Friday, 3 April 2015

आनंदयात्री ! - अशोकभाऊ जैन

जातशत्रू असलेल्या श्री. अशोकभाऊ जैन हे आज वयाची 50 वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यांच्याकडे येणारा कंपनीतला व बाहेरचा माणूस अडचणी घेऊन येतो. त्यावर शक्यतो मार्ग काढून अडचणी सोडविण्याचे काम श्री. अशोकभाऊ करतात, म्हणून ते ठरतात ‘आनंदयात्री’


अशोक जैन

माझ्या 50 वर्षांच्या आयुष्यात जैन उद्योग समुहात गेली 30 वर्षे वेगवेगळ्या जबाबदार्‍या पार पाडताना ‘आनंददायी’ अनेक घटना घडल्या. कुटुंब, कंपनी, मित्र मंडळी आणि समाज अशा विविध ठिकाणी माझा सहभाग आहे. त्यामुळे माझ्या मनाला आणि माझ्यामुळे इतरांना आनंद देणारे अनेक प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहतात. म्हणूनच मला माझ्या आयुष्याचा प्रवास आनंददायी वाटतो.
मी महाविद्यालयीन शिक्षण घेताना क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात पुढे असायचो. महाविद्यालय व विद्यापीठाच्या क्रीकेट टिममध्ये होतो. कबड्डी व खो-खो या खेळापासून लांब राहिलो. मात्र, लंगडी या खेळात संघाचा कप्तान होतो. आज अखिल भारतीय लंगडी खेळ संघटनेचा मी अध्यक्ष आहे. महाविद्यालयाच्या गॅदरींगसाठी मी पडद्यामागून काम करायचो. खर्च 51 हजार रुपये होता. मी वडिलांकडून 5 हजार व आ. सुरेशदादांकडून 5 हजार असे 10 हजार रुपये आणले. इतरांकडून वर्गणी गोळा केली व धडाक्यात स्नेहसंमेलन केले. बॅडमिंटन, हॉकी व फुटबॉल हेही माझे आवडते खेळ. आर. आर. शाळेत असताना मी स्काऊटचा सार्जन्ट होतो. बहुदा या खेळांमधूनच मला मित्रांची आवड निर्माण झाली व काम टिमवर्क म्हणून करायला शिकलो.
जळगाव शहरात कोणतेही नवे तंत्रज्ञान पहिल्यांदा मी कंपनीत आणले. हॉट लाईन, झेरॉक्स, पेजिंग, फॅक्स, फ्रॅकींग मशिन व आठ मोबाईल आम्हीच पहिल्यांदा आणले.
कंपनीतल्या शंभर कर्मचार्‍यांना एकाच वेळी शंभर नॅनो देण्याचा उपक्रम यशस्वी केला, याचा मला मनस्वी आनंद आहे.
कंपनीच्या यशात अनेक आनंदाचे प्रसंग आहेत. मात्र, पहिल्यांदा कंपनीची जमीन खरेदी केल्याची आठवण मला आजही आठवते. कंपनीचे काम करताना तेथील बांधकाम आराखडे, सुविधांचे आराखडे व यंत्र-तंत्रासाठी नियोजन करताना मी स्वत: लक्ष घालतो. सध्याच्या सौरऊर्जा साहित्यनिर्मिती प्रकल्पाचे पूर्ण आरेखन माझेच आहे.
कुटुंबातही मला आनंद देणारे अनेक प्रसंग आहेत. आईच्या इच्छेखातर सर्व नातेवाईकांना आमच्या कुलदेवतेच्या गावी नेले तो प्रसंग सर्वांत आनंद देणारा.
माझा मुलगा आत्मन कालच तबल्याची परिक्षा उत्तीर्ण झाला. आमच्या घरात अथांग हा लंडन स्कूल ऑफ कॉमर्समध्ये सिलेक्ट झाला. अमोली सीए परीक्षा उत्तीर्ण झाली. अभेद्यला 82 टक्के गुण मिळाले. आशूली, आरोही यांनीही उत्तम गुण मिळविले आहेत. हे सारे पाहता आमचे पिताश्री मा. भवरलालजी जैन यांच्या तिसर्‍या पिढीतही त्यांच्यातील अनेक गुणांचा संगम दिसून येत आहे. आम्ही चौघे भाऊ आ. मोठेभाऊंचा वारसा जपून आहोत. तोच वारसा तिसर्‍या पिढीतही पुढील 100 वर्षे असेल ही बाब आनंद देणारी आहे.
माझ्या आयुष्यात लग्नांनंतर संततीप्राप्तीसाठी 10 वर्षांचा काळ गेला. उपचारासाठी अमेरिका गाठली, पहिल्या इस्पितळात अपेक्षित यश मिळाले नाही. दुसर्‍या इस्पितळात यश मिळाले. पहिल्या मुलीच्या जन्माची बातमी माझ्यासाठी आयुष्यातली सर्वात आनंदाची बातमी ठरली. हा अनुभव लक्षात घेऊनच कंपनीतील इतर अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी आम्ही संततीप्राप्तीसाठी वैद्यकीय उपक्रम राबवित आहोत. हा सारा प्रवास आनंदाचा आहे.

सोलर प्रकल्पपूर्तीचा ठेवा
जैन उद्योग समुहाचा सोलर ऊर्जानिर्मिती प्रकल्प एका वर्षात गतीने पूर्ण केला. त्याचा प्रारंभ 11.11.2011 ला करण्यात आला. 12.12.2012 ला 12 वाजून 12 मिनिटांनी त्याचे उद्घाटन आ. मोठेभाऊ यांच्या हस्ते झाले. ही बाबही आनंद देणारी आहे. बालगंधर्व महोत्सव, मा. श्री. अप्पासाहेब पवार यांच्या नावाने पुरस्कार देणे, प्रतिभाताई पाटील यांचे कार्यक्रम, गांधी रिसर्च सेंटरचे उद्घाटन अशा अनेक कार्यक्रमांतून आनंद मिळाला आहे.

http://www.deshdoot.com/enewspaper.php?region=Jalgaon&date=1360434600&id=50977

No comments:

Post a Comment