Tuesday 3 February 2015

"नक्कलखोरांचे अच्छेदिन"

मित्रहो, गेली २७ वर्षे वृत्तपत्रात काम करतोय. स्वत:च्या कल्पना लढवून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. सकाळ उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचा सहयोगी संपादक असताना पुण्यात होणा-या प्रशिक्षणातून अनेक कल्पना मिळत...सूचत. मालक आ. अभिजीत पवार यांनी प्रशिक्षणाचे सत्रच त्यावेळी सुरू केले होते. मीडिया कान्व्हर्जन्स शिकताना पेपर, मोबाईल, नेट आणि वाचक यांना जोडून काय करता येईल याच्यावर आमचे ब्रेन स्टार्मिंग सेशन झाले. एका माध्यमाची तंगडी दुस-यात टाकून काही तरी उपक्रम राबवा अशी कल्पना घेवून जळगावला आलो.

३/४ दिवस डोक्यात तोच विचार होता. पाचव्या दिवशी महिलांसाठी तेजस्विनी पुरस्कार स्पर्धा आकाराला आली. मी अनिल जोशी आणि मंगेश कुलकर्णी तिघांनी मिळून योजना तयार केली. पेपरात सहभागी महिलांचा परिचय व मतदान कुपन, नेटवर मतदान आणि मोबाईलवर एस एम एस मतदानाचे पर्याय असे कान्व्हर्जन्स ठरले. तेव्हा लताताई पाटणकर यांनी आक्षेप घेतला होता. ही स्पर्धा नको तर चांगले काम करणा-या महिलेला पुरस्कार देवून टाका म्हणाल्या. अखेर आम्ही स्पर्धा ऐवजी उपक्रम शब्द वापरून योजना सुरू केली. मुख्य परिक्षक म्हणून प्रा डा सिमा जोशी होत्या. सोबत ९ गटांचे १८ मान्यवर परिक्षक होते. त्यांनी योजनेची सत्यता तपासली. परिक्षकांच्या प्रति आमचा विश्वास तपासला. नंतर २ वर्षे सकाळमध्ये उपक्रम राबविला. निकाल पूर्णत: पारदर्शी. आमचा व्यवस्थापन म्हणून निकालात हस्तक्षेप नसायचा. सर्व अधिकार परिक्षकांना. तेव्हा प्रायोजक आर सी बाफना ज्वेलर्स होते. अनिल जोशींनी कधीही व्यवस्थापक म्हणून हस्तक्षेप केला नाही आणि हो पुण्यातील काही मंडळींनी ही योजना रोखली होती. तेव्हा आ. विश्वास देवकर आणि जोशी यांनी मंजूर करून आणली. आम्ही झोकात उपक्रम राबविला. येथे अजून एक उल्लेख करावा लागेल. तो लक्ष्मिकांत मणियार यांचा. ते म्हणाले, "तेजस्विनीत काम करणा-या महिलांचा गौरव होतो. घर, कुटुंब सांभाळणारी आई कुठे आहे? माझ्याठी ती योजना तयार करा" मग आम्ही सकाळ गृहिणी योजना तयार केली. कल्पना होती, कुटुंबातील कोणीही घरातल्या महिलेच्या आईपणावर लिहून पाठवावे. भन्नाट रिस्पान्स मिळाला. समन्वयक होते सतीश पाटील आणि भरत चौधरी. सकाळ नंतर व्हाया नाशिक देशदूत मार्गे जळगाव देशदूतला आलो. नाशिकला असताना संचालकांना महिलांसाठी हा उपक्रम राबवतो हा शब्द दिला होता.

