विधानसभा निवडणुकीसाठी युती
किंवा आघाडी झाली वा नाही झाली तरी जळगाव जिल्ह्यातील 11 मतदारसंघातील रणधुमाळीत सर्वच
पक्षांत असलेला व्यक्तिविरोधाचा व्हायरस हा प्रत्येक उमेदवारासाठी डोकेदुखीचा ठरणार
आहे. मनोमिलनाची तात्पुरती मलमपट्टी करुन हा व्हायरस किल करता येत नाही आणि त्याच्याकडे
दुर्लक्षही करता येत नाही, अशी साऱ्यांचीच अवस्था आहे.
कधीकाळी एकमेकांपासून मतभेदाने
दुरावलेली मंडळी आता मनभेदाच्या पलिकडे व्यक्तिद्वेषातून परस्पर विरोधात उभी ठाकली
आहे. येथे व्यक्तिद्वेष हा शब्द जरा बटबटीत वाटतो. त्यामुळे आपण त्याला पर्यायी शब्द
व्यक्तिविरोध म्हणूया.
व्यक्तिविरोधाचा हा व्हायरस
प्रत्येक पक्ष आणि नेत्याच्यासंदर्भात कालसापेक्ष परंतू पिच्छा न सोडणारा आहे. जिल्ह्याच्या
राजकारणात सर्व पक्ष धुंडाळले तरी मनमिळावू, शांत स्वभावाचे, प्रत्येकाचे ऐकून घेणारे,
आपलेसे वाटणारे असे लोकनेते सध्या तरी नाहीत. जे आहेत, त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या
मर्यादा निश्चित झालेल्या आहेत. चेहरे आणि वर्तणूक परस्पर परिचित आहे. त्यामुळे प्रत्येक
नेत्याचा कंपास त्याचे समर्थक, कार्यकर्ते यांच्यापुरतेच वर्तुळ साकारते. या वर्तुळाचा
स्थायीभाव मी, माझा विजय आणि माझा सत्तेतला हिस्सा हाच असतो. परस्पर सहकार्याचे किंवा
विश्वासाचे वर्तुळ छेदण्याचा प्रयत्न कोणीही करीत नाही. यातूनच युतीतले घटक मात्र विरोधातले
किंवा आघाडीतले घटक मात्र दुरावलेले असे व्यक्तिविरोधाच्या व्हायरसचे प्रकार जळगाव
जिल्ह्याच्या राजकारणात पाहाता व अनुभवता येतात. हेच व्हायरस विधानसभा निवडणुकीच्या
निकालावर अनुकूल अथवा प्रतिकूल प्रभाव पाडू शकतात. व्यक्तिविरोधाच्या या व्हायरसचा
आढावा मतदारसंघनिहाय घेवू या.
राज्याच्या विधीमंडळात क्रमांक
दोनचे नेते असलेल्या विरोधीपक्षनेते एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघात त्यांना
शिवसेनेचा तीव्र विरोध आहे. हा विरोध अगदी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद
निवडणुकीतही होत असतो. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील हे उघडपणे खडसेंना
विरोधाची भूमिका मांडतात. याच मतदार संघात भाजपचे अशोक कांडेलकर आणि शिवसेनेचे छोटू
भोई यांच्यातही विरोध आहेच. भुसावळ मतदारसंघ पालकमंत्री
संजय सावकारे यांचा आहे. तेथे त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार संतोष चौधरी
यांचा प्रखर विरोध आहे. त्यामुळेच सावकारे सध्या शिवसेनेच्या दारात असल्याची चर्चा
आहे. याबरोबरच भाजप आणि शिवसेनेतही एकमेकांचा विरोध आहेच. नगरपालिकेच्या राजकारणामुळे
भाजपचे अजय भोळे शिवसेनेचे मनोज बियाणी यांच्यात विरोध आहे. शिवसेनेअंतर्गत बियाणी
व माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र दायमा यांच्यात मतभेद आहेत.
जामनेर मतदारसंघात गिरीश महाजन
यांना गटबाजीचा फारसा त्रास नाही. मात्र जामनेर पालिका निवडणुकीत भाजपच्या काही मंडळींनी
विरोधात काम केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ही पालिका भाजपच्या ताब्यातून गेली.
महाजन यांना कॉंग्रेसची काही मंडळी विरोध करतात, त्याचवेळी कॉंग्रेसच्या विरोधातील
राष्ट्रवादी कॉंग्रेसची ईश्र्वरलाल जैन यांच्यासारखी बडीमंडळी महाजन यांना सहकार्य
करतात. पारोळा मतदारसंघात व्यक्तिविरोधाचे
अजब रसायन आहे. तेथे कोणकोणाचा समर्थक, हितचिंतक हे कोणीही सांगू शकत नाही. राष्ट्रवादी
कॉंग्रेसमध्ये डॉ. सतीश पाटील व वसंतराव मोरे पाठीमागे एकमेकाला खेचतात. शिवनसेनेत
चिमणराव पाटील यांना मच्छिंद्र पाटील यांचा कडवा विरोध आहे. शिवाय भाजपचेही नेते चिमणराव
पाटील यांच्या विरोधात आहेत.
