Monday 9 February 2015

दशावतारी साहेब



हाराष्ट्रासह देशातील सत्तेच्या सारीपाटावर साहेब या नावाला वेगवेगळे वलय आहे. साहेब शब्दाला जाणताराजा हाही पर्याय आहे. राजकारणाचा उंबरठा नव्याने ओलांडणारा कोणताही नवखा किंवा उमदा गडी साहेबांचे नाव घेताना दोन्ही हाताने कानांच्या पाळ्या पकडतो, जीभ सुद्धा चावतो. यातून व्यक्तिमत्वाविषयी असलेल्या आदराची आणि उत्तुंगपणाची जाणीव व्हावी. साहेबांचे गुगली, घुमजाव, यू टर्न आणि वक्तव्याचा विपर्यास याच गुणवैशिष्टांची संकलीत माहितीतून ओळख करुन घेण्याचा हा प्रयत्न आहे.

(वैधानिक इशारा : हा लेख साहेब या विषयाशी संबंधित यापूर्वीच्या संकलीत माहिती वरून लिहीलेला आहे. साहेब हे व्यक्तिमत्व सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही व्यक्ती अथवा चरित्राशी मुळीच संबंधित नाही. तरी सुद्धा ते तसे वाटत असेल तर, तो निव्वळ योगायोग समजावा.)

माझी पत्रकारिता नाशिकला सुरू झाली. प्रेस फोटोग्राफर होतो. हळूहळू बातम्या लिहायला लागलो. तेथील अत्यंत बुजूर्ग व्यक्तिमत्व कै. मधुकरराव कावळे यांनी शासकिय व राजकिय पत्रकारितेचे धडे दिले. दिले म्हणण्यापेक्षा माझ्याकडून गिरवून घेतले. त्यांना कावळेदादा म्हणायचो. फोटोग्राफर म्हणून त्यांच्या सोबत जावे लागायचे. एकेदिवशी गोल्फ्नलब विश्रामगृहावर गेलो. मुख्यमंत्र्याची पत्रकार परिषद होती. पत्रकार परिषदेसाठी सर्वजण एकत्र बसलो. समोर आले साहेब! नाशिकच्या बऱ्याचशा पत्रकारांना त्यांनी नावाने ओळखले. ज्यांचे नाव घेतले ते खूश झाले. वातावरण हलकेफुलके झाले. चर्चा सुरू झाली. मी फोटो काढून मागे बसलो. विषय फळबाग आणि द्राक्ष बागांशी संबंधित होता. साहेब सर्व प्रश्नांची उत्तरे देत होते. जवळपास पाऊण तास पत्रकार परिषद सुरू होती. कोणाला काही विचारायचे आहे का? असा एक प्रश्न साहेबांनी मध्येच विचारला आणि तो बहुधा, आता थांबू या याच टोनमध्ये होता. मी मागे गप्प बसलो होतो आणि त्या प्रश्नामुळे मलाही प्रश्न विचारायची इच्छा झाली. मी म्हणालो, साहेब माझा एक प्रश्न आहे. साऱ्यांनी चमकून मागे पाहिले. अशा पत्रकार परिषदांमध्ये फोटोग्राफरला प्रश्न विचारायचा हक्क नसतो. मी मात्र प्रश्न विचारायचा आहे असे बोलून गेलो. साहेबांच्या मेमरीत माझी ओळख कुठेच लागत नव्हती. त्यांनी नेहमीच्या मंडळींना नजरेनेच खुणावले, कोण आहे हा? तेव्हा नाशिकच्या जुन्या दैनिकाचे एक प्रतिनिधी म्हणाले, साहेब हा तुमच्यासाठी घरचा आहेर आहे. त्यापाठोपाठ कावळेदादा लगबगीने म्हणाले, हो साहेब! आपलाच आहे. आपल्या पेपरचा फोटोग्राफर आहे. साहेबांच्या कपाळावर आढ्या होत्याच तरी ते हसत म्हणाले, विचार काय विचारायचे आहेस तुला? मला हायेसे वाटले आणि मी प्रश्न विचारलाच, साहेब आपण परदेशातून महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी अमेेरिकेचा नुकताच दौरा केला, पण खरोखर त्यातून काही गुंतवणूक येणार आहे का? हा प्रश्न विचारून मी गप्प झालो मात्र, त्यानंतर साहेब पुन्हा पाऊण तास बोलले. अमेेरिकेत कोणा सोबत भेटी झाल्या याची जंत्रीच त्यांनी दिली. अपेक्षित गुंतवणुकीचा तपशीलही दिला. कारण, अमेेरिका दौरा करून ते दोन-तीन दिवसांपूर्वी मुंबईत परतले होते. तेव्हा माध्यमांची एवढी स्पर्धा आणि गर्दीही नव्हती. मुंबईहून डाक एडीशन म्हणून येणाऱ्या वृत्तपत्रात मी त्याविषयी वाचलेले होते म्हणून प्रश्न विचारला होता. साहेब भरभरून बोलले. पत्रकार परिषद संपल्यानंतर कळी खुललेल्या कावळेदादांनी मला चहा पाजला. आमच्या मालकाशी असलेले साहेबांचे ब्लड रिलेशन मलाही त्या दिवशी समजले. दुसऱ्या दिवशी सर्वच वृत्तपत्रात लिड हा साहेबांनी परदेशातील अपेक्षित गुंतवणुकीबाबत दिलेल्या माहितीचाच होता. साहेबांशी माझा हा पहिला परिचय.

