Monday 9 February 2015

देव आणि देवत्वाचा शोध


शिर्डीच्या साईबाबांना देवाचा दर्जा देणे किंवा त्यांचे देवत्व नाकारून मंदिरातील त्यांच्या मूर्ती काढून टाकण्याचा खळबळजनक आदेश कर्वदा (छत्तीसगड) येथे नुकत्याच पार पडलेल्या हिंदू साधू- संतांच्या धर्मसंसदेतून देण्यात आला आहे. साईबाबांचे महत्त्व किंवा देवत्वही सांगायचे नाही आणि धर्मसंसदेच्या आदेशालाही विरोध करायचा मुद्दा नाही. विचार मांडायचा आहे तो, केवळ देव मानणाऱ्या श्रद्धेचा आणि देवत्वाचे अस्तित्व अनुभवणाऱ्या प्रचितीचा. दगड, प्रतिमा किंवा कोणत्याही प्रतिकात देव शोधण्यापेक्षा माणसांमधील देवत्वाचा शोध आपण कधी घेणार? आणि त्याला कोणाची संमती अथवा मंजुरी घ्यावी लागणार? हे दोनच प्रश्न सर्वसामान्य माणूस अथवा भाविकांसाठी महत्वाचे आहेत. आम्ही सांगू तो देव किंवा आम्ही पेटंट घेवून ठरवला तोच देवाचा चेहरा ही वृत्ती- प्रवृत्ती श्रद्धेचा प्रवास अंधश्रद्धेकडे नेणारी आहे. ती सर्वार्थाने समाजासाठी घातक आहे.
 

साधारणपणे वीस-बावीस वर्षांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते  डॉ. श्रीराम लागू आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते स्व. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी वाद- संवाद नावाचा एक कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर सादर केला होता. त्या कार्यक्रमाचे नाव परमेश्र्वराला रिटायर करा, असे लक्षवेधी होते. लागू हे मानवी मनातील श्रद्धेची अवस्था स्पष्ट करुन परमेश्र्वराच्या भरवशावर निष्क्रिय होणाऱ्या मानवी प्रवृत्तींवर शाब्दीक प्रहार करीत, परमेश्र्वराला आता रिटायर करा अशी भूमिका मांडत. त्याचवेळी दाभोळकर अंधश्रद्धेची व्याख्या आणि चमत्काराच्या नावाने होणारी भोंदूगिरी यावर शाब्दीक हल्ला करीत. हा कार्यक्रम ज्यांनी ऐकला त्यांनी कधीही लागू अथवा दाभोळकर हे देवाच्या किंवा देवत्वाच्या विरोधात आहेत, असे म्हटले नाही. देवाचे अस्तित्व नाकारण्याचा मुद्दा लागू हे विज्ञान, तर्क, अनुभव आणि आशा-अपेक्षा यांचा आधार घेवून मांडत. त्यामुळे देवादिकांचे स्तोम माजवणारी मंडळी या कार्यक्रमाला प्रखर विरोध करू शकली नव्हती.

गेल्या काही दिवसांपूर्वी द्वारका धर्मपीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांनी शिर्डी येथील साईबाबा हे देव नाहीत, असा दावा करीत नवा वाद निर्माण केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर छत्तीसगडमधील कबीरधाम जिल्ह्यातील कर्वधा येथे धर्मसंसद झाली. तीत धर्म-कर्मकांडशी संबंधित 13 आखाड्यांच्या साधू-संत-महंतांनी एकत्रितपणे ठराव करून साईबाबांचे देव असणे किंवा त्यांच्या कथित चमत्कारांना देवत्वाचा दर्जा देणे अशा दोन्ही बाबी नाकारल्या. एवढेच नव्हेतर सनातन धर्माच्या मंदिरात असलेल्या साईबाबांच्या मूर्ती उखडून टाकाव्यात असा आदेशही दिला.

