला गाव, रेतीसाठी कोरलेली नदी, कोरडा किनारा, विझलेली माणसे, व्यसनाधीन तरुण, भविष्य न कळलेला कुणबी गावात राहीला आणि हुशार माणसे गाव सोडून गेली. फक्त कष्ट आणि समाज असे लोक टिकले आहेत.
उशीरा ऍड.जमील पटेल यांनीही पोस्ट टाकली. आमची शेती पाळधीला आहे. मी सुद्धा रात्री पाटचारीतून पाणी भरायला जायचो. आता रविवारी शेतात जातो.
रात्री उशीरापर्यंत संवाद साधणारे डॉ. राजेश पाटील हेही चर्चेत उतरले. त्यांनी पोस्ट टाकली. माझे आजोबा प्राथमिक शिक्षक होते. उपखेडे (ता. चाळीसगाव) येथे शेती होती. मी कधी शेतात गेलो नाही. पण शेतकर्‍यांची आजची अवस्था पाहून जीव तुटतो.
शंभूण्णांनी पुन्हा पोस्ट टाकली. जळगावचे सुप्रसिद्ध डॉ. प्रताप जाधव आजही शेतात काम करतात. दर रविवारी हा माणूस शेतकर्‍यापेक्षा जास्त राबतो.
चर्चेचा सूर येथे थोडा गंभीर झाला. काईंगडे, शंभूअण्णा भावूक झाले. पुन्हा सविता बोरसे भुईमुगाची आठवण घेवून आल्या. पाटात पडल्याचे आठवते असेही म्हणाल्या.
शंभूअण्णा गंभीरतेचा धागा पकडून म्हणाले, जागतिकीकरणामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या. शेतकरी आत्महत्या करतो हा सामाजिक प्रश्‍न आहे. मी त्याचा अभ्यास करतोय. पण, लेवा पाटील आणि गुजर शेतकरी कितीही संकटात असला तरी आत्महत्या करीत नाही. कारण ते शेतात राबतात. पूर्वी सूर्यप्रकाश आणि पावसासोबत माणसाचे श्रमही असत. आता शेती साईड बिझिनेस आहे.
आमचे मित्र गिराशराव कुळकर्णीही धानोरा येथील शेतीच्या आठवणी घेवून आले. ते म्हणाले, थंडीत गव्हाला पाणी भरताना पाणी गरम लागायचे. बाहेर आल्यावर हुडहुडी भरायची. हा संवाद सुरू असताना काईंगडे यांनी शंभूअण्णांचा जागतिकीकरणामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या हा मुद्दा खोडला. ते म्हणाले, डॉ. मनमोहन सिंग यांनी आम्हाला उपासमारीतून बाहेर काढले. पण, तरीही यात अनेक विषय गुंतलेले आहेत.
शंभूअण्णा म्हणाले, शेती विषय खूप गुंतागुंतीचा आहे. त्यावर आता चर्चा नको. नंतर एकत्र भेटू आणि बोलू. अर्थात, रात्रीचे १२.५ होत होते. इतरही सदस्य पेंगूळलेले असावेत. पोस्ट ऑपरेटिंग थांबल्या होत्या. मात्र, हा विषय दुसर्‍या दिवशी आमचे सायलेंट ऑब्झर्व्हर प्रदीप रस्से यांनी वेगळ्या पद्धतीने त्यांच्या फेसबुकवरील रोजच्या ‘टिकटिक’ संवादात घेतला. शेकर्‍यांसाठी फाईव्हस्टार हॉटेल सुरू करण्याचे स्वप्न पाहणार्‍या मित्राची छोटी कहाणी मांडून. या फाईव्हस्टार हॉटेलात केवळ शेतकर्‍यांना प्रवेश मिळेल मात्र, तेथे एकच अट असेल ती ‘सातबारा’ दाखवायची! ही पोस्ट त्यांनी मला समर्पित केली होती. रस्सेजींचा मोठा फेसबुक वाचक वर्ग आहे. तो विद्वानांचा आहे. तेथेही शेतीच्या अडचणींवर अनेकांनी मार्मिक, वास्तव मते मांडली. ती येथे देत नाही. पण, सातबाराच्या निमित्ताने शेतीच्या आठवणी रंगल्या, हेही नसे थोडके. मला एकाच गोष्टीचे समाधान आहे. ते म्हणजे, ‘शेतीच्या मातीशी अनेकांचे पाय जुळलेले असतात. पायच माणसाला वेगवगळ्या जगात नेतात. हो पण इतर अवयवांनी प्रयत्न केले की, सर्व क्षेत्रांतील प्रवास हा निश्‍चित सुखावह होतो. किमान मनमोहन देसाईच्या मसाला चित्रपटातील सुखान्त ‘दी एण्ड सारखा’ !!!

No comments:

Post a Comment