जळगाव जिल्ह्याची महिला देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपतीपदापर्यंत पोहचल्याचा इतिहास श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या नावावर सुवर्णाक्षरांनी लिहीला गेला आहे. आदरणिय प्रतिभाताईंचे हे मोठेपण हिमालयाच्या उंची एवढे आहे. जिल्ह्यातील महिलांना राजकारण आणि सत्तेतील सर्वोच्चपदे अभावानेच मिळाली. ज्यांना मिळाली त्यांनी निश्चितपणे कार्याचा ठसा उमटवला. आता तशी संधी अमळनेर येथील सौ. स्मिताताई उदय वाघ यांना विधान परिषद आमदारकीच्या माध्यमातून मिळाली आहे. मनमिळावू, सतत कार्यरत राहणाऱ्या आणि पक्ष-कामांशी निष्ठावंत असलेल्या ताईंचा हा प्रवास हिमालयाच्या तुलनेत सध्यातरी डोंगर होण्याएवढाच आहे. मात्र कामाच्या आदर्शातून स्मिताताई भविष्यात शिखर झालेल्या असतील असा आज विश्वास आहे...
विविध क्षेत्रांत पुरूषांच्या बरोबरीने कार्यरत असलेल्या महिला त्यांच्या स्वतंत्र कार्यशैलीमुळे स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यात यशस्वी होतात. किंबहुना राजकिय क्षेत्रात काही महिलांनी पुरूषांच्याही पुढे जावून प्रभावाचे वर्तुळ विस्तारले आहे. जळगाव जिल्ह्यातील महिलांच्या राजकिय इतिहासाचे सुवर्णपान महामहिम माजी राष्ट्रपती प्रतिभाताई यांच्या पाचवर्षांच्या कार्यकाळ स्वरुपात लिहीले गेले आहे. प्रतिभाताईंचे हे मोठेपण हिमालयाच्या उंची एवढे आहे. पुन्हा कोणत्या महिलेस अशी संधी मिळेल की नाही, सांगता येत नाही. पण, हिमालय होणे श्नय नसले तरी काही महिलांचा राजकिय प्रवास हा डोंगर होण्याच्या दिशेने निश्चित आहे, हे आज तरी दिसत आहे.
जळगाव जिल्ह्यातील केवळ दोन
महिलांना राज्याच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली. त्यापैकी पहिल्या होत्या
श्रीमती प्रतिभाताई पाटील आणि दुसऱ्या होत्या चोपड्याच्या स्व. शरश्चंद्रीकाअक्का पाटील.
त्यानंतर केंद्राच्या राजकारणात आणि मंत्रिमंडळात काम करण्याची संधी श्रीमती प्रतिभाताईंनाच
मिळाली. राज्यसभेचे उपसभापतीपद, राज्यपालपद आणि अखेरीस राष्ट्रपतीपद त्यांच्याकडे चालून
आले. श्रीमती प्रतिभाताईंच्या व्यतिरिक्त जिल्ह्यातील कोणत्याही महिलेस अजून तरी केंद्रात
मंत्रिपद मिळालेले नाही.
राज्याच्या विधीमंडळात विधानसभेच्या
आमदार म्हणून स्व. शरश्चंद्रीकाअक्का आणि श्रीमती पारूताई वाघ यांना मतदारांनी निवडून
दिले. नंतर तशी संधी इतर महिलांना मिळालेली नाही. विधानपरिषदेत ऐनवेळेची संधी म्हणून सौ. मधू रमेश जैन या काही काळ आमदार होवू शकल्या.
त्यांच्या निवडीमागे योगायोगाचा भागच जास्त होता. महिलांच्या राजकारणातील संधीचा विस्तार
हा अलिकडे खासदार रक्षाताई खडसेंच्या विजयातून झाला. जिल्ह्यातून पुन्हा दुसरी महिला
केंद्रात पोहचली. या साऱ्या महिलांचे हे नेतृत्व डोंगर होण्याच्या प्रवासाचे आहे, असे
वाटते. सत्ता आणि राजकारणात गावापासून ते देशाच्या संसदेपर्यंतचे एकएक पद मिळणे म्हणजे
डोेंगर होण्याचाच प्रवास. शेवटच्या टप्प्यावर तुम्ही स्वतःच शिखर होतात. श्रीमती प्रतिभाताईंसारख्या.
