Thursday 12 February 2015

शहर सुंदर करणारी माणसं...


रिवर्तन हे नाव घेवून नाट्य क्षेत्रात काम करणारे आमचे मित्र व नाट्यक्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते शंभूअण्णा पाटील यांच्याशी एकदा जळगाव सुंदर आहे का? याविषयांवर वादपूर्ण चर्चा रंगली. जळगाव मनपा आणि त्यातील नाकर्त्या पुढाऱ्यांवर माझा प्रचंड राग असल्यामुळे भौतिक सुविधांच्या तक्रारी करीत जळगाव सुंदर नाहीच, असे मी आग्रहाने मांडत होतो. त्यावर शंभूअण्णा म्हणाले, बौद्धीक संपदा, निःस्वार्थी जनसेवा आणि चांगल्या प्रवृत्तीची माणसं लक्षात घेवून मी आपले जळगाव सुंदर असल्याचे म्हणत आहे. जळगावची माणसं इतरांच्यापेक्षा निश्चित सुंदर आहेत. अर्थात, हा युक्तीवाद मान्य करण्याच्या मनःस्थितीत मी नव्हतो. 


शहर सुंदर असणे, ही माझी कल्पना नागरी सुविधांच्या एकूण उपलब्धतेशी संबंधित होती. ती अगदी परवा-परवापर्यंत. पण, केशवस्मृती प्रतिष्ठानच्या डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार प्रदान सोहळ्यास मी उपस्थित राहीलो. तेथे लक्षात आले की, शहर हे सेवा-सुविधांमुळे कमी आणि निःस्वार्थी, निःस्पृहपणे जनसेवा करणाऱ्या माणसांमुळे अधिक सुंदर असते. जनसेवेचा वसा घेणाऱ्यांचे गाव जळगाव व्हायला हवे, हाच विचार मनांत पक्का ठसवून त्यादिवशी भैय्यासाहेब गंधे सभागृहातून बाहेर पडलो...

सर्वसामान्यांच्या अनेक अडचणी असतात. व्यक्तीगत, कौटुंबिक आणि सामाजिक अशा अनेक अडचणींचे विषय सुद्धा विभिन्न असतात. यातील प्रमुख विषय आर्थिक, मानसिक, शारिरीक, आरोग्य, नोकरी, रोजगार, सेवा, व्यापार-उद्योग, सोयी-सुविधा आदी असू शकतात. त्यावरचे उपाय-उपचार प्रत्येक जण स्वतः शोधण्याचा प्रयत्न करतो. कधी एकट्याने तर कधी कुटुंबाच्या पाठबळावर. तिसरा पर्याय सरकारी मदतीचा असू शकतो. चौथा पर्याय आहे तो म्हणजे, समाजाच्या सहकार्याचा. समाजाचे सहकार्य मिळते इतरांच्या जनसेवेतून. जनसेवा करण्यासाठी माणसाची वृत्ती आणि प्रवृत्ती दोन्हीही प्रगल्भ असाव्या लागतात. अशी वृती-प्रवृत्ती असलेली माणसं आणि त्यांच्या नेतृत्वातील संस्था जनसेवेचे अकल्पित असे कार्य उभे करतात. इतरांसाठी आदर्शाचे दीपस्तंभ ठरतात.

