Tuesday 3 February 2015

सामुहिक जेवण हा घट्ट मैत्रीचा मार्ग....

माणसे जवळ येण्याची क्रिया दोनच पद्धतीने होते. पहिली म्हणजे, एकमेकांचे विचार जुळणे आणि दुसरी म्हणजे, एकमेकांच्या सोबत आनंद घेत जेवणे.
मला आठवते, मी नाशिक सकाळला फोटोग्राफर म्हणून सन 1989 मध्ये लागलो तेव्हा माझे वेतन होते 650 रुपये. त्यावेळी माझे मित्र सुधीर देशपांडे, प्रकाश जोशी, बाबर, संजय पागे ही मंडळी माझ्याकडून पार्टी घ्यायची. तीचा खर्च असायचा 1000 रुपयेवर. मी वडीलांकडून पैसे मागवून वर खर्च भागवायचो.


इनायत कॅफेत रात्री 12 नंतर आम्ही जायचो. यापैकी सुधीर हा माझा सच्चा मित्र. नाशिकच्या अशोक स्तंभावर असलेल्या केक हाऊसमधून रोज एक केक आणि एक खिमा पॅटीस तो खावू घालायचा. त्याचवेळी देशदूतमध्ये दिनेश चंद्रस आणि अजून एक दाढीवाला मित्र होता. दिनेश क्राईममध्ये हुशार होता. तोच मला सकाळसाठी अनेक बातम्या द्यायचा. दुसरा दाढीवाला अनेक अडचणीतून पुढे गेला. आज निवासी संपादक आहे. माणसे जुने दिवस विसरतात. त्याच्या कुटुंबातील लफडे- झगडे निस्तरताना आम्ही सोबत होतो, हे तो विसरला.

नंतर मी जळगावला आलो. अनिल जोशी, संजय पागे, रवींद्र पाठक आणि चंद्रशेखर जोशी हे सोबत होते. अनिल जोशी फुले मार्केटमधील गजानन मधून दालफ्राय व शेवभाजी मागवायचा. सकाळच्या गाळ्यात कागदावर बसून जेवायचो. संजय पागेला मेदूवडा आवडायचा. त्याच्या सोबत मद्रास कॅफेत जायचो. चंद्रशेखर जोशी पाववडा आणायचे. आणि हो संजय वाणीकडे वर्षभर जेवणाचा डबा होता. त्याचा भाऊ आबा डबा आणायला विसरायचा. बऱ्याचवेळा बाहेर जेवायचो.

नंतर नंदुरबारला गेलो. तेथे रमाकांत पाटील आणि प्रमोद पाटील यांच्या सोबत अनेक वेळा बाहेर जेवलो. रमाकांतचा कोंबडा करायचा, हा आमचा पासवर्ड होता. एकदा गजेंद्र शिंपीच्या नेतृत्वात सकाळ कार्यालयात खिचडी केली होती. शिंपीने खिचडीत पाव किलो मीरे टाकले आणि व्हायचे तेच झाले. खिचडी तिखट झाली. रमाकांत व इतर अक्षरशः रडून खात होते. गंमत म्हणजे खिचडी बासमी तांदुळाची होती. तीत पाव किलो बदाम, पावकिलो काजू, बेदाणा टाकलेला होता. खाल्ली जात नाही म्हणून खाली भिकाऱ्यांना दिली तर त्या बेट्यांनी खिचडीतील काजू, बदाम काढून पाण्याने धुवून खाल्ले. तिखट खिचडी टाकून दिली.