काळाच्या उदरात राजकारणाचे
कोणते प्रवाह दडलेले असतील? सांगता येत नाहीत. अमळनेर येथील उदय वाघ आणि स्मिताताई
वाघ या राजकिय दाम्पत्याच्या बाबतीत हे अधुनमधून दिसून येते. यापैकी स्मिताताई या आता विधान परिषदेच्या
आमदार झाल्या आहेत. अगदी ध्यानीमनी नसताना. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी विधासभेच्या
अमळनेर मतदार संघातून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करणाऱ्या स्मिताताईंना पक्षाचे
जिल्हाध्यक्ष असलेले पती उदय वाघ हे उमेदवारी मिळवून देवू शकले नाहीत. स्मिताताई स्वतः
पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आहेत. मात्र, राज्यस्तरावर पक्षश्रेष्ठींसोबत
वावरताना ताई स्वतःसाठी उमेदवारी आणू शकल्या नाहीत.
येथे एक उल्लेख करावा लागेल.
तो म्हणजे, स्मिताताईंना उमेदवारी हवी होती पण, ती मिळत नाही किंवा इतर काही अडचणी
आहेत हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपले सर्व लक्ष पक्षाच्या निवडणूक प्रचारावर केंद्रीत
केले. पक्षाच्या महिला शाखेची प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे त्यांनी स्वतःच्या जागेसाठी
प्रतिष्ठापणाला लावण्याऐवजी राज्यभरात महिलांना जागा मिळाव्यात यासाठी पक्षनेत्यांकडे
आग्रह धरला. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी लोकसभेची निवडणूक झाली. तेव्हा राज्यात
48 पैकी 10 जागा द्याव्यात अशी मागणी स्मिताताईंनी पक्षश्रेष्ठी असलेल्या देवेंद्र
फडणवीस, एकनाथराव खडसे यांच्याकडे केली होती. तेव्हा खडसे म्हणाले होते, तुला 10 नाही
मात्र, 3 जागा नक्की देतो. त्याप्रमाणे महिला आघाडीसाठी तीन जागा मिळाल्या आणि त्या
तीनही जगांवर पक्षाच्या उमेदवार निवडून आल्या. या तिनही जागांवर पक्षाला मिळालेले मताध्निय
हे पक्षाकडे वाढणारा महिलांचा कल दर्शवित होते. अर्थात, या तिनही मतदार संघासह संपूर्ण
राज्यभरात स्मिताताईंनी प्रचाराची धुरा सांभाळली. त्यानंतर आली विधानसभा निवडणूक. पुन्हा
महिलांसाठी 21 जागा स्मिताताईंनी मागितल्या. त्यापैकी 18 जागा मिळाल्या. प्रत्यक्षात
12 महिलांना पक्षातर्फे आमदार होण्यासाठी मतदारांनी निवडून दिले.
पक्षाला मते मिळवून देण्यासाठी
लाट कोणाच्याही नावाची असली तरी विजयी महिला उमेदवारांना मिळालेले मताध्निय हे महिलांचा
भाजपकडे असलेला कल स्पष्ट करणारे होते. या विजयातही स्मिताताईंच्या राज्यभरातील प्रचाराच्या
धावपळीचा मोठा सहभाग होताच.
पक्षनेतृत्व या कार्याची दखल
घेत होते. न बोलता आणि गाजावाज न करता. राज्यात पहिल्यांदा भाजप नेतृत्वातील सरकार
शिवसेनेच्या पाठबळामुळे पूर्णतः बहुमतात आहे. विधीमंडळात दोन्ही पक्षांच्या आमदारांची
संख्या निम्म्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे विधान परिषदेत रिक्त झालेल्या 4 जागांसाठी
जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा उच्छूक उमेदवारांच्या यादीत स्मिताताईंचे नाव कधीही
चर्चेत आले नाही. पक्षांतील जेष्ठ मंडळींचेच नाव मुंबईच्या माध्यमातून येत होते. जळगावच्या
माध्यमातूनही कोणाचेही नाव चर्चेत नव्हते.