जळगाव येथील ऋषीतुल्य सेवाव्रती डॉ. अविनाश आचार्य यांच्या कार्याची आणि त्यांच्या नेतृत्वात उभ्या राहिलेल्या विविध जनसेवा प्रकल्प संस्थांची माहिती जवळपास सर्वांनाच आहे. केशवस्मृती  परिवार म्हणून विस्तारलेल्या 14 जनसेवा प्रकल्पांचा विस्तार टप्प्या टप्प्याने होत गेला आहे. संपूर्ण भारतातून आणि विदेशातूनही काही व्यक्ती-संस्थांचे प्रतिनिधी या परिवाराचे काम पाहून गेल्या आहेत. नव्हे, त्याप्रमाणे कामाचा वसाही अनेकांनी घेतला आहे. ‘सब समाजको साथ लिए आगे है बढते जाना’, हे डॉ. अविनाश आचार्य यांच्या निःस्वार्थी आणि निःस्पृह जनसेवेचे ब्रिद आहे. जनसेवेला आर्थिक पाठबळ हवे, हे वास्तव माहित असल्यामुळे जळगाव जनता सहकारी बँकेच्या माध्यमातून अर्थव्यवहाराचा व्यापही डॉ. आचार्य यांनी वाढवला. या बँकेचा शुभांकर (ब्रॅण्ड) मुंगी आहे. डॉ. आचार्य यांनी अत्यंत धोरणी होवून या मुंगीची निवड केली आहे. मुंगी होवून साखर खावी, हे जरी सर्वसामान्य माणसाला माहित असले तरी, कर्जाचे गोड वाटणारे ओझे आपल्या शिरावर पेलता येईल तेवढेच घ्या, असा संदेशही डॉ. आचार्य यांनी दिला आहे.
डॉ. अविनाश आचार्य यांनी दिलेला जनसेवेचा वसा केशवस्मृती परिवार आजही समर्थपणे सांभाळत आहे. किंबहुना, त्यात जुन्या व नव्या जनसेवांचा व्यापक विस्तार करण्याचे नेतृत्व पुढे सरसावते आहे.

गेल्या 26 जानेवारीला डॉ. अविनाश आचार्य यांच्या नावाने एक व्यक्ती आणि एका संस्थेला डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा अत्यंत उत्साहात आणि समाजाच्या तुडूंब प्रतिसादात शिस्तबद्ध पद्धतीने साजरा झाला. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात व्हावे, या काव्यपंक्तींची प्रचिती उत्तरोत्तर रंगणाऱ्या सोहळ्यात येत गेली. या सोहळ्याशी संबंधित सारीच माणसं सेवाव्रती असली तरी ती परस्परांचा आदर-सन्मान करणारी आहेत हे प्रकर्षाने जाणवले.

देणाऱ्यांचे हात व्हावे, याचा अनुभव रामेश्वर नाईक याने पुरस्काराचे 51 हजार रुपये संस्थेला परत केले यातून आला. डॉ. आचार्य यांच्या नावाने मला पुरस्कार दिला तेवढेच पुरे. रक्कम नको. मी ती परत करतो. आपण जनसेवेच्या कार्यात वापरा असे रामेश्वरने सांगितले. ध्येयवादी जनसेवेतून आलेली ही प्रगल्भता पुस्तकी शिक्षणातून येणाऱ्या सभ्य शिष्टाचारांच्या खूप पुढची आहे, असे मला वाटते. पुरस्कार प्रदान सोहळ्यात पुरस्कारार्थी, त्यांचे निकटवर्तीय आणि पुरस्कार देणाऱ्या संस्था प्रतिनिधींचे मनोगत जनसेवेचा लेखाजोखा मांडणारे आणि समोरच्याला अंतर्मूख करणारे होते. व्यक्तीगत पुरस्कार गोंद्री (ता.जामनेर) च्या रामेश्वर पुनमचंद नाईकला प्रदान करण्यात आला. रामेश्वरचे कार्य म्हणजे आरोग्य विषयक व्याधी, उपचार, शस्त्रक्रिया यासाठी अडलेल्या-नडलेल्यांना मुंबईत मदत करणे. मोफत आरोग्यसेवेचा लाभ गरजूंना मिळवून देणे. संस्था विषयक पुरस्कार पुणे येथील उमेद परिवाराला प्रदान करण्यात आला. ही संस्था विशेष मुलांसाठी (येथे गतिमंद, मतीमंद किंवा बहुविकलांग असे शब्द न वापरता) कार्य करते. या संस्थेचे प्रतिनिधी म्हणून श्रीकांत झेंडे आणि जयप्रकाश अंतुरकर यांनी पुरस्कार स्वीकारला. कार्यक्रमास औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकिय प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल भालेराव हे प्रमुख अतिथी होते.

