Wednesday 1 April 2015

फळे, भाज्यांना कृत्रिम आकार

निसर्गासोबत राहणे आणि त्याचा आनंद घेणे हा मानवाचा मुलभूत हक्क आहे. मात्र, निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी पोहचवून मानवी गरजा-सुविधांचा विकास करण्याच्या धोरणांना संपूर्ण जगभरातून विरोध आहे. परंतू काहीवेळा मानवी कल्पकतेतून निसर्गातील वृक्ष, वेली, पाने, फुले, फळे, वनस्पती यांच्या रचनेतही बदल केले जातात. हे बदल कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक व सहाय्यक ठरतात. सध्या काही कृत्रिम बदल फळे, भाज्यांच्या आकारात केले जात आहेत. या बदलांच्या मनोरंजक आढावा...
अती प्रगत जैवतंत्रज्ञानांमुळे वनस्पतींच्या आकार, रंग, रुप, चव, फळे आदी प्रकारात हवे तसे अपेक्षित बदल घडवून आणण्याचे तंत्र जगभरात विकसित झाले आहे. टिश्यू कल्चर तंत्रामुळे विविध गुुणधर्म असलेल्या आणि अवगुण नाकारलेल्या धान्य, फळे पिकांची किंवा इतर वनस्पतींची वाढ, पुनर्वाढ शक्य झाली आहे.
याचाच परिणाम म्हणून वेगवेगळ्या रंगीची-चवीची फळे, भाजीपाला बाजारात उपलब्ध होत आहे. लाल-पिवळी ढोबळी मिरची, लाल-नारंगी पत्ता कोबी, लाल-पिवळा मूळा, हिरवी-लाल-काळी द्राक्षे भारतीय बाजारातही शहर, गाव पातळीवर दिसू लागली आहेत. फळांची आणि भाज्यांची दुनियाच ‘रंगिन’ झाली आहे.
निसर्गातील नियमित आणि कृत्रिम बदलांची फारशी माहिती माणसाला नसली की, त्यातून गैरलाभ घेणारी किंवा दिशाभूल करणारी मंडळीही समाजात असतात. बारावी विज्ञानशाखेत  असताना वनस्पतीशास्त्राचा थोडाफार परिचय मला झालेला आहे. वनस्पतींचे वेगवेगळे प्रकार असतात. ते त्यांच्या पाने, फुले आणि फळांच्या रचनेवरून ठरतात एवढी जुजबी माहिती आहे. त्यानंतर रोजच्या व्यवहारात बिन बियांचे द्राक्ष, चेंडूच्या आकाराची शबरी बोरे, लाल ढोबळी मिरची या विषयी माहिती होत गेली आणि वनस्पतींच्या  रचनेत माणूस शास्त्रशुद्ध बदल करू शकतो हे लक्षात आले. अगदी अलिकडे टिश्यू कल्चर,  बीटीतंत्र याविषयी सुद्धा जुजबी माहिती मिळाली. वनस्पतींमधील बदल हे चव, आकार आणि उत्पादन वाढीसाठी केले जातात हेही लक्षात यातूनच आले.
माझ्या दृष्टीने वनस्पतीशास्त्राचे एवढे सामान्यज्ञान पुरेसे आहे. जवळपास इतरांनाही ते तेवढेच असेल. मात्र, जी मंडळी कृषी क्षेत्रात काम करतात त्यांचे या क्षेत्रातील ‘ज्ञान’ निश्‍चितच जास्त असेल. वनस्पतीशास्त्रात होणार्‍या बदलांंच्या विषयांकडे मी अनावधानाने  खेचला गेलो. ते सुद्धा व्हाट्स ऍपवरील विविध संदेशांच्या देवाण-घेवाणमुळे.
साधारणपणे वर्षभरापूर्वी मुलींच्या आकारातील फळांची छायाचित्रे व्हाट्स ऍपवरील गृपमधून फिरत होती. उभ्या आकारातील, हात जोडलेल्या मुलींच्या आकाराची ही फळे हिमालयातील वृक्षांची असून ती दर वीस वर्षांनी येतात असा संदेशही या छायाचित्रांच्या सोबत दिला जात होता. आमच्याही गृपमध्ये काही मान्यवरांनी ही छायाचित्रे आणि संदेश फॉरवर्ड केले.
बारावीत असताना शिकलेले वनस्पतीशास्त्र थोडेफार आठवले. नवस्पतींच्या ‘फॅमिली’ समजून घेताना मुलींच्या आकारातील फळांविषयी किंवा असे फळ देणार्‍या वनस्पतीविषयी काही शिकलो नाही किंवा काही वाचले नाही असे सहज लक्षात आले. मी इंटरनेटवर जावून शोध सुरू केला आणि ‘फेक’ (खोट्या) माहितीचे ‘संदेश वहन’ सहज लक्षात आले.
