जळगाव शहर व परिसरात दि. 8 आणि 9 सप्टेंबर दरम्यान सुमारे 36 तास झालेल्या जोरदार पावसामुळे उपनगरांमधून वाहणाऱ्या नाल्यांना नैसर्गिक उतार व प्रवाहाच्या दिशेने पूर आले. या पुरामुळे नाल्यांच्या काठावरील आणि लगतची पाच हजारावर कुटुंबे पूर्णतः किंवा काही प्रमाणात उध्वस्त झाली. निसर्ग आणि पर्यावरणाशी मनमानी खेळ करणाऱ्या सरकारी व खासगी प्रवृत्तींना या पुराने इशारा दिला. तो का, कसा, कुठे आणि कधीपर्यंत? हे प्रत्येक जळगावकराने समजून घेणे आवश्यक आहे...
पावसाळ्याच्या चारपैकी जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जळगाव परिसरात खुपच कमी पाऊस होता. दरवर्षाची सरासरी गाठली जाईल की नाही, या विषयी शंका होती. मात्र, गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी (दि. 8) दुपारी पाचला जळगाव शहर आणि परिसरात पावसाची झडी सुरू झाली. त्यानंतर तब्बल 36 तासांनी म्हणजे दि. 9 सप्टेंबरला सायंकाळी पाचला पावसाचा जोर कमी झाला. या काळात जळगाव शहर आणि परिसरात सुमारे 155 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. हा पाऊस शहरातील आणि लगतच्या नाल्यांमध्ये न भुतो न भविष्यती, असे पुराचे पाणी घेवून आला. पूर दिवसा आल्यामुळे जीवितहानी टळली पण पाच हजारावर कुटुंबांचे जीवन काहीना काही प्रमाणात विस्तळीत झाले. हा पूर नदीला किंवा धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे आलेला नव्हता. तो शहरवासियांनी जमिन वापरासाठी केलेल्या बेपर्वाईतून आलेला होता, हे आता विनाशखुणा पाहून लक्षात येत आहे. पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम गेले चार दिवस सुरू आहे. किती नुकसान झाले याचा निश्चित आकाडा समोर आलेला नाही परंतु, जळगाव महानगरपालिकेच्या सूत्रानुसार पहिल्या पाहणीत किमान 21 कोटी रुपयांवर नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
जळगाव शहरालगत विस्तारणाऱ्या
उपनगरांमधील नाल्यांवरचे अतिक्रमण आणि त्यांच्या सफाईकडे होणारे दुर्लक्ष या मूलभूत
प्रश्नाकडे पुराने सर्वांचे लक्ष वेधले आहे. दोन दिवसांच्या आपत्तीमुळे नागरी वित्त
व मालमत्तांचे काय नुकसान झाले आणि भविष्यात संभाव्य हानी कशी होवू शकते? याचा गांभिर्यांने
विचार करण्याची गरज आजच निर्माण झाली आहे. यावर चर्चा करीत असताना प्रथम जळगाव शहराचे
स्वरुप, जमिनीचा वापर, नैसर्गिक स्थिती आणि मानवी स्वार्थातून पर्यावरण किंवा वातावरणात
होणारा हस्तक्षेप, त्यातून निर्माण होणारे प्रश्न यावर दृष्टीक्षेप टाकावा लागेल.