नंदुरबारमध्ये आमचे मोठे बंधू, मार्गदर्शक श्री. किशोरभाई वाणी यांचा कोर्ट ओटा गृप होता. आम्ही रात्री गप्पा मारत बसायचो. भाई, अॅड. बाळासाहेब चौधरी, घोडामिलचे संजयभाई अग्रवाल, कै.अतुलभाई, आमचे ही मॅन तथा मोठे बंधू बळवंत जाधव तथा बल्लूबापू, भगवानअप्पा चौधरी, विजयभाई अग्रवाल, प्रकाशदादा चौधरी, पुऱ्या नंदुरबारची खबर ठेवणारे रमेशभाई खिंवसरा तथा रमेश मड्ड्या असे अनेक जण सदस्य होते. महिन्यातून एकदा एकत्र जेवणाचा कार्यक्रम होत असे. कधी बल्लूबापूच्या शेतात, कधी दिनेशशेटच्या मिलमध्ये. आमचे मित्र प्रविणबापू चौधरी हॉटेल गौरव पॅलेस सुरू करीत होते. तेव्हा कोणता खानसामा चांगला आहे, हे ठरविण्यासाठी किमान 3 वेळा आम्ही 15 ते 20 जण एकत्र जेवलो.

नंदुरबारमध्ये वसंतकाका चौधरी हे आमचे आदरणीय होते. ते मला सोबत घेत. आम्ही शिर्डी, मनमाड, मालेगाव, सप्तशृंगगड सोबत फिरलो.

यानंतर मी अकोल्यात गेलो. तेथे श्रीकांत जोगळेकर, श्रीकांत पाचकवडे, विलास देशमुख, विशाल राजे ही मंडळी होती. मी आजारी असताना जोगळेकर यांच्या भगिनी श्रीमती केतकरताई माझ्यासाठी खिचडी पाठवत. ती सुद्धा दूध घालून. जोगळेकर यांचा सांस्कृतिक गृप होता. त्यात मुले- मुली एकत्र येत. कधीतरी डबे आणत. मला बोलवायचे. देवीच्या मंदिरात आम्ही एकत्र जेवायचो. विलास देशमुखच्या घरी कधी खिचडी तर कधी पिठले भाकरी खाल्ल्याचे आठवते.अशाच एका रात्री विनोद इंगोलेला त्याच्या मोठी उमरीतील जुन्या घरात पिठले भाकरी करायला लावली होती. त्याचे सारे कुटुंब कामाला लागले होते. त्याच्या आईने प्रेमाने स्वयंपाक केला होता. विशाल राजे माझ्या शब्दाला किंमत द्यायचा. तो लोकमत सोडून सकाळला आला. मी म्हटले पार्टी दे. त्याने शेगावला नेवून सर्वांना पार्टी दिली. खर्च होता 3 हजार रुपये. विशाल शब्द पाळायचा. या सर्वांना मी फोटोग्राफी शिकवली. येथे संजय सोनार होता. जळगावला ऑफिसबॉय असलेला संजू नंतर ऑपरेटर झाला. तसाच एक गृप सुधीरदादा देशपांडे यांचा होता. त्यांच्याकडे गायनाच्या कार्यक्रमासाठी आम्ही जात असू. तिसरा गृप डॉ. वाघमारे यांचा होता. उंच, धिप्पाड असलेला हा माणूस बारीक गंमत करायचा. मजेशीर बोलायचा. त्यांचे आवडते वाहन बुलेट होती.

अकोला कार्यालयात असताना अकोला जिल्हा आणि वाशीम, बुलडाणा येथील बातमीदारांसोबत अनेकदा सामुहिक आनंद घेत जेवलो. गृप जेवणाची पद्धत अकोल्यातही होती. अविनाश बेलाडकर (मूर्तिजापूर), दीपक देव (अकोट), मनोज वाकोडे (अकोला), श्रीकांत पाचकवडे, किसनराव फंडाट (तेल्हारा), नंदकिशार शिंदे (वाशीम) यांनी दिलेले सामुहिक जेवण लक्षात राहणारे आहे. मनोज वाकोडेच्या शेतात आणि टँक्सीवाले पप्पूभाऊ यांनीही शेतात स्नेहभोजन दिले. ते सुद्धा न विसरणारे. नागपूर सकाळमधील ट्रेनिंग दौरा कार्यक्रमात यवतमाळच्या विक्रेत्यांनी माझ्या स्वागतासाठी बनवलेली रस्सा फणस भाजी आठवते.

