Thursday 12 February 2015

बदलाचा उंबरठा ओलांडताना...


खान्देशच्या मातीत रुजलेले दैनिक ‘जळगाव तरुण भारत’ आज 18 वर्षांची वाटचाल पूर्ण करून 19 व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. प्रखर हिंदूत्ववादी आणि उज्ज्वल राष्ट्राभिमान, राष्ट्रीय एकात्मतेचा विचार अंगिकारून नागपूर येथे वृत्तपत्राचा चेहरा लाभलेल्या ‘तरुण भारत’च्या मूळ स्थापनेपासूनच्या वाटचालीचा इतिहास 88 वर्षांचा आहे. स्थापनेपासूनच्या कालावधीचा विचार केला तर ‘जळगाव तरुण भारत’च्या प्रवासाला दीर्घ काळाची वाटचाल असे म्हणणे योग्य होणार नाही. परंतू, ‘जळगाव तरुण भारत’ अनेक स्थित्यंतराच्या काळातही आपले अस्तित्व आणि ओळख कायम ठेवू शकला, ही या द्विदशकाच्या प्रवासातील निश्चित समाधानाची बाब आहे. 


‘तरुण भारत’ परिवाराने स्थापनेपासून अनेक प्रकारच्या स्थित्यंतराचा अनुभव घेतला. अनेक अडचणी, संकटे आणि अडथळ्यांचा मुकाबला केला. काही स्थित्यंतरे कालौघात अपरिहार्य म्हणून निर्माण झाली तर काही मानवी अपेक्षा, गरजांमधून घडून आली. स्थित्यंतरातून बदलाची क्रिया घडून येते. इच्छा असो की नसो त्यातून होणारे क्रियात्मक बदल स्वीकारावे लागतात. ते अनुकूल किंवा प्रतिकूलही असतात. यातून होणारा बदल सक्तीचा असतो. मात्र, काळासोबत बदलाचे धोरण स्वतः संस्थेने स्वीकारले की, बदलाची क्रिया ही निश्चित दिशा ठरवून अपेक्षा, उद्दिष्टपूर्तीकडे नेणारी ठरते. संस्था आणि बदलाच्या प्रवाहातील प्रत्येक घटक केवळ वाहून जाणे न स्वीकारता आपण असे का प्रवाहीत झालो, आपण कोणत्या दिशेने वाहून जात आहोत आणि आपले अंतिम उद्दिष्ट काय आहे? याचाच विचार करून प्रवाहाशी जुळवून घेतो किंवा प्रवाहाशी संघर्ष करीत पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारचे कार्य विधायक बदल आणि ध्येय्य प्राप्तिचे उदाहरण ठरते. वेळ, काळ आणि स्थिती यानुसार घडणारी बदलाच्या या प्रवाहाची क्रिया जळगाव ‘तरुण भारत’मध्ये ठरवून घडते आहे. बदलाचा एक उंबरठा आम्ही निश्चय करून ओलांडत आहोत. आमच्याही मनात ‘अच्छे दिन आए है’ चा दृढ संकल्प आहे. या संकल्पाची पार्श्र्वभूमी, कारणे आणि वैशिष्ट्ये ही आम्हाला आमचे वाचक, विक्रेते, हितचिंतक, जाहिरातदार, हितसंबंधी आणि मित्र संस्था, संघटनांना सांगणे आवश्यक वाटते.

