Thursday 12 February 2015

स्थितःप्रज्ञ नाथाभाऊंची आव्हानांवर मात !


राजकारण, समाजकारण आणि कौटुंबिक व्यासपीठावर गेल्या पाव शतकात ना. एकनाथराव खडसे यांची अनेक रुपे पाहता आणि अनुभवता आली. पत्रकार म्हणून त्यांच्या काही राजकिय निर्णयांचे समर्थन केले. अपवादात्मक स्थितीत खंडन  करणारे लिखाणही केले. तटस्थपणे लिहीताना निर्णय टोकाचे वाटले मात्र, त्यांच्याशी चर्चा करून लिहीताना निर्णयांशी सहमती झाली. नाथाभाऊंच्या स्वभावाचा हा महत्त्वाचा पैलू आहे. त्यांनी एखाद्याविषयावर बाजू मांडली की, आव्हानात्मक वाटणारी स्थितीही त्यांच्या ताब्यात येते. ही सिद्धी त्यांना वैचारिक आणि आध्यात्मिक बैठकीच्या नैतिक अधिष्ठानातून प्राप्त झाली आहे. म्हणूनच नाथाभाऊ स्थितःप्रज्ञ माणसाप्रमाणे साऱ्या आव्हानांना सामोरे जातात नव्हे तर त्यावर यशस्वीपणे मातही करतात.