या सोहळ्यात जवळपास सर्वच मान्यवरांनी आपले विचार मांडले. जनसेवेचे कार्य सुरू करताना येणाऱ्या अडचणी त्यातून व्यक्त झाल्या. अर्थात, त्यात हेतू व संदेश हा अवघड मार्गावरून पुढे जाण्याची उमेद बाळगायलाच हवी हे सांगणारा होता. रामेश्वर आणि झेंडे यांनी त्यांच्या कार्यातील प्रारंभीचे अनुभव सांगितले. रामेश्वर म्हणाला, मी माझ्या आजारपणातून इतरांना मदत करणे शिकलो. महागड्या उपचाराच्या भितीने लोक डॉ्नटरांपर्यंत पोहचतच नाहीत हे मी अनुभवले. म्हणून, अशा गरजूंना मदतीचा वसा मी घेतला. अगदी साधा सोपा विचार घेवून रामेश्वर उभा राहिला. आज त्यांने किमान 67 हजार लोकांना आरोग्य सेवांचा लाभ मिळवून दिला आहे. निःस्वार्थी वृत्तीने. म्हणजेच या कामाचे वेतन किंवा गरजूंकडून कोणताही लाभ न घेता!


झेंडेेचाही अनुभव असाच. मुलांसाठी कार्य करायचे तर जागेची अडचण उभी राहिली. अखेर मित्रांनी एकत्र येवून प्रत्येक अडचणीवर पर्याय शोधले. संस्था उभी राहिली. या सोहळ्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन भारावून बोलले. रामेश्वरच्या जनसेवेत पडद्यामागील सहकार्याचे हात महाजन यांचे आहेत. महाजन हे लोकप्रतिनिधी असले तरी त्यांची खरी ओळख आरोग्यदूत. जामनेर तालु्नयातील कोणताही रुग्ण महागड्या उपयाचाराअभावी वंचित राहू नये, या एवढ्या छोट्या विचारातून महाजन यांनी काम सुरू केले. तालु्नयातील गरजूंना मुंबईत नेवून मोफत उपचार, शस्त्रक्रिया करुन, सुदृढ करुन घरी परत आणायचे हा महाजन यांच्या कामाचा वसा. अगोदर तो फक्त जामनेर तालु्नयासाठी होता. नंतर तो जिल्हासाठी विस्तारला. आता राज्यभरातील रुग्ण त्यांच्याकडे मदतीच्या अपेक्षेने येतात. महाजन यांचे हे कार्य अविरत सुरू आहे. याच साखळीत 12-13 वर्षे रामेश्वर त्यांच्याकडे टीकला.