चोपड्यात जगदीश वळवी हे राष्ट्रवादी
कॉंग्रेसचे आमदार आहेत. ते राष्ट्रवादीकडून रिंगणात राहतील की नाही या विषयी शंका आहे.
त्यांचे मनोमनी अरुण गुजराथींशी जमत नाही. हे दोघे कार्यक्रमांसाठीही एकत्र येत नाहीत.
गुजराथींनी चंद्रकांत बारेला व डी. पी. साळुंखे यांना उमेदवारीसाठी पुढे रेटले आहे.
शिवसेनेत माजी आमदार कैलास पाटील यांना पक्षांतर्गत विरोध आहेच.
अमळनेर मतदार संघात भाजपअंतर्गत वेगवेगळे गट आहेत. अनिल भाईदास पाटील आणि उदय वाघ,
सौ. स्मिताताई वाघ यांच्यात बराच दुरावा आहे. लालचंद सैनानी व भाजपत नव्याने आलेले
डॉ. बी. एस. पाटील सध्यातरी अनिल पाटील यांच्यासोबत दिसतात. या मतदारसंघात आता विद्यमान
आमदार साहेबराव पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आहेत. त्यामुळे तेथील राष्ट्रवादी
कॉंग्रेसची जुनी मंडळी व कॉंग्रेसचे नेते अॅड. ललिता पाटील, अनिल शिंदे हे त्यांना
कितपत सहकार्य करतात? हा कळीचा मुद्दा आहे.
चाळीसगाव मतदारसंघात राष्ट्रवादी
कॉंग्रेसमध्ये रस्सीखेच नाही. एकमेव उमेदवार राजीव देशमुख हेच आहेत. त्यांनाही कॉंग्रेसचा
विरोध नाही. भाजपत विविध गट आहेत. रामदास पाटील, कैलास सूर्यवंशी व उन्मेष पाटील यांच्यात
उमेदवारीसाठी रस्सीखेच आहे. येथे शिवसेना स्पर्धेत नाही.
जळगाव ग्रामीण मतदारसंघात माजी
पालकमंत्री गुलाबराव देवकर हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार असतील. त्यांना त्यांच्याच
पक्षाचे धरणगावचे नेते ज्ञानेश्र्वर महाजन व संजय मुरलीधर पवार यांचा टोकाचा विरोध
आहे. शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांना भाजपचे पी. सी. पाटील यांचा तीव्र विरोध आहे.
जळगाव शहर मतदारसंघात सुरेशदादा
जैन हे शिवसेनेचे उमेदवार असतील. मात्र, त्यांच्या प्रचारात शिवसेनेचे काही मोजके कार्यकर्ते
वगळून जास्तीत जास्त समर्थक खान्देश विकास आघाडीचे असतील. जैन यांना भाजपचा टोकाचा
विरोध आहे. अर्थांत तो जैन विरूद्ध खडसे या जुन्या वादाचा परिपाक आहे.
रावेर मतदारसंघात कॉंग्रेसचे
शिरीश चौधरी यांना थेट कोणाचाही विरोध नाही मात्र त्यांच्याविरोधात जिल्हास्तरावरील
कॉंग्रेसनेते डॉ. उल्हास पाटील, डॉ. जी. एन. पाटील कोणती भूमिका? घेतात हे पाहावे लागेल.
या मतदारसंघात भाजपअंतर्गत चांगलीच रस्सीखेच आहे. माजी खासदार हरिभाऊ जावळे हे उमेदवारीसाठी
इच्छुक आहेत. त्यांना भरत महाजन, सुरेश धनके यांचा विरोध असण्याची श्नयता आहे. पाचोरा मतदारसंघात राष्ट्रवादी
कॉंग्रेसचे दिलीप वाघ आणि प्रा. डॉ. अस्मिता पाटील यांच्यात परस्पर विरोधाचे चित्र
आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व उमेदवार किशोर पाटील आणि भाजपच्या नेत्यांमध्ये सख्य
नाही. भाजपची काही मंडळी वाघ यांना मदत करतात.
जिल्हास्तरावरील हे चित्र स्थानिक विरोधाच्या स्वरुपाचे आहे. या शिवाय नेत्यांच्या
एकमेकांच्या व्यक्तिविरोधाचेही काही कंगोरे दुभंगास कारणीभूत ठरतात. एकनाथराव खडसे
आणि सुरेशदादा जैन यांच्यात विरोध आहे. ईश्र्वरलाल जैन आणि गुलाबराव देवकर यांच्यात
विरोध आहे. शिवसेनेत आजी-माजी पदाधिकाऱ्यांचे गटतट आहेत. भाजपतही नेत्यांच्या प्रभावाचे
काही वेगवेगळे प्रवाह आहेतच. त्याचा जाहीर उल्लेख खडसे यांनीही केला आहे. कॉंग्रेसमध्ये
माजी पदाधिकाऱ्यांचे आणि नव्या जिल्हाध्यक्षांचे सांधे अजुनही जुळलेले नाहीत. मनसेसंदर्भात
काही लिहावे असे वादविवाद नाही. सध्या तेथे ललीत कोल्हे यांचा एकखांबी तंबू आहे.
(प्रसिद्धी - २१ सप्टेंबर २०१४ तरुण भारत)
No comments:
Post a Comment