 पत्रकार म्हणून मी गेली 24 वर्षे काम करतोय. सन 1989 पासून जळगाव जिल्ह्यातील विविध राजकिय नेत्यांच्या कार्यपद्धती आणि सार्वत्रिक वर्तुणकिशी माझा जवळचा संबंध आला आहे. काही नेत्यांच्या राजकारणाचा तो सूवर्ण काळ होता. काही जण राजकारणाच्या उंबरठ्यावर होते. अगदी मोजकी मंडळी प्रस्थापितांच्या दरबारात नवशिकी होती. काहींनी बुजूर्ग अवस्थेची मर्यादा गाठलेली होती. मी सुद्धा पत्रकारिता शिकतच होतो. 1989 ते 1992 दरम्यानचा तो काळ जळगाव जिल्ह्यातील बऱ्याच काजकिय उलथापालथींचा होता. नानाविध प्रकरणांनी जिल्हा गाजत असे.
मला चांगले आठवते त्याकाळात राज्याच्या विधानसभेत जळगाव जिल्ह्यातील भाजपचे एकमेव आमदार एकनाथराव खडसे होते. त्यांनी विचारलेले तारांकीत प्रश्न जळगाव जिल्ह्यातील जिल्हा सहकारी बँक, जिल्हा सहकारी दूध संघ, महाफेड अशा संस्थांशी संबंधित असत. हे प्रश्न स्थानिक कॉंग्रेसच्या नेत्यांना अडचणीत आणणारे असत. त्यामुळे बऱ्याचवेळा आ. खडसेंच्या प्रश्नांना लेखी उत्तरे देवून सरकार वेळ निभावून नेत असे. अशाही परिस्थितीत ताकांकित प्रश्न चर्चेला लागणार असेलतर आ. खडसे जळगावच्या काही पत्रकारांना फोनवरून उद्या या प्रश्नावर चर्चा आहे, हे व्यक्तीशः सांगत. दुसऱ्या दिवशी काय चर्चा झाली तेही फोनवरून सांगत.
कधीतरी जळगावला आले की, सेंट्रल फुले मार्केटच्या दुसऱ्या मजल्यावरील वृत्तपत्राच्या कार्यालयासमोर आ. खडसे सिगारेटचे झुरके घेत विधीमंडळात काय घडले? याचा पूर्ण किस्सा सांगत.
जळगाव जिल्हा बँक आणि राज्य शिखर बँकेच्या सहकार्याने त्याकाळात सहकारी उपसा जलसिंचन योजनांची कोट्यवधी भरपूर कामे केली जात होती. राज्य शिखर बँकेचे अध्यक्ष आणि जिल्हा बँक अध्यक्ष म्हणून स्व. प्रल्हादराव पाटील होते. कामांचे ठेकेदार म्हणून भुसावळचे स्व. एम. के. कोटेचा होते. या कामांमधील अनियमिततेच्या असंख्य तक्रारी होत्या. योजनांची कामे करताना शेतकऱ्यांची संमतीपत्रे, शेतावर कर्जाचा बोजा, करारपत्रे अशा अनेक गोष्टी भानगडींच्या होत्या. या साऱ्या गोष्टीचा अत्यंत बारकाव्याने विचार करून आ. खडसे यांनी विधीमंडळात उपसा जलसिंचन योजनेतील घोटाळ्यावर प्रश्न विचारले होते. अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात हा प्रश्न चर्चेला येईल अशी अपेक्षा असताना, प्रश्न चर्चेला आलाच नाही. प्रश्नाविषयी विचारण्यासाठी आ. खडसेंनी सभागृहात तासभर बोट वर करून ठेवले मात्र विधानसभाध्यक्षांनी त्यांच्याकडे लक्षच दिले नाही. हा किस्सा सायंकाळी आ. खडसेंनी फोनवर सांगितला. दुसऱ्या आठवड्यात हा प्रश्न चर्चेला आला, त्यावर पाऊणतास आ. खडसे बोलले आणि अध्यक्षांनी प्रश्न रोखून त्यावर सहकारमंत्र्यांना सभागृहात सविस्तर उत्तर देण्यास सांगितले. नंतर चौकशीसाठी समितीही नेमण्यात आली.
हा किस्सा एवढ्यासाठीच सविस्तर दिला आहे की, त्यानंतर गेल्या 20- 22 वषार्र्ंत आ. खडसे यांच्या अधिकार व व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू विधानसभेत अनुभवता आले. विधीमंडळातील अभ्यासपूर्ण आणि उत्कृष्ट भाषणांबद्दल त्यांचा मान्यवरांनी सत्कारही केला. आ. खडसेंचे तेव्हाचे अस्तित्व हे भाजपचा केवळ एकमेव आमदार असे होते. आज ते विधीमंडळातील सभागृहात विरोधकांचे नेते आहेत.
आपण एकटे आहोत, त्यामुळे सभागृहात फारसे बोलून काय साध्य होणार? नाहीपेक्षा सत्ताधाऱ्यांशी जमवून घ्या असा विचार त्यांनी केला असता तर त्यांच्यांतील लढवय्या नेता घडला नसता. पुढील राजकिय आव्हानांवर सहजपणे मात करू शकला नसता. खरेतर त्याकाळात आ. खडसे यांच्यामुळे माझ्यासारख्या नवश्निया पत्रकाराला विधीमंडळात विरोधकांची काय भूमिका असते? हे समजू शकले.
