Monday 9 February 2015

अकार्यक्षम उमवि प्रशासनाचे ‘नैतिक मूल्यांकन’ काय?



पाच महिन्यांपासून विद्यार्थिनींचे लैंगिक छळ प्रकरण प्रलंबित : कुलगुरू आणि टीम दोषींना शोधू शकत नाही
प्रशासन प्रमुख असतो जबाबदार कोणत्याही मोठ्या संस्थेच्या व्यवस्थापनाचा प्रमुख हा संस्थेतील अंतर्गत आणि बाह्य व्यवस्थेला जबाबदार असतो, हा साधा नियम आहे. वयाची 25 वर्षे गाठणाऱ्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रशासनाचे प्रमुख म्हणून खान्देशात कुलगुरू प्रा. डॉ. सुधीर मेश्राम यांच्याकडे पाहिले जाते. किंबहुना तेच या सर्वोच्च शैक्षणिक संस्थेचे प्रमुख आहेत. या संस्थेत घडलेल्या एखाद्या अपराधाची अंतर्गत चौकशी करताना त्यातील दोषी किंवा अपराधी शोधून काढण्याचे काम सर्व प्रथम कुलगुरू, कुलसचिव आणि उपकुलसचिवांच्या गोतावळ्यासह सर्व अधिकारी वर्गाने केले पाहिजे. दोन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या प्रकाराकडे ही सारी मंडळी दुर्लक्ष करीत असल्याचेच आतापर्यंत दिसत आहे. 
 शिक्षक भवनात मुलींचा विनयभंग
उमवितील शिक्षक भवनाच्या एका खोलीत विनापरवाना राहणाऱ्या परवीन उर्फ पारती वेलसी (अफगाणी) हिच्या मदतीने अल्ला अब्दुल रहिम मोहंमद याने उमवितील मुलींच्या वसतीगृहातील दोन मुलींचा दि. 3 ऑगस्ट 2014 ला विनयभंग केल्याची तक्रार पाळधी पोलीसात दि. 1 ऑ्नटोबर 2014 ला दाखल झाली आहे. परवीना ही उमविची अधिकृत विद्यार्थीनी नाही. अल्ला अब्दुल हा उमविचा ‘पाहुणा’ नाही. तरीही या दोघांनी शिक्षक भवनात खोली मिळवून निवास केला. या निवासात मुलींच्या विनयभंगाचे प्रकरण घडले. कुलगुरूंकडे मुलींनी दि. 1 ऑ्नटोबरला तक्रार दिली. त्या दिवसापासून आजपर्यंत कुलगुरू मेश्राम हे विद्यापीठ अंतर्गत दोषी कोण? हे शोधू शकलेले नाहीत.


अंतर्गत चौकशीचा फार्स
शिक्षक भवनात राहण्यासाठी परवीन आणि अल्ला अब्दुल यांना कोणी परवानगी दिली हा मुद्दा गेल्या पाच महिन्यांत कुलगुरू, कुलसचिव, बीसीयूडीचे संचालक शोधू शकलेले नाहीत. या प्रकरणातील सत्यशोधण्यासाठी एक समिती नेमली आहे. ही समिती जे घडले त्याचा लेखाजोखा मांडेल. विद्यापीठबाह्य परवीन आणि अल्ला अब्दुल यांना कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याने शिक्षक भवनात प्रवेश दिला हे समिती कधीही स्पष्ट शब्दांत मांडणार नाही. त्यामुळे सत्यशोधन हा केवळ चौकशीचा फार्स राहील हे, आत्ताच सांगून टाकायला हरकत नसावी. समितीने खरोखर दोषींचे नाव जाहीर केले तर त्यांच्या निर्णयाचे तोंडभरून कौतुक करणारी बातमी याच ठिकाणी प्रसिध्द करू. गॅरंटीने!


पोलिसही बनलेत बाहुले
विद्यापीठात शिक्षक भवनात दोन मुलींचा विनयभंग, तो करणारे अपराधी विदेशी, कोणीतरी त्यांना शिक्षक भवनात थांबविले, परविनाचा व्हिसा संपल्याचे सांगण्यात येते, अल्ला अब्दुलाचा उमविशी थेट संबंध नाही असे सारे सूर्यप्रकाशाच्या एवढे स्वच्छ असताना अजूनही पाळधी पोलीस किंवा नेमलेले स्वतंत्र अधिकारीही गुन्ह्यांच्या साखळीवर प्रकाश पाडू शकलेले नाहीत. उमवितील प्रशासन अंतर्गत दोषी शोधत नाहीत आणि पोलीस कायद्याच्या चौकटीत आरोपी शोधत नाहीत. अशावेळी प्रश्न पडतो तो त्या दोन्ही तक्रार देणाऱ्या धाडसी मुलींचे काय? त्यांचा विचार कुलगुरू तसेच पोलीस आणि त्यांचे चौकशी पथक वास्तवाच्या पातळीवर करणार आहेत की नाही? असा प्रश्न पडतो.

 तो कर्मचारी बळीचा बकरा?
दोन मुलींच्या विनयभंगाचे प्रकरण समोर आल्यानंतर उमविच्या शिक्षक भवनातील कर्मचारी सीताराम पवार यांनी आत्महत्त्या केली. अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवून पवार गेले. याचाच लाभ उमवितील कोडगे प्रशासन घेत आहे. परविना प्रकरणात तिचा पासपोर्ट, व्हिसा तपासणी, तिच्या गाईडची नेमणूक, तिचा विद्यार्थी क्रमांक नसणे, तिच्या पत्रावर फॉरेनसेलचे शेरे, तारखांचा बदल,  गाईड- कुलसचिवांनी घातलेले विशेष लक्ष अशा अनेक बाबी समोर असतानाही ही सर्व संबंधित मंडळी आपला अपराध कबूल करायला तयार नाहीत. बहुधा, ही सर्व मंडळी मुलींच्या विनयभंगासाठी आणि शिक्षक भवनातील परवीना व अल्ला अब्दुलच्या रहिवासाकरिता पवारला दोषी ठरविण्याची श्नयता आहे.


थेट गुन्हे दाखल करा
परवीना आणि अल्ला अब्दुलच्या रहिवास आणि मुलींच्या विनयभंगाला उमवि प्रशासनातील सर्व वरिष्ठांचा हातभार लागलेला आहे. त्यामुळे या प्रकरणात फॉरेनसेलचे प्रमुख, शिक्षक भवानाचे प्रभारी प्रमुख, कुलसचिव, बीसीयूडीचे संचालक आणि कुलगुरू यांच्यावर पोलिसांनी थेट गुन्हा दाखल करायला हवा. किमान तशी पहिली नोंद तरी तक्रार-खबर दप्तरी करा. अशी काळ्या अक्षरातील ऐतिहासीक नोंद होते आहे म्हटल्यावर उमवि प्रशासनातील  दोषी किंवा अपराधी पोपटासारखे बोलायला लागतील. जे प्रशासन विनयभंग प्रकरणातील सत्य मांडू शकत नाही, अशा प्रशासनाचे ‘नॅक’चे 3 रे मूल्यांकन करण्याआधी  सत्य, वास्तव, गुणवत्ता या कसोटीवर ‘नैतिक’मूल्यांकन होणे आवश्यक आहे.


(प्रसिद्धी दि. १८ जानेवारी २०१५ तरुण भारत)


No comments:

Post a Comment