स्वातंत्र्यपूर्व काळात सन 1926 मध्ये गांधीवादी विचारांच्या प्रचार व प्रबोधनासाठी ‘तरुण भारत’ हे साप्ताहिकाचा चेहरा घेवून नागपूर येथून सुरू झाले. तेव्हा स्वातंत्र्यप्राप्ती हेच सर्व समाजघटकांचे अंतिम उद्दिष्ट असले तरी कॉंग्रेसमध्ये जहाल आणि मवाळ मतप्रवाहांमध्ये अंतर होते. जहाल विचारसरणीच्या ‘महाराष्ट्र’ या मुखपत्रात गांधी विचारांना पुरेशी जागा मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर गांधीवाद्यांनी ‘तरुण भारत’ हे स्वतःचे व्यासपिठ निर्माण केले. गांधीवाद्यांचे 1930 मधील असहकार आंदोलन हे इंग्रज सरकारच्या विरोधात असल्यामुळे हे मुखपत्र बंद पडले. 1944 मध्ये जहाल विचारसरणीचे ग. त्र्यं. माडखोलकर यांनी संपादक म्हणून ‘तरुण भारत’चे पुनरूज्जीवन केले. हे स्थित्यंतर मवाळ विचारांच्या ‘तरुण भारत’ला प्रखर हिंदूत्ववादी विचारसरणीचा चेहरा देणारे ठरले. याच काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा प्रभाव व पुरस्कार ‘तरुण भारत’ मधून होवू लागला. गांधी हत्येनंतर लोकक्षोभ होवून त्यात ‘तरुण भारत’ पुन्हा बंद पाडले गेले. अशाही परिस्थितीतून तावून सलाखून निघत माडखोलकरांनी अवघ्या 14 दिवसात ‘तरुण भारत’ पुन्हा सुरू केला. या संकटानंतर ‘तरुण भारत’ची संपूर्ण विचारधारा बदलणारे स्थित्यंतर घडले. सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी ‘तरुण भारत’ची होणारी कोंडी बघितली आणि मदतीचा हात पुढे केला. सन 1956 च्या सुमारास संघाचे तत्वज्ञान आणि हिंदुत्ववादावर निष्ठा असेलेली अनेक मान्यवर मंडळी ‘तरुण भारत’च्या व्यवस्थापनाशी जोडली गेली. मात्र, संपादक म्हणून माडखोलकरांच्या स्वातंत्र्यावर देवरस यांनी कोणताही बंधने घातली नाही, उलटपक्षी त्यांना अधिक स्वातंत्र्य दिले. याच विचारधारेतून संयुक्त महाराष्ट्राचा मुद्दा ‘तरुण भारत’ने लावून धरला. गरजेतून होणाऱ्या स्थित्यंतरामुळे पुण्यातून ‘तरुण भारत’ची स्वतंत्र आवृत्ती सुरू झाली. एकाच वृत्तपत्राची दुसऱ्या ठिकाणाहून दुसरी आवृत्ती सुरू करणारे ‘तरुण भारत’ हे पहिले वृत्तपत्र ठरले. 

‘तरुण भारत’च्या व्यवस्थापनाने काळानुसार स्थित्यंतरे घडत असताना काही बदल ठरवून स्वीकारले. यात अत्याधुनिक छपाई तंत्राचा वापर, वृत्तसंकलनासाठी जिल्हास्तरावर कार्यालये, अंक पोहचविण्यासाठी वाहन व्यवस्था याबाबतचे निर्णय सत्त्वर घेवून त्याची कार्यवाही करण्यात आली. नागपूर कार्यालयात सॅटेलाईटद्वारे संपर्काचीही व्यवस्था निर्माण झाली. सन 1975 मध्ये देशभरात आणिबाणी असताना संघाचे अनेक मान्यवर नेते तुरूंगात डांबले गेले किंवा स्थानबद्ध केले गेले. पुन्हा ‘तरुण भारत’ बंद होते की काय अशी स्थिती आली. मात्र, संपादकिय मंडळाने हुशारी व कौशल्याने अंक छपाई सुरू ठेवली. याच काळात ‘तरुण भारत’ हे केवळ वृत्तपत्र नव्हे तर संकटसमयी मदत उभी करणारी संस्था अशी नवी ओळख निर्माण झाली. हा वसा ‘तरुण भारत’ परिवारातील सर्वच आवृत्त्यांनी आजही जपला आहे.

