Wednesday, 4 February 2015

फॅमिलीचा "मोबाइल" संवाद...

काही दिवसांपूर्वीचा किस्सा. मी एका मान्यवर आणि ज्येष्ठ मित्रासोबत त्यांच्या सुप्रसिद्ध सुपर शाॅपमध्ये गप्पा करीत होतो. विषय मोबाइलवरून सुरू होवून कुटूंबाकडे वळला. पालकांचा मुलांशी संवाद होत नाही असा मी स्वानुभव सांगत होतो. एकच मुलगा, पण तो आम्हा उभयतांशी दिवसभरात एकदाही बोलत नाही असे माझे गार्‍हाणे होते. आम्ही चर्चेत चौघे होतो आणि मुलांशी संवाद होत नाही यावर सहमत होतो.

मित्र म्हणाले, "दहावीपर्यंतच्या शिक्षणाला पोहचेपर्यंत मुले पालकांकडून उत्तरांची अपेक्षा करतात. काॅलेजात गेली की, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे तीच मित्रांमध्ये शोधतात. आता तर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मोबाइल देतो. म्हणून मुले पालकांपेक्षा मित्रांशी जास्त बोलताना दिसतात." मला मित्राचे बोलणे मान्यच होते. मी म्हणालो, "खरे आहे. आज काल माझे मुलाशी बोलणे केवळ वाहन चालवताना होते." ते सुध्दा तो चालक असेल आणि मी बाजूला असेल तर. अर्थात, बायको मात्र मागे गप्प बसते किंवा झोपलेली असते. गाडीतल्या या गप्पाही मुलाच्या कलाने होतात. त्याला गाडी सावध चालव असा सल्ला द्यायचा नसतो. आता तर तो चालक म्हणून बसण्यापूर्वी तशी अटच घालतो, पप्पा गाडी चालवताना सल्ला द्यायचा नाही. त्याच्या सोबत बायकोही म्हणते, "तुमच्यापेक्षा तोच चांगली चालवतो बरे !" मग पुढे गप्प बसण्याशिवाय मी काय करू शकतो ? पण खरे सांगतो, तेव्हा मनातून मी आनंदी असतो कारण, मुलाच्या सुरक्षित ड्रायव्हिंगवर हा फॅमिलीचा विश्वास असतो. असो, थोडे विषयांतर झाले.

पण अलिकडे मला वाटते की, मी गाडीत गप्प बसून ऐकत असलो की, मुलगा माझ्याशी भरभरून बोलतो. काॅलेजच्या, मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या गप्पा करतो. गंमत म्हणजे मला सुनावतो, पप्पा पण तेथे तुमची चूक झाली म्हणून. माझी बायको आता शहाणी झाली आहे. मुलगा बिनतोड युक्तिवाद करतो म्हटल्यावर ती त्याच्याशी वाद वाढवत नाही. कारण तिच्याशी मौखिक वादात आतापर्यंत नेहमी हरणारा मीच एकटा पुरूष तिला भेटलोय...

वरील सर्व विषय आमच्या गप्पांमध्ये चर्चेत होते. मी म्हणालो, "लाँग ड्रायव्हिंग वगळता मुलाशी बोलायला अजून दुसरी जागा सापडली नाही." मित्र म्हणाले, "कधीतरी जेवायला बाहेर जात जा." मी हसून तसाही अनुभव सांगितला. तिघे जेवायला बाहेर जातो. प्रायव्हसी मिळेल असा टेबल शोधतो. आर्डर दिल्यानंतर तिघेही मोबाइलवर खेळत बसतो. जेवणाच्या आस्वादावर आणि कशावरही चर्चा नसते. हसलोच तर व्हाट्स अपवर आलेला विनोद सांगितल्यावर... मी माझा हा अनुभव सांगत होतो... आता मात्र मित्र हसला आणि म्हणाला... "माझाही असाच अनुभव आहे. आमचेही असेच होते. पण आम्ही तेथेही समोरासमोर असताना मोबाइल फॅमिली चॅटींग सुरू केले आहे. थेट चेहरा, डोळे, हास्य ओठांचा संवाद टाळून मोबाइल स्क्रिन, व्हाट्स अप, स्मायली, फिलिंग असा संवाद आम्ही करतो..."

हे सांगतांना ते मन मोकळे हसले. मी गप्पा आवरत मुलाशी आणि बायकोशी संवादाचा नवा मार्ग मिळाल्याच्या आनंदात तेथून उठलो...

(ही पोस्ट केवळ वाचू नका. कुटुंबाशी संवादाचे आपले मार्ग, पर्याय, अनुभव शेअर करा)

एक चांगला लेख आवर्जून वाचा-

WHAT A NUISANCE CELL PHONES CAN BE!!

https://senselessramblingsofthemindless.files.wordpress.com…


(Posted on FB - २२ जानेवारी २०१५ )


No comments:

Post a Comment