जळगाव शहराची स्थिती
शहराची लोकसंख्या पाच लाखांच्यावर
आहे. शहराचे क्षेत्र 68.24 चौरस किलोमीटर आहे. शहरातील लोकांना पिण्यासाठी व वापरासाठी
रोज सुमारे 80 दशलक्ष लीटर पाणी लागते. त्याचवेळी रोज सुमारे 60 दशलक्ष लीटर सांडपाणी
तयार होते. सांडपाणी वाहून जाण्यासाठी मनपाच्या प्न्नया, कच्च्या गटारी आणि नाल्या
आहेत. या शिवाय शहर व परिसरातून वाहणारे पाच-सहा नाले आहेत. यात लेंडी, खेडी, पिंंप्राळा,
गुजर आणि हरिविठ्ठल नाले हे लांब व रुंद असून इतर लहान नाले आहेत. शहरात सर्वांत मोठा
लेंडी नाला असून त्याची लांबी जवळपास 8 किलोमीटर आहे. या नाल्याचा उतार उत्तरेकडून
दक्षिणेकडे आहे. शहराचा नैसर्गिक उतार हा जैनव्हॅली परिसराकडून (याला चांभारखोरे असेही
म्हणतात) ममुराबाद नाल्याकडे आहे. या शिवाय शिरसोली, मोहाडी भागाकडेही काही प्रमाणात
उतार आहे. पिंप्राळा परिसरातून महामार्गावरील गिरणापुलापर्यंतही उताराचा भाग आहे. उताराच्या
याच दिशेने नाले वाहतात. सर्वाधिक सांडपाण्याचा प्रवाह हा ममुराबाद नाल्याच्या दिशेने
होतो. जळगाव मनपा किंवा मध्य रेल्वेची भुसावळ विभागीय कार्यालय यंत्रणा या भागात रेल्वे
पुलाखालचा सांडपाण्याचा प्रश्न गेल्या 20-25 वर्षांत सोडवू शकलेली नाही. जळगाव शहराचा विकास आराखडा
आतापर्यंत तीनवेळा सन 1977, सन 1983 आणि सन 1993 मध्ये सुधारित स्वरुपात तयार करण्यात
आला. या शहराचे मूळ गावठाण क्षेत्र सन 1953 मध्ये 11.45 चौरस किलोमीटर होते. नंतर यात
56.78 चौरस किलोमीटर क्षेत्राची वाढ झाली. उपनगरांच्या लगत असलेली छोटी पाच गावे पिंप्राळा,
खेडी, कुसुंबा, निमखेडी आणि मेहरूण जळगाव शहराला जोडण्यात आली. गावठाण वाढल्यामुळे
नागरी वसाहतींचा विस्तार पाचोरारोड, एरंडोलरोड, भुसावळरोड, औरंगाबादरोड, खेडीपरिसरात
वाढला. त्यातुलनेत ममुराबाद रस्त्याकडे वस्ती फारशी वाढली नाही. याबरोबर लोकसंख्या
सन 2005 मध्ये तीन लाख 40 हजार, सन 2011 मध्ये चार लाख 60 हजार, सन 2014 मध्ये पाच
लाखावर गेली. सन 2031 मध्ये जळगावची लोकसंख्या नऊ लाखांवर जाण्याचा अंदाज आहे.
कोणत्याही शहराची लोकसंख्या
वाढते म्हणजे काय होते? याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. लोकसंख्या विस्तारताना
आहे त्याच जागेचा वापर वाढतो. प्रती चौरस किलोमीटरमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या,
त्यांचा वावर वाढतो. वाढलेली लोकसंख्या नागरी सुविधा, गरजा यावरचा ताण वाढविते. हा
ताण निसर्ग आणि पर्यावरणाच्या स्थितीत बदल करायला मानवाला प्रवृत्त करतो. त्यातून वादळ,
पाऊस, पूर यामुळे उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीची संभाव्यता वाढते.
जमिन वापराचा मुद्दा
आता जमिन वापराचा मुद्दा विस्ताराने
पाहू. जळगावचे क्षेत्रपूर्वी 11.45 चौरस किलोमीटर असताना त्यापैकी केवळ 165 हे्नटर
म्हणजे अवघी 15 टक्के जमिन निवासासाठी वापरात होती. व्यवसायासाठी केवळ 19 हे्नटर म्हणजे
1.63 टक्के, औद्योगिकरणासाठी 693 हे्नटर म्हणजे 60 टक्के, रस्ते-रेल्वेसाठी 16 टक्के
तर नागरिकांच्या सार्वजनिक वापरासाठी 8 टक्के जमिन वापरात होती. शहराच्या विस्तारात
आजुबाजूची गावे जोडल्यामुळे उपनगरांचा विस्तार वाढला. आज जमिन वापराचे चित्र इतिहासातील
टक्केवारीच्या पूर्णतः विपरित दिसते आहे.