मात्र, मित्रपक्ष-शिवसेना आणि
भाजपांतर्गत नावे निश्चित करताना एक जागा शिसेनेला, दोन जागा मित्रपक्षांना देत पाचवर्षे
रिकामी झालेली आमदाराची जागा भाजपने स्मिताताईंना दिल्याचे जाहीर केले. हे वृत्त अनेक
राजकिय निरीक्षकांना धक्का देणारे ठरले. कारण असे होईल, असा अंदाज कोणीही केला नव्हता.
अर्थात, स्मिताताईंच्या नावाचा आमदारकीसाठी विचार करायला लावण्यामागे खडसे आणि जलसंपदामंत्री
गिरीश महाजन यांचे प्रयत्न होतेच. येथून स्मिताताईंचा राजकिय प्रवास डोेंगर होण्याच्या
दिशेने सुरू होतो.
स्मिताताईंची ओळख जळगाव जिल्ह्याला
तशी खूप जुनी आहे. स्मिताताई भाजपकडून जिल्हा परिषदेच्या पहिला महिला अध्यक्ष झाल्या.
याशिवाय त्यांनी भाजपच्या विविध शाखांमध्ये काम केले. त्यांचा प्रवास अखिल भारतीय विद्यार्थी
परिषदेतून सुरू झाला. लहानपणीच्या आठवणी सांगताना त्या म्हणतात, आम्ही विसनजीनगरात
राहत असताना मी अभाविपची कार्यकर्ती म्हणून
कार्य सुरु
केले.
स्मिताताईंनी पक्षांतर्गत विविध
जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्या जिल्हा, राज्य आणि केंद्रीय समितीवर सदस्य होत्या. सत्तेच्या
राजकारकारणात त्या 3 वेळी जिल्हा परिषद सदस्य झाल्या. त्यातून त्यांना अध्यक्ष होण्याची
संधी मिळाली. आता त्या आमदार होवून राज्याच्या विधीमंडळात पोहचल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष
असताना स्मिताताईंनी अंगणवाड्या सक्षम करण्याकडे लक्ष दिले. यानिमित्त त्या संपूर्ण
जिल्हाभरात फिरल्या. मुलांचे-महिलांचे प्रश्न त्यांनी जवळून पाहिले. कार्यकर्ती म्हणून
करावी लागणारी मागणी आणि सत्तेचा अधिकार हाती असूनही सामान्यांना लाभ देण्यात येणाऱ्या
अडचणी त्यांनी समजावून घेतल्या. स्मिताताई जेव्हा दौऱ्यावर जात तेव्हा गावातल्या महिलांना
थेट भेटत. कुठे पापड करणाऱ्या, कुठेे शेवया करणाऱ्या महिला त्यांना भेटत. स्मिताताई
तेथेच बैठक जमवत. गप्पा करीत-करीत महिलांच्या अडचणी जाणून घेत. याच अनुभवातून त्यांच्या
संवादाला आणि भाषणाला वास्तवतेची किनार लाभू लागली. जि. प. च्या सभा असो की दौरे स्मिताताई
नेमकेपणाने आणि मुद्यांवर बोलत.
स्मिताताईंना जिल्हा परिषदेचे
अध्यक्षपदही पक्षाने त्यांच्या निष्ठा आणि परिश्रम घेण्याची वृत्ती पाहून दिले. तीनवेळी
सदस्य झालेल्या ताईंसाठी ही काम करून दाखविण्याची संधी होती. राजकारणाची एक टेकडी त्यांनी
सर केली होती. स्मिताताईंच्या कारकिर्दीत महिलांच्या अनेक योजना प्रभावीपणे मार्गी
लागल्या. फारसे वाद-विवाद न होता त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला.
स्मिताताईंच्या कार्याची अध्यक्ष
म्हणून नोंद कोणती? असे विचारल्यावर त्या म्हणतात, मी अध्यक्ष झाले आणि एके दिवशी नाथाभाऊंचा
फोन आला. ते म्हणाले, स्मिता केंद्र शासनाची एक चांगली योजना आली आहे. बघ, आपल्या जिल्ह्यात
काही करता येईल का? मी भाऊंच्या आदेशानुसार कामाला लागले. त्या योजनेची माहिती घेतली.