त्यानंतर गेली 25-26 वर्षे पत्रकार म्हणून काम सुरूच आहे. साहेबांच्या अनेक सभा, बैठका आणि पत्रकार परिषदा केल्या. निवडणूक काळात जाहीरसभास्थळी व्यासपिठाच्यामागे स्टॅण्डींग मिटींग घेत साहेब एसपी, कले्नटरला कशा सूचना देतात हे मी जवळून ऐकले आहे. वाहनांचे ताफे एकत्र दिसू नये म्हणून एसपीला हेलिपॅडच्या बाहेर उभे करून पुढाऱ्यांच्या तीन-चार गाड्या सोडा अशा सूचना देताना मी पाहिले आहे. भाकरी फिरवावी लागते, ओठात राम आणि पोटात नथूराम ही साहेबांची ऐतिहासिक वा्नये मी स्वतःच्या कानांनी ऐकली आहेत. अलिकडच्या निवडणुकीत साहेबांनी विचारलेला आणि मैलाचा दगड ठरलेला प्रश्न, देश हाफचड्डीवाल्यांच्या हातात देणार का? मी चलमाध्यमातून किमान 100 वेळा ऐकला-पाहिला आहे. असे सारे काहीही असले तरी साहेबांच्या एकूणच व्यक्तिमत्वाच्या मी प्रेमात आहे.गेल्या दोन-तीन दिवसांपासून साहेबांच्या वक्तव्यांविषयी विविध प्रकारच्या माध्यमांतून उलट-सुलट लिहीले-बोलले जाते आहे. चिंतन शिबिरातील वक्तव्याच्यानिमित्ताने अखेर ताईसाहेबांनाही खुलासा करावा लागला. मी तसे बोललेच नाही, असेही ताईंना सांगावे लागले. यामुळेच मी अस्वस्थ आहे. 