जळगाव शहर आणि उपनगरात आज नागरिकांच्या
निवासासाठी जमिन वापर 50 टक्के आहे. कृषीसाठी 10 टक्के, उद्योगासाठी 14 टक्के, रस्त्यांसाठी
8 टक्के, खासगी-नागरी वापरासाठी 14 टक्के, क्रिडांगण-पार्कसाठी 4 टक्के जमिन वापर आहे.
पूर्वी असलेली नागरी जमिन विस्ताराची टक्केवारी 15 वरून 50 टक्केपर्यंत पोहचली आहे.
याचाच अर्थ नागरी वसाहतीसाठी 35 टक्के अधिकृत जमिन अधिग्रहण किंवा अतिक्रमण झाले आहे.
म्हणजेच शहर विस्तारत असताना सांडपाण्यासाठी असलेले नाले, नाल्या, गटारी लगतच्या जागांवर
अतिक्रमण वाढले आहे. त्याविषयी फारशी तक्राही कोणी करीत नाही. नागरी जमिनीवर अतिक्रमणाचे
वाढणारे प्रकार हे गलिच्छ वस्त्यांच्या विस्ताराचे ठिकाण असतात. जळगाव शहरात आज मनपाने
अधिकृतपणे घोषित केलेल्या 25 आणि अघोषित असलेल्या पाच ठिकाणी गलिच्छ वस्त्या आहेत.
या वस्त्यांमधील लोकसंख्या किमान एक लाखावर आहे. यापैकी मोठ्या संख्येतील वस्ती ही
नाल्यांलगत किंवा खदानींच्या काठावर विस्तारलेली आहे. नाल्याच्या प्रवाह क्षेत्रात
भराव टाकून, नाल्यांचा प्रवाह वळवून, फिरवून वस्त्यांमधील कुटुंबे वाढत आहेत.
नाल्यांच्या स्वरुपाविषयीची
पूर्वीची स्थिती काय होती? हे लक्षात घेतले
तर कसा भयावह बदल होतो आहे हे लक्षात येते. जळगाव शहरातील सर्व लहान-मोठ्या नाल्यांची
लांबी मोजली तर ती 30 किलोमीटरपर्यंत जाते. या नाल्यांची पूर्वीची रुंदी जास्तीत जास्त
20 मीटर आणि कमीत कमी 6.8 मीटर होती. सरासरी 4 मीटर होती. ज्याठिकाणी रुंदी जास्त होती
तेथे सांडपाण्यासह पुराच्या पाण्याचा प्रवाह वेगात असायचा. मात्र, जमिन बळकावण्याच्या
स्वार्थापायी नाल्यांची रुंदी कमी कमी होत गेली. आज 30 किलोमीटर पैकी 22 किलोमीटर नाल्यांची
रुंदी अवघी 4 मीटर राहीली आहे.
लेंडी नाला 8 किलोमीटर आहे.
त्यातून रोज 25 ते 30 दशलक्ष लिटर सांडपाणी वाहते. पावसाळ्यात हे प्रमाण कितीतरी पटीने
वाढते. याच नाल्याच्या भोवती अतिक्रमण वाढत गेल्यामुळे तो बहुतांश ठिकाणी रुंद झाला
आहे. जेथे जेथे मातीचे भराव टाकून नाला बुजविला गेला तेथे तेथेच उताराकडे वेगाने वाहणाऱ्या
पुराच्या प्रवाहाने घरांचे व मालमत्तेचे नुकसान केले.
नुकसान कशामुळे झाले?