ती योजना बंधारे दुरूस्ती आणि जोड रस्त्याची होती. मी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेतले. तीन महिने अक्षरशः जिल्हा
फिरून कामांचे आराखडे तयार केले. ते केंद्र शासनाकडे पाठविण्यासाठी राज्याच्या ग्राम
विकास मंत्रालयात पाठविले. तेथून आमचा प्रस्ताव पुढे जाईच ना! मी माहिती घेतली तेव्हा
कळले की, संबंधित मंत्र्यांनाही ती योजना माहित नव्हती. त्यामुळे त्यांनी जळगावचे प्रस्ताव
पाहून स्वतःच्या जिल्ह्याचा प्रस्ताव तयार केला. त्यात वेळ गेला. नंतर, केंद्र सरकारने
त्या योजनेकडे दुर्लक्ष केले.
स्मिताताईंनी जिल्हा परिषदेचा
गावगाडा स्वतःच्या अनुभवाच्या शिदोरीवर चालवला. त्या कधीही रबर स्टॅम्प किंवा इतर कोणाची
सावली म्हणून वावरल्या नाहीत. त्यांनी निर्णय घेतले ते स्वतःला पटले म्हणून. सभेतही
कधीकधी त्या रणरागिणी झाल्या. आक्रमक होणाऱ्या सदस्यांना त्यांनी बोटांवर रोखले. हे
सारे प्रसंगावधान आणि ध्यैर्य त्यांना अभाविपतून मिळाले. हा तेथील संस्कार होता.
स्मिताताई जि. प. सदस्य असताना
थेट अध्यक्ष झाल्या. त्यांना सभापतीपदाचा वगैरे अनुभव नव्हता. पण, अभाविपच्या विविध
उपक्रमातून संघटन कौशल्ये त्यांनी आत्मसात केली होती. लग्नानंतरच्या दीड-दोनवर्षांच्या
काळात छपाई व्यवसायाच्या अर्थकारणाचा सांधा जुळवताना त्या अर्थव्यवहारही शिकल्या. उदय
वाघ हे छापखान्याच्या मालकांपैकी एक होेते पण कामाचा, व्यवसायाचा आणि नफा-नुकसानीचा
हिशेब नेहमी स्मिताताईंनीच पाहिला. हाही अनुभव जि. प. तील कारकिर्दीसाठी उपयुक्त ठरला.
स्मिताताई संघाच्या विचारधारेशी
जुळलेल्या उद्यमी महिला पतसंस्थेच्याही पहिल्या पासून पदाधिकारी आहेत. स्वतःचा उद्योग-व्यवसाय
सांभाळताना त्यांना उत्कृष्ट उद्योगिनी महिला पुरस्कारही मिळाला आहे. हा पुरस्कार त्यांना
मंत्री म्हणून खडसे आणि प्रमुख पाहुणे म्हणून दुसरे मंत्री सुरेशदादा जैन यांच्या उपस्थितीत
मिळाला आहे.
स्मिताताईंच्या आतापर्यंतच्या
वाटचालीतील काही योगायोग लक्षवेधी आहे. जेव्हा श्रीमती प्रतिभाताई पाटील पहिल्या महिला
राष्ट्रपती झाल्या तेव्हा स्मिताताई पहिल्या महिला जि. प. अध्यक्ष झाल्या. आज आपण त्याच
प्रतिभाताईंच्या उत्तुंग भरारी समोर स्मिताताईंचे आमदार होणे हे डोंगर असल्याचे म्हणत
आहोत. स्मिताताईंच्या नेतृत्वात जळगाव जिल्ह्यातील काही महिला सरपंच व जि. प. सदस्यांचे
शिष्टमंडळ नवीदिल्लीत जावून प्रतिभाताई, शरद पवार, कपिल सिब्बल आदींना भेटून आले होते.
स्मिताताई जि. प. अध्यक्ष असताना जळगावचे उद्योगपती पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांना
मनपाचा जळगावरत्न पुरस्कार दिला गेला होता. त्यानंतर आजपर्यंत हा पुरस्कार दुसऱ्या
कोणालाही दिलेला नाही. स्मिताताईंच्या काळातच जि. प. च्या इंग्रजी शाळा सुरू झाल्या.
खान्देश महोत्सव भरविणे सुरू झाले. हे सर्व उल्लेख स्मिताताईंच्या आगळ्यावेगळ्या कार्याची
ठळकपणे माहिती देतात.
