Sunday, 5 April 2015

निसटामार्गाचे सेवेकरी

राजपटावर सत्तेच्या जवळ जाण्यासाठी किंवा सत्ता मिळविण्यासाठी दोन प्रकारच्या मार्गांचा अवलंब केला जातो. पहिला म्हणजे, एकाच विचारधारेशी कायम प्रामाणिक राहून सत्ता प्राप्तीची प्रतीक्षा करणे. हा मार्ग खूप वेळ घेणाराही असू शकतो. दुसरा मार्ग म्हणजे, सत्तेत असलेल्या कोणत्याही विचारधारेशी तडजोड करणे. शक्य होईल तेव्हा आपली विचारधारा बदलणे. हा मार्ग संधीनुसार बदलता येतो. वरील दोन्ही क्रियांसाठी दोन चांगले पर्यायी शब्द समोर आहेत. पहिल्या विचारधारेसोबत कायम राहणार्‍यांना आपण ‘निष्ठामार्गावरुन’ जाणारे वारकरी म्हणू शकतो. मात्र, बदलत्या विचारधारेशी गरजेनुसार संधी साधणार्‍यांना आपण ‘निसटामार्गाचे सेवेकरी’ म्हणू शकतो. याचे कारण, ही मंडळी एकाजागेहून दुसर्‍या जागेसाठी कधीही निसटू शकतात. त्याचे उद्दिष्ट हे सेवा देण्याचे किंवा घेण्याचे असते, म्हणून ते सेवेकरी....