जळगाव शहरालगतच्या सर्वच उपनगरांमध्ये
पाण्याचे लोंढे उताराकडे वाहत होते. त्याची निचरा होण्याची जागा शेजारची नाली किंवा
नाला होती. त्यामुळे जागा मिळत नाही तोपर्यंत सगळीकडे जलमय शहर असेच चित्र होते. हे
का घडले? हे जाणून घेताना लक्षात आले की, जळगाव शहरातून भुसावळकडे जाणाऱ्या महामार्गालगत
ईच्छादेवी ते कालिकामाता मंदिर दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनधिकृतपणे मातीचे
भराव टाकून नाल्यांचे रुंदीकरण केले गेले आहे. ईच्छादेवी मंदिरालगत तांबापुरा भागात
उजविकडे पूर्वी नाला वाहताना दिसायचा. आता तो शोधावा लागतो. हिच बाब सिंधी कॉलनीच्या
मागील बाजूची आहे. तेथेही भराव टाकून वसाहती वाढत आहेत. वादग्रस्त ठरलेल्या घरकूल योजनेच्याही
परिसरात पुराचे पाणी शिरले होते. मिल्लतनगर व इकबालनगरचा परिसर किमान सात ते आठ फूट
पाण्यात होता. याच भागात नाल्याचा प्रवाह बदलला आहे. शिवाय रस्त्याच्या एका बाजूला
साईमंदिराजवळ नाला अडवून भींत बांधली आहे. या सर्व प्रकारांमुळे पुराच्या पाण्याचा
प्रवाह नैसर्गिक उतार शोधू लागला. पाण्याचा वेग आणि दाबाने कृत्रिम भराव उध्वस्त केले
आणि पाणी पुढे वाहू लागले. हा प्रवाह केवळ आणि केवळ थैमान घालणारा होता. काही लोक असे
सांगतात की, सन 2006 च्या सप्टेंबर महिन्यातही शहर परिसरात जोरदार पाऊस झाला होता.
त्यावेळी नाले बऱ्यापैकी रुंद असल्यामुळे काही काळ पाणी तुंबले पण नुकसान झाले नाही.
यावेळी पुराने केवळ तबाही दाखवली.
मदतीचे हात होते तयार
पुराची ही भयावहता दि. 9 सप्टेंबरला
सकाळी 10 नंतर लक्षात येवू लागली. त्याचवेळी आपदग्रस्तांना मदतीसाठी काही जळगावकरही
पुढे सरसावले. सर्वप्रथम उल्लेख करावा लागेल तो जळगाव मनपाच्या यंत्रणेचा. मुंबईच्या
डीआरटी कोर्टाने जळगाव मनपाचे बँक खाते गोठवले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचे
वेतन मिळालेले नाही. खिशात रुपया नसताना मनपाची यंत्रणा राबत होती. स्वतः आयुक्त संजय
कापडणीस सर्वत्र फिरत होते.लोकप्रतिनिधी म्हणून मनपा पदाधिकारी महापौर सौ. राखीताई
सोनवणे, स्थायी समिती सभापती नितीन लढ्ढा, उपमहापौर सुनील महाजन यांच्यासोबत नेते म्हणून
आ. सुरेशदादा जैन यांचे पूत्र राजेश जैन फिरत होते. त्यांनी पाहणी करीत आपदग्रस्तांना
धीर दिला.
दुसरीकडे रोटरी ्नलब वेस्टचे
पदाधिकारी अनंत भोळे, नितीन रेदासानी यांचे एक पथक, जैन उद्योग समुहाचे दुसरे पथक आणि
इनरव्हिल ्नलबच्या पदाधिकाऱ्यांचे तिसरे पथक अन्नाची पाकिटे वाटप करीत होते. येथे अजून
एक उल्लेख करावा लागेल तो म्हणजे पाऊस व पुरामुळे निम्म्या शहरातील वीज पुरवठा खंडीत
झाला होता. जळगावमध्ये खासगी करार तत्त्वावर क्रॉम्प्टनने वीज पुरवठा सेवा दिली आहे.
