Thursday, 12 February 2015

शोध मी कोण?चा


गेले काही दिवस माझा वैचारिक गोंधळ उडाला आहे. मी कोण? या प्रश्नाचे उत्तर मला वेगवेळ्या मानसिकतेतून मिळत आहे. मला पडलेला प्रश्न हा माझ्या राष्ट्रीयत्व आणि नागरिकत्व याच्याशी संबंधित आहे. मी हिंदुस्थानी आहे, की मी भारतीय आहे, की मी इंडियन आहे, यापैकी जी ओळख मी माझी मानतो, त्यानुसार माझी विचारधारा बदलते. बहुधा याच मनःस्थितीत इतरही अनेकजण असावेत. ही ओळख एकदा प्रत्येकाने निश्चित केलीच पाहिजे...


गेल्या महिनाभरात परदेशात दोन मोठ्या घडामोडी घडल्या. पहिली म्हणजे, पाकिस्तानातील एका लष्करी शाळेवर दहशतवाद्यांनी हल्ला करून 100 वर विद्यार्थ्यांचा अंदाधूंद गोळीबारात बळी घेतला. या घटनेमुळे सारे जग संताप आणि दुःखावेगाने स्तब्ध झाले. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ या मराठी म्हणीचा शब्दशः अनुभव साऱ्यांनाच आला. मुंबईवर दहशतवादी हल्ला घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या. या दोन्ही घटनांची तुलना मी पाकिस्तानी विरूद्ध हिंदुस्तानी या मानसिकतेतून केली. जरी मी मनाने हिंदुस्तानी होतो तरी सुद्धा पाकिस्तानातील मृत बालकांच्यासाठी ओम शांती शांती म्हणत, श्रद्धांजलीचे दीप पेटविण्याचे कार्य माझ्याकडून आपसूक घडले. कारण, इतरांच्या मृत्यूचा किंवा दुःखाचा आनंद मानायचा नाही हा हिंदू संस्कृतीचा संस्कार माझ्या मनावर आहेच.


पाकिस्तानातील घटनेनंतर दहशतवाद्यांच्या कारवायांची भयावह आणि भीषण बाजू तेथील राज्यकर्त्यांच्या लक्षात येईल अशी भाबडी आशा आम्ही हिंदुस्तानी आजही बाळगून आहोत. या मागे कारण आहे ते भारतात नेहमी घडणाऱ्या पाक पुरस्कृत दहशतवादी कारवायांचे. पाकिस्तानात लपलेले, तेथून भारतात घुसखोरी करणारे दहशतवादी आता पाकिस्तानातील भावी पिढीच्या मुळावरच उठले आहेत, हे वास्तव स्वीकारून पाकिस्तान आता तरी दहशतवाद्यांना आश्रय देणार नाही, अशी या मागची भोळी भावना होती. इतरांच्या दुःखात सहभागी होणे आणि दुसऱ्यांच्या मनात कधीतरी सद्भाव जागा होईल अशी अपेक्षा करणे ही आमच्या हिंदुत्ववादी संस्कार व जीवनशैलीची सकारात्मक मानसिक प्रक्रिया आहे. त्यामुळे पाकिस्तानात दहशतवाद्यांनी केलेले हत्याकांड हे हिंदुत्ववादी मानसिकतेला कधीही सुखावणारे किंवा आनंद देणारे नव्हते. त्याचा प्रत्येकानेच निषेध केला आणि दुःखदायक संवेदनाही प्रकट केल्या.