जळगाव जिल्ह्यातच नव्हेतर संपूर्ण राज्यात आ. खडसे यांनी भाजपचे प्रभावीनेते म्हणून लौकिक मिळवला. त्यांनी केळी, कापूस या पिकांसह वीज भारनियमन, सिंचन, पोलिसांची मनमानी अशा विविध विषयांवर आंदोलने केली. त्यांच्या आंदोलनाची पद्धतही अभिनव असायची. शिंगाडे मोर्चा, अर्धनग्न (शर्ट- बनियन काढून) धरणे, भजन आंदोनल असे अनेक आंदोलन प्रकार आ. खडसे यांच्या नेतृत्वात केले गेले. यातूनही आ. खडसेंचे व्यक्तिमत्व घडले, त्याचा प्रभाव राज्यभरात विस्तारला. आ. खडसेंना सन 1990 ते 1995 च्या काळात विधीमंडळात उपगटनेता, त्यानंतर सन 1994- 1995 दरम्यान पक्षाच्या राज्यशाखेचे चिटणीस व त्यानंतर सरचिटणीसपद मिळाले. या प्रत्येक पदावर काम करताना आ. खडसेंनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला.
या नंतरच्या कालप्रवाहात युतीची सत्ता असताना आ. खडसे मंत्रीपदापर्यंत पोहचले. पक्षांतर्गत नेतृत्वाची संधीही त्यांच्याकडे चालून आली. त्यांच्याच नेतृत्वात जळगाव जिल्हा परिषदेतही युतीची सत्ता आली. कधीकाळी जिल्ह्याच्या सहकारात भाजपचा एखादा नेता, पदाधिकारी किंवा कार्यकर्ता चुकून माकून घुसायचा तेथे पक्षाचे अनेक पदाधिकारी उभे राहीले. स्वतः आ. खडसे हे जिल्हा बँकेत संचालक झाले. ज्या बँकेतील गैरप्रकारांवर त्यांनी विधीमंडळात प्रहार केले त्याच बँकेच्या सत्ताधारीगटात आ. खडसे बसले.
आ. खडसे यांच्या व्यक्तिमत्वाचा हाही एक पैलू आहे की, त्यांना जे हवे होते, त्यांना ज्याची अपेक्षा असते, ते त्यांनी सर्वप्रकारचे सामर्थ्य वापरून मिळविले किंवा ते साध्य करतात. जळगाव जिल्हा बँकेत संचालक म्हणून त्यांचा स्वतःचा प्रवेश आणि जळगाव जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष या दोन्ही अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्या.
आ. खडसे यांचा राजकिय प्रवास अगदीच सरळसोट नाही. जेव्हा जे मिळायला हवे ते त्यांना मिळाले नाही. पात्रता, हक्क आणि सामर्थ्य असतानाही काहीवेळा ते सत्तेपासून लांब राहीले. याचे पहिले उदाहरण म्हणजे, सन 1995 मध्ये राज्यात पहिल्यांदा युतीची सत्ता आल्यानंतरही तब्बल तीन महिन्यांनी मंत्रिमंडळात आ. खडसे यांचा समावेश झाला.
या विषयी विचारले तर आ. खडसे म्हणतात, तेव्हा पहिल्यांदा युतीचे सरकार सत्तेत येणार म्हणून सर्वांना आनंद होता. मंत्रिमंडळाची रचना करण्याचे अधिकार तेव्हा स्व. प्रमोद महाजन यांना होते. त्यांनीच यादी निश्चित केली होती. माझा मंत्रिमंडळात समावेश आहे, असा निरोप मला मिळालेला होता. मात्र, ज्या दिवशी मुंबईत शपथविधी होता त्याच्या आदल्या रात्री मला प्रमोदजींचा फोन आला. ते म्हणाले, एकनाथजी तुम्हाला मंत्रिमंडळात येण्यापासून थोडे थांबावे लागेल. पहिल्या शपथविधीत एखादी महिला मंत्रीपदी हवी म्हणून तुमचे नाव वगळून शोभाताई फडणवीस यांना संधी देत आहोत. तुम्ही थोडा संयम ठेवा. मी प्रमोदजींच्या सांगण्या बाहेर नव्हतो. म्हटले, नंतर संधी द्या. मी गप्प बसलो पण कार्यकर्ते आणि पक्षातील काही तरुण मंडळी स्व. गोपीनाथ मुंडेजींकडे जावून मला मंत्री करा, हीच मागणी वारंवार करीत होती. अखेर तीन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर मला मंत्रीपद मिळाले.
हाच मुद्दा स्पष्ट करताना आ. खडसे पुढे म्हणतात, अडचणी अशा सांगून येत नाही. मी मंत्री तर झालो पण मला खातेच नव्हते. पाच दिवस बिन खात्याचा मंत्री होतो. अखेर मला उच्चशिक्षण खात्याचे मंत्रीपद मिळाले. मी जोमाने कामाला लागलो. पुन्हा तीन महिन्यांनी मला सांगण्यात आले की, तुमचे काते बदलत आहोत. तुम्ही अर्थ व नियोजन खाते सांभाळा. मी मात्र यावर नाराज झालो नाही कारण, राज्याची तिजोरीच माझ्या ताब्यात आली. मी एक अर्थ संकल्प सादर केला आणि पुन्हा माझे खाते बदलून पाटबंधारे मंत्रालय देण्यात आले. मी या संधीचा फायदा घेतला. विविध पाटबंधारे महामंडळांची स्थापना केली. तापी पाटबंधारे महामंडळ स्वतंत्र केले. त्याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी आला. धरण, सिंचन प्रकल्पांचा वेग वाढला.