वरील दोन्ही प्रसंग वेगवेगळे आहेत. मात्र, दोघांमधील संदेशात एक अदृश्य साम्य आहे. ते म्हणजे, परमेश्वराचे अस्तित्व नाकारणारा. लागू हे सरसकट सर्वच परमेश्र्वरांचे अस्तित्व नाकारत होते. दाभोलकर हे परमेश्र्वराच्या नावाने होणाऱ्या अंधश्रद्धेला नाकारत होते. धर्मसंसद मात्र, आम्ही सांगू तेच देव आहेत, आम्ही नाकारू त्यांना देव मानू नका असा एकांगी, एककल्ली आदेश देत आहेत. मूलतः संदेश हाच की, परमेश्र्वराचे अस्तित्व नाकारा.

विचारांची गंमत आणि गल्लतही याच ठिकाणी आहे, ती म्हणजे परमेश्र्वराचे अस्तित्व नाकारा हे सांगणे खूप सोपे आहे. कारण, मी परमेश्र्वर आहे हे सांगण्यासाठी किंवा तसा दावा करण्यासाठी कोणीही समोर येणार नाही. या बरोबरच मी परमेश्र्वर पाहिला, परमेश्र्वराचे निवासस्थान मला माहिती आहे, असेही कोणी ठासून सांगत नाही. त्याबद्दल पुरावेही देवू शकत नाही. जे काही तथाकथित पुरावे दिले जातात त्याला एकतर चमत्कार, भास, अनुभूती अथवा मानवी अचेतन अथवा अती जागृत अवस्थेतील अनुभव असे म्हटले जाते. या अवस्थांना मनोविकार चिकित्सा अभ्यासातही विविध संकल्पनांद्वारे स्पष्ट केले आहे. अशा स्थितीत परमेश्र्वर (देव) म्हणजे काय? आणि त्याची प्रचिती (देवत्व) म्हणजे काय? हे धर्मशास्त्र आणि अनुभवाच्या कसोटीवर समजावून घेणे आवश्यक वाटते. देव आणि देवत्वाविषयी वेद, उपनिषदात अनेक संकल्पना स्पष्ट केलेल्या आहेत. या शिवाय समाजातील धर्म, आध्यात्म क्षेत्रात नावलौकिक असलेल्या मान्यवरांनी विविध व्याख्याही केल्या आहेत. सर्वप्रथम आपण यास्काची याने स्पष्ट केलेली संकल्पना पाहू.

देवः दानात् वा दीपनात् वा द्योतनात् वा
द्युस्थानो भवति इति वा
यो देवःसा देवता

म्हणजे- दान देणारा (इतरांच्या इच्छा पूर्ण करणारा), चकाकणारा (स्वयंम प्रकाशी ः हा प्रकाश विद्वतेचा असावा), प्रकाश देणारा (इतरांना मार्गदर्शन करणारा) असा घटक म्हणजे देव होय. दा, दीप आणि द्युत यापासून देव तयार होतो. देवता म्हणजे ज्याच्या अंगी दिव्य शक्ती आहेत. ज्याच्या अंगी तेज आहे आणि ज्याच्या अंगी सामर्थ्य आहे तो देव. जो अदृश्य असतो, जो भक्त, श्रद्धाळूंची पूजा-बळी स्वीकारून इच्छा पूर्ण करतो, भक्तीच्या उत्कटप्रसंगी जो प्रकट होतो, ज्याची पंचमहाभूतांवर सत्ता आहे तो देव.

येथे पंचमहाभूतांचा उल्लेख आहे. त्याच्याशी संबंधित घटकांना पृथ्वी, सूर्य, अग्नी, वायू आणि जल याला आपल्या पूर्वजांनी देव मानलेच आहे. निसर्गाला देव मानणे म्हणजे पंचमहाभूतांचीच पूजा होय. या शिवाय देवांच्या मानवी अवतारालाही आपण स्वीकारले आहे. मानवी रुपातील देवांचा जन्म होतो म्हटल्यावर त्यांचा मृत्यू किंवा त्यांचे निर्वाण आपण मान्य केले आहे. ऋग्वेदातही देवतांच्या मृत्यूला मान्य केले आहे. हिंदूच्या देवता किती? असा विषय चर्चेला आला की 33 कोटी की 36 कोटी हा आकडा नेहमी ऐकिवात येतो. प्रत्यक्षात 33 देवतांचा उल्लेख वेदात आहे. यात आकाशाशी संबंधित 11, पृथ्वीशी संबंधित 11 आणि पाण्याशी (जलाशी) संबंधित 11 देवता आहेत. या शिवाय दिव्य देवता, अंतरिक्ष देवता, अपूर्ण देवता, स्त्री देवता, युग्म देवता असेही प्रकार आहेत.