महाजन आरोग्यदूत म्हणून काम करतात हे माहित होते. पण, त्यांच्या या कार्याचा व्याप किती मोठा असेल याचा अंदाज नव्हता. महाजन रामेश्वरचा गौरव करण्यासाठी बोलायला उभे राहीले. काय बोलावे हा प्रश्न त्यांना होताच. ते उत्स्फूर्तपणे बोलत जनसेवेचा एकएक पट उलगडत गेले. तालु्नयातील ग्रामीण भागात फिरताना आर्थिक अडचणीतील रुग्ण पाहिले. त्यांना तालुका, जिल्हास्तरावर उपचारासाठी पाठवू लागलो. काहीवेळा मीच सोबत जात होतो. नंतर अद्ययावत उपचारांसाठी मुंबईला पाठविण्याची गरज निर्माण झाली. तेथे निवास, मोफत उपचाराचा प्रश्न होता. आमदार असल्यामुळे तेथील निवासात लोक राहत. पण त्यांचे जेवण, तेथे राहणे, मुंबईत फिरणे, उपचारांचा खर्च अशी अनेक आव्हाने होती. त्यातून मार्ग निघत गेले. प्रत्येकासोबत मी जाणे अवघड होते. मग, रामेश्वर सारखी मंडळी जोडली गेली. इतरही लोक जोडले गेले. महाजन म्हणाले, आज मुंबईत माझ्याकडे रोज 300 लोकांचे जेवण बनवावे लागते. तशी व्यवस्था झाली आहे. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाण्या-येण्याची व्यवस्था करावी लागते. दोन-तीन गाड्या आहेत. माझ्या काही मित्रांनी चालक दिले आहेत. मुंबईतला एक भाजीपाला विक्रेता त्याच्याकडून रोज भाजी पाठवतो. ती सुद्धा पैसे न घेता. अशी जनसेवा सुरू आहे. मुंबईतील मोठमोठ्या डॉ्नटरांशी ओळखी झाल्या. ते सुद्धा आता मदत करतात. सहकार्य करतात. लहान मुलांच्या शस्त्रक्रियांसाठी उद्योगपती बिर्ला निधी देतात. उपचार केलेल्या काही मुलांशी त्यांची भेट घालून दिली. त्यांनी मुलांचा आनंद पाहिला. त्यासाठी द्यायच्या निधीत त्यांनी वाढ केली. असा हा आरोग्यसेवेचा रथ पुढे सरकतोय. कोणताही स्वार्थ न ठेवता किंवा कोणाकडेही एक रुपयांची थेट मदत न मागता.

केशवस्मृती प्रतिष्ठानचे प्रकल्प प्रमुख भरत अमळकर हेही यावेळी प्रास्ताविकात मोजकेच बोलले. त्यांनी दोन उदाहरणे सांगितली. एक होते, जिल्हा रुग्णालयात कधीकाळी डॉ. आचार्य यांच्यासोबत दाईचे काम करणाऱ्या श्रीमती शकुंतला बोंडे यांनी प्रतिष्ठानला दिलेल्या एक लाख रुपयांच्या मदतीचे, दुसरे होते अमेरिकेतील डॉ. भाग्यश्री बारलिंगे यांनी प्रतिष्ठानला देणगी म्हणून दिलेल्या 5 हजार डॉलर्सचे. जनसेवेचा वसा गाजावाजा न करता पुढे नेणारी माणसं असतात, हेच अमळकर यांनी खूप कमी शब्दांत सांगितले.

गिरीश महाजनांनी रामेश्वरच्या संदर्भात एक उल्लेख केला. ते म्हणाले, रामेश्वर मला भेटला कारण, मी नशिबवान आहे. निःस्वार्थीपणे काम करणारी अशी माणसं भेटणे हे भाग्यच. रामेश्वर प्रमाणे स्वयंप्रेरणेने अजूनही इतर लोक रुग्णसेवेचे काम करायला तयार आहेत. त्यांची 11 जणांची वेटींग लिस्ट आहे. महाजन, अमळकर, भालेराव, झेंडे, रामेश्वर अशी सारी मंडळी माणसांच्या चांगुलपणावर बोलत होती. हळूहळू मलाही जाणवायला लागले, खरेच शहरे ही माणसांमुळे सुंदर होतात. अशी माणसं उपजत वृत्तीची असावी लागतात. ती संस्कारातून तयार होतात. निर्जिव पाठ्यपुस्तकांच्या शाळेतून नाही. माणसांच्या संस्काराचा हा वसा शहर सुंदर करतो. भौतिक सुविधा आज नाहीतर उद्या सरकार किंवा सहकारातून उभ्या राहू शकतात. शहराला सुंदर करणारी माणसं मात्र संस्कारातून निर्माण व्हायला हवीत. हे काम केशवस्मृती प्रतिष्ठान उत्तमपणे करीत आहे. शहराची ही एक सुंदर जागा आहे. निश्चित!!!

(प्रसिद्धी दि. फेब्रुवारी २०१५ तरुण भारत )

No comments:

Post a Comment