 जळगावला आल्यावर पुन्हा महिलांसाठी हीच स्पर्धा टाकली. प्रायोजक होते गोदावरी फाऊंडेशन. डा उल्हास पाटील यांचा माझ्यावर विश्वास. सर्व व्यवहार मीच ठरवला. (तो सुध्दा जळगावच्या वैकुंठधाममध्ये १० मिनिटांच्या चर्चेत) नावही गोदावरी गौरव योजना ठरविले. डाक्टरांच्या आईंचे नाव गोदावरीबाई. फार्मूला जुन्या तेजस्विनी उपक्रमाचा होता पण, काही नव्या गोष्टी जोडून. उपक्रम धडाक्यात करणे ही खासियत कायम ठेवली. दोन वर्षे मी हा उपक्रम निष्ठा, विश्वास आणि स्वत:ची कल्पना म्हणून सुरू ठेवला. येथे सहकार्य केले ते ग्रामीण वार्ताहरांनी. त्यांनी उपक्रमात महिलांचा सहभाग वाढवला. माझ्या कामात कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेतला नाही. संचालकांनीही याच कार्यशैलीला पाठिंबा दिला होता. या उपक्रमाची बांधणी दरवर्षी सारखी दिसत असली तरी त्यात काही बेमालूम बदल करावे लागतात. कार्बन कापी किंवा झेराक्स सारखा मेंदू घेवून काम करावे लागत नाही. या उपक्रमाची शिस्त आहे. मुख्य समन्वयक होणे म्हणजे उपक्रमाविषयी सतत विचार, कृती करणे होय. नाविन्य आणणे होय.

जेथे बातम्या शिळ्या (मागील वर्षाच्या जशाच्या तशा/ नियमावली जशीच्या तशी/ अर्ज फार्मेट जसेच्या तसे) असतील तर महिलांनी पुन्हा पुन्हा का उपक्रमात यावे? का अर्ज भरावेत? एक चांगली कल्पना केवळ काही रकमेसाठी "हो आम्ही करू" या मानसिकतेने पुढील पानावर ढकलली जात असेल तर तेथे "अपयश" किंवा "नो रिस्पान्स" ठरलेला आहे. काही उपक्रमांचे बारकावे कल्पना जन्माला घालणा-यांनाच माहिती असतात. नक्कल करणा-यांना नाही. ते फक्त नगाला नग असतात. उपक्रम राबविण्यासाठी पारदर्शीपणा हा गुण लागतो. जेथे छोट्या व्यावसायिक लाभासाठी लोक नियम मोडून "असे आपण करतो" म्हणत पायंडे पाडतात, ते कधीही-काहीही तडजोड करू शकतात. अमूक एक नसतानाही आम्ही करू शकतो असे भासविणे ही स्वत:ची, योजनेत सहभागी होणा-यांची, प्रायोजकाची फसवणूक असते. एकदा नियमाच्या भिंतीला बारिक छिद्रे पाडले की इतर ठिकाणची मंडळी आपले खिळे ठोकून घेतात. तसे झाले. महिलांच्या नाही पण, पुरूषांच्या पुरस्कारात. तो माझ्या शिस्तीला छेद होता. आजही शल्य आहेच. "तुम्ही होते म्हणून केले; नाहीतर अमूकवर विश्वास नाही", असेही लोक नंतर बोलतात. हे घडताना पाहून मी अस्वस्थ होतो. कल्पना चोरता येते मात्र ती प्रामाणिकपणे राबविण्याचे जिगर आणणार कोठून? सोबत समाजातील तशी माणसही लागतात. माणूस छोटाच असतो मात्र त्याला सोबत करणारे, सहकार्य करणारे यांच्या वलयामुळे तो मोठा होतो. माझ्या वलयास प्रभावित आणि वलयांकित करणारी माणसं मी तेजस्विनी आणि गोदावरी पुरस्कारातून जोडली. त्यांची संख्या २०० वर आहे. आज तिच मंडळी भेटली तर म्हणतात, " स्पर्धेचा तो काळ अजुनही लक्षात आहे" बहुधा प्रामाणिकपणा, निष्ठा, सातत्य याचे हे परिमाण असावे. ( हो, सकाळमध्ये तेजस्विनी स्पर्धा धुळ्यातही घेतली होती. प्रायोजक होते कुणाल पाटील यांचे खान्देश विकास फाऊंडेशन आणि समन्वयक होते निखील सूर्यवंशी व अशोक तोटे) कलपनेने खुजी असणारी माणसं नवनिर्मिती न करता नक्कलला अस्सल सांगून मिरवतात... बहुधा "दिन त्यांचेही अच्छे" येत असावेत ????

Posted on FB - २९ नोव्हेंबर २०१४


No comments:

Post a Comment