स्थित्यंतराच्या याच प्रवासात खान्देश प्रांतात जळगाव येथून दि. 3 एप्रिल 1996 ला ‘तरुण भारत’ ची आवृत्ती सुरू झाली. औरंगाबाद येथील देवगिरी प्रतिष्ठानने यासाठी पुढाकार घेतला होता. मार्च 2001 पर्यंत ही आवृत्ती अनेक अडचणी, अडथळ्यांवर मात करून सुरू होती. ही आवृत्ती बंद करण्याचा निर्णय मध्यंतरी झाला होता. मात्र, अंतिम टप्प्यात कै. डॉ. अविनाश आचार्य आणि त्यांच्यासोबतच्या काही मंडळींनी ‘तरुण भारत’ पुढे सुरू ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली. दि. 1 एप्रिल 2001 पासून ‘तरुण भारत’ पूर्ववत निघू लागला. ध्येय, उद्दिष्ट आणि विचार यांच्या प्रचार, प्रबोधनाचा वसा पुढे नेण्याचे एक व्रतस्थ कार्य म्हणून ‘जळगाव तरुण भारत’ची जबाबदारी अनेकांनी स्वीकारली. जुलै 2001 पासून ‘जळगाव तरुण भारत’च्या संचालनाची जबाबदारी केशवस्मृती प्रतिष्ठानचा प्रकल्प म्हणून माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानकडे आली. गेली 13 वर्षे प्रतिष्ठानने समर्थपणे ही जबाबदारी पेलली. जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतही ‘तरुण भारत’ पोहचला. खऱ्या अर्थाने ‘तरुण भारत’ला खान्देशाचे वृत्तपत्र हा चेहरा लाभला. माधव बहुउद्देशिय प्रतिष्ठानने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हा अंक सुरू ठेवण्याचे शिवधनुष्य पेलले. दैनंदिन अंक चांगला, दर्जेदार, राष्ट्रीय विचारांनी प्रेरित तसेच स्पर्धेच्या युगात टिकेल अशा आकर्षक छपाईसह वाचकांना देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मध्यंतरी ‘तरुण भारत’ची रचना व छपाईत बदल करुन ती अधिक आकर्षक करण्यात आली. पानांची संख्या चार वरून आठवर नेण्यात आली. अर्थात, ही स्थित्यंतरे प्रतिकूल असली तरी ‘तरुण भारत’चे अस्तित्व टिकवून ठेवणारी होती. या काळात दैनिकाला लाभलेल्या सर्व संपादकांनी राष्ट्रीय विचारानुसार प्रबोधन करण्यासोबतच समाजातील कुप्रवृत्तींवर प्रहार करण्याचे कर्तव्य निष्ठेने पार पाडले. ‘तरुण भारत’ने या काळात वाचकाभिमूख विशेषांकाचे अनेक प्रकल्प राबविले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी मार्गदर्शक ठरेल असा बचतगटांच्या यशोगाथांवरील स्वयंसिध्दा विशेषांक, आरोग्याची काळजी घेण्यासाठी उपयुक्त ठरेल असा आरोग्य विशेषांक व मेडिकल डिरे्नटरी, उद्योग क्षेत्राला उपयुक्त असा उद्योग विशेषांक व इंडस्ट्रीयल डिरे्नटरी, विविध क्षेत्रातील यशोगाथा दर्शविणारा जनरेशन ने्नस्ट, पर्यावरण संवर्धनाबाबत जागृती करणारा वसुंधरा विशेषांक, ज्येष्ठ समाजसेवी कै. डॉ. अविनाश आचार्य यांच्या जीवनचरित्रावरील व समाजातील सेवाभावी संस्थांची माहिती देणारा ‘सेवा समिधा’ अशा विशेषांकांची मालिका ‘तरुण भारत’ने वाचकांना दिली आहे. याच विशेषांक मालिकेतील वेगळा अंक म्हणून 18 व्या वर्धापनदिनाचा विशेषांक हा ‘खान्देशचा विकास ः काल, आज आणि उद्या’ या विषयावर दिला आहे. मासिकाच्या आकारातील हा विशेषांकही ‘तरुण भारत’ने बदलाचा उंबरठा ओलांडला हे कृतीतून स्पष्ट करतो. या अंकातील लेखांचा आशय, माहिती आणि बहुरंगी छपाई हे गुणवत्तेचे सर्व निकष उत्तमतेच्या कसोटीवर पूर्ण करतात. ‘खान्देशचा विकास’ याच विषयावर आज (शुक्रवारी) मान्यवरांच्या उपस्थितीत परिसंवादही होणार आहे. वृत्तपत्र म्हणून केवळ छापिल माध्यम म्हणून काम न करता माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी व नेत्रतपासणी शिबिर, विविध विषयांवर तज्ज्ञ, विख्यात विचारवंतांची व्याख्याने, चर्चासत्र, परिसंवाद आदी उपक्रम राबविण्यात येतात. आगामी काळात यासारखे इतर उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येणार आहे. 