पत्रकार म्हणून एक गोष्ट मान्य करायला हवी. ती हिच की, आ. खडसे यांच्या नेतृत्वात उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सिंचनाची अनेक कामे मार्गी लागली.
येथे एक जुना संदर्भ आठवतो. तो म्हणजे युतीचे सरकार सत्तेत आले तेव्हा नंदुरबारमधून अपक्ष आमदार म्हणून डॉ. विजयकुमार गावीत निवडून आले होते. त्यांचा हात आ. खडसे आणि स्व. मुंडे यांनी पकडला. त्यांनी युतीला पाठींबा देत राज्यमंत्रीपद पदरात पाडून सत्तेत सहभाग मिळवला. नंदुरबार जिल्हा स्थापनेसाठी पुढाकार घेतला. आ. खडसे यांनीही डॉ. गावीतांचे जाहीर पालकत्व स्वीकारून नंदुरबारसह वाशीम जिल्ह्यांची निर्मिती केली. त्यानंतर सत्तेची सर्व प्रकारची फळे डॉ. गावीत आणि त्यांच्या कुटुंबियांनी चाखली. आज त्यांच्या कन्या डॉ. हिना गावीत या नंदुरबारमधून भाजपच्या खासदार आहेत.
सत्तेच्या सारीपाटावर आ. खडसे यांनी मैत्री राखणे आणि दिलेला शब्द पाळणे या दोन गोष्टी नेहमी पूर्ण केल्या. त्यांच्या कृपेमुळे सामान्य कार्यकर्ते असलेले अशोक कांडेलकर जि.प. चे अध्यक्ष झाले. व्यापारी असलेले डॉ. गुरूमुख जगवाणी दुसऱ्यांदा विधान परिषदेचे आमदार झाले.
जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात कॉंग्रेसच्या अनेक जुन्या पुढाऱ्यांशी आ. खडसे यांचे वैचारिक मतभेद राहीले. परंतु त्यांनी कोणाचाही टोकाचा दःुस्वास केला नाही. येथे अपवाद मात्र जळगावचे नेते आ. सुरेशदादा जैन आणि जामनेरचे नेते खा. ईश्वरलाल जैन यांचा. आ. खडसे यांनी सुरेशदादांशी दोनवेळा राजकिय संबंध जुळवून घेतले. पहिल्यावेळी तर सुरेशदादा आणि आ. खडसे यांच्या नेतृत्वात खान्देशच्या विकासासाठी खान्देश विकास मंचही स्थापन करण्याता आला होता. या मंचच्या जाहीर प्रचाराचे अभियान मीच पत्रकार म्हणून राबविले होते. मात्र, जिल्ह्यातील काही स्थानिक स्वराज्य संस्थांमधील समर्थकांमुळे सुरेशदादा व आ. खडसे दुरावले. हा दुरावा सुरेशदादांनी एवढ्या टोकाला नेला की, आ. खडसे यांच्या काळात तापी पाटबंधारे महामंडळात कोच्यवधींचा घोटाळा झाला असे चित्र प्रसार माध्यमातून मांडले गेले. अर्थात, आ. खडसे यांनीही आरोपांना त्याच भाषेत उत्तर देवून
राज्यशासनाकडे तक्रार करा किंवा पोलिसात तक्रार नोंदवा, असे जाहीरपणे सांगितले. सुरेशदादा त्यापैकी काहीही करू शकले नाहीत. सुरेशदादांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. ते काही काळ मंत्रीही होते पण आ. खडसे यांच्यावर कोणतीही कुरघोडी ते करु शकले नाहीत.
नंतरच्या काळात सुरेशदादा हे पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसची वारी करून शिवसेनेत परत आले. त्यांना व आ. खडसे यांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी जळगावमधील काही मान्यवरांनी प्रयत्न केले. झालेही तसेच. दोघे एकत्र दिसू लागले. पण तेव्हा युतीची सत्ता गेली होती.
सुरेशदादा व आ. खडसे यांच्यातील मैत्रीच्या शब्दाला जागण्याची वेळ विधानपरिषदेच्या जळगाव मतदार संघाच्या निवडणूक निमित्ताने आली होती. त्यावेळी टोकाचा विरोध करून सुरेशदादा पुन्हा आ. खडसेंपासून दुरावले. परंतू हे धाडस करताना सुरेशदादांनी राज्याच्या सत्तेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना दुखावले. मात्र ना. खडसे हे विधानसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून सत्तेच्या जवळ राहीले. पूत्र स्व. निखील याचा सुरेशदादा, ईश्वरलाल जैन यांनी घडवून आणलेला पराभव आ. खडसेंच्या जिव्हारी लागला. आजपर्यंत त्या पराभवाचे शल्य आ. खडसेंच्या मनांत आहेच.