साहेबांचे व्यक्तिमत्व ज्यांना माहित आहे, ती मंडळी अशा खूळचट विषयांना प्राधान्य देत नाही. साहेबांच्या आयुष्यातील असे हे काही आजचे प्रसंग नाहीत. यापूर्वीही अनेकवेळा असे झाले आहे. ज्यांना माहित नाही त्यांना सांगावे लागेल, बाबांनो! गुगल सर्चवर जा, तेथे साहेबांचे नाव आणि घुमजाव, यू टर्न, गुगली, वक्तव्याचा विपर्यास, मुकरे (हिंदीत घुमजाव) असे मराठी शब्द टाईप करा. बघा, साहेबांच्या वक्तव्यांच्या शेकडो लिंक समोर येतात. एवढेच नव्हे तर साहेबांच्या विषयी हेच शब्द घेवून लिहीणाऱ्या ठराविक लेखकांचे लेख, भाष्य, मत, क्रिया-प्रतिक्रियाही समोर येतात.
साहेबांचे व्यक्तिमत्वच अशा विविध कंगोऱ्यांचे आहे. पूर्वी साहेब फक्त महाराष्ट्राचे होते. गेल्या काहीवर्षांत ते देशाचे झाले आहेत. बरे, साहेबांचे इतर पक्षांतील मित्रही तेवढ्याच वेगवेगळ्या मिजासचे आहेत. साहेबांच्या बंधुंनी सांगितलेला एक किस्सा माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचा. पंतप्रधानकी गेल्यानंतर चंद्रशेखर एकदा बारामतीत साहेबांच्या फार्म हाऊसवर मुक्कामी होते. तेथे आंब्याचे वेगळ्या प्रकारचे झाड होते. चंद्रशेखर यांनी विचारले, इसका फल कैसा होता है? मोठ्या ताईंनी काहीतरी सांगितले, साहेबही बोलले. पण, चंद्रशेखर यांचे समाधान काही झाले नाही. त्यांनी म्हणे गुडघ्यापर्यंत धोतर गुंडाळे आणि ते सरसर झाडावरही चढले. तब्बल वीसएक मिनिटे फांद्यांवर इकडू तिकडे केल्यानंतर झाडाच्या शेंड्यावर चंद्रशेखर यांना एक कैरी सापडलीच. ती घेवून ते खाली आले. ज्यादिवशी त्यांना पंतप्रधानपद मिळाले तेव्हा जेवढा आनंद झाला होता तेवढाच किंबहुना थोडा जास्त आनंद त्यांना ती कैरी मिळवून झाला होता! बघा कसा योगायोग असतो, साहेबांना देशाचे सर्वोच्च पद हवे होते. ते जुगाडमध्ये चंद्रशेखर यांना मिळाले. साहेब पाहात राहीले. त्याच चंद्रशेखर यांनी कैरीचा हंगाम गेल्यानंतरही साहेबांच्या बंगल्या लगतच्या झाडावरून एक कैरी शोधून काढलीच ना? जावू दे विषयांतर झाले.

विषय होता साहेबांच्या विषयी गुगलवर मिळणारी माहिती. अर्थात, गुगलवर सर्वच काही माहिती सत्य असते असे मुळीच नाही. म्हणूनच लेखाच्या प्रारंभी वैधानिक इशारा दिला आहे. साम्य आढळले तरी संकलनातील साहेब हे पात्र पूर्णतः काल्पनिक आहे. साहेब आणि खंजर असाही गुगल शोध माहितीची विक्रमी पाने दाखवतो. तो आपला विषय नाही. मी साहेबांना पूर्णतः अहिंसावादी मानतो. त्यामुळे ते खंजर ठेवू शकतात हे मी स्वप्नातही मान्य करणार नाही. पण, साहेब आणि सरकार पाडणे किंवा साहेब आणि मध्यावधी निवडणुका याचा काहीवेळा संबंध इतिहासाच्या...सॉरी गुगलच्या पानात नोंदला गेला आहे.

1978 मध्ये सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याबद्दल कै. वसंतदादांनी साहेबांना बोलावून विचारले, अरे तू असे करणार आहेस का? त्यावर साहेब नाही म्हणाले. मात्र, अवघ्या दोन तासांनी चारमंत्री आणि 18 आमदारांची वेगळी चूल मांडत सरकारच्या बाहेर पडत पडल्याची घोषणा साहेबांनी केली. भर अर्थलंकल्पीय अधिवेशनात कै. वसंतदादांचे सरकार पडले. याचा अर्थ एवढाच घ्यावा लागेल, तो म्हणजे कै.वसंतदादांचे सरकार टिकवायची जबाबदारी तेव्हाही साहेबांची नव्हती आणि आजही भाजपचे सरकार टिकवायची जबाबदारी साहेबांची नाही. तेव्हा तरी साहेबांनी दोन तासांत सरकार पाडले होते. आता किमान शपथविधी होवून सरकार काही काळ चालले तरी आहे!