त्यांचे प्रमुख भवानीप्रसाद यांनी भरपावसात दुरूस्तीची कामे करुन घेतली. जवळपास संपूर्ण
शहराचा वीज पुरवठा पूर्ववत राहीला. जळगावकरांचे हे रुप आपत्तीशी मुकाबला करणारे समाधानाचे
आणि सामुहिक जबाबदारीची जाणीव करु देणारे होते.
नैसर्गिक उताराचे वास्तव
जळगाव शहराचा सर्वांत उंच भाग
शिरसोली रस्ता व मोहाडी रस्ता परिसर आहे. त्यानंतर मेहरूण, त्यानंतर महामार्गलगतचा
भाग, नंतर जुने जळगाव आणि अखेरीस ममुराबाद रस्ता परिसर आहे.
शिरसोली रस्ता भागात जैनहिल्सच्या
टेकड्या आहेत तेथील पावसाचे पाणी अंबरझरा तवालाकडे जाते. हा तलाव नैसर्गिकरित्या तयार
झालेला आहे. त्या खालोखाल मेहरूण तलाव आहे. पावसाच्या पाण्यामुळे अंबरझरा भरले की तेथील
जादा पाणी मेहरुण तलावाकडे वाहते. मेहरुण तलाव भरला की तेथील सांडव्यावरून जादाचे पाणी
रिधूर नाल्यात वाहते. जळगाव मनपाने अंबरझरा तलावातून पाणी वाहून आणण्यासाठी चारीसुद्धा
केलेली आहे.
दि. 8 आणि 9 सप्टेंबरला जळगाव
शहर व लगतच्या परिसरात 36 तासात 155 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे टेकड्यांवरील
पाणी अंबरझारा तलावात येण्याचा वेग वाढला. याबरोबरच मेहरुण तलावातही पाणी येण्याचा
वेग वाढला. पाण्याचा प्रवाह आणि त्याचा वेग एवढा जोरदार होता की, अंबरझराच्या चारीतील
पाणी मेहरूण तलावात जावूच शकत नव्हते. त्यामुळे या चारीची एक कमकुवत दगडी भींत जोरदार
प्रवाह आणि दाबामुळे फुटली. त्यामुळे मेहरुण तलावातील जादाचे (ओव्हफ्लो) पाणी आणि चारीतील
पाणी वेगाने रिधूर नाल्यात पडू लागले. प्रत्यक्षदर्शी मंडळी असे सांगतात की, मेहरुण
तलावातील पाण्याची उंची पूर्ण भरल्याच्या पाच फूटवर होती. म्हणजेच तलावातून पाण्याचा
अक्षरशः प्रपात सुरू होता.
मेहरुण तलावाच्या खाली आदर्शनगर,
त्यालगत मेहरूणमधील सखल भागातली वस्ती आणि पुढे जुने जळगावचा भाग आहे. नाल्यांच्या
पुराची पातळी सतत वाढू लागली. हा प्रकार दिवसा होत असल्यामुळे पूररेषा क्षेत्रातील
किमान लाखभर जळगावकर सावध होते. जावाईवाडा,
कंजरवाडा, रामेश्र्वरकॉलनी, मिल्लतनगर, इकबालनगर, हनुमाननगर, मेहरुण गावठाण, मलिकनगर, त्यापुढे वाल्मिकनगर, जुने जळगाव, गोपाळपुरा,
गुरूनानकनगर, कोळीपेठ, चांभारवाडा, ममुराबादनाका भागात नाल्यांच्या पुराने उच्छाद मांडला.