सुरेशदादांनी पूर्वी आ. खडसेंवर जाहीरपणे तापी पाटबंधारे महामंडळात  कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचा आरोप केला होता. ते सत्तेत असताना आ. खडसेंचे काहीही करू शकले नाहीत मात्र, विरोधी पक्षनेता म्हणून आ. खडसेंनी जळगाव महानगर पालिकेतील घरकुल घोटाळ्याचा पाठपुरावा करून अखेर त्याचे अपश्रेय सुरेशदादांच्या नावावर टाकून त्यांना तुरूंगात पाठविले. या शिवाय इतरही पाच- सहा प्रकरणात सुरेशदादा अजुनही संशयित आरोपी आहेतच. असाच टोकाचा विरोध मात्र वस्तुस्थिती व सत्याला धरून आ. खडसे यांनी पोलीस प्रशासनातील लोहार कुटुंबियांचे बनावट जात प्रमाणपत्र आणि परीक्षेतील हेराफेरी प्रकरणात केला आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे तीनही लोहार बंधूंना पदे सोडावी लागली. एकाला फेरनियुक्तीनंतरही कायदा हातात घेतल्यामुळे जामीनावर मुक्त होण्याची वेळ आली.

आ. खडसे यांचा विरोधकांना पूर्णतः धडा शिकविण्याचा गुण थोडा टोकाचा वाटतो पण, सर्व विरोधकांच्या बाबत असे होत नाही. संधी मिळेल तेव्हा आ. खडसे विरोधकांच्या समोर सुरूवातीला तडजोडीचा प्रस्ताव मांडतात. मात्र, समोरच्याने अगदीच ऐकून घेतले नाही तर प्रशासनातील सर्व प्रकारची आयुधे वापरून हवे ते साध्य करण्याची किमया आ. खडसे यांच्याकडे आहे. त्यांच्या अभ्यास व आक्रमकपणाला सत्तेतील उच्चपदस्थ यासाठीच वचकून असतात.