दुसरी घटना आहे ती पॅरिसमध्ये एका कार्टून विषयक मासिकाच्या कार्यालयात दहशतवाद्यांनी घुसून तेथील संपादक, व्यंगचित्रकार यांच्यासह 10 जणांची हत्या केली. या घटनेतील मृत हे व्यंगचित्रकार हे कलाकार होते. त्यांच्या अभिव्यक्तीतून निर्माण झालेल्या व्यंगचित्राने पवित्र धार्मिक आदर्शाची  विटंबना झाली, असा दावा दहशतवाद्यांनी केला होता. आमच्या धार्मिक आदर्शांची विटंबना करता म्हणूनच तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही असे म्हणत दहशतवाद्यांनी मासिकाच्या संपादक आणि व्यंगचित्रकारांना गोळ्या घातल्या. या घटनेनेही सारे जग हादरले.

पॅरिसमधील घटना घडल्यानंतर सोशल मीडियाचे व्यासपीठ असलेल्या फेसबुक आणि व्हाट्स अपवर विविध प्रतिक्रिया सुरू झाल्या. त्यात भारतात प्रदर्शित झालेल्या वादग्रस्त पीके चित्रपटातील हिंदुंशी संबंधित दृश्यांच्या संदर्भांची पार्श्र्वभूमी होती. चित्रपट निर्मिती ही सुद्धा एक दृश्य कलाच आहे. व्यंगचित्रकार रेषा आणि रंगातून बोलतो. त्याचा आशय संदेशात्मक अथवा विनोदाचा असतो. चित्रपट निर्माता-दिग्दर्शक चलचित्रांच्या माध्यमातून बोलतो. त्यातही संदेश किंवा विनोद असतो. पॅरिसमधील व्यंगचित्रकारांनी मुस्लिमांच्या धार्मिक आदर्शावर व्यंगचित्र काढले. ते रुचले नाही म्हणून कट्टरपंथी दहशवाद्यांनी मासिकाच्या संपादकासह व्यंगचित्रकार व इतरांना ठार मारले. भारतात पीकेचा निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता यांनी पीके चित्रपटातील काही दृश्यांमधून हिंदुंच्या धार्मिक आदर्श देवादिकांची विडंबना केली. हे सारे पाहून दोन मत प्रवाह निर्माण झाले. पहिला कट्टर विरोधाचा आणि दुसरा समाजवाद-अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा. ही विचारधारा भारतीयत्व या मानसिकतेतून आहे. ही स्थिती पुन्हा गोंधळाचीच आहे.

मी जेव्हा स्वतःला भारतीय म्हणून घेतो तेव्हा देशातील सर्व जाती, धर्म, पंथ यांच्याप्रति मी तटस्थ, निर्विकार होतो. कारण आम्ही बालवयात शिकतो, हे विश्वची माझे घर किंवा वसुदेव कुटुंबकम्. कधीतरी साने गुरूजींच्या आंतरभारतीतून सहभागी होताना मला सारे धर्म एक सारखेच वाटू लागतात. अशावेळी भारतीयत्वाचा माझा विचार मला पॅरिसच्या घटनेकडे वेगळ्या आणि पीकेतील वादाकडे वेगळ्या नजरेने पाहायचा आग्रह करतो. मात्र, तेथे मानसिक प्रक्रियेची गल्लत होत जाते. स्वतःचे अस्तित्व भारतीय मानले तर माझा विशिष्ट धर्म आणि धार्मिक प्रतिकांची ओळख सोडावी लागते. याचा अर्थ भारतीयत्व स्वीकारणे ही अस्तित्व नसल्याची स्थिती मला वाटते. या स्थिती मी पीकेतील आशयाचे समर्थन करू शकतो पण, पॅरिसमधील हिसांत्मक घटनेचा मी निषेध केला तर माझे भारतीयत्व गळून पडते. मुस्लिमांच्या धार्मिक प्रतिकांचा अवमान केला ना, मग आता त्यांच्या क्षोभाला सामोरे जा असे माझे भारतीयत्व मला सांगते. कारण, येथे मी मुस्लिम व ख्रिश्चनांसाठी भारतीय म्हणून तटस्थ आहे. परंतू त्याचवेळी भारतीय म्हणून मी घेतलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा माझा दुसरा विचार मला सांगतो, अरे पॅरिसमधील कलाकारांनी त्यांची कला दाखविली मग त्यांचे काय चुकले? दहशतवाद्यांनी त्यांना मारण्याचा घोर अपराध केला आहे. मग, मी पॅरिसमधील हल्लेखोरांचा निषेध करायला लागतो. माझी धार्मिक तटस्थता गळून पडते.