मुलींच्या आकारातील फळांसोबत एक संदेश दिला जात असे. तो होता,  ‘‘सोबतचे छायाचित्र हे ‘नारिपोल ट्री’ ला येणार्‍या फळांचे आहे. हा वृक्ष थायलंडमध्ये आहे.’’ या बरोबरच तेच छायाचित्र काही गृपमध्ये वेगळ्या संदेशासह दिले जात होते. तो संदेश होता, ‘‘सोबतचे छायाचित्र हे ‘नारिलता’ या वृक्षाला येणार्‍या मुलींच्या आकारातील फळांचे आहे. हा वृक्ष हिमालयात आहे. ही फळे दर २० वर्षांनी येतात’’
गंमत म्हणजे, भारताविषयी अभिमान बाळगून असणारी मंडळी हिमालयातील या वृक्षांंविषयी आणि फळांविषयी ‘वृथा देशाभिमान बाळगून’ तो संदेश आंधळेपणाने फॉरवर्ड करताना दिसत होती.
मी जेव्हा इंटरनेटवर शोध घेतला तेव्हा या छायाचित्रांचा फोलपणा, खोटेपणा लक्षात आला. इंटरनेट किंवा व्हाट्स ऍपवरून फॉरवर्ड केली जाणारी मुलींच्या आकारातील फळांची केवळ तीन छायाचित्रे एकाच प्रकारची होती. चौथे वेगळ्या प्रकारचे कोणतेही छायाचित्र उपलब्ध नव्हते. त्यामुळे मुलींच्या आकारातील ती फळे किंवा छायाचित्रात दिसणारा तो वृक्ष याविषयी कुठेही सविस्तर तपशील उपलब्ध नव्हता. हा वृक्ष कोणत्या ‘फॅमिलीतला’ आहे, याची नोंद नव्हती.
मुलींच्या आकारातील ती फळे म्हणजे शुद्ध अफवा असल्याचे स्पष्ट करताना म्हटले होते की, ‘असे कोणतेही फळ अस्तित्वात नाही. ते थायलंड किंवा हिमालयात यापूर्वी कोणाला दिसलेले नाही. अशी फळे देणारी कोणतीही वनस्पती नाही. जर तसे फळ अस्तित्वात असते तर त्याचा उल्लेख नवस्पतीशास्त्रात असता. या शिवाय, अशा प्रकारची फळे पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली असती. ते ठिकाण पर्यटनस्थळ झाले असते. जसा १४ वर्षांनी कुंभमेळा होतो तसे २० वर्षानंतर येणारी मुलींच्या आकारातील फळे पाहण्यासाठी जगभरातील प्रवासी एकत्र आले असते.’
त्या फेक छायाचित्रांचा पंचनामा करताना तज्ञ वनस्पतीशास्त्रांनी असेही म्हटले होते की, ‘छायाचित्रे बारकाव्याने पाहिली तर लक्षात येते की, मुलींच्या आकाराती फळे थेट वृक्षांच्या फांद्यांमधून निघालेली आहेत. बहुतांश वनस्पतींची फळे ही फांद्यांच्या टोकाला दोन पानांच्या देठातून बाहेर येतात. फळाच्या अगोदर फूल तयार होते. नंतर फळधारणा होते. तसे या मुलींच्या आकारातील फळांचे नाही. याचाच अर्थ ही फळे कृत्रिम, मानवनिर्मित आणि दिशाभूल करण्याच्या हेतूने तयार केली आहेत. मुलींच्या आकारातील तथाकथित फळांचे देठ हे लांब असून ते इतर वेलींनी झाकलेले आहे. याचा अर्थ असाही होतो की, कृत्रिम फळ दोरी, तार, वायर याचा वापर करुन टांगलेले असावे. ते दिसू नये म्हणून इतर वेलीचा, काड्यांचा वापर केला आहे.’
अर्थात, हे सारे वाचून मी लगेचच गृपमध्ये संदेश देवून ते फेक छायाचित्र आणि त्या सोबतचा संदेश फॉरवर्ड न करण्याची विनंती सर्व सदस्यांना केली. त्यानंतर जवळपास वर्षभर तसे छायाचित्र पुन्हा गृपमध्ये आले नाही.
गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी थोडा वेगळा प्रकार घडला. आमच्या ‘कान्हदेश गृप’ मध्ये लहान मुलांच्या आकारातील फळांचे एक छायाचित्र ज्येष्ठ सदस्याने फॉरवडर्र् केले. अर्थात त्यासोबत संदेश होता, ‘‘मंकी ऑर्चिड वृक्षाचे हे मुलांच्या आकारातील फळ असून, हा वृक्ष हिमालयात आहे. दर २० वर्षांनी हे फळ येते’’
वरील संदेश वाचून मी पुन्हा विचारात पडलो. फळाचा आकार लहान मुलांच्या सारखा निश्‍चित होता. वर्षभरापूर्वी चर्चेत आलेल्या मुलींच्या आकारातील फळापेक्षा लहान आकारात हे फळ होते. नेहमी प्रमाणे मी मुलांच्या आकारातील फळांचा इंटरनेटवर शोध सुरू केला. आणि गंमत म्हणजे अवघ्या काही मिनिटांत फळे, भाज्यांच्या क्षेत्रातील एक नव्या प्रयोगाची माहिती समोर आली.
या लेखाचा प्रारंभ आपण निसर्गात मानवाकडून होणार्‍या बदलांच्या उल्लेखाने केला आहे. त्याचे सूत्र आता येथे आहे. कोणतीही फळे किंवा भाज्या आपण नियमित किंवा नैसर्गिक आकार व रंगात पाहतो. या फळांना किंवा भाज्यांनाही आपल्याला हवा तो आकार देण्याचा वेगळा प्रयोग जगभरातील काही कल्पक शेतकर्‍यांनी केला आहे. अर्थात, त्यांना सहकार्य आहे ते वनस्पतीशास्त्र संशोधकांचे. चीन आणि जपानमधील काही शेतकर्‍यांनी विशिष्ट फळे किंवा भाज्यांना हवा तो आकार देण्यासाठी लक्षवेधी, रंजक प्रकार केले आहेत. यासाठी वापर केला आहे तो ‘प्लास्टिक मोल्ड’ किंवा ‘कव्हर रॅपरचा’.
इंटरनेटवर उपलब्ध वेगळ्या प्रयोगाची माहिती वाचताना लक्षात आले की, लहान मुलांच्या आकाराचे, माओच्या चेहर्‍याच्या आकाराचे, सांताक्लॉजचे, हसर्‍या चेहर्‍याचा बुद्ध, चौकोनी- त्रिकोनी आकाराचे अशा विविध आकारात फळे-भाज्या उपलब्ध आहेत. ही फळे किंवा भाज्या वृक्षांवर नैसर्गिकरित्या निर्माण होत नाही तर तसा आकार त्या फळांना-भाजीला दिला जातो.
ही माहितची वाचून माझी उत्सुकता जास्तच ताणली गेली. मी माहितीचा अधिकाधिक शोध घेतला आणि समोर रंजक माहितीचा खजाना खुला होत गेला.
आज जगभरात भोपळा, ढोबळी मिरची, पिअर्स, काकडी, गिलके, पेरू, स्ट्रॉबेरी, टमाटे, टरबूज, संत्रे, वांगी आदी फळे-भाज्या कृत्रिम आकारात उपलब्ध आहेत. त्याचा दरही नियमित फळे-भाज्यापेक्षा जास्त आहे. या मागचे गणित जसे ‘दिसण्याचे’ आहे तसे ते ‘धार्मिक’ आणि ‘शुभ संकेताचे’ ही आहे.
हे आकार का आणि कसे निर्माण झाले? या प्रश्‍नाला अनुसरून शोध घेतल्यावर चीनमधील एक ‘लोणकढी थाप’ ही यानिमित्त वाचनात आली. ती अशी ः योऊकू येथील ‘एक्सी सुई झ्ही’ हा एकदा थायलंडमधील हजारो वर्षांपूर्वीच्या प्रार्थनास्थळात गेला. तेथे त्याला एक बौद्ध भिक्षू भेटला. तो एक्सी ला म्हणाला की, मला स्वप्नात परमेश्‍वर  दिसले. ते म्हणाले मी आता भोपळ्याच्या रुपात दर्शन देणार आहे. मंदिरातून घरी परतल्यावर एक्सीने भिक्षूच्या स्वप्नावर विचार केला. त्यातून त्याला भोपळ्याला बुद्धाचा, येशूचा कृत्रिम चेहरा देण्याची कल्पना सूचली. त्याने प्लास्टीक केसचा वापर करून भोपळा हवा त्या आकारात वाढवला. फळ-भाजी हव्या त्या आकारात वाढू शकते हे त्याच्या लक्षात आले. चीनमध्ये भोपळा हे ‘शुभ संकेत’  देणारे फळ मानले जाते. त्यामुळे ते बुद्ध किंवा येशूच्या चेहर्‍यात मिळत असेल तर ग्राहक श्रद्धेने खरेदी करतात असेही त्याच्यो लक्षात आले. यातूनच भोपळ्याला मानवनिर्मित कृत्रिम चेहरा देण्याची प्रथा सुरू झाली.