सरकार पाडण्यात साहेबांचा हात कोणीही धरू शकत नाहीत असे म्हटले जाते. अगदी पहिल्यांदा जेव्हा 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी सरकार बनविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा एक मत बहुमताला कमी पडले होते. त्यावेळीही ते सरकार पाडण्यासाठी साहेबांनी पडद्यामागून परिश्रम घेतल्याचे कालपरवापर्यंत शिवसेनेचे उद्धव ठाकरे बोलत होते.
यावेळेचाही एक किस्सा आहे. अटल सरकार पडल्यानंतर संसदेच्या पायऱ्यांवर उभे राहून साहेब म्हणाले होते, अब हम सोनियाजीके लिडरशिपमे नया सरकार बनाएगें. मात्र, दुसऱ्याच दिवशी कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सोनियांच्या विदेशीपणाचा मुद्दा साहेब, त्यांचे दुसरे मित्र अमर (तारिक अन्वर) आणि तिसरे मित्र अॅन्थनी (पी. ए. संगमा) यांनी उचलला. अखेर पक्षातून तिघांची गच्छंती झाली.

इतिहासातील संदर्भ आणि अलिकडची कृती पाहता साहेबांना सरकार कधीही पाडता येते. साडेचारवर्षे राज्यात आघाडी म्हणून एकत्र नांदत असताना सत्ताकाळ संपण्याच्या 20 दिवस अगोदर सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इतिहासही साहेबांच्या नावावर लिहीला गेला आहे. दुपारी विद्यमान असलेल्या मुख्यमंत्र्याला सायंकाळी माजी मुख्यमंत्री करुन टाकण्याची किमया साहेबांना साध्य आहे.

गेली 10 वर्षे साहेब केंद्रात कॉंग्रेस आघाडीच्या सरकारमध्ये क्रमांक दोनचे मंत्री होते. तसे असले तरी साहेब अधुनमधून कॉंग्रेस आघाडी सरकारमधून बाहेर पडायचा इशारा द्यायचे. 2013 च्या ऑ्नटोबर महिन्यातही साहेबांनी बडोदा येथे पक्षाच्या मेळाव्यात मध्यावधी निवडणुकांचे भाकित केले होते. तेव्हाही साहेबांचा पक्ष बाहेर पडला तर केंद्र सरकारच्या स्थैर्यावर परिणाम होवू शकतो अशा बातम्या दोन-तीन दिवस आल्या. मात्र, साहेबांनी कराड येथे खुलासा केला की, मी तसे भाकित केलेले नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाला. उलटपक्षी साहेब असेही म्हणाले की, राजकिय पक्षांना नेहमी निवडणुकांसाठी तयार राहावे लागते. त्या उद्देशाने मी ते विधान केले. आता बोला! साहेब तेव्हाचीच सहज सोपी भाषा आजही महाराष्ट्रातल्या सरकारसाठी वापरत असतील तर त्यात त्यांचा काय दोष?

साहेबांची एक गोष्ट सूर्यप्रकाशाएवढी सत्य आहे ती म्हणजे, ते जे वक्तव्य करतात ते नंतर फिरवून दुसरे वक्तव्य करायचे असेल तर ते सुद्धा तेवढ्याच स्पष्टपणे करतात. म्हणजे नंतर हेच कळत नाही की, साहेबांचे मूळ वक्तव्य काय होते?
2013 मधील सप्टेंबरचा महिना आठवून  पाहा. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा झाला आहे, अशी मोठी बातमी साहेबांनी प्रसारमाध्यमांना दिली. तीन तीन महिने फाईलींवर सह्याच होत नाही, प्रशासनातील लोकांचे हात थरथरतात काय? मला वाटते यांच्या हाताला लकवा भरलाय की काय? असे वक्तव्य साहेबांनी केले होते. तेव्हापासून लकवा मारणे हे राजकिय क्रियापद म्हणून ओळखले जावू लागले. या वक्तव्यानंतर अवघ्या चार दिवसांनी यवतमाळला साहेब पत्रकारांच्या समोर बोलले, मुख्यमंत्री चांगले काम करीत असून ते जे बोलतात तेच करतात! तेव्हा सुद्धा साहेबांच्या या वक्तव्याला काही नतद्रष्टांनी घुमजाव म्हटले.

2009 मधील एक किस्सा असाच. लोकसभा निवडणुकीचे वातावरण तयार होत होते. साहेबांना आपल्या घरच्या मतदार संघातून ताईंना रिंगणात उतरवायचे होते. अशावेळी स्वतःसाठी कोणता मतदारसंघ घ्यावा आणि तो आपण कसा मागावा? हा साहेबांच्या समोर प्रश्न होताच. त्यामुळे साहेबांनी वक्तव्य केले, मी आता निवडणुकीच्या राजकारणातून लांब राहावे असा विचार करतोय. झाले दोन दिवसांनी पुन्हा बातमी आली. साहेब बोलले, मी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर शेवटची निवडणूक लढणार. साहेबांनी स्वतःसाठी माढा मतदारसंघ निवडला होता.