देवांच्या अवस्थेविषयी गीतेतही श्रीकृष्णाने अविनाशी रुप आणि विनाशी रुप स्पष्ट केले आहे. सत्कार टाळणारा, अविवेकाचा त्याग करणारा, आसक्ती आणि त्यातून निर्माण होणारे दोष जिंकणारा, आत्म स्वरुपात रममाण होणारा व सुख दुःखापासून निष्काम, मूक्त झालेला पुरूष हा अविनाशीपदाला पोहचतो आणि तो देवाचा, परमेश्र्वराचा अवतार असतो, असे कृष्णाने स्पष्ट केले आहे.

दासबोधात समर्थ रामदास स्वामी महाराज देवाचे स्पष्टीकरण करताना म्हणतात-
ब्रह्मा विष्णू आणि हर
त्यांसी निर्मिता तोचि थोर
तो ओळखावा परमेश्र्वर
नाना यत्न करुनी

वरील सर्व प्रकारचे विवेचन लक्षात घेतले तर सर्व जागाची अगम्य, गूढ निर्मिती करणाऱ्या, त्यासाठी अमर्याद शक्ती असलेल्या आकार अथवा निरंकारास देव म्हणून साऱ्यांनी मान्य केल्याचे दिसते. हे अस्तित्व कोणी बहुईश्र्वरवादी, कोणी एक ईश्र्वरवादी तर कोणी निःस्वरुपवादी मानले आहे.

देवाचा शोध घेण्याचा प्रयत्नही अनेक महानुभाव, संत, महंतांनी केला आहे. यापैकी एक श्री श्री रवीशंकर म्हणतात-
देव शोधायला लांब जायला नको. तीर्थयात्राही करायला नको. जेथे आहात तेथे देव पाहू शकता. तुम्ही स्वतः जेथे आहात तेथे संपूर्णतः राहा. म्हणजे तुम्ही तन, मन, आचार, विचाराने एका ठिकाणी थांबा. तुम्हाला देव तेथेच दिसले.
देवाचा शोध घेताना नेहमी देव आणि देवत्व या दोन संकल्पनांचा उल्लेख केला जातो. याबाबत धर्म क्षेत्रातील विचारवंत म्हणतात-
जे तत्व चिरंतन राहते, त्याचा नाश होत नाही ते देव, आणि जे मानवजातीच्या कल्याणासाठी झिजते ते देवत्व होय.
खूप सुंदरपणे हे स्पष्टीकरण दिले आहे. देव म्हणजे स्थिती आणि देवत्व म्हणजे अवस्था, असेही म्हणता येईल. ते कसे हे समजून घेवू. 

स्थिती म्हणजे स्थितीज. जैसे आहे तैसे. कायम स्थित असलेले. देवाची मूर्ती, प्रतिमा ही कायम स्थितीज अवस्थेत असते. प्रतिक रुपात देव अचल, मूर्त अथवा अमूर्त आहे. परंतु, अवस्थेत असलेला देव हा कृतीप्रवण आहे. ही कृती कृपेची असेल, चमत्काराची असेल किंवा इच्छापूर्तीची असेल. म्हणजेच अवस्था ही इतरांसाठी देवत्वाची प्रचिती, अनुभूती अथवा अनुभव देणारी आहे. आता थोडा विवादास्पद मुद्दा समोर घेवू. वरील प्रकारचे कार्य, कर्तृत्व मानवाच्या संदर्भात घडले तर त्याला देवत्व देण्याची सर्वसामान्य माणसाची वृत्ती अथवा प्रवृत्ती आहे. जसे क्रिकेटचा देव सचिन (भोजपुरी अभिनेता मनोज तिवारीने बांधलेले मंदिर) अथवा आयपीएलचा देव धोनी (इंडिया टुडेवर कृष्णावतारात धोनीचा फोटो), गायनाच्या अतीउच्च शिखरावर असलेली गायनाची देवी गानसम्राज्ञी लता मंगेशकर (इंदूर येथे वर्षा झालानी हिने बांधलेले मंदिर), तेलंगानाची माता सोनिया गांधी (पी. शंकरराव यांनी सिकंदराबाद येथे बांधलेले मंदिर), राजकारणातील देवी इंदिरा गांधी (अमृतसर येथे विजय अग्निहोत्री यांनी बांधलेले मंदिर) अशी किती तरी उदाहरणे देता येतील. म्हणजेच मानवाच्या कृतीतही देवपण शोधण्याचा प्रयत्न करणे ही मानवाचीच सहज, सुलभ वृत्ती अथवा प्रवृत्ती म्हणावी लागेल. वर दिलेली नावे ही देवांची आहेत की मानवाची यावर आपण अनुकूलही नाही किंवा प्रतिकूलही नाही. येथे फक्त माणसातील देवत्व शोधण्याच्या क्रियेचा विचार आपण केला पाहीजे.

