Thursday 12 February 2015

विसर्जन रस्ता दुरूस्तीसाठी जैन उद्योग समुहाचा पुढाकार


नपाचे बँक खाते सील झालेले. कोणताही ठेकेदार उधारीत काम करायला तयार नाही. पालकमंत्र्यांनीही निधी द्यायला असमर्थता व्यक्त केलेली. अशा अडचणीत गणेश विसर्जन मार्गाची तातडीने दुरूस्ती कशी करावी? हा प्रश्न मनपा प्रशासनासमोर होता. अखेर मदतीला उभा राहीला जैन उद्योग समुह. समुहाचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांनी सामाजिक उत्तरदायित्वाचे भान ठेवून विसर्जन मिरवणूक मार्ग दुरूस्तीच्या सूचना दिल्या आणि काम मार्गी लागले...

गणेशोसत्वाला प्रारंभ होण्यापूर्वी  ऑगस्टच्या अखेरचा हा किस्सा आहे. जळगाव शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या व्हाट्स अॅपवरील कान्हदेश विकास मंच या गृपमध्ये जळगावचे माजी पीआय विश्र्वजित काईंगडे आणि डॉ. प्रतापराव जाधव यांनी मेसेज टाकला होता.  महाराष्ट्रात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी सार्वत्रिक स्वरूपात 3000 हजार कोटी रुपये गोळा होतात. हा पैसा शिक्षण व शेती सारख्या सामाजिक कामांवर खर्च केला तर अनेक विकास कामे होतील, असे मत या मेसेजमध्ये व्यक्त केलेले होते.

अर्थात या मेसेजवर अनेक सदस्यांनी मत व्यक्त करताना उत्सवाचा पैसा उत्सवावरच खर्च व्हावा असे म्हटले. काहींनी उत्सवाचे स्वरूप विधायक व्हावे अशी सूचना केली. नागरी विकासावर पैसा खर्च व्हावा हा मुद्दा मागे पडला. गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे यांचे म्हणणे होते की, उत्सवातून हजारो लोकांना रोजगार मिळतो. त्यामुळे या खर्चाकडे उपरोधाने पाहू नये. श्री एजन्सीचे संचालक लक्ष्मीकांत मणियार म्हणाले, हा उत्सव लोकांना एकत्र आणतो. त्याचे पावित्र्य जपून तो साजरा करा. जैन उद्योग समुहाचे उपाध्यक्ष अशोक जैन व दाणा बाजार संघटनेचे प्रविण पगारीया यांनी भारतीय संस्कृतीला धरून उत्सव साजरा करावा असे मत मांडले. ही चर्चा करून विषय संपला. यानंतर उत्सवाला प्रारंभ झाला. महामंडळाची प्रशासनासोबत बैठक झाली. 



नेहमी प्रमाणे सुरळीत वीज पुरवठा, मंडळांची सुरक्षा, रात्री उशीरापर्यंत ध्वनीक्षेपक वापराला परवानगी आणि विसर्जन मिरवणूक असे विषय होते. बैठकीनंतर विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यात आली. दरवर्षाप्रमाणे या मार्गावरील खड्डे, अडथळे या विषयीचे प्रश्न समोर आले. योग्य स्वरुपातील रस्त्यांची व्यवस्था करण्याची जबाबदारी मनपाकडे आहे. रस्ता दुरूस्त करा, असे महामंडळासह इतरही वरिष्ठ अधिकारी मनपाचे आयुक्त संजय कापडणीस म्हणाले. रस्ता दुरूस्त करण्यासाठी मनपाच्या हातात पैसाच नाही, ही आगतिकता आयुक्तांनी स्पष्ट केली. डीआरटी कोर्टाने मनपाचे बँक खाते सील केले आहे, त्यामुळे रस्त्याचे काम केले तरी पैसा देता येणार नाही हा मुद्दा त्यांनी मांडला. मनपाची अर्थिकस्थिती नागरिकांपासून लपून राहीलेली नाही. त्यामुळे इतर कोणी ठेकेदार उधारीवर काम करणार नाही हेही त्यांनी सांगून टाकले.
यावर महामंडळाचे अध्यक्ष नारळे यांचे म्हणणे होते की, आम्ही सर्व गणेश मंडळे वर्गणी काढून रस्ता दुरूस्त करतो पण नंतर तो रस्ता सरकारी किंवा मनपाच्या वाहनांनी वापरू नये. अर्थात, हे म्हणणे मान्य होणे श्नय नव्हते.

अखेर रस्ती दुरूस्तीचा विषय श्री. कापडणीस, स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लढ्ढा यांनी जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन तथा मोठेभाऊ यांच्यासमोर नेला. मनपाचे बँक खाते सील असल्याची अडचण त्यांनी सांगितली. मोठ्याभाऊंनी तातडीने जैन उद्योग समुहामार्फत रस्ता दुरूस्ती काम करण्याचे मान्य केले. एवढेच नाहीतर लगेचच सायंकाळी कामाला प्रारंभ केला. या संदर्भात स्थायी समितीनेही ठराव करुन जैन उद्योग समुहाला तशी परवानगी दिली. यापूर्वीही आणि आताही जैन उद्योग समुहाने जळगावच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि विकासात्मक कार्यात नेहमी आपले योगदान दिले आहे. जळगावकरांना विविध सेवा देण्यात सुप्रीम इंडस्ट्रीज, मेरिको, लिंग्रा, तुलसी पाईप, ओरिएंट सिमेंट, ए्नसीस बँक, महावीर ज्वेलर्स आणि रतनलाल सी. बाफना फाऊंडेशन यांनी नेहमी मदतीचा हात पुढे केला आहे. जैन उद्योग समुहाने रस्ता दुरूस्ती काम सुरू केल्यानंतर शांतता समितीची एक बैठक पालकमंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत झाली. तेथेही रस्ता दुरूस्तीसाठी निधी मागितला गेला. श्री. सावकारे म्हणाले, मी जळगाव शहरासाठी निधी देवू शकत नाही. नियम मोडले तर आम्ही अडचणीत येतो. त्यांच्या या वक्तव्यावर वादही झाला. अखेर विधानपरिषदेतील जिल्ह्याचे आमदार डॉ. गुरूमुख जगवानी यांनी विधानसभा निवडणुकीनंतर रस्ता दुरूस्त करायला मी निधी देतो असे सांगितले व विषय थांबला.