सध्या गल्ल्लीपासून तर दिल्लीपर्यंत पक्षांतराचा माहौल आहे. कॉंग्रेससह इतर पक्षांमधील मंडळी भाजपच्या उंबरठ्यावर उभी आहेत. काहींनी भाजपच्या कमळाचे उपरणे गळ्यात घालून घेतले आहे. काही हातात घेवून पक्षाचे दरवाजे कुणामार्फत उघडतील याच्या अंदाजात आहेत. बहुतांश जण संधीच्या शोधात आहेत. आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचे कधीकाळी समर्थन करणार्‍या किरण बेदी, शाजीया इल्मी या सुद्धा दिल्ल्लीच्या निवडणुकीपूर्वी भाजपवासी झाल्या. पक्षांतराचे हे लोण अगदी जळगाव जिल्ह्यापर्यंत पोहचले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांच्या खंद्या समर्थक मानल्या जाणार्‍या प्रा. अस्मिता पाटील यासुद्धा गेल्या आठवड्यात भाजपवासी झाल्या. जिल्ह्याचे नेते व पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनीच त्यांना कमळाचे उपरणे दिले. अजुनही काही मंडळी भाजपच्या मार्गावर आहेत. यापूर्वीही खडसेंच्या आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात इतर काही पुढारी भाजपत स्थिरावले आहेत. त्यात संजय सावकारे, अनिल चौधरी यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.
केवळ जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यस्तरावर सुद्धा आजी-माजी २१ आमदार, खासदार भाजपच्या उंबरठ्यावर असल्याचा गौप्यस्फोट दस्तुरखुद्द प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. दिल्लीतील श्रेष्ठींशी बोलून मगच या इनकमिंग नेतृत्वाला भाजपत जागा मिळणार आहे. या सर्व घडामोडींचे निरीक्षण करीत असताना एक प्रश्‍न सतत मनात येत असतो तो हाच की, खरेच कोणाच्या येण्याने किंवा जाण्याने राजकिय पक्ष मजबूत होतात की खिळखिळे होतात? शिवसेना सोडून जाणार्‍यांना स्व. बाळासाहेब ठाकरे कावळे म्हणत. त्यांनीच नवी म्हण जन्माला आणली. ती म्हणजे, ‘उडाले ते कावळे आणि राहीले ते मावळे.’ मावळे हा शब्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत स्वराज्य स्थापनेसाठी लढणार्‍या सहकार्‍यांना वापरला जात असे. केवळ स्वराज्य प्राप्ती हेच त्यांचे ध्येय होते. याशिवाय, ज्येष्ठनेते शरद पवार यांच्या कारकिर्दीत पक्ष सोडणार्‍यांसाठी ‘खंजीर खुपसला’ किंवा ‘गद्दार’ हे शब्द वापरले जावू लागले. ते कधी पवार यांच्यासाठी इतरांनी तर कधी इतरांसाठी पवारांनी वापरले. दिल्लीच्या राजकारणात नेत्यांच्या पक्षांतराच्या प्रवृत्तीसाठी ‘आयाराम गयाराम’ हाही शब्द खूप पूर्वी प्रचलित होता.
पूर्वी पक्षांतर करताना नेत्यांच्या भूमिका कार्यकर्ते आणि जनतेलाही पचनी पडत असत. पक्षात खूप काळ थांबूनही सत्ताप्राप्तीसाठी संधी दिली गेली नाही की, टोकाला जावून पक्षांतर केले जाई. कधीकधी पक्षनेतृत्व करणारी मंडळी आणि दुसर्‍या फळीतील नेते यांच्यात मतभेद होवून पक्षाला सोडचिठ्ठी दिली जात असे. अर्थात, हा वैचारिक घटस्फोट तसा त्रासाचा असे. पक्ष सोडताना नव्या कोणत्या पक्षाच्या वळचणीला जायचे किंवा स्वतःच नवा पक्ष काढायचा की नाही, याचा अंदाज घ्यावा लागत असे. पूर्वीच्याकाळी पक्षांतरही यशस्वी होत असे किंवा त्यात फसगतही होत असे.
अगदी अलिकडील काही उदाहरणे याची आठवण करुन देतात. स्व. वसंतदादा पाटील यांची साथ सोडून स्वतःचा गट निर्माण करुन शरद पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री म्हणून सत्ता मिळविली. त्यांचे पक्षांतर यशस्वी ठरले. त्यानंतर पुन्हा दुसर्‍यांदा कॉंग्रेस (एस) चे विलनिकरण कॉंग्रेस (आय) मध्ये केल्यानंतरही काही काळ पवारांना सत्तेसाठी थांबावे लागले. पवारांचे केंद्रातील सत्तेत सहभागासाठीही पक्षांतर तसे फसत गेले. त्यांना हवे होते पंतप्रधानपद. त्यासाठी कधीही अनुकूल वातावरण निर्माण झाले नाही. आजही केंद्रीय राजकारणाचा लेखाजोखा मांडला तर पवार यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अस्तित्व नेहमी दुय्यम राहीले. पवारांना कॉंग्रेस अध्यक्षांनी दिलेल्या खूर्ची, पदांवर बसावे लागले.
दुसरे गाजलेले पक्षांतर हे छगन भुजबळ यांचे आहे. त्यांनी शिवसेना सोडली आणि ते नेहमी शरद पवारांच्या कृपाछत्राखाली राहीले. क्षमता असूनही त्यांना उपमुख्यमंत्री हे सन्मानाचे पद फार काळासाठी मिळून शकले नाही. भुजबळांच्या पक्षांतराचा हिशेब हा ‘कभी खुशी कभी गम’ वाला आहे. भुजबळांच्याप्रमाणे शिवसेना सोडून कॉंग्रेसमध्ये जाणारे नारायण राणे यांचेही पक्षांतर चर्चेत राहीले. मात्र, राणेंची सततची अस्वस्थता लक्षात घेता ते पूर्णतः फसलेले पक्षांतर म्हणावे लागेल. राणे कॉंग्रेमध्ये कधीही हवे ते पद मिळवू शकलेले नाहीत.
माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे मातब्बर नेते विलासराव देशमुख यांचे जावई अतुल भोसले यांनीही भाजपत प्रवेश केलेला आहे. मात्र, ते सध्या कुठे आहेत, असा प्रश्‍न पडतो. नवीदिल्लीत कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या कृष्णा तीरथ यांनी भाजपत प्रवेश केला आहे. प्रवेश करण्याबरोबरच तीरथ यांनी ‘कॉंग्रेसमुक्त भारत’ बनवण्याचा संकल्प केला आहे. तसे होईल की नाही, हे काळ ठरवेल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून माजी आमदार प्रवीण दरेकर, वसंत गिते (नाशिक), रमेश पाटील (कल्याण ग्रामीण) आणि अखिलेश चौबे यांनी मनसेला सोडचिठ्ठी देऊन भाजपत प्रवेश केला आहे. या तिघांमुळे भाजप किती बळकट झाला हे नंतरच्या काळात समजेल.
अगदी अलिकडे धनंजय मुंडे यांचेही पक्षांतर चर्चेत राहिले. भाजपनेते व माजी उपमुख्यमंत्री स्व. गोपिनाथराव मुंडे यांचे पुतणे म्हणून धनंजय यांच्या भोवती प्रभावलय आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्वतःचा चेहरा बहुजनवादी असावा म्हणून धनंजय मुंडेंना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद दिले आहे. येथे मुंडेंसाठी बेरजेचा हिशेब असला तरी तो राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी जास्त लाभदायी आहे. याशिवाय, सध्या राष्ट्रवादी सोडणारे नेते हे मराठेतर आहेत. कोणताही मराठानेता राकॉंमधून भाजपत आलेला नाही. हेही लक्षात घ्यावे लागे. दिल्लीच्या विधानसभेसाठी शनिवारी मतदान झाले. ‘आप’ च्या काठावरून भाजपत स्थिरावलेल्या किरण बेदी यांना पक्षाने थेट मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ठरविले आहे. बेंदीसाठी ही बाब तूर्त आशादायक असली तरी, तेथील निवडणूकपूर्व अंदाज लक्षात घेता त्या यशाच्या की अपयशाच्या धनी ठरतात हे सोमवारी जाहीर होईल.
इतरही राज्यात पक्षांतराची काही कमी अधिक उदाहरणे आहेत. त्यात कल्याणसिंग (भाजपला सोडचिठ्ठी), उमा भारती (भाजपतून बाहेर), अमरसिंह (समाजवादी पक्षातून बाहेर) आदींच्या त्या-त्यावेळच्या भूमिका आणि राजकिय हिशेब नेहमी वजाबाकीचेच निष्कर्ष देणार्‍या राहील्या आहेत. या ठळक उदाहरणांच्या पलिकडे जावून आजच्या पक्षांतर किंवा आयाराम-गयारामच्या कृतींचा विचार केला तर केवळ सत्तासंधीसाठीच सारी धावपळ सुरू असल्याचे दिसून येते. सध्यातरी केंद्र आणि राज्याच्या राजपटावर सत्ताप्राप्तीसाठी परवलीचा ‘पासवर्ड’ केवळ भाजप हाच आहे. म्हणूनच ‘सत्तेचे सेवेकरी’ ठिकठिकाणी भाजपच्या वाटेवर दिसतात.
महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक पक्षांतर (आऊटगोईंग) राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून होत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी डॉ. विजयकुमार गावित, संजय सावकारे हे भाजपत आले. भाजपकडून निवडूनही आले. त्यांचे गणित बेरजेचे राहीले. काही अडथळे पार करून अनिल चौधरीही भाजपत आले. सध्यातरी ते कार्यकर्त्यांच्या भूमिकेत आहेत. भाजपमध्ये नव्याने आलेली ही मंडळी औरंगाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महासंगममध्ये खाकी अर्धी चड्डी आणि पांढरा शर्ट घालून शिस्तीत सहभागी झाली होती. तेव्हाचे त्यांचे फेसबुकवरील फोटो मनोरंजनही करीत होते. भविष्यात भाजपकडून एखादे पद पदरात पाडून घेताना ‘बायोडेटा’वर संघाच्या पोषाखातील फोटो हवा म्हणूनच ही तजविज या मंडळींनी करून ठेवली असावी, असे म्हणता येईल.
भाजपच्या उंबरठ्यावरील किंवा उंबरठा ओलांडणार्‍या सर्व मंडळींनी पक्षांतर्गत काही बाबी समजून घेणे आवश्यक आहे. बर्‍याचवेळा मोबाईल कंपन्या इनकमिंग फ्रिची जाहीरात करतात परंतु, नंतर छुप्या चार्जेसचे बिल आले की, मोफत सेवा घेणार्‍यांचे डोळे पांढरे होतात. अशाच इनकमिंगचा घोटाळा इतर पक्षांच्या प्रवेशात संभवू शकतो. पक्षात नव्याने आलेल्या मंडळींना काही काळ प्रतिक्षा करावी लागते. त्यालाच काही काळ पक्षाचे काम करा असा गोंडस सल्ला देणे असेही म्हणतात. प्रत्येक पक्षात एक चढ आणि दुसरी उतरंड असते. बर्‍याचवेळा उतरंडचा मार्ग निसरडाच असतो. नेता किंवा कार्यकर्ता फसतो येथेच. निसरड्यामार्गावरील पाऊल ‘निसटामार्गावर’ घेवून जाते. तसेच चढ असलेला मार्ग निष्ठामार्ग असतो. पण तो त्रासाचा असतो. म्हणूनच पक्षांत नव्याने स्थिरावणार्‍यांसाठी निष्ठा आणि निसटा या दोन्ही शब्दांचा अर्थ वेळीच समजून-उमजून घेणे आवश्यक ठरते.