येथे हिंदुस्थानी आणि भारतीय असा विचार करणाऱ्यांचीही गफलत होते. ती कशी बघा. पीकेतील धार्मिक अवडंबराचे चित्रण भारतीय व्यक्तीस योग्य वाटते. तो समाज किंवा साम्य वादातून पीकेचे कलाकृती म्हणून समर्थन करतो. या कलाकृतीस विरोध करणाऱ्यांना हिंदुत्ववादी म्हणतो. पीकेचे समर्थन करणारा भारतीय पॅरिसच्या घटनेबाबत मात्र दहशतवाद्यांना दोष देतो. भारतीय धार्मिक प्रतिकांची कलेतून विडंबना केली तरी तारिफ होते पण मुस्लिमांच्या धार्मिक प्रतिकांवर साधे व्यंग केले तर मृत्यूचा फतवा निघतो. याचा कोणताही कार्यकारण भाव भारतीय माणूस देवू शकत नाही. कारण तो तटस्थ आहे. त्याला सर्व धर्म समान आहेत. हिंदुत्ववादी मात्र टीकेचा, उपेक्षाचा धनी ठरतो.

येथे आपल्या मानसिकतेची गल्लत केवळ हिंदुत्ववादी किंवा भारतीय अशा दोनच प्रकारातच नाही. ती अजून तिसऱ्या प्रकारातही आहे. ती म्हणजे, आम्हाला जग अजूनही इंडियन्स म्हणून ओळखतात. या इंडियन्सचा चेहरा काही ठिकाणी मागासलेला, कर्मठ, परंपरा आणि दैववादी दिसतो. काही ठिकाणी प्रतिगामी, पुढारलेला दिसतो. काही ठिकाणी समाजवादी दिसतो. काही ठिकाणी अर्धवट मुक्त विचारांचा दिसतो. अशा रुपातील इंडियन्स पॅरिसमधील घटना किंवा पीकेसंदर्भातील वादाकडे याच्याशी आपला संबंध नाही असे म्हणून पाहतो. माझ्या दृष्टीने मी कोण? हा मानसिक प्रक्रियेचा गोंधळ आहे तो या तीन वेगवगळ्या मानसिकतेतून. कोणत्याही घटनेकडे पाहण्याची आमची दृष्टी कशी आहे? त्यावर समोरील घटनेचे समर्थन, विरोध, तटस्थता आणि दुर्लक्ष यावर माझा प्रतिसाद, हावभाव अवलंबून असतो.

माझ्या ओळखीचा हा गोंधळ केवळ राष्ट्रीयत्वापुरता नाहीच. तो आमच्या नागरिकत्वातही आहेच. भारत किंवा हिंदुस्तान अथवा इंडिया म्हणून उभे राहत असताना आम्ही आमचा प्रांत, आमचा धर्म, पोटधर्म, जात, पोटजात, प्रादेशिकता आणि त्यासंबंधिच्या ओळखीची अस्मिता घेवून आम्ही उभे राहतो. मी भडगावकर असतो. नंतर जळगावकर होतो. पुढे खानदेशी होतो. त्यापुढे उत्तर महाराष्ट्रीय ही ओळख असते. नंतर महाराष्ट्रीयन होतो. अखेरच्या टप्प्यात भारतीय, हिंदुस्तानी किंवा इंडियन असतो. यापैकी कोणती ओळख घेवून उभे राहायचे यावर आमच्या विचारांची धारा अवलंबून असते. कट्टर भारतीय कधी हिंदुत्ववादी असतो. हिंदुत्ववादी कधी इंडियन असतो. इंडियन असलेला नेहमी मी भारतीय की हिंदुत्ववादी असे स्वतःला विचारत असतो. माझे असे असणे कधीही गळून पडत नाही किंवा मी आहे तसा कायम असत नाही. म्हणून आपण माणसे बदलतात किंवा त्यांची वृत्ती बदलली असे म्हणतो. मी जेव्हा वेद-पुराणे वाचतो. महाभारत वाचतो तेव्हा राजा भरताच्या नावावरून माझ्या देशाचे नाव भरत झाले हे मी मानतो. तो संदर्भ घेवून मी भारतीय असतो. भारतात तेव्हा असणारी स्थिती मी स्वीकारतो. ही संस्कृती मिश्र जीवनशैलीची असल्याचे मला मान्य असते.