या ठिकाणी एक छोटा मुद्दा मांडायचा आहे. तो हाच की, गणोशोत्सव साजरा करण्यासाठी गोळा होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या वर्गणीतून काही रक्कम खरोखर नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वापरता येईल का? या दृष्टीने विचार करायला हवा. लेखाच्या सुरवातीला जो मुद्दा बाजूला पडला होता, पुन्हा त्याकडेच सर्वांचे लक्ष वेधले आहे. दरवर्षी मंडळांनी विशिष्ट रक्कम एक समस्या सोडविण्यासाठी खर्च केली तर शहरात एकएक मोठे विकास काम सहज उभे राहू शकेल. जळगाव शहराच्या विकासाचा एक हजार कोटींचा आराखडा तयार आहे. त्याच्या लोकवर्गणीची हिस्सेदारी सुद्धा यातून देता येईल. जैन उद्योग समुहाने ही लोकवर्गणी भरण्याची आणि विकास आराखड्यानुसार काम करण्याची तयारी दर्शविली आहे. येथे त्यांची एक अट आहे, ती हीच की काम आम्ही करणार, गुणवत्तानियंत्रण आमचेच असेल. मनपाच्या यंत्रणेचा त्यात कोणताही हस्तक्षेप नको. हा प्रस्ताव लक्षात घेता, जळगावकरांनी जैन उद्योग समुहाच्या मागणीला पाठींबा देण्यास हरकत नसावी. कोट्यवधींची गुंतवणूक ते करणार असतील तर विकास काम उभारणीत नियंत्रण त्यांचेच राहणे योग्य वाटते.
विसर्जनाच्या एका रस्त्याने सर्वांना शहाणपण दिले आहे. नागरी सुविधा देण्याची जबाबदारी मनपाची असली तरी जैन उद्योग समुहाप्रमाणे आम्हीही लोकसहभागातून काही काम करू शकतो का? हाच विचार पुढील सार्वत्रिक उत्सव साजरे करताना प्रत्येकाच्या डो्नयात हवा. जळगावकर या संदर्भात विकासाचा काही नवा पॅटर्न निर्माण करु शकले तर त्याची महाराष्ट्रात निश्चित चर्चा व अनुकरण होईल. आमचा विकासाचा अनुशेषही भरून निघेल

हे तर समाजाला देणं लागतो...

आपण सर्वजण समाजाकडून येवढं काही घेत असतो आणि त्याची परतफेड करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. या भावनेतून आ. मोठ्याभाऊंच्या मार्गदर्शनानुसार जैन इरिगेशन आणि भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन मल्टीपर्पज फाऊंडेशन समाजात, समाजातील सर्व घटकांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी जेवढं जमेल तेवढं योगदान देत असतो.
जळगाव मनपाचे आयुक्त श्री. कापडणीस आणि स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लढ्ढा यांनी मनपाची आजची स्थिती मोठ्याभाऊंसमोर ठेवली. मोठ्याभाऊंनी जळगावचा एक नागरिक म्हणून त्यांना ताबडतोब प्रतिसादही दिला. काल दुपारपासून रस्त्याच्या विसर्जन मार्गाच्या काम, खड्डे भरण्याच्या काम सुरू झाले. सुरू असलेल्या कामाची पाहणी जैन हिल्स ते कंझरवाड्यापर्यंत मोठ्याभाऊंनी केली. जळगाव शहरातील सगळ्या जेष्ठांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. लहानांच्या सदिच्छापण आहेत. त्यामुळे समाजासाठी थोडंफार काही तरी करण्याची संधी आम्हाला मिळाली. जळगाव ही आमची जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे म्हणूनच जळगावशी आमची ही बांधिलकी आहे.
- अशोक जैन
उपाध्यक्ष, जैन उद्योग समुह

आमची सुद्धा तयारी आहे...
विसर्जनमार्ग दुरूस्त करण्याच्या कामाला प्रारंभ केल्याबद्दल मी गणेशोत्सव महामंडळातर्फे जैन उद्योग समुह आणि मोठ्याभाऊंचे आभार मानतो. घेतलेले काम ते पूर्ण करतील यात शंका नाही. दरवर्षी आम्ही विसर्जन रस्ता दुरूस्ती करण्यासंदर्भात विषय मांडत असतो. या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करा अशी सर्वांची सूचना आहे. प्रशासन लक्ष देत नाही. आम्ही महामंडळातर्फे लोकवर्गणीतून रस्ता दुरूस्त करूही, पण मग हा रस्ता केवळ नागरिकांसाठी असेल. त्यावरून मनपा किंवा सरकारी अधिकाऱ्यांची वाहने जावू नयेत. माझे म्हणणे टोकाचे आहे पण गेली 15 वर्षे एकच एक विषय किती वेळा मांडायचा?                           
- सचिन नारळे
अध्यक्ष, गणेशोत्सव महामंडळ

(प्रसिद्धी दि. 7 सप्टेंबर 2014 तरुण भारत)

No comments:

Post a Comment