2012 च्या जुलैमधील काही नोंदी साहेबांचा महाराष्ट्र सरकारवरील राग केंद्र सरकारवर कसा व्यक्त झाला हे दर्शवितात. राज्य सहकारी शिखर बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याची कार्यवाही तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वारीज चव्हाणांनी मायपॉवरमध्ये केली होती. त्या बँकेत साहेबांचे व छोट्या साहेबांचे चेलेचपाटे होते. सत्तेची एक जागा गेल्याचा राग साहेबांच्या डो्नयात होता. तेव्हा साहेबांनी कॉंग्रेस श्रेष्ठींकडून मुख्यमंत्र्यांवर दबाव आणण्यासाठी वक्तव्य केले होते की, आमच्या हिताविरूद्ध काही होत असेल तर आम्ही कॉंग्रेस आघाडी सरकारमधून बाहेर पडू आणि सरकारला बाहेरून पाठिंबा देवू. अर्थात, साहेबांनी तसे काही केले नाही.

साहेबांनी नेहमी संयुक्त महाराष्ट्राची पाठराखण केली. स्वतंत्र विदभार्र्ला पाठिंबा देणारे वक्तव्य जाहीरपणे कधीही केले नाही. पण, 2013 च्या फेब्रुवारीत साहेब म्हणाले, तेलंगाणा जसे स्वतंत्र होत आहे तशी विदर्भाची स्वतंत्र होण्याची मागणी आली तर राष्ट्रवादी कॉंग्रेस आडवी येणार नाही. याला कोणी साहेबांचा यू टर्न म्हणत असतील तर साहेबांनी हे विधान लोकेच्छेखातर केल्याचेही लक्षात घ्यायला हवे.

लोकशिक्षण आणि लोकविनोद या दोन गोष्टी साहेबांनी समाजाला आणि साहित्य क्षेत्राला दिल्या. साहेब स्वतः कधीही निवडणुकीतील गैरप्रकार करून निवडून आलेले नाही. उलट त्यांनी आपल्या गृह मतदारसंघात मताध्नियाचे विक्रम केले आहेत. पण, साहेब इतरांना निवडणूक पद्धतीतील गैरप्रकार दाखविण्यासाठी लोकशिक्षण देणारी किंवा लोकविनोद करणारी वा्नये हमखास वापरतात. त्याची दोन ठळक उदाहरणे आहे. पहिले म्हणजे नगर मतदारसंघात एकदा प्रचाराच्या सभेत साहेब बोलून गेले, समोरची व्यक्ती तुम्हाला पैसा देईल, तो घ्या मात्र मत कॉंग्रेसला द्या. साहेबांच्या या वा्नयावर काय गजहब झाला?  साहेबांना थेट सुप्रीम कोर्टापर्यंत लढावे लागले. पण एक गोष्ट तेवढीच खरी. कोर्टाने साहेबांचा लोकशिक्षणाचा मुद्दा ग्राह्य मानला.

दुसरे उदाहरण अगदी अलिकडचे. मुंबईत माथाडी कामगारांच्या मेळाव्यात साहेब बोलून गेले, मतदान दोन वेगवेगळ्या तारखांना आहे. त्यामुळे बोटाची शाई पुसा आणि दोनदा मतदान करा. अर्थात, यावरून निवडणूक आयोगाकडे तक्रार झालीच. अखेर साहेबांना बोलावे लागले, माझे ते वा्नय राजकिय नाही तर ते विनोदाने केले आहे. साहेबांचा हा खुलासाही निवडणूक आयोगाने स्वीकारला. अहो, येथे मतदार एकवेळा मतदान करीत नाहीत. दोनदा मतदान करा हे मतदाराला सांगणे म्हणजे विनोद नाहीतर काय आचारसंहितेचा भंग आहे? साहेब मतदारांना दोनदा मतदान करायला प्रवृत्त करीत आहेत, यातील लोकशिक्षण मुद्दा खूळचट लोकांना दिसलाच नाही.