नंतर मी जळगावात आलो. सहयोगी संपादक असताना सकाळ कर्मचाऱ्यांसाठी स्नेहमेळा सुरू केला. रात्री लॉनवर खिचडी पार्टी उपक्रम राबविला. भरत पाटील, मंगेश कुळकर्णी यात पुढाकार घेत. सर्व मिळून रात्री खिचडीचा आनंद घ्यायचो. खाण्याच्या आग्रहाबाबत अमळनेरचे प्रतिनिधी राजू तथा डिगंबर महाले यांचे नाव घ्यावे लागेल. या माणसाला दुसऱ्याला खावू घालण्याची खोड आहे. आग्रह आणि आग्रह. शिवाजी जाधवमार्फत जेवायचे निमंत्रण यायचे.

जळगावचीच एक आठवण आहे. शैलेंद्र चव्हाण याला एकदा म्हणालो, तुझ्या शेतात जोवायचा बेत कर. तो लगेच हो म्हणाला. म्हसवाद शिवारात त्याच्या शेतात आम्ही सगळे संपादकिय सहकारी जेवायलो गेलो. त्याच्या कुटुंबाने खूप प्रेमाने आदरातिथ्य केले. (शैलेंद्र तुझी खिचडी वाचूनच हे मोकळेपणाने लिहीले आहे)

यानंतरच्या प्रवासात मी नाशिक देशदूतमध्ये रुजू झालो. तेथे कै. जोशीकाका आणि मनोहर खराडकर यांनी मला जेवणाचा डबा दिला. अगदी घरच्या सारखा.

मी जळगावला देशदूतला बदली झाली. एकदा होळीच्या दिवशी आम्ही काठी (जि. नंदुरबार) येथे होळी पाहायला निघालो होतो. अमळनेरजवळ असताना भांगेचा घोटा आणि थंडाई पिण्याची लहर आली. हेमंत अलोने व मनीष पात्रिकरसाठी हा विषय नवा होता. मी गाडीतून राजू महाले यांना फोन केला. आम्हाला भांगेचा घोटा पाजा म्हणालो. महाले यांनी अवघ्या एक तासात व्यवस्था केली. नंतर पुढे जाताना गाडीत पात्रिकर रात्रभर हसत होते.

रात्रीच्या एका जेवणाची आठवण अशीच. भुसावळचे युवा व धडाडीचे नेते अनिल चौधरी यांच्या तडीपारीची मुदत संपली होती. शेवटच्या रात्री त्यांचा मुक्काम फर्दापूर जवळच्या हॉटेलात होता. अलोने, पात्रीकर यांना त्यांनी बोलावले होते. संजयसिंग चव्हाण म्हणाले, तुम्हीही या. आम्ही तिघे गेलो. खुप गप्पा झाल्या. विषय होता भावी राजकारणाचे काय? मी म्हटले, राष्ट्रवादी सोडा. संतोष चौधरींच्या कार्यापेक्षा मोठ्या कार्याची काठी मोठी करा. अनिल चौधरी म्हणाले, कुठे जावे. म्हटले, मनसेत जा...नाहीतर भाजपत जा. नाथाभाऊंशी जुळवून घ्या. अनिल चौधरी विचारात पडले. या गप्पांच्यावेळी खाणे सुरू होते. एक किलो सुरमई मासे खाल्ले. पोटात जेवायला जागा नव्हती. पुन्हा गप्पा रंगल्या. तासाभराने एक कार्यकर्ता भरीत, कळण्याच्या पुऱ्या, बाजरीची भाकरी, मूळा, मेथी, टमाटे घेवून आला. केळीची पाने होती. सारा मामला गरमा गरम. तेव्हा एकाने डब्यातून बोंबिलचा ठेचा काढला. मी पूर्वी कधीही खाल्ला नव्हता. चवीला थोडा घेतला आणि नंतर त्याच्या सोबतच जेवण झाले. जेवणाची ही रात्र न विसरणारी...नंतर अनिल चौधरी भाजपत गेले...आम्ही असे म्हणणार नाही की ते त्या रात्रीच्या गप्पांमुळे गेले...पण त्यांना सल्ला दिला आहे...काठी मोठी करा...