‘तरुण भारत’च्या खान्देश आवृत्तीची ही वाटचाल कधी प्रवाहात होणारे अपरिहार्य बदल म्हणून तर कधी गरजेतून होणारी स्थित्यंतरे म्हणून पाहावी लागतील. आज बहुमाध्यांच्या वाढत्या संख्येत आधुनिक विज्ञान, अतीप्रगत तंत्रज्ञान आणि काळापेक्षाही अधिक गतीच्या व्यावसायिक स्पर्धेने केवळ परंपरांना व कर्मठ विचारांना जखडून चालणाऱ्या प्रसार माध्यमांचे अस्तित्व धो्नयात आणले आहे. या स्पर्धेत टीकायचे तर वृत्तपत्रांना आपली ध्येय- धोरणे लवचिक करीत व्यावसायिकता व वाचकाभिमुखता स्वीकारणे आवश्यक झाले आहे. प्रखर हिंदूत्व आणि राष्ट्राभिमानाचा पुरस्कार करीत इतरही माध्यमांच्या स्पर्धेत उभे राहताना ‘तरुण भारत’ला व्यावहारिक शहाणपण अवगत करणे क्रमप्राप्त आहे. वृत्तपत्राची वाचकांपर्यंत पोहच वाढविणे, वृत्तपत्रातील आशयाची मांडणी आकर्षक करणे आणि परंपरेच्या विचारधारेसोबतच अनुकूल- प्रतिकूल विचार प्रवाहांचा योग्य सन्मान करीत त्यांनाही जागा देण्याचे नवे लवचिक धोरण घेवून ‘तरुण भारत’ने पुढील वाटचाल करण्याचा निर्णय घेतला आहे. लवचिक होणे म्हणजे काळापुढे पूर्णतः झुकणे असे नाही मात्र, वृत्तपत्राच्या अर्थव्यवहाराचे चक्र सतत फिरते ठेवण्यासाठी पुरेशा जाहिराती, पुरेशी वाचक संख्या मिळविण्याचा ठरवून प्रयत्न ‘तरुण भारत’ करणार आहे. हे कार्य व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करून, नितीमूल्यांची जपवणूक करीत आणि ध्येय प्राप्तीच्या निर्धाराने पूर्णतः तडीस नेले जाईल. यासाठी माधव प्रतिष्ठानचे विश्वस्त मंडळ आणि ‘तरुण भारत’ची संपादकिय, वितरण व जाहिरात विभागांची टीम सज्ज झाली आहे. वाचक, जाहिरातदार, एजंट आणि इतर सर्व हितसंबंधी यांचे या बदलास सहकार्य व पाठबळ निश्चित मिळेल हा ठाम विश्वास आहे.

(प्रसिद्धी दि. ऑगस्ट २०१४  तरुण भारत )

No comments:

Post a Comment