2014 च्या जानेवारीत गोध्रा हत्याकांडानंतरच्या हिंसाचारासंदर्भात सुप्रीम कोर्टाने नरेंद्र मोदी यांना ्निलनचिट देणारा निकाल दिला. यावर साहेब लगेच बोलले,  आता 2002 च्या गोध्रा हत्याकांडा नंतरच्या हिंसेवर चर्चा करायची गरज नाही. मोदींच्या भूमिकेवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केला आहे. तेव्हा तथाकथित समाजवाद्यांनी साहेबांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. मुस्लिमांची व्होट बँक डिस्टर्ब होईल असे लक्षात आल्यावर साहेबांनी 2014 च्या फेब्रुवारीत पुन्हा वक्तव्य केले की, 2002 मध्ये मोदींच्या नेतृत्वात झालेले सामुहिक हत्याकांड लोक कसे विसरतील? झाले, साहेबांचे हे वा्नय आजही गुगल सर्चमध्ये ....र्स यू टर्न म्हणून सर्वाधिक पाने मिळवून आहे.

साहेबांच्या या कृतीचा समाचार घेताना प्रकाश जावडेवर तेव्हा म्हणाले होते की, साहेब हे साडेचारवर्षे निधर्मी आणि समाजवादी असतात पण निवडणूक आली की ते सहा महिने पूर्णतः जातीवादी होतात. हे निरीक्षण काही अंशी योग्य वाटते. साहेबांना सोडून जाणाऱ्या स्वकियांनी निवडणूक काळात जे आरोप केले आहेत ते बहुतांश जावडेकर बोलतात तसेच आहेत.
2014 च्या एप्रिलमध्ये साहेबांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची चिरफाड करणारी वक्तव्ये केली होती. त्यात त्यांनी बेमालूमपणे कै. बाळासाहेब ठाकरे यांची भलावण करीत उद्धव ठाकरेंची पिसे काढली होती. साहेब म्हणाले होते, मला एनडीएत जाण्यापासून उद्धवने रोखले असे म्हणणे हा सर्वांत मोठा विनोद आहे. शिवसेना दिवसेंदिवस रसातळाला जात आहे. उद्धव यांना कोणीही गांभिर्याने घेत नाही. 2014 च्या नोव्हेंबरमध्ये साहेब उद्धवांच्याविषयी बोलले, उद्धवने बाळासाहेबांच्यानंतर शिवसेना चांगली सांभाळली आहे. त्यांचे नेतृत्व कार्यकर्त्यांनी स्वीकारले आहे. आता या दोन्ही वक्तव्यांची तुलना करायची काही गरज आहे का? माणसाचे दुसऱ्याप्रती असलेले मत कधीही बदलू शकते. उलट बदल हे झटपट झाले तर चांगलेच असतात. साहेबांच्या बाबतीत बदलांची क्रिया इतरांच्या तुलनेत लवकर होते.

साहेबांनी मध्यंतरी आपल्याच पक्षात साफसफाईची मोहिम सुरू केल्याचा अविर्भाव आणला होता. 2013 च्या जूनमध्ये साहेबांनी पक्षाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत आघाडी सरकारमधील आपल्या पक्षाच्या 22 मंत्र्यांचेे राजीनामे घेतले होते. तेव्हा अनेकांना वाटले होते की, बस्स आता डागी मंत्री घरी बसणार पण, झाले भलतेच. देवकर, जाधव व पाचपुते घरी बसले. देवकर आजही कारागृहात आहेत. पाचपुते साहेबांना सोडून गेले आहेत. जाधवांची अवस्था धड संघटनेत ना धड साहेबांच्या जवळ अशी आहे. साहेबांच्या वक्तव्यांचा आडवळणांचा प्रवास असा खूप मोठा आहे. याला एक कारणही आहे. ते म्हणजे, साहेबांची नाळ महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांशी, नेत्यांशी शेवटपर्यंत जुळेली आहे. एवढा मोठा जनसंपर्काचा व्याप सांभाळायचा आणि सत्तेत किंवा सत्ताकारणाच्या चर्चेत अग्रभागी राहायचे तर शब्दांचा फेरफार करावाच लागतो. कधी इतरांना सांभाळायला तरी कधी स्वतःला सावरायला.