आया राम-गयारामचा इतिहास
देशात स्वातंत्र्यानंतर ३० वर्षे कॉंग्रेस हा एकच प्रभावशाली पक्ष होता. कॉंग्रेस विरोध हा मुद्दा घेवून अनेक पक्ष कॉंग्रेस पुढे टिकू शकले नाहीत. सन १९६७ च्या निवडणुकीत प्रथमच अनेक राज्यांमध्ये कॉंग्रेसला सत्ता गमवावी लागली आणि बिगर कॉंग्रेस सरकारे सत्तेवर आली. मात्र, अनेकांना मुख्यमंत्रीपद हवे असल्याने या काळात पक्षांतराचा सुळसुळाट झाला होता. सदस्यांना व्यक्तिगत लाभ हवा असल्यामुळे अनेक राज्य सरकारे अस्थिर झाली होती. भारतीय राजकारणाच्या शब्दकोशात या पक्षांतरामुळे मिळालेला एक शब्द म्हणजे आय राम गया राम सन १९६७ च्या निवडणुकीनंतर हरियानाचे आमदार गया लाल यांनी १५ दिवसात तीन वेळेस पक्ष बदलून एक रेकॉर्डच केला आहे. (कॉंग्रेसमधून युनायटेड फ्रंट, पुन्हा कॉंग्रेस व ९ तासात पुन्हा युनायटेड फ्रंट) त्यानंतर त्यांनी पुन्हा कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर कॉंग्रेसचे नेते राव वीरेंद्र सिंह यांनी चंडीगड येथील सभेत गया राम था, अब आय राम है अशी घोषणा केली. तेव्हापासून राजकारणात आय राम  गया राम हा शब्द प्रचलित झाला.
उडणारे कावळे पाहून पवार शांत का?
सन १९७८ मध्ये शरद पवार यांनी अवघ्या १८ आमदारांना सोबत घेऊन कॉंग्रेसला रामराम ठोकला होता. सत्ता हाती आल्यावर अनेक आमदार त्यांच्याकडे ओढले गेले. पण, सत्तेचे पारडे फिरल्यावर अनेक निकटचे मित्र सहकारी पवारांना सोडून गेले. दिल्लीत इंदिराजींची सत्ता आल्यावर पवारांचा पुलोद प्रयोग धुळीस मिळाला. तरीही पवारांनी सन १९८० मध्ये पन्नासच्या आसपास आमदार निवडून आणले होते. त्यातले बहुतांश आमदार वर्षभरातच यशवंतराव यांच्यासोबत कॉग्रेसमध्ये गेले आणि चारपाच आमदार पवारांसोबत राहिले. नंतर सन १९८४ मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाल्यावरही त्यांनी राजीव लाटेत दोन खासदार निवडून आणले होते. लगेच आलेल्या विधानसभा निवडणुकीत दत्ता सामंत व शिवसेना असे दोन गट सोडल्यास इतर सर्वच पक्षांना सोबत घेऊन पवारांनी शेवटचा पुलोद प्रयोग करून बघितला. पण त्यातही ५४ जागांच्या पलिकडे त्यांची मजल गेली नाही, की पुलोदला सव्वाशेचा पल्ला ओलांडता आला नाही. सन १९७८ मध्ये पवारांसोबत असलेले बहुतांश ज्येष्ठ सहकारी सोडून गेले, तरी पवारांनी नवे तरूण हाताशी धरून नव्या दमाचे नेतृत्व उभे केले. वल्लभ बेनके, आर. आर. आबा, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, मधुकर पिचड अशी ती नवी नेतृत्वाची पिढी म्हणून दाखवता येईल. जेव्हा सोकावलेले जुनेजाणते सोडून जातात, तेव्हा पवार नव्यांना संधी देतात.

शिवकाळातील पक्षांतर
पक्षांतराची उदाहरणे जशी राजकारणाच्या पुस्तकात आहेत तशी शिवकाळातील इतिहासातही आहेत. काही जण राजे संभाजी हे औरंगजेबास जावून मिळाले असा उल्लेख करतात. या विषयावर विविध मतप्रवाह आहेत. त्यात आपल्याला जायचे नाही. येथे संदर्भ केवळ एवढाच घ्यायचा की, दि. ६ जून १६७६ रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि दि. १३ डिसेंबर १६७८ रोजी संभाजीराजे दिलेरखानास जावून भेटले. या मागील काही कारणे रायगडावरील गृहकलहाची सांगण्यात येतात. आताच्या राजकारणातही काहीवेळा गृहकलह हेच कारण पक्षांतरासाठी कारणीभूत ठरताना दिसते.
(या लेखासोबतच्या काही चौकटींचा मजकूर इतरांच्या लेखनातून संदर्भासाठी वापरला आहे)

No comments:

Post a Comment