मावळत्या विधानसभेत साधारणतः वर्षभरापूर्वी आ. खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना व त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित संस्थामधील गैरव्यवहारांना टार्गेट करुन वातावरण पूर्णतः तापविले होते. या आरोपांमुळे पवार कुटुंबिय अडचणीत होते. अखेर शरद पवारांनी स्वतःचा संयम सोडून आ. खडसेंवर थेट खंडणीखोर विरोधी पक्षनेता असा शेल्नया भाषेतला आरोप केला. आ. खडसेंमधील स्थितःप्रज्ञ माणसाची लक्षण दिसली ती या काळात. आ. खडसेंनी पवारांच्या आरोपाला तेवढ्याच खंबीरपणे उत्तरे दिली. मात्र, भाषा पवारांच्या एवढी खालच्यास्तराची वापरली नाही. आ. खडसे संयम ठेवून मात्र आक्रमकपणे म्हणाले, मी गुन्हेगार याचा व्हायचा तो परिणाम झाला. पवारांच्या घोटाळ्यांची प्रकरणे माध्यमातून नेहमी चर्चेत राहिली, उलटपक्षी आ. खडसेंना माध्यमांनी सहकार्यच केले.

येथे एक बाब मुद्दाम नमुद करावी लागेल. एकीकडे ज्येष्ठ पवारांशी शाब्दीक वाद असताना आ. खडसेंनी कधीही मोठे पवार
व छोटे पवार यांच्याशी टोकाचे मतभेद बाळगले नाहीत. विधीमंडळात पवारांवर हल्ला करणारे आ. खडसे छोट्या पवारांच्यासोबत जेवायला बाहेर जात. एवढेच नव्हे तर मोठ्या पवारांशी आ. खडसे यांचे आजही घरगुती संबंध आहे. आ. खडसेंचा हा अजातशत्रू गुण फारच कमी लोकांना माहित आहे. मुक्ताईनगर तालु्नयात कोणत्याही गावात कोणाचेही निधन झाले किंवा आजारी असेल तर तर आ. खडसे त्यांच्या घरी आवर्जून जातात. संबंधित व्यक्ती राजकारणात विरोधातील असेल तर त्याची मुद्दाम आठवण करतात.

राजकारणासोबत काही कौटुंबिक आव्हानेही आ. खडसेंच्यासमोर उभी ठाकली. आहे त्या पस्थितीत त्यांनी ती संयम, धैर्य आणि धीराने हाताळली. स्वतःच्या आरोग्याचाविषय असो की मुलाच्या अकाली मृत्यूचा आघाज असो आ. खडसे, सौ. मंदाताई, सूनबाई श्रीमती रक्षाताई आणि दोन्ही कन्या असे सारे कुटूंब या आपत्तीतून एकत्र येवून सावरले, उभे राहीले. कोणत्याही आपत्तीने आ. खडसे खचले नाहीत. नव्या उभारीने ते पाय रोवून उभे राहीले. यातूनच आव्हानांना सामोरे जाणारे एकनाथराव खडसे सर्वांना भावतात. आपले वाटतात. इतरांसाठी आदर्श ठरतात.

आ. खडसे आज (दि. 2 सप्टेंबर 2014 ला) 62 वा वाढदिवस साजरा करून 63 व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. महाराष्ट्रात विधानसभची निवडणूक तोंडावर आहे. निवडणूकपूर्व मतदारांचा कौल भाजप- शिवसेना युतीच्या बाजूने आहे. यदाकदाचित युती अंतर्गत भाजपच्या जागा जास्त निवडून आल्या तर मुख्यमंत्रीपद भाजपच्या वाट्यावर येवू शकते. तेव्हा नियतीचा कौल हा पुन्हा आ. एकनाथराव खडसे यांच्या बाजूने पडून जळगाव जिल्ह्यातील लोकनेत्याचे नव्हे लोकनाथाचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे अशीच अपेक्षा आपण करू शकतो. यासाठीच आ. खडसे यांना तरुण भारत परिवाराच्या शुभेच्छा आहेतच.

(प्रसिद्धी - दि. 2 सप्टेंबर 2014 तरुण भारत)

No comments:

Post a Comment