स्मिताताईंचे बालपण कॉंग्रेस
विचारसरणीच्या घरात गेले. त्यांचे वडील रावसाहेब पाटील (रा अंदरसूल, ता. येवला, जि.
नाशिक) हे जहागिरदार होते. त्याकाळी वसंतदादा, शरद पवार यांच्या ते संपर्कात होते.
तेथे राजकारणाचे बाळकडू स्मितामाईंना मिळाले. त्यांचे लहानपणीचे नाव माई होते. माई
सर्वांशी मिळून-मिसळून वागत. माईला आजी अन्नपूर्णा चव्हाण यांच्याकडे कानळदा (ता. जळगाव)
येथे शिक्षणासाठी पाठविले. नंतर आजी जळगावात विसनजीनगरातील घरी आल्या. तेथेच लहानपणीचा
प्रवास सुरू झाला.
अन्नपूर्णाबाई धार्मिकवृत्तीच्या
होत्या. त्यांचा तो संस्कार माईवर झाला. पूजा-पाठ सुरू झाले. आरत्या, स्तोत्र पाठ झाले.
संघ, अभाविपतही ही विचारधारा जुळलेली होती. आजही स्मिताताई पूजा-पाठसाठी वेळ देतात.
त्यांचा भविष्य-प्रारब्ध यावर विश्वास आहे. बहुधा यातूनच पापभिरूवृत्तीची जोपासना झाली
असावी.
स्मिताताईंच्या आयुष्यात दोन
रावसाहेबांच्या सहकार्याची नोंद करावीच लागेल. एक म्हणजे, त्यांचे वडील रावसाहेब पाटील.
त्यांनी माईला आजीकडे पाठविले म्हणून माई ते स्मिताचा प्रवास पुढे सरकला. त्यानंतर
दुसरे रावसाहेब म्हणजे, उदय वाघ. उदय यांचे घरचे नाव रावसाहेब आहे. हाही एक योगायोग
म्हणायचा.
यशस्वी महिलांविषयी लिहीताना
त्यांच्या पाठीमागे असलेल्या पुरूषांचा उल्लेख केला जातो. स्मिताताई आणि उदय वाघ यांच्याही
बाबतीत असाच उल्लेख करावा लागेल. पण त्यात योगायोगांचा भरणाच अधिक आहे. दुसऱ्या शब्दांत
असेही म्हणता येईल की, जी संधी उदय वाघांची हुकली ती नेहमी स्मिताताईंसाठी चालून आली.
याची काही उदाहरणे पाहू. उदय
वाघ सरपंच होते. जि. प. सदस्य होण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र, कै. हरिअण्णा
पाटील यांनी त्यांचा पराभव केला. पुढे त्यांचा गट महिला राखीव झाला. त्या गटातून स्मिताताई
तीन वेळा निवडून आल्या. उदय वाघ एकदा जिल्हा बँकेत संचालक झाले मात्र, सहा महिन्यात
बँक बरखास्त झाली. स्मिताताई जि. प. अध्यक्ष म्हणून जिल्हा बँकेवर पदसिद्ध संचालक होत्या.
याशिवाय त्या उमविच्या सिनेटवरही निवडून आल्या होत्या.
दोघांच्या आयुष्यातील काही
योगायोग पक्षनेतृत्वाच्या बाबतही आहेत. उदय वाघ पक्षाचे जिल्हा सरचिटणीस असताना स्मिताताई
राज्य कार्यकारिणीवर होत्या. उदय वाघ आता जिल्हाध्यक्ष आहेत तर स्मिताताई महिला शाखेच्या
प्रदेशाध्यक्ष आहेत. उदय वाघ जिल्ह्यात उमेदवार ठरवित असताना स्मिताताई राज्यात महिला
उमेदवार निश्चित करीत होत्या. उदय वाघ यांनी दोनवेळा पक्षाकडे अमळनेर मतदार संघातून
उमेदवारी मागितली. त्यांना संधी मिळाली नाही मात्र, आता स्मिताताई थेट आमदार झाल्या.