मी जेव्हा सिंधू संकृती वाचतो तेव्हा मी सिंधू नदी, सिंधू संस्कृतीचा इतिहास घोकून सिंधू वरून हिंदू आणि हिंदुस्तान याला मान्यता देतो. सिंधू संकृती द्रविडांची होती. तेथे अस्तित्वाचा हा पर्याय आम्ही स्थानिक म्हणून मान्य करीत असलो तरी त्यानंतर आलेले आर्यही हिंदू संस्कृतीत स्थिरावल्याचे, एकरुप झाल्याचे आपण नाकारत नाही. म्हणजेच येथे धर्म, जात, पात संक्रमणाला आम्ही निषिद्ध मानत नाही. ब्रिटीशांचा इतिहास वाचताना आम्ही इंडियन्स ठरतो. ब्रिटाशांच्या लढ्यात खांद्याला खांदा लावून लढणारे सारे इंडियन्स ठरतात. तेथे आमच्या अस्तित्वाच्या खुणा किंवा हुतात्म्यांचे स्तंभ हे धर्म, जात-पात यावर ठरत नाही. 

आमचा क्रिकेट संघ जिंकतो तेव्हा आम्ही भारतीय असतो. जेव्हा मंगळयान यशस्विपणे अवकाशात झेपावते तेव्हा आम्ही इंडियन्स असतो. जेव्हा कारगिलचे युद्ध जिंकतो तेव्हा हिंदुस्थानी असतो. हे वेगवेगळे अस्तित्व आमची वारंवार गफलत करीत असते. याचाच अप्रत्यक्ष परिणाम हा आमच्या अहिष्णूता, तटस्थता, सर्व समानता या विचारधारेवरही होतो.
अशा तिहेरी मानसिकतेत आम्ही आमच्या आनंद, सुख-समृद्धीचे आणि अडचणी-संकटाचे विभाजन करूच शकत नाही. कोणत्या मानसिकतेत आम्ही काय स्वीकारतो? यावरच आमचे व्यक्तिमत्व आणि राष्ट्राचेही व्यक्तिमत्व ठरते. निधर्मीवाद, बहुधर्मिवाद, निरंकार, एकेश्र्वर किंवा बहु ईश्र्वरवाद, समाजवाद की समानतावाद अशा अनेक जंजाळात व्यक्ति म्हणून आम्ही विभाजीत आहोत. हे विभाजन गोंधळाचे आणि गफलतींचे आहे. म्हणूनच आमची एक विचारधारा, एक राष्ट्रीयत्व नाही. कुठेतरी हा गोंधळ निस्तरावा लागेल. स्वतःला जमले नाही पण येणाऱ्या भावी पिढाली एक निश्चित ओळख द्यावी लागेल. त्याच्यासाठी काय करायला हवे?  हे निश्चित करण्याची आज वेळ आहे. काळाचा आणि विचारांचा उंबरठा ओलांडताना आता अंतर्मुख व्हावेच लागणार आहे...

(प्रसिद्धी - दि. ११ जानेवारी २०१५ तरुण भारत)


No comments:

Post a Comment