दुसरीकडे पिंप्राळा, वाघनगर, किसनरावनगर, हरिविठ्ठलनगर, श्रीधरनगर भागातही नाल्याचे
पाणी घुसले. पुराने शेकडो घरांचे नुकसान केले. वाहने वाहून नेण्याचे प्रकार घडले. उपनगराजवळच्या
पाईप पुलांचे भराव वाहून गेले. जलवाहिनी उखडली गेली. असे अनेक प्रकार घडले.
नाले सफाईचे काय?
दरवर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात
शहरातील नाल्यांच्या सफाईचा मुद्दा गाजतो. यावर्षीही नाल्यांच्या सफाईचे नियोजन केलेले
होते. पुराचा फटका ज्या भागात बसला तो बहुतांश भाग प्रभाग क्रमांक तीनमध्ये येतो. या
भागाचे अधिकारी सुशील साळुंखे यांना विचारले असता ते म्हणाले, आम्ही ठरल्याप्रमाणे
सर्व नाल्यांची सफाई जून पूर्वीच केली आहे. त्याचा सविस्तर तपशील उपलब्ध आहे. तो तुम्हाला
दाखवू शकतो.
माहिती घ्यावी म्हणून अहवालांची
पाहणी केली असता मानराज मोटर्स, गौरव हॉटेल, बीएसएनएल, एमआयडीसी, मोहाडीरोड, आरोग्यनगर,
सेंट टेरेसा स्कूल, उपासनीनगर, कसाईवाडा, आहुजानगर, चावरिया बंगला, रामेश्र्वर कॉलनी
आदी भागात किमान 200 तास जेसीबीने नाले सफाई केल्याचे अहवाल दप्तरी आढळून आले. यापैकी
मानराज मोटर्सचा परिसर अंगावर शहारे आणणाऱ्या पुराच्या परिस्थिीत होता. तेथील दोन चारचाकी
आणि 13 दुचाकी वाहने शेजारच्या नाल्यात वाहून गेली. रामेश्र्वर कॉलनी पुरात एखाद्या
बेटाप्रमाणे दिसत होती.
नाले सफाई केलेली असतानाही
पुराच्या पाण्याने नुकसान कसे केले? या प्रश्नावर साळुंखे म्हणाले, मेहरुण तलाव आणि
अंबरझरा तलावातून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह एवढा वेगात आणि दाबाचा होता की त्यामुळे
सारेच उध्वस्त झाले. शहरात कुठेही पाणी तुंबले नाही. ते वाहून जात होते. त्यामुळे नाले
सफाई झाली नाही असे कोणीही म्हणू शकत नाही. दुसरीकडे पिंप्राळा परिसरातील नुकसानसंदर्भात
प्रभाग चारचे अधिकारी अविनाश गांगोडे यांना विचारले असता ते म्हणाले, आमच्या भागात
संबंधित अभियंत्याने नाले सफाई केलेली नाही असे आढळून आले आहे. त्यामुळे पुराच्या पाण्याचा
फटका काठावरच्या काही घरांना बसला.
ही दोन्ही उदाहरणे प्रशासनाची
तत्परता आणि दुर्लक्ष प्रवृत्ती दर्शवितात. म्हणूनच जळगावच्या नागरिकांना भविष्यातील
संभाव्य हानीचा अंदाज घेवून पुराचे आव्हान स्वीकारावे लागणार आहे. प्रशासन सर्वच ठिकाणी
मदत नाही करु शकत. काही ठिकाणी व्यक्तिगत स्वार्थ आणि नागरी गैरसोय टाळून व्यापक हिताचाच
विचार करावा लागेल. यासाठी प्रत्येक नागरिकाची मानसिकता आणि प्रवृत्ती तयार व्हायला
हवी. नैसर्गिक आपत्तीशी लढा देण्याच्या अगोदरच बचाव, पर्यावरण रक्षण आणि वातावरणातील
अनावश्यक बदल थांबविणे या विषयी एकत्रितपणे जाणीव-जागृती ही सरकारी यंत्रणा, मनपा यंत्रणा,
खासगी नागरी संस्था यांना करावी लागणार आहे. तसे झाले तरच भविष्यात जळगावकर पुराच्या
संभाव्य धो्नयापासून सुरक्षित राहू शकतात.