आध्यात्मावर अधिकाराने भाष्य करणारे सुप्रसिद्ध प्रवचनकार रामचंद्र देखणे देव अनुभवण्यासाठी म्हणतात- देवाने भक्तांना देव कळावा म्हणून स्वतः रुप घेतले. ते रुप आहे सद्गुरूचे किंवा संतांचे. याच रुपातून आपल्याला देव कळतो.
शिर्डीचे साईबाबा हे मानव रुपातच होते. खरेतर त्यांच्या जात, समाज, धर्म याचा विचार भाविक, भक्त करीत नाही. कबीर, रामकृष्ण परमहंस आणि महर्षी रमण यांच्याही जातीपातीचा उल्लेख कोणीही करीत नाही. परंतु, ही मंडळी सद्गुरू होती किंवा संत होती, हे कोणाही मान्य करेल. तसेच साईबाबा मुस्लिम फकीर होते. फकीर म्हणजे वैराग्य वृत्ती. गांजा, चिलीम ही फकीरांची दैनंदिन आयुधे. बरेचसे फकीर एकाकी, एकांकी असतात. लहरी असतात. साईबाबा तसेच होते. त्यांच्या चमत्कारांचा नेहमी उल्लेख होतो. त्यांच्या विषयी प्रदर्शित चित्रपटातही त्यावरच भर दिलेला आहे. चमत्कारांची चर्चा अनुभूती किंवा अनुभवातून होते. त्याला पुरावे नसतात. ते तर्काने तपासावेत अथवा त्याची श्रद्धा, निष्ठेने प्रचिती घ्यावी. साईबाबांचे चरित्र वाचताना ते देव असल्याचा दावा कोणाही करीत नाही. तसा कुठे उल्लेखही नाही. असे असतानाही साईमंदिरांची उभारणी झाली. ते केवळ साईबाबांच्या अवस्थेतून. अवस्था म्हणजे कार्य, कर्तृत्व हे आपण माघाशी बघितले. ही अवस्था अनुभवलेले, त्याची प्रचिती घेतलेले भाविक तेथे जमतात. त्यांची गर्दी वाढते आहे. साईपरिवार वाढतो आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. मग ही गर्दी का आहे? याचेही उत्तर सर्व बाजूंनी घासून पुसून तपासायला हवे.

कोणत्याही मंदिरात आपण गेलो तर तेथील मूर्ती अथवा प्रतिकांचे दर्शन आपण घेतो. गाभाऱ्यातील मूर्ती अथवा प्रतिक हे देवाची स्थिती असते. ती कायम असते. मात्र, त्यातून निघणारी अदृश्य ऊर्जा, प्रेरणा, शक्ती ही अवस्था असते. ती प्रत्येक भाविकाच्या कुवतीनुसार त्याला अनुभवता येते किंवा अनुभूती देते. याला आपण काहीवेळा चमत्कार म्हणतो किंवा अगदीच नकाराच्या भाषेत केवळ योगायोगही म्हणू शकतो.