चर्चा जेवणाचीच आहे तर जैन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष आ. डॉ. पद्मश्री भरवलालजी जैन यांनी जैन हिल्सच्या विस्तारातील त्यांच्या आवडत्या वडाच्या झाडाखाली खास दिलेले वनभोजन मी कधीही विसरणार नाही. त्यांच्या 75 व्या वाढदिवसाची पुरवणी आम्ही केली होती. तेव्हा खुप आनंदीत झालेल्या मोठ्या भाऊंनी ही मेजवानी दिली.

माझे एक ज्येष्ठ मित्र आ. वसंतराव कोरेगावकर नंदुरबारचे पोलीस अधीक्षक असताना मी बोगस डॉक्टर शोध मोहीमेसाठी त्यांना एक अर्धशासकिय पत्र तयार करुन दिले होते. ते पत्र त्यांनी पोलीस महासंचालकांना पाठविले. त्यावर महासंचालकांनी कोरेगावकरांना खात्यांतर्गत रिवार्ड दिला. खुश झालेल्या कोरेगावकरांनी मला पार्टी देतो असे म्हटले. मी म्हणालो सर्व पत्रकारांना द्या. माणूस फारच दिलदार व दिलखुलास होता. नंदुरबारच्या 100 पत्रकारांना पार्टी दिली. छोट्यात छोटा पत्रकार त्या रात्री दारू पीत होता. पीआय दर्जाचे अधिकारी दारू, चकना सर्व्ह करीत होते. गंमत म्हणजे कोरेगावकर, मी आणि रमाकांत पाटील आम्ही तिघेच थम्सअप पीत होतो.

कॉलेज जीवनात माझा एक मित्र तुकाराम कर्वे अंडाकरी बनवायचा. आजही तो मसाल्याचा वास आणि त्याने तळलेली अंडी आठवतात.

वरील सर्व आठवणी रावसाहेब उगले याने माझ्या देशदूत सोडताना, या पोस्टवर केलेल्या, सर मी तुमच्या बरोबर नाशिकला मराठा खानावळमध्ये जेवलो आहे, ही कॉमेंट वाचून डोळ्यासमोर आल्या. वरील सर्वांशी माझी आजही घट्टमैत्री आहे. मी कधी कधी निराश झालो की या आठवणींमध्ये रंगून जातो. जेवणाचे हे किस्से मला प्रामाणिक वाटतात. कपट, कारस्थान करण्यासाठी मी कधीही कोणासोबत जेवलो नाही. बहुधा सात्विक व प्रामाणिक जेवणामुळे आपली नीती, मती व गतीही शुद्ध, निकोप राहत असावी असे मला वाटते.

(या खाद्य यात्रेत कोणाचे नाव अनावधानाने राहीले असेल तर कृपया आठवण करून द्यावी)

विशेष नोंद - देशदूतमधील मित्र भरत चौधरी यांचा उल्लेख राहीला. या माणसासोबत फार कमी वेळ मिळाला. त्याला सोबत घ्याची ईच्छा आहे. भरतने धरणगावचा आलूवडा रस्सा आणि पाववडा बऱ्याचवेळा आग्रह करून खावू घातला. आम्ही 2 वेळा सप्तशृंगगडावर गेलो. तेथे भरतने उत्तम व्यवस्था केली. भरतला पुन्हा कधीतरी सोबत घेणार आहे.

Posted on FB - दि. १८ जुलै २०१४

No comments:

Post a Comment