पुराचे पाणी नुकसान कसे करते?
नद्या-नाले यांच्यातील पुराचे
पाणी कसे नुकसान करते? याचे गणित तज्ज्ञांनी मांडले आहे. पाणी हे जीवनदायी असले तरी
त्याचा प्रवाह, वेग आणि दाब हा जीवन हिरावणाराही आहे. वाहणाऱ्या पाण्याचा वेग प्रती
तासाला किती मैल (एमपीएच) वाहतो आहे? असा मोजला जातो. 100 मैल प्रतीतास म्हणजे 65 एमपीएच
मोजले जाते. तज्ज्ञ मंडळी अशी म्हणते की, वाहत्या पाण्याची उंची 2 ते 4 फूट असेल तर तेथे वाहन उभे करणे धो्नयाचे असते. 4 एमपीएचने
वाहणारे पाणी 66 पाऊंड वजन सहज वाहून नेते. या तुलनेत 8 एमपीएचने वाहणारे पाणी 264 पाऊंड वजनाची वस्तू वाहून नेते.
त्या प्रवाहाचा वेग व दाब किमान साडेतीनपट असतो.
माणसाच्या बाबतीत तज्ज्ञ असे
म्हणतात की, वाहणाऱ्या पाण्याची उंची 0.3 मीटर असेल तर माणसाला त्यात उभे राहणे धोकादायक
असते. वाहणाऱ्या पाण्याची उंची 1.8 मीटर असेलतर तो प्रवाह माणसाला धक्का मारून वाहून
नेतो. कोणत्याही नदी-नाल्यात मूळ प्रवाह, सांडपाणी, पावसाचे पाणी यामुळे प्रवाहाचा
वेग आणि दाब वाढतो. उतार असेल तर वेग व दाब प्रतिकूलपणे वाढतो. हे वास्तव लक्षात घेवून
माणसाने आपल्या उंचीच्या चारपट पाण्याच्या प्रवाहात कधीही उतरू नये. पाण्याचा पृष्ठभाग
दिसत नसेल तरी त्यात उतरू नये. माणसाला उभे राहण्यासाठी 6 इंच पाण्याचा 6 एमपीएच वेगही
धोकादायक असतो. लोकांचे मृत्यू 3 मीटर पाण्यात जास्त संख्येत होतात. दोन तृतीयांश संख्येत
पोहणाऱ्यांचे मृत्यू पुरात होतात. 32 टक्के मृत्यू वाहने पुरात घातल्याने होतात.
12 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या पाण्यात 20 मिनिटे पोहल्यास शरीराचे तापमान 37 अंश
सेल्सिअसवरुन 27 पर्यंत घसरते. यात शरीराच्या अवयवांची काम करण्याची क्षमता 30 टक्के
कमी होते. त्यामुळे जास्तवेळ पोहणाऱ्याचा अंदाज चुकून शक्तीपात होवून ते बुडतात. पावसाच्या
पाण्याचा थेंब किती लहान असतो हेही समजून घेवू. एक लहानात लहान थेंब एका इंचाच्या
100 भागापैकी 1 भाग (0.0254 सेंमी) किंवा मोठा थेंब एका इंचाच्या 4 भागापैकी 1 भाग
(0.0635 सेंमी) असतो. पावसाच्या थेंबाचा मारा तासाला 7 ते 18 मैल वेगाने (3 ते 8 मीटर
प्रती सेकंद) असतो. पावसाचा वेग थेंबाच्या आकारावर अवलंबून असतो. वाऱ्यामुळे थेंबाचे
विघटन होवून त्याचा वेग वाढतो.
प्रसिद्धी - १४ सप्टेंबर २०१४ तरुण भारत जळगाव
No comments:
Post a Comment