स्मिताताईंचे हे यश स्वतंत्र
आणि सर्वसमावेशक व्यक्तिमत्वाचे प्रतिक मानावे लागेल. पक्षांतर्गत गटतट सर्वच ठिकाणी
असतात. तसे ते जळगाव भाजपतही आहेत. मात्र, या सर्व गटातटांच्या वर्तुळाला पारदर्शी
स्पर्श करण्याचे कौशल्य स्मिताताईंकडे आहे. म्हणूनच त्यांच्या उमेदवारीला नाथाभाऊ आणि
गिरीशभाऊ दोघेही एकमुखी समर्थन देतात. हे भाग्य फारच थोड्या मंडळींच्या नशिबी येते.
एक गोष्ट नक्की. स्मिताताईंची
भाग्यरेषा इतरांपेक्षा निश्चित ठळक आणि मोठी आहे. अर्थात, त्यांना मिळालेली आमदार होण्याची
संधी ही नशिबाचा नाही पण, परिश्रम आणि निष्ठांचा प्रसाद आहे. असे म्हणतात की, प्रसाद
वाटल्याने वाढतो आणि त्यानिमित्ताने इतरांचे आशीर्वादही मिळतात. स्मिताताईंच्या डोेंगर
होण्याचा हा प्रवास त्यांच्या आदर्श कार्याचे शिखर होवून थांबावा हिच यानिमित्त तरुण भारत परिवार ची शुभेच्छा आहे!!
सालंकृत स्मिताताई
देशाच्या सर्वोच्चपदावर प्रतिभाताई
असताना त्यांनी कधीच भारतीय संस्कृतीला धक्का लागू दिला नाही. फूल्ल बाह्यांचे ब्लाऊज,
कपाळावर शोभेल असे ठसठशीत कुंकू, डो्नयावर पदर असा ताईंचा पेहराव असतो. विदेश दौऱ्यावर
जरी ताई गेल्या तरी त्या आपल्या राहणीमानात बदल करीत नसत. स्मिताताईंचे तसेच आहे. आंदोलन,
संघटन, बैठका अशा सर्व ठिकाणी स्मिताताई नेहमीच्या पेहरावात असतात. कपाळावर शोभून दिसणारे
कुंकू आणि डो्नयावरून न ढळणारा पदर हीच त्यांची ओळख. भारतीय संस्कृतीचे यातून खरे रूप
पाहावसाय मिळते. आपल्या राहणीमानातून स्मिताताई सालंकृत व्यक्तिमत्व असल्याचे स्पष्टपणे
जाणवते.
पॉलिसी ठरविणाऱ्यात स्मिताताई
हव्यात...
आमदार झालेल्या स्मिताताईंशी
गप्पांचा कार्यक्रम केशव स्मृती प्रतिष्ठानचे प्रकल्प प्रमुख भरतदादा अमळकर यांच्या
पसाय या निवास्थानी शनिवारी आयोजित होता. भरतदादा आणि सौ. हेमाताई अमळकर यांच्यासमोर
स्मिताताईं मोठ्या झाल्या. त्यामुळे हा सत्कार घरचा होता. यावेळी विवेकानंद प्रतिष्ठानचे
अध्यक्ष माजी प्राचार्य अनिल राव, डॉ.रवींद्र हिराणी, सौ. व श्री. सचिन अमळकर आदी उपस्थित
होते. गप्पाच्या ओघात हेमाताई म्हणाल्या, स्मिताताई आपण अभाविपच्या माध्यमातून संघटन
कौशल्य शिकल्या. जि. प. सदस्य म्हणून महिलांचे प्रश्न तुम्हाला माहित झाले. जि. प.
अध्यक्ष म्हणून सत्ताकारणाचा अनुभव घेतला. आता विधीमंडळाच्या आमदारांनी तुम्हाला निवडून
दिले. 6 पैकी 5 वर्षे तुम्ही सर्वोच्च सभागृहात असाल. आता स्मिताताईंचा प्रवास हा राज्याचे
धोरण ठरविणाऱ्या मंडळीत हवा. तुम्ही पॉलिसी ठरवा आणि महाराष्ट्र घडवा. अर्थात, स्मिताताईंसाठी
हे शब्द आशीर्वादपर आहेत हे सांगायला
नको.
(प्रसिद्धी - दि. २५ जानेवारी २०१५ तरुण भारत)
No comments:
Post a Comment