महाभारतातही युधिष्ठीराच्या नशिबी सुद्धा नरो वा कुंज रोवा, अशी दुहेरी भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे. तशी ती साहेब नेहमी घेतात. महाभारतात जयद्रथाचा वध करण्यासाठी कृष्ण कृत्रिम सूर्यास्त घडवून आणतो आणि नंतर पुन्हा सूर्य दाखवून अर्जूनाला म्हणतो, हा बघ सूर्य आणि हा जयद्रथ. अर्जूनही जयद्रथाचा शिरच्छेद करतो.
साहेबांची भूमिकाही अशीच आहे. विरोधकांना कात्रजचा घाट दाखवून भलतीकडे नेण्याचे कौशल्य साहेबांच्या व्यक्तिमत्वात आहे. ते त्याचा अधुनमधून वापर करतात. इतरांना करता येत नाही. म्हणूनच ते साहेबांना बेभरवशाचे, बोलतील एक करतील दुसरेच, या हाताचे त्या हाताला कळत नाही किंवा साहेबांनी खांद्यावर हात ठेवला ना? आता संपले सारे असे खोचक मत व्यक्त करतात. मी या मतांशी सहमत नाही. ज्यांचा कृष्णाच्या दशावतारावर विश्वास आहे त्यांनी तरी किमान साहेबांच्या या दशावतारी व्यक्तीमत्वाविषयी टीका-टीपण्णी करू नये.


प्रतिमा व्यवस्थापनाची सोय

साहेबांच्या व्यक्तिमत्वाला कोणताही तडा जावू नये म्हणून प्रसार माध्यमांमध्ये प्रतिमा व्यवस्थापन करणारी काही मंडळी सदैव तत्पर असतात. साहेबांचे आणि दाऊदचे संबंध आहेत असा जेव्हा कै. गोपिनाथ मुंडेनी आरोप केला होता तेव्हा मुंबईतल्या उद्योजक लॉबीने साहेबांच्या भलावणसाठी लगेच बैठक घेवून पाठिंबा दर्शवला होता. तेथे बोलताना साहेब भावनाशील झाले होते. आताही साहेंबाच्या उलट-सुलट विधानांवर आक्षेप घेतले जात आहेत. एका प्रिंट मीडियामध्ये साहेबांना खलनायक संबोधणारा लेख 2014 च्या जुलै महिन्यात प्रसिद्ध झाला. त्या लेखातील तपशील कसे चुकीचे आहेत? याची दुसरी बाजू मांडण्यासाठी एका माजी संपादकाने आपली लेखणी झिजवली आहे. यापूर्वीही साहेब आणि खंजर असा प्रचार होत असताना भारतात कधीकाळी संपादक असणाऱ्या व नंतर विदेशात स्थायिक झालेल्या एका विचारवंत संपादकाने तेव्हा (1978 मध्ये) साहेबांनी खंजर मारला नाही हे लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी खास लेख लिहील्याचे आढळून आले आहे.


मोस्ट अनप्रिडे्नटेबल पर्सन
कॉंग्रेसचे माजी नेते कै. अर्जून सिंग यांचे आत्मचरित्र अ ग्रेन सॅण्ड इन अवर ग्लास ऑफ टाईम या नावाने प्रसिद्ध झाले आहे. त्यात ते साहेबांच्या विषयी लिहीतात, ही व्यक्ती अविश्वासू, बेभरवशाची आणि धोकेबाज आहे. कै. अर्जून सिंग हे साहेबांच्या सोबत कै. पी. व्ही. नरसिंहराव आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या केंद्रातील सरकारमध्ये सहकारी मंत्री होते.

(या लेखातील संदर्भ हे साहेबांच्या विषयी उपलब्ध माहितीवर आधारित आहेत. वक्तव्य बदलणे, शब्द फिरवणे, विपर्यास करणे एवढाच साहेबांच्या कृतीशी संबंधित मुद्दा यात आहे. इतर कोणत्याही कृती, कार्य, आदर याविषयी अनादर, अवमान करण्याचा हेतू नाही. अर्थात, साहेब हे पात्र कोणत्याही व्यक्ती किंवा चरित्राशी साधर्म्य ठेवणारे नाही)


(प्रसिद्धी दि. २३ नोव्हेंबर २०१४ तरुण भारत)


No comments:

Post a Comment