चीनमधील शेतकरी ‘पिअर्स’ हे फळ वेगवगळ्या कृत्रिम आकारात वाढवतात. लहान बुद्धाच्या चेहर्‍याच्या आकारातील फळांना विविध शॉपिंग मॉलमध्ये मोठी मागणी आहे. माओ, सांताक्लॉज, देवदूत आकारातही भोपळा मिळतो.अशाच प्रकारे ‘टरबूज-खरबुजांना’ ही हवा तो आकार दिला जातो. टरबूज हे चौकोनी, हृदयाच्या आकारात मिळतात. चीनमधील शेतकर्‍यांनी सुद्धा फळ-भाज्यांना विविध आकार दिले आहेत. ब्रिटनमधील शेतकर्‍यांनी सुद्धा फळशेतीला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी कृत्रिम आकाराचा प्रयोग स्वीकारला आहे. फळ-भाज्यांसाठी विविध आकारांचे रबर मोल्ड, रॅपर, कव्हर तयार करणार्‍या संस्था पुढे येत आहेत.
भारतात अद्याप असे प्रयोग झालेले नाहीत. मात्र, या पद्धतीचा विचार काही फळांसाठी करता येईल. नागपुरी संत्रा, मराठवाड्यातील टरबूज यासाठी कृत्रिम आकाराचे प्रयोग उपयुक्त ठरू शकतात.
फळ-भाज्यांच्या कृत्रिम आकाराची दुनिया भन्नाट आहे. फळे-भाज्यांना मानवी चेहरे किंवा हवा तो आकार देण्यासोबत आता कंपनीचे नाव देण्याचाही प्रकार सुरू आहे. जाहिरातीचे किंवा ब्रॅण्डींगचे नवे क्षेत्र यातून विस्तारते आहे. जगभरात कोला निर्मितीत आघाडीवर असलेल्या कोकच्या फळांवर ‘कोकाकोला’ हेच नाव उठावात यावे म्हणून प्लास्टिकचे मोल्ड तयार केले जात आहेत. ब्राझिलमध्ये याच पद्धतीने ‘कॅम्प’ कंपनीचे नाव फळांवर दोनवर्षे तयार करण्यात आले. स्पेनमध्ये हृदयाच्या आकारात फळे निर्माण केली जातात. लाल रंगातील टमाटे किंवा स्ट्रॉबेरीलाही हृदयाचा आकार दिला जातो. जपानमधील शेतकर्‍यांनी त्रिकोण-चौकोन आकारात संत्रा, मोसंबी तयार केली आहे.
हे सारे बदल वाचताना एका नव्या विषयाची माहिती मिळाली. व्हाट्स ऍपवर आलेल्या एका संदेशाचा पाठपुरावा करताना शेतकर्‍यासाठी उपयुक्त ठरले अशी माहिती मिळाली. फळे-भाज्यांना हवा तो आकार देणे अवघड नाही. पळांच्या वाढीचा काळ लक्षात घेवून त्यावर प्लास्टिक मोल्डचे आवरण सहज चढवता येवू शकते. भारतातही फळे-भाज्यांची बाजारपेठ मोठी आहे. आपला ग्राहकही शौकीन आहे. मध्यमवर्गीय ग्राहकही आकारासाठी भाजी-फळांवर पैसे खर्च करु शकतो. त्याला साथ हवी ती विविध आकारांचे मोल्ड, रॅपर, कव्हर तयार करणार्‍यांची...


मुलींचे फळ - एक अख्यायिका

मुलींच्या आकारातील फळ अस्तित्वात नाही याविषयी वनस्पतीशास्त्रातील संशोधक म्हणतात, ‘‘फोटोत दिसणारे झाड हे ‘ऑर्चिडासेई’ प्रकारातील असून ‘जेनेरा ऑफ पॅबेनारिआ’ फॅमिलीतील आहे. जर ते ऑर्चिड म्हणून ओळखले जात असतील तर ते फळ फांद्यांना कसे काय लागू शकतात?’’ मात्र, बुद्ध कथांच्या काही अख्यायिका किंवा चमत्काराच्या कथांमध्ये ‘नारिफोन’ या वृक्षाचा उल्लेख आहे. वृक्षांवर मुलींच्या आकाराची फळे होती, असे त्याबाबत मौखिकरित्या सांगण्यात येते. थायलंडमध्ये सुद्धा ‘नारिपोल’ किंवा ‘नारिफोन’ वृक्षाला ‘मुलींचे फळ’  लागतात अशी चर्चा आहे. ‘फूम फरा रुंगा’  या अख्यायिकेतही मुलींच्या फळांची कथा असून तसे फळाचे काल्पिनिक चित्रही आहे. बहुधा यातूनच मुलींच्या आकाराच्या फळाची ‘फेक स्टोरी’ आणि त्याला पूरक ठरतील अशी ‘छायाचित्रे’ निर्माण झाली असावीत. म्हणजेच ती फळे मॅनमेड आहेत.

No comments:

Post a Comment