देवादिकांच्या मंदिरातील ऊर्जा ही प्रत्येकाला कार्याची शक्ती देते, प्रवृत्त करते, कामासाठीचा आत्मविश्वास देते, आत्मबळ देते, सहजीवन- समुहजीवनात नांदण्याची समज देते. या शिवाय कोणाला हवे ते बळ देते. हे प्रथम आपण मान्य करू या. छत्रपती शिवाजी महाराज कोणत्याही मोहिमेवर जाण्यापूर्वी भवानी मातेला कौल लावत. मातेच्या हातातील फूल पडून अनुकूल कौल मिळाला की महाराज आखलेली मोहीम फत्ते करायला बाहेर पडत. हा उल्लेख महाराजांच्या चरित्रात आहे. परंतु, कौल मिळाला नाही म्हणून महाराजांनी एखादी मोहीम केली नाही किंवा सोडून दिली असा उल्लेख अजून तरी वाचनात आलेला नाही. याचा अर्थ आपण एवढाच काढू की, अनुकूल कौल मिळाला आहे, याची स्वतःला खात्री करुन घेण्यासाठीच महाराज मातेचा कौल मागत असत. आजही केवळ याच भावनेतून साऱ्या मंदिरे, प्रार्थनास्थळांमध्ये भाविक, भक्तांची गर्दी होत असावी. त्यामुळे कोणाला देव मानू नका अथवा त्यांचे देवत्व नाकारा असे कोणीही, कितीही अधिकाराने सांगितले तर ते ऐकणार कोण हा प्रश्नच आहे?
धर्मसंसदेत साईबाबांच्या संदर्भात जे घडले ते लक्षात घेता ग्रामगीतेत संत तुकडोजी महाराजांनी पंचेचाळीसाव्या अध्यायात देव- देवळे प्रकरणात वर्णन केलेली परिस्थिती आजच्या वातावरणाला चपखल बसते. ते म्हणतात-

संताचे घेतले संमेलन, तेवढ्यापुरते झाले मिलन
परंतु नित्याच्या उपासनेत, वाढे अंतर सर्व जनी
आपुलेच चिन्ह ठेवावे, त्यावरोनी संप्रदाय ओळखावे
म्हणोनी मांडिले दुकान बरवे, आपापले या पंथानी
सज्जनाने देव पुजिला, इतरांना तो मोठा देव झाला
वाढला त्याचा लौकिक भला, यात्रा भरली त्यासाठी

भाषा सोपी असल्यामुळे तुकडोजी महाराजांना काय म्हणायचे आहे हे सहज लक्षात येते. धर्मसंसदेतील साधू, महंतांची मनोवस्था आणि साईचरित्र यातील गल्लत लक्षात येते. आम्ही सांगू तोच देव, हा अट्टहास एकाकी, एकांगी वाटतो.
राहीला आता शेवटचा मुद्दा. जसे आम्ही सांगू तोच देव हे सामान्य भाविक किंवा भक्ताला पटणारे नाही तसेच आम्ही पेटंट मिळविलेल्या देवाचे रुपही इतरांना वापरता येणार नाही, असे प. पू. स्व. पांडुंरग शास्त्री आठवले प्रणीत स्वाध्याय परिवाराने म्हणणेही देव- देवळांच्या बाजारात व्यापार, व्यवहाराचे प्रतिक ठरते. या दोन्ही वृत्ती- प्रवृत्तींना निश्चितपणे सज्जन भक्तांना उत्त्र द्यावे लागणार आहे. धर्मसंसदेच्या नावाने जी मंडळी आदेश देत आहे, त्यांचा या क्षेत्रातील अधिकार, अभ्यास आणि मक्तेदारी याचाही सर्वार्थाने विचार करावा लागेल. कोणाताही धर्म हा जसा मानवाचे अस्तित्व टीकवण्यासाठी महत्त्वाचा आहे, तसेच देव आणि देवत्व ही संकल्पना मानवातील सदाचार, सद्व्यवहार आणि सद्वर्तन टीकविण्यासाठी आवश्यक आहे. एकवेळ मंदिरात मूर्ती नसेल तरी चालेल मात्र, माणसाच्या मनात देव आणि देवत्वाचे अस्तित्व, वास, प्रचिती, अनुभूती अथवा अनुभव असणे आवश्यक आहे.


(प्रसिद्धी - रविवार, दि. 31 ऑगस्ट 2014 तरुण भारत)

No comments:

Post a Comment